पावसाळी भटकंती : वारुगड (Varugad)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
20 Jul 2018 - 11:46 am

ताथवड्यावर भटकण्याचा "संतोष" घेउन मी "वारु"वर स्वार व्हायला निघालो. फलटण शहरातून विचारणा करत गिरवी रस्त्याला लागलो. फलटणवरून वारुगडाला जाण्यासाठी तीन मार्ग आहेत.
Varugad 1
१ ) फलटणवरून गिरवीमार्गे पायथ्याचे जाधववाडी गाव गाठायचे. हे अंतर साधारण १४ कि.मी. आहे. फलटण ते गिरवी अशी एस टी सेवा उपलब्ध आहे. गिरवीतून ५ किमी अंतरावर असणारा जाधववाडी गाठावा. येथून वारुगड माचीवर जाण्यास २ तास लागतात. माचीतून बालेकिल्ल्यावर जाण्यास २० मिनिटे लागतात. फलटणवरुन गिरवीसाठी सकाळी ६.३०, १०,११,१२,१,३,४.४५,७.१५ अश्या बसेस आहेत, तर परतीच्या बसेस ७.४५,११.१५,१.१५,२.१५,४.१५,६.१५,८.०० अश्या आहेत. याशिवाय थेट जाधववाडीला सकाळी ८.०० व दुपारी ४.०० तर जाधववाडीवरुन फलटणला ९.३० आणि ५.३० अशा दोन बस आहेत.
याशिवाय संतोषगड पाहून थेट वारुगडाच्या पायथ्याच्या जाधववाडीला यायचे असल्यास ताथवडा- मांडवखडक- दुधेबावी असा थेट रस्ता आहे, पण अर्थात कच्चा.
आणखी एक पर्याय म्हणजे ताथवडा सोडल्यानंतर मोळ घाटाने वर चढून यावे. डिस्कळ - बुध पर्यंत आल्यावर बुध गावाच्या अलीकडे एक रस्ता कुळकजाई गावापर्यंत जातो. कुळकजाई गावातून पुढे छोटा घाट लागतो नि घाट संपला कि डावीकडे लगेच शिंदी खुर्दचा फाटा आहे. येथून शिंदी खुर्द पासून २ -३ किलोमीटरचा रस्ता कच्चा आहे. पुन्हा एक घाट लागतो तो खांडेवाडीकडे जातो. खांडेवाडीतुन पुन्हा कच्चा रस्ता उतरून आपण फलटण-वारुगड रस्त्याला लागतो.येथून समोरचा वारुगड दिसतो. ताथवडा - डिस्कळ - कुळकजाई - शिंदी खुर्द - वारुगड हा प्रवास १-१:३० तासाचा आहे. पण हा रस्ता एकाकी आणि अवघड आहे. त्यामुळे नवख्यानी ह्याऐवजी ताथवडा - फलटण - मोगराळे - बीजवाडी - वारुगड (५६ km ) ह्या मार्गाने यावे.
Varugad 2
२ ) फलटण - दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंर २० किमी अंतरावर मोगराळे नावचा फाटा लागतो. इथे घाट आहे. या घाटात पावसाळी धबधबा असतो. या फाट्यापासून एक कच्चा गाडी रस्ता तोंडली मार्गे थेट माचीवरील घोडेवाडी वस्तीत घेऊन जातो. मोगराळे ते घोडेवाडी अंतर १५ किमी आहे.
३) फलटण - दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंर २६ किमी अंतरावर बिजवडी नावचे गाव लागते. या गावातून एक कच्चा गाडी रस्ता तोंडली मार्गे थेट माचीवरील घोडेवाडीत जातो. मुंबई सेंट्रल स्थानकावरुन मुंबई-वारुगड अशी बस सकाळी ६.०० वा. सुटते. या बसने मुंबई - पुण्याहून फलटणमार्गे थेट वारूगड माचीवर जाता येते. तर वारुगडावरुन मुंबईला थेट बस सकाळी ७.०० वा. आहे.
Varugad 3
अर्थात मला गडाच्या माचीवर थेट गाडी जाते हे त्यावेळी माहिती नव्हते. त्यामुळे मी जाधववाडीच्या दिशेने निघालो. वाटेत विंचुर्णी गावाचा फाटा लागला, त्यावर मला "विंचुर्णीचे धडे" या पुस्तकाची आठवण झाली.
Varugad 4
जसा गड जवळ आला तसे माचीचा पुढे आलेला भाग व एखाद्या टोपीसारखा बालेकिल्ला मजेदार दिसत होता. गिरवीची जाधववाडी म्हणजे नावाप्रमाणेच जाधव आडनावांची वसाहत. गावात प्राथमिक शाळेत गाडी लाउन मी गडाकडे चालायला सुरवात केली. पावसाचा पत्ता नसल्याने वाटेतील शेतामधे अजून पेरणी झालेली नव्हती. वैराण अशा शेताडीतून डोंगरपायथ्याशी पोहचलो. वाट तशी रुळलेली नाही.
Varugad 5
दगडांवर हातपाय रोवत अखेरीच वर पोहचलो तो एका दरवाज्याने स्वागत केले. दरवाज्याची कमान मात्र उध्वस्त झाली आहे. यालाच "फलटण दरवाजा" म्हणतात. त्यातून माचीवर प्रवेश केला आणि उजव्या रस्त्याने बालेकिल्ल्याकडे निघालो. इथेपर्यंत पोहचायला किमान एक ते दिड तास लागतात.
Varugad 6
( वारुगडाचा नकाशा )
Varugad 7
वारूगड माची अन् बालेकिल्ला अशा दोन भागांत विभागला गेला आहे.
Varugad 8
किल्ल्याची माची ही संपूर्ण तटबंदीवेष्टीत आहे. आजही ती बर्‍याच मोठ्या प्रमाणावर शाबूत आहे. ज्या भागात गड मुख्य रांगेशी जोडलाय तिथे त्याला तिहेरी तटबंदी असावी, एखादा दुसरा मजबूत दरवाजा असावा यापैकी आज दुहेरी तटांची बांधणी सहज दिसते. माचीच्या एका टोकावरून साऱ्या माचीला वेढलेली तटांची मजबुती दिसते. माचीत आज असलेल्या घरांमागे जुने ढासळलेलं बांधकाम नि अवशेष दिसतात.
Varugad 9
माचीवर एक छोटं मंदिर आणि पाण्याचं एक जोडटाकं आहे.
Varugad 10

Varugad 11

Varugad 12
बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पाण्याचे सुंदर बांधीव टाक आहे. पाण्याची चव सुरेखच होती. हे टाकं थोडं खालच्या बाजूला असल्याने मस्त थंडावा देणारं होतं. गिरवी जाधववाडीतून माचीवर येणारी पायवाट दरवाजातून पुढे गेल्यावर दोन भागात विभागते. डावीकडे जाणारा रस्ता माचीवरील घोडेवाडीकडे जातो, तर सरळ वर जाणारी वाट १५ मिनिटात बालेकिल्याच्या प्रवेशद्वारापाशी येऊन धडकते.( रस्त्याने किल्ल्यावर प्रवेश केल्यास डाव्या बाजूची पायवाट पाण्याच्या टाक्याच्या बाजूने बालेकिल्ल्यावर जाते.)
Varugad 13

Varugad 14
या माचीत शिरण्यासाठी पूर्वी ५ दरवाजे होते.
Varugad 15
भैरवनाथ मंदिराजवळ हि स्वागत कमान उभारली आहे.
Varugad 16
आता मात्र रस्त्याच्या उजव्या बाजूला एकच दरवाजा शिल्लक आहे. त्याच्या पुढे पाण्याचा छोटा तलाव आहे. रस्ता संपतो तिथे भैरोबाचे जीर्णोध्दारीत मंदिर आहे.
Varugad 17

Varugad 18
मंदिर प्रशस्त असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते. मंदिरा समोरच हातपंप व वस्ती आहे. मंदिराच्या मागे धर्मशाळा आहे, येथे राहण्याची सोय होते.धर्मशाळेत साधारण २५ जणांची राहण्याची सोय होउ शकते. मात्र एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, वारुगडावर मुक्काम करायचा झाल्यास अमावास्या टाळावी. दर अमावास्येला पंचक्रोशीतील लोक वारूगडावरील भैरबाच्या मंदिरात जमतात. तेथे भंडारा व रात्रभर भजन चालते. त्यामुळे धर्मशाळेत राहण्यासाठी जागा नसते. या माचीवरच घोडेवाडी किंवा वारुगड हे गाव वसलेले आहे.
Varugad 19
बालेकिल्ल्यावरुन तटाबंदीची एक भिंत थेट खाली माचीपर्यंत आली आहे. बालेकिल्ल्याला दोन दरवाजे आहेत.एक सरळ बांधणीचा आहे , मात्र आज त्याची दुरावस्था झाली आहे.
Varugad 20
दरवाजा गोमुखी बांधणीचा असून तो शिवनिर्मित दुर्गस्थापत्याची साक्ष देतो.
माचीतून छोटी चढण चढून वीस मिनिटांत पडलेल्या दरवाजातून वारूगडचा माथा गाठला आणि वरच्या भैरोबाला दंडवत घातला. वारुगडाचा सर्वोच्च माथा समुद्रसपाटीपासून २९५२ फुट उंच आहे. परिसर वैराण असला तरी भर्राट वार्‍याचे सुख अनुभवता येते. याच वार्‍याचा फायदा घेण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पवनचक्क्या उभारल्या आहेत. हवा स्वच्छ असेल तर इथून पुरंदर-वज्रगड दिसतात.
Varugad 21
वारूगडच्या माथ्यावर एक सदरेची इमारत आहे. आज ती पूर्णपणे नव्याने बांधून काढलेली आहे.
Varugad 22
या सदरेच्या ईमारतीजवळच अंधार कोठडी म्हणवली जाणारी जागा आहे. आज मात्र यात मोठ्याप्रमाणात झाडी माजली आहे.
Varugad 23
ह्या पाण्याच्या टाक्यात क्वचितच पाणी असते.
Varugad 24

Varugad 25
याशिवाय भैरवनाथाचं मंदिर आहे.
Varugad 26
एका चुन्याच्या घाण्याचे चाकही पहायला मिळते.
एकुणच या परिसराचा विचार केला तर फलटणच्या निंबाळकरांवर लक्ष ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा गड उभारला असावा. या किल्ल्याचा किल्लेदार परभू जातीचा होता. २०० पहारेकरी व बरीच शिबंदी किल्ल्यावर होती. संभाजी महाराजांच्या अखेरच्या काळात सुध्दा गड मराठ्यांच्या ताब्यात होता. २९ सप्टेंबर १६८८ मधे औरंगजेबाच्या फौजांनी हा गड ताब्यात घेतला. त्याची माहिती मुल्तफतखान औरंगजेबाला लिहून कळवतो, " खटावहून निघालो, तेथून आठ कोसावर संभाजीच्या मुलुखात पोहचलो. नारोगडच्या ( वारुगड ) पायथ्याशी असलेला संभाजीचा प्रदेश उध्वस्त केला. किल्लेदार चालून आला". १८१८ मध्ये सातारच्या राजाच्या फडणीस विठ्ठलपंत याने २०० लोक पाठवून दुसर्‍या बाजीरावाकडून हा किल्ला घेतला.
तसा पठारी प्रदेशात असल्याने वरून दृश्य एवढं खास नाही. समोर उत्तरेला फलटण शहर दिसत असते, तर मागे दक्षिणेकडे सीताबाईचा डोंगर आणि पश्चिमेकडे डाव्या हाताला अगदी कोपऱ्यात ओळखता आला तर संतोषगड.. इतकाच काय तो पसारा. पण सहजसोप्या चालीने एक सुंदर दुर्ग बघायचा असेल तर वारूगड म्हणजे भन्नाट ऑप्शन!!!
Varugad 27
मात्र माथ्यावरुन खाली माचीवर पहूडलेले वारुगड गाव आणि भैरवनाथ मंदिर एखाद्या चित्रासारखे दिसते. बालेकिल्ल्यावर मी एकटाच होतो. इतकी निरव शांतता कि एखादा खडा पडल्यावर देखील आवाज होइल. नाही म्हणायला मेंढराना कोवळे गवत खायला घालण्याचे हेच दिवस असल्याने गावातील मेंढपाळ मेंढ्या घेउन आजुबाजुच्या डोंगरात विखुरले होते, त्यांचा "फिर्रर्र" किंवा " आ ! फ्रुआ" असा पुकारा आधूनमधून एकु यायचा तेवढाच.इथून उठायचे जीवावर आले होते, पण पापी पेट का सवाल होता. नाईलाजानेच मी उतरायला सुरवात केली.
Varugad 28
एकुणच वारुगडाचे स्थान लक्षात घेता फक्त वारुगड पहायला न येता दोन ते तीन दिवसाची सवड काढून हा परिसर पहाता येईल. वारुगडावर मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी ४० किमी वरील शिवाजी महाराजांचे कुलदैवत, शिखर शिंगणापूरचे मंदिर व परीसर (यात शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजींनी बांधलेला तलाव, मंदिराची भव्य प्रवेशव्दार, शिवाजी-संभाजी-राजाराम महाराजांची समाधी मंदिर) पाहून , २५ किमी वरील महिमानगड पाहाता येतो.

तळटिपः- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) सातारा जिल्हा गॅझेटियर
२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३ ) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के. घाणेकर
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
६ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

22 Jul 2018 - 4:56 pm | प्रसाद_१९८२

छान लिहिलेय.
--
ट्रेक वृतांतील दोन नकाशे सोडल्यास बाकी एकही फोटो दिसत नाही.

माणदेशच्या वैराण मुलुखातील हे दुर्गस्थापत्य कमालीचे देखणे आहे.

खुपच छान माहीती. महादेवाच्या डोंगररांगातील किल्ले तसे दुर्लक्षीतच,त्यांची ओळख करुन देत आहात त्यासाठी आभार.

सुंदर फोटो आणि रोचक माहिती !

खिलजि's picture

26 Jul 2018 - 7:08 pm | खिलजि

दुर्गविहीरीसाहेब , आमच्यासारख्या ( गिर्यारोहणाची सवय नाही त्यांनी ) या गडाच्या माचीपर्यंत गाडीनेही जाऊ शकतो हे ऐकून बरे वाटले . एकूणच नेहेमीसारखा माहितीपूर्ण लेख . धन्यवाद .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

सर्वच वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनापासून आभार आणि धाग्याची शिफारस विभागासाठी निवड केल्याबध्दल संपादक मंडळाचे आभार. उद्यापासून मराठवाड्याच्या भटकंतीला सुरवात करणार आहे, त्यामधे अंभईच्या वाडेश्वर आणि घटोत्कच लेण्याची माहिती देणारा धागा येइल, त्याचेही तुम्ही स्वागत कराल अशी आशा करतो.

यशोधरा's picture

26 Jul 2018 - 8:57 pm | यशोधरा

सुरेख आलेत फोटो. भ्रमंती आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jul 2018 - 9:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक माहिती आणि सुंदर प्रकाशचित्रे ! शेवटून दुसरे देवळाचे विहंगम दर्शन करणारे चित्र खूप आवडले.

मराठवाड्याच्या भटकंतीची प्रतिक्षा आहे.