दिवाळीचे दिवस - डॉ. सुधीर रा. देवरे
बालपणी दिवाळी आली की नव्या कपड्यांपेक्षा फटाकड्यांचीच जास्त ओढ लागायची. पंधरा दिवस दिवाळी पुढे रहायची अशा बेताने मी आण्णांच्या मागे फटाकडे आणण्याचे टुमणं लावत असे. दुसरीकडे माझी आकाशदिव्याची तयारी सुरू व्हायची. तेव्हा सुध्दा विरगावला व्यापार्यांच्या दोन तीन घरांमध्ये रेडीमेड आकाशदिव्यांची फॅशन सुरू झाली होती. पण सर्वच गाव टोकरांच्या कामड्यांपासून तयार केलेल्या घरगुती आकाशदिव्यातच समाधान मानणारे होते. मला विमान आणि चांदणीचे आकाशदिवे करता येऊ लागले होते. म्हणून एका वर्षाआड मी आकाशदिवा करत असे. सलग दोन वर्ष मी तोच आकाशदिवा लावत असे.