ती एकदाच दिसली...
ती एकदाच दिसली अन् छंद होत गेला
दिनदर्शिका-फुल्यांचा धरबंद होत गेला!
होती कथा विराणी,झाली गझल रुमानी
बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला!
शर खोल-खोल रुतला नजरेतला तिच्या अन्
एकेक मंद ठोका मग बंद होत गेला!
केसांत मोकळ्या त्या मन गुंतवीत गेलो
कमळात बंद भुंगा स्वच्छंद होत गेला!
टिपतो सुगंध वारा..उबदार ओंजळींनी
बागेतल्या कळ्यांचा गुलकंद होत गेला!
ती गुणगुणत असावी बहुतेक शेर माझे
प्रत्येक शब्द माझा मकरंद होत गेला!
केंव्हातरी अचानक येतो सुगंध अजुनी
हा कायदा ऋतूंचा,बेबंद होत गेला!
—सत्यजित