फारा वर्षांपूर्वीचा हा अनुभव .... लिहावासा वाटला.. म्हणून लिहिला...
सभोवार पसरलेले पांढरे शुभ्र बर्फ. कुठलाच रंग नसलेले आकाश आणि आसमंतात घुसणारे मत्त वार्याचे झोत. प्रत्यक्ष अनुभवताना काहीतरी अद्भुत आणि अगदी बिन ओळखीचे पाहते आहे असेच वाटत गेले. आभळातून हिमकणांची संततधार लागलेली. आधीच जमिनीवर मढलेल्या शुभ्र गालिच्यावर बर्फाचे पांढरे नाजुक थेंब पाहता पाहता मिटून जात होते. हिरवे गवत, काळी माती, नीळे आकाश, ह्या व्याख्याच ह्या हिमवादळाने उधळून लावल्या आहेत. आता रंग फक्त दोनच, एक जमिनीवर अच्छादिलेल्या सर्वव्यापी बर्फाचा पांढरा आणि दुसरा निष्पर्ण झाडाच्या बुंध्याचा करडा.