पावसाळी भटकंती, घ्यावयाची काळजी ( Rainy Trks, Tips and Tricks )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
8 Jun 2018 - 12:47 pm

चैत्र महिना येतो आणि उन्हाच्या काहीलीने समस्त जीव कातावलेले असतात. धरतीही भेगाळून सुस्कारे टाकत असते, डोंगर करपून काळे झालेले असतात. सगळेच आसूसलेले असतात, पाण्याच्या थेंबाना. वैशाख संपत येतो ,गार वारे वाहू लागतात आणि अशातच एक दिवस "तो" येतो. पश्चिमेला आकाशात काळी धुसर रेषा उमटते, बघता बघता जवळ येउ लागते आणि काळेकभिन्न ढग आकाश व्यापून टाकतात. टपोरे थेंब पडू लागतात.
Rainy Tips 1
जमीनीचे उसासे सुरु होतात, डोंगरावरुन पाण्याचे तपकिरी ओघळ वहायला सुरु होतात आणि कड्यावरुन स्वताला लोटून देत धबधबे सुरु होतात.
Rainy Tips 2
पक्षी लगबगीने घरटी विणायला घेतात, तर बेडकांची ड्युटी सुरु झाल्यने ते भुमीतून प्रगट होउन अस्तित्व दाखवायला लागतात आणि एकच डरांव डरांव सुरु होते. शेतकरी पेरणीच्या तयारीला लागतात.
Rainy Tips 3
नभ मेघांनी आक्रमिले अशी नुसतीच परिस्थिती नसते तर ढग सह्याद्रीच्या माथ्यावर उतरतात आणि पर्वत शिखरे ढगाच्या बुरख्यात स्वताला लपवतात.
Rainy Tips 4
आता किमान तीन महिने तरी याच ढगातून स्कायवॉक करायला मिळणार असतो.
Rainy Tips 5
अवघी भुमी गवताच्या अच्छादनाखाली बुडून जाते आणि निसर्गाचे वर्षातील सर्वांग सुंदर रुप नजरेत भरते.
अवघा सभोवताल असा फुलला असल्यावर अगदी अरसिक मनुष्य देखील या अविष्काराने विरघळतो आणि घरोघर वर्षाविहाराचे प्लॅन सुरु होतात.
Rainy Tips 6
निरनिराळी पुस्तके, वर्तमानपत्राच्या पुरवण्या, वेबसाईट, पावसाळी फोटोंनी सजतात, नवीन लोकेशन्स धुंडाळली जातात. फे.बु., व्हॉटस अ‍ॅपवर पोस्ट येत रहातात आणि कुटुंबीय एखाद्या गाडीत बसुन धबधब्याकडे, कॉलेज गोअर्स एखाद्या गड-किल्ल्याकडे आणि जेष्ठ नागरिक एखाद्या पठारावर सहलीचे आयोजन करतात. मात्र या सर्वात उत्साहाच्या भरात काही गोष्टींचे भान ठेवले जात नाही आणि मग दुर्दैवी बातम्या येउ लागतात. धबधब्यातून पडून मृत्य, एखाद्या पाण्याच्या लोढ्यांबरोबर वाहून गेलेली व्यक्ती, धुक्यात वाट चुकून एखाद्या डोंगरावर किंवा गडावर अडकलेले युवक, एखाद्या कड्यावरुन पाय घसरुन झालेले दुर्दैवी मृत्यु. मन विषण्ण करणार्‍या या बातम्या. खरेतर थोडी काळजी घेतली असती तर शंभर टक्के हे सर्व अपघात टाळता येतात.
Rainy Tips 7
आषाढ सरतो आणि हासरा, नाचरा श्रावण येतो. बहुतेक हिंदु सण हे निसर्गाला फार जवळचे आहेत आणि पर्यावरणाचा पुर्ण विचार करुन ठरवलेले आहेत. श्रावणाचेच उदाहरण घ्या ना, सरता जेमतेम भिजवणारा पाउस, उन पावसाचा एका आड एक चालणारा खेळ, अवघी सृष्टि एन बहरात आलेली, योग्य वेळ आणि कोन साधला गेला तर, "नभी उमलणारे ईंद्रधनु", एकापाठोपाठ येणारे सण, पंचमीचे झोपाळे, श्रावणी सोमवारचे उपवास आणि पोरीबाळींना बाहेर खेचणार्‍या मंगळागौर.
Rainy Tips 8
आपल्या पुर्वजांनी या सणांचा किती खोलवर विचार केलेला आहे पहा. श्रावणी सोमवारी शंकराचे दर्शन घेण्याची प्रथा निर्माण केली. वास्तविक पर्वत शिखरांचा राजा शंभु महादेव. बहुतेक शिवस्थाने डोंगरावरी वसलेली आहेत.जुन्या काळी एरवी कारणवशात बाहेर पडणारा महिला वर्ग शिवदर्शनानिमीत्त या गिरीमाथ्यावर जावा आणि त्यांना दर्शनाबरोबरच फुललेल्या निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठीच बहुधा श्रावण सोमवारांची योजना असावी. अर्थात हा केवळ माझा तर्क. श्रावण सरतो आणि गणरायाच्या आगमनाबरोबरच भादवा येतो. पावसाची सर आता क्वचितच भिजवत असते. ढग पश्चिमेकडे परतीच्या प्रवासाला निघालेले असतात.
Rainy Tips 9
छायाचित्रकारांना नेहमी आव्हान देणारा रोजचाच सुर्यास्त ढगांमुळे रंगबेरंगी बनतो. अवघा सह्याद्री भरजरी हिरवा शेला ल्यालेला असतो.
Rainy Tips 10
याच काळात वर्षभर उजाड, रखरखीत भासणारी पठारे गवतफुलांचे गालीचे पांघरतात.
Rainy Tips 11
बेभान वहाणारे धबधबे आता आपला पसारा आवरुन, आपल्याला आणखी जवळ येउ देतात. अश्या काळात निदान सुट्टीच्या दिवशी तरी लोळत पडण्यात अर्थ नाही. "आंतरराष्ट्रीय पर्यटन दिन" येणार्‍या या काळात थोडी काळजी घेउन बाहेर पडले तर दिवस नक्कीच कारणी लागतो.
पावसाळी भटकंतीचे आपण सोयीसाठी दोन भागात विचार करु . चिंब भिजवणारा जेष्ठ आणि आषाढ. आणि वर्षातील सर्वाधिक सुंदर ऋतु श्रावण आणि भाद्रपद. पावसाच्या या पुर्वार्धात थोडी जास्त काळजी घेतली पाहिजे. उत्तरार्धात मात्र तेच पावसाळी सौंदर्य जास्त चांगल्यापध्दतीने अनुभवता येते. एकतर ढगांची सावली असते, पाउसही जेमतेम भिजवणारा असतो, अवघी धरणी हिरवा गवताखाली लपलेली असते आणि डोंगर हे दुरुन नव्हे तर जवळूनही साजरे असतात.
यासाठी या धाग्यात आपण पावसाळी ट्रेकमधे कोणती काळजी घ्यायची याचा आढावा घेउ. अर्थातच प्रतिसादामधे आणखी उत्तम सुचना मिळतील अशी अपेक्षा करतो.
१ ) एन पावसातील ट्रेक किंवा सहलीचे नियोजन करताना खुप काळजी घेतली पाहिजे. जेथे जायचे त्या ठिकाणाची सखोल माहिती असणे फार गरजेचे आहे. त्या करीता विविध वेबसाइट वर शोधून सम्बंधित ठिकाणा बद्दलची माहिती गोळा करावी. तेथे जाऊन आलेल्या दो-चौ जणांशी बोलून तेथील मार्गाबद्दल चौकशी करावी, फ़ोटो पहावे, नकाशा पहावा, वाटेवरील खाणा खुणांची माहिती घ्यावी व आपल्यासोबत येत असलेल्या इतर सवंगड्यांना ती द्यावी. या काळात बहुतेक गडमाथे ढगात गुरफटलेले असतात. त्यामुळे वाटा सापडताना अडचण येते. अशावेळी कमीतकमी ग्रुपमधे किमान एकजण तरी आधी त्या ठिकाणी जाउन आलेली व्यक्ती पाहीजे किंवा एखादी स्थानिक व्यक्ती बरोबर पाहिजे.शक्यतो गावातील एखादा वाटाडया घेता आला तर उत्तम. परंतु त्यांच्याशी देवाण घेवाणी बद्दल आधीच बोलणी करून घ्यावी म्हणजे नंतर वाद होत नाहीत.
स्थानिक गावकर्‍यांशी संवाद जरुर करावा पण, त्यांच्यावर, त्यांच्या जीवन पद्धतिवर, त्यांच्या पेहरावावर कुठल्याही प्रकारची टिका टिप्पणी टाळावी. भांडण तंटा करू नये. भटकंतीला जायच्या ठिकाणचा, पायथ्याच्या वाडीतला एखादा गावकऱ्याचा संपर्क क्रमांक आपल्याकडे असावा. अवघड प्रसंगी त्यांना बोलावता येते.
बर्‍याचदा पावसाळ्याच्या काळात शेतात लावणीची कामे असल्याने स्थानिक व्यक्ती उपलब्ध असतीलच असे नाही. यासाठी त्या ठिकाणाची / गडाची पुर्ण माहिती घेउनच मग त्याठिकाणाला भेट देण्याचे नक्की करावे. काही वेळा ढगामुळे दरीचा अंदाज न आल्याने दरीत पडून मृत्यु झाला किंवा एखाद्या पठारावर ढग उतरल्याने वाट चुकून अडकून पडल्याचे अनुभव आहेत. एन ढगातून चालणे हा एक निसर्ग जवळून अनुभवण्याचा आणि सुंदर अनुभव असला तरी त्यातून दुर्घटना होउ नये हि काळजी घ्यावी. शक्यतो एन वर्षाकाळात माहितीच्या ठिकाणीच जावे म्हणजे अश्या संकटात सापडण्याचे कारण येणार नाही. तसेही गडावरचे अवशेष नीटसे पहायला मिळत नाहीत, शिवाय गडावरुन दिसणारे ईतर किल्ले किंवा आसमंत बघायला मिळत नाही, यामुळे याकाळात मी तरी भेट दिलेल्या किल्ल्यावरच जातो. बहुतेकदा एखाद्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जाणे होतेच असे नाही. यामुळे एन पावसात माहिती असलेल्या ठिकाणी जाणे योग्य होइल.
एकट्याने भटकंती करणे टाळावे तसेच आपण जेथे जातोय त्याबद्दल घरच्यांना कल्पना जरूर द्यावी. तसेच शक्य झाल्यास ग्रुपमधल्या ईतर सदस्यांचे संपर्क क्रमांक घरी कळवावे, ज्यामुळे रेंज नसेल किंवा मोबाईलची बॅटरी संपली तरी ईतर सदस्यांच्या मोबाईलवर घरचे लोक संपर्क करु शकतात.
एखाद्या ग्रुप सोबत जात असलो तर त्या ग्रुपबद्दल जाणून घ्यावे, त्यांच्या सभासदांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे ना याची चौकशी करून घ्यावी. त्यांचे दूरध्वनी क्रमांक आपल्या घरच्यांना देऊन ठेवावेत.
२ ) पावसाळ्यात शक्यतो सोप्पी श्रेणी असलेले गड किल्ले अथवा घाटवाटांची निवड करावी. ज्या ठिकाणी रॉक क्लाइम्बिंग करावे लागत असेल अथवा जेथे दरड कोसळण्याची शक्यता असते अथवा दरड कोसळून अपघात झाल्याचा इतिहास असतो अश्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे. थोडाफार पावसाचा आणि मुख्य म्हणजे पायथ्याच्या गावकर्‍यांशी बोलून वाटांचा अंदाज घेउनच ट्रेक करावेत. परिस्थिती अनुकुल नसेल तर माघार घेउन किंवा पर्यायी ट्रेक केलेले चांगले. त्यासाठी ट्रेक प्लॅन करताना, नेहमी "प्लॅन बी" तयार ठेवावा. सह्याद्री बर्‍याच ठिकाणी राबता नसल्याने एन पावसात वाटा मोडलेल्या नसतात, तसेच झाडीही मोठ्या प्रमाणात माजलेली असते. अश्यावेळी वाटा चुकणे किंवा न सापडणे असे प्रकार होतात. शक्यतो बर्‍यापैकी राबता असणारे किल्ले निवडले तर सोयीचे पडते. हाच काळ अनेक पक्षांचा आणि प्राण्यांचा प्रजननकाळ असतो. त्यामुळे बहुतेक अभयारण्ये पर्यटकांच्या वावरासाठी बंद केलेली असतात. सहाजिकच अश्या अभयारण्याच्या परिसरात असलेलया गड, किल्ल्यांना भेट देणे टाळावे. ईतर ठिकाणीही जाताना आपल्यामुळे निसर्गाच्या जीवनचक्रात अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी.
आपण निसर्गाच्या सहवासात असताना आपल्याकडून निसर्गाची कुठल्याही प्रकारे हानी होता कामा नये. झाडाच्या फांद्या तोड़ने, झुडुपे मुळासकट उपटणे, कुठल्याही प्रकारचा कचरा करणे हे सर्वतोपरी टाळावे. प्रत्येक भटक्याने आपल्या सोबत एक पिशवी बाळगणे गरजेचे आहे. सहजा सहजी विघटन न होऊ शकणारे जे जे काही असेल ते ते सर्व पुनः आपल्या सोबत आणून शहरातील कचरा कुंडीमध्ये टाकावे.
बरेच जणांना सवय असते की ते शौचाला जाताना नेलेली पाण्याची बाटली फेकून देतात. केवळ शौचाला बाटली नेली म्हणून फेकून देण्याची सवय बऱ्याच जणांना असते. या बद्दल भावनेच्या आहारी न जाता प्रत्येकाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.
३) बर्‍याचदा आपण जाणार असू त्या गडाच्या किंवा धबधब्याच्या वाटेत ओढे असतात. त्यातील पाण्याचा अंदाज घेउन किंवा स्थानिक लोकांची मदत घेउन योग्य जागी ओढे ओलांडावेत. क्वचित जाताना पाणी कमी असले तरी एनवेळी पडणार्‍या पावसामुळे अचानक ओढ्याची पातळी वाढून धोकादायक परिस्थिती होते. अशावेळी पाणी ओसरण्याची वाट बघणे हिताचे. अशी काही आणीबाणीची परिस्थिती उदभवू शकते हे गृहित धरुन काही गोष्टी सोबत ठेवाव्यात, उदा- ग्रुपमधे व्यक्ती किती आहेत त्याप्रमाणे थोडे कोरडे खाण्याचे पदार्थ, पावसापासून बचाव करण्यासाठी तंबु किंवा किमान सगळ्यांना एकत्र रहाता येईल ईतपत प्लॅस्टीकची ताडपत्री. पावसाळ्यातील ट्रेकमधे किमान शंभर फुट जाड रोप कायम सोबत बाळगावा, तो ओढा ओलांडताना उपयोगी पडतो. वहात्या पाण्यामुळे ओढ्यातील दगड शेवाळ साठून घसरडे झालेले असतात. अशावेळी दोन्ही टोकाशी रोप बांधून ओढा ओलांडणे श्रेयस्कर.
नुसता दोर सोबत असून काय उपयोग? दोर कसा बांधावा याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. बेसिक 4 नॉट्सची माहिती करून घ्यावी, त्या बांधण्याचा सराव करावा व तज्ञ लोकांकडून खातरजमा करून घ्यावी. विविध प्रकारच्या नॉट्सची माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
फ़क्त आपल्या ग्रुप मधील एका व्यक्तीला थोडा सराव आहे म्हणून केवळ एकाच व्यक्तीच्या भरवशावर जाणे टाळावे. त्याच व्यक्तीला काही दुखापत झाली तर इतरांना सांभाळून घेणारा लागतोच. त्यामुळे सर्व भटाक्यांनी इतर कुणावर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण व्हावे. प्रत्येकाने आपापली काळजी स्वतः घेण्यास सक्षम व्हावे. अर्थात हे थोड्या अनुभवानेच शक्य होईल.
४ ) पावसाळ्यातील चिखलामुळे निसरड्या झालेल्या वाटेमुळे तसेच रॉकपॅचवर शेवाळ साठल्यामुळे शक्यतो अवघड गडकिल्ल्यांच्या वाटेला जाउ नये. तसेच इतर ऋतुत जो किल्ला चढायला तासभर पुरतो, तोच गड चढण्यासाठी या प्रतिकुल परिस्थितीमुळे दुप्पट वेळ लागु शकतो. तेव्हा त्याप्रमाणे वेळ लागणार हे गृहित धरुन एकुणच ट्रेकचे वेळापत्रक ठरवावे. थोडा जास्ती उशीर धरलेला चांगला. अंधार पडायच्या आधी पायथ्याला पोहोचण्याचा प्रयत्न करावा कारण मग तेथील ट्रांसपोर्टवाले अव्वाच्या सव्वा भाव लावतात. अगदी उशीर झालाच तर अंधारात वाट शोधण्यासाठी विजेरी (टॉर्च) असलेला बरा म्हणून अगदी एक दिवसाच्या भटकंती मध्ये सुद्धा विजेरी सोबत ठेवावी
तसेच या काळात घाटवाटाही टाळळेल्या चांगल्या. बर्‍यादा या वाटांच्या उतारामुळे पाण्याचा लोंढा वहात असतो. शेवाळलेले दगड आणि निसरड्या वाटा यामुळे हे ट्रेक वैतागवाणे होतात.
पावसाळ्यातील एन भरात वहाणारे धबधबे पाहून भान हरते. याच मनस्थितीत काही वेडी साहसे केली जातात. बरेच धबधब्याचे वेगळ्या अँगलने फोटो काढण्याच्या नादात नसलेल्या वाटांनी चढायचा प्रयत्न करतात. चिखल भरलेल्या वाटांनी चढणे जरी सोपे असले तरी उतरणे प्राणघातक ठरू शकते. हे सर्व प्रकार पुर्णपणे टाळावेत.
५) जर ट्रेकसाठीचा प्रवास सार्वजनिक वहानाने केला जाणार असेल तर कदाचित एन वेळी दरड कोसळ्याने रस्ता बंद होउन वहातुकीचा खोळंबा होतो आणि बस रद्द होण्याचे प्रकार याच काळात होतात. तेव्हा ती शक्यता गृहित धरुनच नियोजन असावे.
स्वतःच्या वहानाने प्रवास करणार असाल तर गाडी सुस्थितीत आहे याची आपण किंवा मेकॅनिक याचेकडून खात्री करुन घ्यावी. पावसाळ्यात रस्ते बर्‍याचदा उखडलले असतात. त्यात साठलेल्या पाण्यामुळे खड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यातून जाताना गाडीला नुकसान होउ शकते. तसेच ओल्या रस्त्यावर ग्रीप मिळत नाही, त्यामुळे गाडीच्या टायरची तपासणी करावी, जर टायर गुळगुळीत झालेले असतील तर तातडीने बदलून घ्यावे. गाडीच्या पुढच्या काचेवर जोराच्या पावसाने पाणी साचून पुढचे दिसत नाही, बरेच ड्रायव्हर यासाठी काचेवर तंबाखु चोळतात.
दुचाकीवरचा प्रवास किमान याकाळात तरी टाळावा असा माझा सल्ला राहिल. घसरड्या रस्त्यामुळे दुचाकीवरचा प्रवास प्राणघातक होउ शकतो. तरी जवळचा प्रवास करायचा झाल्यास टायर, ब्रेकची तपासणी केलेली चांगली, पुढचा दिवा, ईंडीकेटर काम करत आहेत, हे ही पाहून घ्या.
६ ) या काळात मुक्कामी ट्रेक करणार असाल तर नेहमीपेक्षा थोडी जास्त तयारी करायला हवी. एकतर या काळात कोरडे सरपण मिळणे अवघड जाते. स्थानिक लोकांकडून सरपण उपलब्ध होउ शकले तरी ते त्यांनी त्यांच्या पुढच्या गरजा विचारात घेउन गोळा केलेले असते. हल्ली गॅसच्या शेगड्या मिळतात, त्या घेउन जाणे हा उत्तम मार्ग. लाकुड ओले असल्याने पेटत नाही, यासाठी रॉकेल वापरले जाते. पण बरीच काळजी घेउनही रॉकेलचा वास सॅकला लागतो. यासाठी कापुरदेखील वापरता येईल. रात्री झोपण्यापुर्वी मुक्कामाची जागा तपासून घ्या. उबेसाठी साप येउ शकतात. वावडींगाची पुड सोबत बाळगून ती झोपण्याच्या जागेभोवती पसरणे हा सुरक्षित मार्ग.
सरत्या पावसात बिळात पाणी जाउन उन्हे खाण्यासाठी बाहेर आलेल्या सापांची बर्‍याचदा गाठ पडते. साप दिसला कि लगेच घाबरुन जाण्याची गरज नाही तसेच त्याला मारायला जाण्याची घाईही करु नका. आपल्यासारखा तो हि एक निसर्गाचा एक भाग आहे हे लक्षात ठेवले तरी पुष्कळ झाले. शक्य झाल्यास साप विषारी किंवा बिनविषारी आहे ते ओळखायला शिका.
Rainy Tips 12
काही सापांना निसर्गानेच संरक्षणासाठी छ्द्म आवरण दिलेले आहे. वरील फोटोतील गवत्या हा साप बिनविषारी आहे. डोक्यात विषग्रंथी नसल्याने त्याचे गोलसर डोके लक्षात येते.
Rainy Tips 13
गवत्यासारख्याच हिरव्या रंगाचा पण निमुळते डोके असणारा हरणटोळ हा अर्धविषारी साप आहे. याच्या चाव्यामुळे चक्कर येण्यासारखे त्रास माणसाला होउ शकतात, मात्र माणुस मृत्युमुखी पडत नाही.
Rainy Tips 14
एखाद्या बाणासारखे त्रिकोणी डोके असणारा हा हरानाग उर्फ चापडा. हा साप विषारी असला तरी याच्या चाव्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या माणसांची फार कमी उदाहरणे आहेत. सापांची अशी नीट ओळख असेक तर ट्रेकमधे पुरेसा सावधपणा बाळगता येईल शिवाय दिसला साप कि मार त्याला ही प्रवृत्तीही बंद होइल.
७ ) सॅक पॅक करताना एका मोठ्या जाड प्लॅस्टिकच्या पिशवीत सर्व सामान पॅक केलेले चांगले. एकदा आतील वस्तु भिजल्या कि पुर्ण ट्रेक कठीण होतो. हल्ली मिळणार्‍या सॅकना रेनी कव्हर मिळते. शिवाय महत्वाचे सामान जसे पैसे, मोबाइल हे आणखी एका जाड प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवावे. म्हणजे अगदी भिजण्याची वेळ आली तरी ह्या गोष्टी सुरक्षित रहातील.
एकच भली मोठी पाण्याची बाटली घेण्या पेक्षा दोन बाटल्या असाव्यात जेणेकरून बॅग मधील सामानाचा तोल सांभाळला जाईल.
दोर, औषधे, खाऊ, पाणी असे सामान पटकन काढता येईल अश्या प्रकारे वरच्या कप्प्यात ठेवावे. खाण्याचे पदार्थ सहजा सहजी दिसतील अश्या प्रकारे कधीही ठेवू नयेत जेणेकरून माकडे त्याकडे आकर्षिली जाणार नाहीत व तुमचा खाऊ माकडांपासून सुरक्षित राहील.
कॅमेरा कापडात गुंडाळून ठेवू नये कारण हवेतील आर्द्रता शोषुन घेतल्यामुळे कापड भिजते व या दमटपणामुळे कॅमेर्‍यामध्ये बूरशी निर्माण होउ शकते. कॅमेरा बॅग मध्ये नेहमी आर्द्रता शोषून घेणाऱ्या सिलिका जेलच्या पुड्या ठेवाव्यात. पावसात फ़ोटो काढण्याचा मोह आवरता येत नसेल तर सोबत छत्री असावी. किंवा एखाद्या मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीला लेन्सपुरते भोक करुन त्यात कॅमेरा झाकून फोटोग्राफी सुरक्षितपणे करता येईल.
Rainy Tips 15
मोबाईलला फ्रंट कॅमेरे आल्यापासून सेल्फीचे वेड पसरलेले आहे. सेल्फीच्या नादात कड्याच्या टोकाशी जाउन फोटो काढण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात होउन त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले तरी लोक त्यातून शहाणपणा घेत नाहीत, असे खेदाने म्हणावे लागेल. कोणत्याही फोटोचे मुल्य आपल्या जीवापेक्षा जास्ती नाही ईतके समजले तरी पुरे.
१० ) सध्याच्या युगात मोबाईल हा सगळ्यांचाच प्राण बनला आहे. "जेथे जातो तेथे तु माझा सांगाती" असा मोबाईल ट्रेकमधे तर अपरिहार्यच. ट्रेकला जाताना मोबाईल पुर्ण चार्ज आहे याची खात्री करावी. तसेच दुर्गम भागात बहुतेकदा रेंज नसते, तिथे शक्य तितका कमी वापर करावा. कितीही स्मार्ट म्हणले तरी मोबाईलची बॅटरी वेगाने संपते. दुर्गम खेड्यात आयडीया, एअरटेल, जिओ यांना रेंज असतेच असे नाही, यासाठी बी.एस.एन.एल.चे सीम कार्ड सोबत ठेवणे बरे पडते. " जिथे कोणी नाही, तिथे आम्ही" असे (अजुन तरी ) नसलेले घोषवाक्य बी.एस.एन.एल.चे आहे. बहुतेकदा या सीमला दुर्गम भागात चांगली रेंज असते असा माझा अनुभव आहे. तसेच एनवेळी पाणी जाउन मोबाईल बंद पडणे, बॅटरी संपल्यावर प्राणहिन मोबाईल बघायला लागणे असे प्रसंग येतात, यासाठी सॅकमधे जादाचा मोबाईल पुर्ण चार्ज करुन बंद अवस्थेत ठेवणे एनवेळी उपयोगी पडते.
११ ) ट्रेकसाठी घातले जाणारे कपडे विशेषतः पावसाळ्यात हि फार महत्वाची गोष्ट आहे. शक्यतो पटकन वाळतील असे कपडे असावेत, जीन्स घालणे या काळात टाळलेले बरे. कपड्यांचा जादाचा जोड बरोबर असावा. ओल्या कपड्याने प्रवास म्हणजे आजाराला निमंत्रण. फॅशनच्या नावाखाली बरेच जण तोकडे कपडे घालून येताना दिसतात. या काळात बेसुमार वाढलेले गवत आणि त्यातील किड्यांमुळे हि फॅशन अंगाशी येउ शकते.
तेव्हा अंगभर कपडे घालणे हेच हितकारक, जी फॅशन करायची आहे ती आपल्या रहात्या शहरात करावी. पावसात भिजत ट्रेक करण्याचा आनंद एखाद्या वेळी ठिक आहे, मात्र अनावश्यक भिजून अजारी पडून आपल्या रुटीनवर परिणाम होणार असेल तर विंडचिटर, रेनकोट वापरून पावसात न भिजणेच योग्य होइल.
१२ ) पावासाळी ट्रेकमधे बुट घालावे कि न घालावे, हा नटसम्राटसारखाच पडलेला प्रश्न. कारण ओल्या वाटेवर आणि शेवाळलेल्या दगडावर ग्रीप मिळण्यासाठी बुट घालावे तर पावसाचे पाणी शिरुन बुट जड तर होतातच, शिवाय ओल्या बुटाने पायाची त्वचा खराब होते ते वेगळेच. यासाठी चांगली ग्रीप असलेल्या सँडल हा चांगला पर्याय. एकतर पावसाचे पाणी पडले तरी वाहून गेल्यामुळे फारसा त्रास होत नाही.नवीन एखादा भटका साधारण विचार करतो की पावसात जायचे आहे भिजायला आणि मज्जा मस्ती करायला, चिखल माती लागून ख़राब तर होणार असे समजून अडगळीतील एखादी जुनी बॅग, पडिक बूट बाहेर निघतात. हे टाळावे. अश्या वेळेस बॅग फाटली, चेन तुटली, पाण्यात भिजुन बुटाचा सोल निघाला तर पंचाईत होते. एकदम नविन करकरित बूट घातले व ते पायाला चावले तरी संकट. त्यामुळे एकतर नविन बूट 8-10 दिवस वापरून पहावेत अथवा रोजच्या वापरतील बूट घालावेत. अनुभवाने सांगेन की अ‍ॅक्शन ट्रेकिंगचे बूट हे सगळ्यात चांगले. स्वस्त आणि मस्त. दिसायला साधे असले तरीही ओल्या खड़कावर देखील घसरत नाहीत. शेवटी माणूस चलताना कसा तोल सांभाळतो यावर सगळे अवलंबून असते. सोल निघुन पंचाइत होण्यापासून वाचण्याकरिता जुन्या एखाद्या बुटाची नाड़ी आपल्यासोबत असली की फाटलेला बूट बांधता येतो.
सह्याद्री परिसरात याच काळात जळवांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो. यासाठी बरोबर हळदीची पुडी बाळगणे सोयीचे . तसेच साबण बरोबर असल्यास साबण लावलेल्या पायावर जळवा टिकत नाहीत. मात्र पावसामुळे साबण फारवेळ टिकत नाही. तेव्हा शक्य असेल तर तंबाखू किंवा हळद हाच सोयीचा उपाय. आगकाडी पेटवून तीचा चटका दिल्यासही जळु निघते. मात्र जळु लागली आहे हे लवकर समजत नाही आणि ती गळून पडल्यानंतर जखमेतून रक्त वहात रहाते आणि जखम ठसठसते. यासाठी पावसाळ्यात ट्रेक करताना सतत पाय तपासावेत.
१३ ) पावसाळ्यात शरीरातील कफ दोष वाढतो, तसेच पाण्याची आम्लता किंचीत वाढत असल्याने पित्तदोषही वाढतो. यासाठी खाणे पिणे हे जपून असावे अन्यथा सहलीच्या किंवा ट्रेकच्या आनंददायी आठवणी न रहात तो वेगळ्याच कारणासाठी लक्षात रहातो. पावसाळ्यात सगळ्यात जास्त मोह होतो तो भजी किंवा वडापाव खाण्याचा.
Rainy Tips 16

Rainy Tips 17

Rainy Tips 18
पावसाच्या धुंद आणि कुंद वातावरणात कांदाभजीचा दरवळ नाकापर्यंत पोहचल्यावर साक्षात शुक मुनीही वैराग्य सोडतील अशी परिस्थिती असते. कोसळत्या धारात भजी खाण्याची मजाही घेतलीच पाहिजे, पण तोंडावर नियंत्रण ठेउन आपल्याच आरोग्याशी खेळ होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.
Rainy Tips 19
भाजलेली किंवा उकडलेली कणसे हि पावसाळ्यात हितकारक असल्याने त्यांचाही स्वाद घ्यायला हरकत नाही, मात्र "अति सर्वत्र वर्जयेत' हे विसरु नये. मात्र मद्यपान आणि मांसाहार हे टाळलेले चांगले.
१४ ) पावसाळयातील बदलत्या वातावरणात कधी कुणाची तब्येत बिघडेल सांगता येत नाही. सर्दी ताप तर नित्याचेच. त्यामुळे ग्रुप मधील एक अथवा दोन व्यक्तींकडे औषधांचा साठा असावा. प्रथमोपचार करण्याचे प्रशिक्षण घेतले असेल तर उत्तम. साधारण सर्दी - खोकला, ताप, उलटी - जुलाब, पोटात मळमळ, सांधेदुखी, जखम होणे, चपलांमुळे पायाला फोड़ येणे, भाजणे , मुरगळणे , काटा रुतणे , खाज व बुरशी येणे, इत्यादिवर औषध असणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात बहुतेकदा गड, किल्ल्यावरच्या टाक्यातील पाणी डहुळले जाउन गढूळ बनले असते. अशावेळी स्वतः सोबत पुरेसे पाणी बाळगणे आणि तेच पिणे किंवा पाणी शुध्द करण्यासाठीच्या गोळ्या किंवा मेडीक्लोर सोबत ठेवणे आवश्यक आहे. ओढा ओलांडायची वेळ आली तर ओढ्याच्या गढूळ पाण्यातील जंतु पायावाटे शरीरावर पसरतात, यासाठी ट्रेकवरुन परत आल्यास न चुकता डेटॉल किंवा सॅव्हेलॉन घातलेल्या पाण्याने पाय धुवावे. पावसाने डोके भिजले तर सर्दी, खोकला मागे लागतो. त्यामुळे सोबत कोरडा टॉवेल ठेवावाच. याशिवाय जखमेवरती लावण्यासाठी बॅडेडच्या पट्ट्या, पाय मुरगाळला तर मुव्हसारखा स्प्रे, थकव्यासाठी ईलेकट्रॉल, पोट बिघडल्यास गोळ्या हे सर्व सोबत ठेवावे. दुर्गम ठिकाणी एनवेळी हे उपलब्घ होईलच असे नाही, त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत अडचण होते.
एखाद्याला डॉक्टरने काही औषधे सुचविली असल्यास ती जरूर सोबत बाळगावित. दमा अथवा ऊंचीचा त्रास अथवा एखाद्या विशिष्ट आजार असल्यास ग्रुप लीडरला त्याबद्दल आगाऊ कल्पना द्यावी.
पावसाळ्यात आल्हाददायक वातावरणात तहान लागत नाही परंतू चालल्यामुळे, चढल्यामुळे शरीरातील पाणी वापरले जाते. अश्या वेळेस पाणी न प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन पायात वात येण्याचा संभव असतो. त्यामुळे प्रत्येकाने भरपूर पाणी प्यावे.
डोंगरावर चढल्यावर पुनः खाली यायचेच आहे त्यामुळे काहीतरी अचाट साध्य केल्याचा अहंकार वरच ठेवून या. आपल्यामुळे कुणाला स्वतःची कामे टाकून आपला जीव वाचवण्यासाठी येऊ लागू नये ह्याची काळजी प्रत्येकाने आपापली घ्या. अर्धवट माहितीच्या आधारे पराक्रम गाजवू नका. निसर्गाशी मैत्री करा, निसर्गाच्या सन्निध्यात स्वतःचे सुख शोधा, निसर्गाचे नियम पाळा, निसर्गाचा आदर करा. जमेल तेव्हडा इतिहासाचा, भूगोलाचा, सह्याद्रीचा, तेथील वन्य जीवनाचा अभ्यास करा पावसाळी भटकंतीचा योग्य तऱ्हेने आनंद घ्या.
पावसाळी भटकंतीत आपण नेहमी धबधबे, रानफुले, गवतांनी लपेटलेली पठारे, ढगांमधे दडलेले गिरीमाथे याचा आनंद नेहमी घेतो. पण खास पावसाळी असे निसर्गचमत्कार आहेत, त्याचा या पावसाळ्यात जरुर आनंद घ्यावा.
सह्याद्रीत विशेषतः हरिश्चंद्रगडावर योग्य वेळी, योग्य ठिकाणी असल्यास ईंद्रवज्र" म्हणजे पुर्णवर्तुळाकार ईंद्रधनुष्य दिसु शकते. याची सविस्तर माहीती खालील लिंकमधे आहे.
हरिश्चंद्र इंद्रवज्र
याशिवाय हल्ली वॉटरफॉल रॅपलिंग नावाचा नवीन अ‍ॅक्टीव्हिटी सुरु झाली आहे. वैयक्तिक मला हा प्रकार पटत नसला तरी त्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्या ग्रुपचा अनुभव आणि साधनांची सुरक्षितता तपासून घ्या.
याबाबतीत काळजी घेतली नाही तर काय दुर्घटना होउ शकतील यासंदर्भात सावधान करणारी हि लिंक
Disaster Recipe

याशिवाय सरत्या पावसाच्या काळात एखाद्या माळावर असंख्य फुलपाखरे पहायला मिळतात, तसेच याच काळात शरीरातील काही जीवनसत्वांची कमी भरून काढण्यासाठी फुलपाखरे शांतपणे चिखलपान करताना दिसतात. हि सर्व निसर्गनवल जरुर पहा, मात्र या सर्व घटकांना कोणताही त्रास न देता.
सर्वांनाच आनंददायी, सुरक्षित पावसाळी भटकंतीसाठी शुभेच्छा देउन या धाग्याचा समारोप करतो.
पावसाळ्यात कारची काळजी घेण्यासंदर्भात हा व्हिडीओ

पावसाळ्यात धबधब्यामधे झालेले अपघात

( तळटिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

प्रतिक्रिया

वरुण मोहिते's picture

8 Jun 2018 - 1:05 pm | वरुण मोहिते

लिहता हो. जियो .

यशोधरा's picture

8 Jun 2018 - 2:06 pm | यशोधरा

सुरेख लिहिले आहे.

किसन शिंदे's picture

8 Jun 2018 - 3:00 pm | किसन शिंदे

दंडवत घ्या मालक !!

सुमीत भातखंडे's picture

8 Jun 2018 - 3:19 pm | सुमीत भातखंडे

अप्रतिम सुंदर लेख.

शाली's picture

8 Jun 2018 - 5:39 pm | शाली

योग्य वेळी ऊत्तम लेख.

शितल बाबर's picture

8 Jun 2018 - 11:42 pm | शितल बाबर

अतिशय महत्त्वाची उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद

कंजूस's picture

9 Jun 2018 - 7:00 am | कंजूस

बरीच माहिती आहे.
गाववाले बुट नाही घालत पण त्यांना सराव असतो.
लेखातले फोटो कमी करावेत. स्लो उघडतो.

प्रचेतस's picture

9 Jun 2018 - 8:28 am | प्रचेतस

उत्तम माहिती.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jun 2018 - 10:00 am | ज्ञानोबाचे पैजार

समयोचित, (नेहमी प्रमाणेच) माहितीपूर्ण आणि उत्तम लेख.
यादीत काही राहिले आहे असे वाटत नाही, सगळे महत्वाचे मुद्दे आले आहेत.
पैजारबुवा,

विशुमित's picture

9 Jun 2018 - 10:19 am | विशुमित

खूप उपयुक्त माहिती.

सुबोध खरे's picture

9 Jun 2018 - 8:13 pm | सुबोध खरे

हा शुद्ध हलकट पणा आहे दुवि.
छान छान निसर्गाचे फोटो पाहत असताना एकदम असे डेंजर वडा पाव , मिसळ आणि भजी यानचे फोटो पाहया, ते सुद्धा उपाशी पोटी हा शुद्ध अन्याय आहे.
लेख उत्तम आहे हे वे सां न ल

मनिमौ's picture

9 Jun 2018 - 9:58 pm | मनिमौ

सगळेच मुद्दे व्यवस्थित मांडले आहेत.

विअर्ड विक्स's picture

10 Jun 2018 - 11:21 am | विअर्ड विक्स

लेख आवडला

एस's picture

10 Jun 2018 - 7:45 pm | एस

उपयुक्त माहिती.

सर्वच मुद्द्यांचा समावेश आणि परामर्ष व्यवस्थित घेतला आहे. यास एखाद्या पुस्तिकेचे स्वरुप दिले तर सर्वसामान्य भटक्यांना एक आचारसंहिता मिळण्याचे भाग्य मिळेल.

निशाचर's picture

11 Jun 2018 - 3:54 am | निशाचर

उत्तम माहिती. लेख आवडला.

निश्चितच उपयुक्त आणि समयोचित .

सर्वच वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. मागच्या पावसाळ्यात आपण बहुतेक मावळ भागातील किल्ले फिरलो. यावेळी भिवगड या छोट्या किल्ल्यापासून सुरवात करुन माणदेशी दुर्गभ्रमंती करायची आहे.