वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - फायनल - भारत विरुद्ध श्रीलंका

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
8 Mar 2017 - 8:07 am

२ एप्रिल २०११
वानखेडे, मुंबई

भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडीयममध्ये वर्ल्डकपचे संयुक्त यजमान असलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यात वर्ल्डकपची फायनल रंगणार होती. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दोन आशियाई संघ समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती. सेमीफायनलमध्ये श्रीलंकेने कोलंबोला न्यूझीलंडचा पराभव केला होता तर भारताने मोहालीला पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमधलं आपलं रेकॉर्ड ५-० असं पुढे नेलं होतं. सचिन तेंडुलकरचं होम ग्राऊंड असलेल्या वानखेडेच्या मैदानावर वर्ल्डकप उंचावण्यास भारतीय संघ उत्सुक होता तर इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायर होण्यापूर्वी शेवटच्या मॅचमध्ये खेळणार्‍या मुथय्या मुरलीधरन्साठी वर्ल्डकप जिंकण्याच्या जिद्दीने श्रीलंकन संघ मैदानात उतरणार होता!

महेंद्रसिंग धोणीच्या भारतीय संघात अनुभवी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग, विराट कोहली, सुरेश रैना असे बॅट्समन होते. त्यांच्या जोडीला स्वतः धोणी होताच! भारतीय बॉलिंगचा भर प्रामुख्याने होता तो झहीर खान आणि हरभजन सिंग यांच्यावर. त्यांच्या जोडीला मुनाफ पटेल होता. सेमीफायनलनंतर आशिश नेहराला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या ऐवजी श्रीशांतची निवड करण्यात आली होती. मात्रं सेमीफायनलप्रमाणेच फायनलमध्येही रवीचंद्रन अश्विनचा समावेश करण्यात आलेला नव्हता.

कुमार संगकाराच्या श्रीलंकन संघात स्वतः संगकारा, महेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान, उपुल तरंगा, थिलन समरवीरा असे बॅट्समन होते. ऑलराऊंडर अँजेलो मॅथ्यूजला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या ऐवजी चामरा कापुगेदेराचा संघात समावेश करण्यात आला होता. श्रीलंकेच्या बॉलिंगची मदार अर्थातच लसिथ मलिंगा आणि मुथय्या मुरलीधरन यांच्यावर होती. त्यांच्या जोडीला नुवान कुलशेखरा होता, पण रंगना हेरथ आणि अजंथा मेंडीस यांना मात्रं वगळण्यात आलं होतं. त्यांच्या ऐवजी ऑफस्पिनर सूरज रणदीव आणि थिसरा परेरा यांची निवड करण्यात आली होती.

मॅच सुरु होण्यापूर्वी टॉसच्या वेळेस काहीसा गोंधळ झाला. पहिल्यांदा टॉस करण्यात आला तेव्हा महेंद्रसिंग धोणीने आपण टॉस जिंकला या कल्पनेने आपण बॅटींग करणार असल्याचं रवी शास्त्रीला सांगितलं. पण कुमार संगकाराचा कॉल नेमका काय होता हे मॅच रेफ्री जेफ क्रोला नीट ऐकूच आलं नसल्याने पुन्हा टॉस करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी संगकाराने टॉस जिंकल्यावर बॅटींग करण्याचा निर्णय घेतला!

तिलकरत्ने दिलशान आणि उपुल तरंगा यांनी सुरवातीला सावध पवित्रा घेत भारतीय बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. झहीर खानच्या पहिल्या अचूक ओव्हरनंतर दुसर्‍या ओव्हरमध्ये श्रीशांतच्या बॉलवर दिलशानविरुद्धं एलबीडब्ल्यूचं जोरदार अपिल अंपायर आलिम दरने फेटाळून लावलं. झहीर खानने तरंगाला लागोपाठ दोन मेडन ओव्हर्स टाकत अक्षरशः खिळवून ठेवलं होतं. अखेर ६ व्या ओव्हरमध्ये दिलशानने श्रीशांतला मिडविकेट्ला पूलची बाऊंड्री मारल्यावर त्याच ओव्हरमध्ये स्क्वेअरकट्ची बाऊंड्री तडकावली. पण पुढच्याच ओव्हरमध्ये....

झहीर खानचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
तरंगाने फ्रंटफूटवर येत बॉल डिफेंड करण्याचा प्रयत्नं केला...
टप्पा पडल्यावर बॉल सिम झाला आणि तरंगाच्या बॅटची एज लागली...
पहिल्या स्लिपपेक्षा काहीशा दूर असलेल्या वीरेंद्र सेहवागने उजव्या बाजूला डाईव्ह मारत कॅच घेतला...
श्रीलंका १७ / १!

तरंगा आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या कुमार संगकाराने सावधपणे भारतीय बॉलर्सना खेळून काढत १-२ रन्स काढण्यावर भर दिला. श्रीशांतच्या जागी बॉलिंगला आलेला मुनाफ पटेल आणि झहीरच्या अचूक बॉलिंगमुळे संगकारा - दिलशान यांना फटकेबाजीची फारशी संधी मिळत नव्हती. अखेर १२ व्या ओव्हरमध्ये पटेलच्या हाफव्हॉलीवर संगकाराने त्याच्या टिपीकल स्टाईलमध्ये एक पाय गुडघ्यात दुमडून खाली बसत कव्हरड्राईव्हची बाऊंड्री फटकावली. झहीरच्या ऐवजी बॉलिंगला परतलेल्या श्रीशांतला संगकाराने क्रीजमधून पुढे सरसावत मिडऑनवरुन बाऊंड्री मारली. पुढच्याच बॉलवर फॉलो थ्रूमध्ये संगकाराचा स्ट्रेट ड्राईव्ह श्रीशांतला अडवता आला नाही. श्रीशांतच्या शेवट्च्या बॉलवर दिलशानच्या बॅटची एज लागून बॉल थर्डमॅन बाऊंड्रीपार गेल्याने श्रीलंकेला ओव्हरमध्ये १५ रन्स मिळाल्या. पटेल आणि श्रीशांतच्या ऐवजी बॉलिंगला आलेला हरभजनसिंग यांच्या अचूक बॉलिंगमुळे पुढच्या ३ ओव्हर्समध्ये संगकारा - दिलशान यांना फारसं काही करता आलं नाही. पुढच्या ओव्हरमध्ये....

हरभजनसिंगचा बॉल लेगस्टंपवर पडला...
दिलशानने स्वीप मारण्याचा प्रयत्नं सपशेल फसला...
बॉल त्याच्या अपेक्षेपेक्षा बाऊंस झाला आणि त्याच्या ग्लोव्ह्जला लागून थायपॅडवर गेला...
थायपॅडला लागलेला बॉल गेला तो थेट लेगस्टंपवर!\
दिलशान बोल्ड झाला!

४९ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह दिलशानने ३३ रन्स फटकावल्या.
श्रीलंका ६० / २!

दिलशान आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या महेला जयवर्धनेने नेहमीच्या स्टाईलमध्ये कोणतीही रिस्क न घेता रन्स काढण्यास सुरवात केली. हरभजनसिंगच्या बॉलवर त्याने पॉईंटला बाऊंड्री मारल्यावर त्याच ओव्हरमध्ये त्याच्या बॅटची एज लागून बॉल थर्डमॅन बाऊंड्रीपार गेला. मुनाफ पटेलच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या श्रीशांतला तर जयवर्धनेने स्लिप्समधून चक्कं लेटकट् ची बाऊंड्री मारली! धोणीने श्रीशांतच्या ऐवजी युवराज सिंगला बॉलिंगला आणलं, पण जयवर्धनेला काहीच फरक पडला नाही. युवराजच्या शॉर्टपीच बॉलवर त्याने मिडविकेटला पूलची बाऊंड्री फटकावली! हरभजनसिंग - युवराज यांच्या ३ अचूक ओव्हर्सनंतर जयवर्धनेने युवराजला लेटकट्ची बाऊंड्री मारण्यात कोणतीही हयगय केली नाही. जयवर्धनेचा हा कारभार सुरु असताना संगकारा चाणाक्षपणे स्ट्राईक रोटेट करत होता. ११ ओव्हर्समध्ये या दोघांनी ६२ रन्सची पार्टनरशीप केली. हे दोघं भारताला त्रासदायक ठरणार अशी चिन्हं दिसत असतानाच...

अराऊंड द विकेट बॉलिंग करणार्‍या युवराज सिंगचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
संगकाराने बॅकफूटवर जात बॉल कट् करण्याचा पवित्रा घेतला...
बॉल त्याच्या अपेक्षेपेक्षा किंचित जास्तं बाऊंस झाल्याने त्याच्या बॅटची एज लागली....
धोणी हा कॅच सोडणं शक्यंच नव्हतं!

६७ बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह संगकाराने ४८ रन्स फटकावल्या.
श्रीलंका १२२ / ३!

संगकारा आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या थिलन समरवीराला श्रॉशांत आणि युवराज सिंगच्या बॉलिंगवर थर्डमॅनला २ सुदैवी बाऊंड्री मिळाल्या. श्रीशांतच्या पुढच्या ओव्हरमध्ये जयवर्धनेने कट्ची बाऊंड्री मारली. पुढच्या ओव्हरमध्ये....

युवराजचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
समरवीराने ऑफस्टंपच्या बाहेर जात तो फाईनलेगला स्वीप करण्याचा प्रयत्नं केला...
त्याच्या अपेक्षेपेक्षा बॉल किंचित स्लो आल्याने बॉल हवेत गेला...
धोणीने कॅच घेतला आणि अपिल केलं, पण अंपायर आलिम दरने ते फेटाळून लावलं....
धोणीने डीआरएसचा आधार घेत थर्ड अंपायर इयन गूल्डकडे दाद मागितली...
टीव्ही रिप्लेमध्ये बॉल समरवीराच्या पॅडला लागल्याचं स्पष्टं दिसत होतं, पण ग्लोव्ह्जला लागल्याची कोणतीही खूण आढळली नाही...
समरवीराला 'बेनिफीट ऑफ डाऊट' मिळाला!

युवराजची ओव्हर संपल्यावर श्रीशांतच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या खेळाडूला पाहून वानखेडेवरच्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला...
सचिन तेंडुलकर!

सचिनच्या पहिल्या ओव्हरमध्ये जयवर्धने - समरवीरा यांनी कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढण्यावरच भर दिला. युवराजच्या पुढच्या ओव्हरमध्ये जयवर्धनेने स्वीपची बाऊंड्री मारली. युवराजच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या विराट कोहलीला कट्ची बाऊंड्री फटकावण्यात जयवर्धनने कोणतीही कसूर केली नाही. कोहलीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या झहीर खानच्या स्लो बॉलवरही त्याने लेटकट्ची बाऊंड्री मारली. जयवर्धने - समरवीरा यांनी ५७ रन्सची पार्टनरशीप केल्यावर...

युवराजचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
समरवीराने ऑफस्टंपच्या बाहेरून बॉल स्वीप करण्याचा प्रयत्नं केला पण बॉल त्याच्या पॅडवर लागला...
धोणी आणि युवराजनी एलबीडब्ल्यूसाठी केलेलं अपिल अंपायर सायमन टॉफेलने फेटाळून लावलं...
युवराजला समरवीरा आऊट असल्याची इतकी खात्री होती की त्याने धोणीला डीआरएस वापरण्याचा आग्रह केला...
युवराजच्या आग्रहाखातर अखेर धोणीने थर्ड अंपायर बाऊडेनकडे दाद मागितली...
टीव्ही रिप्लेमध्ये बॉल ऑफस्टंपच्या लाईनमध्ये समरवीराच्या पॅडवर लागल्याचं आणि मिडलस्टंपवर जात असल्याचं स्पष्टं झालं!

संपूर्ण वर्ल्डकपमध्ये डीआरएस मुळे बदलण्यात आलेला सायमन टॉफेलचा हा एकमेव निर्णय होता.
श्रीलंका १७९ / ४!

कापुगेदेरा आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या नुवान कुलशेखराने सावधपणे भारतीय बॉलर्सना खेळून काढत जयवर्धनेला सपोर्ट देण्याची भूमिका घेतली. झहीर खानच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या मुनाफ पटेलला कट् मारण्याचा कुलशेखराचा प्रयत्नं फसल्यावर धोणीने कॅचचं अपिल केलं पण अंपायर आलिम दरने ते फेटाळलं. धोणीने डीआरएसचा आधार घेत थर्ड अंपायरकडे दाद मागितली पण आलिम दरचा निर्णय योग्यं असल्याचं स्पष्टं झालं. आणखी २ बॉल्सनंतर जयवर्धनेने पटेलला पॉईंटला बाऊंड्री मारली. ४५ ओव्हर्सनंतर श्रीलंकेचा स्कोर होता २११ / ५!

झहीर खानच्या बॉलवर जयवर्धनेने कट्ची बाऊंड्री मारली. पटेलच्या पुढच्या ओव्हरमध्ये कुलशेखराने फाईनलेगला बाऊंड्री मारल्यावर त्याच ओव्हरमध्ये जयवर्धनेने थर्डमॅनला बाऊंड्री मारण्यात कोणतीही हयगय केली नाही. पुढच्या ओव्हरमध्ये....

झहीर खानचा पहिला बॉल लेगस्टंपवर पडला...
कुलशेखराने तो मिडविकेटवरुन उचलला...
बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार गेला.... सिक्स!

पुढच्या दोन बॉल्सवर ३ रन्स निघाल्यावर....

झहीर खानचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
जयवर्धनेने लेगसाईडला सरकत तो पॉईट आणि शॉर्ट थर्डमॅनच्या वरुन तडकावला...
बॉल थर्डमॅन बाऊंड्रीपार गेला....

पाचवा बॉल ऑफस्टंपवर पडला...
पुन्हा एकदा लेगसाईडला सरकत जयवर्धनेने तो मिडऑफवरुन फटकावला....
बॉल लाँगऑफ बाऊंड्रीपार गेला....

महेला जयवर्धनेची सेंचुरी पूर्ण झाली!
८५ बॉल्समध्ये!

झहीरचा सहावा बॉल लेगस्टंपवर पडला...
जयवर्धनेने तो ग्लान्स करण्याचा प्रयत्नं केला पण बॉल धोणीच्या ग्लोव्हजमध्ये गेला...
कुलशेखराने बाय चोरण्याच्या इराद्याने जयवर्धनेला कॉल दिला पण....
महेंद्रसिंग धोणीने शांत डोक्याने स्टंप्सचा वेध घेतल्याने कुलशेखरा रनआऊट झाला!

३० बॉल्समध्ये १ बाऊंड्री आणि १ सिक्ससह कुलशेखराने ३२ रन्स फटकावल्या.
श्रीलंका २४८ / ६!

कुलशेखराच्या ऐवजी बॅटींगला आलेल्या थिसरा परेराने हरभजनसिंगच्या ४९ व्या ओव्हरमध्ये बाऊंड्री मारली. शेवटच्या ओव्हरमध्ये....

झहीर खानच्या पहिल्या २ बॉल्सवर जयवर्धने - परेरा यांनी २ रन्स काढल्या...

झहीरचा तिसरा बॉल ऑफस्टंपवर आलेला फुलटॉस होता...
परेराने लेगसाईडला सरकत तो एक्स्ट्राकव्हरवरुन तडकावला.... बाऊंड्री!

चौथा बॉल मिडलस्टंपवर पडला...
परेराने याखेपेला तो मिडऑनवरुन फटकावला... बाऊंड्री!

पाचव्या बॉलवर मिडविकेट बाऊंड्रीवर विराट कोहलीने बॉल बाऊंड्रीपार जाण्यापासून अडवला पण परेराने २ रन्स काढल्या...

शेवटचा बॉल लेगस्टंपवर पडला...
परेराने तो लेगसाईडला उचलला...
बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार गेला... सिक्स!

झहीर खानच्या शेवटच्या ओव्हरमध्ये १८ रन्स झोडपल्या गेल्या!
बॅटींग पॉवरप्लेमधल्या शेवटच्या ५ ओव्हर्समध्ये जयवर्धने, कुलशेखरा आणि परेरा यांनी ६३ रन्स फटकावून काढल्या!

५० ओव्हर्सनंतर श्रीलंकेचा स्कोर होता २७४ / ६!

महेला जयवर्धने ८८ बॉल्समध्ये १३ बाऊंड्रीसह १०३ रन्स फटकावत नॉटआऊट राहीला.

कुमार संगकारा म्हणाला
"I knew he was going to get runs that day. He just had that look."

वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारतापुढे २७५ रन्सचं टार्गेट होतं.
भारताने हे टार्गेट गाठल्यास वर्लकप फायनलमधला तो रेकॉर्ड रनचेस ठरणार होता.

पहिल्याच ओव्हरमध्ये....

लसिथ मलिंगाचा दुसरा बॉल ऑफस्टंपवर पडला....
वीरेंद्र सेहवागने बॅकफूटवर जात तो मिडऑनला फ्लिक करण्याचा प्रयत्नं केला....
सेहवागच्या अंदाजाप्रमाणे बॉल किंचित वेगाने आल्याने मिडलस्टंपसमोर तो त्याच्या पॅडवर आदळला...
अंपायर आलिम दारचं बोट वर गेलं!
सेहवागने क्षणाचाही विचार न करता डीआरएसचा वापर करत अंपायर इयन गूल्डकडे दाद मागितली...
टीव्ही रिप्लेमध्ये आलिम दरचा निर्णय अचूक असल्याचं निष्पन्नं झालं.
भारत ० / १!

सेहवाग आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या गौतम गंभीरने पहिल्याच बॉलवर स्क्वेअरलेगला बाऊंड्री मारली. मलिंगा आणि नुवान कुलशेखरा यांच्या अचूक दोन ओव्हर्सनंतर चौथ्या ओव्हरमध्ये सचिनने कुलशेखराला त्याचा ठेवणीतला स्ट्रेट ड्राईव्ह फटकावल्यावर वानखेडेवरील प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. आणखीन १ बॉलनंतर कुलशेखराच्या ऑफस्टंपबाहेर पडलेल्या बॉलवर सचिनने सणसणीत स्क्वेअरकटची बाऊंड्री तडकावली. मलिंगाच्या अचूक ओव्हरनंतर कुलशेखराच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या थिसरा परेराला गंभीरने क्रीजमधून पुढे सरसावत कव्हर्समधून बाऊंड्री मारली, पण पुढच्याच ओव्हरमध्ये....

मलिंगाचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
सचिनने फ्रंटफूटवर येत कव्हरड्राईव्ह मारणाचा प्रयत्नं केला...
टप्पा पडल्यावर बॉल सीम होऊन बाहेर गेल्यामुळे सचिनच्या बॅटची एज लागली...
कुमार संगकारा हा कॅच सोडणं शक्यंच नव्हतं!

वानखेडेवर सन्नाटा पसरला...
भारत ३१ / २!

सचिन परतल्यावर मलिंगा - कुलशेखरा आणि मलिंगाच्या ऐवजी बॉलिंगला परतलेला परेरा यांच्या पुढच्या ३ ओव्हर्समध्ये केवळ ४ रन्स निघाल्या. अखेर आपल्या ११ व्या बॉलवर कुलशेखराला स्क्वेअरलेगला फ्लिकची बाऊंड्री मारत विराट कोहलीने आपल्या इनिंग्जची सुरवात केली. परेराच्या पुढच्या ओव्हरमध्ये गंभीरने पुन्हा क्रीजमधून पुढे सरसावत मिडविकेटवरुन बाऊंड्री फटकावली. कुलशेखराच्या पुढच्या ओव्हरमध्ये गंभीरने कव्हर्समधून बाऊंड्री तडकावल्यावर त्याच ओव्हरमध्ये पूल करण्याच्या प्रयत्नात कोहलीची टॉप एज लागली, पण त्याच्या सुदैवाने बॉल फाईनलेग बाऊंड्रीपार गेल्याने त्याला बाऊंड्री मिळाली. कुलशेखराच्या ऐवजी सेहवाग ९९ वर खेळत असताना मुद्दाम नो बॉल टाकणारा ऑफस्पिनर सूरज रणदीव बॉलिंगला आल्यावर...

रणदीवचा बॉल लेगस्टंपवर पडला....
गंभीरने लेगसाईडला सरकत तो कव्हर्सवरुन फटकावण्याचा प्रयत्नं केला...
त्याच्या अपेक्षेपेक्षा बॉल जास्तं बाऊंस झाल्याने तो हवेत गेला...
लाँगऑफला असलेल्या कुलशेखरा कॅच घेण्यासाठी काहीसा उशिराच धावला...
शेवटी व्हायचा तोच परिणाम झाला...
कुलशेखराच्या हातातून कॅअ सुटला...

परेराच्या पुढच्या ओव्हरमध्ये गंभीरने पुन्हा क्रीजमधून पुढे सरसावत फाईनलेगला लेग ग्लान्सची बाऊंड्री मारल्यावर संगकाराने त्याच्या ऐवजी तिलकरत्ने दिलशानला बॉलिंगला आणलं पण गंभीरवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. पुढच्या ओव्हरमध्ये...

रणदीवचा बॉल लेगस्टंपवर पडला...
गंभीर एक पाय दुमडून गुडघ्यावर खाली बसला आणि त्याने स्लॉग स्वीप मारला...
सहसा फारसा स्वीप न मारणार्‍या गंभीरचा हा शॉट अचूक बसला...
बॉल मिडविकेट बाऊंडीपार गेला...

मुथय्या मुरलीधरन बॉलिंगला आल्यावर गंभीर - कोहली यांनी सावध पवित्रा घेत १-२ रन्स काढण्यावरच लक्षं केंद्रीत केलं. रणदीवच्या बॉलवर कोहलीने लेग ग्लान्सची बाऊंड्री मारल्यावर संगकाराने त्याच्याऐवजी पुन्हा दिलशानला बॉलिंगला आणलं. कोहलीने दिलशानला स्क्वेअरकट्ची बाऊंडी मारली, पण पुढच्याच बॉलवर...

दिलशानचा बॉल लेगस्टंपवर पडला...
कोहलीने तो मिडविकेटला फ्लिक करण्याचा प्रयत्नं केला...
त्याच्या अपेक्षेपेक्षा बॉल किंचित स्लो आल्याने त्याच्या बॅटची लिडींग एज लागली....
दिलशानने फॉलो थ्रू मध्ये जवळापास नॉनस्ट्रायकर असलेल्या गंभीरच्या समोर डाईव्ह मारत अप्रतिम कॅच घेतला...

४९ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह कोहलीने ३५ रन्स फटकावल्या.
सचिन - सेहवाग परतल्यावर गंभीरबरोबर ८१ रन्सची पार्टनरशीप करत त्याने भारताची इनिंग्ज सावरली होती...
भारत ११४ / ३!

विराट कोहली परतल्यावर वर्ल्डकपमध्ये जोरदार फॉर्मात असलेला युवराज सिंग बॅटींगला येईल अशीच सर्वांची अपेक्षा होती, पण बॅटींगला आला महेंद्रसिंग धोणी!

गंभीर आणि धोणी यांनी शांत डोक्याने श्रीलंकन बॉलर्सना खेळत १-२ रन्स काढण्यावर भर दिला. हे दोघं दिलशान - मुरलीधरन यांना आरामात खेळून काढत असलेले पाहून संगकाराने विकेट मिळवण्याच्या दृष्टीने मलिंगाला बॉलिंगला आणलं, पण मलिंगाचा ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला यॉर्कर गंभीरने थर्डमॅनला चॉप करत बाऊंड्री वसूल केली. पण पुढच्याच ओव्हरमध्ये....

दिलशानचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
क्रीजमधून पुढे सरसावत कव्हर्समधून बॉल फटकावण्याचा गंभीरचा प्रयत्नं पार फसला...
गंभीरच्या सुदैवाने त्याच्या बॅटची इनसाईड एज लागली...
संगकाराला कोणतीही संधी न देता बॉल फाईनलेग बाऊंड्रीपार गेला!

मुरलीधरनच्या बॉलवर धोणीने बॅकफूटवर जात कव्हर्समधून बाऊंड्री फटकावली. संगकाराने मलिंगाच्या ऐवजी परेराला बॉलिंगला आणलं, पण धोणीने त्याला पॉईंटवरुन कट्ची बाऊंड्री तडकावण्यात कोणतीही हयगय केली नाही. मुरलीधरनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या कुलशेखराला गंभीरने क्रीजमधून पुढे सरसावत मिडविकेटला बाऊंड्री फटकावली, पण धोणीने त्याला संगकारा नेहमीप्रमाणे मागे उभा न राहता स्टंप्सजवळ उभा असल्याची जाणिव करुन दिली. रणदीवच्या पुढच्या ओव्हरमध्ये धोणीने बॅकफूटवर जात कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली.

वर्ल्डकप जिंकण्यासाठी शेवटच्या १४ ओव्हर्समध्ये भारताला ८४ रन्सची आवश्यकता होती!

संगकाराने कुलशेखराच्या ऐवजी पुन्हा मलिंगाला बॉलिंगला आणलं. मलिंगाच्या बॉलवर पूल मारत धोणीने वन डे मध्ये ६००० रन्स पूर्ण केल्या, पण एव्हाना त्याला पाठदुखीचा त्रास जाणवू लागला होता. पण मुरलीधरनच्या पुढच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्राकव्हरमधून बाऊंड्रू फटकावण्यात धोणीने कोणताही अनमान केला नाही. मुरलीधरनच्या ओव्हरमध्ये त्याने पुन्हा कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली! एव्हाना ९७ वर पोहोचलेला गंभीर सेंचुरी ठोकणार असं वाटत असतानाच...

मलिंगाच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या परेराचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
गंभीरने क्रीजमधून पुढे सरसावत लेगसाईडला सरकून कव्हर्सवरुन बॉल फटकावण्याचा प्रयत्नं केला...
गंभीरच्या दुर्दैवाने बॉल त्याच्या बॅटवर न लागता इनसाईड एजला लागून मिडल्स्टंपवर गेला...
वर्ल्डकप फायनलमध्ये सेंचुरी ठोकणं गंभीरच्या नशिबात नव्हतं!

१२२ बॉल्समध्ये ९ बाऊंड्रीसह गौतम गंभीरने ९७ रन्स फटकावल्या.
महेंद्रसिंग धोणीबरोबर १०९ रन्सची पार्टनरशीप करुन त्याने भारताला विजयपथावर आणून सोडलं होतं.
भारत २२३ / ४!

गंभीर आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या युवराज सिंगने परेराला मिडविकेटला पूलची बाऊंड्री फटकावत आक्रमक सुरवात केली. रणदीवच्या अचूक ओव्हरनंतर पुढच्या ओव्हरमध्ये...

परेराचा पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला शॉर्टपीच बॉल होता...
धोणीने बॅकफूटवर जात तो पॉईंटवरुन तडकावला....
बॉल पॉईंट बाऊंड्रीपार गेला...
भारतीय प्रेक्षकांच्या जल्लोषाने वानखेडे दणाणून गेलं... सिक्स!

६ ओव्हर्समध्ये भारताला अद्याप ३५ रन्सची आवश्यकता होती!

रणदीवच्या ४५ व्या ओव्हरचा पहिला बॉल युवराजने थर्डमॅनला खेळला...
धोणीने एक रनसाठी युवराजला कॉल दिला...
थर्डमॅनला कापुगेदेराने बॉल पिकअप केला आणि स्टंप्सचा अचूक वेध घेतला...
स्क्वेअरलेगला असलेल्या अंपायर सायमन टॉफेलने हा निर्णय थर्ड अंपायर इयन गूल्डकडे सोपवला...
टीव्ही रिप्लेमध्ये कापुगेदेराचा थ्रो स्टंप्सवर लागण्यापूर्वी धोणीने क्रीज गाठल्याचं स्पष्टं झालं!

दुसर्‍या बॉलला धोणीने १ रन काढल्यावर...

अराऊंड द विकेट बॉलिंग करणार्‍या रणदीवचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
युवराजने फ्रंटफूटवर येत बॉल डिफेंड करण्याचा पवित्रा घेतला...
बॉल त्याच्या पॅडवर लागताच रणदीव आणि संगकाराने एलबीडब्ल्यूचं केलेलं अपिल अंपायर आलिम दरने फेटाळलं...
रणदीवच्या आग्रहावरुन संगकाराने डीआरएसचा आधार घेत थर्ड अंपायर इयम गूल्डकडे दाद मागितली...
टीव्ही रिप्लेमध्ये युवराजच्या बॅटची इनसाईड एज लागून बॉल पॅडवर लागल्याचं स्पष्टं झालं...

५ ओव्हर्समध्ये भारताला ३० रन्स बाकी होत्या.

शेवटच्या ५ ओव्हर्स शिल्लक राहील्याने बॅटींग पॉवरप्ले आपोआपच सुरु झाला होता. संगकाराने शेवटचा उपाय म्हणून पुन्हा एकदा मलिंगाला बॉलिंगला आणलं. मलिंगाच्या अचूक ओव्हरमध्ये कोणतीही घाई न करता धोणी - युवराज यांनी ३ रन्स काढल्या, पण पुढच्या ओव्हरमध्ये...

कुलशेखराच्या पहिल्या बॉलवर युवराजने १ रन काढली...

दुसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
धोणीने तो मिडऑफ आणि कव्हर्समधल्या गॅपमधून तडकावला...
मिडऑफला असलेल्या रणदीवला कोणतीही संधी मिळाली नाही...
बॉल तुफान वेगाने लाँगऑफ बाऊंड्रीवर धडकला...

तिसर्‍या बॉलवर धोणीने लाँगऑफला १ रन काढल्यावर...

कुलशेखराने चौथा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्नं केला...
बॉल मिडलस्टंपवर फुलटॉस आला...
युवराजने तो मिडविकेट बाऊंड्रीवर फटकावण्यात कोणतीही कसूर केली नाही...

शेवटच्या ३ ओव्हर्समध्ये भारताला १६ रन्स हव्या होत्या!

श्रीलंकेच्या उरल्यासुरल्या सर्व आशा लसिथ मलिंगावर होत्या.
२००७ च्या वर्ल्डकपमध्ये मलिंगाने ४ बॉल्समध्ये ४ विकेट्स उडवून दक्षिण आफ्रीकेची हवा तंग करुन सोडली होती...
श्रीलंकेला वर्ल्डकप जिंकण्यासाठी अशाच एखाद्या चमत्काराची गरज होती...

मलिंगाच्या पहिल्या बॉलवर युवराजने १ रन काढल्यावर...

मलिंगाचा दुसरा बॉल लेगस्टंपच्या बाहेर पडला...
धोणीने शांत डोक्याने तो स्लो बॉल स्क्वेअरलेगला फ्लिक केला...
फाईनलेगवरुन धावत आलेल्या कुलशेखराने डाईव्ह मारली पण बॉल बाऊंड्रीपार गेला....

तिसरा बॉल पुन्हा लेगस्टंपच्या बाहेर पडलेला स्लो बॉल होता...
धोणीने तो चक्कं स्क्वेअरलेगला स्वीप केला...
यावेळी कुलशेखराला बॉलच्या जवळपास फिऱकण्याचाही चान्स मिळाला नाही...

चौथा बॉल लेगस्टंपच्या बाहेर पडलेला यॉर्कर होता...
धोणीने चाणाक्षपणे पाय उचलून बॉल संगकाराकडे सोडून दिला...

शेवटच्या २ बॉल्समध्ये धोणी - युवराज यांनी २ रन्स काढल्या...

एव्हाना वानखेडेवर प्रेक्षकांचा जल्लोष सुरु झाला होता!

४९ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर युवराजने १ रन काढल्यावर...

कुलशेखराचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
धोणीने तो मिडविकेटवरुन फटकावला...
बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार प्रेक्षकांमध्ये दिसेनासा झाला!

कॉमेंट्रीबॉसमध्ये असलेला रवी शास्त्री म्हणाला,
"Dhoni finishes off in style! A magnificent strike into the crowd! India lift the world cup in 28 years! Party begins in the Indian dressing room! And it’s an Indian captain who’s absolutely magnificent in the night of the final!"

भारताने वर्ल्डकप जिंकला!

युवराजने धोणीकडे धाव घेऊन त्याला मिठी मारली.
धोणी काहीसा गोंधळून गेला होता! नेमकी काय प्रतिक्रीया द्यावी हेच त्याला कळत नव्हतं...

"Emotionally, I was confused; I thought hug-vug we will do later, first take a stump. It was an emotional moment. I was confused, I didn't know what to do at the time, how to show my emotions."

भारताचे एकूण एक खेळाडू मैदानावर धावून आले!
सचिनच्या चेहर्‍यावरचा आनंद अवर्णनीय होता!
वानखेडेवर हजर असलेल्या प्रेक्षकांनी स्टेडीयम दणाणून सोडलं होतं!

सुरवातीचा आनंदाचा भर ओसरल्यानंतर भारतीय खेळाडूंनी आळीपाळीने सचिनला खांद्यावर बसवून वानखेडेला फेरी मारली!
सचिननंतर कोच गॅरी कर्स्टनलाही खांद्यावर बसवून मैदानाला फेरी मारण्यात आली!

विराट कोहली म्हणाला,
"Tendulkar has carried the burden of nation for 21 years; It was time we carried him!"

मॅच संपल्यावर बोलताना कुमार संगकारा म्हणाला,
"Mahela who rose up to the occasion and put up a great hundred. When you look at this Indian team anything less than 350 looks less! The only way to stop India is to get atleast 7 wickets. Gautam was outstanding and Dhoni stepped up and performed. We're going to miss Murli terribly. Unfortunately we couldn't give him a great send-off but that's the way it goes. We were outplayed and we have to accept that. India were the better side today."

महेंद्रसिंग धोणी म्हणाला,
"I took a quite few decisions tonight, if we hadn't won I would have been asked quite a few questions: Why no Ashwin, Why sreesanth. Why no Yuvraj, Why did I bat ahead? Gautam was batting well and all I needed to do was to rotate the strike. They had 3 off spinners, so it was important to have a left-right combination than two left handers against off spinners. I have played a lot with Murali and I know his doosra quite well, and he knows that also. I was able to put a bit of pressure on him! In this game, I wanted to bat up the order and Gary backed me and by the senior players. I had a point to prove to myself. I would have liked Gautam to go on and get that big hundred."

मॅन ऑफ द मॅच म्हणून धोणीचीच निवड करण्यात आली!
मॅन ऑफ द सिरीज म्हणून युवराज सिंगची निवड झाली!

युवराज म्हणाला,
"This is unbelievable. Under-19 World cup, then Twenty20 but this is the most special. For Sachin, for everyone else. Last time we were in World-cup final, we made lots of mistakes. Batting second is lot of pressure but Gauti and MS played outstandingly. We don't have a proper left-arm spinner and so it was my job to do it."

भारतीय संघातील एकूण एक खेळाडूंची हा वर्ल्डकप सचिनसाठी जिंकल्याची भावना होती.
स्वतः सचिनला काय वाटत होतं?

"Couldn't have asked for anything more than this!" सचिन म्हणाला, "Winning the world cup is the proudest moment of my life. Thanks to my team-mates. Without them, nothing would have happened. I couldn't control my tears of joy. Thanks to the support staff. Thanks to Mike Horn, who has helped with the expectations and pressure. The team stuck together in the rough phases and proved people wrong who doubted our ability. Self belief has been always there but in the last two years, we have been very consistent. It's been great honor to be part of this team. Thanks to Gary and Paddy Upton."

महेला जयवर्धनेने वर्ल्डकप फायनलमध्ये सेंचुरी ठोकली होती, पण तरीही पराभव पदरी पडल्याचं शल्यं त्याला बोचत होतं.
"I would swap that century any day for a championship medal. We fought well but it wasn't enough. We got a couple of early wickets but we couldn't get anything going after that. They batted very well. When Kumar got out I knew I had to bat the 50 overs. With the Powerplays you know you can catch up. I'm quite happy with the effort but unfortunately we ended up on the losing side."

वर्ल्डकप फायनलमध्ये सेंचुरी ठोकल्यावरही पराभव पत्करावा लागलेला महेला जयवर्धने हा एकमेव खेळाडू!

१९८३ च्या वर्ल्डकपपासून स्फूर्ती घेऊन क्रिकेटसाठी स्वतःला वाहून घेतल्यावर आणि १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यावर २२ वर्षांनी आपला ६ वा वर्ल्डकप खेळताना सचिनचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्नं अखेर साकार झालं होतं!

....आणि ते देखिल वानखेडे स्टेडीयमवर!
मुंबईत!

स्वतःच्या देशात वर्ल्डकप जिंकणारा पहिला संघ म्हणून वर्ल्डकपच्या इतिहासात भारताची नोंद झाली!
(१९९६ मध्ये श्रीलंका संयुक्त यजमान असले तरीही फायनल लाहोरला झाली होती)

सचिनच्या बरोबरीने गेल्या १५-२० वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत असलेल्या शिवनारायण चँडरपॉल, मुथय्या मुरलीधरन, जॅक कॅलीस आणि रिकी पाँटींगचा हा शेवटचा वर्ल्डकप!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

चिनार's picture

8 Mar 2017 - 9:40 am | चिनार

अप्रतिम वर्णन !!
षटकार ठोकून जिंकल्यावर धोनीच्या चेहऱ्यावरील भाव अजूनही आठवतात !!!

लोनली प्लॅनेट's picture

8 Mar 2017 - 11:18 am | लोनली प्लॅनेट

सचिन ची विकेट मिळाल्यावर श्रीलंकेला आता आपणच जिंकणार असेच वाटत होते परंतु गंभीर ने त्यांच्या आशेवर पाणी फेरले
प्रचंड दडपणाखाली केलेली गौतम गंभीर ची खेळी निव्वळ अफलातून होती परंतु त्याचे एवढे कौतुक झाले नाही जेवढे धोनी चे झाले

कपिलमुनी's picture

8 Mar 2017 - 7:04 pm | कपिलमुनी

या वर्ल्ड्कप आणि टी २० वर्ल्ड्कप फायनलमधील त्याच्या ईनिंगचे म्हणावे तेवढे कौतुक झाले नाही.

अभिजीत अवलिया's picture

11 Mar 2017 - 4:09 pm | अभिजीत अवलिया

गंभीरने ह्या सामन्यात दबावाखाली केलेली बॅटिंग म्हणजे एक अद्भुत खेळी होती. पण त्याच्या वाट्यास तितकेसे कौतुक आले नाही. कदाचित गंभीर 'सचिन' न्हवता हे कारण असावे असे वाटते.