वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
10 Mar 2017 - 9:30 am

२८ फेब्रुवारी २०१५
इडन पार्क, ऑकलंड

न्यूझीलंडच्या उत्तर बेटावरच्या ऑकलंडच्या ईडन पार्कच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन यजमान देशांतली पूल ए मधली मॅच रंगणार होती. न्यूझीलंडने श्रीलंका, इंग्लंड आणि स्कॉटलंड यांचा पराभव करुन आपल्या पहिल्या तीनही मॅचेस जिंकल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडला आरामात धूळ चारली होती, पण बांग्लादेशविरुद्ध ब्रिस्बेनच्या दुसर्‍या मॅचवर पाऊस पडला होता, त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने ही मॅच विशेष महत्वाची होती. ही मॅच जिंकल्यास क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश मिळवणं ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने सुकर होणार होतं.

मायकेल क्लार्कच्या ऑस्ट्रेलियन संघात डेव्हीड वॉर्नर, अ‍ॅरन फिंच, शेन वॉटसन, स्वतः क्लार्क, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल असे बॅट्समन होते. त्यांच्या जोडीला ब्रॅड हॅडीनसारखा विकेटकीपर - बॅट्समन होता. ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क आणि पॅट्री़क कमिन्स यांच्यावर होता. ऑलराऊंडर मिचेल मार्शचाही ऑस्ट्रेलियन संघात समावेश होता. आवशकता भासल्यास मॅक्सवेलच्या ऑफब्रेक्सचा तसेच शेन वॉटसनच्या मिडीयम पेसचा मायकेल क्लार्कला उपयोग करता येणार होता.

ब्रेंडन मॅक्कलमच्या न्यूझीलंड संघात स्वतः मॅक्कलम, मार्टीन गप्टील, केन विल्यमसन, रॉस टेलर असे बॅट्समन होते. ऑस्ट्रेलियाकडून वन डे मध्ये खेळलेला पण आता न्यूझीलंडच्या संघात असलेला ल्यूक राँचीसारखा विकेटकीपर - बॅट्समन होता. न्यूझीलंडच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी आणि न्यूझीलंड क्रिकेटचा Grand old man असलेला डॅन द मॅन व्हिटोरी यांच्यावर होता. त्यांच्या जोडीला अ‍ॅडम मिलेन होता. न्यूझीलंडची जमेची बाजू म्हणजे कोरी अँडरसन आणि ग्रँट इलियटसारखे दोन ऑलराऊंडर्स न्यूझीलंडच्या संघात होते!

मायकेल क्लार्कने टॉस जिंकल्यावर बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. अ‍ॅरन फिंच आणि डेव्हीड वॉर्नर यांनी सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. टिम साऊदीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये फिंचने लेग ग्लान्सची बाऊंड्री मारल्यावर साऊदीचा बंपर वॉर्नर आणि विकेटकीपर राँचीच्याही डोक्यावरुन गेल्याने ऑस्ट्रेलियाला ४ बाईजचा फुकटचा बोनस मिळाला. साऊदीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये १५ रन्स फटकावल्या गेल्या होत्या. दुसर्‍या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टला लेगसाईडला फटकावण्याच्या प्रयत्नात वॉर्नरची टॉप एज लागली पण बॉल थर्डमॅन बाऊंड्रीपलीकडे गेला. सिक्स! साऊदीच्या पुढच्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवर फिंचने स्ट्रेट ड्राईव्हची दुसरी सिक्स ठोकली, पण पुढच्याच बॉलवर....

साऊदीचा बॉल ऑफस्टंपच्या किंचित बाहेर पडला...
फिंचने फ्रंटफूटवर येत पुन्हा ड्राईव्ह मारण्याचा पवित्रा घेतला...
अचूक लेंग्थवर पडलेला साऊदीचा बॉल इनस्विंग झाला आणि फिंचच्या बॅट-पॅडमधून घुसला...
फिंचचा ऑफस्टंप उडाला!
ऑस्ट्रेलिया ३० / १!

फिंच आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या शेन वॉटसनने पहिल्याच बॉलवर स्क्वेअरलेगला बाऊंड्री मारली. बोल्टच्या अचूक ओव्हरनंतर वॉर्नरने साऊदीला फाईनलेग आणि स्क्वेअरलेगला लागोपाठ २ बाऊंड्री फटकावल्या. ६ ओव्हर्सनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता ५१ / १!

ब्रेंडन मॅक्कलमने साऊदीच्या ऐवजी डॅनियल व्हिटोरीला बॉलिंगला आणल्यावर ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक फटकेबाजीला खीळ बसली. व्हिटोरी आणि बोल्ट यांच्या अचूक बॉलिंगमुळे वॉर्नर आणि वॉटसन यांना फटकेबाजी करणं अवघड झालं होतं. वॉर्नर आणि वॉटसन यांनी ५० रन्सची पार्टनरशीप केल्यावर अखेर व्हिटोरीला फटकावण्याचा वॉटसनचा प्रयत्नं पार फसला आणि मिडविकेट बाऊंड्रीवर साऊदीने त्याचा कॅच घेतला. ऑस्ट्रेलिया ८० / २!

पुढच्याच बॉलवर...
साऊदीचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
वॉर्नरने बॅकफूटवर जात बॉल डिफेंड करण्याचा केलेला प्रयत्नं फसला...
बॉल मिडलस्टंपसमोर त्याच्या पॅडवर आदळला...
अंपायर रिचर्ड इलिंगवर्थचं बोट वर झालं!
वॉर्नरने डीआरएसचा आधार घेत थर्ड अंपायर सुंदरम रवीकडे दाद मागितली...
टीव्ही रिप्लेमध्ये बॉल मिडलस्टंपसमोर वॉर्नरच्या पॅडवर लागल्याचं आणि स्टंप्सला लागत असल्याचं स्पष्टं झालं...

४२ बॉल्समध्ये २ बाऊंड्री आणि १ सिक्ससह वॉर्नरने ३४ रन्स काढल्या.
ऑस्ट्रेलिया ८० / ३!

मायकेल क्लार्क आणि स्टीव्ह स्मिथ यांनी सावध पवित्रा घेत न्यूझीलंडच्या बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. साऊदीच्या बॉलवर क्लार्कने स्क्वेअरलेगला फ्लिकची बाऊंड्री मारली पण पुढच्याच ओव्हरमध्ये व्हिटोरीच्या बॉलवर स्मिथच्या बॅटची एज लागली आणि विकेटकीपर राँचीने त्याचा कॅच घेतला. ऑस्ट्रेलिया ९५ / ४!

स्मिथ आऊट झाल्यावर जेमतेम १ रनची भर पडल्यावर...

ट्रेंट बोल्टचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
मॅक्सवेलने तो ऑफसाईडला फटकावण्याचा प्रयत्नं केला...
मॅक्सवेलच्या अपेक्षेपेक्षा वेगाने आलेल्या बॉलमुळे त्याच्या बॅटची बॉटम एज लागली....
मॅक्सवेलचा ऑफस्टंप उडाला...
ऑस्ट्रेलिया ९६ / ५!

बोल्टचा पुढचा बॉल मिचेल मार्शने खेळून काढल्यावर पुढचा बॉल वाईड गेला...

पुढच्या बॉलवर मॅक्सवेलच्या विकेटचा अ‍ॅक्शन रिप्ले झाला...
फक्तं यावेळी आऊट होणारा बॅट्समन होता मिचेल मार्श!
ऑस्ट्रेलिया ९७ / ६!

मिचेल मार्श आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या ब्रॅड हॅडीनने व्हिटोरीला लेग ग्लान्सची बाऊंड्री मारली, पण पुढच्याच ओव्हरमध्ये....

बोल्टचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
क्लार्कने फ्रंटफूटवर येत तो ड्राईव्ह केला पण...
त्याच्या अपेक्षेपेक्षा बॉल किंचित स्लो आला होता...
शॉर्ट कव्हरला केन विल्यमसनने कॅच घेण्यात कोणतीही कसूर केली नाही!
ऑस्ट्रेलिया १०४ / ७!

क्लार्क आऊट झाल्यावर जेमतेम २ रन्सची भर पडते तोच...

बोल्टचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
मिचेल जॉन्सनने लेगस्टंपच्या बाहेर सरकत तो ऑफसाईडला ड्राईव्ह केला...
शॉर्ट कव्हरला विल्यमसनने उजवीकडे डाईव्ह मारत कॅच घेतला.
ऑस्ट्रेलिया १०६ / ६!

आणखीन २ बॉल्सनंतर...

बोल्टचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
मिचेल स्टार्कने बॉल लेगसाईडला येईल या अपेक्षेने डिफेंड करण्याचा पवित्रा घेतला...
टप्पा पडल्यावर बॉल सीम झाला आणि स्टार्कला चकवून मिडलस्टंपवर गेला!
ऑस्ट्रेलिया १०६ / ९!

ऑस्ट्रेलियाचा शेवटचा बॅट्समन पॅट्रीक कमिन्स बॅटींगला आल्यावर ब्रॅड हॅडीनने दुसरा कोणताही पर्याय न उरल्याने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. व्हिटोरीला मिडऑनवरुन बाऊंड्री तडकावल्यावर आणखीन एक बॉलनंतर हॅडीनने त्याला स्ट्रेट सिक्स ठोकली! कमिन्सने बोल्टची मेडन ओव्हर खेळून काढल्यावर टिम साऊदी आणि बोल्टच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या अ‍ॅडम मिलेनच्या २ ओव्हर्स सावधपणे खेळून काढल्यावर साऊदीच्या बॉलवर हॅडीनने कट्ची बाऊंड्री मारली. मिलेनच्या पुढच्या ओव्हरमध्ये हॅडीनने पॉईंटमधून बाऊंड्री फटकावल्यावर साऊदीच्या बॉलवर कमिन्सने मिडऑनला बाऊंड्री तडकावली. साऊदीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या कोरी अँडरसनच्या पहिल्याच बॉलवर हॅडीनने स्ट्रेट सिक्स ठोकली, पण पुढच्याच बॉलवर....

अँडरसनचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
हॅडीनने पुन्हा स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नं केला...
त्याच्या अपेक्षेपेक्षा बॉल किंचित स्लो आल्यामुळे हॅडीनच्या बॅटची एज लागली...
शॉर्ट थर्डमॅनला रॉस टेलरच्याऐवजी फिल्डींगला आलेल्या टॉम लॅथमने आरामात कॅच घेतला!

४१ बॉल्समध्ये ४ बाऊंड्री आणि २ सिक्ससह हॅडीनने ४३ रन्स फटकावल्या.
शेवटच्या विकेटसाठी हॅडीन आणि कमिन्स यांनी ४५ रन्सची पार्टनरशीप केली.

ऑस्ट्रेलिया १५१ रन्समध्ये ऑलआऊट झाले होते!

केवळ ३३ व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज आटपली होती!
ट्रेंट बोल्टने ५ विकेट्स उडवल्या होत्या!

ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज निर्धारीत साडेतीन तासांच्या आधी तासभर संपल्यामुळे न्यूझीलंडची इनिंग्ज लगेच सुरु होणार होती!

मार्टीन गप्टील आणि ब्रेंडन मॅक्कलमने न्यूझीलंडच्या अतिआक्रमक पवित्र्याला अनुसरुन पहिल्या बॉलपासूनच फटकेबाजीला सुरवात केली. मिचेल जॉन्सनच्या पहिल्याच नो बॉलवर गप्टीलने लेग ग्लान्सची बाऊंड्री मारल्यावर पुढच्या बॉलवर फ्री हीटवर त्याने लाँगऑफवर दणदणीत सिक्स ठोकली! दुसर्‍या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कला क्रीजमधून पुढे सरसावत मॅक्कलमने कव्हर्सवरुन सिक्स ठोकली. त्याच ओव्हरमध्ये त्याने स्टार्कला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. तिसर्‍या ओव्हरमध्ये...

मिचेल जॉन्सनचा पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
मॅक्कलमने फ्रंटफूटवर येत तो पॉईंट बाऊंड्रीपार तडकावला... सिक्स!

दुसरा बॉल ऑफस्टंपवर पडला....
मॅक्कलमने तो कव्हर्समधून तडकावला... बाऊंड्री!

जॉन्सनचा तिसरा बॉल अचूक पडलेला यॉर्कर होता. मॅक्कलमला त्यावर काहीच करता आलं नाही...
चौथा बॉल इतक्या वेगाने आला होता की मॅक्कलमलाही कोणतीही हालचाल करता आली नाही. बॉल त्याच्या हातावर आदळला...

पाचवा बॉल ऑफस्टंपवर पडला...
मॅक्कलमने तो लेगला सरकत थर्डमॅनला फटकावला... बाऊंड्री!

शेवटचा बॉल पूल करण्याचा मॅक्कलमचा प्रयत्नं बॉल इनसाईड एज लागून त्याच्या पॅडवर लागल्यामुळे यशस्वी झाला नाही!

जॉन्सनच्या ओव्हरमध्ये १४ रन्स फटकावल्या गेल्यावर पुढच्याच ओव्हरमध्ये स्टार्कला ड्राईव्ह करण्याचा गप्टीलचा प्रयत्नं पार फसला आणि मिडऑफला पॅट कमिन्सने त्याचा कॅच घेतला. न्यूझीलंड ४० / १!

गप्टील आऊट झाल्यानंतरही मॅक्कलमला काहीच फरक पडला नाही. केन विल्यमसनने जॉन्सनला लेग ग्लान्सची बाऊंड्री मारल्यावर मॅक्कलमने पुन्हा क्रीजमधून पुढे सरसावत त्याला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री फटकावली. जॉन्सनच्या पुढच्या ओव्हरमध्ये...

जॉन्सनचा शॉर्टपीच बॉल मिडलस्टंपवर पडला...
मॅक्कलमने बॅकफूटवर जात तो स्क्वेअरलेगला पूल केला... बाऊंड्री!

पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
मॅक्कलमने तो लाँगऑफ बाऊंड्रीपार उचलला... सिक्स!

पुढचा बॉल लेगस्टंपवर पडलेला बंपर होता....
मॅक्कलमने तो शॉर्टफाईनलेगला असलेल्या कमिन्सच्या वरुन पूल केला... बाऊंड्री!

जॉन्सनच्या त्या ओव्हरमध्ये १७ रन्स झोडपल्या गेल्या!

मायकेल क्लार्कने स्टार्कच्या ऐवजी पॅट्रीक कमिन्सला बॉलिंगला आणलं. कमिन्सच्या दुसर्‍याच बॉलवर न्यूझीलंडला ५ वाईड रन्सचा बोनस मिळाला पण आणखीन २ बॉल्सनंतर...

कमिन्सचा बॉल ऑफस्टंपच्या किंचित बाहेर पडला...
मॅक्कलमने लेगसाईडला सरकत तो मिडऑफवरुन उचलण्याचा प्रयत्नं केला पण...
त्याच्या अंदाजापेक्षा बॉल किंचित स्लो आल्याने त्याचा शॉट हवेत गेला...
मिडऑफला स्टार्कने कॅच घेण्यात कोणतीही कुचराई केली नाही!

२४ बॉल्समध्ये ७ बाऊंड्री आणी ३ सिक्ससह मॅक्कलमने ५० रन्स झोडपून काढल्या!
न्यूझीलंड ७८ / २!

मॅक्कलम परतल्यावर जेमतेम १ रनची भर पडल्यावर...

स्टार्कचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
रॉस टेलरने फ्रंटफूटवर येत तो मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्नं केला...
पण अचूक टप्प्यावर पडलेला बॉल इनस्विंग झाला आणि बॅट आणि पॅडमधून घुसला...
टेलरचा ऑफस्टंप उडाला!
न्यूझीलंड ७९ / ३!

टेलर आऊट झाल्यावर साडेतीन तासांचा वेळ संपल्यामुळे मॅच ब्रेकसाठी थांबवण्यात आली.
न्यूझीलंडला अद्याप ७३ रन्सची आवश्यकता होती.

इनिंग्ज ब्रेक नंतर...
स्टार्कचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
इलियटने फ्रंटफूटवर येत ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नं केला...
टेलरला पडलेल्या बॉलप्रमाणेच बॉल इनस्विंग होऊन इलियटच्या बॅट आणि पॅडमधून घुसला...
इलियटचा मिडलस्टंप उडाला!
न्यूझीलंड ७९ / ४!

हॅटट्रीकवर असलेल्या स्टार्कच्या समोर होता कोरी अँडरसन!

अँडरसनने शांतपणे बॉल खेळून काढत हॅटट्रीक होणार नाही याची काळजी घेतली. त्याच ओव्हरमध्ये विल्यमसनविरुद्धचं एलबीडब्ल्यूचं अपिल अंपायर मरायस इरॅस्मसने फेटाळून लावलं. विल्यमसन आणि अँडरसन यांनी सावध पवित्रा घेत स्टार्क - कमिन्सला सावधपणे खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. विल्यमसनने कमिन्सला कट्ची बाऊंड्री मारली, पण स्टार्कच्या बॉलिंगवर कोणतीही रिस्क घेण्याचं दोघांनीही टाळलं. पण स्टार्कच्या ऐवजी मिचेल जॉन्सन बॉलिंगला आल्यावर...

जॉन्सनचा पहिलाच बॉल ऑफस्टंपवर पडलेला बंपर होता...
अँडरसनने तो सरळ जॉन्सनच्या डोक्यावरुन पूल केला... बाऊंड्री!

दुसरा बॉल मिडलस्टंपवर पडला...
अँडरसनने फ्रंटफूटवर येत तो डिफेंड करण्याचा प्रयत्नं केला...
त्याच्या बॅटची इनसाईड एज लागून हॅडीनला कोणतीही संधी न देता बॉल फाईनलेगच्या दिशेने गेला.... बाऊंड्री!

तिसरा बॉल लेगस्टंपवर पडलेला शॉर्टपीच बंपर होता...
अँडरसनने बॅकफूटवर जात तो पूल केला...
बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार गेला.... सिक्स!

जॉन्सनच्या ओव्हरमध्ये १६ रन्स फटकावल्या गेल्या!

कमिन्सच्या पुढच्या ओव्हरमध्ये विल्यमसनने कव्हर्सवरुन बाऊंड्री तडकावली. जॉन्सनच्या ५ ओव्हर्समध्ये ६८ रन्स झोडपल्या गेल्या होत्या, पण त्याने अँडरसनला टाकलेली पुढची ओव्हर मेडन होती! कमिन्सच्या ऐवजी मिचेल मार्श बॉलिंगला आल्यावर विल्यमसनने त्याला मिडविकेट आणि कव्हर्समधून बाऊंड्री तडकावल्या. जॉन्सनच्या ऐवजी पुन्हा बॉलिंगला आलेल्या स्टार्कच्या ओव्हरमध्ये अँडरसनविरुद्धचं एलबीडब्ल्यूचं अपिल अंपायर रिचर्ड इलिंगवर्थने फेटाळून लावल्यावर मायकेल क्लार्कने डीआरएसचा आधार घेत थर्ड अंपायर रवीकडे दाद मागितली, पण टीव्ही रिप्लेमध्ये स्टार्कचा बॉल लेगस्टंपच्या बाहेर जात असल्याचं निष्पन्नं झालं! विल्यमसन - अँडरसन यांनी ५२ रन्सची पार्टनरशीप केली. हे दोघं न्यूझीलंडला सहजपणे मॅच जिंकून देणार असं वाटत असतानाच...

मिचेल मार्शच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
अँडरसनने ऑफस्टंपच्या बाहेरुन स्लॉग स्वीप उचलला....
मिडविकेट बाऊंड्रीवर पॅट्रीक कमिन्सने पुढे डाईव्ह मारत कॅच घेतला...
अंपायर इरॅस्मस आणि इलिंगवर्थ यांनी कमिन्सने कॅच घेतल्याची खातरजमा करण्याची थर्ड अंपायर रवीला सूचना दिली...
टीव्ही रिप्लेमध्ये कमिन्सच्या हातातून बॉल किंचीत सुटल्याचं निष्पन्नं झालं, पण बॉल जमिनीला लागल्याची कोणतीही खूण आढळली नाही...

४२ बॉल्समध्ये २ बाऊंड्री आणि जॉन्सनला ठोकलेल्या सिक्ससह अँडरसनने २६ रन्स फटकावल्या.
न्यूझीलंड १३१ / ५!

अँडरसन आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या ल्यूक राँचीने मॅक्सवेलच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर लाँगऑनला दणदणीत सिक्स ठोकली. पण पुढच्या ओव्हरमध्ये...

स्टार्कचा बंपर लेगस्टंपवर पडला...
राँचीने बॅकफूटवर जात बॉल डिफेंड करण्याचा पवित्रा घेतला पण...
स्टार्कचा बंपर त्याच्या अपेक्षेपेक्षा बराच जास्तं उसळला आणि त्याच्या डोक्याच्या दिशेने आला...
राँचीने शेवटच्या क्षणी मागे झुकत बॉलच्या मार्गातून दूर होण्याचा प्रयत्नं केला पण...
बॉल त्याच्या ग्लोव्हजना लागून हॅडीनच्या हातात गेला!
न्यूझीलंड १३९ / ६!

कमिन्सच्या पुढच्या ओव्हरच्या पहिल्या ४ बॉल्सवर विल्यमसन आणि डॅनियल व्हिटोरी यांनी ६ रन्स काढल्या, पण...

पाचवा बॉल लेगस्टंपवर आलेला फुलटॉस होता...
व्हिटोरीने तो सरळ मिडऑनला असलेल्या डेव्हीड वॉर्नरच्या हातात मारला!
न्यूझीलंड १४५ / ७!

न्यूझीलंडला अद्याप मॅच जिंकण्यासाठी ७ रन्सची आवश्यकता होती...
ऑस्ट्रेलियासमोर न्यूझीलंडच्या उरलेल्या ३ विकेट्स घेणं एवढाच पर्याय होता...
मिचेल स्टार्क आणि केन विल्यमसन यांच्यापैकी जो शांत डोक्याने खेळू शकेल तो मॅच जिंकणार होता...

स्टार्कचा पहिला बॉल ऑफस्टंपवर अचूक पडलेला यॉर्कर होता...
विल्यमसनने तो शांतपणे खेळून काढला...

दुसरा बॉल मिडऑफला ड्राईव्ह करुन विल्यमसनने १ रन काढली...

स्टार्कचा तिसरा बॉल मिडलस्टंपवर पडला...
अ‍ॅडम मिलेनने ड्राईव्ह मारण्याचा केलेला प्रयत्नं पार फसला...
मिलेनचा मिडलस्टंप उडाला!
न्यूझीलंड १४६ / ८!

स्टार्कचा चौथा बॉल ऑफस्टंपवर पडलेला यॉर्कर होता...
टिम साऊदीने तो मिडविकेटला खेळण्याचा केलेला प्रयत्नं सपशेल फसला...
तुफान वेगाने आलेल्या स्टार्कच्या बॉलने साऊदीचा ऑफस्टंप उडवला!
न्यूझीलंड १४६ / ९!

नॉनस्ट्रायकर एन्डला असलेल्या केन विल्यमसनच्या डोक्यात नेमके काय विचार येत असतील?
दुसर्‍या बॉलवर १ रन काढून त्याने मिलेनला स्टार्कच्या तोफखान्यासमोर बळीचा बकरा म्हणून सोडलं होतं...
स्टार्कने मिलेन आणि साऊदी दोघांचाही निकाल लावला होता...
जेमतेम तासाभरात तो दुसर्‍यांदा हॅटट्रीकवर होता...
ट्रेंट बोल्ट काय करु शकणार होता?

स्टार्कचा पाचवा बॉल मिडलस्टंपवर पडला...
बोल्टने सावधपणे फ्रंटफूटवर येत तो डिफेंड केला...

शेवटचा बॉल ऑफस्टंपच्या बराच बाहेर पडला...
बोल्टला तो खेळण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. त्याने शांतपणे तो सोडून दिला!

न्यूझीलंडला अद्यापही मॅच जिंकण्यासाठी ६ रन्स बाकी होत्या!

बोल्टने स्टार्कच्या ओव्हरचे शेवटचे २ बॉल्स खेळून काढल्यावर कमिन्सच्या समोर विल्यमसन स्ट्राईकवर होता...

कमिन्सचा पहिलाच बॉल मिडलस्टंपवर पडला...
विल्यमसन लेगसाईडला सरकला आणि त्याने कमिन्सचा बॉल लाँगऑनवरुन उचलला...
बॉल लाँगऑन बाऊंड्रीपार गेला.... सिक्स!

न्यूझीलंडने १ विकेटने मॅच जिंकली!

केन विल्यमसन ४२ बॉल्समध्ये ५ बाऊंड्री आणि कमिन्सला ठोकलेल्या सिक्ससह ४५ रन्स फटकावून नॉटआऊट राहीला.
मिचेल स्टार्कच्या नाट्यपूर्ण ओव्हरनंतर विल्यमसनने एका फटक्यात मॅच संपवली होती!
स्टार्कने न्यूझीलंडच्या ६ विकेट्स उडवल्या पण ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकून देणं त्याला शक्यं झालं नाही!

मॅच संपल्यावर मायकेल क्लार्क म्हणाला,
"Our batting was horrendous to put it politely. I think both teams would say we didn't bat the way we'd have liked. Credit need to go to the New Zealand bowlers, they bowled really well, swung the ball nicely and bowled good areas, but our shot selection was very poor and I think our defence more than anything else was an area that was a lot poorer than we would have liked."

ब्रेंडन मॅक्कलम म्हणाला,
One hell of a game. Both teams showed what quality their bowlers are. Starc and Boult both were outstanding. We saw some great pace and swing bowling."

मॅन ऑफ द मॅच म्हणून ट्रेंट बोल्टची निवड करण्यात आली.

केन विल्यमसन म्हणाला,
"When we needed seven, every run seemed quite significant and we still had three wickets left so I thought it would be okay, but it turned out to be pretty tough. When Starc fired out those two, I was thinking ‘What have I done?’. After what he did at the other end, it was tough for the new batsman coming in, so I was looking to hit a boundary, ideally a six. The moment I connected, I knew it was all over!"

क्रीडालेख

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

10 Mar 2017 - 10:13 am | अनन्त्_यात्री

क्रिकेट खेळायला लागणारी शक्ती < < क्रिकेट मॅचवर बॉल-बाय-बॉल लिहायला लागणारी ऊर्मी <<<< क्रिकेट मॅचवर बॉल-बाय-बॉल लिहिलेले वाचायला लागणारी सहनशक्ती .

क्रिकेट खेळायला लागणारी शक्ती < < क्रिकेटवर बॉल-बाय-बॉल लिहायला लागणारी ऊर्मी << क्रिकेटवर बॉल-बाय-बॉल लिहिलेले वाचायला लागणारी सहनशक्ती

लोनली प्लॅनेट's picture

10 Mar 2017 - 1:20 pm | लोनली प्लॅनेट

प्रचंड थरारक सामना होता हा
कॉमेंट्री बॉक्स मध्ये इयान स्मिथ नुसता ओरडत होता
केन विल्यम्सन ने कमिन्स चा बॉल हवेत उचलल्यावर तो ओरडला Straight down the ground and it's gone for six kane williamson has done it for new zealand what a day we have in eden park