वर्ल्डकप क्लासिक्स - १९९६ - क्वार्टरफायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रीका

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
18 Feb 2017 - 10:10 am

११ मार्च १९९६
नॅशनल स्टेडीयम, कराची

सिंध प्रांताची राजधानी असलेल्या कराचीच्या नॅशनल स्टेडीयमवर वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात तिसरी क्वार्टरफायनल रंगणार होती. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे वर्ल्डकपचे संभाव्यं विजेते म्हणून पाहिलं जात होतं. ग्रूपमधल्या आपल्या पाचही मॅचेस आरामात जिंकून त्यांनी क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली होती. वेस्ट इंडीजची परिस्थिती नेमकी उलट होती. झिंबाब्वेविरुद्धची पहिली मॅच जिंकल्यावर भारताविरुद्ध वेस्ट इंडीजला पराभव पत्करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाप्रमाणेच वेस्ट इंडीजनेही श्रीलंकेत खेळण्यास नकार दिल्याने ती मॅचही वेस्ट इंडीजने गमावलेली होती. पण वेस्ट इंडीजला हादरवलं ते केनियाने! पुण्याच्या मैदानावर केनियाकडून अपमानास्पद पराभव पत्करावा लागल्यावर वेस्ट इंडीजच्या संघावर चौफेर टीकेची झोड उठली होती. त्यातच केनियाविरुद्धच्या पराभवानंतर ब्रायन लाराच्या वर्णभेदी वक्तव्याच्या बातमीने अधिकच गहजब झाला.

केनियन खेळाडूंचं अभिनंदन करताना लारा म्हणाला,
”It wasn’t that bad losing to you guys. You are black. Know what I mean. Now a team like South Africa is a different matter altogether. You know, this white thing comes into the picture. We can’t stand losing to them.”

लाराचं हे वक्तव्यं आऊटलूक मासिकात छापून एकच गोंधळ झाला. लाराचा एजंट जोनाथन बार्नेटने लाराच्या वक्तव्याचा इन्कार केला. बार्नेट म्हणाला,
“Lara told Kenyans, 'Losing to you guys hurt badly but it wasn’t the worst day of my life. The worst was losing to South Africa in the 1992 World Cup because I realised we weren’t going to qualify for the semis'!”

खुद्दं लाराने दुसर्‍या दिवशी आपल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त माफी मागितली. आपलं वक्तंव्य चुकीच्या संदर्भात छापण्यात आल्याचा त्याने दावा केला!

केनियाकडून झालेला पराभव वेस्ट इंडीजच्या जिव्हारी लागला नसता तरच नवंल! ग्रूपमधल्या शेवटच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन वेस्ट इंडीजने क्वार्टरफायनल गाठली पण दक्षिण आफ्रीकेपुढे त्यांचा निभाव लागणं कठीण आहे अशी जवळपास प्रत्येकाची खात्री होती!

रिची रिचर्ड्सनच्या वेस्ट इंडीयन संघात स्वतः रिचर्ड्सन, ब्रायन लारा, शिवनारायण चँडरपॉल. जिमी अ‍ॅडम्स, कीथ आर्थर्टन, रोलँड होल्डर असे बॅट्समन होते. वेस्ट इंडीजच्या खतरनाक फास्ट बॉलर्सचा वारसा पुढे चालवणारे कर्टली अ‍ॅम्ब्रोज, कॉर्टनी वॉल्श, इयन बिशप असे बॉलर्स वेस्ट इंडीजकडे होते. त्यांच्या जोडीला होता ऑफस्पिनर रॉजर हार्पर आणि विकेटकीपर कॉर्टनी ब्राऊन! कराचीच्या विकेटवर स्पिनर्सना मदत मिळणार याची कल्पना असल्याने हार्परच्या जोडीला जिमी अ‍ॅडम्सच्या स्पिन बॉलिंगचा वापर करण्याचा रिचर्ड्सनचा इरादा होता.

हॅन्सी क्रोनिएच्या दक्षिण आफ्रीकन संघात गॅरी कर्स्टन, अँड्र्यू हडसन, डॅरील कलिनन, स्वतः क्रोनिए, जाँटी र्‍होड्स असे बॅट्समन होते. ब्रायन मॅकमिलनसारखा ऑलराऊंडर दक्षिण आफ्रीकेकडे होता. ग्रूपमधल्या मॅचेसमध्ये वेस्ट इंडीजच्या बॅट्समनना स्पिनर्सचा मुकाबला करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचं वूल्मरच्या चाणाक्षं नजरेला आलं होतं. स्पिनर्सना मदत करणार्‍या विकेटवर पॅट सिमकॉक्स आणि पॉल अ‍ॅडम्स या दोन्ही स्पिनर्सना खेळवण्याचा वूल्मर - क्रोनिए यांनी निर्णय घेतला. ऑलराऊंडर शॉन पोलॉक आणि क्रेग मॅथ्यूजचाही दक्षिण आफ्रीकेच्या संघात समावेश होता पण सर्वात आश्चर्यकारक आणि अविश्वसनिय निर्णय म्हणजे अ‍ॅलन डोनाल्डला ड्रॉप करण्यात आलं होतं!

या निर्णयाचा काय परिणाम होणार होता?

रिची रिचर्ड्सनने टॉस जिंकल्यावर बॅटींगचा निर्णय घेतला. एकदा स्पिनर्स बॉलिंगला आल्यावर रन्स काढणं कठीण जाणार याची कल्पना असल्याने शिवनारायण चँडरपॉलच्या जोडीला रिचर्ड्सनने विकेटकीपर कॉर्टनी ब्राऊनला बॅटींगला पाठवलं ते फटकेबाजीचा मुक्तं परवाना देऊनच! सुरवातीच्या तीन ओव्हर्स सावधपणे खेळून काढल्यावर ब्राऊनने क्रेग मॅथ्यूजला कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. पाचव्या ओव्हरमध्ये पोलॉकचा बॉल फटकावण्याचा ब्राऊनचा प्रयत्नं पार फसला, पण चक्कं जाँटी र्‍होड्सच्या हातातून हा कॅच सुटला! ब्राऊनने पोलॉकला दोन बाऊंड्री फटकावल्यावर चँडरपॉलने मॅथ्यूजला स्ट्रेट ड्राईव्ह आणि कव्हर ड्राईव्हच्या बाऊंड्री ठोकल्या. अखेर मॅथ्यूजलाच फटकावण्याच्या नादात मिडऑनला डॅरील कलिननने ब्राऊनचा कॅच घेतला. वेस्ट इंडीज ४२ / १!

ब्राऊन आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या ब्रायन लाराने सुरवातीला सावधपणे दक्षिण आफ्रीकन बॉलर्सना खेळून काढण्याचं धोरण अवलंबलं होतं. पोलॉक - मॅथ्यूज यांच्या स्विंग होणार्‍या बॉल्सवर अनेकदा बॉल त्याच्या बॅटच्या एजजवळून जात होता पण लाराला त्याने काहीच फरक पडत नव्हता. पोलॉकच्या जागी हॅन्सी क्रोनिए बॉलिंगला आल्यावर मात्रं लाराने आक्रमक पवित्रा घेत त्याला तीन बाऊंड्री तडकावल्या. क्रॉनिएच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या पॅट सिमकॉक्सला लाराने लेटकटची बाऊंड्री मारली. लाराची फटकेबाजी सुरु असताना चँडरपॉल चाणाक्षपणे स्ट्राईक रोटेट करत होता. सिमकॉक्सच्या जागी बॉलिंगला आलेल्या पॉल अ‍ॅडम्सलाही लाराने दोन बाऊंड्री फटकावल्यावर क्रोनिए हतबल झाला. पण आता कुठे नुकती सुरवात झाली होती!

पॅट सिमकॉक्सच्या २८ व्या ओव्हरमध्ये...

पहिल्या बॉलवर लारा क्रीजमधून पुढे सरसावला आणि त्याने तो फुलटॉस मिडऑनवरुन उचलला...
शेवटच्या क्षणी लाराचा एक हात बॅटवरुन सुटला होता...
एका हाताने मारलेला शॉट मिडऑन बाऊंड्रीपार केला!
दुसरा बॉल लाराने बॅकवर्ड पॉईंट आणि पॉइंटच्या दरम्यान असलेल्या गॅपमध्ये स्क्वेअर ड्राईव्ह केला... बाऊंड्री!
तिसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडलेली हाफ व्हॉली होती...
लाराने ती कव्हर्स बाऊंड्रीवर तडकावली....
चौथा बॉल शेवटच्या क्षणी थर्डमॅन बाऊंड्रीवर गेला... लेटकट!
पाचवा बॉल लाराने चक्कं डिफेन्सिव पद्धतीने खेळून काढला...
सहावा बॉल बॅकवर्ड पॉईंट बाऊंड्रीवर गेला... स्क्वेअरकट!

सिमकॉक्सच्या ओव्हरमध्ये ५ बाऊंड्री तडकावत लाराने २० रन्स झोडपून काढल्या होत्या!

क्रोनिएने सिमकॉक्सच्या ऐवजी ब्रायन मॅकमिलनला बॉलिंगला आणलं पण त्याने फारसा फरक पडला नाही. सिमकॉक्सप्रमाणेच मॅकमिलनलाही लाराने लेटकटची बाऊंड्री मारली!

कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेला रॉबिन जॅकमन उद्गारला,
"South Africa are looking down the barrel of a very big gun!"

लारा - चँडरपॉल यांनी २४ ओव्हर्समध्ये १३८ रन्सची पार्टनरशीप केल्यावर अखेर मॅकमिलनला फटकावण्याच्या प्रयत्नात स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर डॅरील कलिननने चँडरपॉलचा कॅच घेतला. ९३ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह चँडरपॉलने ५६ रन्स काढल्या. चँडरपॉल आऊट झाला तेव्हा ३१ ओव्हर्समध्ये वेस्ट इंडीजचा स्कोर होता १८० / २!

चँडरपॉल परतल्यावरही लाराची फटकेबाजी सुरुच होती. सिमकॉक्सच्या जागी बॉलिंगला आलेल्या क्रेग मॅथ्यूजला त्याने बॅकवर्ड पॉईंटला असलेल्या जाँटी र्‍होड्सच्या डोक्यावरुन कट्ची बाऊंड्री तडकावली. मॅकमिलनच्या पुढच्याच ओव्हरमध्ये अंपायर स्टीव्ह रँडलने एलबीडब्ल्यूचं जोरदार अपिल फेटाळलं.

पुन्हा बॉलिंगला आलेल्या सिमकॉक्सला मिडविकेटला फ्लिक करत लाराने सेंच्युरी पूर्ण केली...
८३ बॉल्समध्ये १५ बाऊंड्री तडकावत!
सेंच्युरी पूर्ण झाल्यावर पुढच्याच बॉलल लाराने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री मारलीच!

लाराची फटकेबाजी सुरु असताना कॅप्टन रिची रिचर्ड्सनला मात्रं रन्स काढणं कठीण जात होतं. १० रन्ससाठी २७ बॉल्स खर्ची घातल्यावर अखेर सिमकॉक्सला फटकावण्याच्या नादात स्क्वेअरलेग बाऊंड्रीवरुन पळत येत गॅरी कर्स्टनने त्याचा कॅच घेतला. पण वेस्ट इंडीजला खरा धक्का बसला तो आणखीन ४ रन्सची भर पडल्यावर. सिमकॉक्सला स्वीप मारण्याचा लाराचा प्रयत्नं पार फसला आणि शॉन पोलॉकने त्याचा कॅच घेतला. ९४ बॉल्समध्ये १६ बाऊंड्री तडकावत लाराने १११ रन्स फटकावल्या! ४० ओव्हर्समध्ये वेस्ट इंडीज २१४ / ४!

लारा आऊट झाल्यावर वेस्ट इंडीजची इनिंग्ज घसरली. फटकेबाजीच्या हेतूने अ‍ॅडम्स - आर्थर्टन यांच्या आधी बॅटींगला आलेल्या रॉजर हार्परला मॅकमिलनने एलबीडब्ल्यू केलं. पॉल अ‍ॅडम्सला फटकावण्याचा कीथ आर्थर्टनचा प्रयत्नं पार फसला आणि मिडविकेटला अँड्र्यू हडसनने त्याचा कॅच घेतला. पुढच्याच बॉलवर अ‍ॅडम्सच्या चाणाक्षं फिल्डींगमुळे रोलँड होल्डर रनआऊट झाला. ४४ व्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडी़जची २३० / ७ अशी अवस्था झाली होती!

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला मायकेल होल्डींग म्हणाला,
"We saw some absolutely brilliant cricket from West Indies in the early overs, now we are seeing some brainless cricket!"

जिमी अ‍ॅडम्स आणि इयन बिशपने थंड डोक्याने उरलेल्या ओव्हर्स खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर बिशपने पॉल अ‍ॅडम्सला लाँगऑनला सिक्स ठोकली, पण पुढल्याच बॉलवर तो बोल्ड झाला. अ‍ॅडम्स आणि कर्ट्ली अँब्रोज यांनी शेवटच्या ४ बॉल्समध्ये १० रन्स फटकावल्या. लाराच्या आतषबाजीनंतरही वेस्ट इंडीजच्या इनिंग्जच्या शेवटच्या १० ओव्हर्समध्ये फक्तं ४८ रन्स निघाल्या. त्यापैकी पॉल अ‍ॅडम्सच्या शेवटच्या ओव्हरमध्ये १६ रस्न फटकावल्या गेल्या होत्या!

५० ओव्हर्समध्ये वेस्ट इंडीजचा स्कोर होता २६४ / ८!

रिची रिचर्ड्सन म्हणतो,
“Brian badly wanted to do well after all the pressure he’s been under and I felt very tense for him; but when he hit his first four, I knew he was definitely going to score his 100.”

गॅरी कर्स्टन आणि अँड्र्यू हडसन यांनी सुरवातीला सावध पवित्रा घेत वेस्ट इंडीजच्या बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. तिसर्‍या ओव्हरमध्ये हडसनने अँब्रोजला मिडविकेटला पूलची बाऊंड्री तडकावली. पण हा एकमेव अपवाद वगळता अँब्रोज आणि वॉल्श यांच्या अचूक बॉलिंगमुळे कर्स्टन - हडसन यांना आक्रमक फटकेबाजी करणं जमत नव्हतं. सातव्या ओव्हरमध्ये...

अँब्रोजचा पहिलाच बॉल लेगस्टंच्या बाहेर पडला...
कर्स्टनने बॅकफूटवर जात बॉल मिडविकेटला खेळला आणि एक रनसाठी कॉल दिला...
रन काढण्यासाठी पहिलं पाऊल उचलताना कर्स्टनचा पाय घसरला...
स्वतःला सावरुन तो नॉनस्ट्रायकर एन्डला धावत सुटला पण...
बेल्स खाली पडल्या होत्या!

गॅरी कर्स्टन हिट विकेट झाला!
दक्षिण आफ्रीका २१ / १!

कर्स्टन परतल्यावर बॅटींगला आलेला डॅरील कलिनन आणि हडसन यांनी वेस्ट इंडीजच्या बॉलर्सना फटकावण्याचा मार्ग पत्करला. वॉल्शला कलिननने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री मारल्यावर हडसनने अँब्रोजला मिडविकेटला पूलच्या दोन बाऊंड्री तडकावल्या. दहाव्या ओव्हरमध्ये वॉल्शच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या इयन बिशपला अ‍ॅक्रॉस द लाईन फटकावण्याच्या नादात हडसन बोल्ड झाला, पण...

बिशपचा हा बॉल नोबॉल होता!

हडसन आऊट होण्यापासून सुदैवानेच वाचला असला तरी त्याचा आक्रमकपणा यत्किंचितही कमी झाला नाही. बिशपच्या पुढच्याच ओव्हरमध्ये कटची बाऊंड्री मारल्यावर अँब्रोजच्या जागी पुन्हा बॉलिंगला आलेल्या वॉल्शला हडसनने मिडविकेटला बाऊंड्री तडकावली. वॉल्शच्या पुढच्याच ओव्हरमध्ये हडसनच्या पावलावर पाऊल टाकत कलिननने मिडविकेटला दणदणीत सिक्स ठोकली! बिशपच्या पुढच्या ओव्हरमध्ये हडसनने मिडऑफवरुन बाऊंड्री मारल्यावर वेस्ट इंडीजचा कॅप्टन रिची रिचर्ड्सनला स्पिनर्सना बॉलिंगला आणण्यावाचून पर्याय उरला नाही!

ऑफस्पिनर रॉजर हार्पर आणि डावखुरा जिमी अ‍ॅडम्स बॉलिंगला आल्यावर हडसन - कलिनन यांच्या फटकेबाजीला खीळ बसली. ओव्हर द विकेट बॉलिंग करणार्‍या अ‍ॅडम्सचे लेगस्टंप किंवा लेगस्टंपच्याही बाहेर पडलेले बॉल आणि ऑफस्टंपच्या लाईनमध्ये पडलेले रॉजर हार्परचे ऑफब्रेक्स लेगसाईडला खेळण्यावाचून इलाज नव्हता. लाँगऑन, मिडविकेट आणि स्क्वेअरलेगला असलेल्या फिल्डर्समुळे बाऊंड्री मिळण्याची शक्यता जवळपास निकालातच निघाली होती. लेगस्टंपच्या बाहेर जाऊन ऑफसाईडला फटकेबाजी करणं हा पर्याय होता पण तो चांगलाच रिस्की होता.

रॉजर हार्परच्या २५ व्या ओव्हरमध्ये कलिननने मिडविकेटवरुन सिक्स ठोकली, पण हा अपवाद वगळता कलिनन - हडसन यांना १-२ रन्सवरच समाधान मानावं लागत होतं. हडसन - कलिनन यांनी ९७ रन्सची पार्टनरशीप केल्यावर अखेर स्पिन बॉलर्सनी केलेल्या नाकेबंदीला वैतागलेल्या हडसनचा क्रीजमधून पुढे सरसावत अ‍ॅडम्सला फटकावण्याचा प्रयत्नं फसला आणि लाँगऑनला वॉल्शने त्याचा कॅच घेतला. ८० बॉल्समध्ये ८ बाऊंड्रीसह हडसनने ५४ रन्स फटकावल्या. हडसन आऊट झाला तेव्हा २६ व्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रीकेचा स्कोर होता ११८ / २!

हडसन परतल्यावरही कलिननची फटकेबाजी सुरुच होती. २८ व्या ओव्हरमध्ये अ‍ॅडम्सचा लेगस्टंपच्या फूटभर बाहेर पडलेला बॉल लेगसाईडला सरकत कलिननने एक्स्ट्राकव्हर बाऊंड्रीपार तडकावला! लेगस्टंपच्या इतक्या बाहेर जाऊन कलिननने ही सिक्स ठोकली होती की कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला रॉबिन जॅकमन म्हणाला,

"It didn’t matter what line Adams bowled. Cullinan was almost standing at midwicket when he struck it!"

अ‍ॅडम्सचा पुढचा बॉलही लेगस्टंपच्या बाहेर पडला...
कलिननने पुन्हा लेगस्टंपच्या बाहेर जात ऑफसाईडला बॉल उचलला....
....पण यावेळी मात्रं लाँगऑफ बाऊंड्रीवरुन धावत आलेल्या बिशपने कॅच घेतला!

७८ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि ३ सिक्स ठोकत कलिननने ६९ रन्स फटकावल्या.
दक्षिण आफ्रीका १४० / ३!

शेवटच्या २० ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला १२५ रन्सची आवश्यकता होती!

हॅन्सी क्रोनिए आणि जाँटी र्‍होड्स यांनी सुरवातीला आक्रमक फटकेबाजीच्या मोहात न पडता १-२ रन्स काढण्यावर भर दिला, परंतु हार्परच्या अचूक बॉलिंगने दोघांनाही सहजगत्या रन्स काढणं कठीण झालं होतं. रिचर्ड्सनने अ‍ॅडम्सच्या ऐवजी वॉल्शला बॉलिंगला आणल्यावर क्रोनिएने त्याला ३७ व्या ओव्हरमध्ये मिडविकेटवर दोन दणदणीत सिक्स ठोकल्या! क्रोनिए - र्‍होड्स यांनी ४० रन्सची पार्टनरशीप केल्यावर वॉल्शच्या जागी पुन्हा बॉलिंगला आलेल्या अ‍ॅडम्सला पूल करण्याचा क्रोनिएचा प्रयत्नं फसला आणि स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर कीथ आर्थर्टनने पुढे डाईव्ह मारत त्याचा अफलातून कॅच घेतला! ४७ बॉल्समध्ये २ बाऊंड्री आणि वॉल्शला मारलेल्या २ सिक्ससह क्रोनिएने ४० रन्स फटकावल्या. दक्षिण आफ्रीका १८६ / ४!

४१ व्या ओव्हरमध्ये...
रॉजर हार्परचा पहिला बॉल...
जाँटी र्‍होड्सने मिडविकेट बाऊंड्रीवर असलेल्या जिमी अ‍ॅडम्सच्या हातात पूल केला...
हार्परचा दुसरा बॉल...
बॅकफूटवर जात लेगसाईडला फ्लिक करण्याचा ब्रायन मॅकमिलनचा प्रयत्नं फसला...
ऑफस्टंपच्या लाईनमध्ये मॅकमिलनच्या पॅडवर बॉल आदळला...
मॅकमिलन एलबीडब्ल्यू झाला!
विकेटकीपर स्टीव्ह पालफ्रामनने हॅटट्रीक होणार नाही याची काळजी घेतली पण...
पाचवा बॉल पालफ्रामनने बॅकफूटवरुन मिडऑफला फटकावण्याचा प्रयत्नं केला...
....आणि फॉलो थ्रूमध्ये डाईव्ह मारत हार्परने डाव्या हातात त्याचा कॅच घेतला!

हार्परने एका ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रीकेच्या ३ विकेट्स उडवल्या होत्या!
दक्षिण आफ्रीका १९८ / ७!

अद्याप ९ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला ६७ रन्स हव्या होत्या!

शॉन पोलॉक आणि पॅट सिमकॉक्स यांनी दक्षिण आफ्रीकेचा स्कोर २१४ पर्यंत नेल्यावर ४५ व्या ओव्हरमध्ये रिची रिचर्डसनने पुन्हा हार्परला बॉलिंगला आणलं. सिमकॉक्सने त्याला मिडविकेट आणि स्क्वेअरलेगवर दोन दणदणीत सिक्स ठोकल्या, पण दोन बॉल्सनंतर हार्परला फटकावण्याच्या प्रयत्नात स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर जिमी अ‍ॅडम्सने पोलॉकचा कॅच घेतला. हे कमी होतं म्हणूनच की काय, पुढच्याच ओव्हरमध्ये कीथ आर्थर्टनला फटकावण्याच्या नादात मिडविकेट बाऊंड्रीवर हार्परने सिमकॉक्सचा कॅच घेतला! ४६ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीका २२८ / ९!

क्रेग मॅथ्यूज आणि पॉल अ‍ॅडम्स यांनी हार न मानता १७ रन्स फटकावल्या, पण...
शेवटच्या ओव्हरच्या तिसर्‍या बॉलवर वॉशने अ‍ॅडम्सची दांडी उडवली!

दक्षिण आफ्रीकेला १९ रन्सनी हरवून वेस्ट इंडीज सेमीफायनलमध्ये धडकले होते!

वेस्ट इंडीजला स्पिनच्या ट्रॅपमध्ये अडकवू पाहणारी दक्षिण आफ्रीका स्वतःच वेस्ट इंडीजच्या स्पिनर्सची शिकार झाली होती!
रॉजर हार्पर - जिमी अ‍ॅडम्स - कीथ आर्थर्टन यांनी दक्षिण आफ्रीकेच्या ८ विकेट्स काढल्या होत्या!
याऊलट पॉल अ‍ॅडम्स - पॅट सिमकॉक्स यांच्या १८ ओव्हर्समध्ये १०९ रन्स फटकावल्या गेल्या होत्या!
अ‍ॅलन डोनाल्डच्या ऐवजी पॉल अ‍ॅडम्सला खेळवण्याच्या हॅन्सी क्रोनिए - बॉब वूल्मर यांच्या निर्णयाचं लाराने एकहाती वाटोळं केलं होतं!
दोन स्पिनर्सना खेळवण्याची चाल बूमरँगप्रमाणे त्यांच्यावरच उलटली होती!

मॅन ऑफ द मॅच म्हणून ब्रायन लाराची निवड झाली हे ओघाने आलंच!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

18 Feb 2017 - 11:38 am | गॅरी ट्रुमन

अजून एक जबरदस्त लेख. या सामन्यात रॉजर हार्परच्या त्या खतरनाक ओव्हरपर्यंत दक्षिण आफ्रिका हरू शकेल असे वाटत नव्हते.

जबरदस्त फॉर्मात असूनही आयत्या वेळी कच खायची असा दक्षिण आफ्रिकेला 'चोकिंग' चा त्रास होणे हा जुनाच प्रकार आहे :(

काहीही असले तरी हा सामना दक्षिण आफ्रिकेने गमाविल्यानंतर वाईट वाटलेच होते. दक्षिण आफ्रिकेसारखा चांगला संघ हरला हे तर दु:ख होतेच पण त्याबरोबरच तो केनियासारख्या लिंबूटिंबू संघाकडून पराभव पत्करलेल्या वेस्ट इंडिजसारख्या संघाकडून हरला याचे अजून दु:ख होते.

स्पार्टाकस's picture

18 Feb 2017 - 7:54 pm | स्पार्टाकस

दक्षिण आफ्रीका या मॅचमध्ये बाराच्या भावात गेली असं माझं मत आहे. वेस्ट इंडीजला त्यांनी सिरीयसली घेतलंच नाही.
उलट केनियाविरुद्धची मॅच हरल्यावर वेस्ट इंडी़जचे खेळाडू चवताळून उठले आणि त्यांनी शेवटच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. दक्षिण आफ्रीकेसाठी ही खरंतर वॉर्निंग बेल होती. समोरच्या टीममध्ये लारा असताना त्यांना हलकं लेखण्याची घोडचूक दक्षिण आफ्रीकेने केली आणि ती त्यांना भोवली.

बाय द वे,
वर्ल्डकपमध्ये सगळ्या मॅचेस जिंकून केवळ एक मॅच गमावल्यामुळे वर्ल्डकपबाहेर पडण्याची पाळी आलेला दक्षिण आफ्रीका हा पहिला संघ. त्यानंतर २०१५ मध्ये हीच पाळी सेमीफायनलमध्ये भारत आणि फायनलमध्ये न्यूझीलंडवर आली.

पैसा's picture

18 Feb 2017 - 12:51 pm | पैसा

कोणत्याही परिस्थितीत सामन्याचा निकाल एकहाती बदलू शकणार्‍या खेळाडूंमधे लाराचं नाव सर्वात वर असेल!