वर्ल्डकप क्लासिक्स - १९७९ - फायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
3 Feb 2017 - 10:43 am

२३ जून १९७९
लॉर्डस्, लंडन

ऐतिहासिक लॉर्डसच्या मैदानातच १९७५ च्या पहिल्या वर्ल्डकपप्रमाणे दुसर्‍या वर्ल्डकपचीही फायनल रंगणार होती. पहिल्या वर्ल्डकपच्या विजेत्या क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीयन संघ दुसर्‍या वर्ल्डकपच्याही फायनलमध्ये येऊन धडकला होता. लॉईडच्या संघात स्वतः लॉईड, गॉर्डन ग्रिनिज, डेसमंड हेन्स, व्हिव्हियन रिचर्डस्, अल्विन कालिचरण असे बॅट्समन होते. १९७५ च्या वर्ल्डकपमधल्या पाकिस्तानविरुद्धच्या मॅचचा हिरो विकेटकीपर डेरेक मरे आणि ऑलराऊंडर कॉलिस किंग या दोघांचाही वेस्ट इंडीजच्या टीममध्ये समावेश होता.

आणि जगभरातल्या बॅट्समनच्या छातीत धडकी भरवणारे चार फास्ट बॉलर्स होते..
अँडी रॉबर्टस, मायकेल होल्डींग, जोएल गार्नर आणि कॉलिन क्रॉफ्ट!

वेस्ट इंडी़जचा सामना होता तो माईक ब्रिअर्लीच्या इंग्लंडशी!

ब्रिअर्लीच्या इंग्लिश संघात स्वतः ब्रिअर्ली, जेफ बॉयकॉट, ग्रॅहॅम गूच, डेव्हीड गावर, डेरेक रँडल असे बॅट्समन होतेच, शिवाय इयन बोथमसारखा ऑलराऊंडरही होता. बोथमच्या जोडीला माईक हेंड्रीक, क्रिस ओल्ड असे बॉलर्स होते, पण न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या दुखापतीमुळे बॉब विलीस मात्रं या मॅचमध्ये खेळण्यास असमर्थ ठरला होता. विलीसच्या जागी फिल एडमंड्सची निवड करण्यात आली होती. पाचव्या बॉलरच्या १२ ओव्हर्ससाठी सेमीफायनलमध्ये अचूक बॉलिंग करणारा बॉयकॉट, गूच आणि वेन लारकिन्सला वापरण्याचा ब्रिअर्लीचा इरादा होता. वेस्ट इंडीजच्या आक्रमक बॉलर्सना आळा घालण्यात इंग्लंडचे बॉलर्स कितपत यशस्वी होतात यावर मॅचचा निकाल अवलंबून राहणार होता.

इंग्लंड्च्या संघात एक बॉलर कमी असल्याने आणि ढगाळ वातावरणाचा फायदा करुन घेण्याच्या हेतूने माईक ब्रिअर्लीने टॉस जिंकल्यावर फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. विलीसच्या अनुपस्थितीत माईक हेंड्रीकच्या जोडीला बॉलिंगला सुरवात केली ती बोथमने! बोथम आणि हेंड्रीकच्या स्विंग होणार्‍या बॉलचा मुकाबला करणं ग्रिनिजला कठीण जात होतं. दुसर्‍या बाजूने हेन्स मात्रं आरामात फटकेबाजी करत होता. हे दोघे जोरदार ओपनिंग पार्टनरशीप करणार असं वाटत असतानाच..

क्रिस ओल्डचा बॉल ग्रिनिजने मिडविकेटला प्लेस केला आणि एक रनसाठी कॉल दिला.
हेन्सने ग्रिनिजच्या कॉलला ताबडतोब प्रतिसाद दिला पण...
स्क्वेअरलेगवरुन तीरासारखा धावत आलेल्या डेरेक रँडलने झडप घालून बॉल पिकअप केला..
रँडलचा थ्रो नॉनस्ट्रायकर एंडच्या स्टंप्सवर अचूक लागला!
सेमीफायनलमध्ये जॉन राईट, मार्क बर्जेसना रनआऊट करणार्‍या रँडलने यावेळी ग्रिनिजला आपला 'हात' दाखवला होता!
वेस्ट इंडीज २२ / १!

कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेला पीटर वेस्ट उद्गारला,
"Yet another reminder. Never take a risky single to Randall!"

ग्रिनिजच्या जागी बॅटींगला आलेला रिचर्डस क्रिस ओल्डच्य पहिल्याच बॉलवर बोल्ड होताहोता वाचला होता. अर्थात त्याच्यावर त्याचा कसलाच परिणाम झाला नाही हा भाग वेगळा! नेहमीप्रमाणे आक्रमक पवित्रा घेत रिचर्ड्सने इंग्लिश बॉलर्सची धुलाई सुरु केली. पण वेस्ट इंडीजचा स्कोर ३६ पर्यंत पोहोचल्यावर रिचर्डसप्रमाणेच फटकेबाजी करण्याचा हेन्सचा प्रयत्नं फसला आणि ओल्डला ड्राईव्ह करण्याच्या नादात दुसर्‍या स्लिपमध्ये हेंड्रीकने त्याचा कॅच घेतला. आणखीन १९ रन्सची भर पडते तोच हेंड्रीकने कालिचरणचा लेग स्टंप उडवला. वेस्ट इंडीज ५५ / ३!

लॉईड बॅटींगला आल्यावर रिचर्ड्सचा आक्रमकपणा अधिकच वाढला! लॉईड सावधपणे बॅटींग करत असताना रिचर्ड्सने बॉयकॉटला मिडविकेटवरुन दणदणीत सिक्स आणि लागोपाठ बाऊंड्री ठोकली. सुरवातीला सावधपणे खेळणार्‍या लॉईडनेही ओल्डला लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. हे दोघं इंग्लंडला त्रासदायक ठरणार अशी चिन्हं दिसत होती. रिचर्डसने हेंड्रीकच्या बॉलवर ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन मिडविकेटला आपला पेटंट शॉट फटकावल्यावर ब्रिअर्लीने त्याच्याजागी ओल्डला बॉलिंगला आणलं. ही चाल चांगलीच यशस्वी ठरली. ओल्डच्या बॉलवर ऑनड्राईव्ह मारण्याचा लॉईडचा प्रयत्नं साफ फसला आणि फॉलो थ्रूमध्ये ओल्डनेच त्याचा अफलातून कॅच घेतला. वेस्ट इंडीज ९९ / ४!

लॉईडच्या जागी बॅटींगला आला कॉलिस किंग!
इंग्लिश बॉलर्सना, विशेषतः बॉयकॉटला फोडून काढण्याच्या इराद्यानेच!

"Hey man, take it easy... we have plenty of time." रिचर्ड्स किंगला समजावण्याच्या हेतूने उद्गारला.

"Smokey, I ain't gonna let Geoffrey get this, man!" किंग उत्तरला, "In the league there would be no mercy, so why should this be any different?"

बोथमच्या पहिल्या दोन बॉल्सवर किंगने कट आणि कव्हरड्राईव्हच्या बाऊंड्री तडकावल्या! पण बोथमच्याच बॉलवर किंगचा फसलेला हूक स्लिप्सच्या डोक्यावरुन गेल्यावर रिचर्ड्सने त्याला शांत करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्नं करुन पाहिला, पण किंगवर त्याचा काडीमात्रं परिणाम झाला नाही. त्यातच ब्रिअर्लीने पाचव्या बॉलरच्या ओव्हर्स पूर्ण करण्याच्या हेतूने बॉयकॉट आणि गूचला बॉलिंगला आणलं! मग काय?

किंग अक्षरशः उधळला!

ड्राईव्ह, कट आणि पूलचा मनसोक्तं वापर करत किंगने बॉयकॉट आणि गूचची पद्धतशीरपणे धुलाई करण्यास सुरवात केली. बॉयकॉटच्या जागी ब्रिअर्लीने लारकिन्सला बॉलिंगला आणलं, पण किंगने त्याला लागोपाठ दोन सिक्स तडकावल्या. निरुपायाने ब्रिअर्लीने पुन्हा बॉलिंगला आणलेल्या बॉयकॉटवर पुढच्याच ओव्हरमध्ये तीच आपत्ती ओढवली! सिक्सपाठोपाठ बॉयकॉटला कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावत किंगने त्याला पार नामोहरम करुन टाकलं!

The Art of Captaincy या आपल्या अप्रतिम पुस्तकात किंगच्या फटकेबाजीचं वर्णन करताना ब्रिअर्ली म्हणतो,
“I remember feeling close to impotence in the World Cup final in 1979, when Collis King and Viv Richards cut loose. Admittedly we had to bowl Geoff Boycott, Graham Gooch or Wayne Larkins for 12 overs, which was, in those conditions, like attacking tanks with pea-shooters,”

अखेर बॉयकॉटच्या जागी आलेल्या एडमंड्सला फटकावण्याचा किंगचा प्रयत्नं फसला आणि स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर रँडलने त्याचा कॅच घेतला!

रिचर्ड्स आणि किंग यांनी २१ ओव्हर्समध्ये १३९ रन्सची पार्टनरशीप केली होती. किंगचा फटकेबाजीचा झपाटा इतका प्रचंड होता की तो ४७ रन्सवर खेळत असताना रिचर्ड्स ९१ वर होता आणि अखेर ८६ रन्सवर तो आऊट झाला तेव्हा रिचर्ड्स ९५ वर पोहोचला होता!

रिचर्ड्स म्हणतो,
"I let him tear into the bowling rather than the two of us going berserk... I worked around him while the fire raged."

६६ बॉल्समध्ये १० बाऊंड्री आणि ३ सिक्स तडकावत किंगने ८६ रन्स झोडपून काढल्या होत्या!
साक्षात रिचर्ड्सला झाकोळून टाकत!

किंग परतल्यावर रिचर्ड्सने इंग्लंडची धुलाई सुरु केली, पण दुसर्‍या बाजूने एकापाठोपाठ एक विकेट्स जात होत्या. एडमंड्सच्या बॉलवर गावरने मरेचा कॅच घेतला तर हेंड्रीकच्या बॉलवर ब्रिअर्लीने रॉबर्ट्सचा! बोथमने गार्नर आणि होल्डींग यांना झटपट गुंडाळलं, पण वेस्ट इंडीजची इनिंग्ज संपुष्टात आणण्यात इंग्लंडला यश मिळालं नाही.

इनिंग्जच्या शेवटच्या बॉलवर ऑफस्टंपच्या बाहेर जात रिचर्ड्सने हेंड्रीकला स्क्वेअरलेगवर सिक्स ठोकली!
१५७ बॉल्समध्ये ११ बाऊंड्री आणि ३ सिक्स तडकावत रिचर्ड्स १३८ रन्स फटकावल्या होत्या!
किंग आऊट झाल्यावर वेस्ट इंडीजने काढलेल्या ४८ रन्सपैकी ४३ रन्स एकट्या रिचर्ड्सच्या होत्या!
६० ओव्हर्समध्ये वेस्ट इंडीजने २८६ / ९ पर्यंत मजल मारली होती!

२८७ रन्सचं टार्गेट घेऊन उतरलेल्या ब्रिअर्ली आणि बॉयकॉट यांनी अत्यंत सावधपणे इंग्लंडच्या इनिंग्जची सुरवात केली. वेस्ट इंडीजच्या तुफानी बॉलिंगपुढे कोणत्याही परिस्थितीत विकेट न गमावण्याचा दोघांचाही निर्धार होता. बॉयकॉट आपल्या नेहमीच्या लौकीकाला साजेशी बॅटींग करत होता. १० रन्स काढण्यासाठी त्याने तब्बल १७ व्या ओव्हरपर्यंत वेळ घेतला होता! ब्रिअर्ली आणि बॉयकॉट यांचा टेस्ट मॅचला साजेसा पवित्रा वेस्ट इंडीजच्या पथ्यावर पडणाराच होता. टी-टाईमपर्यंत ब्रिअर्ली - बॉयकॉट यांनी एकही विकेट जाणार नाही याची काळजी घेतली होती, पण २५ ओव्हर्समध्ये केवळ ७९ रन्स झाल्या होत्या!

( इंग्लंडमधल्या ६० ओव्हर्सच्या वन डे मध्ये पहिल्या इनिंग्जमध्ये लंच तर दुसर्‍या इनिंग्जमध्ये टी-टाईमची व्यवस्था असे! )

टी-टाईममध्ये आपल्या सहकार्‍यांशी चर्चा करताना ब्रिअर्लीने पुन्हा बॅटींगला गेल्यावर वेस्ट इंडीजच्या बॉलर्सवर - खासकरुन किंग आणि रिचर्ड्सचे पार्टटाईम ऑफब्रेक्स यांच्यावर आक्रमण करण्याचा आपला इरादा बोलून दाखवला. बॉयकॉटकडून आक्रमक फटकेबाजीची अपेक्षा करणं व्यर्थ आहे याची ब्रिअर्लीला कल्पना होती. वर्ल्डकप जिंकण्यासाठी ३५ ओव्हर्समध्ये २०८ रन्सची आवश्यकता असल्याने ब्रिअर्लीचा पवित्रा योग्यच होता, परंतु बोथम आणि रँडल यांचं मत मात्रं वेगळं होतं. टी-टाईमनंतर लगेचच फटकेबाजी न करता योग्य वेळ पाहूनच आक्रमक धोरण स्वीकारावं असं दोघांचंही मत पडलं!

टी-टाईमनंतरही ब्रिअर्ली आणि बॉयकॉट टेस्ट मॅचच्याच थाटात बॅटींग करत होते. रिचर्ड्सच्या ऑफब्रेक्सवरही टी-टाईमनंतरच्या ६ ओव्हर्समध्ये केवळ २३ रन्स निघाल्या. हे दोघं बॅटींग करत असतानाच....

रिचर्ड्सच्या बॉलवर क्रीजमधून पुढे सरसावत बॉयकॉटचा ऑन ड्राईव्ह नेमका हवेत गेला....
मिडऑनला असलेल्या लॉईडच्या दृष्टीने हा कॅच म्हणजे आरामाचा मामला होता पण...
उत्कृष्ट फिल्डर असलेल्या लॉईडच्या हातातून बॉल नेमका सुटला!
बॉयकॉट आऊट होता-होता वाचला!

वेस्ट इंडीजच्या पाठीराख्यांच्या मते लॉईडने बॉयकॉटचा कॅच मुद्दामच ड्रॉप केला होता!
बॉयकॉटच्या आधी ब्रिअर्लीचाही तुलनेत बराच कठीण कॅच लॉईडला घेता आला नव्हता.

रिचर्ड्स म्हणतो,
"We weren't too worried when Lloyd contrived to drop Boycott!"

स्वतः लॉईडने मात्रं आपण मुद्दाम कॅच सोडल्याचं नाकारलं. तो म्हणतो.
"I could have watched them all day because I knew every over they batted was another nail in their coffin. A lot of people suggested I put the catch down purposefully just to keep him in... not true, but it wouldn't have been a bad tactic."

"I hope neither of the openers get out." कॉलिन क्रॉफ्ट गार्नरला म्हणाला!

लॉईडने कॅच ड्रॉप केल्यावर बॉयकॉटने अचानक आक्रमक पवित्रा घेत रॉबर्ट्सला कव्हर्समधून लागोपाठ २ बाऊंड्री तडकावल्या! इंग्लंडची ओपनिंग पार्टनरशीप अखेर संपुष्टात आणली ती होल्डींगने. त्याच्या बंपर हूक करण्याच्या प्रयत्नात लाँगलेग बाऊंड्रीवर किंगने ब्रिअर्लीचा कॅच घेतला! १३० बॉल्समध्ये ७ बाऊंड्रीसह ब्रिअर्लीने ६४ रन्स काढल्या होत्या! बॉयकॉटसह त्याने १२९ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली, पण त्यासाठी त्यांनी ३८ ओव्हर्स घेतल्या होत्या!

ब्रिअर्ली आऊट झाल्यावर रन रेट वाढवण्याच्या हेतूने रँडल बॅटींगला आला. जेमतेम ६ रन्सची भर पडते तोच होल्डींगने बॉयकॉटलाही हूकच्या ट्रॅपमध्ये अडकवलं! मिडविकेटला कालिचरणने त्याचा कॅच घेतला. १०५ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह बॉयकॉटने ५७ रन्स काढल्या! इंग्लंड १३५ / २!

बॉयकॉटच्या जागी बॅटींगला आलेल्या गूचने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. गूच - रँडल यांनी ७ ओव्हर्समध्ये ४८ रन्स तडकावल्या, पण कॉलिन क्रॉफ्टला फटकावण्याच्या नादात रँडल बोल्ड झाला! अद्यापही मॅच जिंकण्यासाठी इंग्लंडसमोर १३ ओव्हर्समध्ये १०४ रन्सचं अशक्यप्राय आव्हान होतं. आणि ते देखिल वेस्ट इंडीजच्या तोफखान्यासमोर! इंग्लंड १८३ / ३!

नेमक्या याच वेळेस लॉईडने बॉलिंगला आणलं जोएल गार्नरला!
आणि त्याने इंग्लंडची शब्दशः दुर्दशा करुन टाकली!

गार्नरचा यॉर्कर हा एक अतिभयानक प्रकार! सुमारे दहा फूट उंचीवरुन आदळणार्‍या यॉर्करचा गूचला काहीच अंदाज आला नाही आणि त्याची दांडी उडाली!
त्याच ओव्हरमध्ये गार्नरला कट् मारण्याचा डेव्हीड गावरचा प्रयत्नं पार फसला आणि त्याचा ऑफस्टंप उडाला!
पुढच्याच बॉलवर गार्नरच्या यॉर्करने वेन लारकिन्सच्या स्टंप्सवर झडप घातली
१८३ / ३ वरुन इंग्लंडची १८६ / ६ अशी घसरगुंडी उडाली!

इंग्लंडच्या दृष्टीने आशेचा एकमेव किरण होता तो म्हणजे बोथम, पण क्रॉफ्टच्या बॉलवर लाँगऑफ बाऊंड्रीवर बोथमचा जिगरी दोस्त आणि सॉमरसेटचा सहकारी असलेल्या रिचर्ड्सने त्याचा अफलातून कॅच घेत इंग्लंडची उरलीसुरली आशा धुळीस मिळवली!

गार्नरच्या बॉलवर एडमंड्स बोल्ड होण्यापासून वाचल्यामुळे हॅटट्रीक टळली खरी पण दोन बॉल्सनंतर पुन्हा एकदा गार्नरच्या यॉर्करवर ओल्डची दांडी उडाली!
पुढच्याच बॉलवर विकेटकीपर मरेने बॉब टेलरचा कॅच घेतल्यावर गार्नर पुन्हा हॅटट्रीकवर होता!
पण क्रॉफ्टची पुढची ओव्हर संपेपर्यंत गार्नरला वाट पाहवी लागणार होती!

क्रॉफ्टने त्याला हॅटट्रीकची संधीच दिली नाही!
चौथ्याच बॉलवर त्याने माईक हेंड्रीकला बोल्ड केलं!
१८३ / २ वरुन इंग्लंड १९४ मध्ये ऑलआऊट झाले होते!
गार्नरने आपल्या दुसर्‍या स्पेलमध्ये दोन ओव्हर्समध्ये ४ रन्समध्ये ५ विकेट्स काढल्या होत्या!
११ रन्समध्ये इंग्लंडच्या शेवटच्या ८ विकेट्स उडाल्या होत्या!
( भारताविरुद्धच्या टी२० मध्ये ८ रन्समध्ये ८ विकेट्स गमावणार्‍या इंग्लंडला इतकी थोर ऐतिहासिक परंपरा आहे! )

वेस्ट इंडी़जने १९७५ प्रमाणेच १९७९ मध्येही वर्ल्डकप जिंकला!

मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड झाली ती रिचर्ड्सची, पण स्वतः रिचर्ड्सच्या मते मात्रं किंगची ८६ रन्सची इनिंग्ज जास्तं महत्वाची होती!

रिचर्ड्स म्हणतो,
"I scored 138, but it was Collis who came in and took charge."

किंगची फटकेबाजी सुरु असताना मुख्यं बॉलर्सऐवजी बॉयकॉट - गूच - लारकिन्स यांना बॉलिंगला आणल्याबद्दल ब्रिअर्लीवर टीकेची झोड उठवण्यात आली, पण क्लाईव्ह लॉईडच्या मते ही टीका अनाठायी होती.

लॉईड म्हणतो,
"I don't think any bowler would have bothered King, the mood he was in that day. By the time has was out, I knew the match was ours."

क्रीडालेख

प्रतिक्रिया

अतिशय छान, अजून येउद्या...

चौकटराजा's picture

3 Feb 2017 - 1:25 pm | चौकटराजा

क्रिकेटच्या इतिहासातील एक असे नाव जे जॉन्टी र्होडस बरोबर घेतले जाईल ते नाव म्हणजे डेरेक रॅन्डॉल !!

स्पार्टाकस's picture

3 Feb 2017 - 9:01 pm | स्पार्टाकस

जाँटी र्‍होड्सच्याही पूर्वी निव्वळ फिल्डींगसाठी प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रीकेचाच आणखीन एक खेळाडू होता तो म्हणजे कोलिन ब्लँड. खुद्दं र्‍होड्सनेही ब्लँड आपला आदर्श होता असं नमूद केलं आहे. १९६५ च्या इंग्लंड टूरमध्ये ब्रायन जॉन्स्टनने "For the first time I heard people saying that they must go to a match especially to watch a fielder." असे उद्गार काढले ते ब्लँडबद्दलच!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Feb 2017 - 2:34 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह! मजा आया रे.. जिगरा खूस हो गया.

पैसा's picture

11 Feb 2017 - 10:15 am | पैसा

तेव्हाचे डावपेच आता हास्यास्पद वाटतात. बॉयकॉट आणि ब्रिअर्ली म्हणजे इंग्लंडसाठी नाईटमेअर ओपनर्स म्हटले पाहिजेत!