एतिहासिक कागदपत्रे वाचताना खुप काळजी घ्यावी लागते, कारण जसा मराठीमधे श्लेष अलंकार आहे, ज्यामधे एकाच वाक्याचे दोन अर्थ निघतात, तसेच मोडी लिपीच्या लिहीण्याच्या सलगतेमुळे कदाचित चुकीचा निष्कर्श निघू शकतो. नेमकी अशीच एक घटना वर्धनगड किल्ल्याबाबत झाली असावी.
जेधे शकावली या शिवचरित्राच्या दृष्टीने महत्वाच्या आणि अस्सल साधनामधे एक उल्लेख आहे, "राजश्रीवर्धनगडास जाउन संपुर्ण उष्माकाल राहिले". १२ आक्टोंबर ते नोव्हेंबर १६६१ असे महिनाभर शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते. पण नेमक्या कोणत्या गडावर असा प्रश्न महत्वाचा आहे. आता पर्यंत सर्वच ग्रंथात 'राजश्रीवर्धनगडास' या वाक्यावरुन राजश्री म्हणजे शिवाजी महाराज सातारा जिल्ह्यातील वर्धनगडावर येउन राहिले अशी माहिती देण्यात आली आहे. पण हि माहिती चुकीची आहे, कारण त्यांचा मुक्काम या वेळी सातारा जिल्ह्यातील वर्धनगडावर नसून पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील राजमाचीच्या बालेकिल्ल्यावर म्हणजे श्रीवर्धनगडावर होता. याचे कारण असे कि याच दरम्यान म्हणजे जाने-फेब्रुवारी १६६१ मधे कारतलबखानाचा उंबरखिंडीत पराभव करुन महाराज दक्षिण कोकणात उतरले. शृंगारपुरच्या शिर्के व पालवणच्या जसवंत दळवी या आदिलशाही सरदाराचां पराभव करुन चिरदुर्ग हा बेवसाउ गड ताब्यात घेतला, व त्याची पुनर्बांधणी करुन त्याला मंडणगड नाव दिले. अर्थात याच काळात शाहिस्तेमामा पुण्यात लालमहालात तळ ठोकून होते. डिवचलेला हा खान पुढील कोणत्या चाली करतो त्यावरही नजर ठेवणे आवश्यक होते. याच काळात पेण परिसरात महाराजांच्या सैन्याच्या हालचाली चालू होत्या. स्वतः महाराजांनी पेणजवळच्या मिर्या डोंगराजवळ नामदारखानाचा पराभव केला. या सर्व घटना या कथित विश्रंतीच्या आसपासच झालेल्या आहेत. याचा अर्थ शाहिस्तेखानाचे सरदार लोणावळा खोपोली परिसरात आक्रमणे करीत असताना शिवाजी महाराज या प्रदेशापासून लांब सातार्या जिल्ह्यात वर्धनगडावर मुक्काम करतील हि शक्यता नाही. एकतर हा परिसर त्यावेळी स्वराज्यात नव्हता, शिवाय फलटणचे निंबाळकर, म्हसवडचे माने असे स्वराज्याचे शत्रु या भागात असताना मुळात १६६१ मधे वर्धनगड अस्तित्वात होता याचा पुरावा नाही. यापुर्वी या परिसरातील गडांची माहिती देतानाच लिहीले आहे कि मिर्झाराजे जयसिंहाबरोबरच्या तहानंतर शिवाजी महाराज व मिर्झाराजे यांच्या संयुक्त फौजांनी आदिलशाही मुलुखावर आक्रमण केले. त्या स्वारीत फक्त संतोषगड उर्फ ताथवडा या किल्ल्याचा उल्लेख सापडतो. या परिसरातील दुसर्या कोणत्याही गडाचे नाव येत नाही. शिवाय या मोहीमेतील प्रत्येक घटना मिर्झाराजे पत्राद्वारे औरंगजेबाला कळवत होते, त्यामधेही वर्धनगडाचा उल्लेख यायला पाहिजे होता. अफझलखानाच्या वधानंतर जरी हा परिसर महाराजांनी ताब्यात घेतला असला तरी सिध्दी जोहरच्या वेढ्यातून पन्हाळ्यावरुन सुटका झाल्यानंतर आदिलशहाशी जो तह केला त्यात हा परिसर त्यांना आदिलशहाला द्यावा लागला. त्या काळात महाराज या परिसरात कोणताही नवा गड उभारणे शक्यच नव्ह्ते. याचा अर्थ वर्धनगडाची उभारणी महाराजांनी १६७१ ते ७३ दरम्यान केली असावी. ( सातारा जिल्हा गॅझेटियरप्रमाणे १६७३ ते १६७४ दरम्यान )
आता रहाता राहिला मुद्दा नावाचा, " श्रीवर्धनगड". जेधे शकावलीच्या उल्लेखाप्रमाणे "राजश्रीवर्धनगडास आले", असा उल्लेख आहे. संशोधकांनी त्याची फोड राजश्री वर्धनगडास आले, अशी केली, कारण बहुतेक संशोधकांना वर्धनगड माहिती होता, पण राजमाचीचे बालेकिल्ले स्वतंत्रपणे श्रीवर्धन व मनरंजन असे ओळखले जातात आणि स्वतंत्र किल्ले म्हणून गणले जातात हि बाब त्यांनी लक्षात घेतली नाही. ( विशेष म्हणजे सध्याच्या रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ रेवस इथे मनरंजन व मांडवा इथे श्रीवर्धन अश्या दोन गढ्या शिवाजी महाराजांनी बांधल्याचा उल्लेख आहे, पुढे त्या मानाजी आंग्रांनी पाडून टाकल्या ) संभाजी महाराजांचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांनी बाजी सर्जेराव जेधे यांना लिहीलेल्या ३ मार्च १६८६ रोजीच्या पत्रात लिहीतात कि, "कबिला ( कुटुंब ) रोहिडागडी ठेउन तुम्ही आम्हापासी श्रीवर्धनगडी भेटीस येणे", मात्र सातार्या जिल्ह्यातील वर्धनगडाचा उल्लेख हा वर्धनगड म्हणूनच येतो.
शिवाय मोडी लिपीत लिहीताना राजश्री श्रीवर्धनगडास आले, असे दोनदा श्री न लिहीता राजश्रीवर्धनगडास असे लिहीणे हे सामान्य बाब आहे, अशी उदाहरणे अन्यत्र आहेत. जेधे शकावलीतही अशी उदाहरणे आहेत.
चिटणीसाच्या बखरीप्रमाणे , " राजारामाच्या जन्मानंतर ( म्हणजे १६७० ) नंतर क्र, गाडगे पुंडपणा करुन होते, त्यास दबावासाठी जागाजागा किल्ले नवेच बांधले. वारुगड, भुषणगड, वर्धनगड, सदाशिवगड, मच्छिंद्रगड हे नवेच बांधले ( संदर्भ- चिटणीसाची बखर, पान क्र- ९२,९३ )
अर्थात वरील सर्व विवेचनावरुन शिवाजी महाराज जरी १६६१ मधे वर्धनगडावर आले नसले तरी गड बांधताना मात्र ते नक्कीच येउन गेले असावेत.
पुढे संभाजी महाराजांच्या वधानंतर ५ में १७०१ मध्ये मोगलांनी पन्हाळा जिंकला. त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष्य सातार्यातील किल्ल्यांकडे वळवले. मोगल सरदार फतेउल्लाखान याने सल्ला दिला की ‘‘ बादशहांनी खटावला छावणी करावी, म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील’’. औंरगजेबाने या योजनेला मंजुरी दिली. दि. ८ जूनला फतेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटावच्या बंदोबस्तासाठी गेला. त्याने खटावचे ठाणे जिंकले. मराठ्यांचा पराभव झाला. यानंतर मोगलांची फौज खटावच्या ठाण्यात जमा होऊ लागली होती. आज ना उद्या हे सैन्य वर्धनगडाला वेढा घालणार हे निश्चित होतं म्हणून वर्धनगडातील मराठ्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांतील लोकांना आक्रमणाची आगाऊ कल्पना दिली होती. ज्या लोकांना शक्य होते त्यांनी आपल्या बायका मुलांना किल्ल्यात नेले. नंतर ९ जून १७०१ रोजी वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्लाखाना जवळ पाठवला. त्याने याला सांगितले की ‘‘किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला देण्यास तयार आहे’’. फतेउल्लाखानाने विनंती ताबडतोब मान्य केली. खरतर फतेउल्लाखानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा वेळाकाढूपणा होता.मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता. किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करणे हा त्यामागील हेतू होता. फतेउल्लाखान किल्लेदार आज येईल उद्या येईल म्हणून वाट पाहात राहीला, पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकला सुध्दा नाही. फतेउल्लाखानाला मराठयांचा डाव लक्षात आला आणि त्याने १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला. त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले, पण यात अनेक मराठे मारले गेले. अनेकजण जखमी झाले. मोगलानी मराठ्यांच्या चाळीस लोंकाना कैद केले. मग मोगलानी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाडया जाळून टाकल्या. या लढाईत मोगलांचे पण अनेक सैनिक प्राणास मुकले. दि. १९ जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. दि. २२ जून रोजी ‘मीर ए सामान ’ या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून सहाशे पंचाहत्तर मण धान्य , चाळीस मण सोरा व बंदुकीची दारू ,सहा मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला. त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून ‘सादिकगड’ असे ठेवले.
वर्धनगड तीन वर्ष मोगलांच्या ताब्यात होता. सप्टेंबर १७०४ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला व किल्लेदार किशोरसिंगला कैद केले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोगलांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. इ.स.१७०७ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला.
इ.स. १८०० मधे हा गड पंतप्रतिनिधीकडून महादजी शिंद्याकडे गेला. या लढाईत शिंद्याचा सरदार मुझफ्फर्खान हा रामोशी सैन्याकडून घोड्यासहित मारला गेला. या लढाईत महादजींची मेहुणी जी सरनौबत घोरपडेंची पत्नी होती, तीने मध्यस्थी केली. पुढे १८०३ मधे गडाचे किल्लेदार बळवंतराव बक्षी यांची आणि येसाजी फिरंगी यांची लढाई झाली. पुढे १८०५ मधे फत्तेसिंग मानेनी गडावर आक्रमण केले. लगेचच १८०६ मधे वसंतगडाच्या लढाईनंतर बापु गोखले यांनी पंतप्रतिनिधींना पकडून वर्धनगडाच्या उत्तरेला असलेल्या चिमणगाव येथे आणले आणि गड ताब्यात घेतला. पुढे १८११ पर्यंत म्हणजे पेशव्यांनी हा गड ताब्यात घेई पर्यंत तो बापु गोखलेच्या ताब्यात राहिला. इ.स. १८१८ मध्ये वर्धनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
सकाळी महिमानगड पाहिल्यानंतर मला त्याच रस्त्यावर असलेला वर्धनगड पहायचा होता. मात्र बस लवकर आली नाही. अखेरीस हात केल्यावर एका ट्रकवाल्याने लिफ्ट दिली आणि सातारा-पंढरपुर रस्त्यावरच्या वर्धनगड गावात मी दाखल झालो. महादेव रांगेतील उपरांग म्हसोबा रांगेवर वर्धनगडाची उभारणी झाली आहे. गडाची उंची समुद्रसपाटीपासून जरी १५०० मीटर असली तरी गावातून जेमेतेम १०० मीटरची चढण आहे. सातरा जिल्ह्यातून जाणार्या महादेव डोंगर रांगेवर, भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे. त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर, कोरगाव पासून ७ मैलांवर व साताराच्या ईशान्येस १७ मैलांवर वर्धनगड किल्ला बांधलेला आहे. सातारा - पंढरपूर मार्गावर कोरेगाव नंतर येणारा घाट याच किल्ल्याच्या पदरातून जातो. किल्ल्याला लागूनच असलेल्या ललगुण व रामेश्वर ह्या दोन डोंगरावरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे.
मी जरी महिमानगड पाहून वर्धनगड बघण्यासाठी गेलो असलो तरी थेट वर्धनगड बघण्यासाठी पर्याय आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी सातारा आणि फलटण या दोन्ही बाजूंनी रस्ते आहेत.
१) सातारा - पंढरपूर रस्त्यावर सातार्या पासून ३० किमी अंतरावर वर्धनगड गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.
२) फलटण - मोळघाट - पुसेगाव गाठावे. या मार्गे पुसेगाव गाव फलटण पासून ४१ किमी वर आहे. पुसेगाव पासून ७ किमी अंतरावर वर्धनगड गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.
३) फलटण - दहिवडी मार्गे पुसेगाव गाठावे. या मार्गे पुसेगाव गाव फलटण पासून ४५ किमी वर आहे. पुसेगाव पासून ७ किमी अंतरावर वर्धनगड गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.
गावातील मुख्य चौकात गडावरच्या दोन तोफा आणून ठेवल्या आहेत. गडावरच्या वस्तु पळविल्या जाणे किंवा त्यांची होणारी नासधूस बघता गावकर्यांनी हा योग्य निर्णय घेतला असे म्हणले पाहिजे.
गावातच गडाचा संपुर्ण ईतिहास आणि माहिती देणारा फलक लावला आहे. एकंदरीत गावकर्यांना गडाचा नुसता फुकाचा अभिमान नसून त्यांची प्रमाणिक तळमळ जाणवते.
( वर्धनगडाचा नकाशा )
वर्धनगड गावातूनच किल्ल्याची भक्कम तटबंदी दिसते.आजही किल्ल्याची तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे.
पायथ्याच्या वर्धनगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एक प्रशस्त वाट आहे. ही वाट थेट गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचवते. या वाटेने गडाचा दरवाजा गाठण्यास अर्धा तास लागतो.
गडाचा बुरुजावर भगवा ध्वज डौलात फडकत होता.
गडाचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचे आहे. आजही ते सुस्थितीत उभे आहे. दरवाज्यापासूनच किल्ल्याची तटबंदी चालू होते, ती संपूर्ण गडाला वळसा घालून पुन्हा दरवाजाच्या दुसर्या टोकाशी येऊन पोहोचते. ही तटबंदी आजही चांगल्या स्थितित शाबूत आहे.
दरवाजा उंचीला फार नाही, तरी अद्याप उत्तम अवस्थेत आहे. मात्र तटबंडीवर उगवलेली साडे वेळीच काढायला हवीत.
गडाच्या जेमतेम उंचीमुळे पायथ्याचे गाव व घरे स्पष्ट दिसत होती.
दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच एक माठे टेकाड दिसते. यावर चढून जाण्यासाठी दगडाच्या बांधलेल्या पायर्या आहेत. या टेकाडावर चढून जातांना वाटेतच हनुमानाची भग्न दगडी मूर्ती आहे.
त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. प्रवेशद्वारापासून टेकाडावर असणार्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटे लागतात.
पुढे शंकराचे छोटेसे देऊळ लागते. मी विचाराच्या तंद्रीत मंदिराच्या उजवी कडून म्हणजे मंदिर डाव्या हाताला ठेउन निघालो. मात्र तिथे बसलेल्या गुराख्याने मला थांबवून मंदिराच्या डाव्या बाजुने म्हणजे मंदिर उजव्या हाताला ठेउन जाण्यास सांगितले. हि साधी गोष्ट आधी न लक्षात आल्याने मला खजील झाल्यासारखे वाटले.
त्याच्या आवारात या उध्वस्त मुर्ती आणि दगडी दिपमाळ दिसते.
महादरवाजातून आत शिरल्यावर डावीकडेच हा ध्वजस्तंभ दिसतो.
या ध्वजस्तंभाच्या थोडे पुढे गेल्यावर तटातून बाहेर पडण्यासाठी चोरवाट तयार केलेली आहे.
गडाला एक दरवाजा आयब ( म्हणजे दोष) आहे, यासाठी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडावर न चुकता उपदरवाजा ( चोर दरवाजा ) आढळणारच.
संपुर्ण गडमाथा वेढून टाकणारी गडाची तटबंदी विलक्षण देखणी आहे. बंदुकीच्या मारगिरीसाठी असलेल्या जंगा जागोजागी दिसतात.
तटबंदीवर सैनिकांना पहारा करता यावा यासाठी अशा फांजा बांधलेल्या दिसतात.
शिवकालीन गडाचे वैशिष्ट्य म्हणजे तटबंदी सरळ न बांधता नागमोडी बांधलेली दिसते, ज्यामुळे तोफगोळ्यांमुळे होणारे नुकसान कमी होते.
सर्वोच्च टेकाडावर गडाची अधिष्ठात्री वर्धनीमातेचे मंदिर आहे. वर्धनीमातेच्या मंदिरात पंचक्रोशीतील लोकांचा राबता असतो. मंदिर जीर्णोध्दारीत असल्यामुळे आकर्षक दिसते.
मंदिरासमोर फरसबंदी चौथरा बांधलेला आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. तसेच समोर दगडी दिपमाळही दिसते.
वर्धनीमाता नवसाला पावत असल्यामुळे कौल लावण्यासाठी भाविकांची गर्दी चालूच असते. मंदिराच्या गाभार्यात सुंदर कासवाची मूर्ती कोरलेली आहे.
मंदिराच्या मागच्या बाजूने टेकाडावरून खाली उतरावे. या वाटेने खाली उतरतांना उजवीकडे पाण्याची टाकी आढळतात.
तटबंदीवर असलेल्या तोफासाठीच्या खिडकीतून खालचा सातारा-पंढरपुरमार्गावरच्या वर्धनगडघाटाची वळणे मोठी झक्क दिसत होती. या मार्गावर पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहावाजेपर्यंत दर अर्ध्या तासाला बसेस आहेत.
गार सावली पाहून एका झाडाखाली बरोबर आणलेला डबा सोडला आणि भोजन उरकून थोडी विश्रांती घेतली. घरी फॅन अथवा ए.सी.च्या गारव्यात झोपून जे सुख मिळत नाही, तो आनंद अशा एखाद्या डेरेदार झाडाच्या सावलीत स्वर्गसुख देउन जातो. यासाठीच सवड मिळाली कि शहरी कृत्रिमपणाचा वैताग येउन पावले एखाद्या गडाकडे वळतात. गडावर आणि पायथ्याच्या गावात जेवणाची कोणतीच सोय नाही, मात्र गडावर पिण्यायोग्य पाणी आहे. जर मुक्कामाची वेळ आलीच तर वर्धनीमातेचे मंदिर आहे.
गडाच्या ईशान्येला असलेला नेरचा प्रचंड तलाव दिसतो. हवा स्वच्छ असेल तर याच बाजुला संतोषगड दिसतो. तर पश्चिमेला नांदगिरी उर्फ कल्याणगड, जरंडेश्वराचा डोंगर, अजिंक्यतारा आणि सातारा शहर दिसते. संपूर्ण गड फिरण्यास एक तास लागतो. एक शिवकालीन गड पाहिल्याच्या आनंदात पायर्या उतरुन गावात कधी पोहचलो ते समजलेच नाही.
आतापर्यंत आपण माणदेशातील संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि आज वर्धनगड यांची स्वतंत्र धाग्यात माहिती घेतली. मात्र बहुतेक जण सोयीसाठी या सर्व गडांना एकत्रित भेट देण्याचा प्लॅन करतात. यासाठी त्याचे नियोजन देतो.
सातारा - पंढरपूर रस्त्यावर कल्याणगड (नांदगिरी), वर्धनगड , महिमानगड हे तीन किल्ले आहेत. मुंबई / पुण्याहून रात्री निघून प्रथम कल्याणगड (नांदगिरी) पाहून घ्यावा. त्यानंतर वर्धनगड , महिमानगड हे किल्ले पाहून फलटण मार्गे परत यावे. यातील वर्धनगड , महिमानगड हे किल्ले आटोपशीर असल्यामुळे तीनही किल्ले एका दिवसात पाहून होतात. त्यासाठी काटेकोर नियोजन आवश्यक आहे. यानंतर वारुगड किंवा संतोषगडावर मुक्काम करुन दुसर्या दिवशी हे दोन्ही गड पहाता येतात. किंवा गोंदवले येथे मठात मुक्काम करणे देखील शक्य आहे. याचबरोबर फलटण शहरातील जबरेश्वर मंदिर आवर्जुन पहावे असेच आहे.
तळटिपः- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भग्रंथः-
१) सातारा जिल्हा गॅझेटियर
२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३ ) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के. घाणेकर
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
६ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
७ ) www.durgbharari.com हि वेबसाईट
प्रतिक्रिया
17 Aug 2018 - 7:47 pm | सिरुसेरि
नेहमीसारखेच अभ्यासपुर्ण लेखन आणी फोटो .
18 Aug 2018 - 9:41 am | प्रचेतस
माणदेशच्या संरक्षक दुर्गचौकडीची उत्तम माहिती दिलीत. छत्रपतींनी बांधलेले हे चारही किल्ले पाहायचे आहेत.
18 Aug 2018 - 1:29 pm | टर्मीनेटर
ही माहिती आजच समजली. धन्यवाद.
18 Aug 2018 - 1:47 pm | प्रचेतस
माझ्या मते सरळ तटबंदी ही नेहमी भूदुर्गांबाबत दिसते. भूदुर्ग समतल जमिनीच्या पातळीवर असल्याने सरळ तटबंदी बांधता येते. गिरिमाथ्यांचा परिघ मात्र वेड्यावाकड्या वळणांचे असल्याने तटबंदी अर्थातच सर्पिलाकार होत जाते.
21 Aug 2018 - 8:41 pm | दुर्गविहारी
असे प्रत्येक्वेळी नाही. जे गिरीदुर्ग शिवाजी महाराजांनी बांधलेले नाहीत त्या ठिकाणी तटबंदी स्पष्ट्पणे सरळ रेषेत दिसते. उदा पुरंदर, सिंहगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, पन्हाळा ईत्यादी. कारण तटबंदी सर्पिलाकार नागमोडी बांधली तर त्याला जास्त प्रमाणात दगड्,चुना आणि ईतर बांधकाम साहित्य लागते. मात्र शिवाजी महाराजांचा दुर्गस्थपतीचा अनोखा पैलु इथे प्रकर्षाने दिसतो.
18 Aug 2018 - 1:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
नेहमीप्रमाणेच सुंदर सफरवर्णन आणि फोटो. ऐतिहासिक माहिती असल्याने वाचताना जास्त मजा आली.
18 Aug 2018 - 3:57 pm | प्रसाद_१९८२
छान ट्रेक वृतांत व उपयुक्त माहिती.
--
भटकंती पावसाळी आणि फोटो मात्र उन्हाळ्यातील, असे का ?
21 Aug 2018 - 8:44 pm | दुर्गविहारी
मी हा ट्रेक साधारण २००३ च्या आसपास केला होता, सहाजिकच त्यावेळी माझ्याकडे डिजीटल कॅमेरा नव्ह्ता. धाग्यातील फोटो मी काढलेले नाहीत आणि तशी स्पष्ट तळटिप दिलेली आहे. प्रतिसादाबध्दल धन्यवाद.
21 Aug 2018 - 8:46 pm | दुर्गविहारी
सिरिसेरी, वल्लीदा, टर्मिनेटर, डॉ. सुहास म्हात्रे साहेब आणि प्रसाद_१९८२ या सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबध्दल आभारी आहे.