पुणे-मुंबई या दरम्यान प्रवास करताना सह्याद्रीची रांग खंडाळा ते खोपोली या दरम्यान उतरावी लागते. या दरम्यानच वाहनांसाठी किंवा रेल्वेच्या दळण-वळणासाठी खंडाळ्याचा घाट किंवा जुना बोर घाट बांधलेला आहे. आपण या घाटातून वाहनाने प्रवास करीत असू किंवा रेल्वेने, खंडाळा ओलांडले कि घाटात डाव्या हाताला एक भेदक सुळका आकाश फाडीत गेलेला दिसतो.
नियमीत प्रवास करणार्यांना किंवा डोंगरभटक्यांना त्याची ओळख असते, "डुयक्स नोज" किंवा स्थानिक भाषेत "नागफणी". एकुणच त्याचे उग्र रुप पाहून इथे कधी जाणे शक्य होईल असे सामान्य प्रवाशाला वाटत नाही आणि त्याचे कुतुहल संपते आणि लक्ष हातातल्या चिक्कीकडे वळते. पण मंडळी इथे जाणे अगदी सोपे आहे, अगदी वर्षाविहाराचा किंवा एक दिवसीय पावसाळी भटकंतीचा प्लॅन तुम्ही करू शकता. तेवढाच भिजायचा आनंद आणि थोडी पायपीटसुध्दा.
ड्युक्स नोज, नागफणी परिसराचा नकाशा
इथे जायचे म्हणजे अगदीच सोपे काम. एक तर पुणे-मुंबई महामार्ग काय किंवा लोहमार्ग काय, खुप वर्द्ळ त्यामुळे, इतर ठिकाणी वाहनामुळे होणारी गैरसोय इथे होत नाही. शक्यतो स्वताचे वाहन या भ्रमंतीसाठी न आणलेले चांगले, कारण आपण जाणार एका रस्त्याने आणि परतणार एका रस्त्याने, गाडी एका ठिकाणी लावली तर निष्कारण तिथपर्यंत परत जाण्यासाठी दगदग करावी लागायची. या भ्रमंतीसाठी तरी स्वताची गाडी न वापरणेच चांगले. फार मोठा ग्रुप नसेल आणि माहितगार कोणी नसेल तर उत्तम म्हणजे एखाद्या ट्रेकिंग ग्रुपबरोबर जाणे. या दिवसात फेसबुक, व्हॉटस अॅपवर अशा जाहिराती पहायला मिळतात.
पुण्याहून निघायचे असेल तर, भल्या पहाटे उठून सहा वाजता निघणारी सिंहगड एक्सप्रेस सोयीची. तुम्ही त्यासाठी शिवाजीनगर स्टेशनला आलात तर उत्तरीय म्हणुन टी शर्ट, तर अधरीय म्हणून जीन्स, स्पोर्ट पँट किंवा थ्री-फोर्थ व मागे सॅक अडकविलेली अशी तरुणाईची हि जत्रा पहायला मिळेल. जरा कानोसा घेतलातर एल-व्ही, टि-टि किंवा आर-एम किंवा लो.भी. असे काही तरी अगम्य संभाषण एकू येईल, पण मुरलेल्याना हे काय चाललय ते नक्की कळेल. आपण मात्र या सहलीसाठीचा आपला वाटाड्या शोधायचा आणि पैसे भरुन ट्रेनची वाट पहायची. एखादा मित्र असला तर ठीक नाहीतर सगळेच समव्यसनी किंवा डोंगरव्यसनी असल्यामुळे नवीन मैत्र होउन जातात. ट्रेनमधेच येणारा नाष्टा चापायचा ( हो, नाहीतरी ईतक्या पहाटे तुम्हाला कोण खायला करुन देणार आहे? आई असो किंवा बायको ?) खंडाळा आला कि म्होरक्या ( ग्रुपलिडर हो ;-) ) आपल्याला उतरायला सांगतो.
मुंबईकरानी देखील हेच करायचे, फक्त सोयीची रेल्वे पकडायची, नसेल तर आपल्या महामंडळाची एस.टी. आहेच सेवेसी तत्पर. फक्त वाहकसाहेबांना खंडाळा स्टेशनजवळ सोडण्यास सांगायचे.
तर आपण पोहचलो थंड हवेच्या खंडाळा स्टेशनवर. गाडीतर आता उतारावर धावायला लागून समोरच्या बोगद्यात अदृष्य होते पण आपल्याला आता ड्युक्स नोजकडे जाण्यासाठी दोन वाटा आहेत. मुंबईच्या दिशेने तोंड करुन उभारल्यानंतर डाव्या हाताच्या दिशेने एक वाट फुटते. या वाटेने जायचे तर सध्याच्या ट्रॅकच्या डावी कडे आणि उजवीकडे वापरात नसलेले ट्रॅक आहेत.
पैकी डाव्या हाताच्या रस्त्याने निघालो कि अनेक धनिकांचे बंगले लागतात. आपलाही इथे बंगला असता तर किती मस्त झाले असते असे वाटल्यावाचून रहात नाही.
याच्या पुढे वळणळहून आलेल्या पाण्यानी भरलेला टाटा तलाव लागतो.
मात्र इथे फार न रेगांळतापलीकडच्या वाटेने वरचे पठार गाठायचे. इथेपर्यंत दिड दोन तासात आपण पोहचतो.
याशिवाय दुसरा मार्ग म्हणजे खंडाळा स्टेशनपाशीच उजव्या हातालासुध्दा वापरात नसलेला ट्रॅक आहे. या ट्रॅकच्या उजव्या कडेने पाउलवाट चढायला सुरु होते. वाटेत पाण्याचे तीन मोठे पाईप लागतात. यांच्या खालूनच पुढे जायचे.
याच्यापुढे एक मोठे पठार लागते. आपण जुलै ऑगस्टच्या आसपास आलो तर फक्त हिरवळ असते.
पण तेच सप्टेंबर महिन्यात आलो तर एक्झॅकम आणि ड्रॉसेरा ईंडिका किंवा दवबिंदु वनस्पती पहायला मिळतात.
यानंतर आपण टाटा डॅमच्या आउटगेट्पाशी येउन पोहचतो.
पुढे चालायला सुरुवात केली कि डावी कडून वीजेचा टॉवर दिसतो आणि डोक्यावर हाय टेन्शन लाईन असते. समोरच्या टेकडीवर चढून जायचे.
आता डावीकडे डोंगर रांग असते. आणि डोंगरावरून येणारे अनेक ओढे आपली वाट रोखतात. ईथेपर्यंत काही नाजुक पामर विंडचिटर किंवा रेनकोट मधे बंदिस्त होउन पावसापासून बचाव करीत असतात.
या ओढ्यापाशी थांबून त्यांना रेनकोट काढायला लावून यथेच्छ भिजवले जाते आणि माणसात आणले जाते.
वाटेत काही वेळा ढगांचा पडदा दुर झाला तर दरीचे मनमोहक दॄष्य पहायला मिळते.
तर काहीवेळा ढग कड्याला धडकून उसळून वर येताना दिसतात.
एकंदर निसर्गाची विवीध रुपे निरखत इथे पर्यंतचा प्रवास कसा झाला ते कळतच नाही. मधेच खेकडे देवानंदसारखे तिरके तिरके पळत बिळात अदृष्य होतात.
जागोजागी अश्या याच काळात दिसणार्या वनस्पती उगवलेल्या असतात.
पावसाने किडे मोठ्या संखेने दिसतात, त्यातला एकतरी माझ्या जाळ्यात येइल आणि मेजवानी होईल या आशेत हे कोळीदादा.
आता मात्र चिखलाने भरलेली वाट सुरु होते.
मधेच डचेस नोज दर्शन देते.
अचानक एखादी सुबक ठेंगणी प्रश्न करते, "बट व्हाय दिस कॉल्ड ड्युक्स नोज, यार?".
या फोटोवरून ते स्पष्ट होईल कि ड्युक्स नोजचा आकार खरोखर कसा नाकासारखा दिसतो आणि पुढचा हनुवटीसारखा भाग आहे तो डचेस नोज. ड्युक ऑफ वेलिंग्टन यांच्या धारदार नाकासारखा हा सुळका दिसतो म्हणून ईंग्रजानी याचे नाव ठेवले "ड्युक्स नोज". आता साहेब आला कि त्याच्यामागोमाग मॅडम आल्याच ना, त्यांना कसे दुखाउन चालेल, म्हणून हनुवटीसारखा जो भाग दिसतो आहे त्याला नाव दिलय "डचेस नोज". बहुधा ड्युक्स साहेबांचे कुटूंब अपर्या नाकाचे असावे. असो.( फोटो आंतरजालावरुन साभार)
पण ईंग्रजी नाव जितके साजेसे तितकेच कोण्या देशी जनानी दिलेले "नागफणी" हे नावही यथार्थच. एखाद्या प्रचंड नागाने फणा उभारावा असा हा सुळका दिसतो कि नाही सांगा. तेव्हा हि माहिती त्या सुबक ठेंगणीला सांगुन प्लस पाँईट मिळवा.
आता वाट दाट झाडीतून वर चढती आहे.
एक रॉक पॅच चढूण आपण डचेस नोजवर पोहचतो. एरवी हा पॅच सोपा असला तरी खुप पाउस झाला असला तर शेवाळ्यामुळे थोडा कठीण होतो. तेव्हा उगाच पावसाळी चपला किंवा स्लिपर असले काही घालून आलेल्यांची पंचाईत होते.
बरीचशी चढाई झालेली असल्यामुळे इथे थोडी विश्रांती घ्यायची.
एक तर बाकीची गँग अजून मागे असते,
तो पर्यंत पोट्पुजा उरकायची आणि मनसोक्त फोटोग्राफी करायची.
डचेस नोज आणि ड्युक्स नोज ह्या एकमेकापासून वेगळ्या झालेल्या डाईक आहेत.( डाईक म्हणजे ज्वालामुखी थंड होउन डोंगर तयार होताना मधेच खाच राहून जाते, कालांतराने त्याखाचेत लाव्हा वर येतो व थंड होतो. बाहेरचा भाग नंतर नष्ट झाला कि आतील तुलनेने नवीन भाग कातळभिंतीच्या रुपात शिल्लक रहातो, त्याला डाईक म्हणतात )
या दोन्ही भिंतीच्या मधे जी दरी आहे त्यात व्हॅली क्रॉसिंगची अॅक्टिव्हिटी केली जाते. बहुतेकदा ह्या मोहिमा नोव्हेंबर-डिसेंबरमधे घेतल्या जातात. ( फोटो आंतरजालावरुन साभार)
पण क्वचित पावसाळ्यातही याची मजा घेतली जाते. शक्य असेल तर आपणही हा थरार अनुभवु शकतो.
याशिवाय याच नागफणीवरून रॉक क्लायबिंंग आणि रॅपलींगही केले जाते.
रॅपलींगमधे फक्त दोरावरून उतरायचे असल्याने भीतीवर मात करता आली तर आपणही , जिंदगी ना मिलेगी दोबारा म्हणत हा आयुष्यभर लक्षात रहाणारा अनुभव घ्याच. ( फोटो आंतरजालावरुन साभार)
रॅपलींग करुन या नागफणीच्या कमरेवरच एक नैसर्गिक खाच तयार झाली आहे, तिथून परतताना ट्रॅव्हर्सचा गाळण उडवणारा अनुभव घेता येतो. थोडक्यात ड्युक्स नोज हे एक कंप्लिट पॅकेज आहे. ( फोटो आंतरजालावरुन साभार)
डचेस नोजवरुन डुयक्सच्या माथ्यावर आरामात जाता येते.
इथे एक महादेवाचे मंदिर आहे. आणि निवांत दॄष्य पहाता यावे यासाठी रेलिंग लावलेले आहे. मात्र या रेलिंगमुळेच माझा मित्र विकास कडुसकरला एका भयाण अनुभवाला सामोरे जावे लागले. एका मे महिन्यात व्हॅली क्रॉसिंगसाठी त्याचा ग्रुप इथे आला असता,अचानक वळवाचा पाउस तर आलाच पण वीजांचे तांडव सुरु झाले. या रेलिंगमुळे वीज आकर्षित होउन त्याचे झटके त्यांना जाणविले. नशीब बलवत्तर म्हणुन कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. सोयीचा कधी कधी तोटा होतो तो असा.
हा अनुभव तुम्ही ईथे वाचु शकता
Thunderbolt at Dukes
या नागफणीच्या माथ्यावर काही रांजणखळगे पहायला मिळतात. पावसामूळे एखादा गोटा छोट्या खड्यात अडकला कि पाण्याच्या प्रवाहामुळे गोल गोल फिरून तो कातळ कापुन त्याचा कुंडासारखा आकार होतो. हेच रांजण खळगे.
जुलै, ऑगस्ट या महिन्यात ड्युक्स नोजच्या माथ्यावर तुम्ही असाल तर हा सुळका ढगांच्या दाट दुलईत लपेटलेला असतो, मात्र अचानक वारा येतो आणि धुक्याचा नकाब अलगद दुर करतो आणि थक्क करणारे दृष्य सामोरे येते.
समोर खंडाळ्याच्या घाटातील अमृतांजन पुल दिसतो. ( फोटो आंतरजालावरुन साभार)
मात्र हवा स्वच्छ असताना म्हणजे फेब्रुवारीनंतर इथे आल्यास, थेट उत्तरेला राजमाचीचे जोड किल्ले ,त्याच्यामागे ढाक बहिरी, वायव्येला तर माथेरान, चंदेरी, हाजी मलंग, प्रबलगड, ईर्शाळगड आणि बोट उंचावलेला कर्नाळा अशी विस्तृत रांग पहाण्यास मिळते, नैऋत्येला सुधागड, सरसगड हात करतात तर आग्नेयेला लोहगड, विसापुर ,तुंग, तिकोना आणि कोराईगड हे पवन मावळाचे मानकरी दिसतात. समुद्रसपाटीपासून २५०६ फुट उंच जागा असल्यामूळे खुप मोठा परिसर दृष्टीक्षेपात येतो.
दक्षिण पायथ्याशी चावणी गाव आणि अंबा नदीचे खोरे दिसते. तिथे इतिहासप्रसिध्द उंबरखिंड आहे. एकुण मोक्याची जागा पहाता याला निरीक्षणाचा किल्ला म्हणुन का वापरले नाही असा प्रश्न पडतो. दक्षीण बाजुला थोडली तटबंदी उभारली असती तर हे सहज शक्य होते. बहुधा वर्षभर पुरेल इतक्या पाण्याची सोय इथे झाली नसावी.
खंडाळा स्टेशनपासून निघून निंवात फिरत हि सगळी सहल चार पाच तासा आरामात झालेले असतात.
परतीची वाट मात्र सोपी आहे. वर चढतना खडा असणारा हा सुळका मागच्या बाजुला मंद उताराने कुरवंडे गावाकडे उतरला आहे. हे थोडफार नाणेघाटातल्या नानाच्या अंगठ्यासारखेच आहे.
अर्ध्या तासात जपून उतरत आपण कुरवंडे गावात दाखल होतो. गावात प्रशस्त मारुती मंदिर आहे. आपण एखाद्या ग्रुपबरोबर गेलेलो असू तर इथे चहा नाष्ट्याची व्यवस्था केली जाते. अन्यथा आपण गावकर्याना विनंती करुन चहा नाष्टा द्यायला सांगु शकतो.
इथुन थेट डांबरी सडक आय.एन.एस. शिवाजीच्या कडेकडेने लोणावळ्याला जाते. सात आठ कि.मी.ची वाटचाल आपण आरामत करतो कारण कधी एकदा मगनलाल चिक्की आणि जॅमची चव घेतोय याची ओढ लागलेली असते.
आय.एन.एस. शिवाजी ते लायन पाँईट रस्त्यावरून होणारे नागफणीचे दर्शन
लायन पॉंईटवरुन दिसणारा ड्युक्स नोज किंवा नागफणी
संदर्भग्रंथ
१) पुणे जिल्हा गॅझेटियर
२ ) आडवाटेवरचा महाराष्ट्र:- प्र. के. घाणेकर
प्रतिक्रिया
21 Jul 2017 - 2:37 pm | एस
या काळात नागफणीच्या वर चढणाऱ्या निसरड्या वाटेवर अक्षरशः ट्रॅफिक जॅम लागलेले असते खाली उतरणाऱ्या आणि वर चढणाऱ्या पब्लिकमुळे. फोटो छान आहेत.
बादवे, नागफणी हेच या सुळक्याचे खरे नाव आहे. ब्रिटिशांनी काहीही नाव ठेवोत. आपण नागफणीच म्हणायचे.
21 Jul 2017 - 3:57 pm | स्वच्छंदी_मनोज
मस्तच हो..हाही लेख भारी जमलाय आणी फोटोही सुखद आलेत. पण काही काही फोटोतली जत्रा मात्र निसर्गचित्राशी विसंगत वाटतेय.. पण त्याला काय करणार पावसाळ्याच्या दिवसात नागफणी म्हणजे माणसांची जत्राच झालेय.
ह्याच परीसरात काही घाटवाटाही आहेत, उंबरखिंडीची प्रसिद्ध घाटवाट आहेच त्याशिवाय आंबेनळी, फल्याण, सव, निसण आहेतच. नुसते पावसाळ्यातच नव्हे तर एकंदरीत हे माणगावचे खोरे भटकायला फार मस्त आहे.
21 Jul 2017 - 5:57 pm | कंजूस
साताठ वर्षांपुर्वी मी गेलो होतो खंडाळा वाटेने. खासगी बंगल्यांनी नेहमीची पायवाट बंद केली. एकाने मला एका नाल्याच्या वाटेने पलिकडे नेले होते. तिकडे एका ट्रेकर मुलामुलीचे लग्न मध्ये रोपवेवर झाले. भटजीही रोपवरच मंगगलाष्टके म्हणत होता. ते पाहायला मिळाले. एक चानेलवालेही होते. केदार भट फोटोग्राफर होता. दुसरे दिवशिच्या पेपरात फोटोसह आलेले कात्रण आहे माझ्याकडे.
फोटो अन लेख मस्तच॥
21 Jul 2017 - 7:16 pm | यशोधरा
भा हा री ही ही!
21 Jul 2017 - 7:30 pm | अजया
जबरदस्त! जवळचा ट्रेक आहे. करुन पहायलाच हवा. केव्हाचा हा ड्युक आपले तरतरीत नाक उडवून दाखवतो आहेच! ट्रॅव्हर्स मात्र भितीदायक आहे.
तुम्ही फार छान लिहिलंय. ट्रेक करतोय वाटतंय फोटो बघताना आणि वाचताना!
21 Jul 2017 - 8:38 pm | वरुण मोहिते
पावसाळ्यात त्या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येकाला खुणावणारा परिसर .मस्त
21 Jul 2017 - 9:09 pm | भ ट क्या खे ड वा ला
"या ओढ्यापाशी थांबून त्यांना रेनकोट काढायला लावून यथेच्छ भिजवले जाते आणि माणसात आणले जाते."
हे जाम आवडलं
21 Jul 2017 - 9:44 pm | ऋतु हिरवा
खूप छान लिहिले आहे आणि फोटो जबरदस्त. माहितीही छान सांगितली आहे. मी बरेच वेळा मुंबई पुणे प्रवास केला आहे. त्यावेळी 'नागफणी' या नावावरूनच हा सुळका मी ओळखला होता. तुम्ही म्हणता तसे 'नागफणी' हे अगदी सार्थ नाव आहे तसेच ड्युक्स नोज हे ही सार्थ आहे. एकदा इथे जाण्याची इच्छा होतीच. ती हा लेख आणि फोटो पाहून बळावली. rapling चे फोटो भन्नाट .
22 Jul 2017 - 2:41 am | जुइ
सुंदर फोटो आणि वर्णन!
22 Jul 2017 - 7:35 am | मी कोण
"या ओढ्यापाशी थांबून त्यांना रेनकोट काढायला लावून यथेच्छ भिजवले जाते आणि माणसात आणले जाते."
हे मलाही आवडले. हे वाचुन काही लोकांची आठ्वण झाली - घरात दुलई घेउन बसायचे आणि म्हणायचे "किती छान पाऊस". अशा लोकांना माणसात आणणे गरजेचे असते.
23 Jul 2017 - 7:51 pm | प्रचेतस
१०/१२ वर्षांपुर्वी हा परिसर खूप सुंदर होता. सध्या मात्र कुठल्याही सीजनला येथे गर्दीच असते.
24 Jul 2017 - 5:52 pm | पाटीलभाऊ
मस्त लिहिलंय...! फोटो सुंदर आलेत.
24 Jul 2017 - 6:22 pm | दुर्गविहारी
सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून धन्यवाद. ईथल्या प्रतिक्रीया वाचल्या कि नवा धागा लिहीण्याचा उत्साह येतो. किंबहुणा मि.पा.चा मी ऋणी राहिन. मि.पा.मुळे मी लिहीण्याचा आनंद घेतोय.
एस सर, मी ही नागफणी ह्या मराठी नावाबाबत आग्रही आहे. पण या दिवसात या ट्रेकच्या जाहिराती येतात. त्यामधे ज्यांना ड्युक्स नोज आणि नागफणी एकच आहे याची कल्पना नाही, त्यांचा गोंधल होउ नये म्हणून दोन्ही नावे वापरली आहेत.
स्वच्छंदी मनोज, तुमच्याशी सहमत, माणगाव खोरे जबरदस्त आहे. या परिसरातील अणघाई अजुन राहिलाय. बघुया कधी योग येतो.
बाकी सध्या या परिसरातील प्रत्येक प्रेक्षणीय ठिकाणावर गर्दी होते, पण नाईलाज आहे. फक्त निसर्गाला हानी पोहचु नये आणि प्लॅस्टीकचा कचरा होउ नये अशी प्रार्थना करणेच हाती उरलेय. या साठीच मी आणखी काही खास जागा आहेत, ज्या विषयी मी फार कुणाला सांगत नाही कि त्याविषयी लिहीत नाही. असो.
येत्या आठवड्यात पुन्हा एकदा अनवट किल्ले मालिकेतील पुढचा धागा लिहीन, या वेळी जाउया महाराष्ट्राच्या पार एका टोकाशी, "किल्ले पारगड".
24 Jul 2017 - 10:45 pm | साबु
पण ईंग्रजी नाव जितके साजेसे तितकेच कोण्या देशी जनानी दिलेले "नागफणी" हे नावही यथार्थच.-> नागफणी हे नाव अत्र्यांनी दिले आहे असे लहानपणी वाचल्याचे आठवते.
25 Jul 2017 - 3:46 pm | दुर्गविहारी
असे काही असेल असे वाटत नाही. कारण ब्रिटिश गँझेटियरमधे नागफणी नाव वाचल्यायासारखे वाटते. आणि या सुळक्याला पारंपरिक नाव काहीतरी असणारच ना ?
आचार्य अत्रेंचा खंडाळ्याला बंगला आहे त्यामुळे कदाचित ते ईथे गेलेही असतील पण त्यानी नाव दिले असेल असे वाटत नाही.
प्रतिक्रियेबध्दल धन्यवाद.
25 Jul 2017 - 8:40 pm | शान्तिप्रिय
अतिशय सुंदर आणि माहितीपुर्ण लेख-
25 Jul 2017 - 8:40 pm | शान्तिप्रिय
अतिशय सुंदर आणि माहितीपुर्ण लेख-
25 Jul 2017 - 8:40 pm | शान्तिप्रिय
अतिशय सुंदर आणि माहितीपुर्ण लेख-
25 Jul 2017 - 10:14 pm | दशानन
आवडलं!!!!!
मनापासुन ;)
25 Jul 2017 - 10:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
फार सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. फोटो पण अप्रतिम आहेत. तुमच्याबरोबर आम्हीही सफर करून आलो (न भिजता, न थकता ;) ) पण आता प्रत्यक्ष जावे असे वाटू लागले आहे !
मस्तं लिहिता आहात. नव्या मोहिमेच्या प्रतिक्षेत !
25 Jul 2017 - 11:32 pm | जेनी...
फोटोझ फारच छान आहेत .. तो ओढ्याचा फोटो फार आवडला ..
26 Jul 2017 - 5:10 pm | सिरुसेरि
थरारक अनुभव आणी फोटो . +१
20 Aug 2017 - 5:50 pm | खाबुडकांदा
चला निघुया झणी