वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - क्वार्टरफायनल - दक्षिण आफ्रीका विरुद्ध न्यूझीलंड

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
6 Mar 2017 - 8:30 am

२५ मार्च २०११
शेरे बांगला, मीरपूर

बांग्लादेशची राजधानी असलेल्या ढाक्क्यातल्या मीरपूरच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडीयममध्ये दक्षिण आफ्रीका आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकपची तिसरी क्वार्टरफायनल रंगणार होती. आदल्या दिवशीच महेंद्रसिंग धोणीच्या भारतीय संघाने क्वार्टरफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधली सद्दी संपुष्टात आणल्यामुळे १९९९ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया सोडून दुसर्‍या संघाला वर्ल्ड चँपियन होण्याची संधी मिळणार होती. ऑस्ट्रेलियानंतर या वर्ल्डकपचा प्रमुख दावेदार म्हणून अर्थातच दक्षिण आफ्रीकेकडे पाहिलं जात होतं. इंग्लडविरुद्धच्या एकमेव मॅचचा अपवाद वगळता दक्षिण आफ्रीकेने ग्रूपमधल्या पाचही मॅचेस जिंकून ग्रूपमध्ये पहिलं स्थान मिळवली होतं. उलट रॉस टेलरच्या आतषबाजीने पाकिस्तानला नामोहरम केलं असलं तरी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे न्यूझीलंडला ग्रूपमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं.

ग्रॅम स्मिथच्या दक्षिण आफ्रीकन संघात स्वतः स्मिथ, हशिम अमला, जीन पॉल ड्युमिनी, फ्रान्सवाल ड्युप्लेसी असे बॅट्समन होते. दक्षिण आफ्रीकेच्या बॉलिंगचा भर प्रामुख्याने डेल स्टाईन आणि मॉर्नी मॉर्केल यांच्यावर होता. त्यांच्या जोडीला इमरान ताहीर होता. दक्षिण आफ्रीकेने या वर्ल्डकपसाठी आपला संघ निवडताना ऑलराऊंडर्सवर भर दिला होता, पण त्यात आक्रमक बॅट्समन असलेल्या अ‍ॅल्बी मॉर्केलचा मात्रं समावेश नव्हता! विकेटकीपर मार्क बाऊचरलाही वर्ल्डकपमधून वगळण्यात आलं होतं. विकेटकिपींग आणि बॅटींग अशी दुहेरी जबाबदारी एबी डिव्हीलीअर्सवर सोपवण्यात आली होती. जॅक कॅलिससारखा ऑलराऊंडर दक्षिण आफ्रीकेच्या संघात होताच आणि त्याच्या जोडीला योहान बोथा आणि रॉबिन पीटरसन यांचा ऑलराऊंडर्स म्हणून समावेश करण्यात आला होता.

डॅन द मॅन व्हिटोरीच्या न्यूझीलंड संघात मार्टीन गप्टील, जेसी रायडर, रॉस टेलर, केन विल्यमसन असे बॅट्समन होते. त्यांच्या जोडीला ब्रेंडन मॅक्कलमसारखा आक्रमक विकेटकिपर - बॅट्समन होता. न्यूझीलंडच्या बॉलिंगची मदार होती ती टिम साऊदी आणि कॅप्टन डॅनियल व्हिटोरी यांच्यावर! त्यांच्या जोडीला लेफ्टआर्म स्पिनर ल्यूक वूडकॉक होता. दक्षिण आफ्रीकेप्रमाणेच न्यूझीलंडच्या संघातही ऑलराऊंडर्सचा भरणा होता. स्कॉट स्टायरीस, पाकिस्तानची धूळधाण करण्यात टेलरला मोलाची साथ देणारा जेकब ओरम, नॅथन मॅक्कलम असे ऑलराऊंडर्स न्यूझीलंडकडे होते. पण मुख्य प्रश्नं होता तो म्हणजे दक्षिण आफ्रीकेपुढे त्यांचा कितपत निभाव लागणार होता?

डॅनियल व्हिटोरीने टॉस जिंकल्यावर अपेक्षेप्रमाणेच बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. ग्रॅम स्मिथने पहिल्याच ओव्हरमध्ये बॉलिंगला आणलं लेफ्टआर्म स्पिनर असलेल्या रॉबिन पीटरसनला! पीटरसन आणि डेल स्टाईन पहिल्या २ अचूक ओव्हर्सनंतर....

पीटरसनचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
ब्रेंडन मॅक्कलम आक्रमक पवित्रा घेत क्रीजमधून पुढे सरसावला...
मॅक्कलमच्या अपेक्षेपेक्षा बॉल किंचीत स्लो आल्याने स्ट्रेट ड्राईव्ह हवेत गेला...
पीटरसनने डाव्या बाजूला डाईव्ह मारली आणि अफलातून कॅच घेतला...
मॅक्क्लमसारखा खतरनाक बॅट्समन स्वस्तात निपटला होता...
न्यूझीलंड ५ / १!

ब्रेंडन मॅक्कलम आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या जेसी रायडरने सावधपणे पीटरसनची ओव्हर खेळून काढली. स्टाईनच्या ओव्हरमध्ये रायडरच्या बॅटची इनसाईड एज लागली, पण त्याच्या सुदैवाने बॉल स्टंपच्या जवळून फाईनलेग बाऊंड्रीपार गेला. पण स्टाईनच्या पुढच्या ओव्हरमध्ये चाणाक्षपणे टाकलेल्या स्लो बॉलमुळे त्याला मिडऑफवरुन फटकावण्याचा मार्टीन गप्टीलचा प्रयत्नं पार फसला आणि योहान बोथाने त्याचा आरामात कॅच घेतला. न्यूझीलंड १६ / २!

गप्टील परतल्यावर बॅटींगला आलेल्या अनुभवी रॉस टेलरने सावध पवित्रा घेत कोणतीही रिस्क न घेता दक्षिण आफ्रीकन बॉलर्सना खेळून काढत १-२ रन्स काढण्यावर भर दिला. स्मिथने स्टाईनच्या ऐवजी मॉर्नी मॉर्केलला बॉलिंगला आणल्यावर रायडरने त्याला कव्हर्समधून बाऊंड्री मारली. मॉर्केलच्या पुढच्या ओव्हरमध्ये पुन्हा पॉईंटला बाऊंड्री फटकावण्यात त्याने कोणतीही हयगय केली नाही. मॉर्केलच्या ऐवजी पुन्हा बॉलिंगला आलेल्या पीटरसनच्या ओव्हरमध्ये रायडरने स्क्वेअरकटच्या दोन बाऊंड्री तडकावल्या. इमरान ताहीर आणि पीटरसनच्या अचूक बॉलिंगमुळे पुढच्या ५ ओव्हर्समध्ये रायडर - टेलर यांना केवळ १४ रन्स मिळाल्या, पण ताहीरच्या ऐवजी मॉर्केल बॉलिंगला परतल्यावर रायडरने त्याला लेगग्लान्सची बाऊंड्री मारलीच! २० ओव्हर्सनंतर न्यूझीलंडचा स्कोर होता ८० / २!

योहान बोथा आणि जॅक कॅलिस यांनी अचूक बॉलिंग करत रायडर आणि टेलर यांना फटकेबाजीची कोणतीही संधी दिली नाही. बोथाच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या जेपी ड्युमिनीनेही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत न्यूझीलंड बॅट्समनना जखडून ठेवलं होतं. रायडर - टेलर सावधपणे पण आरामात बॅटींग करत असलेले पाहून विकेट मिळवण्याच्या दृष्टीने स्मिथने कॅलिसच्या ऐवजी स्टाईनला बॉलिंगला आणलं, पण रायडरने त्याला मिडऑफला बाऊंड्री तडकावली. स्टाईनच्या ऐवजी बॉलिंगला परतलेल्या पीटरसनला रायडरने स्क्वेअरकट्ची बाऊंड्री मारल्यावर त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये रॉस टेलरने आपल्या आवडत्या स्लॉग स्वीपचा प्रयोग करत पीटरसनला मिडविकेटला दणदणीत सिक्स ठोकली! पण पुढ्च्या ओव्हरमध्ये...

इमरान ताहीरचा बॉल लेगस्टंपवर पडला...
टेलरने पुन्हा स्लॉग स्वीपचा प्रयोग केला पण...
अपेक्षेपेक्षा किंचीत वेगाने आलेल्या बॉलमुळे त्याचा अंदाज चुकला....
मिडविकेटच्या ऐवजी बॉल स्क्वेअरलेगच्या दिशेने गेला...
स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर कॅलीस हा कॅच सोडणं शक्यंच नव्हतं!

७२ बॉल्समध्ये १ बाऊंड्री आणि पीटरसनला मारलेल्या सिक्ससह टेलरने ४३ रन्स फटकावल्या.
जेसी रायडरबरोबर ११४ रन्सची पार्टनरशीप करुन त्याने न्यूझीलंडची इनिंग्ज सावरली होती.
तो आऊट झाला तेव्हा ३३ ओव्हर्समध्ये न्यूझीलंडचा स्कोर होता १३० / ३!

टेलर परतल्यावर बॅटींगला आलेल्या स्कॉट स्टायरीसने सुरवातीला रायडरला सपोर्ट देण्याची भूमिका घेतली. पण पीटरसनच्या ऐवजी मॉर्केल बॉलिंगला येताच स्टायरीसने आक्रमक पवित्रा घेत त्याला स्ट्रेट ड्राईव्ह आणि पूलच्या २ बाऊंड्री तडकावल्या. बोथाच्या पुढच्या ओव्हरमध्ये क्रीजमधून पुढे सरसावत त्याने लाँगऑनला बाऊंड्री फटकावली, पण मॉर्केलच्या पुढच्या ओव्हरमध्ये कव्हर्समधून फटकावण्याच्या नादात स्टायरीसच्या बॅटची इनसाईड एज लागून बॉल स्टंपवर गेला. पण न्यूझीलंडला खरा धक्का बसला तो आणखीन ३ रन्सची भर पडल्यावर...

इमरान ताहीरचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
इतका वेळ शांत डोक्याने खेळणार्‍या रायडरने आक्रमक पवित्रा घेत तो मिडविकेटला उचलला पण...
अपेक्षेपेक्षा बॉल किंचित स्लो आलेल्या बॉलमुळे रायडरची टॉप एज लागली...
मिडविकेट बाऊंड्रीवर स्टाईनच्या ऐवजी फिल्डींगला आलेल्या कॉलिन इनग्रामने कॅच घेण्यात कोणातीही कसूर केली नाही!

१२१ बॉल्समध्ये ८ बाऊंड्रीसह जेसी रायडरने ८३ रन्स काढल्या.
न्यूझीलंड १५६ / ५!

न्यूझीलंडपुढे आता आव्हान उभं राहीलं होतं ते पूर्ण ५० ओव्हर्स खेळून काढण्याचं!

केन विल्यमसन आणि नॅथन मॅक्कलम यांनी कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढण्यावर भर दिला. स्टाईन आणि पीटरसनच्या अचूक बॉलिंगने मॅक्कलमला जखडून टाकलं होतं. विल्यमसनने क्रीजमधून पुढे सरसावत पीटरसनला लाँगऑनवरुन दणदणीत सिक्स ठोकली. त्याच ओव्हरमध्ये ४ बाईजचा आयताच बोनस न्यूझीलंडला मिळाला, पण स्टाईनच्या पुढच्या ओव्हरमध्ये मॅक्कलमची टॉप एज लागली आणि बॅकवर्ड पॉईंटला ड्युमिनीने त्याचा कॅच घेतला. न्यूझीलंड १८८ / ६!

मॅक्कलम आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या जेकब ओरमने ताहीरला स्वीपची बाऊंड्री मारली. स्टाईनच्या ४८ व्या ओव्हरमध्ये विल्यमसन - ओरम यांनी एकही बाऊंड्री न मारता ८ रन्स काढल्या, पण ताहीरच्या ऐवजी परतलेल्या मॉर्केलला मिडविकेटला फटकावण्याचा ओरमचा प्रयत्नं पार फसला आणि त्याची दांडी उडाली. कॅप्टन डॅनियल व्हिटोरीने पहिल्याच बॉलवर ऑफस्टंपच्या बाहेर जात स्क्वेअरलेगला बाऊंड्री तडकावली, पण आणखीन २ बॉल्सनंतर मॉर्केलच्या अचूक यॉर्करने त्याचा मिडलस्टंप उडवला. शेवटच्या ओव्हरमध्ये विल्यमसनने स्टाईनला एक्स्ट्राकव्हरला बाऊंड्री तडकावत १० रन्स फटकावल्या.

५० ओव्हर्स संपल्या तेव्हा न्यूझीलंडचा स्कोर होता २२१ / ८!

जेसी रायडर आणि रॉस टेलर खेळत असताना न्यूझीलंड किमान २४० - २५० पर्यंत मजल मारेल अशी चिन्हं दिसत होती. हे दोघंही मोक्याच्या क्षणी आऊट झाल्यामुळे न्यूझीलंडला पूर्ण ५० ओव्हर्स खेळून काढण्यावरच लक्षं केंद्रीत करावं लागलं होतं. केन विल्यमसनच्या चाणाक्षं बॅटींगमुळे न्यूझीलंडला ते साध्यं झालं होतं. ४१ बॉल्समध्ये १ बाऊंड्री आणि १ सिक्ससह ३८ रन्स फटकावून विल्यमसन नॉटआऊट राहीला.

दक्षिण आफ्रीकेला २२२ रन्सचं आव्हान कितपत कठीण जाणार होतं?

डॅनियल व्हिटोरीने पहिल्या ओव्हरमध्ये नॅथन मॅक्कलमला बॉलिंगला आणलं. मॅक्कलमच्या तिसर्‍या बॉलवर हाशिम अमलाने कव्हर्समधून बाऊंड्री तडकावत आक्रमक सुरवात केली पण...

नॅथन मॅक्कलमचा शेवटचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
अमलाने कट् मारण्याचा पवित्रा घेतला पण बॉल त्याच्या बॅटच्या बॉटम एजला लागला...
बॉल जमिनीवर न पडता विकेटकीपर ब्रेंडन मॅक्कलमच्या बुटावर पडून उडाला...
स्लिपमध्ये असलेल्या डॅनियल व्हिटोरीने कॅच घेण्यात कोणतीही कुचराई केली नाही...
न्यूझीलंडच्या खेळाडूंनी साहजिकच अपिल केलं...
अंपायर आलिम दर आणि रॉड टकर यांनी आपापसात चर्चा केल्यावर थर्ड अंपायर कुमार धर्मसेनाकडे हा निर्णय सोपवला...
टीव्ही रिप्लेमध्ये अमला आऊट असल्याचं निष्पन्नं झालं!
दक्षिण आफ्रीका ८ / १!

वर्ल्डकपमध्ये स्पिनरकरवी बॉलिंग ओपन करण्याच्या तंत्राचा जनक म्हणजे मार्टीन क्रो! १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये डॅनी मॉरीसनच्या जोडीला ऑफस्पिनर दीपक पटेलला बॉलिंगला आणून त्याने अनेक संघांना गोंधळून टाकलं होतं. पण यावेळी व्हिटोरीने मार्टीन क्रोच्या पुढे एक पाऊल टाकत दोन्ही बाजूंनी स्पिनर्सकरवी बॉलिंगला सुरवात करण्याचा निर्णय घेतला. मॅक्कलमच्या पहिल्या ओव्हरनंतर बॉलिंगला आला स्वतः व्हिटोरी!

मजेदार गोष्टं म्हणजे न्यूझीलंडचा बॉलिंग कोच होता..... अ‍ॅलन डोनाल्ड!

अमला आऊट झाल्यावर बॅटींगला आलेला जॅक कॅलीस आणि कॅप्टन ग्रॅम स्मिथ यांनी कोणतीही रिस्क न घेता मॅक्कलम - व्हेटोरी यांना सावधपणे खेळून काढत १-२ रन्स काढण्यावर भर दिला. अमला परतल्यावर पुढच्या ४ ओव्हर्समध्ये केवळ १२ रन्स निघाल्या, पण ६ व्या ओव्हरमध्ये कॅलीसने क्रीजमधून पुढे सरसावत व्हिटोरीला लाँगऑफवरुन बाऊंड्री फटकावली. मॅक्कलमच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या टिम साऊदीच्या २ ओव्हर्समध्ये कॅलिसने स्क्वेअरलेगला २ बाऊंड्री तडकावल्या. इतका वेळ शांतपणे खेळणार्‍या स्मिथने आक्रमक पवित्रा घेत व्हिटोरीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या जेकब ओरमला स्क्वेअर कट्ची बाऊंड्री मारली. साऊदी आणि ओरमच्या पुढच्या ३ ओव्हर्समध्ये केवळ १० रन्स निघाल्यावर ल्यूक वूडकॉकला स्मिथने कव्हर्समधून बाउंड्री तडकावण्यात कोणतीही हयगय केली नाही. स्मिथ - कॅलीस यांनी ६१ रन्सची पार्टनरशीप केल्यावर...

जेकब ओरमचा शॉर्टपीच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
स्मिथने अर्थातच आक्रमक पवित्रा घेत स्क्वेअरकट मारली पण...
बॉल हवेत उचलण्याची घातक चूक त्याला भोवली...
बॅकवर्ड पॉईंटला जेसी रायडरच्या ऐवजी फिल्डींगला आलेल्या जेमी हाऊने कॅच घेतला!

३४ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह स्मिथने २८ रन्स फटकावल्या.
दक्षिण आफ्रीका ६९ / २!

कॅलीसच्या जोडीला एबी डिव्हीलीयर्स आल्यावर दोघांनी न्यूझीलंड बॉलर्सचा सहजपणे मुकाबला करत आरामात रन्स काढण्यास सुरवात केली. वूडकॉकच्या फुलटॉसवर डिव्हीलीयर्सने मिडविकेटला बाऊंड्री फटकावली. वूडकॉकच्या जागी स्वतः व्हिटोरी बॉलिंगला आला पण कॅलीस - डिव्हीलीयर्सला काही फरक पडणं शक्यंच नव्हतं. ओरमच्या बॉलवर डिव्हीलीयर्सने स्क्वेअरड्राईव्हची बाऊंड्री मारल्यावर त्याच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या साऊदीला त्याने कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली! डिव्हीलीयर्सचा हा कारभार सुरु असताना कॅलीस शांत डोक्याने १-२ रन्स काढत स्ट्राईक रोटेट करत होता. कोणतीही रिस्क न घेता या दोघांनी ३९ रन्सची पार्टनरशीप केल्यावर...

टिम साऊदीचा मिडलस्टंपवर पडलेला बॉल कॅलीसने पूल केला...
कॅलीसचा शॉट आरामात बाऊंड्रीपार जाणार असं वाटत असतानाच...
मिडविकेट बाऊंड्रीवर जेकब ओरमने हवेत जंप मारली आणि कॅच घेतला...
कॅलीसचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना...

७५ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह कॅलीसने ४७ रन्स फटकावल्या.
न्यूझीलंड १०८ / ३!

ओरम म्हणतो,
"My only thought was just run, because he did hit it so well. I was running back and across. Thankfully I am 6'6". I replaced Kane Williamson out there who is about 4'6"; maybe it would have been a one-bounce four if he was out there."

कॅलीस आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या जेपी ड्युमिनीने सावधपणे डिव्हीलीयर्सला सपोर्ट देण्याची भूमिका घेतली. साऊदीच्या पुढच्या ओव्हरमध्ये डिव्हीलीयर्सने मिडऑनला बाऊंड्री फटकावली, पण पुढच्या ओव्हरमध्ये...

नॅथन मॅक्कलमचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
ड्युमिनीने बॅकफूटवर जात कट् मारण्याचा पवित्रा घेतला पण...
बॉल टप्पा पडल्यावर त्याच्या अपेक्षेप्रमाणे स्पिन न होता सरळ जात बॅट आणि पॅडमधून घुसला...
ड्युमिनीचा ऑफस्टंप उडाला!
दक्षिण आफ्रीका १२१ / ४!

आणखीन १ बॉलनंतर...

मॅक्कलमचा ऑफस्टंपवर पडलेला बॉल फाफ ड्युप्लेसीने मिडविकेटला फ्लिक केला आणि १ रनसाठी कॉल दिला...
डिव्हीलीयर्सने त्याच्या कॉलला प्रतिसाद दिला आणि रन काढण्यासाठी धाव घेतली...
मिडविकेटला मार्टीन गप्टीलने बॉल पिकअप केला...
डिव्हीलीयर्सने क्रीजमध्ये पोहोचण्यासाठी जिवाच्या आकांताने डाईव्ह मारली...
गप्टीलचा हाफव्हॉलीवर आलेला थ्रो कलेक्ट करुन मॅक्कलमने बेल्स उडवल्या...
स्क्वेअरलेग अंपायर आलिम दरने थर्ड अंपायर कुमार धर्मसेनावर हा निर्णय सोपवला....

कॉमेंट्रॉ बॉक्समध्ये असलेला इयन बिशप म्हणाला,
"Oh my goodness! If this is out, its unbelievable!"

डिव्हीलीयर्सच्या संदर्भात थर्ड अंपायरचा निकाल येत असतानाच एक वेगळंच नाट्यं आकाराला आलं....

न्यूझीलंडचा संघ हा सभ्यं खेळाडूंचा संघ म्हणूनच ओळखला जातो. स्लेजिंगवगैरेच्या भानगडीत सहसा न्यूझीलंडचे खेळाडू पडत नाहीत. आयसीसीतर्फे दरवर्षी दिलं जाणारं 'फेअर प्ले अ‍ॅवॉर्ड' सर्वात जास्तं वेळा न्यूझीलंडच्या संघाला मिळालेलं आहे पण न्यूझीलंडच्या संघाचा आक्रमक अवतार यावेळी पाहण्यास मिळाला...

रॉस टेलर आणि ड्रिंक्स घेऊन मैदानात आलेला काईल मिल्स यांची डिव्हीलीयर्स रनआऊट होण्यावरुन ड्युप्लेसीशी खडाजंगी झाली...
एरवी समंजस आणि सभ्यं म्हणून ओळख असलेल्या व्हिटोरीनेही आपल्या सहकार्‍यांची बाजू घेत ड्युप्लेसीला चार शब्दं सुनावले...
ड्युप्लेसी मागे हटणं शक्यच नव्हतं. त्याने त्यांना प्रतिउत्तर दिलंच...
थर्ड अंपायरच्या निर्णयाची प्रतिक्षा करत असलेल्या डिव्हीलीयर्सने ड्युप्लेसीच्या बाजूने वादात उडी घेतली...
अखेर अंपायर आलिम दर आणि रॉड टकर यांनी मध्यस्थी करत हा वाद शमवला!

डिव्हीलीयर्स रनआऊट झाला!

४० बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह डिव्हीलीयर्सने ३५ रन्स फटकावल्या.
दक्षिण आफ्रीका १२१ / ५!

दक्षिण आफ्रीकेला २२ ओव्हर्समध्ये अद्याप १०१ रन्सची आवश्यकता होती!

डिव्हीलीयर्स आऊट झाल्यावर बॅटींगला आलेला योहान बोथा आणि ड्युप्लेसी यांना रन्स काढण्याची कोणतीही संधी मिळत नव्हती. व्हिटोरी, नॅथन मॅक्कलम आणि वूडकॉक यांनी अचूक बॉलिंग करत त्यांना एका जागी अक्षरशः खिळवून ठेवलं होतं. ४ ओव्हर्समध्ये केवळ ६ रन्स निघाल्यावर व्हिटोरीने बॉलिंगला आणलं ओरमला...

ओरमचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
बोथाने फ्रंटफूटवर येत बॉल डिफेंड करण्याचा पवित्रा घेतला पण...
टप्पा पडल्यावर बॉल सीम झाला आणि बोथाला चकवून ऑफस्टंपवर गेला...
दक्षिण आफ्रीका १२८ / ६!

ओरमच्या पुढच्या ओव्हरमध्ये कट् मारण्याच्या प्रयत्नात रॉबीन पीटरसनच्या बॅटची बॉटम एज लागली...
ब्रेंडन मॅक्कलम हा कॅच सोडणं शक्यंच नव्हतं...
दक्षिण आफ्रीका १३२ / ७!

डेल स्टाईनने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पहिल्याच बॉलवर लेग ग्लान्सची बाऊंड्री मारली. त्याच ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर ड्युप्लेसीने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री मारत ओरमच्या ओव्हरमध्ये १२ रन्स फटकावल्या.

१५ ओव्हर्समध्ये अद्याप ८१ रन्स बाकी होत्या!

नॅथन मॅक्कलम आणि ओरमच्या ऐवजी बॉलिंगला आलेला वूडकॉक यांच्या २ ओव्हर्समध्ये ५ रन्स निघाल्यावर...
मॅक्कलमचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
स्टाईनने लेगसाईडला सरकत कव्हर्समधून बॉल तडकावला....
स्टाईनच्या बॅटची आऊटसाईड एज लागून बॉल पॉईंटच्या दिशेने उडाला...
पॉईंटला असलेल्या ओरमने पुढे डाईव्ह मारत कॅच घेतला!
दक्षिण आफ्रीका १४६ / ७!

मॉर्नी मॉर्केल बॅटींगला आल्यावर ड्युप्लेसीपुढे आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजी करण्यापलीकडे पर्याय उरला नाही. त्या दृष्टीने त्याने बॅटींग पॉवरप्ले घेतला!

व्हिटोरीच्या ओव्हरमध्ये केवळ ४ रन्स निघाल्यावर मॅक्कलमच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या साऊदीला ड्युप्लेसीने स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री फटकावली. व्हिटोरीच्या पुढच्या ओव्हरमध्ये त्याने क्रीजमधून पुढे सरसावत मिडऑनला बाऊंड्री तडकावली. साऊदीच्या अचूक ओव्हरनंतर व्हिटोरीने पुन्हा ओरमला बॉलिंगला आणलं....

ओरमचा पहिलाच बॉल ऑफस्टंपवर पडला...
ड्युप्लेसीने फ्रंटफूटवर येत स्ट्रेट ड्राईव्ह मारला...
ओरमला हा कॅच घेता आला नाही...

ओरमचा दुसरा बॉल ऑफस्टंपच्या किंचित बाहेर पडला...
ड्युप्लेसीने क्रीजमधून पुढे सरसावत तो हाफव्हॉलीवर घेतला आणि एक्स्ट्राकव्हरला उचलला...
बाऊंड्रीवर असलेला जेमी हाऊ कॅचच्या प्रतिक्षेत होता पण...
बॉल बाऊंड्रीपार गेला... सिक्स!

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला मार्क निकोलस म्हणाला,
"Thats in the air over the extra cover… has it got legs? Its got the legs! Six of the most desperate runs needed in South Africa’s cricket history!"

आणखीन दोन बॉल्सनंतर...

ओरमचा पाचवा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
ड्युप्लेसीने लेगसाईडला सरकत तो पुन्हा कव्हर्समधून फटकावला पण....
बॉल गेला तो कव्हर्समध्ये असलेल्या टिम साऊदीच्या हातात...
.... आणि दक्षिण आफ्रीकेची उरलीसुरली आशा संपुष्टात आली!

४३ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि ओरमला मारलेल्या सिक्ससह ड्युप्लेसीने ३६ रन्स फटकावल्या.
दक्षिण आफ्रीका १७२ / ९!

अद्याप ७ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला ५० रन्सची आवश्यकता होती!

वूडकॉकच्या ओव्हरच्या दुसर्‍याच बॉलवर...
मॉर्नी मॉर्केलने क्रीजमधून पुढे सरसावत बॉल मिडऑफवरुन उचलला...
लाँगऑफ बाऊंड्रीवर जेसी रायडरच्या ऐवजी फिल्डींग करत असलेल्या हाऊने कॅच घेण्यात कोणतीही कसूर केली नाही!
दक्षिण आफ्रीका १७२ ऑल आऊट!

न्यूझीलंड ४९ रन्सनी मॅच जिंकून सेमीफायनलमध्ये धडकले!

ग्रॅम स्मिथला नेमकं काय बोलावं हे कळत नव्हतं,
"No words to describe how I feel. Just have to take it on the chin.. Very disappointing evening. At 100 for 2, we were sitting well, and then we lost too many wickets. The stand between Jesse and Taylor kept them in good stead, but we kept them to 220, which is very gettable. We lost too many wickets.. Its been happening since 1992. We are disappointed with tonight, and nothing I say is going to change that for fans back home."

स्मिथने मॅचनंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये दक्षिण आफ्रीकेच्या कॅप्टनपदाचा राजीनामा दिला!

डॅनियल व्हिटोरी म्हणाला,
We knew we had to be aggressive. We were hanging in there even when Kallis and AB were going. It was a tricky wicket, and knew it was going to be an old-school one-day game. That's the sort of game we like to play. Once we got de Villiers and Kallis, we were back in it. The run out of de Villiers was an amazing piece of work."

मॅन ऑफ द मॅच म्हणून जेकब ओरमची निवड झाली.

ओरम म्हणाला,
"Thankfully I was tall enough and managed to get there for the Kallis caught. I don't want to take credit for that one, but I suppose Kallis' dismissal was the turning point of the match."

दक्षिण आफ्रीकेच्या पराभवाला त्यांची मोक्याच्या क्षणी कच खाण्याची घातक सवय अर्थातच कारणीभूत होती, पण त्यापेक्षाही वर्ल्डकपसाठी संघ निवडताना त्यांनी घातलेला घोळ त्यांना भोवला होता. योहान बोथा आणि रॉबिन पीटरसन यांच्या क्षमतेवर फाजिल विश्वास ठेवून विकेटकीपर मार्क बाऊचर आणि ऑलराऊंडर अ‍ॅल्बी मॉर्केल यांचा वर्ल्डकपमध्ये समावेशच करण्यात आला नव्हता!

दक्षिण आफ्रीकेच्या या चुकीवर सर्वात प्रथम बोट ठेवलं होतं ते महेंद्रसिंग धोणीने!

वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी धोणी म्हणाला होता,
"Dropping Albie Morkel is a big mistake by South Africa. He is a genuine match winner with bat and ball!"

डॅनियल व्हेटोरीने नेमक्या याच गोष्टीचा न्यूझीलंडला फायदा झाल्याचं स्पष्टं केलं!

व्हिटोरी म्हणाला,
"We were desperate to get into that middle to lower order; that was our whole game plan, do whatever we can to get down there. It was always about getting past AB de Villiers. Their top four has proven themselves over a long, long time. They've got fantastic records, and I thought if we could break through that, particularly getting down to No. 6 and Botha at No. 7 meant they had a longish tail. The whole talk while we were out there and before the game was just to take wickets."

मॅच रेफ्री रोशन महानामाने ड्युप्लेसी, मिल्स आणि व्हेटोरी यांच्यात झालेल्या वादावादीबद्दल त्यांना दंड ठोठावला.

वर्ल्डकपच्या नॉकआऊट मॅचेसमध्ये आयत्यावेळी कच खाण्याच्या दक्षिण आफ्रीकेच्या 'चोकर्स' या पदवीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं!

दक्षिण आफ्रीकेचा कोच मिकी आर्थर म्हणाला,
"The monkey's almost become a gorilla now and until we win an ICC event it's always going to be there I'm afraid."

क्रीडालेख