सॅम पित्रोडा नवे राष्ट्रपती?

फोन ही हल्ली अन्न, वस्त्र, निवारा आणि विज यानंतरची पाचवी मुलभुत गरज बनली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुरध्वनी जर कुठे उपलब्ध असेल, तर तो भारतात असं म्हणतात. अवघ्या काही वर्षांपुर्वी मात्र हे असं मुळीच नव्हतं. आपल्यापैकी अनेकांना ट्रंक कॉल लावून तासनतास वाट बघत बसण्याचे दिवस चांगलेच आठवत असतील. ट्रींग ट्रींग करणारा काळा फोनही अनेकांच्या अगदी स्पष्ट स्मरणात असेल. तारेपासुन ते ब्रॉडबॅण्डपर्यंत दुरसंचार क्षेत्रात अगदी तासातासागणीक होणा-या या प्रगतीला सत्यनारायण गंगाराम पांचाल नावाचा एक माणुस जबाबदार आहे, असं सांगीतलं तर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही. सॅम पित्रोडा म्हटलं तर मात्र ब-याचजणांना आठवण येइल त्यांच्या वैषिष्ट्यपुर्ण केशरचनेमुळे डॉक़्टर ए पी जे अब्दुल कलामांची आठवण करून देणा-या एका भन्नाट व्यक्तीमत्त्वाची.

भारतातील संचारक्रांतीचे प्रणेते, दूरसंचार क्षेत्रातील अनेक नव्या आविष्कारांचे जन्मदाते, नव्या कल्पनांचे जनक, आणि सध्या पंतप्रधानांचे तंतज्ञानविषयक सल्लागार असलेल्या सॅम पित्रोडांचं नाव नुकतंच पुन्हा एकदा चर्चेत आलं ते येत्या जुलै महिन्यात होणा-या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांच्या निमित्ताने. चर्चा आहे की पित्रोडांचं नाव कॉंग्रेसतर्फे पुढं केलं जाण्याची दाट शक्यता आहे. जर तसं झालं, तर या नावाला क़ुणाचाच विरोध असण्याचं काहीच कारण असणार नाही. भारताला डॉक्टर कलामांनंतर आणखी एक परिणामकारक आणि प्रभावी राष्ट्रपती प्राप्त होईल यात शंकाच नाही. शिवाय पित्रोडांचा स्पष्टवक्ता तसेच मार्मिक स्वभाव, विविध विषयांवरील त्यांचा प्रगल्भ व्यासंग आणि मुख्य म्हणजे संवाद साधण्याची अचंबीत करणारी क्षमता या सगळ्या गोष्टी त्यांना एक 'डायनॅमिक' प्रेसीडेंट बनवायला मदतच करतील. जन्म गुजराती कुटुंबातला असल्यामुळे मातृभाषा गुजराती; कुटुंब ओरिसातल्या तितलागढ येथे स्थायिक झालेले असल्यामुळे ओरीया आणि बंगाली; आधी शिकागो आणि मग दिल्ली ही कर्मभुमी असल्यामुळे ईंग्रजी आणि हिंदी; शिवाय आयुष्याच्या अनुभवाने आलेल्या जर्मन आणि रशियन सह अन्य अनेक भाषांमध्ये पित्रोडा बिनधास्त संवाद साधू शकतात. मुळात संवाद साधणे हाच या माणसाचा मुळ पिंड आहे. म्हणुनच आपल्या कल्पना आणि संकल्पशक्तीच्या जोरावर अवघ्या भारत देशाला संवाद साधणं सोपं करून देण्यात ते यशस्वी झालेत.

पित्रोडांचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे सुतारकाम. त्यांच्या वडिलांना या कामानिमित्त गुजरात सोडून ओरिसात स्थायिक व्हावं लागलं होतं. तेथेच १९४२ साली सत्यनारायणचा जन्म झाला. शिक्षणासाठी मात्र वडिलांनी मोठ्या भावासह त्यांना गुजरातमध्ये पाठवलं. याचं कारण म्हणजे गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव. गुजरात ही गांधीजींची जन्मभुमी असल्यामुळे मुलांना गांधी विचारांचं बाळकडू शिक्षणाबरोबरच मिळेल या उद्देशाने वडिलांनी त्यांची रवानगी वडोद-याला केली.ईथल्या सयाजीराव विद्यापिठातुन भौतिकशास्त्रात पदवी घेऊन सत्यनारायणने थेट शिकागो गाठलं. सांगायचं कारण होतं उच्च शिक्षणासाठी! मात्र मुळात २२ वर्षाच्या या तरूणाला ओढ लागली होती ती अमेरिकेच्या चांद्रमोहिमेची. अमेरिका मानवाला चंद्रावर पाठवणार या कल्पनेनंच तो भारावून गेला होता. या मोहिमेत आपणही काहीतरी करून सहभागी व्हावं याच उद्देशाने त्याने शिकागोच्या ईलिय़ॉनिस ईन्स्टीट्युटमधून ईलेक्ट्रॉनिक ईंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. अमेरिकेचं नागरिकत्त्वही मिळालं. सत्यनारायण पांचाल चा सॅम पित्रोडा झाला. शेवटी चंद्रावर मात्र निल आर्मस्ट्रॉंग गेला. सॅमने घेतलेलं शिक्षण डिजिटल टेलिकॉम स्विचिंगचं मशिन बनवण्याच्या कामी आलं. काही दिवस वेगवेगळ्या ईलेक्ट्रॉनिक कंपन्यांसाठी काम करता करताच १९७०च्या सुरूवातीला काही मित्रांसमवेत त्यांनी स्वतःची ‘वेसकॉम’ नावाची कंपनी स्थापन केली. एकामागोमाग एक अशी पन्नासहून अधीक टेलीकॉम उपकरणे त्यांनी तयार केली. त्या सर्वांचं पेटंटही घेतलं. दहा वर्षांनंतर ही कंपनी रॉकवेल ईंटरनॅशनल्स मध्ये विलीन करतांच सॅम पित्रोडा करोडपती झाले. त्यानंतर सहज म्हणुन भारत भेटीवर आले असता तो प्रसंग घडला, ज्याने पित्रोडांचं जीवन आणि आपलं संचारविश्व बदलवून टाकलं.
ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पित्रोडा थांबले होते, तीथून त्यांच्या पत्नीला काही केल्या फोन लागेच ना. शेवटी त्यांना घरी जाऊनच बायकोला भेटावं लागलं. तेव्हाच त्यांनी निश्चय केला, की आता बास झालं पैशाच्या मागे धावणं. आता मातृभुमीसाठी काम करण्याची वेळ आली. भारतातली संचारसेवा अद्ययावत करण्याची एक प्रभावी योजना त्यांनी तयार केली, आणि ती ऐकवण्यासाठी सरळ पंतप्रधानांचीच म्हणजे ईंदिरा गांधींची भेट मागीतली. त्यांची भेट १० मिनिटांच्या वर मिळे ना, आणि पित्रोडांना हवा होता एक तास! मग मंत्रालयाच्या वा-यांवर वा-या सुरू झाल्या. अनेकदा वाट पाहून परत जावं लागलं, तर अनेकदा ईंदिराजींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ठरलेली मिटिंग रद्द झाली. दरम्यानच्या काळात नुकतेच राजकारणात आलेले, देशोदेशी फिरलेले आणि तंत्रज्ञान ब-यापैकी कळणारे राजीव गांधी पित्रोडांच्या संपर्कात आले, आणि दोघांची मैत्री झाली. राजीवजींच्या मध्यस्तीने त्यांनी ईंदिराजींची भेट मिळवली आणि आपलं पहिलंवहिलं प्रेझेंटेशन केलं. यानंतर ईंदिराजींनी त्यांना आपल्या नवरत्नांमध्ये स्थान दिलं, ते नेहमी करीताच. "मॅडम, तिकडे शिकागोला माझ्याकडे लोकांना भेटायला वेळ नाही. सहा सहा महिने लागतात माझी अपॉईन्टमेन्ट मिळवायला. आणि ईकडी मी तुमची वेळ घेण्यासाठी सहा महिन्यांपासुन अक्षरश: फे-या मारल्यात," अशी शालजोडीतून सुरवात करून सुरू केलेलं पित्रोडांच पहिलंच प्रेझेंटेशन गांधीं मातापुत्रांचं मन जींकून गेलं. यानंतर घडला तो ईतीहास.

राजीव गांधीच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अमेरिकन नागरिकत्व सोडून ते पंतप्रधानांचे मुख्य तंत्रज्ञान सल्लागार बनले. हे काम त्यांनी तब्बल दहा वर्षे दरसाल अवघा एक रुपया नाममात्र वेतन घेऊन केले. वीस वर्षांपूर्वी भारतात सुरू झालेल्या 'पीसीओ ' क्रांतीचे पित्रोडा शिल्पकार ठरले.

आज गावोगावी , गल्लोगल्ली दिसणाऱ्या ' पब्लिक टेलिफोन बूथ ' च्या मागे दूरभाष सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठीची पित्रोडा यांची कल्पकता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राबलेल्या तंत्रज्ञांच्या पलटणींचे परिश्रम आहेत. राजीव गांधींच्या घातपाती मृत्यूनंतर , जवळची सर्व बचत संपत आल्यानंतर पित्रोडा १९९३ साली अर्थार्जनासाठी अमेरिकेला परतले व तेथे स्थायिक झाले. संयुक्त राष्ट्रसंघाने मागास देशांत टेलिकॉम सेवेचा प्रसार करण्यासाठी स्थापलेल्या ' वर्ल्डटेल ' या संस्थेचे ते अध्यक्ष झाले. या संस्थेच्या अनेक उत्पादनां ची पेटंट्स त्यांचीच आहेत. शिकागोत स्वत:च्या मालकीच्या काही छोट्या तंत्रज्ञान कंपन्या पित्रोडा आपल्या कुटुंबाच्या (पत्नी व दोन मुलांच्या) चरितार्थासाठी चालवित होते. भारतातील घडामोडींवरही त्यांची नजर होतीच. शिवाय त्यांच्यावर नजर होती भारतातील नेतेमंडळींची. म्हणुनच डॉक्टर मनमोहनसिंग पंतप्रधान झाल्यावर पित्रोडांना परत एकदा भारतात येण्याचं निमंत्रण मिळालं. विज्ञान महामंडळाचे ते अध्यक्ष झाले. पंतप्रधानांचे तत्रज्ञान क्षेत्रातील सल्लागार बनले. आता वेळ होती मोबाईल आणि ब्रॉडबॅण्ड क्रांतीची! ही क्रांती आपण अनुभवतो आहोतच. अगदी वानगीदाखल सांगायचं झालंच तर आज लक्षावधी लोक मोबाईलवरून आर्थीक व्यवहार (फंड ट्रान्सफर, ऑनलाईन बॅन्कींग, बिल पेमेन्ट ई.) करण्यासाठी वापरतात ते 'वन वॉलेट' तंत्रज्ञान पित्रोडांचंच पेटंट आहे.

'पॉलीसी मेकींग़' अर्थात योजना बांधणीमध्ये त्यांचा हातखंडा आहे. म्हणुनच भारत सरकारच्या रेल्वे नविनिकरणापासुन ते ऑनलाईन लायब्ररीपर्यंतच्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. सध्या त्यांचा एक पाय भारतात, एक अमेरिकेत असतो. शिवाय लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतही शिक्षणविषयक योजनांकडे ते लक्ष देतात. भारतातही शाळांचे संगणकीकरण, ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅण्डने जोडणे, भारतीय पारंपारीक वैद्यकशास्त्राचे पुनरुज्जीवन ईत्यादी सामाजीक महत्त्वाचा तांत्रीक कामामध्ये हल्ली त्यांनी लक्ष घातले आहे. तंत्रज्ञानातून सर्वांगीण प्रगतीचा हेतू साध्य करणारे पद्मभुषण सॅम पित्रोडा पुढे येऊ पाहणा-या मोठ्या जबाबदारीलाही याच आत्मविश्वास आणि स्मीतहास्यासह सामोरे जातील, यात शंका नाही

प्रतिक्रिया

छान ओळख करून दिलीत!
आज आपण जी संदेश दळणवळणात जी प्रगती केली आहे त्यामागे पित्रोदांचा फार मोठा हात आहे.
ते राष्ट्रपती ह्यावे ह्यासाठी सदिच्छा पण झाल्यास रबर स्टॅम्प राष्ट्रपती होऊ नये हीच इच्छा.

- (पित्रोदांचा समर्थक) सोकाजी

लेख आवडला.
>>ते राष्ट्रपती ह्यावे ह्यासाठी सदिच्छा पण झाल्यास रबर स्टॅम्प राष्ट्रपती होऊ नये हीच इच्छा.>>
+१

ते राष्ट्रपती व्हावे हीच इच्छा. बहुतेक वेळी अधिकार आणि जबाबदारीच्या बाबतीत पद कुचकामी असलं तरी कोणत्यातरी कर्तुत्ववान व्यक्तीला मिळावं.

या धाग्यावर हे अवांतर होइल पण सध्याची बाई जाम डोक्यात जाते यार. आता हे काही रागाचं कारण नव्हे, पण एकदा सकाळ मध्ये फोटो आला होता कुठल्यातरी दौर्‍यावर असताना, "एका निवांत क्षणी प्रतिभा पाटील" या टॅग लाइननं. त्या फोटोत ही बाई पायर्‍यांवर बसली होती आणी जवळच नवरा आणि अंगरक्षक हात बांधून उभे होते. :|

असा निष्कारण रागराग करण्यापेक्षा या दौर्‍याविषयीची आंतरजालावर माहिती काढायचा प्रयत्न केला. :) अजेंडा काय होता, तीथं प्रत्यक्षात जाणं का जरूरीचं होतं वगैरे. पण कुठेच काहीच माहिती मिळाली नाही. या फोटोशिवाय कुठल्याही वर्तमान पत्रानंही या दौर्‍याची दखलही घेतली नव्हती. म्हणजे हा दौराच निरुपयोगी होता की गोपनिय होता हे कळायला मार्ग नाही. (च्यायला रिटायर झाल्यावर माहितीच्या अधिकार वापरून हीच कामं करावी लागणार आहेत)

आणि आतातर या बाईने आत्तापर्यंतच्या राष्ट्रपतींमध्ये रेकॉर्ड केला आहे दौर्‍यांवर खर्च करून. मागे सुखोईमधून प्रवास केला म्हणे. या वयात असल्या विदुषकी चाळ्यांनी सैनिकांचं मनोधैर्य खरच उंचावत असेल? की फक्त यांच्या हौसे खातर पद वापरून यांचे शौक पुर्ण करून घ्यायचे? देशासाठी खरच काही करायचं असेल तर यांनी पैसे न उधळता फक्त घरी बसावं.

म्हणजे हा दौराच निरुपयोगी होता की गोपनिय होता
हे म्हणजे अगदि हुच्च लिहिलत.
देशासाठी खरच काही करायचं असेल तर यांनी पैसे न उधळता फक्त घरी बसावं.
हे त्याहून थोर.

पित्रोडा ह्यांना राजीव ह्यांच्या मृत्यू नंतर इतर राजकारणी माणसांनी त्यांच्या कर्तुत्वाला संधी मिळेल व देशाचे सोने होईन अशी कोणतीही कामगिरी देऊ शकले नाही.

मनमोहन सिंग ह्यांनी अनेक गुणी माणसे योग्य त्या पदावर आणली. आलुवालीया, तेंडूलकर , जाधव , निलकेणी आणि अशी कितीतरी वेगळ्या शेत्रातील कर्तुत्ववान माणसे कोणतेही राजकारण न करता योग्य त्या पदावर आलेत.

आता दुबळे म्हणून हिणवणे फार सोपे असते. पण प्रत्यक्षात कड्बोल्याचे सरकार चालवणे विरोधी पक्षाला सुद्धा कठीण गेले.

माझ्या मते राष्ट्रपती हा रबरी शिक्का जरी असला तरी त्याचा जगात एक ब्रेंड म्हणून उपयोग होऊ शकतो. कलाम ह्यांच्या उच्च शिक्षण व भव्य कारकीर्दीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला स्वताची प्रतिमा उंचावण्यासाठी फार मोठी मदत झाली. आता प्रतिभा ताई ह्यांच्या नावामागे आंतराष्ट्रीय ख्याती आणि वलय नव्हते हे तितकेच खरे आहे.

पित्रोडा ह्यांच्या अनुभव ,कार्य आणि नाव ह्यांच्या भारताला खरेच खूप चांगला फायदा होईन, विशेतः दक्षिण अमेरिकेची बाजारपेठ चीन वेगाने खिशात टाकतोय. तिथे आणि अफिक्रेत भारतीय नेते जाऊन चांगले संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे. प्रगत देशांची व त्यांच्या कंपन्यांचे तंत्रांद्यान पारदर्शक रीत्या भारतात आले पाहिजे. आणि ह्या साठी पित्रोडा सारख्या व्यक्तींची देशाला गरज आहे.

माहीती पूर्ण लेख दिलात. आपल्याला धन्यवाद

नेहमीप्रमाणेच उत्तम ओळख करुन दिलीत. धन्यवाद

जाताजाता: मिपा हे दैनिक वगैरे नसून एक पब्लिक फोरम आहे. इथे येउन फक्त लेख टाकण्यापलिकडे इतर धाग्यांवरही प्रतिसाद देत चला. हा जरी संस्थळाचा नियम नसला तरी लोकांची अपेक्षा असते.

कलामांविषयी, त्यांच्या कार्याविषयी पूर्ण आदर ठेऊन मी म्हणतो की त्यांनी राष्ट्रपतीपदी असताना एवढे काय भव्य-दिव्य काम केले होते? ते एक शास्त्रज्ञ म्हणून प्रयोगशाळेत किंवा एक प्राध्यापक म्हणून कितीही चांगले असले म्हणून ते राष्ट्रपती भवनातही ते तितकेच चांगले होते असे का वाटते हे समजत नाही. चर्चेत कलामांच्या विद्वत्तेचा भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मान उंचावायला उपयोग झाला असे कोणी म्हटले आहे. भारताची मान उंचावली (असली तर) ती आर्थिक कारणांमुळे आणि अमेरिकेला भारताचे महत्व अधिक जाणवू लागले म्हणून. कलाम राष्ट्रपती होते त्या काळातच भारताचे स्थान पूर्वीपेक्षा अधिक उंचावले (ते इतर कारणांमुळे) पण त्याचे श्रेय कलामकारणांमुळे) पटले नाही.

मुळात राष्ट्रपती हे पद शोभेचे असते. त्या पदाला फारसे अधिकारही नाहीत. तेव्हा अशा ठिकाणी एका चांगल्या माणसाला प्रयोगशाळेतून उचलून का ठेवले गेले हेच समजले नाही. त्यांनी प्रयोगशाळेतून देशासाठी प्रसिध्दीच्या झोतात तितक्या प्रमाणात न राहता खूप योगदान दिलेच आहे त्यात २००२ ते २००७ या काळात अजून चांगल्या पध्दतीने ते योगदान देऊ शकले असते.

कलाम एकदा पूर्वोत्तर भारतात गेले असताना त्यांनी एका हवाई तळावरून अंधार पडल्यानंतर विमानाचे उड्डाण करून लवकरात लवकर दिल्लीला परत जायला लावले होते असे वाचल्याचे आठवते. या हवाई तळावरून अंधार पडल्यानंतर विमानांचे उड्डाण करत नाहीत. तरीही कलामांनीच आग्रह धरल्यामुळे स्थानिक अधिकार्क्ष्याचा नाईलाज झाला आणि त्याला परवानगी द्यावी लागली. समजा दुर्दैवाने विमानाला काही झाले असते तर ते कोणावर शेकले असते?मला वाटते तो अधिकारी विमानाचे उड्डाण व्यवस्थित होईपर्यंत आपला जीव मुठीत घेऊन बसला असेल!!

कलामांनी मुळात राष्ट्रपती म्हणून ५ वर्षात एवढे काय भव्यदिव्य केले होते ? आणि इतकेच नव्हे तर विजयी व्हायची खात्री असल्यास ते आणखी ५ वर्षे राष्ट्रपती भवनात राहून काय करणार होते? (http://news.oneindia.in/2007/06/20/kalam-willing-for-2nd-term-unpa-cong-...)

तेव्हा एखाद्या क्षेत्रात उत्युंग कार्य केलेली व्यक्ती सगळ्या क्षेत्रातही तितक्याच भरार्या मारेल ही मानसिकता अयोग्य आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

कलामांनी मुळात राष्ट्रपती म्हणून ५ वर्षात एवढे काय भव्यदिव्य केले होते ? आणि इतकेच नव्हे तर विजयी व्हायची खात्री असल्यास ते आणखी ५ वर्षे राष्ट्रपती भवनात राहून काय करणार होते?
त्यांचे सोडा आजतागायत होऊन गेलेल्या सर्वच जणानी त्या पदावर राहून भव्यदिव्य राहूद्या साधे तरी नक्की काय केले.
अपवाद झैलसिंग्.त्यानी राजीव गांधीना बर्‍यापैकी चाप लावला होता

त्यांचे सोडा आजतागायत होऊन गेलेल्या सर्वच जणानी त्या पदावर राहून भव्यदिव्य राहूद्या साधे तरी नक्की काय केले.

बरोबर आहे. आणि म्हणूनच कलामसाहेबांसारखा चांगला माणूस काही फारसे साध्य करू शकत नसलेल्या पदावर ५ वर्षे होता म्हणजे त्यांच्याकडून अधिक चांगले कार्य झाले असते ती ५ वर्षे फुकट गेली असेच मला वाटते. तेव्हा फारसे काही करता न येण्याजोगे पद असेल तर तितपत आवाक्याचाच माणूस तिथे हवा. कलामसाहेबांसारख्या हुषार माणसाला तिथे ठेवणे म्हणजे त्यांच्या विद्वत्तेचेच नव्हे तर देशाचेही नुकसानच आहे.

पुढील पाच वर्षासाठी आणखी एका कर्तुत्ववान माणसाचा आलेख शून्यावरती येणार.

बराचसा सहमत ! अहो पंतप्रधानाचे पद इतके महत्वाचे व शक्तिशाली असताना देखील अनिल बोकिलांचे "काळे धन नियंत्रणा " वरील उपायापैकी एक तरी उपाय मनमोहन सिंग यानी करून पाहिला आहे का? भारतीय पंतप्रधान राजकीय दबावामुळे स्थितिप्रधान असतो असेच दिसून आले आहे.

खुप छान माहिती. हे सगळे वाचून आता असं वाटत आहे की हेच भारताचे पुढील राष्ट्रपती बनावेत

अमोल केळकर

सर्व प्रतिक्रीयाचे स्वागत! धन्यवाद!

काही फरक पडणार नाही. आणखी एक रबरी शिक्का येईल आणी जाइल.