खुशबू (भाग १८)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
16 Mar 2015 - 7:03 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८| भाग ९| भाग १०| भाग ११| भाग १२
भाग १३ | भाग १४ | भाग १५| भाग १६| भाग १७

रियाध… रंगरूप अरब शहराचं असतं तसंच, शहरभर विविध भागांना जोडणारे प्रशस्त रस्ते, त्यावरून अखंड चालणारी एसी गाड्यांची वर्दळ, रस्त्यांच्या कडेने खाजुरांची सरळ झाडे , मुख्यशहरात एकमेकांना खेटून असलेल्या, सरळसोट चौकोनी उभ्या इमारती, सगळ्याच एअर कंडीशंड, त्यांच्यामधून डोकावत आकाशाकडे झेपावणार्या मशिदींचे शिडशिडीत मिनार, मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे त्यांच्यावरचं नक्षीकाम, व त्यांच्या खड्या पहाऱ्यात वसलेले मशिदींचे ठसठशित घेरदार घुमट, निरभ्र निळं आकाश त्यात माथ्यावर आग ओतणारा सूर्य, सूक्ष्म रेतीयुक्त धुळीने माखलेला आसमंत, संपूर्ण शहराला हलक्या तपकिरी रंगात न्हाऊ घालत होता. त्यातल्या ऐका इमारतीत आपल्या कार्यालयीन दालनात बसला होता, सौद राजकुलातील क्रं १७ वा प्रिन्स, अख्हमद बिन खालेद अल सौद, अल सौद म्हणजे, सौद कुळातला, आणि ते कुळ म्हणजे त्याला मिळालेले खिताब, हादीम-अलहर्मन-अस्ससरिफ़यन म्हणजेच, मुस्लिमजगतातील अत्यंत महत्वाच्या मक्का आणि मदिना येथील, 'अल-मस्जिद-अल-हर्म' आणि 'अल-मस्जिद-अल-नबावी' या दोन मस्जिदींचे प्रतिपालक, घराणे. असा हा अख्हमद बिन खालेद ज्या कार्यालाच्या मुख्य खुर्चीवर बसला होता त्या कार्यालयाचे नाव होते 'अल माबाहेथ अल अम्मह' म्हणजेच 'माबाहेथ', माबाहेथ चा सरळसोट इंग्रजी अर्थ होता जनरल इन्वेस्टीगेशन डीरेक्टोरेट GID, सौदींचे सिक्रेट पोलिस.
आज त्याच्या आलिशान वातानुकुलीत, पायाखाली नक्षीदार विविध काश्मिरी तुर्की उंची गालिचे अंथरलेल्या, छताला चकाकणारी झुंबरांच्या थाटामाटात आणि खानदानी अत्तरांच्या घमघमाटात, कार्यालयीन आगंतुक सभागृहात, एक व्यक्ती त्याच्या भेटीची वाट पाहत बसले होती. ते होते सौदी अरेबियातील भारताचे राजदूत डॉ साजिद हमीद. कारण काल माबाहेथच्या सैनिकांनी रियाध येथील ऐका ठिकाणाहून लियाक़त अली या पाकिस्तानी पासपोर्टधारकाला चौकशीसाठी अटक केली होती, चौकशीच कारण होतं की लियाक़त अली, फळांच्या बिसनेसनिम्मित सौदीत दाखल झाला होता परंतु गेल्या कित्येक दिवसात त्याने काहीच त्या व्यवसायाशी निगडीत काहीचं काम केलं नव्हत, बहुंतांश वेळा तो दक्षिण आशियायी कामगार वर्गात जिहाद विषयी बोलताना आढळला होता. अर्थात हे सांगायचं अधिकृत कारण होत, त्याला अटक, ही वरून आलेल्या हुकुमावरून झाली होती. सध्या त्याला रियाध येथील उलाइशा तुरंगात टाकलं होत.
-----------------------------------------------------------------------
नोबेल हॉस्पिटलमधे तज्ञ डॉक्टरांच्या खोल्यापासून साधारण १० पावलांवर असलेल्या कॉउन्टरवरचा कॅशीअर नायरला जिन्यातून वरच्यामजल्यावर येईपर्यंत धाप लागली होती, समोरच्याच वर्हांड्यात तो शोधत असलेली व्यक्ती दिसताच त्यानं चालण्याचा वेग वाढवायचा प्रयत्न करून पाहिला, पण ते शक्य नाही हे पाहून, त्याने तिथूनच हाक मारायला सुरुवात केली, सर … सर …. डॉ . कुंभारे, त्याची हाक ऐकून पँथोलॉजी विभागाचे डॉ . कुंभारे थांबले, त्यांनी विचारलं 'काय आहे रे ?, बोल पटकन, मी जर घाईत आहे', नवीनच रुजू झालेला नायर, वरिष्ठ डॉ च्या व्यक्तिमत्वामुळे थोडासा दबला … पण रेकॉर्ड्स वौचर फॉर्म्स फायली हेच त्याचं रोजी रोटी होतं, सगळ धैर्य एकवटून तो म्हणाला 'डॉ या बायोप्सी फॉर्मवर तुमच्या सह्या हव्या होत्या, मगाशी प्रती संपल्या होत्या म्हणून झेरॉक्सला पाठवल्या होत्या, त्यामुळ मागच्या पेशंटच्या फाइलमधे लावायच्या राहिल्या होत्या', डॉ नी त्याच्या हातातले फॉर्म व बॉलपेन घेतले, जवळच्याच भिंतीवर फॉर्म डाव्या हाताच्या मनगट ते कोपरा या दरम्यानच्या भागाने दाबून धरून, उजव्या हातातील पेनने सही केली. 'कुठल्या पेशंटचे आहे रे ?',
'मगा ती मुलगी, त्या म्हातार्या बाईला घेऊन आलेली नं ? ' … नायर
'ए शहाण्या, पेशंटच नाव काय ? या फॉर्ममधे देखील रीकामा ठेवला आहे रकाना ? '…. डॉ
'अं …फरीदा अत्तारी …असाव …. ' …. नायर आठवून उत्तरला …
डॉ कुंभारेनी आत्ताच, लोकल अनेस्थेशिया देऊन, पेशंटची फाईन नीडल बायोप्सी केली होती, ते स्याम्पाल मुंबईला टाटा इन्स्टीट्युटला पॉसिबल कॅन्सर तपासणीसाठी पाठवणार होते…

-----------------------------------------------------------------------

कितीही मन स्थिर ठेवायचं म्हटलं तरी, सौदी अरेबियातील भारताचे राजदूत डॉ साजिद हमीद किंचितसे टेन्स झाले होते, तेरवा सकाळी त्यांना परत प्रिन्स अख्हमद बिन खालेदची भेट घेऊन भारताच्या बाजूने दुसर्यांदा केस रीप्रेसेंट करायची होती, सगळे पॉंइंट्स पिंजून काढले होते, पाकिस्तानी दूताची उद्याची पोसिशन काय असेल, तो कसा तंगड आडवं घालू शकतो, त्या करता तेरवा आपण कोणते पॉंइंट्स मांडायचे आहेत वै वै …
थोडक्यात काय तर पाकिस्तानी दूताने एकच गुर्हाळ लावलं होतं, 'तो' पाकिस्तानी नागरिक आहे, त्याचाकडे वैध पाकिस्तानी पासपोर्ट आहे, म्हणून यजमान देशामधे त्याच्या हातून कोणताहि प्रमाद घडला असेल आणि यजमान देशाने त्याला डीपोर्ट करायचं ठरवलं असेल तर त्यांनी त्याला त्याची 'कंट्री ऑफ ओरिजिन' म्हणजेच पाकिस्तानकडे सुपूर्त करावं ….
भारतातर्फे डॉ साजिद हमीद यांनी त्याचे वॉईस स्याम्पलस, तरुणपणाच्या फोटोवरून सुपरइम्पोज केलेले फोटो व त्याचा सध्याचा फोटो यांच्यातलं कमालीच साम्य, त्याचा जन्माचा गुजरातमधील नगरपालिकेचा दाखला, गुजरात बोर्डाच १० वी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला, डिप्लोमाच फोटोसहीत सर्टीफिकेट, म्यजीस्त्रेट अटक वॉंरंट वैगरे टेक्नीकल कागदपत्राचा भेंडोळी दाखल केली होती….
परंतु प्रिन्सच्या मते भारत व पाकिस्तानतर्फे सादर केलेल्या गोष्टी नेक-टू-नेक म्हणजेच बरोबरीच्या होत्या, म्हणून जर येत्या महिन्यात भारतातर्फे आणखी काही सक्षम पुरावा मिळाला नाही तर, डीफॉल्ट म्हणून त्याला पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात येईल…

-----------------------------------------------------------------------

त्या दिवशी फारीदाची बायोप्सी झाल्यावर खुशबू तिला आपल्या बरोबर रिक्षातून घेऊन गेली होती, तिला सांगितलं कि तुझं स्याम्पल डॉ नी मुंबईला तपासायला पाठवलं आहे, पण तिकडे कामाचा आधीच प्रचंड ताण असल्यामुळे, कदाचित त्याचा रिसल्ट येई पर्यंत एक दीड महिना लागेल, तुझ स्याम्पल १-२ आठवडे तरी तिथल्या फ्रीजमधे वाट पाहत थांबलेलं असेल… आज फारीदाने आग्रह केला की तिला एकदा मीराबाबाच्या दर्ग्यावर जाउन आल्यावर बर वाटेल, खुशबू जरा कामात व्यापलेली होती, पण चाचीला तिने १०० रु च्या दोन नोटा काढून दिल्या, ती म्हणाली 'चाची तू रिक्षाने जा व ये'…
फारीदाने विचार केला, शहरापर्यंत सिक्स सीटरने जाऊ, तिथून रिक्षाने जाऊ, संध्याकाळी परत येवू…नाहीतरी मला म्हातारीला दिवसभर काय काम आहे…

संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वी, खुशबू इंटरनेटवरील ब्युरोवरच्या लेटेस्ट न्यूज वाचत होती, त्यातल्या ऐका बातमीने तीच लक्ष वेधलं, कारण ती बातमी तिच्या घराजवळची होती….
"पुणे-नगर महामार्गावरील सिक्ससीटरच्या बी आर टी मार्गात अपघातामुळे कलंडल्यावर बारीक स्फोटा सारख्या आवाजानंतर इंजिनमधून अचानक धुराचे लोट येऊ लागले आणि क्षणार्धात आगीचा भडका उडून सिक्ससीटर जळून खाक झाली. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद येरवडा पोलिस ठाण्यात झाली आहे. गाडीने पेट घेतल्यानंतर नागरिकांनी अग्निशामक दलाला बोलावले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर कर्मचा-यांनी भडकलेली आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आगीमुळे त्यातल्या वाहक आणि एक प्रवासी यांची राखरांगोळी झाली होती. अपघातात संपूर्ण गाडी क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे त्यांना पळून जायची संधी मिळाली नसावी. पोलिसांनी पंचनामा केला. प्रत्येक वाहनामध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविण्याची सक्ती असावी, अशी प्रतिक्रिया घटनास्थळी होती. "

खुशबू ऑफिसवरून घरी आली, त्यारात्री फरीदा चाची अजूनही आलेली नव्हती, म्हणून तिची अम्मी काळजीत होती, सकाळीच तिने फरीदाला सिक्ससीटरच्या स्टान्डवर, सिक्ससीटरमधे बसवून आली होती, ती सिक्ससीटर, फातिमाच्या चांगलीच लक्षात राहिली होती, कारण तिच्या मागे, पितळेच्या पंख फैलावून उभ्या असलेल्या परीच्या शिल्पाचा लोगो, इंजिनाच्या दरवाज्यावर शौकीन ड्रायवरने वेल्ड केलेलं होतं….

-----------------------------------------------------------------------

आजच्या मिटिंगनंतर डॉ साजिद हमीद थोडेशे खुश होते, त्यांनी आज पाकिस्तानचे सर्व मुद्दे यशस्वीरीत्या परतवले होते, एवढच नाही, तर त्यांनी आज प्रिन्ससमोर पाकिस्तानच्या नेहेले पे भारताचा देहेला टाकला होता, 'जबिउद्दिन अत्तारीची आई सध्या पुण्यात राहते आहे ', असं चर्चेदरम्यान, भारतीय सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या फाइलमधे वाचल्याचं, त्यांना आठवलं, तेव्हाचं त्यांनी हुकुमी पत्ता टाकला, 'जबिउद्दिन अत्तारी भारतीय नागरिक असल्याच ते सिद्ध करणार होते … कशाच्या बळावर … सोप्पय… त्याचा आईची डी एन ए प्रोफाईल, सौदिना द्यायची, म्हणायचं, करा तुम्ही कॅम्पेअर, तुमच्या ताब्यातल्या वाक्तीच्या डी एन ए प्रोफाईल बरोबर …… '

वाङ्मयकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मास्टरमाईन्ड's picture

16 Mar 2015 - 8:31 pm | मास्टरमाईन्ड

लवकर येऊ द्या पुढचे भाग

एस's picture

16 Mar 2015 - 8:34 pm | एस

वाचतो आहे. कथा आता उत्सुकतेच्या वळणावर पोहोचली आहे.

सामान्य वाचक's picture

16 Mar 2015 - 9:54 pm | सामान्य वाचक

फार छान चालली आहे कथा

प्रीत-मोहर's picture

17 Mar 2015 - 1:55 pm | प्रीत-मोहर

मस्त चाल्लीये कथा!!

बोका-ए-आझम's picture

17 Mar 2015 - 2:50 pm | बोका-ए-आझम

एकदम उत्कंठा वाढलेली आहे!