गाणे

काय होते अंतरी...

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
6 Jan 2023 - 9:15 am

पाहुनी हसताच तू काय होते अंतरी
बावरा हा जीव माझा भिरभिरे कोठेतरी.

चांदण्यांचे तेज गाली
या फुलांची ओठी लाली
तू बटांना कुरवाळता
बघ हवेची झुळूक आली
वादळे तू कुंतलाना सोडता वाऱ्यावरी.

चाहुलीनं या तुझ्या
बघ पान पान बहरतं
दव भिजले गवत
तव पावलानं बिलगतं
गंध लेवूनी तनूचा बघ फुले ही बावरी.

गाणेकविता

शब्द तू, संगीत तू, तूच गाणे...

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
24 Nov 2022 - 1:44 pm

शब्द तू, संगीत तू, तूच गाणे
अंतरात निनादती तव तराणे.

बहरलेले झाड तू जे कळ्यांनी
बरसलेले मेघ तू जे सरींनी
सजविले आहे मना तू फुलाने.

रात तू जी भारली चांदण्याने
गीत तू जे गायले पाखराने
रंगल्याले तूच ते ना या नभाने.

तूच दर्या, तू नदी अन् झरा तू
चांदणे तू चांद तू अन् धरा तू
ल्यायलेले रुप तू या धरेने........

गाणेप्रेम कविताकविता

फिरुनी केली मनात दाटी...

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
11 Nov 2022 - 9:24 am

फिरुनी केली मनात दाटी जुन्या क्षणांनी
टिपे जराशी झरुनी गेली गालावरुनी.

जुन्या फुलांचा जुना सुगंध अवती भवती
किती क्षणांची घुटमळ जुन्या रस्त्यावरती
फिरूनी ओठावर येती पुन्हा जुनीच गाणी.

किती रेशीम क्षणांचा गुंता गुंतत असता
कुणी उसवला नाही मी पण व्यापून जाता
पसा गतकाळाचा भरला तुटलेल्या धाग्यांनी.

देठ तुटताना तेव्हा रडले होते पान पान
असे उठले होते वादळ उजाड हा माळरान
सडा सुकलेल्या फुलांचा गेला गंध उडुनी.

गाणेभावकविताकविता

कुणा न कळता.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
18 Oct 2022 - 9:11 am

कुणा न कळता भेटत होतो तेव्हा आपण
शब्दा वाचुनी जाणत होतो तेव्हा आपण.

नुकता वसंत आला झाड झाड मोहरले
नुकते हृदयी आपुल्या प्रीत झरे पाझरले
नवे फुलोरे झेलत होतो तेव्हा आपण.

भिडता डोळ्यास डोळे हृदयी अनामिक सूर
पळभर दूर होता का उठते मनी काहूर
मनो मनी का झुरत होतो तेव्हा आपण.

तुझ्या आसपास माझे उगाच घुटमळने
नजरेच्या कोनातून हळूच तुझे बघणे
जरा आगळे वागत होतो तेव्हा आपण.

दीपक पवार.

कविता माझीगाणेकविता

मेघ भरुनी येताना.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
3 Mar 2022 - 1:33 pm

मेघ भरूनी येताना रिमझिम धारा झरताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.

रिमझिमती असते बरसात
चिंब चिंब भिजलेली रात
कोंब प्रीतीचे मनात माझ्या हळुवार रुजताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.

मृदगंध भारला वारा
भारी गंधाने गगन धरा
वार्‍यात मिसळल्या मातीच्या गंधावर झुलताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.

हे तरूवर सर्व स्तब्ध शांत
सभोती उदास हा एकांत
अंतरात या तव स्मृतींचा दिप हा जळताना
मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.

गाणेपाऊसप्रेम कविताभावकविताकविताप्रेमकाव्य

रिमझिमत्या धारातून आलीस.

Deepak Pawar's picture
Deepak Pawar in जे न देखे रवी...
17 Feb 2022 - 8:55 am

रिमझिमत्या धारातून
आलीस होऊनिया चिंब
मला वाटले फुलावरती जणू जलाचे थेंब.

मातीस स्पर्शती धारा
गंधात नाहते धरा
तुझ्या तनुचा तसा दाटला, मनात मृदगंध.

पापण्या मिटून दूर
लाजून जाहली चूर
थरथरत्या ओठावर देशी तू दातांचा दाब.

दाटले मनी काहूर
डोळ्यात साठला पूर
उगा बावरी होऊ नको, का घाबरशी सांग?

गाणेकविताप्रेमकाव्य

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
9 Jan 2022 - 11:51 am

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले
अजूनी होते हवे ते परी न आता उरले

उबदार किती ते वाटे गारठ्यामधे
लेवून अंगी जणू चिलखत ते भासे
कितीही संकटे आली जरी
घाव वर्मी ते सोसतसे

किती निगूतीने वस्त्र निर्माण केले
उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले
शिलाई नाजूक टाके अचूक
रंग तयाचे भरदार असले

या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण
कुणी न विणकर आता न विणणार
भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला
पुन्हा कधी न उमटे

miss you!आठवणीगाणेप्रेम कविताबापजन्मभावकवितावडीलविराणीसांत्वनाकरुणकविताजीवनमानव्यक्तिचित्रण

पाळणा झुलू दे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
29 Dec 2021 - 6:15 pm

असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे
या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे

माझ्या या अंगणी आला ग श्रीरंग
काय सांगू बाई माझ्या बाळाचे रंग
किती द्वाड तो धावतो घरात
आवरता आवरेना दिस जाई त्याचे संग

काय काय मागतो खायला प्यायला
लोणी श्रीखंड बासूंदी करंजी घेते मी कराया
रव्या बेसनाचे लाडू मोतीचूर भरपूर
केली खीर, कोशिंबीरी सोबतीला शेवया

माझ्या या बाळाला आयुष्य उदंड लाभू दे
असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे

असा झुलू दे झुलू दे पाळणा झुलू दे
या पाळण्यात माझ्या बाळाला खेळू दे

- पाषाणभेद
२९/१२/२०२१

गाणेशांतरससंगीतकविताबालगीत

चंद्रायण..!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
2 Dec 2020 - 4:50 pm

ही रात निळीशार,
ओतीत चंद्र-धार...
स्वप्नातल्या कळ्यांना
देते नवा आकार!

पाण्यात चंद्र-पक्षी,
मांडून सौख्य-नक्षी...
किरणावरी शशीच्या
होतात मंद स्वार!

पाहून चंद्र-मेळा,
क्षितिजास ये उमाळा...
नक्षत्र बांधतात
तारांस एक-तार!

स्वप्नील चंद्र-गाणे
मधु-मीलनी उखाणे...
गातात फूल, वारे
छेडीत गंध-तार!

एकांत चंद्र-वेडा,
वितळून जात थोडा...
देतो अनामिकेला
अलगूजशी पुकार!

उचलून चंद्र-मेणा,
र्‍हदयात चंद्र-वेणा...
कित्येक चंद्र-वेळा,
करतात येरझार!

— सत्यजित

shabdchitreगाणेभावकवितामाझी कविताशृंगारकविताप्रेमकाव्यरेखाटनस्थिरचित्र

(धागा धागा.....)

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
12 Jun 2020 - 9:01 pm

धागा धागा पिंजत बसुया
प्रतिसादांची चळत रचूया

अक्षांशाचे अयनांशांशी
बादरायणी सूत जुळवूया
धागा विषया फोडुनी फाटे
भरकटवुनी तो मजा बघूया

अध्यात्माच्या मागावरती
शब्दछलाचे तंतू टाकूया
वस्त्र विणूया भरडे तरिही
महावस्त्र त्यालाच म्हणूया
पडलो तोंडावरती तरीही
"जितं मया"चा घोष करूया

धागा धागा पिंजत बसुया...

(नंब्र विनंती: धागाभरकटतज्ञांनी कृ.ह.घे.)
(प्रेर्ना: कवी पी. सावळाराम यांचे गीत " धागा धागा अखंड विणूया)

गाणेविडंबन