खुशबू (भाग ८)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
26 Feb 2015 - 6:18 pm

भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७

तो संध्याकाळी निवांत बालगंधर्वपुलावर रेलींगला टेकून बसला होता… खांदा मानेचं धनुष्य ताणून, बोटांना सिगरेटचा शेवट जाणवत असताना, वारा पाठीच्या पन्हाळीतून त्याचे मानेवरचे केस भुरूभुरू कुरवाळत होता, उद्या सकाळी उठून परत रटाळ रुटीनने जीवनाला भिडावे लागणार होतं…ड्युटी संपल्यावर खत्रीच्या टपरीवर एक गोल्डफ्लेक एक कटिंग मारल्यावरच त्याच्या दिवसाचं सार्थक व्हायचं… त्याची नजर रस्ता क्रॉस करणाऱ्या झब्ब्यावर स्थिरावली…. …रस्त्याच्या उतारावरून झपाझप चालत, बसस्टेशन गर्दीत झब्बा उतरला…. झब्ब्यान ऐक मोठी पॉलीथिनची पिशवीभरून आणलेलं त्याचं सामान फलाटावर बाकड्याजवळ ठेवलं…. तेव्हड्यात मोबाईलवर बोलत बोलत पानटपरीकडे जाऊ लागला … वाय झेड अस सामान ठेवून कोणी जात का फुकायला…. चोरीला जाइल सामान … बस बोंबलत म्हणावं …निसर्गनियमांची अटळता रेखलेला त्याचा चेहेरा होता झब्ब्याचा …. गालांची उभट ठेवण असलेल्या त्या चेहेर्यावर घाऱ्या रंगाचे डोळे होते, संथ, थंडगार नजर…त्याच्या बंद जीवणीवर पुसटशी तुच्छतादर्शक रेष होती,…. हम्म… असा चेहेरा एखाद्या विरक्त संयास्ताचा असू शकेल किंवा एखाद्या निर्मम मारेकर्याचा.

------------------------------------------------------------------------------------

आज आपली शेवाटची भेट तुळशीबागेला… याची संगीताला पुसटशी देखील कल्पना नसेल, चितळेसमोरच्या गल्लीतून रमतगमत फुटपाथवरचा माल बघत चाललेल्या लोकांच्या भाऊगर्दीतून कशीबशी वाट काढत ती 'तुलसी' च्या दिशेन घाईघाईन चालली होती. गडबडून जाऊ नकोसं अस दहावेळा तरी तिने स्वतःला बजावलं असेल…नवीन संसार थाटायला लागणारी भांडीकुंडीच तर आज फायनल करायची आहेत आपल्याला … ती पुढच्या कोपर्यावर आली, तेव्हा चौकात लाल दिवा लागलेला होता. रहदारी थांबलेली होती …. ती थबकली … आणि तेवढ्यात गर्दीतल्या कोणीतरी तिला धक्का दिला… ती एकदम धडपडत रस्त्यावरच आली असती पण तिने तोल सावरला … 'शी ! काय ही गर्दी ! बेशिस्त कुठले ' … तीन शनिवारपेठी स्टाईल नं मनातल्या मनात शिवी हासडली, त्याचं वेळी तिला धक्का देऊन जाणारा झब्बा, हातातली भली थोरली गच्च पॉलीथिनची पिशवी फुटपाथच्या कडेला ठेवून, इकडे तिकडे बिल्डिंगकडे मान वर करून बघत होता … 'कुठनं कुठनं पुण्यात येतात अशी लोकं देव जाणे, धक्का दिला तरी सॉरी म्हणायचे म्यानर्स नाही… पूर्वीसारखं पुणे आता राहिलं नाही आता ….' असं म्हणून ती तुलसीची पायरी चढली ….

---------------------------------------------------------------------------------

त्याचं घर म्हणजे ऐक हवेशीर प्रशस्त ड्यूप्लेक्स अपार्टमेंट होती …. स्वप्नशिल्प ४ थ्या मजल्यावरच. सुंदर भलामोठा हॉल, ६ फुटी प्रशस्त खिडक्या, मार्बल टाइल्स, ऐल शेप सोफा, ४५ इंच फ्लाट स्क्रीन एल इ डी, लस्टर पेंट … पलीकडे मास्टर बेडरूम , बाथरूम, स्टडीरूम, हवेशीर व प्रशस्त , भरपूर सूर्यप्रकाश येणारा… भिंतीवर छान डीकॅल … लहानखोर चणीच्या चटपटीत दिसणाऱ्या गोगटे काकांची बुद्धी अतिशय कुशाग्र होती, म्हणूनच पेठेतल्या वाड्यातल्या घराला सोडचिठ्ठी देण्याच्या मोबदल्यात… काकांनी फक्त बांधकामाच्या खर्चातच बिल्डरकडून कोथरूडमधे त्यावेळी फ्लाट मिळवला …. खिडकीतून दिसणाऱ्या पलीकडच्या सुंदर इमारती संध्याकाळी न्याहाळणे, चहाचा कप हाती घेऊन, हे ऐक नित्य कर्म ….
रिक्षातून उतरून हातातल्या जड पिशव्या सांभाळत, तोल सांभाळत ऐक झब्बा त्यावेळी बिग बझार च्या दिशेन जाताना त्यांना दिसला …. 'अजून खरेदी शिल्लक राहिली वाटतं …. ' अस म्हणून काकांनी चहाचा सुरका मारला ….
--------------------------------------------------------------------------------
न्यूज @ रात्री १० …
पुण्यात डेक्कन जिमखाना परिसर, तुळशीबाग, कोथरूड अश्या गजबलेल्या तीन ठिकाणांवर झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यात अमोनियम नायट्रेड वापरण्यात आले असून नेमका कोणत्या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला या संदर्भात आम्ही चौकशी करीत आहोत. त्यामुळे सर्व शक्यता पडताळून पाहिल्यावरच हे कृत्य कोणी केले, हे निश्चित होणार असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत कोकरे यांनी सांगितले आहे. झालेल्या स्फोटांचा तपास एटीएस आणि क्राइम ब्रांच करीत असून केंद्रीय तपास यंत्रणाही या कामात आम्हांल मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. फॉरेन्सिक तपास सुरू असून त्यानंतरच हा हल्ला कोणी केला, त्यासाठी कोणते मॉड्युल वापरले गेले, याचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

रात्री सव्वासातच्या सुमारास येथे स्फोट झाल्यावर रात्री गृहमंत्री हे विशेष विमानाने पुण्याला आले. नऊ वाजता त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. नंतर ससून हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, रूबी हॉल, इन्लॅक बुधराणी हॉस्पिटलला भेट दिली. महाराष्ट्र पोलिस, केंद्रीय पातळीवरील गुन्हे अन्वेषण दल, सैन्याचे गुन्हे तपासणी दल यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, पुणे जिल्हा संपर्क मंत्री हे होते.
त्याचवेळी हा स्फोट म्हणजे गुप्तचर संघटनेचे अपयश असल्याचा आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान, बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांपैकी दोन जण, तसेच जखमींपैकी अकरा जण परदेशी नागरिक आहेत. या स्फोटात जखमी झालेल्या ६० जणांवर शहरातील विविध रुग्णांलयामध्ये उपचार सुरू आहेत. झालेल्या बॉम्ब स्फोटांनंतर शहराच्या विविध भागात बॉम्ब असल्याच्या अफवा पसरत होत्या. मात्र, अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे त्यांनी यांनी नागरिकांना आवाहन केले.

वाङ्मयकथाविरंगुळा