पावसाळी भटकंती: अँबी व्हॅलीचा शेजारी, कोराईगड(Koraigad,Korigad )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
15 Sep 2017 - 1:32 pm

एखाद्या किल्ल्याला ईतिहासातील एखादे झुंज, एखादी कथा, निसर्गरम्य परिसर, चढण्याच्या सोप्या वाटा, बर्‍यापैकी शाबुत असलेले अवशेष, एखादे आधुनिक आकर्षण असे बरेच काही लाभलेले असते. साहजिकच हा गड नुसता दुर्गभटक्यांची राबता असणारा न रहाता सर्वसामान्य पर्यटकांनासुध्दा आकर्षित करतो. असाच एका गडावर आज आपण पावसाळी भटकंती करणार आहोत, तो म्हणजे "कोराईगड". लोणावळ्याच्या दक्षिणेस पवनमावळात कोरबारस नावाचा भाग आहे. याच परिसरात आहे, कोराईगड. यालाच कोरीगड, कुंवारीगड आणि पेठ शहापुर या पायथ्याच्या गावामुळे शहागड अशी नावे आहेत.कोरी हे एका कोळ्यांच्या पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय. ह्या गडावर असलेली कोरीव गुंफा आणि परिसरात असणारी कार्ला, भाजे आणि बेडसे लेणी पहाता गडाचे वयोमान किमान तेराशे वर्षाचे निश्चित, पण आपल्याला ज्ञात ईतिहास आहे, निजामशाहीपासून.गडाची उभारणी तैलबैल्या, घनगडाजवळून चढणार्‍या घाटवाटा आणि कोरीगडाजवळचा सव घाट यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असणार. मलिक अंबरच्या ताब्यात हा गड होता. शिवाजी महाराजांनी १६५६ च्या सुमारास ढमाले देशमुखांकडून हा गड घेतला. पुढे पुरंदरच्या तहात या परिसरातील तुंग, तिकोणा, लोहगड व विसापुर मोगलांना दिले तरी कोराईगड आपल्याच ताब्यात ठेवला. ३ व ५ ऑगस्ट्च्या केरीदुर्ग (Kerridurg ) शिवाजीराजांनी मोघलांकडून ११ जुन १६७० ला घेतल्याचा उल्लेख आहे पण तो चुकीचा आहे, कारण केरिदुर्ग म्हणजे कुर्डूगड, कोराईगड नाही. सन १६९४ मधे औरंगजेबाच्या स्वारीत मोंगलानी गड घेतला, पण लगेच तो पंताजी शिवदेव, कदम, दामाजी नारायण यांनी परत घेतला. ११ मार्च १८१८ ला कर्नल प्रॉथर सिंहगड्,पुरंदर, लोहगड, राजमाची आदी बलदंड किल्ले जिंकून ईथे आला. ११,१२ व १३ मार्च असे तीन दिवस धडका देउन ईंग्रजांचे सैन्य चांगलेच वैतागले. अखेरीस १४ मार्च रोजी नेमका एक तोफगोळा दारुच्या कोठारावर पडला आणि प्रचंड स्फोट झाला. ज्याच्या जिवावर लढायचे ते दारु कोठार नष्ट झाले आणि कोराईगडाने शरणागती पत्करली.
kor1
हा झाला ईतिहास पण या कोराईगडावर एक दंतकथाही सांगितली जाते. महाड जवळ पिंपळवाडी या गावी लुमाजी भोकरे हा कोळी प्रमुख होता. त्याला मोठे ईनाम आणि संपत्ती पाहिजे होती. यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे काही पराक्रम करणे आवश्यक होते. तेवढ्यात त्याला कोरीगडावर एक तगडा अरबी घोडा असल्याचे समजले. आपण तो घोडा बादशहाला नजर करतो असे त्याने सांगितले.लुमाजीने कोळ्यांना मदतीला घेउन कोराईगडाला वेढा घातला. जवळपास तीन महिने झाले पण काही उपयोग होईना. अश्यातच महाडच्या मुसलमान सरदाराने त्याला खलिता पाठविला कि ,'तु कबुल केल्याप्रमाणे बादशहाला अजून घोडा दिलेला नाही. जर लवकरच काही हालचाल केली नाहीस तर तुला शिक्षा करीन'. हे एकून वेढ्यातील बरेच कोळी पळून गेले, मात्र काहीजण लुमाजीच्या पाठीशी राहिले. तेव्हा लुमाजीने वेष पालटून लाकुडतोड्याच्या रुपात गडावर शिरकाव केला व त्या घोड्याचा माग लावला. काही दिवस त्याने गडावर राहून पहार्‍याचा अंदाज घेतला आणि एके रात्री गडावरून माळ म्हणजे ठराविक अंतरावर गाठी बांधलेली दोरी सोडली, मात्र ती माळ खाली उभारलेया कोळ्यापर्यंत पोहचत नव्हती. लुमाजीने युक्ती केली आणि एकाच्या खांद्यावर दुसर्‍या उभे करून अखेरीस तो वर चढला आणि त्या घोड्यापर्यंत पोहचून त्याने तो पळविला, पण नेमके हे एका पहारेकर्‍याच्या लक्षात आले. त्याने लुमाजीवर गोळी झाडली, पण ती लागली त्या घोड्याला आणि तो घोडा मेला. लुमाजी मात्र गडावरुन निसटला आणि गावी परत आला. पण त्याला काळजी वाटु लागली कि आता आदिलशहा शिक्षा करणार. पण लुमाजीने केलेल्या धाडसी प्रयत्नाबध्द्ल खुश होउन आदिलशहाने त्याला ईनाम दिले.
या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत
१ ) लोणावळ्यावरून भुशी डॅम- लायन पॉईंट-घुसळखांब मार्गे पेठ शहापुर किंवा आंबवण्याला यायचे. इथून दोन्ही गावातून गडावर चढणार्‍या वाटा आहेत.
२ ) पुणे-मुळशी-ताम्हिणी घाटातून एक रस्ता येकोलेमार्गे आंबवण्याला येतो. ईकडूनही कोराईगडाला येता येईल.
kor2
कोराईगड परिसराचा नकाशा
स्वताची गाडी असेल तर फारच सोयीचे कारण या परिसरात खुपच कमी बससेवा आहे. थोड्याफार खाजगी जीपही या रस्त्यावर धावतात. १०.३० ला तिसकारी आणि १२.३० भांबुर्डे या बस सोयीच्या आहेत.
kor3

kor5

kor4
लोणावळ्यावरून पेठ शहापुर २० कि.मी.वर आहे. घुसळखांब ओलांडून आपण पेठ -शहापुरच्या जवळ आलो कि एखाद्या पाचरीसारखा जमीनीत रुतून बसलेल्या ताशीव खडक, तटबंदीचे शेला पागोटे लेवून कोराईगड सामोरा येतो. हा रस्ता अँबी व्हॅलीमुळे खुपच चांगला आहे.
kor6
दुतर्फा घनदाट झाडी, झुळझुळीत रस्ता आणि वाटेत लागणारे शिवलिंग, लायन यासारखे पाँईट यामुळे हा प्रवास कधी संपला ते कळतच नाही. पायथापासून गडावर जाण्यासाठी दोन पर्याय आहेत.
१ ) पेठ शहापुरपासून एक वाट मोठा वळसा घेउन सोप्या पायर्‍याच्या वाटेने साधारण पाउण तासात गडावर पोहचवते. ह्या वाटेने पुर्व बाजुच्या दरवाज्याने आपण गडावर प्रवेश करतो.
२ ) आंबवणे गावातून एक वाट थेट गडाच्या पश्चिम दरवाज्याकडे गेली आहे, पण हि वाट काहीशी अडचणीची आणि फारशी वापरात नाही.
आपण पुर्व दरवाज्याच्या वाटेने जाउ. सुरवातीला पायवाट सहारा अँबी व्हॅलीकडे जाते. ईथे आजुबाजुच्या परिसरातील गावकर्‍यांना रोजगार मिळाला आहे. साधारण वीस-पंचवीस मिनीटे चालले कि उजवीकडे पायर्‍यांची वाट दिसते.
kor7
एन पावसात आल्यास या पायर्‍यांवरून धबधब्यासारखे पाणी वहात असते.
kor8

kor9
या वाटेने पंधरा मिनीटे चढून गेल्यानंतर एक कोरीव लेणे आणि शेजारी नव्याने जीर्णोध्दार केलेले गणपतीचे मंदिर दिसते. गणेशाचे दर्शन घेउन पुढे निघायचे. या कोरीव लेण्याचा उपयोग पहारेकर्‍यांची कोठी म्हणुन होत असावा. कोरीव लेण्याच्या शैलीवरून गडाचे प्राचीनत्व लक्षात येते, मात्र नक्की काळ समजला नाही.
गडावर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने ईथल्या टाक्यातील पाणी भरुन घ्यावे किंवा शहापुरमधून देखील पाणी भरुन घेता येईल किंवा उत्तम म्हणजे स्वताचे पाणी सोबत आणणे.
kor10
दहा मिनीटातच गडाचा दक्षिणमुखी दरवाजा सामोरा येतो.
kor11
ईथे दरवाज्याजवळच डाव्याबाजुला तटावर एक मानवी चेहरा कोरलाय. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर गवताळ लांब पसरलेले पठार पहाण्यास मिळते. खालून गडाचे भेदक दर्शन झाल्यानंतर एवढी मोठी सपाटी पाहून आपण थक्क होतो. समुद्रसपाटीपासून ९२० मीटर उंचीचा ह्या गडमाथ्यावरून बराच मोठा परिसर दिसतो. मुख्य म्हणजे ईतक्या लढाया होउनही अजुनही तटबंदी खणखणीत आहे.
हवा स्वच्छ असेल तर गडमाथ्यावरून उत्तरेला नागफणीचे टोक, त्याचा मागे राजमाचीचे जुळे बालेकिल्ले, ढाकचा किल्ला, ईशान्येला सरसगडाची कातळटोपी, पश्चिमेला कर्नाळा, प्रबळगड, माथेरान, ईर्शाळगड, माणिकगड, दक्षिणेला मुळशी धरणाचे पाणी, लांबवर तोरणा आणि पुर्वेला तुंग, तिकोणा आणि मोरगिरी दिसतात.
kor12
आधी आपण उत्तर टोकाशी जाउया.
kor13
या बाजुला दोन मोठी तळी आहेत. ह्या दोन्ही तलावात काळे पाणविंचू आणि स्पंज जातीच्या प्राण्यांच्या वसाहती आहेत.
kor14
गडाच्या उत्तर पश्चिम टोकाशी तीन छोट्या गुहा आहेत, यातील मधल्या गुहेत चतुर्भुज विष्णुची मुर्ती आहे. या बाजुला पाण्याचे एक टाके आहे, त्याला गणेश टाके म्हणतात.
kor15

kor16
ईथेच जवळ गणपतीचे छोटेसे मंदिर आहे. आतमधे गणेश मुर्ती आणि ईतरही काही मुर्ती आहेत.
kor17

kor18
उत्तर टोकाशी जाउन उभारले की खाली गडाची पेठ, म्हणजे जिथून गडाला रसद पुरविली जाते, ते पेठ शहापुर दिसते.
kor19
एन पावसाळ्यात ईथे आल्यास या बाजुच्या तटबंदीतून वहाणारे पाणी पावसाळ्यात धबधब्याच्या स्वरुपात बाहेर पडताना दिसते.
पशिमेच्या तटबंदीच्या कडेकडेने आपण उत्तर टोकाकडे जाउया.
kor20

kor21
याच दक्षिण बाजुला चार तोफा व्यवस्थित लोखंडी स्टँडवर मांडून ठेवलेल्या दिसतात.
kor22
यापैकी कोराई मंदिराजवळ असलेली सर्वात मोठी तोफ आहे, "लक्ष्मी तोफ".
kor23
या नंतर गडाचा आंबवण्याकडचा दरवाजा आपल्याला दिसतो. एकूण त्याचे स्वरुप पहाता, हा नक्कीच मुख्य दरवाजा नसणार.
kor24
याच बाजुला खाली आंबवणे गाव दिसत असते.
शेवटी आपण दक्षिण टोकाला पोहचतो. हि बाजु तुलनेने नाजुक, त्यामुळे ईथे दुहेरी तटबंदी, म्हणजेच चिलखती तटबंदी घातलेली आहे.
kor25
जर आपण ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत आल्यास गडमाथा सोनकीच्या पिवळ्या फुलांनी भरून गेलेला असतो. या बाजुला आणखी काही तोफा आहेत. या नंतर गडाच्या पुर्व तटबंदीच्या कडेकडेने चालु लागल्यास खाली दरीत एक आधुनिक मानवनिर्मीत पण मुग्ध करणारी गोष्ट पहायला मिळते, " सहारा सिटी, अँबी व्हॅली".
kor26

kor27
साधारण २००० साली असे आधुनिक शहर उभे करावे असे असे श्री. सुब्रतो राय यांच्या मनात आले आणि लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरापासून जवळ सहारा ग्रुपने हे शहर वसविले. बरीच मोठी प्रवेश फि भरुन आपणही हे शहर आतून पाहु शकतो, पण ते शक्य नसेल तर चिंता नाही. कोराईगडावर विनाखर्च आपण याचा आनंद घेउ शकतो, ते ही बर्ड आय व्ह्युने.
kor28

kor29

kor30

kor31
खाली दिसणारे कारंजे, ऑडीटोरीयम, बंगले, जलतरण तलाव, पाण्याचे मोठे तलाव अतिशय विहंगम दिसतात.
kor32
कोराईगड बघायला जेमेतेम दोन-अडीच तास पुरतात, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी रात्री कोराई देवीच्या मंदिरात मुक्काम करून याच सहारा सिटीचा रात्रीचा नजारा बघता येईल.
मी २००२ साली गेलो होतो तेव्हा सहारा सिटीने गडावर खालून मोठे लाईट सोडले होते, गडावर शौचकुप उभारला होता, येणार्‍या पर्यटकांसाठी वॉच टॉवर उभारले होते. पण कंपनीविरुध्द गडावर अतिक्रमणाची तक्रार जातात, हे सर्व काढून घेतले गेले.
kor33
गडफेरी पुर्ण करुन आपण पुन्हा महादरवाज्यापाशी परत येतो.
lor34
गड फेरी उरकून आपण गडमाथ्याच्या मधोमध असणार्‍या कोराई देवीच्या मंदिरात जाउ. गडाच्या मध्य भागी काही उध्वस्त घरांचे चौथरे पहाण्यास मिळतात.खरं तर ह्याठिकाणीच थोडी दुरुस्ती करुन भटक्यांना रहायची सोय करुन देता येईल. सध्या तरी जीर्णोध्दार केलेले कोराई मंदिर हाच एकमेव निवारा गडावर आहे.
kor35
मंदिरात प्रवेश केल्यानंतर अंदाजे ४ फुट उंचीची कोराई देवीची त्रिशुळ, डमरु, गदा आदी धारण केलेली मुर्ती पहाण्यास मिळते. या कोराई देवीसंदर्भात एक कथा सांगितली जाते.जेव्हा १८१८ च्या युध्दानंतर ईंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा कोराई देवी दागिन्यांनी मढलेली त्यांच्या नजरेस पडली, त्यांनी हे दागिणे ईथुन हलवून मुंबईच्या मुंबादेवीला अर्पण केले. सध्या मुंबादेवीच्या मुर्तीवर हेच दागिने आहेत असे मानले जाते.मलातरी हि कथा पटत नाही. लुटमार करण्यासाठीच या देशात आलेल्या ईंग्रजाना ईतके मोठे घबाड मिळाल्यावर ते असे दागिने दुसर्‍या देवीच्या अंगावर चढवतील यावर माझा विश्वास नाही.असो.
kor36
या शिवाय गडावर शिवमंदिरही आहे.
kor37
एकंदरीत फारशी दमणुक न करता, लोणावळ्याच्या पर्यटकांनी गजबजलेल्या परिसरात असलेला हा किल्ला एक दिवसाची सवड काढून नक्कीच पहाण्यासारखा आहे. फक्त गडावर किंवा पायथ्याशी खाण्यापिण्याची फारशी सोय होण्याची शक्यता नसल्याने वाटेत घुसळखांब किंवा लोणावळ्याला जेवण्याच्या वेळेत पोहचू असे प्लॅनिंग करावे.
ईच्छा असल्यास तैलबैल्याच्या पाषाण भिंती आणि घनगडही पहाता येईल किंवा तुंग किल्ला पाहून परत जाता येईल.

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड कोटांची
संदर्भग्रंथ :-
१ ) पुणे जिल्हा गॅझेटियर
२ ) साद सह्याद्रीची! भटकंती किल्ल्यांची !!-प्र.के. घाणेकर
३ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
५ ) शोध शिवछ्त्रपतीच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
६ ) किल्ल्यांच्या दंतकथा- महेश तेंडुलकर

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

15 Sep 2017 - 1:58 pm | सिरुसेरि

छान माहिती आणी फोटो

स्वच्छंदी_मनोज's picture

15 Sep 2017 - 6:30 pm | स्वच्छंदी_मनोज

कोराईदेवी मंदीराची बरीच डागडुजी केलेली दिसतेय. फारपुर्वी जेव्हा गेलो होतो तेव्हा फक्त पत्र्याच्या छपराचे पडलेले देऊळ होते.
याच कोरीगडाच्या आसपास अनेक घाटवाटा आहेत. सव घाट, भैरीची वाट, गवळणीची वाट, काठीची वाट, ह्या अश्या काही. कोकणातला अनघाई आणि देशावरचा कोरीगड हे या घाटवाटांचे रक्षक.

पुढील भाग टाका लवकर.

दुर्गविहारी's picture

15 Sep 2017 - 8:26 pm | दुर्गविहारी

प्रतिक्रियेबध्दल धन्यवाद. आपली माहिती बरोबर आहे. पण बहुतेक स्थानिक आता रोजगार शोधायला शहराकडे जात असल्याने या जुन्या वाटा वापरण्याचे बंद झाले आहे. सव घाट, काठिची वाट तर स्थानिक तरूणांना माहितीही नाही अशी परिस्थिती आहे. काही वर्षानी या वाटा फक्त आठवणी म्हणूनच उरतील.

स्वच्छंदी_मनोज's picture

18 Sep 2017 - 12:13 pm | स्वच्छंदी_मनोज

बर्‍याच घाटवाटा ह्या बंद पडत चालल्यात कारण या वाटा वापरणारे गावकरी आता नाही राहीले, आणि जे आहेत त्याना याची गरज वाटेनाशी झालीय.
मि ह्या सव, भैरी, गवळण, काठी अश्या जेव्हा घाटवाटा केल्या तेव्हा मलाही झगडतच शोधाशोध करावी लागली होती.

कपिलमुनी's picture

16 Sep 2017 - 3:43 pm | कपिलमुनी

अनघाई गेला आहेस का ?
बाहेर बर्‍याच जणांना महिती नसते !
( अर्थात तुम्ही _/\_ , तुम्हाला असनारच).

दुर्गविहारी's picture

16 Sep 2017 - 6:11 pm | दुर्गविहारी

नाही हो मुनीवर, अनघाईला जायला जमले नाही. अनघाई आणि मृगगड असा प्लॅन केला होता. पण अपेक्षेपेक्षा मृगगड त्रासदायक झाला. मार्चचे तापते उन आणि रात्रभर केलेल्या प्रवासाचा शीण, याने मृगगड केल्यानंतरच थकवा जाणवायला लागला. पायथ्यातूनच अनघाई बघून काहीशा निराशेने परतलो. तसाही अनघाईला वाटाड्या लागेल आणि रॉक पॅच असल्याने एक दोघे जण बरोबर असलेले बरे अशी स्वताची समजुत घातली. झाले.
अर्थात डोंगर तिथेच असतात. बघुया पुन्हा कधी जमते ते.

स्वच्छंदी_मनोज's picture

18 Sep 2017 - 12:19 pm | स्वच्छंदी_मनोज

पण अपेक्षेपेक्षा मृगगड त्रासदायक झाला. मार्चचे तापते उन आणि रात्रभर केलेल्या प्रवासाचा शीण, >>> मृगगड आहेच फसवा.. मी दोनदा गेलोय पण समोर किल्ला दिसत असून वाट भरकटलोय. म्हटले तर आहे एवढासाच पण कोकणातल्या वातावरणामुळे दम काढतो. आम्ही कुरवंड्यावरून नागफणी करून फल्याण घाटाने फल्यान गावातून केला होता हा एका दिवसात तर तेव्हा फार म्हणजे फारच हाल झाले होते.

तसाही अनघाईला वाटाड्या लागेल आणि रॉक पॅच असल्याने >>> अनघाईला वाटाड्या नाही लागत पन एक दोन एक्स्पोज्ड रॉक पॅच असल्याने सुरक्षा दोर मात्र नक्कीच लागतो. माझाही अनघाई राहीलाय, करुया एकत्र प्लॅन कधीतरी.

दुर्गविहारी's picture

18 Sep 2017 - 5:47 pm | दुर्गविहारी

माझाही अनघाई राहीलाय, करुया एकत्र प्लॅन कधीतरी.

नक्कीच! मलाही हे असे ऑफबीट किल्ले फिरण्यासाठी तितकाच दर्दी जोडीदार हवा आहे. अशा किल्ल्याना सोबत यायला कोणी तयार होत नाही, म्हणूनच नाईलाजास्तव सोलो ट्रेक करायची वेळ येते. त्यातून मग मी काढलेला मार्ग म्हणजे पायथ्याच्या गावातून पैसे देउन कोणीतरी सोबत घ्यायचे. पण काही वेळा ते ही जमत नाही. याचे एक उदाहरण मी गुमताराच्या घाग्यात दिले आहेच.याच कारणाने काही किल्ले राहून गेलेत.
जेव्हा मी जाण्याचा प्लॅन करेन तेव्हा आधी तुम्हाला नक्की कळवेन. जमल्यास तुमचा नं. व्य.नि.करा.

प्लान झालाच तर आमास्नी बी व्यनि करा.

दुर्गविहारी's picture

22 Sep 2017 - 12:45 pm | दुर्गविहारी

नक्कीच.आणखी कोणी ईंटरेस्टेड असेल एक मि.पा. करांचा ट्रेकच करु.

स्वच्छंदी_मनोज's picture

18 Sep 2017 - 12:14 pm | स्वच्छंदी_मनोज

मी नाही केलाय अजून पण कळंब खोर्‍यात भटकलोय तेव्हा अनघाईचे जवळून दर्शन झाले आहे.

मी २००२ साली गेलो होतो तेव्हा सहारा सिटीने गडावर खालून मोठे लाईट सोडले होते, गडावर शौचकुप उभारला होता, येणार्‍या पर्यटकांसाठी वॉच टॉवर उभारले होते. पण कंपनीविरुध्द गडावर अतिक्रमणाची तक्रार जातात, हे सर्व काढून घेतले गेले.

याबाबत असे ऐकले आहे की, सहारावाल्यांची खाजगी प्रॉपर्टी आहे असे कारण देऊन मुंबईच्या एका ट्रेकर ग्रुपला गडावर जाणास मज्जाव केला गेला.. मग प्रकरण कोर्टात गेले आणि लाईट्स व वॉचटॉवर बेसहारा झाले. ;)

खखोसजा.

दुर्गविहारी's picture

15 Sep 2017 - 8:30 pm | दुर्गविहारी

कदाचित हे खरे असावे. असो. निदान एक गड तरी खाजगी होण्यापासून वाचला. मी गेलो होतो तेव्हा मात्र सहारा सिटीचे कोणी पहारेकरी दिसले नाहीत. अर्थात ते वर्ष मी पुर्णपणे मोकळाच होतो आणि रविवार सोडून सुध्दा ट्रेक व्हायचे.कदाचित आठवड्याच्या मधल्या दिवशी गेलो असेन.

स्वच्छंदी_मनोज's picture

18 Sep 2017 - 12:25 pm | स्वच्छंदी_मनोज

बर्‍याच वर्षांपुर्वी पहील्यांदा जेव्हा गेलो होतो तेव्हा पेठ शहापूर गाव एकदम साधेसेच होते, गडावर कोणीही नव्हते आणी कोराईदेवीचे मंदीरही पडकेच होते. सहारा नुकतेच होऊ घातले होते. नंतर दोन्/तीन वर्षानंतर गेलो तेव्हा एक सहाराचा सुरक्षारक्षक मंदीरात होता ज्याने आम्हाला आत जायला मनाई केली. त्याची चांगलीच शाळा घेतली आम्ही. नंतरच्या एक दोन वेळेलाही एक गार्ड तिथे असायचा. सध्या काय परीस्थीती आहे माहीत नाही. जाऊन बघायला हवे :)

तैलबैलावर राहिलो आहे, तिथे होणारे रॅाक क्लाइमिंगही पाहिले. तिकडून खाली ठाणाळे गावातही गेलो. हा कोरिगड नाही पाहिला वर जाऊन. पण फार छान दिसतो आहे. सर्व फोटो आवडले. जाईन कधितरी.

आंबवणे ते घुसळखांब चालत आलोय. फ्लाइकॅचर पक्षी खूप आहेत. रस्ता-झाडीचा फोटो.

दुर्गविहारी's picture

15 Sep 2017 - 8:40 pm | दुर्गविहारी

कोरीगड एकदम सोपा आहे. सहकुटूंबही फिरू शकतो. सुट्टीच्या दिवशी गर्दी असते, त्यामुळे एकटे गेले तरी अडचण येत नाही. जरुर पहा.

मोदक, ते प्रकरण झालेले. वरून अँबिव्हॅली दिसते म्हणून पाहायला जाणाय्रा लोकांची झडती त्यांचे वाचमन घेत असत. आपल्या क्रिकेट टीमपैकी काहींना ( सचिन +) बंगले दिलेत सहाराने.

मोदक's picture

15 Sep 2017 - 8:37 pm | मोदक

काहींना..?? २००३ विश्वचषकाच्या संपूर्ण चमूला (इन्क्लुडींग पार्थिव पटेल, जो एकही मॅच खेळला नाही) बंगले मिळाले आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2017 - 9:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच तपशिलांसह वर्णन आणि सुंदर फोटो !

माहिती आणि फोटो फार सुंदर... सगळ्या फोटोंमधला पोपटी रंग अप्रतिम! खरंच जायलाच हवं इथं.

कोरीगडावर वर्षानुवर्षे जातोय. अगदी अ‍ॅम्बी व्हॅली स्थापन होण्याच्या आधीपासून. त्याचा सर्वोत्तम व्ह्यु हा सालतर खिंड ओलांडून पुढे आल्यावर दिसतो (पहिल्याच फोटोत असलेला). कोरीगडावर दोन तीन वेळा मुक्कामही केलेला. तेव्हा कोराईदेवीच्या मंदिरावरचं छप्पर विखुरलेलं होतं. महादेवाचं लहानसं मंदिर मुक्कामासाठी उत्कृष्ट होतं. गणेश लेण्यातील टाक्याचे पाणी पिण्याजोगे नाही. आजमितीस गडावर एकमात्र पिण्याच्या पाण्याचा उत्तम स्रोत आहे तो म्हणजे कोरीगडाच्या प्रवेशद्वारापासून (जिथे तो मानवी चेहरा कोरलाय) थोड्या खाली असलेल्या एका पाण्याचा टाक्यात. ह्या टाक्याची रचना फार भारी. छोट्याच्या गुहेत कमरेइतक्या उंचीवर हे टाके आहे. त्यामुळे धूळ, कचरा पडण्याचा धोका नाही. गडावर पूर्वी गणेश टाक्याचे पाणीही अगदी पिण्याजोगे होते पण ते नंतर नंतर कचर्‍यामुळे खराब होत गेले.

गडाच्या आंबवण्याकडच्या बाजूने एकदा खाली उतरलो होतो. वाटेवर घसारा आणि काही प्रमाणात एक्स्पोजर आहे. आजमितीस ही वाट तर अगदीच मोडलेली असेल. वाट उतरवल्यावर पदरातून आंबवण्यात येण्यास मात्र खूप वेळ लागतो.

दुर्गविहारी's picture

16 Sep 2017 - 6:45 pm | दुर्गविहारी

खुपच महत्वाची माहिती दिलीत तुम्ही!! गडावर सर्वसामान्य पर्यटकांचा वावर वाढल्यामुळे टाक्यातले पाणी खराब झाले आहे. सुदैवाने सह्याद्री प्रतिष्ठान या गडाचे संवर्धनाचे काम करते आहे, त्यांना यश येउन पुन्हा टाकी नितळ पाण्याने भरली जावीत अशी प्रार्थना.
तैलबैल्याला जाताना मी आंबवण्याला उतरून तेलबैल्या गावापर्यंत चालत गेलो होतो तेव्हा या गडाला अनेक कोनातून पाहिलयं, खुपच सुंदर आहे हा किल्ला.

आजमितीस गडावर एकमात्र पिण्याच्या पाण्याचा उत्तम स्रोत आहे तो म्हणजे कोरीगडाच्या प्रवेशद्वारापासून (जिथे तो मानवी चेहरा कोरलाय) थोड्या खाली असलेल्या एका पाण्याचा टाक्यात. ह्या टाक्याची रचना फार भारी. छोट्याच्या गुहेत कमरेइतक्या उंचीवर हे टाके आहे. त्यामुळे धूळ, कचरा पडण्याचा धोका नाही.

हे टाके मात्र मी पाहिले नाही.पुढच्या भेटीत नक्की पाहिन.
नेहमीप्रमाणेच प्रोत्साहनात्मक प्रतिक्रियेबध्दल धन्यवाद.

चौकटराजा's picture

19 Sep 2017 - 8:52 am | चौकटराजा

यातील सर्वच फोटो मस्त . खास करून शेवटचा .

सोमनाथ खांदवे's picture

19 Sep 2017 - 9:13 am | सोमनाथ खांदवे

आमचे शरीर नाही पण मन मात्र तुमच्या बरोबर कोराईगड ला जावून आले , खुप सुंदर .

दुर्गविहारी's picture

19 Sep 2017 - 11:11 am | दुर्गविहारी

शरीरानेही जाउन या. ( हलकेच घ्या हो )
मुध्दा ईतकाच कि किल्ला सोपा आणि सहकुटुंब पहाण्यासारखा आहे.

इरसाल कार्टं's picture

20 Sep 2017 - 4:02 pm | इरसाल कार्टं

फोटो कातिल आलेत.

जुइ's picture

22 Sep 2017 - 2:24 am | जुइ

आपण करत असलेली दुर्ग भटकंती जोरदार आहे!

अभिजीत अवलिया's picture

22 Sep 2017 - 2:10 pm | अभिजीत अवलिया

मस्त लेख. जुलै मधे या गडावर गेलो होतो. तुमच्या इतका गडाचा विस्तृृत इतिहास माहीत न्हवता.