पावसाळी भटकंती : संतोषगड (Santoshgad)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
6 Jul 2018 - 12:06 pm

महाराष्ट्राचे देश व कोकण असे दोन भौगोलीक भाग करण्यात दक्षीणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीचा मोठा वाटा आहे. या सह्याद्रीला पश्चिमेला कोकाणात आणि पुर्वेला देशावर डोंगररांगाचे फाटे फुटलेत. अजंठा-सातमाळा, हरिश्चंद्र-बालाघाट, सेलबारी-डोलबारी अशा काही यातील प्रमुख रांगा. अशीच आणखी एक रांग दक्षीण महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात आहे. या रांगेच्या शेवटी शिखरांच्या राजाचे शंभु महादेवाचे "शिखर शिंगणापुर" हे देवस्थान आहे. यामुळे या रांगेला "शंभु महादेव डोंगररांग" म्हणतात. प्रतापगडापासून उगम होउन महाबळेश्वराला वंदन करुन हि रांग पुर्वेकडे शंभु महादेवाचे दर्शन घेण्यासाठी धावते.पुढे या रांगेला तीन उपरांगा फुटतात, शंभूमहादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग. यापैकी म्हसोबा डोंगररंगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत. आपल्याला या पावसाळी भटकंतीत यांचीच ओळख करुन घ्यायची आहे.
अत्यंत कमी पाउस आणि दुष्काळी प्रदेश अशी अपकिर्ती पसरलेला हा प्रदेश आताशी कात टाकतो आहे. उरमोडीच्या व धोम बलकवडीच्या पाण्यामुळे आता हळूहळू समॄध्दी येते आहे. आधी केवळ डाळींबांच्या मळ्यावर जगणारा शेतकरी इथल्या कसदार जमीनीत ऊसाच्या शेती करु लागला, त्यामुळे सर्व परिसर सधन झालेला आहे. माणदेशी मातीची आणि इथल्या माणसांची खरी ओळख करुन द्यायचे श्रेय सुप्रसिध्द लेखक व्यंकटेश माडगुळकर उर्फ तात्यांना जाते. अर्थात बनगरवाडीत वर्णन केलेली स्थिती आता राहिली नसली, तरी "माणदेशी माणसे" मात्र तुम्हाला अजून भेटतील हे नक्की.
Santoshgad 1
( संतोषगड उर्फ ताथवड्याचे हवाई प्रकाशचित्र )
इथली भटकंती शक्यतो पावसाळ्यात केलेली उत्तम. इथल्या एन उन्हाचा कडाका बाहेरच्या लोकांना सहन होण्यासारखा नाही. पाउस तसा जेमतेम भिजवून जातो. एन आषाढात रिमझिंम पाउस असतो तर परतीचा पाउस इथल्या जमीनीची तहान पुढच्या जेष्ठापर्यंत भागवून जातो. म्हणजेच एन आषाढात पाउस नसला तरी ढगांची सावली इथली वणवण सुसह्य करते. सातार्‍या जिल्ह्याचा पुर्व भाग म्हणजे खटाव व दहिवडी तालुका हे दोन्ही तालुके १०० मीटर उंच पठारावर वसलेत. त्यामुळे सहाजिकच दक्षिणेकडे कराडला जायचे असो, पुर्वेकडे पंढरपुर असो, पश्चिमेला कोरेगाव, सातार्‍याला जायचे असो वा उत्तरेला फलटण तालुक्यात उतरायचे असो, घाट चढण्याशिवाय किंवा उतरण्याशिवाय पर्याय नाही. या पठाराच्या उत्तर बाजुच्या कडेला असलेल्या डोंगररांगेत माणदेशी दुर्गचौकडी खडी आहे. यातील मोळ घाटावर पहारा करणार्‍या "संतोषगड उर्फ ताथवडा" या गडापासून या भ्रमंतीला सुरवात करुया.
Santoshgad 2
एका अशाच सवडीच्या दिवशी मी या संतोषगडाचा प्लॅन केला. इथे जायचे तर दोन पर्याय होते.
१ ) ताथवडे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. ताथवडेला अनेक मार्गांनी पोहोचता येते. फलटण ते ताथवडे अशी एस टी सेवा दर अर्ध्या तासाला उपलब्ध आहे. फलटण ते ताथवडे हे साधारण १९ किमी चे अंतर आहे. पुणे-मुंबईवरुन यावयाचे झाल्यास आधी पुणे-सासवड-जेजुरी-नीरा-लोणंद-फलटण यामार्गे किंवा पुणे-बेंगळुरू हायवेने शिरवळाला जाउन तेथून लोणंदमार्गे फलटण गाठता येते. फलटणला येउन नंतर ताथवडे गाठणे सोयीचे आहे.
२ ) सातार्‍याहून सेवागिरी महाराजांमुळे प्रसिध्द झालेल्या पुसेगाव मोळघाटमार्गे फलटणला जाणार्‍या बसने ताथवडे गावाच्या फाट्याला उतरता येते. पुसेगाव ते ताथवडे हे साधारण २३ किमी चे अंतर आहे. सातारा- पंढरपुर रस्त्यावर पुसेगाव असल्याने पुसेगावला भरपुर बस आहेत.
Santoshgad 3
मी मात्र बाईकवरुन पुसेगाव गाठले आणि बुध, ललगुण,डिस्कळ अशी गावे मागे टाकीत अखेरीस मोळ घाट उतरायला सुरवात केली. मोळ घाटातून एका वळणावर महादेव डोंगररांगेतून बाहेर आलेल्या संतोषगडाचे दर्शन झाले. पायथ्याचे ताथवडा गाव मात्र पुसेगाव-फलटण रस्त्यावरुन साधारण १ कि.मी. आत आहे. रस्त्यावरुन साधारण समुद्रसपाटीपासून २९६५ फुट उंचीचा ( ९०६ मी ) पण पायथ्यापासून जेमतेम २०० मीटर उंचीचा गड समोर दिसु लागला.
एन जुलै असल्याने आजुबाजुला थोडी हिरवळ होती, त्याने परिसर थोडाफार तरी सुसह्य वाटत होता, नाहीतर तसा हा भाग वैराणच.
Santoshgad 4
एखादे टिपीकल माणदेशी गाव असावे तसेच हे ताथवडे आहे. गावाच्या मध्यभागी बालसिध्द शंकराचे प्रशस्त मंदिर दिसते.
Santoshgad 5
हे प्राचिन महादेवचे मंदिर प्रेक्षणीय असुन याचा नगारखाना अंदाजे १५ मीटर उंच आहे. मंदिराचे प्राकार प्रशस्त असून मंदिराच्या गाभार्‍यावर असलेल्या कळसामधे तालीम आहे. ( म्हणजे कळस आतून पोकळ असून त्यात तळाशी माती असते. हा प्रकार मी अनेक देवस्थानात पाहिला आहे, मात्र याचे कारण समजत नाही )
Santoshgad 6
मंदिराच्या गाभार्‍याच्या पायथ्याला एक शिलालेख आहे. त्याचे वाचन पुढीलप्रमाणे आहे. "चरणी सादर विसाजी शामराव देशपांडे मो | फलटण देहे सांवधरा शिव कसबे ताथवडा शके १६४८ चैत्र भानु संवत्सर जेष्ठ शुध्द पंचमी" याचा अर्थ "ताथवडे गावातील प्रमुख देउळ बालसिध्दाचे. इ.स. १७६२ मध्ये विसाजी शामराव देशपांडे नामक कोणा सदगृहस्थाने या प्राचीन देवस्थानाचा जीर्णोध्दार केला.
Santoshgad 7
मंदिराजवळ एक दगडी दिपमाळ असुन या मुख्य मंदिराबरोबरच याच्या शेजारी रामाचे, विठ्ठल-रखुमाईचे व शिव मंदिर आहे.
Santoshgad 8
शिव मंदिरातील पिंडीवर शाळुंखेत चौमुखी शिव कोरलेले आहेत.बालसिध्द म्हणजे शंकर अर्थात अष्टभैरवापैकी एक. त्याची मुर्ती शैवपंथीयांच्या संकेतानुसार आहे. दर चैत्र वद्य अष्टमीला येथे यात्रा भरते.
बालसिध्दाचे दर्शन घेउन मी गडाकडे निघालो. ताथवडा गावातून सोपी पायवाट गडावर घेऊन जाते. सध्या या वाटेवर सह्याद्रीत आढळणार्‍या वेगवेगळ्या पक्ष्यांचे फलक लावले आहेत. तसा संतोषगड हा "बेलाग, बुलंद, राकट, कणखर" वैगेरे "टिपिकल" सह्याद्रीच्या विशेषणांच्या खात्यात जमा न होणारा होता. त्रिकोणी आकाराचा हा गड तीन टप्प्यांचा बनलेला आहे. पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुसया टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्लाचा भाग आहे.
Santoshgad 9
( संतोषगडाचा नकाशा )
सह्याद्रीचे उंचच उंच किल्ले चढल्यानंतर या गडाची चढण तशी मॉर्निंग वॉकला दमायला होईल तितपतच आहे. खरेतर ह्या गडाच्या पायथ्याशी गाव असूनही गावकर्‍यांच्या अनास्थेमुळे गडाची दुर्दशा झाली होती. पण हळूहळू आपल्या या अबोल मानकर्‍यांचे महत्व समजल्याने बर्‍याच गडावर दुर्गसंवर्धन सुरु झाले आणि याही गडावर पुण्याच्या शिव सह्याद्री संस्थेची पावले वळाली आणि ईथले रुपडे पालटून गेले आहे. या धाग्यात त्यांच्या कार्याविषयी लिहीणारच आहे.
Santoshgad 10
गडावर चढाई करताना वाटेत हि मंदिर व काही घुमट्या नजरेला पडतात. वर चढणार्‍या वाटेवर वनखात्याने परिसरात दिसणार्‍या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे फोटो लावले आहेत.
Santoshgad 11
पंधरा वीस मिनिटांच्या चढाई नंतर एक पायवाट उजवीकडे वाळलेली दिसली. मठाच्या पुढे तीन गुंफा आहेत. वाटेवरून चालत गेलो असता मी एका मानवनिर्मित गुहे जवळ जाऊन पोचलो.
ही गुहा म्हणजे एक खांबटाकं आहे. सुरुवातीच्या दोन खांबांवर द्वारपाल कोरलेलेआहेत. आत गेल्यावर खोली वाढत गेली. खाली जायला कोरलेल्या पायऱ्या आढळून आल्या. सध्या गुहेमध्ये गणपतीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवलेले आहे. पाणी मात्र नाही.
Santoshgad 12
गुहा बाजूला ठेऊन पुन्हा मुख्य पायवाटेला आलो आणि दोन मिनिटात एका आश्रमापाशी पोचलो. येथील माताजी दत्ताच्या भक्त असून सुमारे चाळीस वर्षांपासून येथे राहत आहेत अशी माहिती मिळाली. आश्रमामधे महिषासुरमर्दिनीची सुंदर मुर्ती आहे. आश्रमाजवळ एक छोटे मंदिर आहे, जेथे दत्त व लक्ष्मी मातेच्या प्रतिमा ठेवल्या आहेत.
मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे. मात्र येथपर्यंत पोहोचण्यासाठी वळसा घालून यावे लागते. मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते.
Santoshgad 13
पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते. देवळातील या मुर्तीला वाल्मिकीची मुर्ती समजतात. येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाजातच घेऊन जाते.
Santoshgad 14
आश्रमाकडून पुन्हा काही पावले मागे आलो आणि डावीकडे वर जाणारी पायवाट पकडली. इथे किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराचे दर्शन झाले. येथील बुरुज ढासळले आहेत. अलीकडेपर्यंत दरवाज्याचा बराचसा भाग हा मातीखाली गडाला गेलेला होता. परंतु पुण्यातील शिव सह्याद्री संस्थेच्या कामातून हा दरवाजा पुन्हा आणला गेला आहे.
Santoshgad 15
या दरवाज्याच्या आधी उजव्या बाजुला तटबंदीत हि कमान दिसते.
दरवाज्यातून पुढे चालत गेल्यावर माझा प्रवेश किल्ल्याच्या माचीवर झाला. येथील बालेकिल्ल्याची तटबंदी आणि ताशीव कडे दृष्टीस पडतात.
Santoshgad 16
माचीला सुद्धा तटबंदी आहे. ह्याची उंची अंदाजे वीस फूट आणि रुंदी पंधरा फुटाहून अधिक आहे. किल्ल्याची भौगोलिक रचना पाहता इतकी भव्य तटबंदी बांधायचा हेतू लक्षात येतो. किल्ल्याचा डोंगर चढायला अतिशय सोपा आहे. त्यामुळे शत्रू अगदी सहजपणे वर चढून येऊ शकतो. माचीवरील ही अभेद्य तटबंदी त्याला आत येण्यापासून रोखून ठेवू शकते.
Santoshgad 17
माचीवरून पायवाटेने पुढे गेल्यावर आपल्याला अजून एक दरवाजा लागला. ह्या दरवाज्याची पडझड झाली आहे.
Santoshgad 18
येथून आत गेल्यावर बालेकिल्ल्याचा दरवाजा मुख्य दरवाजा लागला.
Santoshgad 19
हा दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे. हा दरवाजा निश्चित्तच शिवकालात बांधला गेला असेल. दरवाज्याचा बराचसा भाग अनेक वर्षे जमिनीखाली गाडला गेला होता. शिव सह्याद्री संस्थे मार्फत मुरूम माती बाजूला करून दरवाजा बाहेर काढण्यात आला आहे. दरवाज्याचे चौकोनी दगड, ते एकमेकांवर चिकटवण्यासाठी वापरलेल्या चुन्याच्या रेषा स्पष्ट दिसतात.
Santoshgad 20
दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर सुस्थितीत असलेल्या पहारेकर्यांच्या देवड्या दृष्टीस पडल्या.
Santoshgad 21
बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला मारुती आणि गणपतीचे भग्न अवस्थेतील मंदिर आहे.दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच हनूमानाचे टाके आहे. त्याच्याच मागे वाड्यांचे व घरांचे अवशेष आहेत.
Santoshgad 22
त्याच्या पुढे प्रशस्त सदर आहे. ती पाहता राजगडाच्या सदरीची आठवण आल्यावाचून राहात नाही.
Santoshgad 23
सदरीच्या मागच्या बाजूला तीन खोल्यांत विभागून बांधलेले धान्यकोठार आहे. त्याच्या भिंती शाबूत आहेत, परंतु छप्पर उडाले आहे. त्यात धान्य, दारुगोळा साठवित असत.
Santoshgad 24
गडमाथ्यावर हा चुन्याचा घाणा दिसला.
Santoshgad 25
इथून मी निघालो ते गडावरचे मुख्य आकर्षण पहाण्यासाठी, "प्रचंड मोठी विहीर आणि तातोबा महादेवाचे मंदिर" पहाण्यासाठी. धान्यकोठाराच्या मागच्या बाजूस प्रचंड मोठं विहीर वजा टाकं आहे. टाक्यात खाली वाकून बघताना भीती वाटते. ह्या चौरसाकृती टाक्याची लांबी-रुंदी साधारण तीस फूट, तर खोली जवळपास पन्नास ते पंचावन्न फूट आहे. इतकं मोठं खोदीव टाकं यापुर्वी धुळ्याजवळचा सोनगिर आणि संकेश्वर जवळच्या वल्लभगडावर पाहिले होते. टाक्यात पाणी नाही. माती आणि मुरूम ह्यामुळे ह्या टाक्याच्या बराच भाग बुजलेल्या अवस्थेत होता. शिव सह्याद्री संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला, त्यामुळे टाक्यांची खोली आठ ते दहा फूट वाढली. टाक्याची मूळ खोली अजूनही जास्ती असण्याची शक्यता आहे.
Santoshgad 26
एकुणच या परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेउन इतकी खोल विहीर खोदलेली असावी. हि विहीर पाण्याने पुर्ण भरत असल्यावर गडावरच्या लोकांना काळजीचे कारण उरत नसणार. याच विहीरीचे पाणी नळाद्वारे ताथवडा गावात आणले जात होते. १९९३ पर्यंत त्याचा वापर होत होता , नंतर तो बंद झाला.
Santoshgad 27
टाक्यात उतरण्यासाठी खोदीव पायऱ्या काढल्या आहेत.
Santoshgad 28
खाली उतरताना वाटेत शंकराचे छोटे देऊळ आहे. यालाच "तातोबा महादेव" म्हणतात. याची एक कथा रहाळात सांगितली जाते. तातोबा नावाचा एक साधू या डोंगरावर राहत असे. त्याच्या ख्यातीमुळे रोजच भक्तांची गर्दी व्हायची. त्यामुळे त्याला साधनेला वेळ मिळत नसायचा. शेवटी कंटाळून त्याने या डोंगरावर एक विहीर बांधली आणि त्या विहिरीत तो राहू लागला. जेणेकरून लोकांना आपण कुठे आहोत याचा अंदाज येणार नाही. त्यामुळे त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना साधूबाबा अचानक कुठे गेले हेच कळेना. एक दिवस या डोंगरावर आलेल्या एका गुराख्याला प्रचंड तहान लागली. पण त्याला पाणी कुठे आहे हे माहीत नव्हतं. अचानक त्याच्यासमोर हे तातोबा प्रकट झाले आणि आपल्या कमंडलूमधलं पाणी त्याला प्यायला दिलं आणि अचानक ते अंतर्धान पावले. चकित झालेल्या गुराख्याने आजूबाजूला शोध घेतल्यानंतर त्याला त्या विहिरीत एक शिवमंदिर आणि हे तातोबा दिसले. पुढे त्यांच्या भक्तांनी त्यांचं मंदिर गडावर बांधलं आणि त्यांचंच नाव पायथ्याच्या गावाला दिलं. तेव्हापासून या डोंगराला आणि त्याच्या पायथ्याच्या गावाला ‘ताथवडा’ असं म्हणू लागले. अर्थात ही एक दंतकथा असून याचा कोणताही पुरावा नाही. पण घटकाभर मनोरंजनाची गंमत मात्र यात आहे हे नक्की!!
Santoshgad 29
बालेकिल्ला त्रिकोणी आकाराचा असून तिन्ही टोकाशी बुरुज आहेत. पैकी दक्षिण बाजुचा बुरुजाला चिलखती तटबंदी आहे. ह्या बुरुजावरून खाली पाहिल्यावर ह्या बुरुजाची चिलखती तटबंदी दृष्टीस पडली.
Santoshgad 30
इथे जाण्यासाठी बुरुजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूने भुयारी मार्ग केलेले आहेत. दोन्ही बाजूला तटबंदी आणि मधून वाट. राजगडाच्या आळु दरवाज्याची आठवण आली.
Santoshgad 32
चिलखती तटबंदी मधून एक चोरवाट डावीकडे उतरते. सध्या ही वाट काही प्रमाणात बुजलेल्या अवस्थेत आहे.
Santoshgad 31
याच बाजुला एका प्रचंड प्रस्तरावर दुसरा प्रस्तर ठेवलेला पहायला मिळतो. असाच पाषाणस्तंभ चंदन किल्ल्यावरसुध्दा आहे. मात्र हि रचना कशासाठी याचा उलगडा होत नाही.
Santoshgad 33
गडाच्या दक्षिणेला महादेव डोंगररांग पसरलेली दिसते. पुर्वेला लांबवर वारुगडाचा बालेकिल्ला दिसतो तर पश्चिमेला नांदगिरी उर्फ कल्याणगड त्याच्या माथ्यावरच्या वृक्षामुळे ओळखता येतो. यानंतर मी किल्ल्याच्या पूर्व दिशेकडे असणाऱ्या बुरुजावर आलो.
Santoshgad 34
याच बाजुचे कातळ खडे आहेत आणि त्यावरचे होल्ड आणि एकुणच रचना विचारात घेता हे प्रस्तरारोहणाचा सराव करण्यासाठी आदर्श आहेत.
Santoshgad 35
येथून खाली पाहता भक्कम तटबंदी दृष्टीस पडली. खाली जाण्यासाठी उभ्या असलेल्या बालेकिल्ल्याच्या बुरुजावरून दगडी जिना खाली काढला आहे. परंतु त्याची बरीच पडझड झालेली आहे. हा किल्ल्याच्या माचीचाच भाग असावा. माचीचा विस्तार फार नाही.
Santoshgad 36
ह्या तटबंदी मधून सुद्धा एक चोरवाट काढलेली दिसली. पण ती वाट तटबंदीच्या आत निघते याचे कारण समजले नाही. पण अशीच बरीच न उकल होणारी दुर्ग वैशिष्ट्ये या संतोषगडावर आहेत.
किल्ल्यावरील विस्तीर्ण धान्यकोठार, बालेकिल्ल्यावरील सदर, बालेकिल्ल्याचे चिलखती बुरुज, त्यातील चोरवाटा, प्रचंड मोठं पाण्याचं टाकं, गोमुखी बांधणीचे दरवाजे लक्षात घेता हा किल्ला मोठ्या प्रमाणावर राबता असावा. याचा ईतिहास पहायला गेलो तर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला असल्याचे मानले जाते. पण ते सत्य नाही. फलटण हे आदिलशाहीतील संस्थान, त्यामुळे त्याच्या रक्षणासाठी ह्या मोक्याच्या जागी किल्ला उभारला असावा. किल्ला नेमका कोणी उभारला हे ज्ञात नसले तरी हा गड आदिलशहाकडे असल्याचे पुरावे आहेत. मोगल व आदिलशाही पत्रव्यवहारात ( २२ सप्टेंबर १६५७ च्या खुर्दखतमधे ) या गडाचा उल्लेख "तात्तोरा" तर मोडी पत्रव्यवहारात "ताथवडा, तानवटा, ताथोडे, ताथोडा" असा येतो. याचा अर्थ ती तातोबा महादेवाची दंतकथा थोडीफार खरी असावी. सन १६६५ मधे हा गड फलटणच्या बजाजी नाईक निंबाळकरांच्या ताब्यात होता. याच वर्षी शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंहाच्या पुरंदर तहानंतर मोगल-मराठे संयुक्त फौजांनी ७ डिसंबर १६६५ रोजी जिंकला. ताथवडा घेतल्याबध्दल औरंगजेबाने महाराजांना पोषाख व जडावाची कट्यार पाठवली. त्यानंतर आदिलशहाने तो तह करुन मोगलांकडून परत मिळवला. सन १६७३ मधे शिवाजी राजांनी तो जिंकून घेतला तसेच १६७५ व १६७६ मधे आजुबाजुचा प्रदेश जिंकून घेतला. महाराजांनी संतोषगडाची डागडुजी बहुधा याच काळात केली असावी. गडावरचे गोमुखी प्रवेशद्वार याच काळात बांधले असावे असा माझा अंदाज आहे. असे सांगतात कि हा किल्ला घेतल्यानंतर एकापाठोपाठ एक असे अनेक गड स्वराज्यात आले म्हणून महाराज संतोष पावले म्हणून या गडाचे नाव बदलून संतोषगड ठेवले. मात्र १६७९ मधे आलमगिरी वावटळीत हा गड मोगलांनी जिंकून घेतला. पुढे १७२० मधे शाहुला नजराना म्हणून दिला. सन १७९० च्या महसुल अहवालावरुन हा गड नहिसदुर्ग सरकारमधे उपविभागाचे मुख्य ठाणे होता. सन १८१८ पर्यंत हा मराठ्यांच्या ताब्यात होता. मात्र जनरल प्रिझलरने कमजोर असलेल्या दक्षीण व पश्चिमेकडून तोफांचा मारा करुन हा गड ताब्यात घेतला. पुढे १८२७ मधे ब्रिटीशांविरुध्द बंड करणारे स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांनी या गडाचा आश्रय घेतल्याची नोंद सापडते.
साधारण दोन तासात हि गडफेरी उरकून गावात उतरलो. इथून थेट फलटण गाठले. वाटेमधे वाठार निंबाळकर नावाचे गाव आहे, त्याठिकाणी एक छोटासा भुईकोट बघण्यासारखा आहे, पण मला हे माहिती नसल्याने त्यावेळी पहायचे राहून गेले. संबध प्रवासात पावसाचे अजिबात शिंपण झाले नाही तरी ताथवडा बघण्याचा "संतोष" मात्र मिळाला.

( तळटिपः- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) सातारा जिल्हा गॅझेटियर
२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३ ) साथ सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के. घाणेकर
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५ ) किल्ल्यांच्या दंतकथा- महेश तेंडुलकर
६ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
७ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट

दुर्गसंवर्धनाविषयी : -
महाराजांच्या थोर विचारांचा अंश बनून जे किल्ले आज आपल्यामध्ये आहेत त्यांच्याकडे आजवर दुर्लक्ष करून एक प्रकारे आपण थेट महाराजांच्या विचारांचीच प्रतारणा करतोय, हाच विचार कुठेतरी खोलवर बोचला आणि ह्या विचारातून "शिवसह्याद्री दुर्गसंवर्धन -पुणे" ह्या संस्थेचा उगम झाला. बरोबर एक वर्षापूर्वी या आमच्या छोट्याश्या संस्थेची नोंदणी झाली व आम्ही पहिलाच झेंडा रोविला तो सातारा जिल्ह्यातील संतोषगडावर. संतोषगड म्हणजे माणदेशातील राजगडच जणू, त्याच माणदेशाचा राजगड उभा करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.आज संस्थेच्या वर्धापन दिनानिमित संतोषगड संवर्धन मोहिमेच्या वर्षभराच्या कामाचा लेखाजोखा आम्ही मांडत आहोत.
कामापुर्वीचा संतोषगड:-स्थानिक ग्रामपंचायत व वन खात्याची लेखी परवानगी घेऊन आम्ही कामाचा श्रीगणेशा केला.ज्या वेळी आम्ही संतोषगडला पहिली भेट दिली त्या वेळेस गडाला फक्त तटबंदी शिल्लक दिसत होती.संपूर्ण गडावर घाणेरी ची झुडपे वाढली होती,गडाला असणारे तिन्ही दरवाज्यांपैकी दोन दरवाजे तर हातभरच शिल्लक दिसत होते तर तिसरा दरवाजा नुकताच उजेडात आला आहे.पहारेकर्यांच्या देवड्या सुद्धा दगड मातीने भरून गेल्या होत्या.बालेकिल्यावर असणारी तीनटप्पी राजसदर तर अप्रतिमच आहे ती पूर्णपणे गाडून गेली होती.गडावर असलेली विहीर वजा पाण्याचे टाके व त्यामध्ये बांधलेले शिवमंदिर हे इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही ती विहीर पूर्ण दगड मातीने इतकी भरून गेली होती कि विहिरीच्या मधोमध उंबराची तीन झाडे उगवली होती जी विहिरीबाहेर डोकावत होती.गडाच्या दक्षिणेला असणारा चिलखती बुरुज व त्याला असणारे दोन दिंडी दरवाजे जे बुरुजाला छेदत आरपार झाले आहे.त्यातील एक दरवाजा सहा इंचच दिसत होता तर दुसरा पूर्णपणे गाडला गेला होता.
या दुर्गसंवर्धानाची प्रकाशचित्रे धाग्यावर टाकायची होती, पण आधीच धाग्याची लांबी जास्त झाली आहे. सर्व प्रकाशचित्रे तुम्ही माझ्या ब्लॉगवर पाहु शकता.

प्रतिक्रिया

बरखा's picture

6 Jul 2018 - 1:59 pm | बरखा

वर्णन आणि फोटो मस्त.

कपिलमुनी's picture

6 Jul 2018 - 4:57 pm | कपिलमुनी

तुम्हि करत असलेल्या कामाबद्दल स्वतंत्र धागा येउ द्या .

दुर्गविहारी's picture

6 Jul 2018 - 5:54 pm | दुर्गविहारी

प्रतिसादाबध्दल धन्यवाद. संतोषगडावरचे दुर्गसंवर्धनाच्या कामात मी सहभागी नाही. यापुर्वी रोहिड्यावरच्या रोहिडमल्ल देवळाच्या कामात हातभार लावला आहे. आमच्या "छत्रपती" या व्हॉटस अ‍ॅप समुहातर्फे एक गड निवडायचे चालले आहे, बहुधा वाई परिसरातील वैराटगड, पांडवगड किंवा केंजळगड यापैकी एकाची निवड करु.

वा वा! सुरेखच! फोटोही मस्त!

प्रचेतस's picture

9 Jul 2018 - 9:02 am | प्रचेतस

तपशीलवार वर्णन. गडाची सांगोपांग माहिती मिळाली.

नेहमीप्रमाणेच तपशिलवार वर्णन. एकदा लहानपणी शिखरशिंगणापुरला गेल्याचं आठवतय. अगदी कमी पावसाचा भाग आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2018 - 7:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचा गडभ्रमंतीचा व्यासंग भारी आहे ! तुमचे माहितीपुर्ण आणि सचित्र लेख वाचून आमची घरबसल्या, दमछाक न होता, सहज गडभ्रमंती होत आहे, त्यासाठी धन्यवाद !!

सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार. पावसाळी भटकंतीमधे पुढचा धागा वारुगडावर येईल. आज सटाणा दुर्गचौकडीपैकी शेवटचा गड "दुंधा" याची माहिती देणारा धागा टाकतो आहे, जरुर वाचा.