खुशबू (भाग १२)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
4 Mar 2015 - 5:36 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ | भाग ८| भाग ९| भाग १०| भाग ११

"होणार होणार म्हणून कधी गाजत असलेला तर कधी कुजबुजत असलेला केन्द्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तार आणि खातेबदलाचा बहुप्रतीक्षित सोहळा या आठवड्यात, किंबहुना आज-उद्यालाच, पार पडेल अशी चिन्हे आहेत. पंतप्रधानांनी मागच्या वेळी आपण संसदेच्या अर्थ-संकल्पीय सत्रानंतर मंत्रिमंडळात व्यापक फेरबदल करणार असल्याचे सांगितले होते. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या दहशतवादी कारवायांमुळे केवळ सरकारच्या अडचणीच वाढलेल्या नाहीत तर पंतप्रधानांच्या कर्तबगारीवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. विरोधीपक्ष त्यांचा 'आत्तापर्यंतचा सर्वात कमजोर पंतप्रधान ' म्हणून हिणवण्याची संधी सोडत नाही आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि काही प्रमाणात खातेबदल करवून सरकारची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न होत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री बाळासाहेब थोरवे यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री विजय देशमुख यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.बाळासाहेब थोरवे यांची केंद्रात गृहमंत्री पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. सकाळी झालेल्या पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या "बदली'नंतर मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नावे पुढे येत होती; पण, राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय देशमुख यांनी यामध्ये बाजी मारली. विधिमंडळाच्या त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेतील आघाडीतील घटक पक्षांमधील दिलजमाई करण्याचं "कसब", त्यांच्या या नेमणूकीमागे मुख्य कारण आहे, असे आमचे राजकीय विश्लेषक सांगतात." …………एवढी बातमी उर्दूमधे ड्राफ्ट करून खुशाबुने आपला टी ब्रेक घेतला.

-------------------------------------------

'प्रोटोकॉल अहिल्या' इनीशिऐट करण ही एक प्रीकॉशन होती, आणी आपल्या व्यावसायिक स्वभावानुसार एक पाऊल पुढे टाकतांना मागचं पाऊल सुरक्षित असल्याची खात्री झाल्याशिवाय पुढे जाणं मला आवडतही नव्हतं.… हेमंत कोकरे स्वतःशीच बोलत होते. प्रा. सानेनी सांगितलं की आता सर्व सिस्टीम सुरक्षित आहे… तरीही राहून राहून मनात विचार येतोच की किती माहिती शत्रूपर्यंत गेली असेल. त्या आठवडाभर सर्व काही फ्रीज होत पण आता आपण 'प्रोटोकॉल अहिल्या' विद्रॉव करून महिना झाला … इंटरसेप्टेड सर्वेलंसमधे अबू-फैसल कुठेच आढळून येत नाही…. भारतातून कॉल जाताहेत पण अबू-फैसल कुठेच नाही … हा एकदम हवेत विरघळून कुठे गेला ?…. मोठ्या मुश्किलीने इथवर पोहोचलो होतो…. माग थंड झाला कि परत पकडण अती मुश्किल …ड्याम इट… मला वाटतंय मायबाप केंद्राची अजून मदत घ्यावी लागेल…

-------------------------------------------

मेजर इक़्बाल अजूनही त्याची सिगारेट दोन बोटांत ठेवून विचार करत होता… भारतीय सुरक्षायंत्रणेन त्याचा 'मोल' पकडला होता… त्यांना अबू-फैसल हे नाव ही माहिती झालं होत… आपल्याला फक्त काही समरी रिपोर्ट मिळाले होते त्याच्यामदतीने आपण हा तर्क केला ……तशी बाकीच काहीच माहिती मोलकडून मिळाली नाही आपल्याला, आत्तापर्यंत भारतीय सुरक्षायंत्रणेला संपूर्णपणे कळल असेल का अबू फैसल कोण आहे ते ?…. जर कळल तर ते पाकिस्तानवर परत आंतरराष्ट्रीय प्रेशर आणायला सुरवात करतील …. त्याआधीच आपण अबू-फैसलला सौदीला हलवलं … ते बर केलं …जा म्हणावं तिथं तुझ्यासारख्या भारतीय वंशाच्या मुसलमान कामगारांना जिहादच महत्व पटवून दे …. गुजरातच्या फिल्म्स दाखव……आपल्याला तुझ्या सारखे आणखी अबू भारतात तयार करायचे आहे.…

--------------------------------------------
पंतप्रधान म्हणजे पब्लिकला वाटत तसं जोरकस बोलणारा, सॉलिड असा वागणारा, वेगाने निर्णय घेऊन कृती करणारा अस दिसलं म्हणजे खरा पंतप्रधान …. अर्थतज्ञ पंतप्रधान डॉ योगेंद्र यादव म्हणजे याच्या एकदम विपरीत… अत्यंत शांत, संथ, संयमी आवाजात, कुठेही आक्रस्ताळेपणा न करणारं, बाह्य करणी कधीही जोरकस, सॉलिड असे न वागणार, व्यक्तिमत्व. विरोधीपक्षातल, किंवा पत्रकारांपैकी कोणी काही बोललं, अपमान केला, दुरुत्तर केली, प्रसंगी त्यांच्या कामावर संशय घेतला तरीही हा माणूस सगळ ऐकून घेतो पण उलटून बोलत नाही, प्रसंगी काही बोललेच तर किंचित शेरो शायरीत … तेही स्वतः पंतप्रधान असून … या माणसाच्या तोंडून एकही उणा शब्द जात नाही. पहिल्याच भेटीत माणसांना आपलेपणा वाटावा असं व्यक्तिमत्व. ४ वेळा बायपास होवूनही दिवसातले १६ ते १८ तास कामाच्या व्यापात जात … अश्या पंतप्रधानांचा चेहेरा थोडासा लाल झाला होता …
'या दहशतवादी कारवाया थांबल्या पाहिजेत '… 'भारतीय सुरक्षायंत्रणा ऐका दहशतवाद्याला का पकडू शकत नाही ? यापेक्षा जास्त नामुष्कीची गोष्ट माझ्या सरकार साठी काय असू शकते '…

१० ध्यानपथ वर ही बैठक चालू होती. हे पंतप्रधानांचे निवासस्थान व कार्यालय देखील होते. गृहमंत्री थोरवे, गृहसचिव मेहेता त्यांच्या सोबत आढावा बैठक चालू होती… गृहसचिव माहिती देत होते की या कारवायामागे 'अबू फैसल' या व्यक्तीचा हात आहे, पण सुरक्षायंत्रणेकडे त्याचा एखादा फोटो वा फिंगर प्रिंट वा काही सॉलिड माहिती नव्हती. काही दिवसापासून त्याचा ट्रेस पण जवळजवळ नाहीसा झाला होता, त्याचा माग काढण्याचा पूर्ण कसोशीने प्रयत्न चालू होता…

पंतप्रधानांनी आपल्या सरकारच्या अभीभाषणात घोषणा केली होती की 'या दहशतवादी कारवाया बंद करण माझ्या सरकारपुढील महत्वाची बाब आहे' पण वास्तविकता त्यांच्या आदर्श विचार व आशावादाशी सुसंगत नव्हती.

बैठक संपली, सर्वजण निघून जाऊ लागले तरी, बाळासाहेब थोरवे आपल्या ब्लाकबेरी चा बॉल रोल करत कुठला तरी नंबर शोधत होते, बैठकी आधी हेमंत कोकरे यांनी त्यांना परिस्थितीची कल्पना दिली होती, त्यामुळे आता वेळ झाली होती आपण केलेले फेवर कॅश करण्याची …. थोड्याच वेळात त्यांना तो हवा असलेला नंबर सापडला …… बेंजामिन लेवी
--------------------------------------------

'ठीक आहे सर'… अस म्हणून हेमंत कोकरेनी कॉल कट केला… पलीकडच्या बाजूने गृहमंत्री होते… त्यांनी सूचना केली होती त्याप्रमाणे … त्या व्यक्तीची भेट घ्यायची होती…

इंग्लिश गॉथिक या वास्तुकलेवर आधारित वीट बांधकामाचा वापर करून एक आगळी-वेगळी सौंदर्यपूर्ण इमारत उभी राहिली ती म्हणजे ज्यू धर्मीयांचे प्रार्थनास्थळ म्हणजेच "सिनेगॉग.' या वास्तूचे नाव फारसे कोणाला माहीत नाही किंवा नावावरून ही वास्तू कोणती, असा प्रश्न कोणालाही पडेल. ही वास्तू म्हणजे कॅंपमधील आंबेडकर रस्त्यावरील सुप्रसिद्ध "लाल देऊळ! एरवी शांत असणाऱ्या, थोडेसे गूढ वाटावे असे वातावरण असणाऱ्या लाल देऊळ म्हणजे ओव्हल डेव्हिड सिनेगॉगचा परिसर त्या दिवशी गजबजून गेला होता. प्रार्थना. श्रद्धा, अभिमान आणि उत्साह अशा वातावरणात या सिनेगॉगचा वर्धापन दिन समारंभ होत होता. आशिया खंडातील हे सर्वात मोठे सिनेगॉग स्थापत्यशास्त्राचा एक सुंदर नमुना आहे. सर डेव्हिड ससून यांनी या सिनेगॉगची उभारणी केली. ऐतिहासिक वारसा असलेल्या या इमारतीची पुण्यातील साधारण १०० ते १५० ज्यू कुटुंबांनी जपणूक केली आहे. या सिनेगॉगच्या वर्धापनदिनी शहरातील ज्यू नागरिकांबरोबरच मुंबई, इस्त्रायल, अमेरिकेतूनही ज्यू नागरिक या समारंभासाठी आले होते. सिनेगॉगचा परिसर रोषणाईने सजला होता. या सिनेगॉगच्या आजपर्यंतच्या प्रवासाच्या छायाचित्रांचे छोटेखानी प्रदर्शनही भरवण्यात आले होते. आणि या प्रदर्शनात हेमंत कोकरे शोधत होते 'त्याला', गृहमंत्र्यांच्या सुचनेनुसार ते कोणा 'डेविड कोहेन' या व्यक्तीची वाट बघत होते, ज्यु लोकांच्या गर्दीत ते लगेचच वेगळे उठून दिसत होते, तेवढ्यात ऐक म्हातारी व्यक्ती त्यांच्या दिशेने चालत आली, म्हातारी असली तरी पाठीचा कणा ताठ, चालीतली शिस्त, डोक्यावर किप्पाहः, आणि म्हणाली
'आपणास काही मदत हवी आहे का ?'… हेमंत कोकरे म्हणाले 'नाही मी कोणाची तरी वाट बघतोय'…. त्याने विचारले 'तुम्ही हेमंत का ? '… कोकरेच्या मनात विचार आला की 'यांना कसं ……', ' पण जाऊ दे ' म्हणून त्यांनी तो झटकला, 'आपण कोण ?' कोकारेंनी विचारले…

'मायसेल्फ 'डेविड कोहेन', And I believe you have something for me ?

'येस' म्हणून हेमंत कोकारेंनी त्याच्या तळहातात कागदाचे चिटोरे, कुणालाही लक्षात येणार नाही अश्या पद्धतीने शेकह्यांड करता करता सरकावले. त्याने ते चिटोरे हळूच हाताबरोबर त्याच्या प्यांटच्या पुढच्या खिशात ठेवले. कोकारेंना कल्पना होती त्या चिटोर्यावर दोनच शब्द त्यांनी लिहिले होते …'अबू फैसल'.

तिथून बाहेर पडताना, कोकारेंच्या डोळ्यासमोर त्याच्या हातावर पाहिलेलं, हिब्रू गोंदण, येवू लागले … त्याचं हिब्रू अगदीच तोकड होत, पण त्यांना ते गोंदण लक्षात होत 'मिझतावा एलोहिम'…. कधीकाळी काहीतरी वाचलेलं त्याना स्मरणात होत… ड्रायविंग करत बंड गार्डन सिग्नलला त्यांना त्याचा अर्थ ऐकाएकी आठवला … 'मिझतावा एलोहिम' म्हणजे 'देवाचा कोप'….

वाङ्मयकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मास्टरमाईन्ड's picture

4 Mar 2015 - 5:50 pm | मास्टरमाईन्ड

पण आधीच्या काही भागांपेक्षा बर्यापैकी लहान आहे.
असो, बाकी सर्व छान.
पुढचे पण भाग येउद्या लवकर.

पगला गजोधर's picture

4 Mar 2015 - 7:37 pm | पगला गजोधर
असंका's picture

5 Mar 2015 - 4:28 pm | असंका

चांगलंय....
धोक्याचा अंडरकरंट जाणवतोय.