मुक्त कविता

पाय सरावले रस्त्याला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
2 Sep 2019 - 12:09 am

-: पाय सरावले रस्त्याला :-

मी चाललो, चाललो इतका की
रस्ता ओळखीचा झाला
दुसरी वाट धरावी तर
पाय सरावले रस्त्याला ||ध्रू||

खाच खळगे नेहमीचे झाले
नवे नव्हते वाटले
अडथळे तसेच होते
पायात काटे खुपसले
काट्यांनी तरी जावे कोठे
त्यांना कोण सोबती मिळाला?
पाय सरावले रस्त्याला ||१||

अडचणी अनंत आल्या
उभ्या राहील्या समोर
नेट लावून सामोरी गेलो
प्रश्न अनेक पुढे कठोर
जंजाळ पसरले समोर असता
एक पक्षी अचूक उडाला
पाय सरावले रस्त्याला ||२||

प्रेरणात्मकभावकवितामाझी कवितामुक्त कविताकविता

शब्द

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
29 Aug 2019 - 4:51 pm

शब्द निरर्थाचे भोई
शब्द अर्थभार वाही
शब्द धूसर सावली
शब्द दाहक बिजली
शब्द कोरडा व्यापार
शब्द अस्तित्वाचे सार
शब्द व्योमापार शिडी
शब्द गहनडोही बुडी
शब्द अटळ कुंपण
शब्दापार मुक्तांगण

मुक्त कविताकविता

स्वरराधा

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
23 Aug 2019 - 12:05 pm

भैरव वा भटियार
पहाट फुलवत येती,
स्पर्श जणू कान्ह्याचे
राधेला उठवुन जाती.

ठाऊक तिला सारंग
माध्यान्ही झुलवत येतो,
"गंध" न त्यास स्वत:चा
तरि वृंदावनी घमघमतो.

यमन असा कान्ह्याचा
यमुनेचे श्यामल पाणी.
निनाद गोघंटांचा
सांज करी कल्याणी.

मालकंस वा जोग,
अमृत बरसे गात्री.
कान्ह्याच्या ओठी वेणू
तिच्याचसाठी रात्री.

कणकणात भिनली आहे
मल्हाराची आस,
मेघ पेटवून जातो
मयूरपंखी प्यास.

पण सूर भैरवीचा का
राधेला माहीत नाही?
युगे उलटली, अजुनी
राधा तर वाटच पाही..

मुक्त कवितासंगीतकविताप्रेमकाव्यमुक्तक

चार थेंब

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
5 Aug 2019 - 5:21 pm

चार थेंबांत संपेल
मग पाऊस तो काय,

चार शब्दांत मावेल,
मग माणसाचं मन ते काय,

संपलाही असता तो,
जर
प्रत्येक थेंबाला आभाळ मिळालं असतं,

मावलेही असते ते,
जर
प्रत्येक शब्दाला आयुष्य लाभलं असतं,

पण मग उरल्या थेंबांचं आणि शब्दांचं काय ?

-अभिजीत

मुक्त कविताकविता

इंद्रधनू

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
28 Jul 2019 - 4:01 am

इंद्रधनू

(आकाशात इंद्रधनुष्य पाहील्याने माझी मुलगी हरकली आहे अन ती मला बोलावते आहे.)

आकाशी ते इंद्रधनू आले
अहा!
चला बाबा बघा
ते पहा! ते पहा!!

कितीक मनोहर मोदभरे
आकाशीचे रंग खरे
कमान तयाची वाकली
माझ्यासवे पहा बरे

दवबिंदूवर प्रकाश पडूनी
आले ते वर उसळूनी
उल्हासीत झाले मी
चटकन या तुम्ही

वर्ण वरी घेई तांबडा
तदनंतर ये नारंगी पिवळा
चमके तो रंग हिरवा निळा
घेवूनी पारवा जांभळा
आकाशी व्यापली प्रकाशमाला

मुक्त कविताशांतरसकवितामुक्तक

कोडगं व्हायचं...

निओ's picture
निओ in जे न देखे रवी...
2 Jul 2019 - 8:03 pm

खुशाल कोडगं व्हायचं
कशाला मनाला लावून घ्यायचं
मनाला लावून घेण्याने परिस्थिती
थोडीच बदलणार आहे
अवतीभवतीची माणसं
थोडीच बदलणार आहेत
कशाला पाहिजे हळवं संवेदनशील मन
लहान सहान गोष्टींनी चरे पाडून घ्यायला
ओरखडे पडायला
काय सुख मिळतं संवेदनशील मनाने
चार ओळी लिहिता येतात
पानभर खरडता येते... एवढंच
सरळ निर्लज्ज व्हायचं
सुखी रहायचं
अर्ध्या हळकुंडात पिवळं व्हायचं
ज्याचं खायचं त्याच्यावरच ऊडायचं
रूबाब करायला कमी नाही पडायचं
येता जाता पिंका टाकायच्या
माणुसकीच्या बाता मारायच्या

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तकजीवनमान

काॅफी पिऊन आले...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
28 Jun 2019 - 10:20 am

ऐकावयास गेले,
बोलून काय आले?
बोलावलेस तू, मी
काॅफी पिऊन आले..

ना थेंब पावसाचा
ओली.. भिजून आले.
भांबावल्या दुपारी
काॅफी पिऊन आले..

होते कुणी न कोणी
नव्हतोच एकटे ना?
लोकां कसे पटावे
काॅफी पिऊन आले?

पेले जरी रिकामे
डोळे भरून आले..
वाहू मुळी न देता
काॅफी पिऊन आले.

मुक्त कविताकवितामुक्तक

धागा चालेना, धागा पळेना... धागा संथ चाली, काही केल्या पेटेना

चामुंडराय's picture
चामुंडराय in जे न देखे रवी...
23 Jun 2019 - 6:53 am

कवी " बी " यांना विनम्र अभिवादन

धागा चालेना, धागा पळेना
धागा संथ चाली, काही केल्या पेटेना

गेलो ट्यार्पीच्या बनी
म्हंटली ट्रोलांसवे गाणी
आम्ही सुरात सूर मिळवून रे

गेलो डू-आयडीच्या बनी
डूख धरला मी मनी
ट्रोलांसवे गळाले आयडीभान रे

चल ये रे, ये रे ट्रोल्या
टोचू उचकवू घालु काड्या
टाकू पिंका पिंक पोरी पिंक पोरी पिंक

हे मिपाचे अंगण
अम्हां दिले आहे आंदण
ट्रोलिंग करू आपण सर्वजण रे

आयडी विषयाचे किडे
यांची धाव प्रतिसादाकडे
आपण करू शुद्ध "पिंक"पान रे

vidambanकाहीच्या काही कवितामुक्त कविताविडंबन

दे दे दे दे दे दे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
18 Jun 2019 - 5:46 pm

दे दे दे दे दे दे दे
अगं दे दे दे दे दे दे
जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे
जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे

किती वेळ झाला सारखा हातात घेते
तु जशी मालकीण मी पण मालक आहे
माझ्याच घरात मला चोरी झाली
मालकपणाची शान थोडी तरी दाखवू दे

दे दे दे दे दे दे दे

सारखं सारखं नवर्याला घालून पाडून बोलते

(चाल सोडून:-
भाजी आणा, दळण आणा, इस्त्री करा, डबा भरा)

महत्वाचे ते काम सोडून इतर कामे करवते
वैतागलो मी आता मला विरंगुळा हवा थोडा
सारखा रिमोट हातात ठेवते थोडा मला पण दे
सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे

माझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितामुक्तकविनोदमौजमजा

शोधत होतो पुन्हा स्वत:ला

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
17 Jun 2019 - 9:01 pm

शोधत होतो पुन्हा स्वत:ला
उपसत होतो पुन्हा पुन्हा मी
पुरातनाची प्रचंड पडझड
परंपरांची अपार अडगळ

शोधत होतो अथक स्वत:ला
ऐकत होतो पुन्हा पुन्हा मी
वर्तमान हतबल करणाऱ्या
भवितव्याचे भीषण पडघम

ऐकत होतो अधीरपणाने
माझीच अनोळखीशी चाहूल
कळून चुकला पुन्हा, स्वतःचा
शोध विफल ठरण्याचा संभव

मुक्त कवितामुक्तक