जगातील सात आश्चर्यापैकी एक म्हणजे "ईजिप्तचे पिरॅमीड". हे पहाण्यासाठी जगभरातुन हि गर्दी ईजिप्तला उसळते. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात वडगाव मावळ तालुक्यात निसर्गानेच एक पिरॅमीड उभे केले आहे. मात्र हे पिरॅमीड चौकोनी नसून त्रिकोणी आहे. हा आहे पवन मावळाचा आणखी एक रक्षक "किल्ले तिकोना अथवा वितंडगड".
सध्या ऑफबीट भटकंतीचे वारे अगदी कुटुंबकबिल्यासहित फिरणार्या पर्यटकांमधे पसरल्याने राजमाची, हरिश्चंद्रगड,लोहगड अश्या केवळ ट्रेकर्समधे प्रसिध्द असणार्या किल्ल्यांवर आता सर्वसामान्य पर्यटकही दिसु लागलेत. पैकी तिकोन्यावर आता बर्याच सोयी आणि चहा-नाष्ट्याची सोय झाल्याने सुट्टीच्या दिवशी खुप गर्दी निसर्गाचा आनंद लुटायला आलेली पहायला मिळते.
ईथे जायचे तीन मार्ग आहेत.
१) पुणे -मुंबई हायवे वरून कामशेतपाशी पवनानगर( काळे कॉलनी) कडे जाणारा फाटा आहे. याने पवना धरणाची भिंत उजव्या हाताला ठेवून रस्ता तिकोना पेठ येथे जातो. जर स्वताची गाडी असेल तर तिकोना पेठ येथे न थांबता किल्ल्याच्या पुर्व दरवाज्याकडे जाणार्या डांबरी सडकेने पायथ्यापाशी जाउन मळलेल्या वाटेने आरामात तासाभरात माथा गाठता येतो. पुण्यावरून लोणावळ्याला जाण्यासाठी 3.05am, 4.35am,5.45am, 6.30am, 6.55am, 8.05am, 9.00am, 9.55am,11.25am,12.00pm, 13.00pm, 15.00pm, 15.40pm, 16.30pm, 17.30pm,18.10pm,19.05pm,20.00pm,21.00pm,22.10pm या वेळेत लोकल आहेत. कामशेतवरून तिकोणापेठ गावी जाण्यासाठी सकाळी ८.३० ला बस आहे.स्वारगेट (पुणे) वरुन तिकोन्याला येण्यासाठी सोयीच्या बसेस - काशिग- १०.५० (सकाळी), कोळवण- ९.४५,११.१५(सकाळी), जवण- ७.३०,९.००,१.१५,२.३०, शिळीम- ४.४५, पवनानगर- १०.४५ ( बसच्या वेळांची आगारात खात्री करावी)
२ ) पुणे-पिरंगूट मार्गे जवणला उतरून दक्षीण वाटेने तिकोना चढता येतो किंवा तसेच पुढे जाउन तिकोना पेठ मार्गे गडावर जाता येते. जवणवरून गडावर जायला दोन मार्ग आहेत. गावातून दिसणारा सरळ धारेचा मार्ग किंवा लांब वळसा घालून जाणारा शिंदेवाडीचा मार्ग. हा रस्ता पुढे गाडीमार्गावरून आलेल्या वाटेला खिंडीत मिळतो.
३ ) तुंग करून तिकोना करायचा असल्यास स्वताची गाडी असेल तर मोरवे मार्गे जवन किंवा तिकोना पेठ गाठावे.आणि रुळलेल्या वाटेने माथा गाठावा.
तिकोणा परिसराचा नकाशा.
आधीच्या वर्षी तुंग करताना तिथून तिकोणा पाहिलेला असल्यामुळे साहजिकच या वेळचा १५ ऑगस्ट तिकोण्यावर, साजरा करण्यावर एकमत झालं. कामशेतला पोहचल्यानंतर लवकर बस नसल्याचे कळले. खाजगी जीप हाच एक पर्याय उरला. कसेबसे त्याला कमी किमतीत पटवले. जीपने घाट उतरायला सुरवात केली आणि कातळमाथ्याचा मुकूट घातलेल्या तिकोण्याने पहिले दर्शन दिले. बेडसे गावाजवळ सोबत्याना डोंगरातली लेणी दाखवली. नंतर लोहगड, विसापुरच्या जोडीगोळीने हात केला, तर मातकट पाण्याने वेढलेला तुंगचा माथा ढगात बुडाला होता. मागच्या ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या. नवीन भिडूना मागच्या ट्रेकचे किस्से सांगितले.
पवना नगर ओलांडून जीप चढाला लागली आणि घंटेसारख्या आकाराचा तुंग समोर दिसला. फोटो स्टॉप मस्टच होता.
अखेरीस जीप तिकोणा पेठ या गावात पोहचली. ड्रायव्हरने गावाच्या टोकाशी गाडी नेउन उतरण्यास फर्मावले. पण हाच सरळ डांबरी रस्ता पुढे पायथ्यापर्यंत जातो याची मला माहिती नव्हती. ड्रायव्हरला अर्जंट फोन आल्याने त्याने आम्हाला तिकोणा पेठ गावात सोडून सुंबाल्या केला. नंतर आम्हाला आमची चुक लक्षात आली.
पण तंगडतोड आमच्या नशिबातच होती. अर्थात हा डांबरी रस्ता गडप्रेमींच्या सोयीसाठी केला नसून एका सपाटीवर प्रति हेमकुंड साहिब उभारले आहे ,त्यासाठी बांधला होता. तिकोणा पेठ गावात आता बरीच हॉटेल झाली आहेत. त्यामुळे जेवणाची सोय होउ शकते.या परिसरात बर्याच गोष्टी प्रति उभारण्याचा सपाटाच लावलाआहे, प्रति पंढरपुर, प्रति शिर्डी आदी.असो.
चालात चालता बरीच रानफुले दिसत होती, त्याची माहिती सांगितली. ईतिहासाचा विषय निघालाच.तिकोना गड त्याच्या इतिहासाबद्दल फारसा बोलत नाही.या परिसरात फार मोठी लढाईदेखील झाली नाही. पण तरीही इतिहासात पवन मावळातील एक मुख्य चौकी म्हणून तिकोना गडाचे महत्त्व मोठे होते. या गडाच्या पोटातील लेण्यावरून त्याचे अस्तित्वही प्राचीन असावे. बहमनी काळापासून या गडाचे इतिहासातील उल्लेख मिळतात. इ.स १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. या गडा बद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही. शिवरायांनी १६५७ मध्ये कोकणातील माहुली ,लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुन घेतला. या वेळीच राजांनी अन्य गडांबरोबर याचेही नाव बदलून ‘वितंडगड’ असे ठेवले.किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवन मावळावर देखरेख ठेवण्यासाठी होत असे. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. १२ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदर तहानुसार, १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. यानंतर औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीवेळीही मुघलांनी तिकोन्याभोवती पुन्हा पाश टाकले.मोगल सरदार अमानुल्लाखानने इ.स.१७०२ मध्ये हा गड जिंकून निशानी म्हणून औरंगजेबाकडे सोन्याच्या किल्ल्या पाठविल्या. तिकोना हाती येताच औरंगजेबाने त्याचे नाव ठेवले ‘अमनगड’! पण अमनगडाचा हा प्रवासही अल्पकाळचाच ठरला..मराठय़ांनी गड पुन्हा जिंकला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले.मराठय़ांची ही सत्ता पुढे १८१८ च्या इंग्रज-मराठे शेवटच्या लढाईपर्यंत अबाधित राहिली. या लढाईत कर्नल प्रॉथरने हा गड जिंकला, पण तो पुढे पुन्हा भोर संस्थानकडे सोपवल्याने एकप्रकारे तिकोन्यावरचा जरीपटका अबाधितच राहिला. या संस्थान काळातच असणारे तिकोन्याचे शेवटचे किल्लेदार शिंदे सरनाईक यांचा वाडा आजही गडाच्या दक्षिण पायथ्याशी काशिग गावात आहे.
हा रस्ता एका प्रशस्त मोकळ्या जागी येतो. ईथे गाड्यांच्या पार्किंगची सोय केलेली आहे. मात्र हि जागा कोणाच्या तरी मालकीची असून त्यासाठी चारचाकी वाहनांना ४०/- तर दुचाकी वाहनाना २०/-असे दर आकारले जातात. हा टोल दिला नाही तर गाड्यांची हवा सोडण्याची भाषा केली जाते. स्थानिकांना पर्यटनातून रोजगार मिळायलाच हवा यात शंका नाही. पण हे असले बेकायदा प्रकार थांबविले पाहिजेत. संबधीत व्यक्ती ईथे लक्ष देतील का?
तिकोना किल्ल्याचा नकाशा
पार्किंगच्या जागेपासून सोप्या वाटेने पाच मिनीटातच पायवाटेने खिंडीत आलो. "दुर्गवीर" या गडकोटाच्या संवर्धनाच्या उपक्रमाना वाहुन घेतलेल्या संस्थेने तिकोण्यावर खुपच स्तुत्य कार्य केलेले आहे. गडाची माहिती देणारा फलक, ठिकठिकाणी अवशेषावर लावलेल्या पाट्या, गावातील तरुणाना मावळ्याचा वेष देउन गडाचे पहारेकरी नेमणे आदी अनुकरणीय उपक्रम राबविले आहेत. वाटाही बर्याच सोप्या केलेल्या आहेत.
खिंडीतुन बराच मोठा परिसर दिसु लागतो. इथेच शिंदेवाडीतुन येणारी वाट आपल्या वाटेला मिळते. ईथुन अजून एक वाट खाली उतरून गडाच्या पायथ्याशी असणार्या लेण्याकडे जाते.
शिवदुर्ग संवर्धन या संस्थेने त्याची माहिती देणारा फलकही लावला आहे. तिकोण्याच्या पोटातील हि लेणी म्हणजे गडाच्या प्राचीनत्वाचा पुरावाच. लेण्यामध्ये एकच प्रमुख लेणे असुन याचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला आहे. लेण्याबाहेर व्हरांडा आहे. दर्शनी भागात २ पुर्ण व एक अर्धा स्तंभ आहे. डाव्या बाजुस पाण्याचे टाके आहे. पाण्याच्या टाक्याचे मुख २ मीटर लांब व १ मीटर रुंद आहे. पाण्याची पातळी मात्र खोल आहे. लेणी दक्षिण्मुखी आहेत. लेण्याचे प्रमुख दालन १३ मीटर लांब असुन त्याची उंची २.३ मीटर व रुंदी १.९ मीटर आहे. प्रवेशद्वार चौरसाकार असुन, अंदाजे ३.५ मीटर अंतरावर कातळात आडवी भेग आहे. पावसाळ्यात यातुन मोठया प्रमाणात पाणी आत येते. यामुळेच लेण्याचे खोद्काम अपुर्ण सोडले असावे. लेण्याचा आतला भाग पायऱ्या करुन थोडा वर ठेवलेला आहे. पाणी आत जाऊ नये म्हणुन केलेली ही युक्ती असावी, येथे ३ पायऱ्या आहेत. लेण्यामध्ये मुख्य दालनाच्या पश्चिमेकडे एक चौरस देऊळ कोरलेले आहे. याच्या बाहेर एक लहान व्हरांडा आहे. या देवळाबाहेर, जमिनीवर एक आयताकृती चौथरा आहे. छतावर एक वर्तुळाकार भाग असुन बहुदा तेथे कोरिव नक्षीकाम करण्यासाठी वर्तुळ सोडले असावे.
या लेण्याच्या अंतर्भागात एक लहान गाभारा कोरलेला आहे. या गाभाराची उंची १.९ मीटर असुन रुंदी १.९ मीटर आहे. लांबी २ मीटर आहे. छतावरचा काही भाग अर्धवट सोडलेला आहे. गाभाऱ्याच्या कोपऱ्यांमध्ये भिंतपट्टी आहे. गाभाऱ्याचा उंबरठ्याला विशिष्ट आकार आहे. उजवीकडे एक भगदाड करुन गाभाऱ्यातील पाणी बाहेर यावे याची सोय केली आहे. पण महत्वाचा अवशेष म्हणजे ईथे असणारी मुर्ती.
हे कामशिल्प किंवा गध्देगाळ असावा असे वाटते. थोडे खाली उतरुन जायचे असल्याने सहसा ईकडे कोणी फिरकत नाही.
या खिंडीजवळच अर्थातच पहार्याचे मेट आहे. इथे आता गेट पास विचारणारे कोणी नसल्याने आपण वाट चढायला सुरवात करायची.
थोडे अंतर चढून गेल्यानंतर वाट एका बुरुजा खाली येते. इथे एक नैसर्गिकरित्या भला मोठा खडक किल्ल्याच्या उतारावर तयार झालेला आहे.
हुशार दुर्ग रचनाकारांनी त्याचाही उपयोग करुन घेतला आहे. एक गुहा कोरुन त्याचा दरवाज्यासारखा उपयोग केला आहे. अगदी पहारेकर्यासाठी अलंगा कोरुन काढली आहे.
शिवदुर्गने नेमलेला मावळा इथे आपले स्वागत करतो. जवळपास निम्मा चढ चढून झालेला असतो.
एका बुरुजात लपविलेल्या उत्तराभिमुख वेताळ दरवाज्यातुन आपला माचीवर प्रवेश होतो. वेताळ दरवाज्यातुन डावीकडे गेले कि वेताळाचे मंदिर व टोकाशी बुरुज लागतो. तर दरवाज्यातुन उजवीकडे वळून चालत गेले कि सपाटी सुरु होते.
या सपाटीवर काही घरांची जोती आहेत.
या ठिकाणी मारुतीची एक भलीमोठी मूर्ती आपली वाट अडवते. महाराष्ट्रातील बहुतेक गडांच्या परिसरात विशेषत: प्रवेशमार्गावर हनुमानाच्या मूर्ती हमखास दिसतात. मारुती ही शक्तीची, शत्रूचा नाश करणारी देवता. तेव्हा अशा लढाईच्या मैदानी तिची स्थापना होणे हे अत्यंत स्वाभाविक! या मारुतीने पनवतीला पायाखाली दाबलेले आहे आणि एक हात चापट मारण्याच्या आवेशात आहे. याला "चापट मारुती" म्हणतात.
पुढे आले, की उभ्या कडय़ातील एक प्राचीन लेणे खुणावते. तळजाई मंदिर म्हणून स्थानिक लोकांच्यात हे लेणे परिचयाचे आहे. पाच खोल्यांमध्ये विभागलेल्या या लेण्याच्या एका दालनात तळजाईची स्थापना केलेली आहे. यापुढील छतावर कमळाची सुरेख शिल्पाकृती कोरली आहे. या लेण्यासमोर एक तळेही खोदलेले आहे.
पुण्याच्या डेक्कन कॉलजेच्या डॉ. शोभना गोखले, डॉ. एच. डी. सांकलिया आणि प्रभाकर कुलकर्णी यांनी या लेण्याचे संशोधन करताना त्याचा सातवाहनोत्तर असा काळ निश्चित केला. त्या वेळी त्यांना या परिसरात सातवाहनकालीन जात्याची एक तळीही मिळाली होती. म्हणजे हे खोदकामही प्राचीन असणार. पुढे यामध्ये कालपरत्वे काही बदलही झाले. या गडाच्या पुढय़ातच बेडसे लेणीचा डोंगर आहे. बेडसे लेणी खूपच प्राचीन. बहुधा यातूनच इथल्या या खोदकामाने प्रेरणा घेतलेली असावी.
या लेण्याच्या समोर पूर्वी एक सतीशिळा होती. तिच्यावरचे शिल्पांकन फारच आगळे होते. दोन थरांत कोरलेल्या या शिल्पपटात वरच्या भागात एका पुरुषाच्या पायाखाली एक महिला दाखवली होती. तर खालच्या भागात हाती पुष्पमाला घेतलेल्या दोन महिला कोरल्या होत्या. पण याचा अर्थ लावण्यापूर्वीच ही सतीशिळा इथून गायब झाली. या अशा जागोजागीच्या शिल्पांची तातडीने नोंद करत त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे.
ईथे शिवाजी ट्रेल या संस्थेने गडाचा माहिती फलक लावला आहे.
तुळजाई मंदिरापाशी दोन वाटा फुटतात. पैकी डावी वाट गडाकडे तर उजवी वाट दोन दरवाज्यातून उतरुन तिकोनापेठ गावाकडे जाते.उजव्या हाताच्या वाटेने गेल्यानंतर दरवाज्याच्या दुकलीतुन खाली उतरणारी वाट थेट तिकोनापेठ गावात जाते.
मात्र आता हि वाट रुळलेली नाही. मागे तेरा वर्षापुर्वी आलो होतो तेव्हा मी याच वाटेने खाली उतरलो होतो.
वास्तविक हा शॉर्ट्कट आहे पण आता खुप कमी वापरात आहे. ज्यांना अश्या वाटा उतरायची सवय आहे त्यांनी पावसाळा सोडून ईतर ऋतुत या वाटेने खाली उतरायला हरकत नाही.
उजव्या वाटेने गडाकडे निघाल्यावर सर्वप्रथम हा चुन्याचा घाणा दिसतो. गडावर मोठ्या प्रमाणात बांधकाम करायची असल्यास आधी हि व्यवस्था करतात मग बांधकाम सुरु होते.
चुन्याच्या घाण्यापासुन पुढे निघाल्यावर कोपर्यावर छोटी टपरी लागते. इथे पिठल, भाकरी, भजी, चहा याची सोय होउ शकते. मात्र हे हॉटेल फक्त सुट्टीच्या दिवशीच चालु असते. हे हॉटेल शिवदुर्ग संवर्धन या संस्थेने नेमलेल्या गडाच्या पहारेकर्यापैकी एक श्री. सुजीत मोहोळ यांची आई चालवितात. जर गडावर मोठा ग्रुप घेउन, सुट्टी ईतर दिवशी जाणार असाल तर श्री. सुजीत मोहोळ यांना संपर्क करून व्यवस्था करता येईल. सुजीत मोहोळ यांचा संपर्क क्रं. मो. 9545863824. नाहीतर पायथ्याशी तिकोना पेठ गावात जेवण, नाष्टा याची सोय होउ शकते.
इथुन वळून गेल्यानंतर बालेकिल्ल्याचा पहिला दरवाजा येतो. याच्या पायर्या बर्याचशा भग्न अवस्थेत आहेत. दरवाजा मात्र अजुनही सुस्थितीत आहे.
आत गेल्यानंतर डाव्या बाजुला कातळात खोदलेल नितळ पाण्याचे टाके आहे. एकेकाळी गडावर वावर कमी होता तेव्हा हे पाणी स्वच्छ आणि पिण्यालायक होत. आता मात्र तितकेसे स्चच्छ वाटत नाही.
यानंतर वर चढणार्या पायर्या खड्या आहेत. पावसाळ्यात पाणी वाहुन घसरड्या होतात. सध्या ईथे जाड तार लावून चढण्या, उतरण्यासाठी आधार दिला आहे.
पायर्या उंच आणि अरुंद असल्याने वर येणारे शत्रु सैनिक दमतील अशी योजना आहे.
शिवाय या पायर्यांच्या दोन्ही बाजुला शेरहाजी म्हणजे पहारेकरी वावरण्यासाठी जागा ठेवल्याने येणार्या जाणार्यावर पुर्ण लक्ष ठेवता येते.
पायर्या चढुन गेल्यानंतर दुसरा दरवाजा सामोरा येतो.
या दरवाज्यातून आत गेल्यानंतर डाव्या बाजुला पाण्याची मोठी खोलीसारखे टाके आहेत.
एकंदरीत पाण्याची चोख व्यवस्था ठेवली आहे.
त्यातील एक टाके कोरडे पडल्याने मुक्कामासाठी वापरता येईल.
पाण्याची टाकी पाहून पुन्हा सपाटीवर यावयाचे.
ईथे पुर्ण तटबंदी उभारुन परिसर संरक्षित केला आहे.
इथे उभारल्यानंतर मागचा अस्ताव्यस्त पसरलेला मांडवी डोंगर दिसतो. आपण वर चढून आलो तर ती वाट इथुन दॄष्टीक्षेपात येते.
आता जाउया थेट माथ्यावर. यदाकदाचित शत्रु ईथवर येउन ठेपला तरी बालेकिल्ला लढवता यावा यासाठी बालेकिल्ल्यालाही तटबंदी व अरुंद वळून येणारा जीना केलेला आहे. इथेही दरवाजा असला पाहिजे पण आता तो भग्नावस्थेत आहे.
पायर्या चढुन माथ्यावर पोहचल्यानंतर हे त्रबंकेश्वर महादेव मंदिर सामोरे येते.
वर मंदिर आणि खाली खांब सोडलेले पाण्याचे टाके अशी अनोखी रचना ईथे पहाण्यास मिळते.
यानंतर आपण येतो सर्वोच्च टोकावर म्हणजे समुद्रसपाटीपासून जवळपास ३८५० फुटांवर.
माथाही त्रिकोणी असल्याने तीनही टोकांशी बुरुज आहेत.
माथ्यावर पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. अश्या निसर्गरम्य ठिकाणी वास्तव्य करणार्या त्या अनाम किल्लेदाराचा मला क्षणभर हेवा वाटला. ईथे वारा उधाणलेला असतो. १५ ऑगस्ट असल्याने आत्ता तिरंगा डोलत असला तरी ईतर दिवशी भगवा फडकत असतो.
समोर पश्चिमेला तुंग ढगात डोके खुपसुन बसला होता,
वायव्येला लोहगड-विसापुर पवना धरणाच्या पाण्यात पाय सोडून बसले होते. याशिवाय हवा स्वच्छ असली तर कोराईगड, सोनगिरी, तोरणा, राजगडही दिसु शकतात.
माथ्यावरही पाण्याचे एक मोठे टाके आहे.
तुफान वहाणारा वारा आणि अथांग पसरलेला निसर्गाचा कॅनव्हास याने तिथुन उठण्याचे मन होत नव्हते, पण दुसर्या दिवशीच्या जबाबदार्यांची जाणिव होउन नाईलाजाने उतरायला सुरवात केली.
तिकोन्याच्या परिसरात भालगुडी नावाचे गाव आहे. तिथे श्री नारायण देवस्थान( बालाजी) व गणपती प्राचीन मुर्ती आहे. तसेच अंबामातेची मुर्ती आणि वीरगळ आहेत अशी माहिती मला एका व्हॉटस अॅप ग्रुपच्या माध्यमातुन मिळाली. त्याची खात्री करायला हवी.
या शिवाय तिकोणा पेठ गावाच्या वायव्येच्या डोंगरात येलघोलची लेणी आहेत.
या शिवाय हडशीचे साईबाबांचे मंदिर, पवनानगरची बाग व तिथे चालणारे पॅराग्लायडिंगसारख्या अॅक्टीव्हीटी हि आकर्षणे आहेतच.
(प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार)
संदर्भग्रंथ
१) साद सह्याद्रीची! भटकंती किल्ल्यांची!!- प्र. के. घाणेकर
२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) पुणे जिल्हा गॅझेटीयर
५) तिकोना( लोकप्रभा)- अभिजीत बेल्हेकर
६ ) तिकोन्याच्या पोटातील लेण्याच्या सविस्तर माहिती श्री. विवेक काळे यांचेकडून साभार
प्रतिक्रिया
18 Aug 2017 - 2:38 pm | प्रचेतस
खूपच छान लिहिलंय.
हा सर्व परिसर पाहिलाय. तिकोनापेठेतून सरळ चढणार्या धारेनेही वर गेलोय. तेव्हा तिकोन्यावर फारसे कुणी जात नसत. शेवटच्या त्या अंगावर येणार्या पायर्या प्रचंड उंच.
गोनीदांनी 'कादंबरीमय शिवकाल' ह्या अप्रतिम कादंबरीत तिकोना किल्याच्या पार्श्वभूमीचा वापर मोठ्या खुबीने केला आहे.
खालच्या लेण्यातील ती भग्न मूर्ती मला वीरगळ वाटतेय. खालच्या पट्टीत अप्सरा माला घेऊन वीराला स्वर्गास नेण्यास आलेल्या स्पष्टपणे दिसत आहेत. वरचे दृश्य गधेगाळासारखे दिसत असले तरी ते बहुधा लढाईचे असावे असे वाटतेय. भग्न झाल्याने नीट ओळखता येत नाहीये अर्थात.
21 Aug 2017 - 10:01 am | II श्रीमंत पेशवे II
जाम भारी फोटो , प्रत्यक्ष अनुभवायला तर खूपच मज्जा येईल
धन्यवाद .......अतिशय विस्तृत माहिती .....
23 Aug 2017 - 10:12 am | atulamigo
मस्त आहे
23 Aug 2017 - 11:13 am | दुर्गविहारी
सर्वच वाचकांचे आणि प्रतिसादकाचे मनापासून आभार. यावेळी प्रतिसाद खुप कमी आले याची खंत आणि आश्चर्य आहेच. वास्तविक हा गड आता तसे पर्यटनाचे ठिकाण बनला आहे. लोकांकडून त्यांचे अनुभव येतील किंवा किमान पोचपावती मिळेल आणि मी दिलेल्या माहितीत काही नवीन भर पडेल असे वाटले नाही. असो.
उद्या अनवट किल्ले मालिकेतील कोल्हापुर जिल्ह्यातील शेवटचा किल्ला महिपालगड यावर घागा टाकेन.
23 Aug 2017 - 1:23 pm | कपिलमुनी
मावळात वाढलो असल्याने हे किल्ले पूर्वी खूप वेळा फिरलो आहे ,
सध्या अफाट गर्दी आणि धागडधिन्गा असल्याने टाळतो !
तुंग , तिकोना , लोहगड , विसापूर , वरती कोराई, श्रीवर्धन, मनरन्जन , आडवाटेचा अनघाई असे हिन्डणे असायचे यातले अनघाई सोडला तर एकही ठिकाण फिरण्यासाराखे रहिले नही याची खन्त वाटते .
निसर्गच्या सानिध्यामधला शान्तपणा कुठेही राहिला नाही.
23 Aug 2017 - 2:16 pm | उपेक्षित
नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर वर्णन.
तिकोनाला पुर्वी तसे खुपदा जाणे झालेय पण इतक्यात जमले नाहीये :(