वर्ल्ड कप क्लासिक्स - १९७५ - वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान

Primary tabs

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
26 Jan 2017 - 6:04 am

१९७५ च्या पहिल्यावहिल्या वर्ल्डकपपासून २०१५ मधल्या वर्ल्डकपपर्यंत प्रत्येक वर्ल्डकपमध्ये अनेक थरारक आणि रोमांचक मॅचेस झाल्या. अशाच काही निवडक मॅचेसविषयी...

*************************************************************************************

११ जून १९७५
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

वॉरीकशायरमधल्या एजबॅस्टन मैदानात वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान यांच्यात ग्रूप बी मधली मॅच होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये पदरी पराभव पडल्यामुळे सेमीफायनल गाठण्यासाठी ही मॅच जिंकणं पाकिस्तानसाठी अत्यावश्यक होतं. परंतु मॅचच्या दिवशी सकाळीच पाकिस्तानचा कॅप्टन आसिफ इक्बाल दुखापतीमुळे मॅचमध्ये खेळण्यास असमर्थ ठरला. आसिफ इक्बालच्या अनुपस्थितीत पाकिस्तानचा कॅप्टन म्हणून नेमणूक झाली होती ती माजिद खानची! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये खेळल्यानंतर नुकताच उदयास येत असलेला तरुण फास्ट बॉलर इमरान खानही या मॅचसाठी उपलब्धं नव्हता. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिकत असलेल्या इमरानची नेमकी मॅचच्या दिवशीच परिक्षा होती!

वर्ल्डकपमधल्या या मॅचचं एक वैशिष्ट्य म्हणजे या मॅचमध्ये तीन खेळाडूंनी वन डे मध्ये पदार्पण केलं. या तिघांपैकी परवेज मीरचं करीअर केवळ ३ वन डे नंतर संपुष्टात आलं असलं तरी उरलेल्या दोघांनी मात्रं पुढे अनेक वर्ष टेस्ट आणि वन डे क्रिकेट गाजवलं!

गॉर्डन ग्रिनिज
आणि
जावेद मियांदाद!

माजिद खानने टॉस जिंकून बॅटींग घेतली, पण पाकिस्तानचा स्कोर २१ पर्यंत पोहोचतो तोच बर्नाड ज्युलियनच्या बॉलवर रोहन कन्हायने सादीक महंमदचा कॅच घेतला. माजिद आणि झहीर अब्बास (३१) यांनी ६२ रन्सची पार्टनरशीप केल्यावर व्हिव्हियन रिचर्डसच्या बॉलिंगवर झहीर अब्बास एलबीडब्ल्यू झाला. माजिद आणि अनुभवी मुश्ताक महंमद यांनी कोणतीही रिस्क न घेता पाकिस्तानला १४० पर्यंत पोहोचवल्यावर क्लाईव्ह लॉईडच्या लेग ब्रेकवर विकेटकीपर डेरेक मरेने त्याचा कॅच घेतला. १०८ बॉल्सचा सामना करत माजिदने ६० रन्स फटकावल्या.

माजिद आऊट झाल्यावर मुश्ताक आणि वासिम राजा यांनी झटपट ६२ रन्सची पार्टनरशीप केल्यावर कीथ बॉईसने मुश्ताक (५५) चा ऑफस्टंप उडवला. वासिम आणि मुश्ताकच्या जागी आलेला जावेद मियांदाद यांनी पाकिस्तानचा स्कोर २४९ पर्यंत नेल्यावर रॉबर्टसच्या बॉलवर वासिम राजा बोल्ड झाला. वासिमने ५७ बॉल्समध्ये ६ बाऊंड्रीसह ५८ रन्स फटकावल्या, पण तो आऊट झाल्यावर शेवटच्या काही ओव्हर्समध्ये पाकिस्तानला फारसं काही करता आलं नाही. परवेज मीर आणि मियांदाद (२४) दोघंही रन आऊट झाले. अखेर ६० ओव्हर्स संपल्या तेव्हा पाकिस्तानने २६६ पर्यंत मजल मारली होती.

१९७५ मधल्या वन डे क्रिकेटचा विचार करता ६० ओव्हर्समध्ये २६७ चं टार्गेट आव्हानात्मक होतं.
फक्तं रॉय फ्रेड्रीक्स, रोहन कन्हाय, कालिचरण, लॉईड, रिचर्डस्, डेरेक मरे यांच्यासारख्या बॅट्समनपुढे हे टार्गेट पुरेसं ठरणार होतं का?
अनुभवी मुश्ताक महंमदच्या मनातही नेमका हाच प्रश्नं होता!

वेस्ट इंडीजला सुरवातीलाच हादरवलं ते सर्फराज नवाझने. पहिलीच वन डे खेळणार्‍या गॉर्डन ग्रिनिजचा विकेटकीपर वासिम बारीने कॅच घेतला. फ्रेड्रीक्स आणि कालिचरण यांनी वेस्ट इंडीजचा स्कोर ३१ पर्यंत नेल्यावर फ्रेड्रीक्स एलबीडब्ल्यू झाला. या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच वासिम बारीने कालिचरणचा कॅच घेतला! सर्फराजच्या या अफलातून स्पेलमुळे वेस्ट इंडी़जची ३६ / ३ अशी अवस्था झाली होती!

अनुभवी रोहन कन्हाय आणि लॉईड यांनी वेस्ट इंडीजची इनिंग्ज सावरली. सर्फराजला सावधपणे खेळून काढत आणि कोणतीही रिस्क न घेता त्यांनी ४८ रन्स जोडल्यावर नसीर मलिकच्या बॉलवर कन्हायच्या बॅटला लागून बॉल स्टंपवर गेला! कन्हायच्या जागी आलेल्या रिचर्डसने २ बाऊंड्री ठोकल्या पण पहिल्याच मॅचमध्ये खेळणार्‍या परवेज मीरच्या बंपरवर हूक मारण्याचा त्याचा प्रयत्न साफ फसला आणि लाँग लेगला असलेल्या झहीर अब्बासने आरामात त्याचा कॅच घेतला. वेस्ट इंडीज ९९ / ५!

रिचर्डस परतल्यावरही बर्नाड ज्युलियनच्या साथीने लॉईड ठामपणे पाकिस्तानचा मुकाबला करत होता. सर्फराजचा अपवाद वगळता इतर कोणाचीही बॉलिंग खेळणं फारसं कठीण नसल्याचा फायदा उठवत लॉईड आणि ज्युलियन सावधपणे खेळत होते. या दोघांनी वेस्ट इंडीजचा स्कोर १४५ पर्यंत नेल्यावर सुप्रसिद्ध कॉमेंटेटर जॉन अरलॉटने ज्याच्या रनअपचं "Groucho Marx chasing a pretty waitress" अशा शब्दात वर्णन केलं होतं त्या आसिफ मसूदचा बॉल ज्युलियनने मिडविकेटला असलेल्या मियांदादच्या हातात फ्लिक केला!

परंतु वेस्ट इंडीजला सर्वात मोठा धक्का बसला तो वासिम बारीने लॉईडचा कॅच घेतल्यावर!
लॉईडला आऊट करणारा लेगब्रेक बॉलर होता जावेद मियांदाद!

जावेद मियांदाद उत्कृष्ट बॅट्समन असला तरी सुरवातीच्या काळात बॅटींगच्या जोडीला तो बर्‍यापैकी लेगब्रेक बॉलरही होता. बारीने ज्या बॉलवर लॉईडचा कॅच घेतला तो मियांदादचा बॉल तर गुगली होता! लॉईडने मात्रं बारी आणि मियांदाद दोघांवरही खोटारडेपणाने अपिल केल्याचा आरोप केला! आपल्या बॅट किंवा ग्लोव्हचा बॉलला स्पर्शही झालेला नसल्याचं त्याचं ठाम मत होतं!

लॉईड आऊट झाल्यावर मॅच वेस्ट इंडीजच्या हातातून गेल्यातच जमा होती. त्यातच नसिर मलिकचा ऑफकटर कीथ बॉईसच्या बॅटची एज लागून स्टंपवर गेल्यावर ड्रेसिंग रुममधल्या खेळाडूंच्याच काय, पण मैदानात हजर असलेल्या वेस्ट इंडीयन प्रेक्षकांच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या.

वर्ल्डकपमधल्या या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच निवडण्याची जबाबदारी भूतपूर्व इंग्लिश बॅट्समन टॉम ग्रेव्हनीवर सोपवण्यात आलेली होती. वेस्ट इंडीजची अवस्था १६६ / ८ अशी झाल्यानंतर पाकिस्तान मॅच जिंकणार हे गृहीत धरुन सुरवातीला ३ विकेट्स घेणार्‍या सर्फराजची ग्रेव्हनीने मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड केली आणि घराची वाट धरली! अद्यापही वेस्ट इंडीजला जिंकण्यासाठी १०१ रन्सची आवश्यकता होती. सर्फराजने आधीच ३ विकेट्स घेतल्या होत्या आणि अद्यापही त्याच्या ५ ओव्हर्स शिल्लक असल्याने ग्रेव्हनीची ही निवड योग्य ठरली असती पण....

डेरेक मरे आणि व्हॅनबर्न होल्डर यांनी शांत डोक्याने रन्स काढण्यास सुरवात केली. सर्फराज सोडला तर पाकिस्तानच्या बॉलिंगमध्ये फारसा दम नाही हे चाणाक्षं मरेच्या अचूक ध्यानी आलं होतं. मसूद, मलिक, परवेज मीर, मियांदाद यांना आरामात खेळून काढत तो रन्स काढत होता. मरे - होल्डर यांनी वेस्ट इंडीजला २०० पार पोहोचवल्यावर माजिद खानने वेस्ट इंडीजला गुंडाळण्याच्या इराद्याने परवेज मीरच्या जागी सर्फराजला आणलं. माजिदची ही चाल अचूक ठरली. आतापर्यंत थंड डोक्याने खेळणार्‍या होल्डरने सर्फराजचा बॉल ड्राईव्ह केला तो कव्हरला असलेल्या मीरच्या हातात! वेस्ट इंडीज २०३ / ९!

वेस्ट इंडीजला जिंकण्यासाठी अद्यापही ६३ रन्स बाकी होत्या!
मरेच्या जोडीला आला शेवटचा बॅट्समन अँडी रॉबर्टस्!

मरेला एकच चिंता सतावत होती ती म्हणजे रॉबर्टस शेवटपर्यंत खेळू शकेल की नाही. अद्यापही १४ ओव्हर्स शिल्लक असल्याने त्याला रनरेटची चिंता नव्हती. ६० ओव्हर्स पूर्ण खेळून काढल्यास वेस्ट इंडी़ज मॅच जिंकेल याची त्याला पूर्ण खात्री होती!

रॉबर्ट्स म्हणतो,
"When the 9th wicket fell, the score was 203. I always believed that as long as I stay with Murray, we will win the game. There was too much time left. There were 14 overs."

रॉबर्टस् बॅटींगला आल्यावर वेस्ट इंडीजला गुंडाळून मॅच जिंकण्याच्या इराद्याने माजिदने सर्फराजच्या उरलेल्या सर्व ओव्हर्स वापरण्याचा निर्णय घेतला. सर्फराजने रॉबर्टसवर बंपर्सचा मारा केला, परंतु रॉबर्टसवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. बंपर्सला खेळून काढण्याचं आणि लेंग्थ बॉल फटकावून काढण्याचं तंत्रं त्याने अंमलात आणलं होतं. डेरेक मरेने १ - २ रन्स पळून काढण्याचा आणि योग्य बॉल मिळाल्यावर फटकावून काढण्याचा सपाटा लावला होता! अखेर सर्फराजच्या १२ ओव्हर्स संपल्या परंतु मरे - रॉबर्टसना गुंडाळण्यात त्याला यश आलं नाही!

वेस्ट इंडीजला मॅच जिंकण्यासाठी ६ ओव्हर्समध्ये २९ रन्सची आवश्यकता होती!

परवेज मीरने ५५ वी ओव्हर मेड्न टाकल्याने मॅच आणखिनच रंगतदार अवस्थेत पोहोचली. पण मरेने आसिफ मसूदला लागोपाठ २ बाऊंड्री फटकावल्याने पुन्हा वेस्ट इंडीजचं पारडं जड झालं. ५८ व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला मरेला रनआऊट करण्याची सुवर्णसंधी नसीर मलिकला मिळाली, परंतु त्याचा थ्रो वासिम बारीपासून इतका दूर होता की बारीने थ्रो कलेक्ट करुन स्टंप्स उडवण्यापूर्वी मरे आरामात क्रीजमध्ये पोहोचला होता! शेवटच्या २ ओव्हर्समध्ये १० रन्स हव्या असताना रॉबर्टसने आसिफ मसूदला दणदणीत बाऊंड्री ठोकली!

शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडीजला जिंकण्यासाठी ५ रन्स हव्या होत्या. परंतु माजिद खानपुढे आता वेगळीच समस्या उभी ठाकली होती. बॉलर्सच्या ओव्हर्स मोजण्यामध्ये त्याचा गोंधळ झाला होता. सर्फराज, आसिफ मसूद, नसीर मलिक आणि मियांदाद यांच्या १२ ओव्हर्स पूर्ण झाल्या होत्या. मुश्ताक महंमदने २ ओव्हर्स टाकल्या होत्या, पण माजिदच्या चुकीमुळे परवेज मीरने ५९ वी ओव्हर टाकली होती, त्यामुळे शेवटची ओव्हर टाकणं त्याला शक्यंच नव्हतं! ही भानगड ध्यानात आल्यावर माजिदने बॉल दिला वासिम राजाच्या हाती!

वासिम राजाच्या पहिल्या बॉलवर रॉबर्टसला काहीच करता आलं नाही.

राजाचा दुसरा बॉल रॉबर्टसच्या पॅडला लागून लेगसाईडला गेला. मरे - रॉबर्टस दोघांनीही लेग बाय घेण्यासाठी धूम ठोकली, पण वासिम बारीने कमालीच्या चपळाईने बॉलवर झडप घातली आणि रॉबर्टसला रनआऊट करण्याच्या इराद्याने नॉनस्ट्रायकर एंडला स्टंपचा वेध घेण्याचा प्रयत्नं केला. खरंतर वासिम राजाच्या हातात थ्रो गेला असता तर रॉबर्टस आरामात आऊट झाला असता, पण उत्साहाच्या भरात आणि टेन्शनमध्ये केलेला बारीचा थ्रो स्टंप्सवर लागला नाहीच, उलट राजाच्याही हातात न जाता लाँग ऑफच्या दिशेने गेला! मरे आणि रॉबर्टसने ओव्हरथ्रो वसूल करण्यात कोणतीही कुचराई केली नाही!

वेस्ट इंडी़जला आता केवळ ३ रन्स हव्या होत्या!

राजाचा तिसरा बॉलही रॉबर्टसने कमालीच्या शांतपणे स्क्वेअरलेगला फ्लिक केला आणि झहीर अब्बासचा थ्रो येण्यापूर्वी माजिदने फिल्डर्सना १ रन रोखण्याच्या हेतूने बॅट्समनजवळ उभं केल्याचा चाणाक्षपणे फायदा घेत २ रन्स काढल्या!

राजाचा चौथा बॉल रॉबर्टसने मिडविकेटला फ्लिक केला...
आणि आवश्यक असलेली एक रन पूर्ण केल्यावर तो तसाच पॅव्हेलियनच्या दिशेने धावत सुटला!
रन पूर्ण केल्यावर मरेनेही अबाऊट टर्न करुन पॅव्हेलियनची वाट धरली!
आणि त्याच्यापाठोपाठ पाकिस्तानी खेळाडूंनीही!

प्रेक्षकांमध्ये हजर असलेल्या वेस्ट इंडीजच्या पाठीराख्यांनी एजबॅस्टनचं मैदान डोक्यावर घेतलं होतं!
डेरेक मरेने ७६ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री ठोकत ६१ रन्स फटकावल्या होत्या!
अँडी रॉबर्टसने मरेला समर्थपणे साथ देत ४८ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह २४ रन्स काढल्या!
शेवटच्या विकेटसाठी ६४ रन्सची पार्टनरशीप करत त्यांनी मॅच जिंकली होती!

टॉम ग्रेव्हनीला अशक्यंप्राय वाटणार्‍या १०१ रन्स काढून मॅच जिंकण्यात वेस्ट इंडीज यशस्वी झाले होते!

गॉर्डन ग्रिनिज म्हणतो,
"When 9th wicket fell, we were getting ready and changed to go back to hotel. It was a lost cause. No body expected Andy Roberts to last so long. But he did and pulled it off with Murray!"

लॉईड म्हणतो,
We knew then, we could not loose the tournament after that victory. That was the game of the tournament!

वेस्ट इंडीजने मॅच जिंकली असली तरी टॉम ग्रेव्हनीच्या निर्णयाप्रमाणे मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस देण्यात आलं ते सर्फराजलाच!
ऑस्ट्रेलियापाठोपाठा वेस्ट इंडीजकडूनही पराभव पदरी पडल्यावर पाकिस्तानचा वर्ल्ड कप ग्रूपमध्ये आटपला!

लेखक्रीडा

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

26 Jan 2017 - 8:01 am | अत्रन्गि पाउस

अप्रतिम

कैवल्यसिंह's picture

26 Jan 2017 - 8:24 am | कैवल्यसिंह

मस्त... अप्रतिम... दुसऱ्या मॅचेस विषयी सुद्धा उस्तुक्ता आहे.... मस्त वाटतेय जुन्या मॅचेस विषयी ऐकायला व व्हिडीयोज पहायला.... क्रिकेटच्या ज्ञानात भरच पडतेय याने.... धन्यवाद

अजया's picture

26 Jan 2017 - 9:35 am | अजया

जबरदस्त!

संदीप जाधव__इचलकरंजी's picture

27 Jan 2017 - 10:11 am | संदीप जाधव__इचलकरंजी

मस्त !!!!

पैसा's picture

27 Jan 2017 - 11:42 am | पैसा

वेस्ट इंडिजसाठी थरारक आणि अविस्मरणीय विजय होता. या अशा खेळामुळे त्या काळात जे जगज्जेते होते.