हे लिहायला बसण्यामागे माझ्या मनात अधून मधून पडत असलेलं प्रतिबिंब शब्दरुपात ठेऊन ते स्वत:साठी पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेण्याचा उद्देश आहे. एरव्ही क्षणभर क्षणभर झरणार्या काळाच्या मंद गतीने आयुष्य उलगडत जाते; आणि आयुष्याचं सुस्पष्ट नखशिखांत जसं आहे तसं रुप त्या क्षणभरात पहायला मिळत नाही. ते चित्र उमटण्यासाठी उलटत जाणार्या क्षणाचा आवाका कदाचित तोकडा असेल, कदाचित आपण तीव्रपणे संवेदनशील नसू किंवा दश इंद्रियांचा एक मेळा असणारी आपली निर्मितीच तिच्या सर्वसामान्य रुपात तेवढी 'जिंदा' रहात नसेल, नक्की कारण माहित नाही - पण हे परिपूर्ण जीवन जगणं आहे असं जाणवत नाही, कारण कुठेतरी स्वप्नवत असणारे ते परिपूर्ण जीवन जगण्याची तहान पुन्हा पुन्हा आपल्याला लागत असते. रोजच्या अनुभवाची परिपूर्णता टिकत नसेल, त्यात सतत तुटलेपणा असेल, किंवा अनुभव देणार्या जीवनाची व्याप्तीच एवढी मोठी असेल की तिला सामोरे जाताना फे फे उडत असेल. काय असेल ते असो, पण आपण बोलण्याच्या, लिहिलेल्या शब्दांच्या, भाषेच्या माध्यमातून जीवनातील अनुभवांच्या विविध छटा आणि अदा टिपण्याच्या मागे लागलेलो असतो - साहित्य म्हणजे दुसरं तिसरं काही वाटत नाही, या आपल्याच जीवनाचे आपल्याच शब्दांत मांडलेले पुढेमागे, सुरळित-विस्कळीत, जसे हाती पडतील तसे, ज्या स्थितीत हाती पडतील त्या स्थितीत घेतेलेले फोटोग्राफ्स वाटतात - आणि आपण त्यांच्याकडे बघत बसतो, त्यातून स्वत:ला निरखीत बसतो. प्रत्यक्ष तुम्ही आम्हीच त्यात असण्याची गरज नाही. आपल्यातलाच कुणीतरी जसा ज्या रुपात असेल तसा आपण शोधत असतो.
साहित्यनिर्मिती असं प्रचंड काहीतरी म्हणण्यापूर्वी आपण आपले अनुभव कुठेतरी शब्दांत, गाण्यात किंवा कोणत्याही रुपात मांडून त्यांच्याकडे पहात रहाणे हा आपलाच आरसा आपण तयार करणं वाटतं. आता आपणच स्वत: कसे आहोत ते एकदाचं स्वत: समजून घेण्याचं सोडुन या शब्द, भाषा, साहित्याद्वारे आरसे निर्मितीच्या भानगडीत आपण का पडतो हे तत्त्वज्ञानी विवचेन नंतर करुन पाहू, कारण त्यात वैयक्तिकता येत असल्यानं तो कदाचित वादंगाचा मुद्दा होईल, त्यामुळे ते नंतर.
साहित्य निर्मिती आणि त्यात आपलं पडलेलं प्रतिबिंब हा फार पुढचा पल्ला झाला. कारण 'साहित्य' असं दांडगं काहीतरी हातून तयार होण्याच्या कितीतरी पूर्वी प्रत्येकाने साधे शब्द उच्चारलेले असतातच. अ, आऽऽ आई हे त्याला पुढे आई ची मंगलमूर्ती उभी असल्यानं स्फुरलेलं असतं की हा त्यानं जगात आल्या आल्या घेतलेला पहिला फोटोग्राफ असतो, की आई या उदाहरणादाखल घेतलेल्या साध्या, पण पुढे साहित्यनिर्मिती उभी राहू शकेल अशा शब्दाची ती त्याची पहिली शिकवणी असते काय असेल ते असो. पण 'साहित्य निर्मिती' अशा प्रचंड जोरदार गोष्टीची जाणीव होण्यापूर्वीच त्यानं त्या दिशेनं पाऊल टाकलेलं असतं एवढं नक्की.
फार फाटे फुटले - ही नेहमीसारखी भलतीच निर्मिती झाली. शब्द असे हजारो फाटे फोडतात, कुठल्या शब्दावरुन कोणत्या रंगाचा धागा हातात येईल आणि तिकडंच विणकाम होत राहिल हे सांगता येत नाही. बोलणे, भाषा, साहित्य यावरुन शब्दापर्यंत आलो आणि भलतीकडेच गेलो. पण आता शब्द पकडून ठेवतो. शब्दांच्याच तुकड्या तुकड्यांतून साहित्यात आपलं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. आणि इथं हे शब्दांच्याच वापरातून स्वत:साठी नीट मांडायचं असल्यानं इथे लिहिलेल्या शब्दांच्या जोडणीतून निर्माण होणार्या प्रतिमा भुरळ घालणार - त्याकडे बघायला नको.
तर शब्द, भाषा, साहित्य आणि त्यात पडणारं आपलं इत्थंभूत प्रतिबिंब. हे प्रतिबिंब 'जीवन' वगैरे बलदंड गोष्टींचं आहे असं न पहाता साधी साठ सत्तर वर्षे हयात असलेल्या असलेल्या कुणाही मरणधर्मा माणसाचं मानलं तर मुद्दा जास्त सोपा होईल. कारण त्याच्या अवस्थेत होत गेलेला बदल, आणि त्या त्या अवस्थेत टिपलेली छायाचित्रे आपल्याला साहित्यात निश्चितच कधीही पहायला मिळू शकतील. ''ए केवडा, आपल्याला लाईन देते काय?'' ही साहित्यातील निर्मितीत पडलेल्या माणसाच्या प्रतिबिंबाची अशीच एक अवस्था टिपणारे एक वाक्य. ''मलमली तारुण्य माझे तु पहाटे पांघरावे'' ही थोडीशी पुढची अवस्था. आता हे काही अश्लील नाही. स्त्री-पुरुष या दोन जाती आहेत म्हणूनच त्यांच्या शारीर सूचक, अश्लील वाटतील अशा भावना येतात असं नव्हे, बहुतांश सगळी दर्जेदार साहित्यनिर्मिती कुठल्या ना कुठल्या प्रकारे शरीर सूचक असतेच. दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे, संध्याछाया भिववीती ह्रदया
आता एवढ्या सगळ्या मांडणीतून एक मुद्दा लक्षात आला आहे तो असा की साहित्यनिर्मिती ही परिपूर्णच असते. त्याअर्थी क्षण क्षणाच्या गतीने ठिबकणारा काळही जसा आहे तसा पुरेसा असतो. माणसाला एका क्षणातही आयुष्याची परिपूर्ण झलकही मिळू शकते, तेवढी माणसात संवेदनशीलता आहे. प्रश्न आहे आयुष्यातील अनंत क्षणी निर्माण होणार्या अनंत परिपूर्ण प्रतिमा त्या क्षणीच नष्ट करुन टाकण्याचा, त्या प्रतिमा निर्माण कारणीभूत असणार्या आपल्या अनुभवांच्या, आणि आपल्या स्वत:पासून थोडं वेगळं होण्याचा. स्वत: सोबत स्वत:च फार खेटून उभं राहून कदाचित जगायला नको, थोडीशी जागा ठेवायला हवी. कदाचित तेव्हाच जगणं दरक्षणी जसं असं तसं भिनत जाईल.
प्रतिक्रिया
1 Apr 2012 - 7:12 am | अत्रुप्त आत्मा
जबरदस्त... हो यक्कूशेठ... मस्त मस्त मस्त...!
1 Apr 2012 - 7:36 am | ५० फक्त
हे सगळं कुणीतर सुगम सुलभ मराठीतुन समजावुन सांगेल काय ?
यक्कुंच्या आजकालच्या लिखाणाचा बाज पाहता कुणी यक्कु फॉर डमीज - अशी एखादी सिरीज लिहिल काय ?
1 Apr 2012 - 8:06 am | निनाद
लेखनाचे सार
हेच तर ध्यानात शिकवतात असे ऐकून आहे. स्वतःच्या विचारांना सजगतेने पण निरपेक्ष असे न्याहाळत राहता येणे ही अवस्था मस्तच असणार. प्रत्येक विचाराला - विचार -आचाराने प्रतिसाद दिलाच पाहिज असे नाही. तसेच आयुष्यात घडणार्या आपल्या नियंत्रणा पलिकडच्या घटनांनाही प्रत्युत्तर देण्याचे खरच कारण असते का?
याच विषयाला धरून सॅम्युअल बेकेट ने छान लघुपट बनवला आहे. अॅन अॅक्ट विदाऊट वर्डस.
हा पाहा -
आशा आहे मुद्दा स्पष्ट व्हायला मदत होईल.
यावर एकदा लिहायचे मनात होते पण जमले नाही.
या निमित्ताने विषय वर आला.
(प्रयत्नवादी आणि दैववादी यां ची निरर्थकता यावर सुरेख भाष्य करणारे अॅन अॅक्ट विदाऊट वर्डस २ नक्की पाहा.)
1 Apr 2012 - 8:02 am | सहज
जो भी मैं कहेना चांहू बरबाद करे अल्फाज मेरे!!!
कभी मुझे लगे के जैसे, सारा ये जहा है जादू
जो है और नही भी है ये फिझा घटा हवा बहारे
मुझे करे इशारे ये
कैसे कहू कहानी मै इनकी
जो भी मैं कहेना चांहू बरबाद करे अल्फाज मेरे!!!
जुन्या, नव्या (बर्याचदा जुन्या) हिंदी सिनेगीतांमधे शोधले तर बरेचदा सगळी टोटल लागते :-)
यशवंता लिहीत रहा.
1 Apr 2012 - 9:27 am | प्रचेतस
सुंडर लिखाण रे येशा.
1 Apr 2012 - 10:03 am | सोत्रि
हे आणी त्यानंतर हे
क्लासचं! अतिशय भावपूर्ण आणि सकस लेख!
ह्या लेखाच्या शेवटी क्रमश: आहे असे समजतो, तो आपण प्रत्यक्ष भेटीत पूर्ण करूयात! :)
- (साहित्य जीवनमनाचा आरसा असे समजणारा) सोकाजी
1 Apr 2012 - 12:17 pm | तर्री
थोडे व्यामिश्र (?/!) थोडे स्पष्ट.
थोडे मनस्वी थोडे शब्दांचे सुतारकाम.
छान सुरवात उत्तम मांडणी व समेवर येवून अखेर.
भावेश .....आवडेश.
1 Apr 2012 - 3:23 pm | जाई.
छान
सफाईदारपणे लिहीलय
1 Apr 2012 - 4:49 pm | चौकटराजा
वल्ल्ली येथला सर्वात लब्बाड गृहस्थ आहे हे पटल्यामुळे वल्लीची " गुरू " किल्ली वापरीत आहे.
सुंडर लिखाण रे येशा.
( अवांतर -ज्यायला पुढे णिषेध ची कटकट नको अन येशाबी खुष ! )
1 Apr 2012 - 5:28 pm | प्रचेतस
मी काय केलं हो चौराकाका?
1 Apr 2012 - 5:38 pm | पैसा
सध्या फक्त "लाईक" चा शिक्का दिला आहे. जरा जास्त मनात रुतलं की आणखी लिहीन!
1 Apr 2012 - 8:52 pm | आत्मशून्य
.
2 Apr 2012 - 12:05 pm | मन१
?
2 Apr 2012 - 11:56 pm | अर्धवटराव
हा यक्कुंचा बुद्धावतार म्हणायचा काय?
(पार खेटलेला) अर्धवटराव
3 Apr 2012 - 4:06 pm | प्यारे१
अरे हा येडा हाय काय????? मस्त लिहिलं आहेस रे!
काही गोष्टींचं पृथक्करण करायचं नसतं रे येश्या... आणि करायला लागलास तर तडीस ने!
नाहीतर अजिब्बातच करुच नकोस.