निसर्गाचे सर्वांग सुंदर अविष्कार दाखविणारा श्रावण महिना संपतो आणि गौरी, गणपतीबरोबरच भादव्याची चाहूल लागते. पाउस जवळजवळ सरत आलेला असतो, मात्र निसर्ग नवे रुप लेउन उधाणलेला असतो. हा काळ खास गवतफुले पहाण्याचा. सध्या अचानक प्रकाशझोतात आलेल्या कास पठारावर हि गर्दी असते. मात्र ज्यांना थोडी गैरसोय सहन करून निसर्गाचे मनमोहक रुप पहायचे आहे त्यांनी जरुर रायरेश्वरला भेट द्यावी. या भटकंतीत आपण रायरेश्वर तर पाहु शकतोच पण वेळ मिळाला तर अंबवड्याची शंकराजी नारायण यांची समाधी, समोरचा झुलता पुल आणि कारीचे कान्होजी जेधे यांचे वृंदावन व भोरचा राजवाडा देखील पहाता येईल,
शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वरावर स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली असा ईतिहास आपण सर्वांनीच वाचलेला आहे. बरेच जण या रोहिडेश्वराचा संबध या रायरेश्वर पठाराशी जोडतात. वास्तविक या परिसरात रोहिडा किल्ला आहे आणि तिथला देव आहे "रोहिडमल्ल", तर हे पठार आहे रायरेश्वर.त्यामुळे या रोहिडेश्वराचा मेळ कशाशी घालायचा हाच प्रश्न आहे.बर ज्या पत्राचा यासाठी आधार घेतला जातो ते असे आहे.
श्री
राजश्री दादाजी नरसप्रभु देशपांडे व कुलकर्णी त||
रोहिर खोरे वेलवंड खोरे यासी प्रती शिवाजी राजे सु||
खमस अर्वन अलफ श्री रोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदिकुलदेव
तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रीलगत स्वयंभु आहे. त्यांणी आम्हास
यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करुन पुरवणार
आहे. राजश्री दादापंताचे विद्यमाने बावाचे व तुमचे व आमचे
श्रीपासी इमान जाले जे कायम वज्रप्राय आहे. हे राज्य व्हावे हे श्रींचे
मनात फार आहे,,, २|| छ. २९ सफर बहुत काय लिहीणे?
हे पत्र अस्सल नाही तर मुळ पत्राची नक्कल आहे. शिवाय हिंदवी स्वराज्य या शब्दाला आभ्यासकांचा आक्षेप आहे. तेव्हा मुळात हि घटना खरी कि प्रक्षिप्त हे नक्की सांगणे कठीण. एक मात्र नक्की कि स्वराज्य स्थापनेच्या ज्या सुरवातीच्या हालचाली झाल्या त्या या भागातच. तेव्हा कान्होजी जेधे, बाजी पासलकर, सुर्याजी काकडे, येसाजी कंक, बापुजी मुदगल, दादाजी नरसप्रभु गुप्ते, सोनोपंत ड्बीर या सवंगड्यासह शिवाजी राजे ईथे आले आणि दादाजी नरसप्रभु गुप्ते यांनी रायरेश्वरची पुजा अर्चा करायची व्यवस्था केली आणि त्याचा आर्थिक भार उचलला, शिवाय शिवा जंगमाला तेथे कायमस्वरुपी नेमले. शपथ घेतली कि नाही हे नक्की नसले तरी स्वराज्याची स्थापना रायगडी नक्कीच झाली.
बरेच जण रायरेश्वर गड किंवा किल्ला मानतात, पण हे एक प्रंचड लांब सुमारे १७-१८ कि.मी. पसरलेले आणि ४-५ कि.मी. रुंद काहीसे ईंग्रजी "E " आकाराचे पठार आहे. या परिसरात रायरेश्वर, कोल्हेश्वर आणि महाबळेश्वर आशी तीन पठारे आहेत, तीनही ठिकाणी शिवस्थाने आहेत. तीनही पठारांना जोडून किल्ले आहेत. महाबळेश्वरला जोडून वैराटगड आहे, कोल्हेश्वरला जोडून कमळगड आहे तर रायरेश्वरला चिकटून केंजळगड आहे. पैकी महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले, तर कोल्हेश्वर जाण्यायेण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने दुर्ल्क्षित राहिले ( आणि र्हासापासून वाचले, अजुनही तिथला निसर्ग अस्पर्श आहे) कोल्हेश्वरवर सध्या फक्त धनगरवस्ती आहे. रायरेश्वरवर जंगमांची वस्ती असली तरी आत्ता आत्ता पर्यंत जाणे दुर्गम होते, मात्र आता डांबरी रस्ता रायरेश्वरच्या खांद्यापर्यंत जातो तिथून कातळकडे लोखंडी शिडीने चढता येतात आणि आपण १५९६ मीटर उंच पठाराच्यावर उभे ठाकतो. वर्षभरात रायरेश्वरला जाणे शक्य असले तरी श्रावण-भाद्रपद म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर हा काळ ईथे येण्याचा सर्वोत्तम ऋतु मानला पाहिजे.
रायरेश्वर परिसराचा नकाशा
रायरेश्वर व एकंदरीत या परिसरात येण्यासाठी सोयीचे ठिकाण म्हणजे भोर हे पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. पुण्याहून सकाळी ६.०० वाजल्यापासून दर तासाला भोरसाठी बस आहेत. तर सातार्याकडून यावयाचे असेल तर दोन मार्ग आहेत. एक पुणे-बेंगळुरु महामार्गावरील शिरवळवरून भोरसाठी थेट बससेवा आहे तसेच खाजगी जीप वहातुकही आहे. तर दुसरा मार्ग सातारा-वाई-मांढरदेवी-अंबाड खिंड- भोर असा लांबचा आहे.
रायरेश्वरला स्वताचे वाहन आणने अत्यंत सोयीचे आहे. कारण कमी वेळात बरेच काही पाहून होते. परंतु ज्यांचे स्वताचे वाहन नाही त्यांच्यासाठी एस.टी. बसचे वेळापत्रक खालीलप्रमाणे. भोरपासून रायरेश्वराच्या पायथ्याच्या कोर्ले गावात जाण्यासाठी सकाळी ७.१५,९.००,११.००,१.०० व ३.०० अशी बससेवा आहे.
या अस्ताव्यस्त पसरलेल्या पठारावर जाण्यासाठी बरेच मार्ग आहेत.
१ ) सर्वसामान्य पर्यटकांसाठी भोरवरुन आंबवडे मार्गे कोर्ले या गावी तासाभरात जायचे. कोर्ले गावाच्या मागे कातळटोपी घातलेला केंजळगड उभा दिसतो. कोर्ले गावातूनच थेट गाडीरस्ता रायरेश्वर पठारावर गेलेला आहे. रायरेश्वर व केंजळगड यांना जोडणार्या धारेवर हा गाडीरस्ता थांबतो, तिथून अर्थातच पायगाडीने लोखंडी शिड्या चढून तासाभरात आपण रायरेश्वर मंदिरापाशी पोहचतो.
ज्यांना डोंगरवाटांचा आणि या काळात उधाणलेल्या निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी बरेच पर्याय आहेत.
२ ) सातारा- वाईमार्गे जांभळी या गावी उतरायचे. थेट जांभळी गाडी मिळाली नाही तरी वासोळे, खावली या गाड्या चालतात. जांभळी गावात एका झाडाखाली काही शिल्प आणि वीरगळ ठेवलेले पहायला मिळतात. हे पाहून मस्त खड्या वाटेने दोन-अडीच तासात आपण श्वानदर्याच्या( सुणदरा) वाटेला येउन मिळतो. तिथुन लोखंडी शिड्यांनी माथ्यावर.
जांभळीच्या अलीकडे वडवलीहून सुध्दा डांबरी रस्ता वरपर्यंत आला आहे.
वाईवरून जांभळीसाठी बससेवा-१०.१५,११.४५,२.००,७.३०
वाई-वासोळे बससेवा- ८.००,४.००,६.००
वाई- तुपेवाडी बससेवा- १.००,६.००
३ ) कोर्ले गावातून किंवा वाई-जांभळी रस्त्यावरच्या खावली गावातून केंजळगड पाहून थेट मधल्या धारेने किंवा कोर्लेमार्गे रायरेश्वराला जाता येईल.या जांभळी गावात एका झाडाखाली बर्याच मुर्ती आणि वीरगळ ठेवलेले आहेत.
४ ) कोर्लेगावातूनच दिड ते दोन तासाच्या चालीने गायदर्याने रायरेश्वराचे मंदिर गाठता येते.
५ ) वडतुंबीवरुन दीड तासात गणेशदर्याच्या मार्गाने जाता येते.
६ ) रायरीवरुन दोन तासात सांबरदर्याने वर चढता येते.
७ ) धानवलीहून अडीच तासात वाघदरा मार्गे रायरेश्वरी पोहचता येते.
८ ) कारी गावातून दिड ते पावने दोन तासात लोहदर्याने रायरेश्वर गाठता येईल.
या वाटांना स्थानिकानी जी नावे दिली आहेत, त्यामागेही कारणे आहेतच. गणेश मुर्ती शेजारुन चढते ती वाट गणेशदरा, श्वानासारखे धापा टाकायला लावते ती श्वानदरा, गायीसारखे निवांत रवंथ करत चढणारी वाट म्हणजे गायदरा,वाघासारखा झेप घेणारा वाघदरा तर सांबरासारखा चपळपणे उतरणारा सांबरदरा. ज्याने हि नावे ठेवली आहेत त्याच्या कल्पकतेचे कौतुक वाटते.
आपण श्वानदर्याच्या वाटेने रायरेश्वराची सहल करू. श्वानदर्यावर जेव्हा आपण उभारतो तेव्हा अफलातून नजारा सभोवार दिसत असतो. समोर आडवे पसरलेले रायरेश्वर पठार, त्याचे कातळ कडे, त्यावरून स्वताला लोटून देणारे आणि जोराचा वारा आला तर चक्क उलटे उडून तुषार स्नान करविणारे धबधबे.
थेट दक्षिणेला कातळटोपीचा केंजळगड आणि त्यावरचे दारु कोठार स्पष्ट दिसते. विशेष म्हणजे आपण उभे असलेले रायरेश्वर पठार जरी पुणे जिल्ह्यात असले तरी केंजळगड मात्र सातारा जिल्ह्यात येतो.
पश्चिमेला वाळकी नदीचे खोरे आणि त्यावरचे जांभळी धरण आणि थेट पायथ्याशी दिसणारे जांभळी गाव,
नैॠत्येला धोम धरणाच्या पाण्यात एखाद्या जहाजासारखा तरंगणारा कमळगड आणि त्याच्यामागून डोकावणारे पाचगणीचे टेबललँड आणि पारशी पाँईट्चा परिसर.
आग्नेयेला लांबवर मांढरदेवीचा डोंगर ओळखता येतो आणि शेजारी डोक्यावर काडेपेटी ठेवल्यासारखा दिसणारा पांडवगड असा मोठा मुलुख नजरेच्या टप्प्यात येतो. या डोंगरधारेवरच्या पावसाची गंमत तर न्यारीच. पावसाचा एक थंब पश्चिमेकडे पडला तर थेट वहात कॄष्णा नदीला मिळणार तर हाच थेंब पुर्वेकडे वहात गेला तर केंजळगडाच्या खालच्या ओढ्यातून नीरा नदीला आणि तेथून भीमा नदीच्या पाण्यात मिसळणार.
माथ्याकडे जाताना सुरवातीला सपाटीनंतर लोखंडी जीने बसवून चांगली सोय केलेली आहे.
फार पुर्वी पायवाटेने चढून अक्षरशः प्रस्तरारोहण करूनच या मार्गे चढावे लागायचे,
आता मात्र सोप्या शिड्या लावलेल्या असल्याने अर्ध्या तासात आपण माथ्यावर पोहचतो.
अजुनही काही धबधबे कोसळत असतात. वर सपाटीवर पोहचल्यानंतर मात्र आपण थक्क होतो. अक्षरशः निरनिराळ्या प्रकारच्या फुलांचे ताटवे फुललेले असतात.
रायरेश्वर पठारावर दिसणारी फुले पिवळ्या रंगाची कौला किंवा बरका म्हणजे स्मिथीया, त्यावर लाल ठिपके असणारी मिकी माउस म्हणून ओळखली जाणारी गैसापसिस,
केनीची निळसर नाजुक फुले,
रानतेरड्याची गुलाबी जांभळट फुले आणि कुरडूचे गुलाबी पांढरट तुरे
तसेच अतिनाजुक लहान युट्रीक्युलॅशियाची खुरटीझाडे दिसतात .
बाजुला असलेल्या धबधब्याच्या माथ्यावरही जाता येते. वार्याच जोराचा झोत खालच्या दरीतून आला तर धबधबा उलटा उडून आपल्याला भिजवून टाकतो.
फुलांच्या या नैसर्गिक बगीच्यातून चालत आपण जंगम वस्तीपर्यंत येउन पोहचतो.
आधी आपल्याला एक पावसाळी तलाव लागतो.
त्यांनतर एक पाण्याचे टाके आहे. गावातील राहणारे लोक याच पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात.
पाण्याच्या टाक्यात दगडामध्ये कोरलेले एक गाईचे मुख आहे. या गाईच्या मुखातून सतत टाक्यामध्ये पाणी पडत असते.
जवळच एका चौथर्यावर शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसविला आहे.
रायरेश्वरावरील जंगमवस्ती
यानंतर येते रायरेश्वराचे मंदिर. मंदिर तुलनेने अलिकडचे वाटते. याचा जीर्णोध्दार झालेला आहे.
समोर अलिकडेच बसविलेला शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश पुतळा दिसतो.
मंदिरात आतमधे दोन नंदी दिसतात.
मंदिर तीन खणांचे पुर्वाभिमुख आहे.
मंदिरात रायरेश्वर परिसराचा नकाशा लावलेला आहे.
व एका फलकावर माहितीही लिहीलेली आहे.
मंदिरात ढाल तलवार पहायला मिळते.
डाव्या हातच्या खांबावर शिलालेख आहे," श्रीशंकर, रायरेश्वर दापघर, मौजे राईर येथील समस्त पाटील भाउपणी, यांचे वडील संकरलिंग याने पुर्वी शिवालय बांधले, त्यास सुमारे दोनशे वर्शे जाली, याचा जीर्णोध्दार हरि पाटील याणी बांधीले यास यास खर्च रुपये ७०० शेहे १७०५ सा. झाले".
याच शिवलिंगावर कदाचित महाराजांनी रुदिराभिषेक केला असेल
आत गाभार्यात जाउन शिवपिंडीचे दर्शन घ्यायचे आणि परिसर पहाण्यास निघायचे.श्रावणात आणि महाशिवरात्रीला ईथे खुप गर्दी असते.
मंदिराच्या मागेच पाण्याचे तळे आहे. इथून जादा झालेले पाणी ओढ्याच्या रुपात वहात असते आणि धबधबा होउन स्वताला झोकून देते. तानंतर मागच्या बाजुला टेकडीसारखा भाग आहे. हे आहे रायरेश्वराचे सर्वोच्च टोक, समुद्रसपाटीपासून ४५७९ फुट उंच, या पठाराच्या पुर्व व पश्चिम टोकांना "धावडखाण" व "विभुतीखाण" म्हणतात. या ठिकाणी लोखंड व भस्म सापडत असे. माथ्यावर भर्राट वारा आपला शीण हलका करतो. वातावरण स्वच्छ असेल तर फार मोठा परिसर नजरेस पडतो. थेट उत्तरेला राजगड, तोरणा हि बलदंड जोडी दिसते. ईशान्येला पुरंदर, रोहिडा दिसतात. वायव्येला जननीचा दुर्ग उर्फ कासलोडगड उर्फ मनमोहनगड दिसतो. त्याचा मागे वरंधा घाटातील कावळ्या किल्ला दिसतो. पुर्वी एखाद्या ओढ्यासारखी वाहणारी नीरा नदी आता नीरा-देवधर धरण बांधल्यामुळे प्रंचड जलसागरासारखी दिसते. यामुळे पायथ्याच्या दापकेघर या गावाचे स्थलांतर झाले.
( चंद्रगडावरुन दिसणारे रायरेश्वरचे नाखंदा टोक)
बहुतेक पर्यटक ईथून परत जातात. पण साहसाची अनुभुती घ्यायची असेल तर रायरेश्वरच्या पश्चिमटोकाशी जायलाच हवे.रायरेश्वर पठारावर गावकरी मुख्यतः भातशेती करतात. वाटेत आपल्याला हि शेते आणि काम करणारे गावकरी सोबत करतात.
( ऑर्थरसीट पॉईंटवरून दिसणारे रायरेश्वर पठार)
हे टोक महाराष्ट्रातील एका महत्वाच्या डोंगररांगेची, "शंभुमहादेव डोंगररांगे"ची सुरवात आहे. विशेष म्हणजे एका शिवस्थानापासून सुरु झालेली ह्या रांगेचा शेवटही एका शिवस्थानापाशी म्हणजे, "शिखर शिंगणापुरला" होतो. ईथून खालच्या कुदळी गावात वाट उतरते. याला नाखिंद्याची वाट म्हणतात.
या ठिकाणी एक नेढ देखील आहे. त्यावरूनच याला नाखिंदा म्हणतात, बहुधा नाकेखिंड्चा अपभ्रंश असेल. सरळ कोसळणारी पाचशे मीटरची धार, घसरडे टप्पे आणि मुरमाड वाट बघता पावसाळा सोडून ईतर काळात ईथून उतरता येईल. वाटेत दोन ठिकाणी पाण्याची टाकी आहेत. या वाटेने उतरायचे नसले तरी किमान ईथून दिसणारे सह्याद्रीचे रौद्र रुप पहायलाच हवे. वायव्येला लांब दिसणारे रायगड व लिंगाणा, समोर पश्चिमेला दिसणारा महादेव मुर्हा ( मुर्हा म्हणजे महा'मुर' म्हणजेच भरपुर पाउस पडणारे ठिकाण ) आणि डोकावणारा कांगोरी उर्फ मंगळगड, तसेच खाली दिसणारी अस्वलखिंड , थेट दरीत दिसणारा चिमुकला चंद्रगड, नैऋत्येला दिसणारे महाबळेश्वरचे ऑर्थरसीट टोक व त्याच्या मागे डोकावणारा प्रतापगड.
एकुण पुणे, सातारा व रायगड जिल्ह्याच्या बर्याच भागाचे दर्शन घडविणारा आणि भादव्याच्या निसर्गाचा आनंद देणारे रायरेश्वर पठार आवर्जुन पहायला हवे.
याशिवाय रायरेश्वरवर एक लेण आहे असे माझ्या वाचनात आले. याला पांडवलेण असे म्हणतात्,पण त्याला अर्थातच काही अर्थ नाही. पण मी ते पाहिलेले नसल्याने काही लिहू शकत नाही. जर कोणाला माहिती असल्यास सांगावे.
आंबवड्याचा पुल पंतप्रतिनीधींची समाधी :-
रायरेश्वर बघून परत जाताना आवर्जुन पहाण्यासारखे वाटेतील ठिकाण म्हणजे "आंबवड्याचा झुलता पुल" आणि भोरचे पंतप्रतिनीधींची समाधी.
श्रीमंत रघुनाथराव रघुनाथराव पंडित पंतप्रतिनिधी यांच्या मातोश्री जिजासाहेब पंतसचिव यांच्या स्मरणार्थ भोरचे राजे यांनी १९३६ मधे हा पुल बांधला. उदघाटन श्रीमंत राजे सर गंगाध्रराव बाळासाहेब यांनी केले.गोल्ड्न गेटपुलाविषयी आपल्याला माहिती असते, पण त्याच प्रकारच्या सस्पेंशन ब्रीज प्रकारचा हा पुल अफलातून आहे.
ह्यावरून पळत गेल्यानंतर हलत्या पुलाची गंमत आबालवृध्दांनी जरुर घ्यावी अशी आहे.
थोडे शंकराजी नारायण यांच्याविषयी, पैठणजवळच्या गांडापुर गावचे गांडेकर हे देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण. कोन्हेर विठ्ठल गांडेकरांचा मुलगा मुकुंद. त्यांचा मुलगा नारोपंत उर्फ नारायण. हे प्रथम मांगदरीला आले. शिवाजी महाराजांच्या सेवेत असणार्या नारो मुकुंदाचा शंकराजी हा मुलगा. पुढे पेशव्यांच्या सेवेत तो सुरवातीला कारकुन म्हणून लागला आणि प्रगती करीत सचिव बनले. राजगड किल्ला जिंकून घेतल्यामुळे राजाराम महाराजांनी त्यांना 'मदरुला महाम' हि पदवी दिली. याचा अर्थ मोठ्या भरवश्याचे किंवा दौलतीचे मोठे आधारस्तंभ. औरंगजेबाच्या आक्रमणातही स्वराज्याची घडी टिकवण्यात त्यांचा वाटा मोठा होता.
शामाजीपंत महाशब्दे यांची मुलगी येसुबाई यांच्याशी विवाह झाल्यानंतर दोन औरसपुत्र, एक कन्या आणि एक दत्तक पुत्र असा कुटुंबविस्तार झाला.
पुढे आलमगिरी वावटळीचे संकट संपले पण महाराजांच्या स्वराज्याचे दोन तुकडे झाले. वारणा नदी सीमा धरुन सातारा गादी शाहुंकडे तर कोल्हापुर गादी ताराराणी साहेबांकडे गेली. दौलतीच्या सरदारांपुढे मोठा पेच उभा राहिला, कोणाची बाजू घ्यायची. हा ताण असह्य झाल्यानंतर १७१२ मधे आंबवड्याला आले आणि हिरकणी गिळून त्यांनी आत्महत्या केली. त्यांचे स्मरण म्हणुन नागनाथतिर्थ. पुढे जीर्णोध्दार झाल्यानंतर आज जे दिसतयं ते स्मारक उभे राहिले.
नागेश्वर मंदिरासमोरचे पंचगंगा कुंडही पहाण्यासारखे.
या आंबवड्याजवळच आहे कारी हे गाव. ईथे शिवाजी राजांच्या केवळ शब्दासाठी वतनावर पाणी सोडणारे कान्होजी जेधे यांची समाधी आहे.
जेधे शकावली आणि जेधे करिना हि अस्सल एतिहासिक साधने ईथे होती मात्र सध्या ते पहायला मिळत नाही. जवळच 'होता जीवा म्हणून वाचला शिवा' असे ज्याच्याबध्दल म्हणले जाते त्या "जीवा महाले" याची समाधीही आहे.
या खेरीज भोर गावात आल्यानंतर भोरचा प्रसिध्द राजवाडाही आवर्जुन भेट द्यावा असाच आहे. हल्ली ईथे बरीच शुटींग होतात. जाता जाता थोड खादाडीविषयक सांगतो. भोरच्या राजवाड्याच्या शेजारी पटवर्धनांचं "श्रेयस" हॉटेल असून तिथे "मारामारी" नावाचा एक भन्नाट प्रकार मिळतो.मारामारी म्हणजे चहा आणि कॉफीचं बेमालूम मिश्रण .पण हे हॉटेल रविवारी बंद असतं. भोरमधल्या साईराज हॉटेलमधे मिसळ छान मिळते.
सप्टेंबरमधली एखादी सुट्टी कारणी लावण्यासाठी रायरेश्वर आणि परिसरात जाउन याच.
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भ ग्रंथः-
१ ) पुणे जिल्हा गॅझेटियर
२ ) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
३ ) एक दिवसाच्या सहली, परिसरात पुण्याच्या-प्र.के.घाणेकर
४ ) आडवाटेवरचा महाराष्ट्र-प्र.के.घाणेकर
५) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
६ ) डोंगरमैत्री-आनंद पाळंदे
प्रतिक्रिया
1 Sep 2017 - 4:51 pm | योगेश लक्ष्मण बोरोले
धन्यवाद. उत्तम माहीती दिलीत. जायचे मन होतेय. फोटोतर मस्तच आहेत.
2 Sep 2017 - 6:40 am | प्रचेतस
खूप पूर्वी रायरेश्वरला गेलो होतो, अर्थात तेव्हा नाखिंदा आणि ते लेणं पाहिलं नव्हतं.
जाम भारी आहे रायरेश्वर. दुसरं महाबळेश्वर आणि दुसरं कास पठारंच जणू.
4 Sep 2017 - 5:35 pm | II श्रीमंत पेशवे II
धन्यवाद.
उत्तम माहीती दिलीत
8 Sep 2017 - 10:01 am | दुर्गविहारी
सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे शतशः धन्यवाद.
8 Sep 2017 - 11:01 am | एस
रायरेश्वरबद्दल जितकं लिहू-बोलू तितकं कमीच आहे! फार छान लेख आहे.