शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

Primary tabs

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
19 Oct 2015 - 8:26 am

मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे.

१. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल :
पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले. 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' ची लक्षणे माझ्यात दिसत होती, आणि वर्षानुवर्षे 'फिस्टुला' च्या वेदना मी भोगत होतो. फिस्टुलावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याचे सर्जनने सांगितले, परंतु जालावर हुडकता शस्त्रक्रिया करून सुद्धा पुन्हा फिस्टुला उद्भवतो असे समजले. अ‍ॅलोपाथीची औषधे घेणे मला कधीच भावत नसल्याने आता करावे तरी काय, हेच कळेनासे झाले. पूर्वी नियमित व्यायाम करायचो, तोही आळस आणि निरुत्साहामुळे बंद झाला. गोड, तळकट खाणे सोडवले जात नव्हते. अतिशय निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली होती.
रेक्झीन च्या खुर्चीवर बसल्याने, सिंथेटिक कापडाची विजार घातल्याने, कॉफी प्यायल्याने लगेच फ़िस्टुला होतो हे लक्षात आल्यावर कॉफी पूर्ण बंद केली, सुती पटलूण घालू लागलो, आणि सिनेमाला जातानासुद्धा बुडाखाली ठेवायला सुती बस्कुर नेऊ लागलो. या उपायांनी फिस्टुला होण्याचे प्रमाण जरा कमी झाले खरे, परंतु पुढे मूळव्याधीने पण मला ग्रासले. --- आता मात्र माझी पाचावर धारण बसली. जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे "मै अपनी जिंदगीसे तंग आ चुका था… मेरी बीवी मुझसे नफरत करने लगे थी " --- असे झालेले होते, पण ... " फिर एक दिन मुझे पिंटो मिला, उसने मुझे xxxxx के बारे मे बताया" ... असे मात्र काही घडून येत नव्हते.

२. आशेचा किरण :
अश्या परिस्थितीत २०१४ च्या जुलै महिन्यात अमेरिकेत येऊन पहुचलो. मुलाचे घर पहिल्या मजल्यावर होते, तो एक जिना चढायलाही मला जड जात होते. आलो, त्याच दिवशी मुलाने ' Fat, Sick and Nearly Dead' हा सिनेमा दाखवला आणि त्यात दाखवल्याप्रमाणे आपण सर्वजण एक आठवडा फक्त भाज्या-फ़ळांचा रस घेऊन राहूया, असा प्रस्ताव मांडला. मला आणि पत्नीला ही कल्पना अशक्य कोटीतील वाटली. नुसत्या रसाने पोट कसे भरणार ? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटे, दूध-तूप वगैरेंशिवाय शक्ती कशी राहणार ? एक दिवस सुद्धा जेवणात पोळी नसेल तर आपण त्रस्त होतो, सात दिवस कसे काढणार ? वगैरे शंका होत्या, पण मुलगा एवढे म्हणतो आहे तर करून बघू, झाला तर फायदाच होईल, अगदी रहावले गेले नाही तर खाऊया काहीतरी, असा विचार करून आम्ही संमती दिली.

३. रस-आहारावर वीस दिवस आणि 'काळ-सर्प वियोग'

मग लगेचच बाजारात जाऊन ज्यूसर खरेदी केला आणि काकडी, हिरवी सिमला मिर्च, दुधी भोपळा, पालक, पोदिना, सेलरी, केल वगैरे हिरव्या भाज्या, हिरवी (ग्रॅनी स्मिथ) सफ़रचंदे, पिवळी-लाल सिमला मिर्च, गाजरे, संत्री, टमाटर, ग्रेपफ़्रूट, बीटरूट, लाल सफ़रचंदे, अननस, कलिंगड, वगैरे लाल-पिवळ्या भाज्या आणि फळे, आले, ओली हळद, लिंबू असे सर्व सामान नीट धुवून फ्रिज मध्ये ठेऊन सज्ज झालो.
.
दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले.
...
रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो.
.
रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते.
.
पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले...
...
सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला.
अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले.

४. यानंतरचा काळ :
भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो.
.
ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले.

ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला.

कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत.
http://www.rebootwithjoe.com

Fat Sick and Nearly Dead:
https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8

पाकक्रियासमाजजीवनमानराहणीऔषधोपचारविज्ञानशिक्षणप्रकटनलेखअनुभवशिफारससल्लामाहितीमदत

प्रतिक्रिया

वावावा इतरांनाही नक्कीच उपयोगी.भारतीय खाणेपद्धतीमध्ये खूप बदल झालेत त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.जाडजूड पण घट्ट शरिराचे परदेशी लोक पाहण्यात येतात.सत्तरीतही तरतरीत दिसतात.काम न करण्याची अथवा कष्टाची कामे इतरांवर ढकलून आपण आराम करायला बघायचे नंतर उगाचच जिमवगैरे चालू करायचे.आणखी बय्राच अपप्रवृत्ती आपल्याकडे थोर लोकं अवलंबतात आणि मुलांचा हेच योग्य असा समज होतो. तुम्ही असं करत होता असं म्हणत नाहीये परंतू एक निरीक्षण होते.बय्राच माता मुलांस हाइ प्रोटिन आहार चरवतात नंतर मुलं मोठं शरीर धारण करतात परंतू कामाची आवड उत्पन्न करत नाहीत.
लेखातील फोटो ,मांडणी ,सादरीकरण मस्त झालंय.

रेवती's picture

19 Oct 2015 - 6:22 pm | रेवती

:)

मांत्रिक's picture

19 Oct 2015 - 8:57 am | मांत्रिक

उत्तम लेख! मला अजूनतरी हेल्थ समस्या नाहीत. पण किमान आठवड्यातून १ दिवस तरी ज्यूसाहार नक्कीच करणार. कृपया भारतात उपलब्ध भाज्या व फळे वापरून ज्यूस कसे करायचे याची कुठे वेबसाईट आहे का? किंवा पुस्तक?
कृपया जास्त माहिती व्यनी कराल? एक जवळची व्यक्ती सतत आजारी असते. कारण काही कळतच नाही. त्यांना ही माहीती नक्की देईन.
बाकी अतिशय उपकारक माहिती.

मांत्रिक's picture

19 Oct 2015 - 9:04 am | मांत्रिक

आठवड्यातून किमान एक दिवस ज्यूसाहार केला तर फायदे मिळतील की उगाच करायचं म्हणून केल्यासारखं होईल? जास्त दिवस करावे लागेल का? बाकी जादा माहिती कृपया व्यनी करा.

चित्रगुप्त's picture

19 Oct 2015 - 9:28 am | चित्रगुप्त

आठवड्यातून किमान एक दिवस ज्यूसाहार केला तरी काही न काही फायदे नक्कीच मिळतील. मुख्य म्हणजे जूसाहाराची आवड लागेल, आणि पुढे कधीतरी जमेल तेंव्हा आठवडाभर करणे सोपे जाईल. जूस खेरीज नारळपाणी, ताक, पातळ लस्सी, स्मूदी, कढी, सोलकढी, सूप, सार, पातळ वरण, सांबार, लिंबूपाणी, पाण्यात आले, ओवा, जिरे, बडिशेप वगैरे घालून उकळवून गाळून घेतलेले पेय, असे द्रव पदार्थ जास्त प्रमाणात घेण्यानेही चांगला फायदा होतो. चहा ऐवजी साधा ग्रीन टी पिणे उत्तम. ज्यांना पोट वा वजन कमी करण्याची आवश्यकता नसेल, त्यांनाही पोट/आतडी कमालीची साफ झाल्याने अनेक फायदे मिळतातच.
आपल्याइकडे भाजीपाला नाल्याच्या घाण पाण्यातही उगवला जातो, त्यातील धोका टाळण्यासाठी वाटल्यास गाजर, पालेभाज्या, बीटरूट वगैरे उकळत्या पाण्यात ठेऊन नंतर अन्य फळे, केळी, खजूर, दही इ. सोबत मिक्सर मधून काढून शिवाय पातळ करण्यासाठी पाणी घालून परत फिरवावे. हे पेय सुद्धा उत्तम काम करते. हे तर रोज करता येण्यासारखे आहे.

शशिकांत ओक's picture

27 Oct 2015 - 11:55 am | शशिकांत ओक

आज अनेक दिवसांनी मिपावर प्रवेश केला आणि पाहतो तो ही गर्दी...!
जुसीय आहार आणि त्याचे प्रत्यक्ष अनुभवाने विदित केलेले चित्रगुप्तांचे सिद्धहस्त लेखन ! 14500 वर क्लिक्स, 250 च्यावर प्रतिसाद...! अबब... ! वा.. !वा...!
परंतु शेवटी इतक्या लोकांपैकी एकही ‘चित्रगुप्तांच्या अनुभवावरून शहाणा होऊन, मी लागलो कामाला’ असे म्हणणारा वाचनात आढळला नाही!’
प्रत्यक्ष पोहायला न उतरता, ‘काहो, फार गार असेल ना पाणी?, खोल किती असेल? अशा --- चौकशा, शंका, विचक्षणाकरून, तर कधी सर्व थापा आहेत, लेखन तद्दन्न खोटे आहे.’ अशी भडास काढणाऱ्या विविध वैचारिक महाभागांनी ‘करीन मग’ या उक्तीप्रमाणे वर्तन करायचे ठरवलेले दिसते. असो.
धाग्यातील मुद्देसूद मांडलेली माहिती, आकर्षक फोटो आणि विचारणांना सविस्तर आणि प्रामाणिक उत्तर देण्यातून या प्रश्नाला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुरवातीचा संकोच टाकून, विविध आकृती बंधातून आपल्या पोटात काय काय दडलेले असते याचे साक्षात दर्शन करवून एक नवा पायंडा पाडलेला हा धागा वाचून मी व पत्नी प्रत्यक्ष कामाला लागलो. प्रथम एरंडेलतेलाने पोटातील कृमी असल्या तर आधीच पहाणी करून, काही ‘सापडले’ नाही अशी खात्री करून, पैशाकडे न पाहता काल लगेच नवा जूसर आणला. आज माझ्या बाबत दुसरा दिवस. आता यापुढे काय काय घडले याचा आढावा सादर करेन.

सुबोध खरे's picture

27 Oct 2015 - 12:49 pm | सुबोध खरे

एरंडेलतेलाने पोटातील कृमी असल्या तर
ओक साहेब
एरंडेल सारखे रेचक घेण्यापेक्षा मी आपणास एक बेन्डेक्स ची गोळी घ्या असे सुचवेन. ( किंमत रुपये ८ फक्त). याने सर्व किडे कृमी नष्ट होतील.

शशिकांत ओक's picture

27 Oct 2015 - 4:55 pm | शशिकांत ओक

हवाईदलातील नोकरीमध्ये असल्यापासून अशा गोळ्या खायची प्रॅक्टीस आहे.यावेळी प्रत्यक्ष पुरावा सादरीकरण महत्वाचे वाटल्याने बालपणातील एरंडेल तेल थेरपी करून मग रसथेरपीचा मार्ग सुलभ करायला बरे पडेल, हे सुचले...

चित्रगुप्त's picture

27 Oct 2015 - 5:15 pm | चित्रगुप्त

डॉक्टर साहेब
एरंडेल वगैरे रेचके व औषधे, त्यांचा होणारा बरावाईट परिणाम, कृमी का आणि कश्या होतात आणि त्यांचे शरीरावर होणारे परिणाम, याबद्दल सविस्तर माहिती सवडीनुसार देता येईल का? पर्गेटिव्ह आणि लॅक्झेटिव्ह अशी दोन प्रकारची रेचके असतात असे वाचले आहे, यात काय फरक असतो?

सुबोध खरे's picture

27 Oct 2015 - 8:43 pm | सुबोध खरे

चित्रगुप्त साहेब
पर्गेटिव्ह आणि लॅक्झेटिव्ह यात पूर्वी फरक त्यांच्या शक्ती मधील होता पण आजकाल इतक्या तर्हेची औषधे बद्धकोष्ठावर निघाली आहेत कि त्यातील फरक धूसर झाला आहे. पूर्वी लॅक्झेटिव्ह म्हणजे सौम्य समजली जात असत म्हणजे लिक्विड पाराफिन किंवा क्रिमाफिन सारखी आणी पर्गेटिव्ह म्हणजे तीव्र रेचके एरंडेल सारखी ज्याने पोटात मुरडा( COLIC) होतो ती समजली जात.
पूर्वी एरंडेल तेल पोट साफ होण्यासाठी देत असत याचे कारण त्याच्या तीव्र रेचक प्रभावाने पोटात असलेले काही जंत आणी कृमी( जंत मोठा असतो १५-३० सेमी आणी कृमी लहान असतात १ सेमी) सुद्धा बाहेर पडत असत म्हणून असा समज झाला होता कि ते जंत निर्मूलक आहे म्हणून (सगळे जंत/ कृमी त्याने बाहेर पडत नाहीत).
जंत कसे होतात. जंतांचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या विष्ठेत त्याची अंडी असतात. हि अंडी सोनखताद्वारे भाज्या/ पालेभाज्यांवर येतात. तेंव्हा आपण भाज्या आणी फळे नीट धुवून खाल्ली नाही तर हि अंडी पोटात जाऊन आपल्याला जंतांचा प्रादुर्भाव होतो. दुसरे कारण आपण आपला मळ( विष्ठा) धुतल्यावर हात साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे अन्यथा आपल्या नखाच्या कोपर्यात कृमीची अंडी राहून जातात आणी आपल्या खाण्याद्वारे आपल्याला परत संसर्ग होतो( सेल्फ इन्फेक्शन).
जंत रोज २ लाख अंडी देतात आणी कृमी ५-१० हजार या दराने आपल्या स्वतःच्या हाताद्वारे सुद्धा आपल्याला किती जंत/ कृमींचा संसर्ग होऊ शकतो हे समजून घ्यावे. रस काढण्यापूर्वी आपण घेत असलेल्या भाज्या गाजर मुळा बटाटा रताळे किंवा जमिनीवर असणारी फळे स्ट्रोबेरी, रास्पबेरी, काकडी, भोपळा टोमाटो हे सुद्धा स्वच्छ का धुवून घ्यावेयाचे हे कारण आहे.
या कारणास्तव आम्ही( डॉक्टर) आपल्याला विशेषतः लहान मुलांना दर ६ महिन्यांनी जंताचे औषध द्यायचा सल्ला देतो. बेन्डेक्स किंवा दुसरे अल्बेंडाझोल असलेल्या औषधाची किंमत १२- १४ रुपये आहे. हि गोळी गोड असून चघळून खायची. याने जाणताना लकवा मारतो आणी ते शौचाद्वारे पडून जातात. हे औषध शरीरात शोषले जात नसल्याने इतर लोक साइड इफेक्ट बदल आरडा ओरडा करतात तसे होण्याची शक्यता नाही. मुलांनी किंवा मोठ्यांनी दर सहा महिन्यानी हे औषध एकदा घ्यावे.याच्या बरोबर रेचक घेण्याची आवश्यकता नाही.
जंत -https://en.wikipedia.org/wiki/Ascaris_lumbricoides
कृमी https://en.wikipedia.org/wiki/Necator_americanus

तुषार काळभोर's picture

28 Oct 2015 - 12:47 pm | तुषार काळभोर

मला लहानपणी (९-१० वर्षाचा असताना) जंताचा (मी इतके दिवस जंतच म्हणत होतो. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते ५-१० मिमि लांबीचे होते-कृमी) खूप त्रास होता. एकदा आमच्या फॅमिली डॉक्टरांनी मला "झेंटेल" ही गोळी दिली होती. एका स्ट्रिपमध्ये एकच गोळी. गोड. चघळून खाण्यासाठी. नंतर २ दिवसात हजारो-लाखो (!) कृमी पडून गेले. नंतर परत कधी तसा त्रास झाला नाही. आता शोधल्यावर कळले की त्यात Albendazole असते.

चित्रगुप्त's picture

29 Oct 2015 - 1:46 am | चित्रगुप्त

डॉ. खरे साहेब: कृमी व जंतांबद्दलच्या माहितीबद्दल अनेक आभार. माझे अजूनही काही प्रश्न आहेतः
१. पोटात जंत व कृमी असल्याचा आपल्या आरोग्यावर नेमका काय दुष्परिणाम घडून येत असतो?
२. आपण खात असलेले अन्न ही मंडळी खाऊन पुष्ट होतात, आणि खाल्ल्यापैकी बरेचसे आपल्या 'अंगी लागत' नाही, अशी जी सार्वत्रिक समजूत असते, ती सत्य आहे का?
३. हे कृमी व जंत काही पदार्थ त्यांच्या शरीरातून निष्कासित करतात का? असल्यास त्यांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो ?
४. औषध घेऊन जंत व कृमी नष्ट झाल्यावर मूळव्याध वा फिस्टूला बरा होतो का ?
५. पाश्चात्त्य डॉक्टरी विद्येप्रमाणे या दोन्हींवर कायमचे इलाज काय आहेत ?
६. चरबी विषयी: मुळात जास्तीची चरबी शरिरात निर्माण कशी होते, आणि पोटावर तिचे थर का निर्माण होतात ? तूप वगैरे चरबीयुक्त जिन्नस अजिबात घेतले नाहीत, परंतु अन्य पदार्थ प्रमाणाबाहेर खाण्यानेही चरबी साठत जाते का? चर्बीतही 'चांगली चरबी' आणि 'वाईट चरबी' असे काही असते का?
७. 'सूज' मह्णजे नेमका काय पदार्थ असतो? सूज कश्यामुळे येते आणि कमी होते ? सूज अपायकारक असते की उपकारक ?
८. मांड्यांवर आणि नितंबांवर वगैरे 'सेल्युलाईट' जे जमा होते, ती चरबीच असते की आणखी काही? ते कमी करता येते का? कसे ?
९. जिला आयुर्वेदात 'आम' वा 'आव' म्हणतात तो पदार्थ शरीरात कसा निर्माण होतो, आणि कुठे कुठे साठतो? त्याचे परिणाम ?
लिहिता लिहीता बरेच प्रश्न सुचले. सवडीप्रमाणे शंकासमाधान करावे ही विनंती.

सुबोध खरे's picture

31 Oct 2015 - 10:33 am | सुबोध खरे

कृमी आणि जंतांच्या प्रादुर्भावामुळे आपल्या शरीराला अन्न आणी प्रथिनांची कमतरता जाणवते. तसेच ते रक्त शोषत असल्याने आणि त्यांच्या सूक्ष्म चाव्याच्या ठिकाणाहून बारीक बारीक रक्तस्त्राव होत असल्याने पंडुरोग(ANEMIA) होतो. याचा परिणाम सर्वात जास्त बालकांमध्ये होतो आणी ते कुपोषण आणी रोगाला पटकन बळी पडू शकतात. खेड्यात जेथे लोक उघड्यावर शौचास जातात तेथे त्यांच्या पायातून या कृमींच्या अळ्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे खेड्यातील गरीब बालके हि याचे सर्वात जास्त बळी आहेत. तेथे मुलांच्या पोटात अक्षरशः लक्षावधी जंत आणी कृमी आढळतात ज्यामुळे त्या मुलांना भूक लागत नाही खाल्लेले अन्न अंगी लागत नाही आणी कुपोषण होते.
कृमींच्या या अळ्या आपल्या फुप्फुसातून जात असताना खोकला होतो आणी अलर्जीचा त्रास होतो.
https://en.wikipedia.org/wiki/Hookworm_infection
https://en.wikipedia.org/wiki/Ascariasis
कृमी/ जंत यांच्यावर बेन्डेक्स किंवा तत्सम औषध घेतले तर ते सहज नष्ट होऊ शकतात. खेड्यात किंवा गरीब वस्तीत काम करताना आम्ही कोणत्याही कारणासाठी आलेल्या मुलांना एक बेन्डेक्स ची गोळी समोरच खायला देत असू. जितक्या जास्त मुलांना तुम्ही ते द्याल तितके (COMMUNITY LOAD OF WORMS) कमी होते. कारण हि मुले परत परत बाहेरच शौचास जातात आणी जंतांची अंडी किंवा अळ्य़ा शरीरात प्रवेश केल्याने प्रादुर्भाव होऊन येतात. जितक्या लोकांच्या पोटातील जंत तुम्ही नष्ट कराल तितली त्यांची पसरण थांबेल. डॉक्टर म्हणून तुम्ही त्यांना संडास उपलब्ध करू शकत नाही( ते काम सरकारचे आहे)पण निदान त्यांचे स्वतःचे जंत संसर्ग आणी समाजात त्यांनी पसरवण्याची शक्यता कमी करता येते.
कृमी/ जंत यांचा आणी मुळव्याध किंवा फिस्च्युला यांचा संबंध नाही.
मुळव्याध, फिशर आणी फिस्तूला (हे तिन्ही आजार एकदमच) आमच्या वडिलांना होते. ते शाल्यक्रीयेने बरे झाले आणी गेली ३२ वर्षे( १९८३ ते आता) त्यांना त्याचा काही त्रास नाही. उन्हाळा असो कि तिखट खाल्ले. (आता ८० व्या वर्षी ते तिखट फारसे खात नाहीत हे अलाहिदा)
आपले प्रश्न ६-९ यांची उत्तरे जरा सावकाशीने सविस्तरपणे देतो.

चित्रगुप्त's picture

4 Nov 2016 - 3:04 am | चित्रगुप्त

आपले प्रश्न ६-९ यांची उत्तरे जरा सावकाशीने सविस्तरपणे देतो.

डॉ. खरे साहेब, आज वर्षभरानंतर पुन्हा हा धागा वाचताना मी विचारलेल्या वरील शंकांचे समाधान होणे राहून गेले असल्याचे दिसले, तरी कृपया यबद्दल माहिती दिल्यास फार चांगले होईल.

चित्रगुप्त's picture

6 Nov 2015 - 2:11 am | चित्रगुप्त

डॉक्टर साहेब, कसे कुणास ठाऊक आपण माझ्या प्रश्नांची दिलेली उत्तरे नजरेतून निसटली. ती आत्ता वाचली. अनेक आभार. अन्य उत्तरांच्या प्रतिक्षेत.

तर्राट जोकर's picture

29 Oct 2015 - 10:03 am | तर्राट जोकर

खूप माहितीपूर्ण व चांगला प्रतिसाद! या प्रतिसादासाठी डॉक्टरसाहेबांना अनेक धन्यवाद!

शशिकांत ओक's picture

27 Oct 2015 - 8:15 pm | शशिकांत ओक
चित्रगुप्त's picture

27 Oct 2015 - 12:51 pm | चित्रगुप्त

व्वा ओक साहेब . निसंदिग्धपणे आम्ही प्रत्यक्ष भाग सुरु केले आहे म्हणणारे तुम्ही पहिले . शुभेच्छा , आणि पुढील प्रतिसादाच्या अपेक्षेत.

शशिकांत ओक's picture

27 Oct 2015 - 8:13 pm | शशिकांत ओक
शशिकांत ओक's picture

30 Oct 2015 - 12:18 am | शशिकांत ओक

मित्रांनो,
गीतोपदेश हितकारक मानतात. कर्मण्ये... मा फलेशू कदाचन वगैरे.
फळाची अपेक्षा न ठेवून काम करत रहा.
मी गेले ४ दिवसांसाठी फक्त फलाहारावर दिवस घालवतोय. गीतेचे ग्रंथ फडताळात सरकवून सामान्य भोजनाची आशा सोडून मिक्सर, जूसर आणि इतर भांडीकुंडी घासून साफसफाईचे काम करत वजन कमी करण्यासाठीची फलेच्छा बाळगून आहे...

चित्रगुप्त आणि सर्व रसिक मंडळी हो...

सामान्य भोजनाची आशा सोडून मिक्सर, जूसर आणि इतर भांडीकुंडी घासून साफसफाईचे काम करत, गीतेचे ग्रंथ फडताळात सरकवून, वजन कमी करण्यासाठीची फलेच्छा बाळगून आहे...म्हणणाऱ्या ओकांचा

दहा दिवसाची एकत्र रिपोर्ट ...
ओक आणि कंपनीच्या लोटपोट बाजारात उलथापालथ...
83.4 वरून वजन 4.4 किलोने खाली गडगडले...पोटातील प्राण्यांच्यात घबराट...

असे काही बाही कोठा समाचार पत्रातून भडक मथळ्यात आले होते म्हणे. त्यावर अनेक अनुभवी व जेष्ठ कृमींनी चर्चा करून असे कधी काळी होत असते. आपल्याला घाबरून जायचे कारण नाही. 8-10 दिवसांनी परिस्थिती पुन्हा मूळपदावर येईल असा पक्का अंदाज दिला म्हणतात... उगीच आपापली कौतुकपत्रे परत करायच्या नादी लागून नका असा पोक्त अनाहूत उपदेश ही दिला म्हणे...

त्यांची आज्ञा शिसावंद्य मानून ओकांनी जास्त वेळ त्यांची परिक्षा घ्यायची नाही असा विचार करून पुन्हा रसाहारावर नियंत्रण आणल्याचे वृत्त कोठा समाचारात प्रसिद्ध झाले आणि सर्वत्र पुन्हा आनंदी आनंदाचे वातावरण झाले....

चित्रगुप्त's picture

7 Nov 2015 - 1:29 pm | चित्रगुप्त

ओक साहेब, तुम्ही 10 दिवस रसाहार केलात हे वाचून आनंद झाला परंतु तुमचा हा रिपोर्ट गोंधळात टाकणारा आहे. ज्यांना हा प्रयोग करून बघायचा आहे त्यांना नेमके काय झाले, केले हे समजणार नाही . तरी ते नीट विशद केले पाहिजे . दिवसातून कितीदा, कसला कसला रस घेतला, कसकसा परिणाम होत गेला, आणखी काही खाल्ले की नाही वगैरे सर्व तपशीलवार लिहावे ही विनंती .

चित्रगुप्त's picture

7 Nov 2015 - 3:00 pm | चित्रगुप्त

ओक साहेब, तुम्ही 10 दिवस रसाहार केलात हे वाचून आनंद झाला परंतु तुमचा हा रिपोर्ट गोंधळात टाकणारा आहे. ज्यांना हा प्रयोग करून बघायचा आहे त्यांना नेमके काय झाले, केले हे समजणार नाही . तरी ते नीट विशद केले पाहिजे . दिवसातून कितीदा, कसला कसला रस घेतला, कसकसा परिणाम होत गेला, आणखी काही खाल्ले की नाही वगैरे सर्व तपशीलवार लिहावे ही विनंती .

की वेगवेगळ्या भाज्या फळे एकत्र करून जुस करायचा ?

चित्रगुप्त's picture

19 Oct 2015 - 10:20 am | चित्रगुप्त

जूस एकत्र करावा. दिवसभर जर जूसिंग करायचे असेल, तर एकेका रंगाच्या भाज्या-फळे घेऊन वेगवेगळे रस घेऊ शकता. यात अमूकच करावे, असा काही नियम नाही. आवडीनुसार वेगवेगळे प्रयोग करून बघावेत. रसात साखर मिसळू नये. कारली, मेथी, पालक, काकडी, दुधी भोपळा, वगैरेही घालू शकता.
निरनिराळ्या रंगांच्या भाज्या-फळात निरनिराळी पोषकद्रव्ये असतात. त्यांची शास्त्रीय नावे वगैरे किचकट माहिती मिळवण्यापेक्षा निरनिराळे रंग ओळखणे सोपे.

नाखु's picture

19 Oct 2015 - 9:58 am | नाखु

शतशः धन्यवाद.

सुहास पाटील's picture

19 Oct 2015 - 10:37 am | सुहास पाटील

जर हे सगळ इतका सोप आहे तर डॉक्टर लोक कश्याला उगाच सगळ्यांना शश्रक्रिये चा सल्ला देतात. हे सगळ्या डॉक्टर ना माहित नसेल?

सुबोध खरे's picture

19 Oct 2015 - 11:19 am | सुबोध खरे

रस-आहारावर वीस दिवस
दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले.
यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो
हे सांगण्यासाठी डॉक्टर कशाला लागतो?
एका गोळीत काम होणारा डॉक्टर त्यांना हवा असतो मग चिकन टिक्का, पनीर कबाब आणि मटण हंडी हाणायला बरे.
एक अतिविशाल महिला आहार तज्ञाकडे गेली. पूर्ण दिवसाचा आणी आठवड्याचा आहार त्याने लिहून दिला त्यावर तिने त्यांना विचारले डॉक्टर हा आहार तुम्ही लिहून दिला आहे तो जेवणाच्या अगोदर घ्यायचा कि जेवणानंतर?
आपली अशी परिस्थिती आहे.

मार्कस ऑरेलियस's picture

19 Oct 2015 - 10:51 am | मार्कस ऑरेलियस

वा वा वा !

मस्त अनुभवसिध्द माहीतीपुर्ण लेख !

अभिनंदन !

आम्हालाही आमचे वजन ७२ वरुन ६५ वर आणायचे आहे , पण मटन भाकरीचा अन ग्लेन्लिव्हेट चा मोह काही सुटत नाही तेव्हा तुर्तास होणे अवघड आहे :(

वजन कमी करायचा अट्टाहास कशाला?कमी वजन म्हणजे निरोगी असं कुठंय?

नया है वह's picture

19 Oct 2015 - 11:39 am | नया है वह

अभिनंदन ! Keep it up!

सुबोध खरे's picture

19 Oct 2015 - 11:44 am | सुबोध खरे

कमी वजन म्हणजे निरोगी हे चुकीचे आहे परंतु "प्रमाणात" वजन असणे म्हणजे निरोगी हे बरोबर.
आपल्या वय आणि उंचीप्रमाणे वजन प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्या टप्प्याच्या( range) पेक्षा कमी किंवा जास्त असू नये एवढेच.

वेल्लाभट's picture

19 Oct 2015 - 11:52 am | वेल्लाभट

एक्जॅक्टली.
वजन या आकड्याला आपण इतकं अनन्यसाधारण महत्व देऊन ठेवलंय, की त्याचे कारक, स्नायू, हाडं, बीएमआय, फॅट%, हे आणि इतर अनेक व्हायटल पॅरामिटर्स फाट्यावर मारले जातात. जे खरं तर क्रिटिकल आहे.

"वजन कमी करायचंय" इज अ व्हेरी राँग थॉट टू स्टार्ट विथ अ‍ॅट फर्स्ट प्लेस.

वेल्लाभट's picture

19 Oct 2015 - 11:57 am | वेल्लाभट

चित्रगुप्तसाहेब तुमचं कौतुक आहे

तुमचा अनुभव खूप प्रेरणादायी आहे. आणि डेडिकेशन घेण्यासारखं आहे. फक्त काळजी इतकीच घ्या की यू आर्न्ट लूजिंग युअर मसल मास व्हेन यू लूज वेट. कारण त्यातून इतर वेगळे धोके असतात. इथली डॉक्टर मंडळी सांगतीलच. पण ही शॉक डाएट्स, किंवा वेट लॉस डाएट्स जरा जपून करावी, माहिती घेऊन.

बाकी अनेक मुद्द्यांशी सहमत. सगळंच शक्य होत नसलं रोजच्या आयुष्यात तरीही निग्रह पक्का असेल तर होऊ शकतं.

बॉडी अँड सोल इज द ओनली अ‍ॅसेट यू रियली ओन. इन्व्हेस्ट इन वर्काउट अँड गुड हेल्दी डाएट, अँड रीप द डिव्हिडंड कॉल्ड फिटनेस.

तर्राट जोकर's picture

19 Oct 2015 - 11:58 am | तर्राट जोकर

माझे वय ३५ आहे, गेल्या १२ वर्षांपासून व्यायाम सुटला. पूर्वी बॉडीबिल्डर होतो. आता फुगलो आहे नुस्ता. बसून काम, आहार-व्यायामकडे दुर्लक्ष. आज उंची ५' ६" वजन ९५ किलो. लेखात वर्णन केलेली, "आता काही होऊ शकत नाही" या विचारापर्यंत आलो, पण एवढाही उशीर झाला नाही हेही कळते आहे. कुठलाही प्रकार सुरू केला की निरुत्साहामुळे जास्त दिवस टिकत नाही. वजन ६८ वर आणायचे आहे. यासाठी कसं प्लानिंग करावं यावर डॉक्टर्स व चित्रगुप्त मार्गदर्शन करतील का?

खटपट्या's picture

19 Oct 2015 - 12:27 pm | खटपट्या

आयुर्हीतांची खूप आठवण झाली.

तुषार काळभोर's picture

19 Oct 2015 - 12:59 pm | तुषार काळभोर

व्यनि करा.

अत्रन्गि पाउस's picture

19 Oct 2015 - 7:12 pm | अत्रन्गि पाउस

कसले सपाट पोट आणि कसले काय ...भम्पक पणा इथेच नाही तर परदेशात सुद्धा आहे ....स्वत:ची शी बघतात म्हणे ....कोणत्या lab मध्ये टेस्ट केली ...रिपोर्ट दाखवा ... ..वांग्याचा आणि काकडीचा रस पिऊन काहीही होत नाही .... काळसर्पाचा फोटो एडीट केलेला आहे ....पोटातून तंतुमय किडे कधीच निघत नाहीत ...डोम्बल ...
फ्रीडम फ्रॉम बोट्म च्या परवाच्या टोकियो परिषदेत शिन्कीबोका हेच हेच बोम्बलला ...
आमच्या पथी ची करा टवाळी आणि मग होऊ द्या ......

चित्रगुप्त's picture

19 Oct 2015 - 4:53 pm | चित्रगुप्त

@ तर्राट जोकरः अजिबात निराश होण्याचे कारण नाही, तुमच्याकडे अजून भरपूर वेळ्/आयुष्य आहे. माझे वय जास्त आणि मूळव्याधीसारखी समस्या असूनही अल्पावधीत त्यातून मुक्त होता आले, तस्मात हा उपाय रामबाण आहे, हे निश्चित.
वजन कमी करण्याबाबद एका वेळी फक्त ५ किलो कमी करण्याचे ध्येय ठेऊन सुरुवात करावी, असे वाटते. तेवढे साध्य झाले की दुसरा टप्पा काही दिवस सामान्य आहार घेतल्यानंतर परत सुरू घेऊन करता येईल. एका वेळी दहा-पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस जूसिंग करू नका. माझा मुलगा डॉक्टर असल्याने मी निश्चिंतपणे जास्त दिवस करू शकलो. व्यायामाबद्दल सांगायचे तर माझ्यामते एकदम जिम, वजने वगैरेंपेक्षा योगासने, ताई ची, सायकलिंग, आणि हलके व्यायाम ठीक रहातील. पोहणे शक्य असेल तर अतिउत्तम. संपर्कात रहा.

तर्राट जोकर's picture

19 Oct 2015 - 5:17 pm | तर्राट जोकर

धन्यवाद उत्तराबद्दल. ५ केजी अ टाइम ही टप्पा पद्धत योग्य राहील.

माझे झाले की वडिलांनाही सांगेन, त्यांनाही ३० वर्षे मूळव्याधीचा त्रास आहे.

चित्रगुप्त's picture

29 Oct 2015 - 1:56 am | चित्रगुप्त

तजो: तुम्ही जूसिंग वगैरे करालच, परंतु तुमच्या वडिलांना जर ३० वर्षांपासून मूळव्याध आहे, तर ताबडतोब त्यांना जूसिंग सुरू करवा. त्यांची नीट काळजी घ्या. या कामाला अग्रक्रम द्यावा, असे सांगावेसे वाटते.

वेल्लाभट's picture

19 Oct 2015 - 11:59 am | वेल्लाभट

बाकी ते, सर्प, किडे बिडे अगदी तंतोतंत खरं की जरासं एक्झॅगरेटेड? :) सहज विचारतोय. इट्स ऑफुली अमेझिंग. आय मीन मला असं झालं की... 'आर यू किडिंग मी?'

मार्कस ऑरेलियस's picture

19 Oct 2015 - 3:47 pm | मार्कस ऑरेलियस

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ...

मीही हेच विचारणार होतो ते किडे पाहुन वाटले ... चित्रगुप्त काका , अमेरिकेला जायच्या आधी चीन कंबोडिया व्हेयेतनाम वगैरे मधे जाऊन झुरंळं बिरळं खाउन् आले होते काय ? =))))

चित्रगुप्त's picture

19 Oct 2015 - 5:10 pm | चित्रगुप्त

वाचायला जरा घाण वाटेल, म्हणून मी लिहिले नव्हते, पण आता लिहीतो. पाच-सात दिवस जे जूसिंग करणार असतील त्यांनी विष्ठा कशी होते याचे परिक्षण करण्यासाठी अर्धी-पाऊण बादली पाणी घेऊन त्यात करावी. म्हणजे तरंगणार्‍या कृमी सहज दिसून येतील.
माझ्या लेखातील सर्व फोटो जालावरून घेतलेले आहेत. त्यातील कृमींसारखेच तंतुमय आकार होते.

याॅर्कर's picture

20 Oct 2015 - 2:26 pm | याॅर्कर

:-):-):-):-)

चित्रगुप्त's picture

19 Oct 2015 - 5:03 pm | चित्रगुप्त

@ वेल्लाभटः 'काळसर्प' हे नाव मी गमतीने पोटातून निघालेल्या घाणीला दिले. मात्र अक्षरशः हातभर लांब, काळ्या रबरासारखी गुंडाळी निघाली होती. अर्थात विसेक वर्षे मी फिस्टुलाचा रोगी आणि १-२ महिन्यांपासून मूळव्याध झालेली असल्याने माझ्या आतड्यात वर्षानुवर्षे साठलेली घाण होती, ती एकदम निघाली म्हणून असे दिसले. सर्वांच्याच पोटात एवढे असेल असे नाही. 'कोलोन प्ल्युकॉईड' असे गुगलले की अनेक फोटो मिळतील.
गेल्या वर्षी आणि पुन्हा या वर्षी वीस-पंचवीस दिवस मी जूसिंग केले. दोन्ही वेळी सुरुवातीचे काही दिवस तंतुमय आकार निघाले. जालावर हुडकल्यावर ते परजीवी कृमी असावेत, असा तर्क मी केला. लॅब मधे वगैरे त्यांचे परिक्षण केलेले नाही.

वेल्लाभट's picture

19 Oct 2015 - 5:07 pm | वेल्लाभट

आयला!
हे सॉलिड आहे. आय मीन.. स्केरी !
कमाल आहे तुमची सिरियसली. भारीच.
आणि इतका जुना विकार नाहीसा होतो म्हणजे कुछ तो बात है नक्कीच. सहीए बॉस.

जातवेद's picture

20 Oct 2015 - 12:18 pm | जातवेद

+१

वेल्लाभट's picture

19 Oct 2015 - 5:10 pm | वेल्लाभट

तेवढं, कोलोन प्ल्युकॉइड इंग्रजीत लिहा ना. शोधायला सोपं. स्पेलिंग.

चित्रगुप्त's picture

19 Oct 2015 - 5:19 pm | चित्रगुप्त

आश्चर्य आहे. पूर्वी colon plucoid असे गुगलले की बरेच फोटो येत होते, ते आज colon cleansing असे गुगलले की येत आहेत.

चित्रगुप्त's picture

19 Oct 2015 - 5:21 pm | चित्रगुप्त

त्याहीपेक्षा colon plaque असे गुगलल्याने जास्त फोटो दिसत आहेत.

सुबोध खरे's picture

19 Oct 2015 - 11:59 am | सुबोध खरे

वजन हे फक्त वय आणि उंची या मापात न धरता
बारीक बांधा
मध्यम बांधा आणि
मोठा बांधा
या प्रमाणे पण गृहीत धरले पाहिजे
पहा http://www.medindia.net/patients/calculators/height_weight_foradults.asp

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Oct 2015 - 6:49 am | कैलासवासी सोन्याबापु

डॉक साब,

शरीर प्रकारात
१ एक्टोमोर्फिक
२ एंडोमोर्फिक
३ एक्सऑमोर्फिक

अश्या तीन प्रकारच्या बॉडी फ्रेम्स असलेले ऐकले होते, ह्यावर अजुन प्रकाश टाकू शकाल काय?

चित्रगुप्त's picture

20 Oct 2015 - 7:11 am | चित्रगुप्त

.

चित्रगुप्त's picture

19 Oct 2015 - 12:08 pm | चित्रगुप्त

हा जो रसाहाराचा प्रयोग केला, त्यातून मूळव्याध, फिस्टुला वगैरे बरे होईल, पोटाचा घेर आणि वजन कमी होईल, अशी मला कल्पनाही नव्हती, त्यामुळे हे घडून आल्याचा अतिशय आनंद झाला. 'पोटातला काळसर्प' याची तर कल्पनाही केली नव्हती. आहारातील कॅलरी वगैरेंचाही विचार केला नव्हता. काहीतरी नवीन, वेगळे करून बघण्याची आवड आणि तयारी यातूनच पूर्वी विपश्यनेचा कोर्सही केला होता, तेंव्हा त्यातून अनेक वर्षांची पाठदुखी सुद्धा अशीच अनपेक्षितपणे कायमची बंद झाली होती.
माझे वजन ७५-७६ किलो झालेले होते (वय ६४, उंची ५'५") ते ७०-७१ झाले. जिना कष्टाने चढू शकत होतो, तो धावत सुद्धा चढू लागलो.
शरीरात 'फाजील' चरबी किती आहे, हे कळावे यासाठी काही खात्रीलायक पद्धत आहे का?

चित्रगुप्त's picture

19 Oct 2015 - 12:16 pm | चित्रगुप्त

बारीक बांधा - मध्यम बांधा - मोठा बांधा यालाच आयुर्वेदात 'वात - पित्त - कफ प्रकृती म्हणतात ना? 'काहीही मेहनत न करता' सुद्धा वात प्रकृतीच्या लोकांच्या जास्त कॅलरी खर्च होतात, पित्त वाल्यांच्या मध्यम आणि कफ वाल्यांच्या अगदी कमी असे ऐकले आहे.

माझ्या थोडया फार अभ्यासानुसार वात पित्त कफ हे मानवी शरीरात पुढील भूमिका बजावतातः
१) वात वियोग(dissociation), चलनवलन, हालवाली, चेतना, विघटन, उत्सर्जन यांच्याशी संबंधित आहे.
२) पित्त रुपांतरण(transformation), पचन, ऊर्जा, तेज, उष्णता, पोटातील अग्नि/भूक, यांच्याशी संबंधित आहे.
३) कफ संघटन(association), शीतलता, पौष्टिकता, वृद्धी, धारणा यांच्याशी संबंधित आहे.

शरीरातील सर्व क्रिया या ३ कॅटॅगरीत बसतात. उदा. एखाद्या लहान अर्भकात कफ हा स्वतःच्या असोसिएशन गुणाधर्मामुळे भराभरा पेशींची, हाडांची वाढ घडवून आणतो.
पित्त हा ग्रहण केलेल्या अन्नाचे पचन घडवून आणतो. शरीराला आवश्यक अशी ऊर्जा, तेज पुरवतो.
तर वात हा शारीरिक हालचाली, स्नायूंच्या ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया, खेळणे इ. क्रियांना मदत करतो.

बाकी तज्ञ मंडळीच सांगू शकतील. मिपावर आनंदा हा आयडी बहुतेक आयुर्वैदिक वैद्य आहेत, असे आठवते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Oct 2015 - 12:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

चित्रगुप्तसाहेब, खूप दिवस वाट पाहयला लावल्यानंतर पाताळेश्वर कट्ट्यांत सांगितलेला कालसर्पवियोगलेख आला... आणि तोही तुमच्या खास शैलीत आणि यथार्थ सुंदर चित्रांसहित !

आता परत एकदा मिपाकट्टाज्यूसभक्षण करायला पुण्यात लवकरच या ! :)

सुबोध खरे's picture

19 Oct 2015 - 12:18 pm | सुबोध खरे

आमच्या कंपनीचे डॅाक्टरांनी नोकरीच्यावेळी
मेडिकल टेस्ट करतांना-
१) एक रबरी हातोडीने गुडघ्यांवर ( तिथे मेंदू असतो असं मेडीकल शास्त्रतरी मानत नसावेत ) आणि ढोपरांवर ठोकून पाहिले,
२) स्टेथो• ने छातीचे ठोके मोजले,
दीर्घ श्वास घेण्यास सांगून मोजले,
जागेवरच दोन मिनीटे उड्या मारायला सांगून त्यानंतर मोजले,
३) छातीचं माप श्वास घेण्याअगोदर व नंतर मोजले.
४) वजन घेतले.
५) खोकायला सांगुन पोटाखालचे रिफ्लेक्स पाहिले,
६) आणि( काही लैंगिक रोग वगैरे).

ओके म्हणाल्यावर मी त्यांना विचारले बास इतक्या टेस्ट पुरेशा असतात?
" होय यातून बरेच कळते."

गावातले शेतकरी दहा किलो+ चा नांगर तीन चार किमी खांद्यावर नेतात तो पाहून वाटते असेल यांचे वजन नव्वद किलो तर काय बिघडते?

पिलीयन रायडर's picture

19 Oct 2015 - 12:27 pm | पिलीयन रायडर

काका अभिनंदन!!

फळांचे ज्युस पिणे चांगले की डायरेक्ट फळच? आणि कच्च्या भाज्या पोटात जाताना अनेक जण असेही म्हणतात की न शिजवल्याने त्याचाही त्रास होऊ शकतो. हे कितपत खरे आहे?

बॅटमॅन's picture

19 Oct 2015 - 12:30 pm | बॅटमॅन

चित्रगुप्तकाका, लेख अतिशय आवडला. सध्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे, सबब नक्कीच मददगार साबित होगा ये लेख. अनेक धन्यवाद!!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Oct 2015 - 5:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कमी झालास तर गायब होशिल रे आता बॅट्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Oct 2015 - 7:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

बॅट्याला वजन कमी करायला कोणी सांगितले ???!!!... बहुतेक आंतरजालावर सापडलेला तज्ञ असावा ;)

मात्र, बैठ्या कामाच्या स्वरूपामुळे रोज अर्धा ते पाऊण तास तरी घाम येऊन नाडीचे ठोके १२० पर्यंत वाढतील इतपत व्यायाम करायला पाहिजे.

नाखु's picture

20 Oct 2015 - 9:35 am | नाखु

कुणाच्या तरी नजरेत "मावत" नसावा किंवा

भरला

असावा म्हणून हे वजन कमी करण्याचे त्याच्या डोक्यात आले आहे असे आमचा मिपा नगरीचा वार्ताहर कळवतो.

दैनीक सध्या आनंद तर्फे कट्टेकर्यांच्या माहीती करता प्रसारीत.

बॅटमॅन's picture

20 Oct 2015 - 12:27 pm | बॅटमॅन

दिसत नसले तरी वजन बरेच आहे ओ. ७२ पासून ६५ पर्यंत आणायचे आहे. अगोदर ७५ होते ते आता हळू हळू व्यायामाने ७२ पर्यंत आणलेय.

मार्कस ऑरेलियस's picture

20 Oct 2015 - 2:20 pm | मार्कस ऑरेलियस

७२ पासून ६५ पर्यंत आणायचे आहे

चला किमान एका गोष्टीवर तरी एकमत आहे आपले =))

http://www.misalpav.com/comment/757884#comment-757884

बॅट्या लेका तुला गरज नाही बे कमी करायची.
मलाच ३ किलो तरी कमी करावे असे वाटू लागलेय.
सध्यातरी वन्डे ज्युसडे करायला काहि हरकत नाही. नंतर टेस्ट खेळून पाहावी.

नाय बे अभ्या, गरज नक्कीच आहे. नुसते बघून कळत नाय पण तीनचार महिन्यांचे पाप (या शब्दप्रयोगासाठी पोपशास्त्री यांचे पोरगीपटाव शास्त्र पहावे.) तरी नक्कीच आहे त्याचे परिमार्जन करण्याची नितांत गरज आहे. =))

तूही लाग कामाला. वजन कमी केल्यावर खास सपाटपोटप्रीत्यर्थ ज्यूसकट्टा करू.

बॅटमॅन's picture

20 Oct 2015 - 2:38 pm | बॅटमॅन

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =))

जोक्स अपार्ट, मोबिलिटी वाढवणे हे परम आवश्यक आहे.

मार्कस ऑरेलियस's picture

20 Oct 2015 - 2:49 pm | मार्कस ऑरेलियस

अनुमोदन . फक्त मोबिलीटीच नव्हे तर strength stamina speed agility चारही पाहिजे !

कोणताही ट्रेक करताना आता मला जे साठवलेले ६-८ किलो एक्स्ट्रा फॅट आहे ते जाणवते राव .

बॅटमॅन's picture

20 Oct 2015 - 2:57 pm | बॅटमॅन

आम्!

अन साठवलेले फॅट जाणवते हे बाकी खरेच!!!! :( इन्शामारुती, हे होईलच.

आयडियली पाहता खांद्यावर ९-१० किलो वजनाची सॅक घेऊन राजगडसारखा ट्रेक तसा बर्‍यापैकी सहजपणे करता आला पाहिजे.

ही अपेक्षा तशी बरीच जास्त आहे सद्यस्थितीकडे पाहता, पण असे काही लक्ष्य समोर ठेवले तर थोडे थोडे करत करत सुधारणा होईल असे वाटते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Oct 2015 - 4:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पेशन्स लॅडी पेशन्स.

बॅटमॅन's picture

20 Oct 2015 - 6:17 pm | बॅटमॅन

आय आय क्याप्टन!

धर्मराजमुटके's picture

19 Oct 2015 - 12:30 pm | धर्मराजमुटके

चांगला लेख !
मात्र याबरोबरच शादी के पहले आणि शादी के बाद चा फोटो ( आय मीन सुरुवातीचा फोटो आणि प्रयोगानंतरचा फोटो) टाकला असता तर आमच्यासारख्यांना जरा जास्त प्रेरणा मिळाली असती !

चित्रगुप्त's picture

20 Oct 2015 - 12:03 pm | चित्रगुप्त

पहले और बाद चे फोटो द्यायचे आहेत, पण अद्याप कंबरेचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही (३८ वरुन ३३ वर आली, पण २८-३० वर यायची इच्छा आहे) शिवाय ते सिक्स अ‍ॅब वगैरे जमले तर उत्तमच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Oct 2015 - 12:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

हायला, सिक्स प्याक अ‍ॅब ! शर्ट काडून पिच्चर-बिच्चर मदे काम करायच इचार हाय काय, भाय ?! ;) :)

dadadarekar's picture

19 Oct 2015 - 12:37 pm | dadadarekar

आजपासून सुरु केले.

दोन काकडी , दोन गाजर , एक सफरचंद , दोन संत्री , थोडी मेथी व चार टोम्याटो.

मिस्करातून फिरवून थोडे पाणी घातले.

अर्धा लिटर लिक्विड तयार झाले.

यात पाणी घातले तर चालते ना ? साखर मीठ घातले नाही. चोथा गाळला नव्हता. चोथ्यासकटच प्यालो. सोबत लिंबू सरबत.

संध्याकाळी थोडे दूध , दही , के ळी व खजूर ज्युस करायचा आहे.

बाकी कच्चे होते.

न शिजवलेल्या भाज्या-फळे हे पचायला कठीण (त्यामुळे अयोग्य), आणी शिजवल्याने त्यातले व्हिटॅमिन वगैरे नष्ट होतात, या दोन्हीवरचा एकत्रित उपाय म्हणजे जूस. नुस्ती कच्ची फळे खाल्ल्यास त्यांचा चोथा शरीराबाहेर टाकायला पचन-संस्थेला एक-दोन दिवस काम करावे लागते, त्यामुळे आतड्यात वर्षानुवर्षे साचलेली घाण बाहेर काढायला मोकळीक मिळत नाही. जूसरद्वारे चोथा आधीच काढून टाकून आपण फक्त पाणी आणि पोषकद्रव्ये घेत असल्याने ते काम सहजपणे केले जाते. शिवाय आतड्यातील परजीवी जंतु (parasites) हे मुख्यतः शर्करा आणि starch वर जगत असतात, त्यांच्या अभावी ते मरून बाहेर पडतात, परिणामी भूक कमी लागू लागते, गोड, मैद्याचे पदार्थ वगैरे खाण्याची इच्छा मावळते.
Gluten युक्त धान्ये विशेषतः गहू (मैदा, कणीक इ. चे पदार्थ) पचणे (पोटात विघटित होणे) कठीण असल्याने ते शरिरात हानिकारक द्रव्ये निर्माण करत असतात. त्या ऐवजी ज्वार, बाजरी इ. ची भाकरी वा अठरा धान्याची भाजणी खाणे उत्तम. खरेतर दुग्धजन्य पदार्थ (दूध, खवा, मिठाया) पण कमी करणे बरे.
मी लेखाच्या शेवटी दिलेला तूनळीवरील 'Fat, Sick and Nearly Dead' हा व्हिडियो अवश्य बघावा.

dadadarekar's picture

19 Oct 2015 - 1:04 pm | dadadarekar

आगोबै , मी जुसर नसल्याने मिस्करातून फिरवुन चोथ्यासकट प्यालो.

ताकातील पालक वगैरेही वापरता येइइल.

मांत्रिक's picture

19 Oct 2015 - 1:18 pm | मांत्रिक

आगोबै , मी जुसर नसल्याने मिस्करातून फिरवुन चोथ्यासकट प्यालो.
दादूस काय चाललंय काय? एकतर आगोबैनं सुरुवात! मग जुसर हा प्रेमळ उच्चार. मग मिश्किल मिस्कर?
चोथ्यासकट कसे प्यालात? चोथा एकतर गिळावा लागणारच किंवा चावावा तरी लागणार?

वर फोटोत दिले आहे तसे.

पिलीयन रायडर's picture

19 Oct 2015 - 1:11 pm | पिलीयन रायडर

चोथा चांगला असतो ना शरीराला? पोट साफ होण्यासाठी फायबरयुक्त आहार असावा असे बर्‍याच ठिकाणी वाचले आहे. की हे असे फक्त डाएट पुरते (शरीरशुद्धी पुरतेच..) करायचे असुन नंतर रोजचाच आहार घ्यायचा आहे?

अजुन काही शंका,
-मी नोकरी करते, शिवाय मुलामागेही धावपळ खुप होते. अशा वेळी हे सलग २०-२५ दिवस ज्युसवर रहाणे शक्य होणार नाही बहुदा. वीकांताला हे प्रयोग केले तर मदत होईल का?

-मध्यंतरी शंखप्रक्षालनासंबंधी पण वाचले होते ज्यात काही विशिष्ट व्यायाम आणि पाणी पिणे ह्याची सांगड घालुन १८-२० ग्लास पाणी पिऊन पोट साफ केले जाते. ह्या क्रियेतही आतडे साफ होत असतील ना? पण तेव्हा असा "काळसर्प" बाहेर पडल्याचे कधी ऐकले नाही. किंवा पंचक्र्मातही बहुदा विरेचनात पोट साफ होते तेव्हाही असे काही बाहेर पडल्याचे ऐकले नाही. ह्या मागे काय करण असु शकेल?

प्यारे१'s picture

19 Oct 2015 - 1:38 pm | प्यारे१

>>> मी नोकरी करते, शिवाय मुलामागेही धावपळ खुप होते. अशा वेळी हे सलग २०-२५ दिवस ज्युसवर रहाणे शक्य होणार नाही बहुदा.

रात्री पाच सात बदाम भिजवून सकाळी सालं काढून खाणे. मस्त एनर्जी टिकते. याबरोबर सुका मेवा कमी क्वांटम मध्ये जास्त एनर्जी देतोच.
बाकि ज्युस पेक्षा कच्ची फळं जास्त खाणं उत्तम. ज्युस बनवल्यास साखर अजिबात नको.

डॉक्टरांना प्रश्न - कार्ब्स काही दिवस पूर्ण बंद केले तर काय होईल?

चित्रगुप्त's picture

19 Oct 2015 - 1:59 pm | चित्रगुप्त

बाकि ज्युस पेक्षा कच्ची फळं जास्त खाणं उत्तम.

हे एरवी, म्हणजे जेंव्हा आपण पोळी, भात वगैरे आहार घेत असतो, तेंव्हा ठीक, परंतु शरीर-शुद्धीसाठी रसाहार घ्यायच्या दिवसात ते योग्य नाही, याचे कारण मी एका प्रतिसादात दिलेच आहे. समजा, एक टोपलीभर भाज्या-फळे आपण घेतली तर ती सर्व कच्ची एका दिवसात आपण खाऊ शकत नाही, आणि खाणेही योग्य नाही, मात्र त्यांचा रस सुमारे तीन-चार ग्लास निघेल, तो मात्र आपण सहज पिऊ शकतो, त्यातून सर्व पोषक द्रव्ये आपल्याला मिळतातच, परंतु चोथा बाहेर टाकून देण्याच्या कामात पचनसंस्था गुंतून रहात नाही, परिणामी जुनी साचलेली घाण काढणे शक्य होते.

प्यारे१'s picture

19 Oct 2015 - 2:02 pm | प्यारे१

ओह ओके.

इतर काहीच न खाल्ल्याने तो काळपट संडास तयार झाला आहे. त्यात आधीची घाण व फळभाज्यातील रंगद्रव्ये दोन्ही असणार.

त्यामुळे कच्ची फळे व भाज्या खाव्या लागतील.

सकाळी मिक्स जुस

दूपारी फळे व भाज्या.

रात्री फ्रुट जुस दही घालून ( पंचामृत टाइप) थोडेसे दूध घालावे लागेल. त्यातून क्यालशियम व विट डी मिळेल. ते भाज्या / फळात नसते.

यात मोड आलेले गहू , कडधान्ये घेता येतील का ?
...

आमची एक एच आय व्ही पेशंट रोज कोर्फड गर , मोड आलेले गहू व कडधानुये खाते.. औषधेही आहेत. तीची तब्येत अगदी निरोगी आहे.