बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री - अक्कामहादेवी

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
10 Apr 2010 - 10:03 pm

अक्कामहादेवी! एक बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री! बाराव्या शतकातील एक अत्युच्च भक्तीच्या मार्गाचा प्रसार करणारी, आगळी वेगळी स्त्री! कन्नड संत साहित्यात तिने आपल्या भक्ती वचनांची जी अनमोल भर घातली आहे त्यासाठी ती कायम स्मरणात राहील. शिवाय ज्या अनोख्या पद्धतीचे आयुष्य ती त्या काळात जगली ते पाहता तिच्या धैर्याची, निश्चयाची, भक्तीची व अलौकिकतेची दादच द्यावी लागेल! तिला बसवण्णा,चेन्न बसवण्णा, किन्नरी बोम्मय्या, अल्लमा प्रभू, सिद्धराम ह्यांसारख्या इतर लिंगायत/ वीरशैव संतांनी ''अक्का'' म्हणजे मोठी बहीण ही उपाधी देऊ केली ते तिच्या सन्मानाचेच प्रतीक आहे. ईश्वराला - शिवाला तिने आपला पती मानले होते. [पुढे १६ व्या शतकात मीराबाईनेही कृष्णाला आपला पती मानल्याची कथा सर्वज्ञात आहे! ]अक्कामहादेवींची वचने फार मार्मिक आहेत. तिच्या ४३० वचनांमध्ये (कन्नड भक्ती काव्य) ती आपल्या ह्या पतिदेवाशी संवाद तर साधतेच, शिवाय समाजात असलेल्या अनेक अज्ञानमूलक, जाचक बंधनांवर शब्दांचा आसूड उगारते!

कर्नाटकात बाराव्या शतकात शिमोगा तालुक्यात जन्म झालेली ही स्त्री आजही कर्नाटकात घरोघरी तिच्या वचनांच्या रूपात जिवंत आहे. कलह, राजकीय अराजकाच्या अनिश्चित कालात तिने एक अशी चळवळ सुरू केली ज्यामुळे तिला स्त्री सबलीकरण व साक्षात्कारासाठी तळमळीने कार्य करणारी पुरोगामी स्त्री असा सन्मान द्यायला काहीच हरकत नाही. महिला-कल्याणाच्या बाबतीत तिची मते, दृष्टिकोन व कार्य हे आजही स्फूर्तिदायक आहे. त्यामुळे तिला त्या काळातील महिलांच्या उद्धारासाठी झटणारी, गूढदृष्टी असणारी स्त्री संत असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. कूडल संगम ह्या कर्नाटकातील लिंगायतांच्या तीर्थक्षेत्री होणाऱ्या अनेक अनुभवमंडपातील विद्वज्जनांच्या सभांमध्ये ती तत्त्वज्ञान व मोक्षप्राप्ती (अरिवु) विषयीच्या चर्चा, वादविवादांमध्ये हिरीरीने भाग घेत असे. आपल्या अमरप्रेमाच्या शोधात तिने प्राणी, पक्षी, फळे, फुले, वनस्पती, झाडे, निसर्ग ह्यांनाच आपले सखे-सोबती मानले. घराचा, कुटुंबाचा त्याग करून बाहेर पडली. त्या काळात वर्णाश्रमाच्या कठोर आगीत शूद्र व स्त्रिया होरपळून निघत होत्या. अशा काळात तिने हे बंड पुकारले. तिने फक्त महिलांच्या उद्धारासाठीच काम केले नाही तर अतिशय सुंदर अर्थाची वचने रचली, जी आजही मोठ्या भक्तीने गायिली जातात.
एक अशीही कथा आहे की अक्कामहादेवीचा विवाह कौशिक नामक स्थानिक जैन राजाशी झाला होता. परंतु तिच्या वचनांमधून स्पष्ट कळून येते की ती फक्त 'चेन्नमल्लिकार्जुन' ह्या आपल्या इष्टलिंगालाच - शिवालाच बालपणापासून आपला पती मानत होती. तिच्या काव्यांतून ती भौतिक पातळीवरचे नाशवंत, मर्त्य प्रेम धुत्कारताना व त्या ऐवजी अमर असणारे, ईश्वराचे ''अनैतिक'' अक्षय प्रेम किंवा ''बाहेरख्याली'' प्रेम जवळ करताना दिसते. आणि ह्या मार्गातच ती स्वतःची उन्नती करून घेताना दिसते!

आयुष्यातील सर्व सुख-सोयींना, संपत्तीला लाथाडून अक्कामहादेवीने आयुष्यभर भटकी वृत्ती स्वीकारली व एक कवयित्री-संत म्हणून जीवन व्यतीत केले. ती गावोगावी हिंडत असे व शिवाची स्तुती गात असे. आत्मोद्धारासाठी तिने प्रचंड भ्रमण केले व शेवटी संन्यासिनी झाली व बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथे उर्वरित आयुष्य जगली. तिच्या जनरीतीला धुत्कारून आचरणाच्या पद्धतीने तिच्याबद्दल सनातन समाजात बरेच वादंग उठले. त्यामुळे अनुभवमंडपातील सभांना तिला प्रवेश मिळवून देणे हेही तिचे गुरू अल्लम्माप्रभू यांना एकेकाळी कठीण झाले होते. खरीखुरी संन्यासिनी असलेली अक्का महादेवी अंगावर वस्त्रेही घालत नसे असे सांगितले जाते. त्या काळी पुरुष संन्यासी निर्वस्त्र राहणे ही सर्वसामान्य बाब होती परंतु एका स्त्री संन्यासिनीने असे राहणे समाजाला रुचणारे नव्हते. पण त्यांच्या विरोधाला न बधता ती तिचे आयुष्य मुक्तपणे जगत राहिली.
ह्याच काळात अनुभवमंडपाच्या सर्व विद्वान, ज्ञानी दिग्गजांनी तिला ''अक्का'' म्हणून (मोठी बहीण) संबोधायला प्रारंभ केल्याचे दिसते. कल्याण सोडताना ती हे वचन म्हणते,
''षड्रीपुंवर विजय मिळवून व शरीर-विचार -वाणी ह्या त्रयीचा अंत करून द्वैतात; आणि आता 'मी व परमात्मा' ह्या द्वैताचा अंत करून अद्वैतात मी केवळ आपल्या सर्वांच्या कृपेमुळे जाऊ शकले. मी येथे बसलेल्या सर्व विद्वज्जनांना, बसवण्णांना व अलम्माप्रभू-माझ्या गुरुंना प्रणिपात करते. आणि आता मी माझ्या चेन्नमल्लिकार्जुनाशी एकरूप व्हावे म्हणून आपण सारे मला आशीर्वाद द्या.''
ही होती अक्कामहादेवीच्या आयुष्यातील तिसऱ्या पर्वाची सुरुवात! पहिल्या पर्वात तिने भौतिक जगतातील वस्तूंचा व आकर्षणांचा त्याग केलेला... दुसऱ्या पर्वात तिने जगाचे रीतिरिवाज, नियम धुत्कारले व तिसऱ्या पर्वात ती श्रीशैलक्षेत्राच्या शिवमंदिराकडे आपला प्रवास सुरू करते - जिथे तिच्या अमरप्रेमाचा - चेन्नमल्लिकार्जुनाचा वास आहे. हे क्षेत्र १२व्या शतकाच्याही आधीपासून पवित्र स्थान म्हणून ख्यात आहे. श्रीशैलच्या निबिड अरण्यातील कदली ह्या स्थानी अक्का आपले शरीर त्यागते.

ती तिच्या वचनांत म्हणते,
१. '' लोक,
स्त्री अथवा पुरुष,
लाजतात जेव्हा त्यांची वस्त्राने झाकलेली शरम
उघडी पडते

जेव्हा जीवांचा अधिपती
ह्या जगात बिनचेहऱ्याने वावरतो
तेव्हा तुम्ही कसली लाज बाळगताय?

जेव्हा सारं जग त्या ईश्वराचेच नेत्र
सर्वदर्शी, सर्वसाक्षी,
तेव्हा तुम्ही काय काय लपवणार?''

तिच्या वचनांतून तिची साधी राहणी, निसर्गप्रेम व चेन्नमल्लिकार्जुनाप्रती भक्ती दिसून येते. ती गाते :

२.'' भुकेच्या निवारणासाठी कटोऱ्यात गावातला तांदूळ आहे,
तहान भागवण्यासाठी नद्या, झरे आणि विहिरी आहेत,
निद्रेसाठी मंदिरांचे भग्नावशेष उत्तम आहेत आणि;
आत्मसुखासाठी हे चेन्नमल्लिकार्जुना, माझ्यापाशी तू आहेस! ''

३.''तुम्ही हातातील पैसा जप्त करू शकता
पण तुम्ही शरीराचे वैभव जप्त करू शकता का?

किंवा ल्यालेली वस्त्रे तुम्ही फेडू शकता
पण नग्नता, नसलेपण
झाकणारं, आच्छादणारं,
तुम्ही फेडू शकता का?

एका निर्लज्ज मुलीला
जी पद्मपुष्पाप्रमाणे, जुईच्या शुभ्रतेप्रमाणे असणाऱ्या
ईश्वराच्या प्रभातीचा प्रकाश ल्याली आहे;
तिला, हे मूर्खा, कोठे आहे आच्छादनाची किंवा आभूषणांची गरज? ''

श्री शैल मंदिर :

[ इंग्रजीतील ओळी :
१. People,
male and female,
blush when a cloth covering their shame
comes loose

When the lord of lives
lives drowned without a face
in the world, how can you be modest?

When all the world is the eye of the lord,
onlooking everywhere, what can you
cover and conceal?

२. For hunger, there is the village rice in the begging bowl,
For thirst, there are tanks and streams and wells
For sleep temple ruins do well

For the company of the soul I have you, Chenna Mallikarjuna!

३. You can confiscate
money in hand;
can you confiscate
the body's glory?

Or peel away every strip
you wear,
but can you peel
the Nothing, the Nakedness
that covers and veils?

To the shameless girl
wearing the White Jasmine Lord's
light of morning,
you fool,
where's the need for cover and jewel? ]

अशा ह्या एका मनस्वी, मुक्त, अलौकिक स्त्री संतश्रेष्ठीला मनःपूर्वक अभिवादन!

तिच्या वचनांच्या ह्या काही यूट्यूबवरच्या लिंक्स आहेत. कर्नाटकी धाटणीत ही वचने गायलेली आहेत.

http://www.youtube.com/watch?v=fkPUd2_r-Gk

http://www.youtube.com/watch?v=lo6fMzp4_sA

अक्का महादेवीचे 'अक्का केळवा' वचन मल्लिकार्जुन मन्सूरांच्या आवाज़ात :

शब्द अक्कामहादेवीचे, बसवराज राजगुरुंची भटियारातली चाल, आवाज़ बसवराजांचा शिष्य नचिकेत शर्मा याचा :

[वरील बरीचशी माहिती आंतरजालावर उपलब्ध आहे तसेच अक्का महादेवीच्या वचनांचे शब्द, अर्थ इ. ही उपलब्ध आहेत. सर्वांना ह्या तेजस्वी स्त्री संतिणीची ओळख करून देणे हाच ह्या लेखामागील उद्देश!]

-- अरुंधती कुलकर्णी
http://iravatik.blogspot.com/

संगीतमांडणीसंस्कृतीप्रेमकाव्यवावरधर्मइतिहाससाहित्यिकसमाजजीवनमानशिक्षणप्रकटनविचारलेखआस्वाद

प्रतिक्रिया

सुचेल तसं's picture

11 Apr 2010 - 5:06 am | सुचेल तसं

सुंदर लेख आणि फोटो...अक्का महादेवींची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद....

नंदू's picture

11 Apr 2010 - 5:57 am | नंदू

सुंदर लेख. वाचकांना महादेवींची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

अरुंधती's picture

11 Apr 2010 - 1:09 pm | अरुंधती

सुचेल तसं व नंदू, प्रतिसादाबद्दल आभार! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मदनबाण's picture

11 Apr 2010 - 1:12 pm | मदनबाण

सुंदर लेखामुळे नविन माहिती मिळाली... :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

शुचि's picture

11 Apr 2010 - 1:20 pm | शुचि

धन्यवाद अरुंधती. छान माहीती मिळाली तुझ्यामुळे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

आळश्यांचा राजा's picture

11 Apr 2010 - 11:34 pm | आळश्यांचा राजा

या श्रेष्ठ संन्यासिनीला स्त्रीमुक्तीवादी म्हणणे योग्य वाटत नाही. मर्यादा घातल्यासारखे वाटते. ती स्त्री-पुरुष द्वैताच्या पलीकडे गेलेली वाटते. केवळ मुक्तीवादी म्हणूया हवं तर.

या संत स्त्री विषयी फार माहिती नसते. चांगली ओळख करून दिली आहे. धन्यवाद!

आळश्यांचा राजा

अरुंधती's picture

12 Apr 2010 - 2:25 pm | अरुंधती

खरं तर अक्कामहादेवी म्हणजे संत कवयित्री! एक आत्मसाक्षात्कारी स्त्री! पण १२व्या शतकात तिने केलेलं बंडही लक्षणीय होतं.... प्रस्थापित समाज, रूढी, परंपरा यांना थेट आव्हान होतं ते.... आणि तसं उन्मुक्त आयुष्य ती जगली! एवढेच नव्हे तर तत्कालीन स्त्रियांना प्रेरणा देऊन गेली, त्यांना सक्षम होण्याची - अबला नव्हे तर सबला होण्याची स्फूर्ती देऊन गेली... म्हणून सध्याच्या भाषेत ती एक स्त्रीमुक्तीवादी.... पण तिचं कार्य त्यापेक्षा खूप खूप मोठं आहे हे नक्की! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

12 Apr 2010 - 2:40 pm | स्वाती दिनेश

परिचय आवडला, नवी माहिती समजली.
स्वाती

वाहीदा's picture

12 Apr 2010 - 6:19 pm | वाहीदा

बाराव्या शतकात जन्म झालेली स्त्री , पुरोगामी मतांची होती हे वाचून सुखद धक्का बसला !
नवीन माहिती आवडली .
~ वाहीदा