शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
19 Oct 2015 - 8:26 am

मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे.

१. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल :
पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले. 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' ची लक्षणे माझ्यात दिसत होती, आणि वर्षानुवर्षे 'फिस्टुला' च्या वेदना मी भोगत होतो. फिस्टुलावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याचे सर्जनने सांगितले, परंतु जालावर हुडकता शस्त्रक्रिया करून सुद्धा पुन्हा फिस्टुला उद्भवतो असे समजले. अ‍ॅलोपाथीची औषधे घेणे मला कधीच भावत नसल्याने आता करावे तरी काय, हेच कळेनासे झाले. पूर्वी नियमित व्यायाम करायचो, तोही आळस आणि निरुत्साहामुळे बंद झाला. गोड, तळकट खाणे सोडवले जात नव्हते. अतिशय निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली होती.
रेक्झीन च्या खुर्चीवर बसल्याने, सिंथेटिक कापडाची विजार घातल्याने, कॉफी प्यायल्याने लगेच फ़िस्टुला होतो हे लक्षात आल्यावर कॉफी पूर्ण बंद केली, सुती पटलूण घालू लागलो, आणि सिनेमाला जातानासुद्धा बुडाखाली ठेवायला सुती बस्कुर नेऊ लागलो. या उपायांनी फिस्टुला होण्याचे प्रमाण जरा कमी झाले खरे, परंतु पुढे मूळव्याधीने पण मला ग्रासले. --- आता मात्र माझी पाचावर धारण बसली. जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे "मै अपनी जिंदगीसे तंग आ चुका था… मेरी बीवी मुझसे नफरत करने लगे थी " --- असे झालेले होते, पण ... " फिर एक दिन मुझे पिंटो मिला, उसने मुझे xxxxx के बारे मे बताया" ... असे मात्र काही घडून येत नव्हते.

२. आशेचा किरण :
अश्या परिस्थितीत २०१४ च्या जुलै महिन्यात अमेरिकेत येऊन पहुचलो. मुलाचे घर पहिल्या मजल्यावर होते, तो एक जिना चढायलाही मला जड जात होते. आलो, त्याच दिवशी मुलाने ' Fat, Sick and Nearly Dead' हा सिनेमा दाखवला आणि त्यात दाखवल्याप्रमाणे आपण सर्वजण एक आठवडा फक्त भाज्या-फ़ळांचा रस घेऊन राहूया, असा प्रस्ताव मांडला. मला आणि पत्नीला ही कल्पना अशक्य कोटीतील वाटली. नुसत्या रसाने पोट कसे भरणार ? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटे, दूध-तूप वगैरेंशिवाय शक्ती कशी राहणार ? एक दिवस सुद्धा जेवणात पोळी नसेल तर आपण त्रस्त होतो, सात दिवस कसे काढणार ? वगैरे शंका होत्या, पण मुलगा एवढे म्हणतो आहे तर करून बघू, झाला तर फायदाच होईल, अगदी रहावले गेले नाही तर खाऊया काहीतरी, असा विचार करून आम्ही संमती दिली.

३. रस-आहारावर वीस दिवस आणि 'काळ-सर्प वियोग'

मग लगेचच बाजारात जाऊन ज्यूसर खरेदी केला आणि काकडी, हिरवी सिमला मिर्च, दुधी भोपळा, पालक, पोदिना, सेलरी, केल वगैरे हिरव्या भाज्या, हिरवी (ग्रॅनी स्मिथ) सफ़रचंदे, पिवळी-लाल सिमला मिर्च, गाजरे, संत्री, टमाटर, ग्रेपफ़्रूट, बीटरूट, लाल सफ़रचंदे, अननस, कलिंगड, वगैरे लाल-पिवळ्या भाज्या आणि फळे, आले, ओली हळद, लिंबू असे सर्व सामान नीट धुवून फ्रिज मध्ये ठेऊन सज्ज झालो.
.
दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले.
...
रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो.
.
रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते.
.
पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले...
...
सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला.
अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले.

४. यानंतरचा काळ :
भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो.
.
ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले.

ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला.

कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत.
http://www.rebootwithjoe.com

Fat Sick and Nearly Dead:
https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8

पाकक्रियासमाजजीवनमानराहणीऔषधोपचारविज्ञानशिक्षणप्रकटनलेखअनुभवशिफारससल्लामाहितीमदत

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

23 Oct 2015 - 3:48 pm | टवाळ कार्टा

रात्री झोपण्याआधी दात घासणे व आंघोळ करणे या गोष्टी कराव्याच...ब्रेच फायदे आहेत ;)

तर्राट जोकर's picture

23 Oct 2015 - 4:59 pm | तर्राट जोकर

रोख.... _/\_ ;-)

प्रसाद१९७१'s picture

23 Oct 2015 - 5:13 pm | प्रसाद१९७१

फक्त रात्री च का? प्रत्येक वेळेस "झोपताना" च या गोष्टी कराव्यात.

द-बाहुबली's picture

23 Oct 2015 - 5:28 pm | द-बाहुबली

झोपुन झाल्यावरही कराव्यात झोपेचा अजुन फायदा होतो.

बॅटमॅन's picture

23 Oct 2015 - 12:09 pm | बॅटमॅन

धन्यवाद!!

स्वप्नांची राणी's picture

21 Oct 2015 - 5:18 pm | स्वप्नांची राणी

हे खरच आहे का, अजया? कारण मी वाचलेलं की हा तोंडातला फ्लोरा खरं म्हणजे पोटासाठी चांगला असतो...

नक्की काय आहे?

तो अातड्यातला फ्लोरा.तोंडातला नाही.किंबहुना तोंडातला बॅक्टेरियाचा फ्लोरा अपायकारकच असतो.यातल्या काही प्रकारच्या जंतूंनी वर सांगितल्याप्रमाणे हार्ट डिसिज तसंच लेटेस्ट संशोधनाप्रमाणे काही किडनी विकार तसेच वारंवार गर्भपात होणे हे आजारही उद्भवू शकतात.
@बॅट्या,मानवाच्या खाण्याच्या पध्दतीत शिजवणे आल्यानंतर बदल होत आलेले आहेत.मऊ अन्न दातात तोंडात शिल्लक राहाते.जे या जंतूंचे खाद्य असते.त्यामुळे दंतविकार आत्ता जास्त दिसतात.फायब्रस खाणे निदान ही फिल्म हटवते.
परंतु रात्री लाळग्रंथी कमी लाळ उत्पन्न करतात हे तेव्हाही होत असणार.कमी लाळ म्हणजे अन्न ढकलले जाणेही कमी.जंतू जास्त.तेव्हा या मानवांनाही प्लाक तोंडात होतच असणार.सकाळची मुखदुर्गंधी असतेच असे धरुन चालत असतील कदाचित!

बॅटमॅन's picture

23 Oct 2015 - 12:09 pm | बॅटमॅन

अनेक धन्यवाद अजया!!

चित्रगुप्त's picture

28 Oct 2015 - 2:34 pm | चित्रगुप्त

मुखदुर्गंधी ही न पचलेल्या - पोटात सडत राहणाऱ्या अन्नाची पण असते हा स्वानुभव. माझ्या रसाहाराच्या काळात अजिबात वास येत नाही तोंडातून वा श्वासातून.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Oct 2015 - 12:03 am | डॉ सुहास म्हात्रे

पोटात अन्न सडत नाही... किंबहुना खुपसे जंतू जठरातल्या हायड्रॉक्लोरीक अ‍ॅसीडमध्ये जिवंत राहू शकत नाहीत... ही शरीराची फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे.

रात्री तोंडाची हालचाल कमी असल्याने लाळ कमी प्रमाणात निर्माण होते. त्यामुळे तोंडातले जंतू पोटात न जाता तोडातच राहतात. एका जागी राहण्याने (स्टॅसिस) जंतूंची वाढ जास्त जोमाने होते, ही शास्रिय वास्तव आहे.

बोलताना तोंडाला येणारी दुर्गंधी ही दात आणि हिरड्यांच्या अनारोग्यामुळे तेथे वाढलेल्या जंतूंमुळे असते. पोटातून बाहेर येणार्‍या वायूला (ढेकर) दुर्गंधी असू शकते. पण ती जठरात पचताना काही प्रकारच्या अन्नांतून बाहेर पडणार्‍या वायुंमुळे असते, सडण्याच्या क्रियेमुळे नाही.

केवळ गाळलेल्या रसाच्या आहारावर असताना तोंडात अडकून सडणारे घन पदार्थ नगण्य असल्याने सडण्याची क्रिया सर्वसामान्य घन आहारापेक्षा कमी होणारच. पूर्ण रसाहाराच्या काळात (पूर्वीचे दात/हिरड्यांचे आजार नसल्यास) झोपताना ब्रश करणे (रसाहारात असल्यावर अगदी फक्त खळखळून चूळ भरणे) तोंड आरोग्यपूर्ण व गंधविरहित राखण्यास पुरेसे आहे. अर्थातच, मी कोणत्याही प्रकारच्या आहारावर असताना झोपण्यापूर्वी "फ्लॉसिंग + ब्रशिंग" करणे जास्त योग्य सवय समजेन.

=======

काही सावधगिरीच्या सूचना:

१. दीर्घकालासाठी रसाहार सुरू करण्याअगोदर आपल्या पसंतीच्या मान्यताप्राप्त वैद्यकिय व्यावसायिकाचा सल्ला घ्यावा. कारण, दीर्घकालीन आहार बदलाने शरिरावर अनेक प्रकारचे ताण येऊ शकतात... विशेषत: जर आपल्याला काही आजार असला तर असा सला घेणे अनिवार्य समजावे. कारण, रसाहारात काही उत्तम आहारतत्वे असतात, पण तो पूर्ण आहार नाही. दीर्घकालासाठी एकाच प्रकारची आहारतत्वे खाणे व इतर आहारतत्वे टाळणे आरोग्याच्या दृष्टीने सर्वांच्या शरिराला सोसेल असे नाही.

२. रसाहारात कोणतेही कृमीविरोधी तत्व नसते. त्यामुळे केवळ रसाहाराने कृमी/जंतांपासून मुक्ती मिळणार नाही. तसेच अनेक कृमी/जंत आतड्याच्या भिंतींमध्ये हुक/सक्शन कपसारख्या अवयवांनी घट्ट चिकटून बसलेले असतात. ते केवळ औषधाने मृत झाल्यावरच विष्ठेतून बाहेर पडतात. शिवाय अनेक प्रकारचे कृमी/जंत व त्यांची अंडी डोळ्यांना दिसू शकत नाहीत.

कानडाऊ योगेशु's picture

23 Oct 2015 - 4:54 pm | कानडाऊ योगेशु

मलाही तसेच वाटले होते. दातामधले जंतु दातात अडकलेल्या अन्नकणांवर प्रक्रिया करतात,जर ते जंतु पोटात गेले तर पोटात साचलेल्या अन्नावर प्रक्रिया करतील. डॉ. सुहास म्हात्रेंने नुकत्याच लिहिलेल्या लेखाप्रमाणे (आरोग्यशास्त्रातील युध्द्शास्त्र) हा प्रकार ही काट्याने काटा काढावा असा असू शकतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Oct 2015 - 12:08 am | डॉ सुहास म्हात्रे

काट्याने काटा काढावा आरोग्यशास्त्रात हे वैश्विक सत्य नाही तर काही ठराविक परिस्थितींत काळजीपूर्वक व सखोल संशोधनानंतर निवडलेली सावध उपायोजना असते. कृपया, सर्वच परिस्थितीत विषाचा उपाय विषाने करण्याचा प्रयत्न/विचार करू नये. ते धोकादायक ठरू शकेल :)

चित्रगुप्त's picture

28 Oct 2015 - 2:23 pm | चित्रगुप्त

या प्लाकचे रासायनिक पृथक्करण केले गेले असेल ना ? त्यात हानीकारक नेमके काय असते ?

दीपक११७७'s picture

3 Nov 2016 - 12:55 pm | दीपक११७७

मला वाटते ८ तास तोड बन्द असल्याने जे विष लळेत जमा होते,
ते अपलेच असल्याने आपल्या शरिरास घातक नसते ते सकाळी पण्याद्वारे
शरीरात पसरते आणि toxins व अनावश्यक पदार्थ बाहेर फेकायला मदत करते,

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2015 - 2:38 pm | प्रभाकर पेठकर

चित्रगुप्त साहेब,

>>>>मग दिवसभर वाट्टेल ते वाट्टेल तितके खा? असे नसावे.

जो लेख मी वाचला त्यात खाण्यापिण्यावर कांही बंधन/उल्लेख नव्हता. आता 'वाटेल तितके'ची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकेल. पोटास तड लागेल असा आहार नसावा. माझे मी सांगतो, मला भूक अपरिमीत लागते आणि सहन होत नाही. ९६ च्या काळात जेंव्हा मी ही थेरपी केली तेंव्हा खाण्यापिण्यावर कांही ताळतंत्र नव्हतेच. पाकिस्तानी उपहारगृहात तेलाची तर्रीवाले नॉनव्हेज (जास्त करून मटण), कबाब, तिखटजाळ पदार्थ, बर्गर्स वगैरे वगैरे पदार्थांची माझ्या आहारात रेलचेल असायची. पण त्या सवयी न बदलताही वॉटर थेरपीचा परिणाम होऊन आरोग्य लाभले. पुढे ८-१० वर्षांनी (मधूमेहामुळे असेल) त्या आहार पद्धती बद्दलचे माझे प्रेम कमी झाले आणि आता बर्‍यापैकी सात्विक आहार असतो. (आठवड्यातून एखाद दिवस तामसी आहार असतो).
हिरव्या मिरच्या, काळीमिरी, चाट मसाला, गरम मसाला वगैरे पदार्थ अ‍ॅसिडिटीला भडकवतात. लाल मिरच्या चालतात. मध्यपान, धुम्रपान, जागरणं, चिंता १०० टक्के टाळाव्यात. ज्या मी प्रयत्नपूर्वक टाळल्या आहेत. अ‍ॅसिडिटी, अल्सरचा अजिबात त्रास नाहीए.

सुबोध खरे's picture

21 Oct 2015 - 1:10 pm | सुबोध खरे

स्पष्ट आणी परखड विवेचन --
आतापर्यंत धाग्यावर वाचलेल्या प्रतिक्रियांकडे पाहून माझे असे मत झाले आहे कि हे सर्व करणाऱ्या व्यक्तींपैकी फारतर १० % व्यक्तींचे वजन थोडे फार कमी होईल. बाकीच्यांना फारसा फायदा होणार नाही. याची कारणे--
१) बहुसंख्य व्यक्तींना रोज एक किवा दोन ग्लास ज्यूस पिऊन वजन कमी करायचे आहे. (बाकी दिनचर्या बदल न करता)
२) काही व्यक्तींना सलग आठ ते दहा दिवस ज्यूस पिऊन वजन कमी होईल असे वाटत आहे
३) इतर काहीना सलग एक महिना असे केले तर वजन होईल असे वाटत आहे.
बहुसंख्य व्यक्तीनची या सोबत व्यायाम करायची मानसिक तयारीच नाही. शिवाय आता वजन कमी झाले तरी परत ते वाढणार नाही यासाठी जी मानसिक तयारी हवी ती बहुसंख्य व्यक्तींमध्ये नाही.
चित्रगुप्त साहेबांनी लिहिलेल्या काही वाक्यांकडे फारसे कोणी लक्ष देताना आढळत नाही
"अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले.
यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो"
वजनाचे मूळ शास्त्र-- उर्जा किंवा वस्तुमान नष्ट होत नाही किंवा तयार करता येत नाही
या प्रमाणे जोवर आपल्या खात्यातून पैसे काढत नाही आणी त्यात भर टाकत राहता खात्यातील पैसे कमी होणार नाहीत.
१ ग्राम चरबी म्हणजे ९ (किलो) कॅलरी. रोजचा आहार २००० कॅलरी असेल आणी तुम्ही पूर्ण उपास( पाणी सोडून कोणतेही ज्यूस किंवा द्रव पदार्थात सुद्धा थोड्या तरी कॅलरी असतात) केला तर २२० ग्राम वजन कमी होईल. शंभर दिवस पूर्ण उपास केला तर २२ किलो वजन कमी होईल. या हिशेबाने आपण किती जेवतो आणी आपल्याला किती वजन कमी करायचे आहे याचा ताळमेळ घालणे आवश्यक आहे.
एक महिन्यात १० किलो वजन कमी होईल अशी गाजरे कुणीही खाऊ नये. कारण चरबी बरोबर बर्यापैकी पाणी पण साठवले जाते जेंव्हा तुम्ही उपास करता आणी चरबी वापरली जाते तेंव्हा त्याबरोबरचे पाणी उत्सर्जन केले जाते. परंतु एकदा तुमचा व्यायाम किंवा आहार थांबला कि झपाट्याने हे पाणी शरीरात शोषले जाऊन वजन "जैसे थे" येते. यास्तव VLCC किंवा तत्सम ठिकाणी जाऊन ५ - ६ किलो वजन एक महिन्यात कमी करून आलेली शेकडो माणसे तुम्हाला दिसतात पण हा बदल तात्पुरता असतो ९९.९ % लोक आपले वजन परत "मिळवतात". दुर्दैवाने यात मला वजन केंव्हाही कमी करता येईल हा खोटा आत्मविश्वास त्यांना येतो आणी नंतर परत कधीही वजन कमी होत नाही. अशीच परिस्थिती सिगारेट सोडणार्याची असते. एक आठवडा सिगारेट सोडतात आणी आयुष्यभर मी सिगारेट केंव्हाही सोडू शकतो हा खोटा आत्मविश्वास बाळगून जगतात.
रस आहाराचा फायदा आपण व्यायाम आणी मिताहार घेऊन वजन कमी करत असलात तर निर्जलीकरण होऊ नये म्हणून होतो (DEHYDRATION) शिवाय रस प्राशन जेवणाच्या "अगोदर किंवा नंतर" न करता ते जेवणा "ऐवजी" केले तर फायदा होईल.
वजन कमी झाल्यावर ते टिकवून ठेवण्यासाठी काय काय करावे लागेल याचा कोणीच विचार केलेला नाही.
बहुसंख्य लोकांना आपले बूड न हलवता गोळी घेऊन किंवा योग विपश्यना ई गोष्टी करून वजन कमी करायचे आहे ते होणारे नाही.
परखड शब्दांबद्दल क्षमस्व.

द-बाहुबली's picture

21 Oct 2015 - 1:25 pm | द-बाहुबली

" मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो"
हम्म.. हे सध्या शक्य नाही. त्यामुले आता डायट थांबवतो. काल पासुन विवीध जुसवरच व दही खाउनच आहे. आता पटकन एखादी कचोरी गिळावीसी वाटत आहे. परखड शब्दांबद्दल धन्यवाद डोक्ट्र. चित्रगुप्त साहेबांचा डायेट व्यायामाशिवाय फार उपयोगी नसल्याने सध्यातरी माझा पास पास करतो.

बाकी विपश्यना मी केली आहे तीथे अतिशय सकस व सात्वीक अन्न मिळते. १० दिवसाचा विपश्यना कोर्सकरायला ते अतिशय योग्य आहे. विपश्यनेमधे मन लागले नाही तरी संतुलीत आहार त्यांचा नक्किच आरोग्यदायी आहे. मला फायदा झाला वजन कमी झाली नसले तरी विपश्यने नंतर फ्रेश फ्रेश वाटतेच.

विलासराव's picture

21 Oct 2015 - 1:26 pm | विलासराव

माझे वजन ८९-९० किलो होते. परिक्रमेला जाऊन आल्यावर ७० किलो झाले. रोज २५,३० ते ३५ किमी चालत होतो. जे मिळेल ते भरपेट खाऊनही वजन कमी झाले.
अर्थात परिक्रमेला या उद्देशाने गेलो नव्हतो.
परत आल्यावर आधीचाच आहार चालु आहे तरीही वजन ७३-७४ ला स्थिर आहे.
मी कोणताही व्यायाम करत नाही.

सुबोध खरे's picture

21 Oct 2015 - 1:33 pm | सुबोध खरे

विलासराव
मी CNBC च्या शो ला गेलो होतो तेथील एक पत्रकार ११० किलो होता. मुंबई मारेथोन धावून त्याने वजन ६५ किलो वर आणले होते आणी आता तो नियमितपणे म्यारेथोन धावतो आणी त्याने आपले वजन ६५ वर टिकवून ठेवले आहे. असा व्यायाम केल्यास नक्की वजन कमी होईल.
मी गेली कित्येक वर्षे (२५ वर्षे ) आपले वजन टिकवून आहे. थोडा व्यायाम आणी मिताहार याने.

बिन्नी's picture

21 Oct 2015 - 1:29 pm | बिन्नी

हे सगळे १०० टक्के पटले.

तर्राट जोकर's picture

21 Oct 2015 - 2:03 pm | तर्राट जोकर

खरेजी, या प्रतिसादाबद्दल शतश: धन्यवाद! सोनाराने कान टोचणे आवश्यक असतेच.

काही लोकांच्या प्रतिक्रियांवरुन आपण योग्य तोच अंदाज लावला आहे. यामागची मानसिकता विषद करण्याचा प्रयत्न करतो. बरेचदा होते असे की वजन "काहीही न करता" वाढले ना मग ते तसेच "काहीही न करता" कमी व्हावे असे जनसामान्यांत भावना असते. आपल्या आप वजन वाढले, त्यात आपण स्वतः इन्टेन्शली काही केले नाही. आपली काही चूक झालीच नाही तर पनीशमेंट (व्यायाम, पथ्य, रुटीन-चेंज) का भोगा? अशी एक मानसिकता असते. बहुतेक लोकांना शरीरस्वास्थ्य राखायला काहीतरी करावेच लागते हे मनोमन पटत नाही. आजुबाजूला तशी उदाहरणेही असतात. कित्येक लोक दीवसभर अंगमेहनतीची कामे करतात पण पोट सुटलेली दिसतात. काही लोक काडी इकडची तिकडे करत नाहीत पण चांगली सडसडीत असतात. अनेक लोक कधी व्यायाम केलेलाच नसल्याने (आपली दिव्य अभ्यास-एके-अभ्यास संस्कृती) व्यायामाने शरिरात होणारे बदल रोकडा व्यवहार असतो हे जाणवलेलेच नसते. दुसर्‍यांचे अनुभव ट्राय करून बघता येत नाहीत. एखाद्याने फेरारी घेतली तर एक टेस्ट ड्राइव करता येईल. पण शरीर कमावले तर त्याचा टेस्ट ड्राईव करता येत नाही. त्यामुळे फेरारी विकत घ्यायची इच्छा बळकट करणारे टेस्ट ड्राईव शरिराच्या बाबतीत होत नाही. लोक पहिली स्टेप व त्यानंतरच्या असंख्य स्टेप्स उचलतच नाहीत. आहेत तिथेच राहतात. पण समाजातून, वावरातून एक मानसिक दबाव येत असतो, की बाबारे वजन वाढलंय, उतरायला पाहिजे. तेव्हा झट्पट उपचार, तोशीस न लागता, रुटीन न बदलता, सोपे वाटणारे(इज ऑफ युज) गोळ्या-पावडरी वापरण्याकडे कल वाढतो. कारण तिथे वजन कमी करणे हे एक आणि एकमेव ध्येय असतं. वजन कमी झाल्यावर कसं वाटेल याचा आंतरिक परिणाम माहित नसल्याने, फक्त बाह्य (विज्युअल) परिणामांवर लक्ष केंद्रित केल्याने कोणत्याही उपचारांचा परिणाम होत नाही. झालेला टिकत नाही. कारण स्वस्थ शरिर हे काय असतं हेच कधी अनुभवलेलं नसतं मग बेन्चमार्क काय असावा हे कसे कळेल? झटक्यात वजन कमी झाले तर इतर त्रास असतातच. पण व्यायाम व आहार-विहारातून योग्य प्लानिंगने आरोग्यपूर्ण शरिर जेव्हा मिळतं तेव्हा वजन कमी झाले हा बाय-प्रॉडक्ट असतो. तेजःपुंज, जोमदार, उत्साही शरीर-मन हे खरं ध्येय असलं पाहिजे. विपश्यना करतांनाही लोक चिंता कमी होतील काय, मानसिक आजार कमी होतील काय? वैगेरे काहीबाही विचार करतात. विपश्यना त्यापलिकडे आहे. शांत मन हे त्याचं बाय-प्रॉडक्ट आहे, शरिरातले बदल हे बाय-प्रॉडक्ट आहे. बाय-प्रॉडक्ट वर लक्ष केंद्रेत केलं तर मेन-प्रॉडक्ट तर मिळत नाहीच, बाय-प्रॉडक्टही मिळत नाही. आणि भलतेच विकार जडून बसतात.

मी हे मार्क केलंय की जेव्हा लोकांना रूटीन बदलण्यास सांगितले जाते, जसे विपश्यनेत दहा दिवस मौन असेल इत्यादी, तेव्हा लोक त्या कल्पनेनेच बेचैन होतात. डिंगा मारायला लागतात की आम्ही तिथे जाऊन गोंधळ माजवू, आम्हाला काय कोण रोखू शकणार नाही, आम्हाला हाकलून लावतील इतपर्यंत आम्ही तिथे दंगा करू, किंवा आपल्याला जमणारच नाही, शक्यच नाही असे बोलायला लागतात. लोकांना रुटीन बदलणे हे दुसर्‍यांनी आपल्यावर सत्ता गाजवल्यासारखे, जबरदस्ती, हुकुमशाही केल्यासारखे, जेलमधे टाकल्यासारखे वाटते, म्हणुन ते पळवाटा शोधतात. ध्येयाकडे लक्ष देण्याऐवजी भलत्याच गोष्टी करतात. म्हणजे मला एका ठिकाणी जायचे आहे आणि कोणी सांगितले की पायीच जावे लागेल. तर बाकीचे सगळे सोडून मी त्या "पायी" वर फोकस करतो. त्याला कसे ब्रेक करता येईल, किंवा टाळता येईल याचा विचार करतो. पण आपल्याला काय 'अचिव' करायचे आहे हे विसरून जातो.

तिसरी गोष्ट, पैसे टाकून सगळं मिळतं, झटपट, सुविधाजनक होतं याची अंगवळणी पडलेली सवय. तसे बघितले तर इथे ज्युस प्या, तरूण व्हा असा एकोळी मंत्र प्रथमदर्शनी दिसतो. पण त्यात किती कष्ट आहेत हे फक्त चित्रगुप्त यांनाच माहिती. पिराताईंनी त्या गोष्टीला आपल्या प्रतिसादात अचूक पकडले आहे. वर जे मी पंधरा दिवसाचे कोष्टक टाकले आहे. ते वाचूनच मला घाम फुटला. बाप रे बाप किती काम आहे हे? पण ते काम केले तरच सपाट पोट आणि तंदुरूस्त शरीर मिळेल ना..? नुसतं ज्युस पिणे नाहीये ते. तर शरीराची गरज ज्युसद्वारे भागवून व्यायाम, चालणे, पोहणे इत्यादीद्वारे चरबी घटवणे, त्यात सातत्य ठेवणे असे इतरही बरेच उद्योग आहेत. ज्युसचा ग्लास प्रथमदर्शनी दिसतो पण त्यामागे किमान दहा कामे आहेत जी केली तरच ते ध्येय साध्य होईल. काही लोक तयार ज्युस विकत घेण्याचा विचार करतील. तिथे मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या जाईल आणी हे एक फॅड-डायट होऊन बसेल. या ज्युस-डायटमधे अवैज्ञानिक, अंधश्रद्धा असे काही नाही. पण जो करतोय त्याने तशी भावना ठेवली तर परिणाम मिळणार नाहीत.

स्वप्नांची राणी's picture

21 Oct 2015 - 4:00 pm | स्वप्नांची राणी

परखड शब्दांबद्दल क्षमस्व.....

क्षमस्व कसलं डॉक्टर, अभिनंदन तुमचं!!!

मला स्वता:लाच या धाग्यावर परखड लिहावं असं वाटत होतं. ..(कर्टसी घरातलीच रजीस्टर्ड न्युट्रीशनिस्ट डायटेशीयन!!) पण मग ईथले काही संभावीत वार आठवले आणि विचार केला की ज्याचं त्याचं आरोग्य आणी ज्याचं त्याचं नशिब!!

चित्रगुप्त काका आता पासष्टीला पोचलेत...पण ईथले बरेचसे वीर जे अजून त्यांच्या चाळीशीत आहेत, त्यांच्यासाठी हे डाएट म्हणजे डीझॅस्टर ठरेल. या ज्युस थेरपीत शरीरा चे बिल्डींग ब्लॉक्स ज्यांना म्हटलं जातं त्या प्रथिनांचा काहीच विचार केलेला नाहीये. दिर्घ काळ प्रोटीन्स न घेतल्याने मग कदाचित कधीच काहीच न घेण्याची वेळ ही येऊ शकते.

कुठल्याही फळाचा किंवा भाजीचा, अगदी कारल्याचा आणी दुधीचाही ज्यूस म्हणजे त्या त्या फळातली किंवा भा़जीतली कॉन्संट्रेटेड साखरच असते. असे ज्युस दिर्घ काळ घेतले तर रक्तातली शुगर लेव्हल धोकादायक रीत्या फ्लक्चूएट होऊ शकते. याचा परीणाम दृष्टी मंदावणे, प्रचण्ड थकवा येणे आणि वजनात घट (वावावा...जीव गेला तरी चालेल, वजन तर कमी झालंच ना..!!)

सतत ज्यूस घेतल्याने पॉटेशीयम ची लेव्हल वाढते, मिनरल्स ची लेव्हल वाढते. परीणामी किडनीवर अतिरीक्त ताण येऊन कीडनी फेल्युअर होऊ शकते.

दिर्घ काळ ज्यूस थेरपी घेत असल्यास शरीरातील एलेक्ट्रोलाईट्स चा इइंबॅलॅन्स होतो आणी स्नायु मधले फॅट शरीराला जगवण्ञासाठी वापरले जाते. या सगळ्या ऊटपटांग डायेट्स चा शरीरावर फार फार वाईट परीणाम होतो. आपल्याला जगण्यासाठी अन्न हवं असतं. तेच मिळालं नाही तर शरीर वेगवेगळे उपाय करतं. उदा...मॅटॅबॉलीस्म रेट कमी होणे. आणि सततच्या फॅड डायेट्सनी कमी झालेला मॅटॅबॉलीक रेट मग कायम कमीच राहतो...परीणामी डायेट सुटले की माणूस हाहा म्हणता फुगत जातो.

प्लीज प्लीज प्लीज.... a BIG NO NO to fad diets...!!

हे ऊंटावरून शेळ्या हाकणे नाहीये. मी स्वतः दिवसातून ६ वेळा खाते. आणि ५३ म्हण्जे ५३ वरच राहतेय गेली कित्येक वर्षं....(प्यारे can vouch for me...क्यूं प्यारे..??) पण त्याच्याच जोडीला दिवसातून कमितकमी २ तास, विभागून, चालणे (with Leslie, at home) किंवा बाहेर चालणे (उन कमी असेल तर), किंवा ईलीप्टीकल क्रॉस ट्रेनर्स असले वेगवेगळे एग्झरसाईझेस करत असते. वजन उतरवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो, तिथे कठोर परिश्रमाला पर्याय नाहीये.

पण त्याच्याच जोडीला दिवसातून कमितकमी २ तास, विभागून, चालणे (with Leslie, at home) किंवा बाहेर चालणे (उन कमी असेल तर), किंवा ईलीप्टीकल क्रॉस ट्रेनर्स असले वेगवेगळे एग्झरसाईझेस करत असते. वजन उतरवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो, तिथे कठोर परिश्रमाला पर्याय नाहीये.

हे एकदम पटलं. वायाम तं पायजेच.

बाकी ते हे

मी स्वतः दिवसातून ६ वेळा खाते. आणि ५३ म्हण्जे ५३ वरच राहतेय गेली कित्येक वर्षं....(प्यारे can vouch for me...क्यूं प्यारे..??)

काय म्हणे नक्की? आयमीन व्हाऊचर बद्दल?

स्वप्नांची राणी's picture

21 Oct 2015 - 4:09 pm | स्वप्नांची राणी

प्यारे पण आमचा लाडका वगैरे...!!

बॅटमॅन's picture

21 Oct 2015 - 4:14 pm | बॅटमॅन

खी खी खी.

अता कोण कुणाचा कसा अन किती लाडका असेल हे अम्ही कय संगावे? पण अंमळ रोचक वतला तपशिल म्हणुन विच्यारले. =))

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 4:24 pm | प्यारे१

That is/ was/ and shall be a compliment for your hardwork from my side.
you are gorgeous.... and inspiration for all काकूस and काकाज like me.

Period!

स्वप्नांची राणी's picture

21 Oct 2015 - 4:27 pm | स्वप्नांची राणी

धन्यवाद!! ...पण आता विषयाकडे वळूया...या धाग्याच्या म्हणते मी... ;)

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 4:32 pm | प्यारे१

हाहाहा!
आम्ही सरळ सरळ सरळ च आहोत.
कुठेही वळलो नव्हतो.

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 4:40 pm | प्यारे१

बाकी ते vouch वगैरे ज़रा जास्त होतंय बरका.
ज़रा स्वत:चं कौतुक कमी करा.

स्वप्नांची राणी's picture

21 Oct 2015 - 4:43 pm | स्वप्नांची राणी

प्यारे...कितनी बार कहा है की चारचौघोंमे ऐसा मत कहो ना....

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 4:46 pm | प्यारे१

अंत:पुरात चला
-यदाकदाचित नाटकातला ड्वायलोक

टवाळ कार्टा's picture

23 Oct 2015 - 3:55 pm | टवाळ कार्टा

काय प्रेमळ संवाद चाल्लाय ;)

बिन्नी's picture

21 Oct 2015 - 9:47 pm | बिन्नी

स्वप्नांची राणी, तुम्ही दिलेली माहिती चांगली आहे!
तुम्ही ५३ म्हणजे ५३ वर आहात म्हणजे खरोखरच तुम्हाला स्वत:ला ओवाळून घ्यायचा हक्क आहे.
या वयात हे नक्की कौतुकास्पद! सलाम तुम्हाला!

स्वप्नांची राणी's picture

21 Oct 2015 - 10:08 pm | स्वप्नांची राणी

अरे देवा....या वयात....???

स्टुपिड's picture

22 Oct 2015 - 3:42 pm | स्टुपिड

राणी काकू विंग कमांडर ओक साहेबांपेक्षा मोठ्या आहेत का?

सालस's picture

22 Oct 2015 - 4:42 pm | सालस

बापरे म्हणजे या त्रेपन्नाव्या वर्षी त्रेपन्न किलो __/\__
त्याप्रमाणे मी पस्तीस किलो हवा. फारच जाड आहे मग मी :(

सायकलस्वार's picture

22 Oct 2015 - 10:38 pm | सायकलस्वार

:)

पीरियड नंतर टिंब द्यायचा असतो हो, उद्गारचिन्ह नाही काही =))

प्यारे१'s picture

21 Oct 2015 - 4:33 pm | प्यारे१

कोणे रे तिकडे. करा दुरुस्ती.
आम्ही सगळ्याच बाबतीत अडाणी आहोत.

कपिलमुनी's picture

21 Oct 2015 - 4:48 pm | कपिलमुनी

चांगला प्रतिसाद !

लेख चांगला आहे आणि लेखाबद्दल अतीव आदर आहे. परंतु जे दुसर्याला लाभले तेच आपल्याला पण लाभेल असे काही नाही हे कळत नाही बहुदा. हुश्श कोणीतरी वेगळा मुद्दा पण मांडला त्याबद्दल खरे साहेबांचे आणि तुमचे अभिनंदन. मला काही हे पटत नव्हते. १० दिवस प्रयोग म्हणून ठीक आहे. शिवाय अमेरिका आणि युरोप सारख्या ठिकाणी चालायला, पाळायला, सायकल चालवायला निर्धोक असे रस्ते असतात आणि कोणीही तुम्हाला हिडीस फिडीस करत नाही किंवा तुमच्या अंगावर गाड्या घालायला येत नाही. हा खूप मोठा फरक आहे. पण मुदलात जितके पोटाला पुरेल तितकेच खाल्ले तरी अपोआप वजन आहे तितके राहते. कमी झाले नाही तरी वाढत नाही असा स्वानुभव आहे. थोडक्यात तोंडावर कंट्रोल आणि शारीरिक व्यायाम ह्याला काहीही पर्याय नाही.

रामचंद्र's picture

28 Jan 2023 - 6:03 pm | रामचंद्र

ज्युस थेरपीत शरीरा चे बिल्डींग ब्लॉक्स ज्यांना म्हटलं जातं त्या प्रथिनांचा काहीच विचार केलेला नाहीये. दिर्घ काळ प्रोटीन्स न घेतल्याने मग कदाचित कधीच काहीच न घेण्याची वेळ ही येऊ शकते.

यावर अधिक माहिती मिळेल का?

रामचंद्र's picture

28 Jan 2023 - 6:11 pm | रामचंद्र

ज्युस थेरपीत शरीरा चे बिल्डींग ब्लॉक्स ज्यांना म्हटलं जातं त्या प्रथिनांचा काहीच विचार केलेला नाहीये. दिर्घ काळ प्रोटीन्स न घेतल्याने मग कदाचित कधीच काहीच न घेण्याची वेळ ही येऊ शकते.

कुठल्याही फळाचा किंवा भाजीचा, अगदी कारल्याचा आणी दुधीचाही ज्यूस म्हणजे त्या त्या फळातली किंवा भा़जीतली कॉन्संट्रेटेड साखरच असते. असे ज्युस दिर्घ काळ घेतले तर रक्तातली शुगर लेव्हल धोकादायक रीत्या फ्लक्चूएट होऊ शकते. याचा परीणाम दृष्टी मंदावणे, प्रचण्ड थकवा येणे आणि वजनात घट (वावावा...जीव गेला तरी चालेल, वजन तर कमी झालंच ना..!!)

यावर अधिक माहिती मिळेल का?

@ रामचंद्रः दीर्घ काळ म्हणजे किती अभिप्रेत आहे ? सुरुवातीला तीन-चार वा किमान एक दिवस तरी करून बघा.
महत्व स्वतः करून बघण्याचे आहे. सैद्धांतिक चर्चेला काही अंत नाही.
आम्ही तिघांनी (मी, बायको आणि मुलगा) रसाहाराचा प्रयोग केला तो निर्हेतुकपणे केला होता. त्यातून वजन कमी होणे, मूळव्याध बरी होणे असा कोणताही हेतु नव्हता. परंतु अनपेक्षित मिळालेला फायदा आठ वर्षानंतर अजूनही टिकून आहे.
जो क्रॉस च्या वेबसाईटवर बरीच माहिती मिळेलः

https://www.rebootwithjoe.com/juicing/

धन्यवाद. मी उद्याच बेंडेक्सची गोळी घेऊन (मला जंताचा त्रास नाही पण केमिस्टला विचारून) परवापासून रसाहार सुरू करणार आहे.

खाली दिलेला जो क्रॉस याच्या दुव्यावरील विविध माहिती तसेच सबा जैन यांचे यूट्यूबवरील विविध व्हिडियो बघून घ्यावेत म्हणजे तुमच्या शंकांना उत्तरे आणि पूरक माहितीही मिळेल. तुमच्या उपक्रमासाठी हर्दिक शुभेच्छा. इथे माहिती देत रहावी.
जो क्रॉसः
https://www.rebootwithjoe.com/juicing/

सबा जैन (Satvic Movement) :
https://www.youtube.com/@SatvicMovement

यांचे बाकीचे खूप विडियो पण आहार आणि आरोग्य याबद्दल चांगली माहिती देणारे आहेत.

यशोधरा's picture

21 Oct 2015 - 11:11 pm | यशोधरा

पर्फेक्ट. म्हणजेच चित्रगुप्तकाकांनी अवलंबलेला ज्यूसिंगचा/ आहाराचा मार्ग + व्यायाम हे दोन्ही एकमेकांस पूरक प्रमाणात केल्यास वजन कमी होईल?

चित्रगुप्त's picture

21 Oct 2015 - 2:43 pm | चित्रगुप्त

वरती तजो यांनी अगदी योग्य सांगितले आहे. मात्र जूसिंग हा माझ्यासाठी तरी एक अत्यंत आनंददायी अनुभव असतो. मी तर जन्मभर करायला तयार आहे. अर्थात अधूनमधून 'वाट्टेल ते' खाणेही चालते. वजन कमी होते खरे पण त्याहीपेक्षा कमालीचा उत्साह आणि ऊर्जा वाढणे हा फायदा फार मोठा आहे. परिणामी व्यायाम व अन्य चांगल्या सवयी लावणे सहज शक्य होते.

तर्राट जोकर's picture

21 Oct 2015 - 2:53 pm | तर्राट जोकर

प्रत्येकाचा आपला एक दृष्टीकोन असतो व तोच त्याचं बरंवाईट करत असतो. जसे वर वेल्लाभट यांनी सांगितले की मन तयार असेल तर मग शरीरही तयार होतं, एकदा नवीन रुटीन सुरु झालं की एकामागोमाग एक अशा चांगल्या गोष्टी घडत जातात. डोमिनो इफेक्ट..! पण पहिले सोंगटी पाडणेच बर्‍याच जणांना जड जाते. ती कितीही छोटी आणि हलकी असली तरी.....

द-बाहुबली's picture

21 Oct 2015 - 5:12 pm | द-बाहुबली

असो, खरे साहेब मनःपुर्वक धन्यवाद.
काल पासुन जुसिंगवर होतो. मगाशी मस्त कचोरी, एक डेरी मिल्क सिल्क, चार इडली हिरव्या चटनी सोबत, आणी ४ मंच कॅटबरी खाल्या. शरीराला एकदम जड वाटलं पन मन अतिशय हलकं झालं. माझ्या १०३ किलो वजनाने आता काही फरक पडणार नाही विचार करुन पुन्हा एक आख्खा अननस खाल्ला. मन अतिशय प्रफुल्लीत झालं. व्यायाम करुन सगळं नियंत्रणात येत असतेच. पण मला ४-६ महिन्यातुन पंचकर्म सेंटरला भेट देउन शरीरशुध्दी करणे जास्त सोपे वाटते. कारण व्यायाम सोडलारे सोडला की अंगाने डबल झालात म्हणुन समजा.

चित्रगुप्त साहेब यावयात आपण जे नेटाने करत आहात त्याबद्दल अभिमान वाटतोच आहे पण आपला व आमचा रस्ता नक्किच वेगळा आहे.. तो फिर मिलेंगे कभी कीसी नये मोड पर नये प्रतिसादोंके साथ....

नाव आडनाव's picture

21 Oct 2015 - 5:46 pm | नाव आडनाव

व्यायाम सोडलारे सोडला की अंगाने डबल झालात म्हणुन समजा
हे लई बेकार. ऊंचीच्या मानानं माझं वजन कमीच होतं, पण तरी वाटलं जरा ढेरी कमी करू आणि व्यायाम सुरू केला. २ महिन्या नंतर बंद केला आणि पुढच्या दोन महिन्यात वजन ७५ :(. च्यायला, त्या जीमचं तोंड काळं. फास्ट चालण्याचा ऊपाय आधी करून बघितला होता आणि वजन कमी झालं पण होतं. उगंच त्या जीमच्या नादी लागलो.
आता आयुक्षात जीमचं तोंड बघणार नाही.

हाय इंटेन्सिटी व्यायामाचा हाच तोटा आहे. त्यापेक्षा लो इंटेन्सिटीवाले वायाम या बाबतीत परवडले बरेच.

अस्वस्थामा's picture

22 Oct 2015 - 6:37 pm | अस्वस्थामा

हा हा हा... हे म्हंजे अभ्यास करुन केस गळतात, डोळ्यांना चश्मा लागतो.. म्हणून अभ्यासच करायला (शिकायला) नको बुवा. असे म्हटल्यासारखे आहे.

थोडक्यात,

हाय इंटेन्सिटी व्यायामाचा हाच तोटा आहे.

याबद्दल असहमत.. :)

चित्रगुप्त's picture

22 Oct 2015 - 7:08 pm | चित्रगुप्त

व्यायामाबद्दल या पुस्तकात बाईंनी चांगली माहिती दिलेली आहे म्ह्णे.
...

चित्रगुप्त's picture

22 Oct 2015 - 7:17 pm | चित्रगुप्त

मला आपल्या वयाचा आणि कुवतीचा विचार न करता केलेल्या जॉगिंग, ब्रिस्क वॉकिंग आणि डंबेल्स या तिन्हीतून दुखापत झाली आणि खूप दिवस अजिबात काही करता आले नव्हते. ऋजुता दिवेकरांच्या या पुस्तकातून असे होण्याचे नेमके कारण कळले. आता मी अतिशय सावकाश हालचालीचे ची-गाँग, ताई-ची चे प्रारंभिक व्यायाम्, आसने वगैरे करतो, ते अतिशय प्रभावी आहेत. सावकाश हालचालींचे व्यायाम करण्यातून आणखी एक फायदा म्हणजे हल्ली आपण उगाचच प्रत्येक गोष्टीची घाई करत असतो (उदा. विमान थांबले रे थांबले की लगेच वरचे सामान काढून गर्दीत ताटकळत उभे रहाणे, लोकल मधून उतरल्या उतरल्या धावत सुटणे, बका बका खाणे इ.) त्या सवयीतून सुटका होते, आणि आयुष्य हे शांतपणे, विना घाई-गडबडीचे जास्त चांगल्या रीतीने जगता येते, हे उमगते.

सुंदर माहिती मिळत्ये कालपासून या धाग्यावर! अगदी मनापासून धन्यवाद चित्रगुप्त साहेब. फार महत्वाचा विषय मांडलात समोर!

रेवती's picture

22 Oct 2015 - 9:58 pm | रेवती

सहमत. ऋजुताबाईंचे वरील चित्रात असलेले पुस्तक वाचलेले नाही पण त्यांच्या पहिल्या पुस्तकात उल्लेख आहे. प्रत्येकाने आपापल्या तब्येतीला अनुसरून व्यायाम निवडावा. फायदा होतोच! चुकीच्या प्रकारे व्यायामास सुरुवात करून जी दुखापत होते, त्याने अनेक दिवस व्यायाम करताच येत नाही. जसे, ट्रेनिंगशिवाय म्यारेथॉन धावणे.

अस्वस्थामा's picture

27 Oct 2015 - 10:32 pm | अस्वस्थामा

सावकाश हालचालींचे व्यायाम करण्यातून आणखी एक फायदा म्हणजे हल्ली आपण उगाचच प्रत्येक गोष्टीची घाई करत असतो (उदा. विमान थांबले रे थांबले की लगेच वरचे सामान काढून गर्दीत ताटकळत उभे रहाणे, लोकल मधून उतरल्या उतरल्या धावत सुटणे, बका बका खाणे इ.) त्या सवयीतून सुटका होते, आणि आयुष्य हे शांतपणे, विना घाई-गडबडीचे जास्त चांगल्या रीतीने जगता येते, हे उमगते.

या बाबत सहमत न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हो काका. पण हे फक्त व्यायामास लागू होत नाही. शांत पणे जेवण करणे. झोपण्याआधी डोक्याला काहीतरी फीड करण्यापेक्षा शांत पडणे अशा बर्‍याच गोष्टी यासंदर्भात येतात. व्यायाम हा "यापैकी एक" असा आहे.

तुमच्या मताशी सहमत आहे परंतु वरती मी हाय इंटेसिटी व्यायामाबाबत व्यक्त केलेल्या मताबाबत असहमत होतो त्याबद्दल यायोगे कारण सांगतो.
तुम्ही म्हणालात "मला आपल्या वयाचा आणि कुवतीचा विचार न करता केलेल्या जॉगिंग, ब्रिस्क वॉकिंग आणि डंबेल्स या तिन्हीतून दुखापत झाली". तुमच्या वयाबद्दल मान्य पण मी विशीतल्या बरेच जणांना याचा चुकीचा अर्थ काठताना पाहिलेय. अचानक ५-१० किमी अगदी ३० मिनिटात धावू पाहणे हे गैरच पण म्हणून कोणी धडधाकट विशीतला माणूस (बाई) माझी ते अंतर (अगदी तिप्पट वेळ का लागेना) धावणे/जॉगिंग करण्याची कुवत नाही म्हणत असेल तर ते चूकच. जर तुम्हाला कोणतीही गंभीर व्याधी/विकार नसेल तर थोडा थोडा प्रयत्न या गोष्टी साध्य करु शकतो यावर माझा विश्वास आहे. आणि चाळिशीच्या आत असाल तर नक्कीच शक्य आहे हे पण. फक्त थोडे थोडे योग्य दिशेने प्रयत्न हवेत.

बाकी तर वरती डॉकनी वरती सांगितल्याप्रमाणे,

परंतु एकदा तुमचा व्यायाम किंवा आहार थांबला कि झपाट्याने हे पाणी शरीरात शोषले जाऊन वजन "जैसे थे" येते

ही वस्तुस्थिती आहे. पण व्यायाम सुटल्यानंतरच्या भितीने व्यायाम करायचाच नाही हे पटत नाही.

पिलीयन रायडर's picture

23 Oct 2015 - 1:54 pm | पिलीयन रायडर

मी ह्या पुस्तकाचा उल्लेख इथे करणारच होते.


ज्या लोकांना खरोखरच व्यायाम करायचा आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे. मस्ट रिड!

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Oct 2015 - 1:32 pm | अनिरुद्ध.वैद्य

दिवेकर बाईंची दोन्ही पुस्तके (डोन्ट सिरीझ) वाचायला सोपी आणि सल्ले आचरणात आणायला सोपे आहेत! पहिल्यात घरबसल्या जास्त काही आहारबदल न करता आहारात हेल्दी बदल घडवून कसे घडवून आणायचे ह्यांचे चांगले सल्ले आहेत. दुसर्यात व्यायामाविषयी सगळ काही आहे.

मी व्यवस्थित प्लान करून ९ किलो कमी केल होत, पण आता ३ किलो परत वाढलाय. कारणे: आहारनियम न पाळणे आणि व्यायामात सातत्य नसणे.

कपिलमुनी's picture

21 Oct 2015 - 5:15 pm | कपिलमुनी

लोक्स एखाद्या डायटेशियन भेटून डायट का ठरवत नाहीत ?

काकांनी सांगितलं तेव्हा हा प्रकार मला रोचक वाटला होता. पण खाणे आणि वर्कआऊट्/खेळणे/पोहणे काहीही जोवर एकत्र करत नाही तोवर शरीरावर त्याचा फरक दिसत नाही असा माझा तरी अनुभव आहे. गेला एक महिना वर्कआऊट नाही/ पुण्यात पावसाच्या कृपेने स्विमींग पूल बंद त्यामुळे निव्वळ खाण्यावर कंट्रोल ठेवला आहे. पण वर्कआऊट किंवा स्विमिंगनंतर दिवसभर जो तरतरीतपणा असायचा तो तेवढा कुठेतरी कमी वाटतोय.

नुसत्या डाएटने होणारे सो कॉल्ड चमत्कार क्षणभंगूर असतात असं माझं मत आहे.

चित्रगुप्त's picture

22 Oct 2015 - 4:29 pm | चित्रगुप्त

नुसत्या डाएटने होणारे सो कॉल्ड चमत्कार क्षणभंगूर असतात असं माझं मत आहे.

हे मत अनुभवाने झालेले आहे की हा एक अंदाज वा समजूत आहे ?
माझी मूळव्याध आणि वीस-पंचवीस वर्षापासून असलेला फिस्टुला (याच्या वेदना आणि त्रास ज्याला होतो तोच जाणे) अवघ्या पंधरा ते वीस दिवसात कायमचा बरा झाला. वजन आणि पोटाचा घेर जो कमी झाला, तो या दीड वर्षात वाढलेला नाही, तेंव्हापासून वाढलेली उर्जा-उत्साह आणि संपलेली-निराशा, आळस ... याला क्षणभंगुर म्हणावे का?

तर्राट जोकर's picture

21 Oct 2015 - 6:09 pm | तर्राट जोकर

खालिल दुव्यावरील महोदय स्वत: डॉक्टर आहेत. ते ह्या डायटला रेकमेंड करत आहेत. वर काही प्रतिसादांमधे काही डॉक्टर्स त्याला विरोध करत आहेत. नक्की कोण योग्य आहे...?

http://drhyman.com/blog/2014/04/20/need-reboot/

गुड, असेच ट्यार्पी मिळवायचे प्रयत्न करत राहा.

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

सायकलस्वार's picture

21 Oct 2015 - 6:18 pm | सायकलस्वार

त्या डॉक्टरसाहेबांचे झटपट डायेटची पुस्तके , सीड्या, सप्लिमेंट्स वगैरे विकण्याचे दुकानच आहे हो!

http://store.drhyman.com/

तर्राट जोकर's picture

21 Oct 2015 - 9:52 pm | तर्राट जोकर

वोक्के सार, ज्यांचे दुकाने नस्तात ते डॉक्टर योग्य बोलतात..... धन्यवाद! ज्ञानात भर टाकल्याबद्दल.

सायकलस्वार's picture

21 Oct 2015 - 11:53 pm | सायकलस्वार

कोण योग्य बोलत आहे, कोण नाही यावर मी काहीच म्हणत नाहीये. दुकान प्रत्येकजणच लावून बसलेला असतो. गिर्‍हाईकानेच तारतम्य बाळगावं अशी अपेक्षा आहे. मी ज्युस डाएट डिसक्रेडिट करत नाही. पण वस्तू विकणार्‍याकडूनच वस्तूचं सर्टिफिकीट आणून दाखवणं गमतीदार वाटलं. असो.

मीउमेश's picture

21 Oct 2015 - 6:43 pm | मीउमेश

दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते ,

स्वप्नांची राणी's picture

21 Oct 2015 - 6:56 pm | स्वप्नांची राणी

फोटोशॉप...???

चित्रगुप्त's picture

21 Oct 2015 - 8:59 pm | चित्रगुप्त

असे लांबट तंतुमय जिन्नस गेल्या वर्षी आणि या वर्षी जूसिंगचे सुरूवातीचे 5-6 दिवस निघाले. जालावर शोध घेता तसले पोटातील कृमी असतात असे कळले. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसे जूसिंग केल्याशिवाय त्याची महती कळणार नाही. उगाच तर्कटे लढवण्यात अर्थ नाही.

तर्राट जोकर's picture

21 Oct 2015 - 10:01 pm | तर्राट जोकर

इथे काही लोकांना असेही वाटेल की तुम्ही त्या ज्युसिंगवाल्याचे एजेंट आहात.

पैसा's picture

21 Oct 2015 - 10:21 pm | पैसा

इंटरेस्टिंग. मी २२ वर्षांपूर्वी सिद्ध समाधी योग शिकले तेव्हा त्यात कित्येक महिने कच्चे खाऊन राहिल्याचे आठवते. तेव्हा वजन प्रमाणात राहून अ‍ॅक्टिव्हिटीज चालू होत्या आणि अ‍ॅलर्टनेस, चपळता वाढली होती.

मात्र तेव्हा नुसते रस घेऊन नव्हे तर माझ्या खाण्यात मोड आलेली कडधान्ये हा प्रमुख घटक होता. थोडे ड्राय फ्रुट्स, सर्व प्रकारच्या कच्च्या भाज्या व फळे (कधीतरी बदल म्हणून रस) गोडी आणण्यापुरता मध, लिबू असा आहार होता. चहा कॉफी बंद केली होती. वाटलेच तर थोडा वरण भात, किंवा कच्चे पोहे खात असे. दूधही बंद केले होते. नंतर मुलांसाठी आणि स्वतःसाठी वेगळे जेवण करणे कठीण होऊ लागले तसे ते बंद झाले. पण अजून कधी संधी मिळाली तर पुन्हा असे कच्चे खाऊन आरामात राहू शकेन.

निव्वळ रसावर रहाण्यापेक्षा असे कच्चे खाऊन सहज रहाता येते. त्यात प्रोटीन्स मिळतात, फायबर मिळते. दात खराब होत नाहीत. वगैरे वगैरे. पण ज्यांना असे कांदा लसूण मिरची काही नसलेले खाणे चालत असेल त्यांना ठीक आहे. बाकीच्यांसाठी जरा अवघड आहे.

एकूण प्रतिसादांमधे डॉक्टर मंडळींचे प्रतिसाद आवडले.

प्रकाश घाटपांडे's picture

22 Oct 2015 - 10:02 am | प्रकाश घाटपांडे

सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.

मग चित्रगुप्त साहेब आपल्याला या प्रदीर्घ चर्चेनंतर काय समजलं? मला डॉ मनोज भाटवडेकर या मानसोपचार तज्ञाची एका पुनर्जन्माची कथा या स्वानुभवावर असलेल्या पुस्तकाची आठवण झाली

चित्रगुप्त's picture

22 Oct 2015 - 5:05 pm | चित्रगुप्त

घाटपांडे साहेब, आम्ही उभयतांनी हा जो प्रयोग केला, तो "मुलगा एवढे म्हणतो आहे, तर करून बघूया" म्हणून. आम्हाला त्यावेळी त्यातून असे सुपरिणाम कायमचे लाभतील, याची सुतराम कल्पना नव्हती. उलट हे एक नवीनच काहीतरी अमेरिकन फॅड आहे, असे वाटले होते. त्यामुळे डायेटिशियन, डॉक्टर वा अन्य विद्वान मंडळींचे या बद्दल काय मत आहे असा कोणताही उहापोह न करता, संपूर्ण समर्पण भावनेने ते केले.
नंतर इतर लोकांशी चर्चा करताना त्यांना आमच्यात झालेला बदल तर उघडच दिसून येत होता, परंतु आम्ही सांगत असलेले पटत नव्हते (माझा अगदी लहानपणापासूनचा खास, अतिविद्वान प्रोफेसर मित्र, लठ्ठ्पणा, पोटाचे विकार वगैरे भोगत असूनही अजूनही त्याला मी हे पटवून देऊ शकलेलो नाही). तेंव्हा मला हे सर्व कसे घडून आले असावे हे जाणून घ्यावेसे वाटले. अर्थात या विषयाचा आवाका फार मोठा आहे, आणि त्यात शरीरशास्त्र, आहारशास्त्र, वनस्पतिशास्त्र, पोषणशास्त्र, वगैरेंचा अभ्यास करणे आवश्यक आहे. असे सर्व इंग्रजीतून वाचण्याचा मला कंटाळा असल्याने ते लांबणीवर पडत आहे.
सध्या मी सुचवतो, की आपण (आणि सर्व जिज्ञासू वाचकांनी) खालील काही व्हिडियो अवश्य बघावेत. माझे समाधान होईल इतपत अभ्यास झाल्यावर मी स्वतंत्र धागा काढेन.

How the Body Reacts to a Juice Cleanse with Joe Cross
https://www.youtube.com/watch?v=7JtjFNy59t4
Fat Sick and Nearly Dead -- भाग १
https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8

Fat Sick & Nearly Dead 2 (2014) HD -- भाग २.
https://www.youtube.com/watch?v=7kLSs4OhS0o

स्टुपिड's picture

22 Oct 2015 - 3:43 pm | स्टुपिड

आमच्यासारख्या बारीक लोकांच्या काही कामाचा नाही हा लेख.

चित्रगुप्त's picture

22 Oct 2015 - 4:41 pm | चित्रगुप्त

आमच्यासारख्या बारीक लोकांच्या काही कामाचा नाही हा लेख.

वजन कमी होणे हा एक अनुषंगिक परिणाम आहे. मुख्य फायदा पचनसंस्था कमालीची स्वच्छ होऊन त्यायोगे अनेक प्रकारच्या सध्या असलेल्या व भविष्यकालीन समस्या उद्भवण्यापासून बचाव हा आहे.
आपल्याला कल्पना नसली, तरी आतड्यात कृमी आणि न पचलेले अन्न, जुनी घाण वगैरे असते, जे नाना व्याधींना जन्म देत असते. ते सर्व नष्ट होते.

मार्मिक गोडसे's picture

22 Oct 2015 - 4:48 pm | मार्मिक गोडसे

@स्टुपिड , अगदी बरोबर बोललात. आपल्या सारख्यांच्या अंगावर ना चरबी ना किडे ठेवायला जागा,त्यामुळे असली थेरेपी आपल्या कामाची नाही.

एक शंका,
अशा थेरेपीने आतड्यातील अपायकारक जीव-जंतूंबरोबर अन्न पचवनारे जीवही बाहेर पडतात का?

चित्रगुप्त's picture

22 Oct 2015 - 5:12 pm | चित्रगुप्त

आतड्यातील अपायकारक जीव-जंतूंबरोबर अन्न पचवनारे जीवही बाहेर पडतात का?

चांगली शंका विचारलीत. माझ्या बाबतीत तरी असे झालेले नाही. दही, ताक घेणे हे यासाठी उत्तम असे ऐकले आहे. याविषयी जास्त माहिती मिळाली, तर अवश्य लिहा.

चित्रगुप्त's picture

22 Oct 2015 - 5:17 pm | चित्रगुप्त

गंमत म्हणून लिहीतो आहे, परंतु कदाचित असेही असू शकते: किडकिडीत असणारे लोक जे काही खात असतात त्यातले बरेचसे अन्न हे आतड्यात ठाण मांडून बसलेले, नको असलेले पाहुणे तर फस्त करत नाहीत?

किडकिडीत असणारे लोक जे काही खात असतात त्यातले बरेचसे अन्न हे आतड्यात ठाण मांडून बसलेले, नको असलेले पाहुणे तर फस्त करत नाहीत?

+१

मार्मिक गोडसे's picture

23 Oct 2015 - 3:35 pm | मार्मिक गोडसे

गंमत म्हणून ठिक आहे. परंतू ह्या थेरेपीनंतर किडकिडीत नसणार्‍या व्यक्तींचेच वजन हे नको असलेले पाहुणे बाहेर पडल्यावर कमी का होते? शरीराचे शोषण थांबल्यामुळे ते तर वाढायला हवे.

माझ्या बाबतीत तरी असे झालेले नाही.

हे जिवाणू साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत आणि तुम्ही तुमची विष्ठा प्रयोगशाळेत तपासलीही नव्हती. मग तुम्हाला कसे समजले?

चित्रगुप्त's picture

23 Oct 2015 - 5:07 pm | चित्रगुप्त

किडकिडीत व्यक्तीने रसाहार केल्याचे उदाहरण मी बघितलेले नाही . माझ्या मुलाच्या पोटातून मोठा टेपवर्म निघाला . कृमी अनेक प्रकारचे असतात . मोठेही असतात . ते चारपाच दिवस सोडून एरवी कधीच तसले काही निघालेले नाही. शरीरशुद्धी आणि वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या रीतीने रसाहार केला पाहिजे असे वाटते . मला दोन्ही गोष्टी साध्य झाल्या . दोन्ही आवश्यक होत्या . रसाहाराने आतडी साफ झाली की योग्य आहार घेऊन वजन वाढवाढवता येईल .

पाषाणभेद's picture

22 Oct 2015 - 11:01 pm | पाषाणभेद

फारच प्रेरणादायी उपक्रमाची माहीती दिलीत. धन्यवाद चित्रगुप्तजी.

पुष्करिणी's picture

23 Oct 2015 - 2:51 am | पुष्करिणी

फेस्बुक वर एक निती संजीव म्ह्णून आहेत त्यांचा डाएट ( डीटॉक्स) प्लॅन खूप प्रसिद्ध आहे सध्या.
त्यांचा प्लॅन फॉलो करून बरेच जणं वजन कमी करण्यात यशस्वी झाले आहेत.

चित्रगुप्त's picture

23 Oct 2015 - 10:25 am | चित्रगुप्त

नीति संजीव यांच्या उपक्रमात काय करायचे असते ?

सुबोध खरे's picture

23 Oct 2015 - 12:05 pm | सुबोध खरे

Breakfast – GREEN JUICE
Mid Day Snacks - NUTS, RAW SEEDS, FRUITS
Lunch – SALAD
Mid Evening Snacks – FRUITS
Dinner – SALAD WITH BOILED PULSES

Water – PLENTY AND MORE
Apple Cider Vinegar – ONCE A DAY (2 teaspoon organic ACV diluted in a glass of water 15 mins before any one meal)
Exercise –½ HOUR WALKING (anything over and above this will accelerate the weight loss like crazy!)
Sunlight - 10-15 minutes of direct sunlight everyday preferably between 9-12 noon (for the vitamin D requirement of the body)
Ingredients:
GREEN JUICE : Half bunch Spinach, Half bunch Coriander Leaf (with part of the stem), Handful mint leaf, 1 full cucumber, 1 full tomato, Juice from 1 big lemon, ½ inch piece ginger, 2 cloves garlic
Blend everything in the blender instead of putting it into a juicer, because it will lose all its fiber in a juicer or if it is strained.
It would be 1-2 glasses in quantity and look like a thick smoothie... Do have the complete juice as soon as it's prepared.

Nuts : Regular mixed nuts – Walnut, Almond, Cashew, Peanut, Pista, etc.- salted ones are fine too - 2 handfuls of mixed nuts a day
Raw Seeds : Mix of Chia seeds, Flax seeds, Sesame seeds, Pumpkin seeds, Hemp seeds, Sunflower seeds, etc. - 2 Tablespoons of mixed seeds a day...
Fruits : Absolutely any fruit your heart desires! All fruits are perfect, including high carb ones like banana, mango, etc.
Salad (prepared for few days): 2-3 medium carrots, 2 medium beetroots, ½ small red cabbage, 2-3 celery sticks, red green and yellow capsicum(1 each), olives... (You can also try other raw vegan salads with dressings... this is the recipe I had during detox...)
Boiled Pulses : White or black chana, kidney beans, black eyed peas, etc. I chose only one pulse for a day and pressure cook ½ cup in turmeric powder and a pinch of salt. You could also garnish it with onion, tomato and spices like pepper, cumin, etc. or fresh grated coconut
हा आहार त्यांनी सुचवलेला आहे. यात फळं भाज्या आणि कडधान्ये आहेत. यात वावगं काहीच नाही.
मूळ मुद्दा येतो तो घेणार्याच्या इच्छा शक्तीचा. सर्वात मोठा प्रश्न येथेच आहे. तीन दिवस असा आहार घेतल्यावर बहुसंख्य लोकांना पिझ्झा, जिलबी, रसमलई, मटण कबाबची स्वप्नं पडायला लागतात. चौथ्या दिवशी त्या गोष्टी जळी स्थळी काष्ठी पाषाणी दिसू लागतात आणि पाचव्या सहाव्या दिवशी पाय घसरतो. आणि मग येरे माझ्या मागल्या होते.
माझे स्वतःचे उदाहरण देतो. काहीच कारण नसताना मी एकदा ठरवले कि आपण पूर्ण फलाहार करावा. म्हणून सकाळपासून मी फक्त केळी डाळिंब संत्रं सफरचंद आणि अननस अशी फक्त फळं खात होतो. संध्याकाळ पर्यंत मला बिस्किटं पोळी भाकरी केक यांचे स्वाद आठवू लागले.शीख कबाब चिकन बिर्याणी सारखे पदार्थ तर नुसत्या आठवणीने तोंडाला पाणी सुटू लागले. दुसर्या दिवशी सकाळी मी झक्क पैकी एक भाकरी आणि मिरचीचा ठेचा खाल्ला. हे फक्त एकाच दिवसात घडले.( माझ्या अंगावर एक दिवसापेक्षा जास्त टिकाव लागेल इतकी चरबीच नाही. आजकालच्या स्मार्ट फोन सारखे एक दिवसात ब्याटरी डाऊन )

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Oct 2015 - 1:44 pm | अनिरुद्ध.वैद्य

पाचव्या सहाव्या दिवशी पाय घसरतो.
>>

एक्झाक्टली. न पेक्षा रोजच्याच आहारात थोडे बदल करून ३ वेळा जेवणाऐवजी पोर्शन साइझ लहान करून ४ ते ५ वेळा जेवलो आणि व्यायाम रेग्युलर ठेवला तर सब ठीक रहेगा. याने पाय घसरण्याची वेळ फार कमी येते आणि एकदा ८ १० दिवसांमध्ये सवय लागली की जास्त टेन्शन राहत नाही .

डाएटिंग इज चेंजिंग युअर लाइफ़स्टाइल (टूवर्ड हेल्थ) का काय ते म्हणतात तेच खरे.

विटेकर's picture

23 Oct 2015 - 11:28 am | विटेकर

रसाहार हा अतिशय सुन्दर उपाय आहे ! गेल्या १० आठवड्यात मी १० किलो वजन कमी केले आहे , दर आठवड्याला एकदा रसाहार करुन !
freedon from diabetes या संस्थेच्या डॉ. प्रमोद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शानाखाली मी माझा मधुमेह रिवर्स ( होय , रिवर्स) केला आहे , गेले दोन महिने एकही गोळी / औषध खात नाही ! पर्यायी औषध नाही , फक्त आहाराचे तंत्र जमवून !

जी टी टी टेस्ट ओके आली की लेख लिहिनच !
उत्सुक लोकांनी freedon from diabetes / डॉ. प्रमोद त्रिपाठी गुगलून पहावे !