माणदेशाच्या दुर्गभ्रमंतीमधे आपण आज महिमानगडाची सफर करणार आहोत. महिमानगड हा सातारा जिल्ह्यातील माण ( दहिवडी ) तालुक्यात मोडणारा किल्ला आहे. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहेत. सातारा-पंढरपूर रस्त्यावर साधारण पुसेगाव सोडल्यानंतर अवतीभोवती उजाड माळरान दिसायला लागतं. हे माळरान आपल्याला माण तालुक्यातील महिमानवाडीपर्यंत सोबत करतं. महिमानवाडी हे या रस्त्यावरचं आणि गडाच्या पायथ्याचं गाव. याच वाडीतून डोंगररांगातून पूर्णपणे विलग झालेल्या गडाचं दर्शन विलोभनीय वाटतं. मध्यम उंचीच्या या गडाच्या सर्व बाजू ताशीव दिसतात. त्यामुळेच पाहताक्षणी हा गड मनाचा ठाव घेतो.
अशा ठिकाणची दुर्गभ्रमंती ही केवळ आणि केवळ इतिहास व दुर्गांच्या प्रेमापोटीच होत असते. त्यामुळे अशा आडवाटेवरच्या; तरीही सुंदर गडदुर्गांकडे अस्सल भटक्यांचीच पावलं वळतात.
इथे जायचे तर दोन पर्याय आहेत.
१. महिमानगड गाव मार्गे:-
सातारा - पंढरपूर मार्गावर पुसेगावच्या पुढे १२ किमी अंतरावर (व दहीवडीच्या अलिकडे ७ किमी वर) महिमानगड गावाला जाणारा फाटा आहे. फलटण - दहिवडी मार्गे सातारा गाडी किंवा सातारा पुसेगावमार्गे पंढरपूर जाणारी गाडी देखील महिमानगड फाट्यापाशी थांबते. या रस्त्यावर भरपुर बस आहेत. महिमानगड फाट्यावरून १.५ किमी वरील महिमानगड गावात पायी चालत जाण्यास वीस मिनिटे लागतात. महिमानगड गावाच्या जिल्हापरिषदेच्या कार्यालया समोरूनच एक वाट गडावर जाते . ही वाट थेट प्रवेशद्वारात घेऊन जाते, शेवटच्या टप्प्यात बांधीव व दगडात खोद्लेल्या पायर्या लागतात. या वाटेने गड गाठण्यास २५ मिनिटे लागतात.
२. दहीवडी मार्गे :-
दहीवडीतून एक रस्ता ५.५ किमीवरील शिंदी बद्रुक या खेड्यात जातो. दहीवडीहून रिक्षाने या गावात जाता येते. येथून एक पायवाट गडाला वळसा घालून तटबंदी खालून जात, प्रवेशद्वाराजवळील पायर्यांपाशी महिमानगड गावतून येणार्या वाटेला मिळते.
असाच एक मोकळा दिवस पाहून अचानक वर्धनगड आणि महिमानगड या दुर्लक्षित किल्ल्यांचे आमंत्रण आठवले. तेव्हा मी या माणदेशींच्या दुर्गजोडीच्या भेटीसाठी प्रस्थान ठेवले. सातारा-पंढरपुर रस्त्यावरच्या उकिर्डे या गावापाशी मी एस.टी. तून उतरलो. उत्तरेला कातळकड्याचे लेणे ल्यालेल्या महिमानगडाने हात केला. श्रावणाचे दिवस असल्याने आजुबाजुच्या सर्व टेकड्या हिरव्यागार, लुशलुशीत गवताने बहरल्या होत्या आणि त्यावर चरणारी काळ्या-पांढर्या रंगाची मेंढर हे दृष्य मोठे मनमोहक होते. मस्त डांबरी सडकेने माझा महिमानगडाकडे मॉर्निंग वॉक सुरु झाला.
एकुणच गडाचे स्थान मोठे मोक्याचे आहे. विजापूर हे आदिलशाहीचे राजधानीचं ठिकाण. इथून कोकणात जाण्यासाठी एक रस्ता होता. हा रस्ता विजापूर-पंढरपूर-सातारा-वाई-महाड बंदर ( प्राचीन काळी महाड हे बंदर होते आणि त्याच्या रक्षणासाठी महाडला कोट म्हणजे भुईकोट किल्ला होता असे उल्लेख आहेत ) असा जात असे. या मार्गाच्या रक्षणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांनीही या गडाची उभारणी केली. अर्थात स्वराज्याविरुध्द वर्तन करणार्या फलटणचे निंबाळकर आणि म्हसवडचे माने या सरदारांवर वचक ठेवणे हा हेतु होताच. या परिसरातील वारुगड, महिमानगड,वर्धनगड आणि भुषणगड यांची उभारणी शिवाजी महाराजांनी केली आणि आधी ते अस्तित्वात नव्हते याचा थेट पुरावा नसला तरी काही महत्वाच्या गोष्टी विसरुन चालणार नाही. एकतर मिर्झाराजे जयसिंहाबरोबर तह केल्यानंतर मराठे-मोंघल यांच्या संयुक्त फौजा आदिलशाही मुलुखावर चालून आल्या. त्यात या परिसरातील संतोषगड घेतल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र या बाकीच्या गडांचा अजिबात उल्लेख नाही. आता संतोषगड घेतल्यानंतर बाकीच्या गडावर शिवाजी महाराज आक्रमण करणार नाहीत हे शक्यच नाही. तेव्हा हे गड साधारण १६७० च्या आसपास उभारले असावेत. शिवाय गोमुखी प्रवेशद्वार हे शिवकालीन दुर्गबांधणीचे महत्वाचे वैशिष्ट्य या सर्व किल्ल्यावर पहायला मिळते. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते. किल्ल्याचा हवालदार आणि सबनीस यांची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुळकर्णी यांच्याकडे चालू आहे.
सकाळचे उत्साहवर्धक वातावरण, थंडगार हवेच्या झुळका आणि आजुबाजुच्या प्रफुल्लित निसर्गामुळे जेमतेम वीस मिनीटातच मी पायथ्याच्या महिमानगड गावात दाखल झालो. महिमानगडाच्या फाट्यापासून गडाचा पायथा असलेल्या वाडीपर्यंत गाडीमार्गाने जाताना महिमानगडाची पश्चिम अंगाची सुरेख तटबंदी दिसत होती . डोंगराच्या गाभ्यात गडाच्या उत्तर पायथ्याला हे चिमुकले गाव वसले आहे. किल्ल्यामुळेच या गावाला महिमानगड असे नाव पडले आहे. या गावामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक आहेत. महिमानगड गावामध्ये जुन्या काळातील असंख्य वाडे पहावयास मिळतील.या वाड्यांची बांधणी, त्यामध्ये असलेली भुयारे हे त्यांचे खास वैशिष्ठय आहे. इथे पूर्वी घोंगडी बनविण्याचा उद्योग चालत असे.आजही काही घरांमधून हा उद्योग पहावयास मिळतो.
( महिमानगडाचा नकाशा )
महिमानगड गावाच्या जिल्हापरिषदेच्या कायार्लयासमोरील वाडीतील मंदिरापासून एक पायवाट गडावर जाते. मंदिराशेजारी आपल्याला एका जुन्या वाड्याचे अवशेष दिसतात. मात्र गुराखी आणि त्यांच्या गुरांच्या वावराने गडावर जाण्यासाठी अनेक ठिकाणी ढोरवाटा तयार झाल्या आहेत. त्यामुळे वाडीतून कोणत्याही वाटेनं वर निघाल्यास आपण मुख्य दरवाजासमोर येऊन हजर होतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासून ३२१९ फुट असली तरी पायथ्यापासून ती जेमतेम १०० मीटर असावी.
या वाटेने वळणावळणाने थेट दरवाजापर्यंत जाताना गडाच्या दरवाजाचे बुरुज त्याच्या अभेद्यपणाची क्षणोक्षणी जाणीव करून देतात.
या वाटेने वर चढत असताना डावीकडे तटबंदीच्या खाली कपारीत तीन पाण्याची टाकी कोरलेली आहे. यातील एकात गच्च झाडी माजलेली असून दुसरे गाळाने पुर्ण भरले आहे पण तिसऱ्यात मात्र स्वच्छ पाण्याचा झरा आहे. येथून खडकावरून चढून आपण गडाच्या मुळ वाटेवर येवू शकतो. गडाच्या शेवटच्या टप्प्यात बांधीव व दगडात खोद्लेल्या पायऱ्या आहेत. या वाटेने गड गाठण्यास अर्धा तास लागतो.
इथल्या तटबंदीवर एक झाड वाढलेले आहे. झाडाच्या असंख्य मुळ्यांनी तटबंदीला चांगलेच जखडले आहे. महिमानगडाच्या हे झाड म्हणजे एक नवलच आहे, हे झाड उभे न वाढता आडवे वाढुन जमिनीला समांतर असे चाळीस पन्नास फूट पुढे आले आहे.
येथून गडात उत्तरेकडून शिरणारा वळणदार मार्ग दिसतो. आतमधे गडाचा पुर्वाभिमुख बांधलेला दरवाजा होता. महिमान गडाच्या दरवाजाची कमान ढासळून नष्ट झाली आहे. कमानीच्या बाजूचे उभे खांब मात्र अजून तग धरून आहेत.
सुबक घडीव दगडाच्या या खांबांच्या खालच्या दोन्ही बाजूला चौकटीतच हत्तीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. त्या गजमुखाची अवस्था पाहून खरोखरीच वाईट वाटतं.
दरवाजासमोर वळणदार भिंत अणि पुढे बुरुज बांधून त्याला शत्रुपासून संरक्षण दिलेले आहे असे गोमुखी पद्धतीचे बांधकाम ही शिवकालीन बांधकामाचे वैशिष्ठ होते. काळाच्या ओघात नष्ट झालेला हा देखणा दरवाजा ओलांडून आपण गडामधे प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या आजुबाजुला असणारी तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे.
आधी मारुतीराय बिचारे उघड्यावर धुपत होते, मात्र गावकर्यांनी प्रयत्नाने मारुती मंदिर नव्याने उभारले आहे.
प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूस समोरच छोट्या टेकडीवर हनुमानाचे देऊळ दिसते. मंदिराशेजारीच एक टाके आहे. त्याच्या समोरच बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या पाय-या दिसतात. येथून संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते.
थोडे पुढे गेल्यावर खालच्या बाजूस उतारावर बारमाही पाण्याचे बांधीव खोल टाके आहे. खडकात खोदून नंतर ते चिरेबंदी दगडांनी बांधून काढलेले आहे.
याच्या शेजारी अजून एक कोरडे टाके आहे. त्याच्याच वरच्या बाजूला वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. याशिवाय बांधीव टाक्याच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे. येथून किल्ल्याच्या बांधकामासाठी दगड काढलेले असुन तो खड्डा साच पाण्याचा तलाव म्हणुन वापरत असावा.
या दोन तलावांच्या मधून वाट गडाच्या अग्नेयेस असलेल्या सोंडेकडे जाते. या सोंडेवर असलेल्या तटबंदीमध्ये एक चोर दरवाजा आहे. या दरवाजातून पलिकडे गेल्यावर लांबवर पसरलेली सोंड दिसते.
ही सोंडवजा माची गडापासून भक्कम तटबंदीने वेगळी केली आहे. या सोंडेवर थोडेफार बांधकामांचे अवशेष दिसतात. सोंडेच्या पुर्वेकडील निमुळत्या टोकावर टेहाळणीसाठी एक बुरुज आहे.
हे पाहून परत येतांना २ तलावांमधून न येता किल्ल्याच्या रस्त्याकडील तटबंदीच्या बाजूने यावे. येथे तलावाच्या वरच्या बाजूस एक पीराचे थडगे आहे. या पीराच्या थड्यावरुन वाद निर्माण झाला कि ज्या अर्थी हा पीर आहे त्याचा अर्थ हा गड मुसलमानी राजवटीत, बहुधा आदिलशाहीत बांधला गेला असावा. मात्र एकतर गडाचे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीआधीचे उल्लेख सापडत नाहीत, शिवाय मिर्झाराजे जयसिंहाबरोबर पुरंदरच्या तहानंतर शिवाजी राजे व जयसिंहाच्या संयुक्त फौजेने आदिलशाही मुलुखावर जे आक्रमण केले त्यात या परिसरातील फक्त संतोषगडाचा उल्लेख सापडतो,बाकीच्या एकाही गडाचा उल्लेख नाही. शिवाय गोमुखी वळणाचे प्रवेशद्वार पहाता हा गड नक्कीच शिवाजी महाराजांनी उभारला असणार.
येथून प्रवेशद्वारापाशी येऊन प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस गेल्यावर तटबंदी व बुरुजांचे अवशेष पाहायला मिळतात. तटबंदीच्या आतून गडाला फेरी मारता येते. तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली असल्यामुळे काळजीपुर्वकच फिरणे आवश्यक आहे. तटबंदीला जागोजाग बुरुज आहेत. गडाचा पश्चिम भाग रुंद असून तो पुर्वेकडे निमुळता होत गेलेला आहे. हा निमुळता भाग मधेच तटबंदी बांधून गडापासून वेगळा राखला आहे.
या तटबंदीमध्ये दोन चोर दरवाजे आहेत. त्यातील उत्तरेकडील चोरदरवाजा दगडी ढासळल्याने बंद आहे. गडावर फार अवशेष शिल्लक नाहीत परंतु वाड्यांची काही जोती मात्र दिसतात. गडाच्या माथ्यावरून आपल्याला मोठा मुलूख दिसतो. भूषणगड, वर्धनगड हे किल्ले तसेच जरंडेश्वराचा डोंगर आणि ईशान्येकडे असणारा मोळ घाट असा सर्व परिसर दिसतो.
येथील तटबंदीवरुन खालचे महिमानगड गाव दिसते.
पावसाळा सोडला तर गडमाथ्यावर पाण्याची वानवाच असते, तेव्हा स्वतासोबत पाणी बाळगणे उत्तम. गडावर रहाण्यासाठी ना निवारा ना खाण्यासाठी काही मिळण्याची शक्यता. गावकरी गडाकडे फिरकतही नाहीत. मात्र इथले कोरीव दगड खाली गावात नेउन काही महाभागांनी घरे बांधली म्हणे. १८१८ मध्ये इंग्रजांनी आपले बहुतांश गड ताब्यात घेतले. नुसते ताब्यात न घेता त्यांची प्रचंड नासधूस करून आपली प्रेरणास्थळं नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कुठलाही गड सुटला नाही. इंग्रज तरी बाहेरचे होते, पण ईथल्या देशीच्या लोकांनाच आपल्या पुर्वजांच्या पराक्रमाचा अभिमान नाही याची खंत जरुर वाटते. या सारखे किती दगड, वस्तू या गडावरून गायब झाल्या असतील याची गणती न केलेलीच बरी.
स्वत:चे वाहन असल्यास सातारा किंवा पुण्याहून एका दिवसात महिमानगडा बरोबर माण तालुक्यातील (अंदाजे २० कि.मी वरील) वर्धनगड, (अंदाजे २५ कि.मी वरील) शिखर शिंगणापूरचे मंदिर व (८ कि.मी. वरील ) गोंदवलेकर महाराजांचे समाधी मंदिर पाहाता येते.
( तळटिपः- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भग्रंथः-
१) सातारा जिल्हा गॅझेटियर
२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) www.durgbharari.com हि वेबसाईट
प्रतिक्रिया
6 Aug 2018 - 9:00 am | प्रचेतस
माणदेशातील हे किल्ले खरोखरंच भाग्याचे. साक्षात शिवछत्रपतींचा सहवास ह्या किल्यांना लाभलेला आहे इतकेच नव्हे तर त्यांची उभारणीच त्यांच्या हस्ते झालेली आहे. शिवकालीन किल्ल्यांची वैशिष्ट्ये ह्या किल्ल्यांत पुरेपूर सामावली आहेत.
दर शुक्रवारी तुमच्या लेखांची आवर्जून वाट बघत असतोच. लिहित राहा.