वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - सेमीफायनल - भारत विरुद्ध इंग्लंड

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
6 Feb 2017 - 11:38 am

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - सेमीफायनल - भारत विरुद्ध इंग्लंड

२२ जून १९८३
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

लँकेशायरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल होती. बॉब विलीसचा इंग्लिश संघ ग्रूपमधल्या सहा पैकी पाच मॅचेस जिंकून सेमी फायनलमध्ये धडकला होता. उरलेली एकमेव मॅचही न्यूझीलंडने शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकली होती. इंग्लिश खेळाडूंचं सारं लक्षं केंद्रीत झालं होतं ते फायनलकडे! दुसर्‍या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडीजला पाकिस्तानला हरवणार हे जवळपास प्रत्येकाने गृहीत धरलेलं असल्याने फायनलमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कोणते डावपेच लढवावेत यावरच इंग्लिश खेळाडूंच्या चर्चा सुरु होता. भारताविरुद्धची ही सेमीफायनल म्हणजे इंग्लंडच्या दृष्टीने प्रॅक्टीस मॅचच होती!

कपिल देवच्या झिंबाब्वेविरुद्धच्या टनब्रिज वेल्सच्या १७५ रन्सच्या कल्पिताहूनही अद्भुत इनिंग्जमुळे भारतीय संघात वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला होता. कोणत्याही परिस्थितीत हार मानणं कपिलला नामंजूर होतं आणि इतरांवरही त्याच्या या वृत्तीचा परिणाम झाला होता. झिंबाब्वेविरुद्धच्या मॅचनंतर पहिल्या राऊंडमध्ये १६१ रन्सनी भारताला हरवणार्‍या ऑस्ट्रेलियाला ११८ रन्सनी धूळ चारत भारताने सेमीफायनल गाठली होती!

बॉब विलीसने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला.

इंग्लंडचे ओपनिंग बॅट्समन होते ग्रॅहॅम फौलर आणि क्रिस टावरे! टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये प्रेक्षकच काय पण प्रतिस्पर्धी खेळाडूंना आणि अंपायर्सनाही वात आणणारा टावरे आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकण्याची क्षमता असलेला फौलर हे दोघे वन डे मध्ये ओपनिंगला यावे यापेक्षा मोठा विरोधाभास शोधूनही सापडला नसता! पण सर्वांच्या अपेक्षेला धक्का देत या दोघांनी ४ पेक्षा जास्तं रनरेटने १६ ओव्हर्समध्ये ६९ रन्सची पार्टनरशीप रचली! ओल्ड ट्रॅफर्डच्या स्लो विकेटवर कपिल आणि संधूचे बॉल्स तुलनेने सहजपणे बॅटवर येत होते. फौलर - टावरे यांनी नेमक्या याच गोष्टीचा अचूक फायदा उठवला होता. इंग्लंडच्या संघात असलेल्या डेव्हीड गावर, अ‍ॅलन लॅम्ब, माईक गॅटींग, इयन बोथम यांच्यासारख्या फटकेबाज बॅट्समनच्या दृष्टीने हा आदर्श प्लॅटफॉर्म होता!

कपिलच्या जागी बॉलिंगला आलेल्या रॉजर बिन्नीच्या आऊटस्विंगरवर विकेटकीपर किरमाणीने टावरेचा कॅच घेतला. ५१ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह टावरेने ३२ रन्स काढल्या. फौलर आणि टावरेच्या जागी बॅटींगला आलेला गावर यांनी इंग्लंडचा स्कोर ८४ पर्यंत नेल्यावर बिन्नीनेच फौलरची दांडी उडवली. टावरेच्या तोडीसतोड ५९ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह फौलरने ३२ रन्स काढल्या. इंग्लंड ८४ / २!

नेमक्या याच वेळेला बिन्नी - मदनलालच्या जागी कपिलने मोहींदर अमरनाथ आणि किर्ती आझाद यांना बॉलिंगला आणलं!

ओल्ड ट्रॅफर्डची स्लो विकेट अमरनाथ आणि आझाद यांच्यासाठी अगदी आदर्श होती. बॉल व्यवस्थित बॅटवर येत नसल्याने या दोघांना फटकावणं ही अशक्यं कोटीतली गोष्टं होती. त्यातच मध्येच एखादा बॉल लो राहत होता. दोघांनीही अचूट टप्प्यावर बॉलिंग करत गावर - लॅम्ब यांना पार जखडून टाकलं. १ किंवा २ रन्स पलिकडे दुसरा कोणताही पर्याय इंग्लंडसमोर उरला नव्हता. त्यातच दोघांच्या ओव्हर्स भराभर संपत चालल्याने इंग्लंडच्या ड्रेसिंगरुममध्ये अस्वस्थता पसरली होती. अखेर वैतागलेल्या गावरने अमरनाथच्या आऊटस्विंगरवर कट मारण्याचा प्रयत्नं केला आणि किरमाणीने त्याचा अप्रतिम कॅच घेतला. इंग्लंड १०७ / ३!

गावर आऊट झाल्यावर आलेल्या गॅटींगलाही फटकेबाजी करणं जमत नव्हतं. लॅम्बसह त्याने ३४ रन्सची पार्टनरशीप केली खरी, पण त्यासाठी १३ ओव्हर्स खर्ची पडल्या होत्या! अखेर १४ ओव्हर्सनंतर आझादला स्वीपची बाऊंड्री मारण्यात गॅटींग यशस्वी झाला. पण हा अपवाद वगळता अमरनाथ आणि आझाद दोघांनीही गॅटींग आणि लॅम्बला अक्षरशः खिळवून ठेवलं होतं. अखेर व्हायचा तो परिणाम झालाच...

आझादचा बॉल गॅटींगने स्वीप केला आणि एक रनसाठी गॅटींगला कॉल दिला...
लॅम्बच्या कॉलला गॅटींगने प्रतिसाद दिला खरा पण शॉर्टफाईनलेगवरच्या यशपाल शर्माने बॉल पिकअप केला होता..
यशपालचा थ्रो किरमाणीकडे जाईल हे लॅम्बने गृहीत धरलं होतं, पण चाणाक्षं यशपालने मात्रं नॉनस्ट्रायकर एन्डला थ्रो केला!
यशपालचा थ्रो अचूक स्टंप्सवर लागला
बेसावध असलेला लॅम्ब रनआऊट झाला!

आणखीन जेमतेम ९ रन्सची भर पडते तोच अमरनाथने इनस्विंगरवर गॅटींगचा लेग स्टंप उडवला!
इंग्लंड १५० / ५!

बोथम आणि विकेटकीपर इयम गूल्डलाही अमरनाथ - आझाद यांना खेळणं कठीण जात होतं. बोथमने ड्राईव्ह, कट् अगदी रिव्हर्स स्वीपचाही प्रयोग करुन पाहिला पण २६ बॉल्समध्ये त्याला जेमतेम ६ रन्स काढता आल्या! अखेर आझादच्या कमालीच्या लो राहीलेल्या बॉलवर बोथम बोल्ड झाला! गूल्ड आणि व्हिक मार्क्स यांनी इंग्लंडचा स्कोर १७५ पर्यंत नेल्यावर...

बिन्नीच्या बॉलवर कट् मारण्याचा गूल्डचा प्रयत्नं फसला, पण तो 'बाय' ची रन घेण्यासाठी धावत सुटला...
किरमाणीने बॉल कलेक्ट केलेला असल्याने मार्क्सने त्याला कोणताच प्रतिसाद दिला नाही.
गूल्ड परत फिरण्यापूर्वीच किरमाणीच्या अंडरआर्म थ्रोने स्टंप्सचा वेध घेतला होता!
आणखीन जेमतेम २ रन्सची भर पडते तोच कपिलने मार्क्सचा स्टंप उडवला!
इंग्लंड १७७ / ८!

ग्रॅहॅम डिली - पॉल अ‍ॅलट यांनी शांत डोक्याने ६० ओव्हर्स पूर्ण खेळून काढण्याचा पवित्रा घेतला. सुदैवी डिलीला बिन्नीच्या बॉलवर इनसाईड एजची बाऊंड्री मिळाली. या दोघांनी २५ रन्सची पार्टनरशीप केल्यावर कपिलला हूक मारण्याच्या नादात शॉर्ट थर्डमॅनला संदीप पाटीलने अ‍ॅलटचा कॅच घेतला. डिलीच्या बॅटच्या आऊटसाईड एजने आणखीन एक बाऊंड्री वसूल केली. शेवटच्या ओव्हरमध्ये कपिलचा बॉल इतका वाईड गेला की किरमाणी बॉलच्या जवळपासही पोहोचू शकला नाही. इंग्लंडला ५ वाईड्सचा बोनस मिळाला. अखेर ६० व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर कपिलने विलीसचा लेग स्टंप उडवला.

इंग्लंडची इनिंग्ज २१३ रन्समध्ये आटपली होती!

मोहींदर अमरनाथ आणि किर्ती आझाद यांच्या तावडीतून सुटका करुन घेणं इंग्लंडला अखेरपर्यंत जमलं नाही.
अमरनाथच्या १२ ओव्हर्समध्ये अवघ्या २७ तर आझादच्या १२ ओव्हर्समध्ये २८ रन्स निघाल्या होत्या!
संपूर्ण इनिंग्जमध्ये फक्तं १२ बाऊंड्री मारणं इंग्लंडच्या बॅट्समनना शक्यं झालं होतं. त्यापैकी ७ बाऊंड्री टावरे - फौलर यांच्या होत्या.
सर्वात कहर म्हणजे क्रिस टावरेचा स्ट्राईक रेट फौलर, गावर, लॅम्ब, गॅटींग, बोथम, गूल्ड या सगळ्यांपेक्षा जास्तं होता!
अमरनाथ आणि आझाद यांनी इंग्लिश बॅट्समनना घातलेल्या मगरमिठीचा हा परिणाम होता!

वर्ल्डकपची फायनल गाठण्यासाठी भारतापुढे २१४ रन्सचं टार्गेट होतं.

गावस्कर आणि श्रीकांत यांनी कोणतीही रिस्क न घेता विलीस आणि डिली यांना खेळून काढण्याचा पवित्रा घेतला. विलीसच्या जागी अ‍ॅलट बॉलिंगला आल्यावर गावस्करने त्याला स्ट्रेट ड्राईव्हचा प्रसाद दिलाच! आतापर्यंत नेहमीप्रमाणे फटकेबाजी न करता टेस्ट मॅचला साजेशी बॅटींग करणार्‍या श्रीकांतने बोथमला लाँगऑफला दोन बाऊंड्री तडकावल्या. या दोघांनी ४६ रन्सची पार्टनरशीप केल्यावर अ‍ॅलटच्या आऊटस्विंगरवर विकेटकीपर गूल्डने गावस्करचा कॅच घेतला. श्रीकांतने बोथमला हूकची बाऊंड्री मारली, पण बोथमलाच मिडविकेटवरुन फटकावण्याच्या नादात विलीसने श्रीकांतचा कॅच घेतला. भारत ५० / २!

अमरनाथ आणि यशपाल शर्मा यांनी कोणतीही रिस्क न घेता भारताची इनिंग्ज सावरली. ओल्ड ट्रॅफर्डच्या स्लो विकेटवर आझाद आणि स्वतः अमरनाथप्रमाणे बॅटींगला लगाम घालण्याची क्षमता असलेला एकही बॉलर इंग्लंडकडे नव्हता. व्हिक मार्क्सचा ऑफस्पिन वगळता इतर सर्व फास्ट बॉलर्सचे बॉल्स आरामात बॅटवर येत होते. अमरनाथ - यशपाल यांनी आरामात १-२ रन्स काढण्याचा पवित्रा घेतला होता. हे दोघं आरामात खेळत असतानाच...

मार्क्सचा फुलटॉस यशपालने मिडऑनला ड्राईव्ह केला आणि एक रनसाठी कॉल दिला.
अमरनाथने यशपालच्या कॉलला प्रतिसाद दिला..
मिडऑन वर असलेल्या माईक गॅटींगने बॉल पिकअप केला आणि स्टंप्सचा अचूक वेध घेतला
इंग्लिश फिल्डर्सनी रनआऊटसाठी जोरदार अपिल केलं, पण अंपायर डेव्हीड इव्हान्सचं बोट वर झालं नाही!
यशपाल जेमतेम क्रीजमध्ये पोहोचला असावा...
टीव्ही रिप्लेमध्ये यशपाल कदाचित आऊट असण्याची शक्यता दिसत होती. थर्ड अंपायरच्या जमान्यात तो कदाचित आऊट ठरलाही असता!

मार्क्सच्या पुढच्याच ओव्हरमध्ये अमरनाथने साईटस्क्रीनवर दणदणीत सिक्स ठोकली! आणखीन चार ओव्हर्सनंतर मार्क्सचा बॉल अमरनाथने मिडविकेटला फ्लिक केला. फौलरच्या जागी फिल्डींगला आलेल्या डेरेक रँडलने कॅच घेण्याचा प्रयत्नं केला, पण त्याने बॉल हाफव्हॉलीवर उचलला. डेव्हीड गावरच्या मते रँडलने कॅच घेतला होता पण स्वतः रँडलने आपण कॅच न घेतल्याचं ताबडतोब स्पष्टं केलं! यशपालने आक्रमक पवित्रा घेत अ‍ॅलटच्या बॉलवर पुढे सरसावत लाँगऑफवर सिक्स तडकावली. अमरनाथ - यशपाल आरामात खेळत असल्याने विकेट घेण्याच्या दृष्टीने स्वतः विलीस बॉलिंगला आला पण झालं भलतंच...

विलीसचा ऑफस्टंपवर पडलेला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर जात यशपालने स्क्वेअरलेग बाऊंड्रीपार तडकावला!
१९७९ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये व्हिव्हियन रिचर्ड्सने माईक हेंड्रीकला मारलेल्या सिक्सची कार्बन कॉपी असावी असा तो शॉट होता!

विलीसने स्वतःच्या ऐवजी बोथमला बॉलिंगला आणलं, पण अमरनाथ - यशपालवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. हे दोघं आरामात भारताला मॅच जिंकून देणार असं वाटत असतानाच...

बोथमचा बॉल यशपालने स्क्वेअरलेगला फ्लिक केला आणि एक रन पूर्ण केली.
अमरनाथने दुसर्‍या रनसाठी कॉल दिला पण... स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर असलेल्या पॉल अ‍ॅलटने बॉल पिकअप केला होता.
बाऊंड्रीवरुन अ‍ॅलटचा थ्रो आला तो स्टंप्सशेजारी असलेल्या मार्क्सच्या हातात! मार्क्सने आरामात थ्रो कलेक्ट करुन बेल्स उडवल्या.
अमरनाथ रन आऊट झाला!

९२ बॉल्समध्ये ४ बाऊंड्री आणि २ सिक्ससह अमरनाथने ४६ रन्स फटकावल्या.
यशपाल बरोबर ९२ रन्सची पार्टनरशीप करुन त्याने इंग्लंडच्या फायनल गाठण्याच्या अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या!
भारत १४२ / ३!

अमरनाथच्या जागी बॅटींगला आलेल्या संदीप पाटीलने आक्रमक पवित्रा घेत इंग्लंडच्या बॉलर्सची धुलाई करण्यास सुरवात केली. यशपालनेही पाटीलच्या तोडीसतोड फटकेबाजी करण्यास सुरवात केली. त्यातच बॉलिंगला आला बॉब विलीस! वर्ल्डकपपूर्वी वर्षभर ओल्ड ट्रॅफर्डलाच संदीप पाटीलने विलीसच्या एका ओव्हरमध्ये ६ बाऊंड्री ठोकल्या होत्या. आता पुन्हा विलीस समोर आल्यावर सोडेल तर तो संदीप कसला? पुन्हा एकदा त्याने विलीसची व्यवस्थित 'उत्तरपूजा' बांधली! फक्तं यावेळी पहिले दोन बॉल यशपाल स्ट्राईकवर असल्याने विलीसची ४ बाऊंड्रीवर सुटका झाली! यशपाल - संदीप यांनी ६३ रन्सची पार्टनरशीप केली. त्यात ४० रन्स एकट्या संदीपच्या होत्या!

अखेर विलीसला मिडविकेटवरुन फटकावण्याच्या नादात यशपालची एज लागली..
थर्डमॅन बाऊंड्रीवरुन सुमारे ३० यार्ड धावत येत आणि डाईव्ह मारत अ‍ॅलटने त्याचा अफलातून कॅच घेतला!
११५ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि २ सिक्ससह यशपालने ६१ रन्स फटकावल्या!
भारत २०५ / ४!

५५ वी ओव्हर सुरु झाली तेव्हा भारताला जिंकण्यासाठी ३ रन्स बाकी होत्या.

विलीसचे पहिले दोन बॉल संदीपने आरामात खेळून काढले पण विलीसचा तिसरा बॉल लाँगऑफला फटकावत संदीप - कपिल यांनी २ रन्स पूर्ण केल्या.
ओल्ड ट्रॅफर्डवरचे भारतीय प्रेक्षक मॅच जिंकल्याच्या आनंदात मैदानावर धावून आले!
स्क्वेअरलेगला असलेल्या अंपायर डॉन ऑस्लरने स्टंप्सकडे धाव घेतली... प्रेक्षकांनी स्टंप्स पळवू नयेत म्हणून!
इतकंच नव्हे तर एक स्टंप उखडून त्याने चक्कं छडीसारखा हातात धरला होता!

अखेर एकदाचे सर्व प्रेक्षक बाऊंड्रीपार परतले. पुन्हा मैदानात धावून येण्याच्या तयारीतच!
बॉब विलीसने आपले सर्व फिल्डर्स ऑफसाईडला ३० यार्डच्या सर्कलमध्ये उभे केले...
एक्स्ट्राकव्हर बाऊंड्रीपार असलेल्या ड्रेसिंगरुमकडे धूम ठोकणं सोपं जावं या हेतूने!
संदीप पाटीलला हसू आवरेना!

विलीसचा चौथा बॉल संदीपच्या बॅटला लागून थर्डमॅनच्या दिशेने गेला मात्रं...
संदीप - कपिल, दोन्ही अंपायर्स आणि इंग्लिश खेळाडू ड्रेसिंगरुमच्या दिशेने धावत सुटले!

भारताने इंग्लंडला धूळ चारत वर्ल्डकपची फायनल गाठली!
मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड झाली तो ४६ रन्स आणि २ विकेट्स काढणार्‍या मोहींदर अमरनाथची.
संदीप पाटील ३२ बॉल्समध्ये ८ बाऊंड्रीसह ५१ रन्स फटकावून नॉटआऊट राहीला!

ड्रेसिंगरुममध्ये परत आल्यावर संदीप दिलखुलासपणे गावस्करला म्हणाला,
"च्यायला सुन्या, विलीस अजून सुधारला नाही रे!"

इंग्लिश पत्रकारांनी इंग्लंडच्या संघावर टीकेची झोड उठवली! वर्ल्डकपची सेमीफायनल गमावण्यापेक्षा भारतासारख्या संघाने इंग्लंडला बाहेरचा रस्ता दाखवावा यावरुन खेळाडूंवर आगपाखड करण्यात आली होती!

SF01

क्रीडालेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

6 Feb 2017 - 3:18 pm | आनन्दा

_/\_

श्रीगुरुजी's picture

6 Feb 2017 - 3:26 pm | श्रीगुरुजी

मस्त! हा सामना म्हणजे भारतात दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण केलेला पहिला एकदिवसीय सामना होता.

बापू नारू's picture

6 Feb 2017 - 4:15 pm | बापू नारू

भारी वर्णन