वर्ल्डकप क्लासिक्स - १९७५ - सेमीफायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
27 Jan 2017 - 12:11 am

१८ जून १९७५
हेडींग्ली, लीड्स

यॉर्कशायरमधल्या हेडींग्लीच्या ग्राऊंडवर पहिल्यावहिल्या वर्ल्डकपमधली पहिली सेमी फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते ते पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेले ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड! वर्ल्डकपपूर्वी १९७४-७५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४-१ असा फडशा पाडला होता. इंग्लंडची अशी वाताहात होण्यास कारणीभूत होते ते म्हणजे ऑस्ट्रेलियाचे ते दोघे खतरनाक बॉलर्स - डेनिस कीथ लिली आणि जेफ्री रॉबर्ट थॉमसन! पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये लिली वन डे मध्ये ५ विकेट्स घेणारा पहिलाच बॉलर ठरला होता. लिली आणि थॉमसनच्या जोडीला अ‍ॅशेस सिरीजमध्ये २३ विकेट्स काढणारा मॅक्स वॉकरही होता. हेडींग्लीच्या स्विंगला अनुकूल असलेल्या विकेटवर यांचा मुकाबला करणं कठीण ठरणार होतं याची इंग्लिश खेळाडूंना कल्पना होती.

आतापर्यंतच्या सर्व मॅचेसमध्ये ऑस्ट्रेलियाने लिली-थॉमसन-वॉकर यांच्याबरोबर ऑफस्पिनर अ‍ॅश्ली मॅलेटला खेळवलं होतं. परंतु हेडींग्लीच्या ढगाळ वातावरणात मॅलेटच्या ऑफस्पिनपेक्षा स्विंग करु शकणारा बॉलरच उपयुक्त ठरेल असा ऑस्ट्रेलियन कॅप्टन इयन चॅपलचा अंदाज होता. या हेतूने मॅलेटच्या ऐवजी ऑस्ट्रेलियन संघात गॅरी गिल्मोरची निवड करण्यात आली. उंचापुरा आणि गिड्डा असलेला डावखुरा गिल्मोर बॉल स्विंग करण्यात पटाईत होताच आणि फटकेबाज आक्रमक बॅट्समनही!

इयन चॅपलने टॉस जिंकल्यावर अपेक्षेप्रमाणे ढगाळ वातावरणाचा फायदा घेण्याच्या हेतूने फिल्डींगचा निर्णय घेतला. डेनिस लिलीच्या पहिल्या ओव्हरनंतर थॉमसन किंवा वॉकरच्या ऐवजी दुसर्‍या बाजूने बॉलिंगला आला गिल्मोर!

इयन चॅपल म्हणतो,
"Having brought Gus in because he is a swing bowler, I thought, I better give him the new ball!"

....आणि गिल्मोर अक्षरश: उधळला!

वन डे क्रिकेटच्या इतिहासात पहिली सेंच्युरी ठोकणारा डेनिस एमिस गिल्मोरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये इनस्विंगरवर एलबीडब्ल्यू झाला! एमिसचा जोडीदार बॅरी वूड आणि कीथ फ्लेचर यांनी पुढच्या तीन ओव्हर्स सावधपणे खेळून काढल्या, पण गिल्मोरने पुन्हा एकदा अचूक पडलेल्या इनस्विंगरवर वूडचा ऑफस्टंप उडवला! इंग्लंड ११ / २!

वूडच्या जागी खेळायला आला टोनी ग्रेग!

१९७४-७५ च्या अ‍ॅशेस सिरीजपासून टोनी ग्रेग आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये खुन्नस होती. ग्रेग बॅटींगला आल्यावर लिलीने त्याच्यावर बंपर्सचा मारा आरंभला. अर्थात त्याचा काहीच परिणाम झाला नाही हा भाग वेगळा. लिलीच्या लेगस्टंपवरच्या बॉलवर ग्रेगने मिडविकेटला बाऊंड्री ठोकल्यावर इंग्लिश प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतलं! अ‍ॅशेस सिरीजमधल्या पराभवाचा तो बदलाच होता जणू! फ्लेचर आणि ग्रेगने इंग्लंडची इनिंग्ज सावरण्याच्या प्रयत्नात असताना गिल्मोरने पुन्हा एकदा इंग्लंडला हादरवलं. ऑफस्टंपच्या बाहेर अचूक लेंग्थवर पडलेल्या आऊटस्विंगरवर टोनी ग्रेगचा कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न साफ फसला आणि त्याच्या बॅटची एज लागली. स्लिपमध्ये असलेला इयन चॅपल कॅच घेण्याच्या तयारीत असतानाच..

रॉडनी मार्शने फर्स्ट स्लिपमधल्या इयन चॅपलच्या समोर बॉलवर झडप घालत अफलातून कॅच घेतला!
इंग्लंड २६ / ३!

फ्रँक हेसने गिल्मोरच्या फुलटॉसवर मिडऑनमधून बाऊंड्री ठोकली, पण त्याच ओव्हरमध्ये गिल्मोरच्या इनस्विंगरचा अंदाज न आल्याने त्याने तो पॅडवर घेतला! पुढच्याच ओव्हरमध्ये गिल्मोरच्या इनस्विंगने पुन्हा एकदा आपला रंग दाखवला! सुमारे तासाभरात ४५ बॉलमध्ये ८ रन्स काढणारा कीथ फ्लेचर एलबीडब्ल्यू झाला! त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर गिल्मोरच्या यॉर्करवर बॅटची एज लागून बॉल पॅडवर गेल्याने अ‍ॅलन नॉट वाचला, पण पुढच्याच ओव्हरमध्ये गिल्मोरने त्याला एलबीडब्ल्यू केलंच! गिल्मोरचा हा धुमाकूळ कमी होता म्हणून की काय लिलीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या मॅक्स वॉकरच्या बॉलवर दुसर्‍या स्लिपमध्ये ग्रेग चॅपलने क्रिस ओल्डचा कॅच घेतला! इंग्लंड ३७ / ७!

इंग्लंडचा कॅप्टन माईक डेनेस आणि जॉन स्नो यांनी सावधपणे वॉकर आणि गिल्मोरला खेळून काढत १५ रन्स जोडल्यावर लिलीला लेग ग्लान्स करण्याच्या नादात रॉडनी मार्शने स्नोचा कॅच घेतला. स्नो आऊट झाल्यावर आलेल्या जेफ्री आरनॉल्डनेही डेनेसला साथ देत इंग्लंडला सावरण्याचा प्रयत्नं केला. डेनेस - आरनॉल्ड यांनी इंग्लंडच्या इनिंग्जमधली २१ रन्सची सर्वात मोठी पार्टनरशीप केल्यावर मॅक्स वॉकरला ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात डेनेसच्या बॅटची एज लागून बॉल स्टंपवर गेला. ६० बॉल्समध्ये डेनेसने २७ रन्स काढल्या. इंग्लंड ७३ / ९!

डेनेस परतल्यावरही आरनॉल्ड आणि पीटर लिव्हर यांनी शेवटच्या विकेटसाठी २० रन्स फटकावल्या. अर्थात यात थॉमसन - वॉकरच्या बॉलवर दोनवेळा आरनॉल्डच्या बॅटची कट् लागून मिळालेल्या दोन सुदैवी बाऊंड्रीचाही मोठा वाटा होता! वॉकरनेच लीव्हरला एलबीडब्ल्यू करुन इंग्लंडची इनिंग्ज आटपली.

गॅरी गिल्मोरने सलग १२ ओव्हर्सच्या स्पेलमध्ये १४ रन्स देत ६ विकेट्स घेतल्या होत्या!
मॅक्स वॉकरने त्याला साथ देत ३ विकेट्स घेत इंग्लंडचा ९३ रन्समध्ये फडशा पाडला होता.

ऑस्ट्रेलियाप्रमाणेच इंग्लंडच्या संघातही जॉन स्नो, क्रिस ओल्ड, जेफ्री आरनॉल्ड आणि पीटर लिव्हर हे बॉल स्विंग करण्यात तरबेज असलेले बॉलर्स होते. अद्यापही बॉल स्विंग होत असल्याने त्यांचा मुकाबला करणं सोपं नव्हतं. परंतु ६० ओव्हर्समध्ये अवघ्या ९४ रन्सचं टार्गेट असल्याने आपण आरामात मॅच जिंकून फायनलमध्ये जाऊ अशी ऑस्ट्रेलियाची अपेक्षा होती!

अ‍ॅलन टर्नर आणि रिक मॅक्कॉस्कर यांनी १७ रन्सची पार्टनरशीप केल्यावर आरनॉल्डने टर्नरला एलबीडब्ल्यू केलं. मॅक्कॉस्कर आणि इयन चॅपल यांनी कोणतीही रिस्क न घेता बॉलिंग खेळून काढण्याचा पवित्रा घेतला होता, पण जॉन स्नोने इनस्विंगरवर इयन चॅपल आणि ग्रेग चॅपल दोघांनाही एलबीडब्ल्यू केलं! ऑस्ट्रेलिया ३२ / ३!

नेमक्या याच वेळेला डेनेसने आरनॉल्डच्या ऐवजी बॉलिंगला आणलं यॉर्कशायरच्याच क्रिस ओल्डला!

रिक मॅक्कॉस्करने तासाभरात ५० बॉल्स खेळून काढत १५ रन्सपर्यंत मजल मारली होती, पण ओल्डच्या इनकटरवर त्याची दांडी उडाली! रॉस एडवर्ड्सच्या ओल्डला ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नाची परिणीती बॉल त्याच्या बॅटची एज घेऊन मिडलस्टंपवर जाण्यात झाली! पुढच्याच ओव्हरमध्ये रॉडनी मार्शही ओल्डला फटकावण्याच्या नादात बोल्ड झाला! ७ बॉलमध्ये ३ रन्स देत ओल्डने ३ विकेट्स उडवल्या होत्या. ऑस्ट्रेलिया ३९ / ६!

अद्यापही ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकण्यासाठी ५५ रन्सची आवश्यकता होती.
नॉनस्ट्रायकर एंडला असलेला डग वॉल्टर्स ही सगळी पडझड असहाय्यपणे पाहत होता.
मार्श आऊट झाल्यावर जोडीला आला गॅरी गिल्मोर!

गिल्मोरने आल्यापासूनच आक्रमक पवित्रा घेत इंग्लंडच्या बॉलर्सवर हल्ला चढवला. ओल्डला मिडऑफ आणि कव्हरर्समधून त्याने दोन बाऊंड्री तडकावल्या. स्नोच्या बॉलवर त्याच्या बॅटची एज लागून स्लिपमधून बाऊंड्री गेल्यावरही त्याचा आक्रमकपणा किंचीतही कमी झाला नाही. गिल्मोरची फटकेबाजी सुरु असताना दुसर्‍या एंडला असलेला वॉल्टर्स चाचपडतच होता, पण गिल्मोरवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. ओल्डला त्याने पुन्हा कव्हर्समधून बाऊंड्री ठोकली.

गिल्मोरची फटकेबाजी सुरु असताना स्नोच्या बॉलवर त्याची एज लागली, पण दुसर्‍या स्लिपमध्ये टोनी ग्रेगला हातून कॅच सुटला आणि बॉल बाऊंड्रीपार गेला! ऑस्ट्रेलियाचा स्कोर त्यावेळी होता ७८ / ६! गिल्मोर आऊट झाला असता तर लिली, वॉकर आणि थॉमसन यांना गुंडाळून मॅच जिंकण्याची इंग्लंडला संधी मिळाली असती.

ओल्डच्या जागी बॉलिंगला आलेल्या आरनॉल्डला वॉल्टर्सने ऑन ड्राईव्ह आणि स्क्वेअरकटच्या दोन बाऊंड्री ठोकल्यावर इंग्लंडच्या उरल्यासुरल्या आशा मावळल्या. आरनॉल्डच्याच बॉलवर लेग बाय घेत वॉल्टर्स - गिल्मोरने ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये नेलं!

२८ बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह २८ रन्स फटकावून गिल्मोर नॉटआऊट राहीला!
डग वॉल्टर्ससह ५५ रन्सची पार्टनरशीप करत त्याने मॅच जिंकली!

वर्ल्डकपच्या इतिहासात गॅरी गिल्मोरची मॅच म्हणूनच ही सेमी फायनल ओळखली जाते!

वेस्ट इंडीजविरुद्ध लॉर्डसला झालेल्या फायनलमध्येही गिल्मोरने ५ विकेट्स काढल्या, पण तो ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देऊ शकला नाही!
वर्ल्डकपच्या केवळ दोन मॅचेसमध्ये ११ विकेट्स घेण्याचा विक्रम गिल्मोरच्याच नावावर आहे!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

हकु's picture

28 Jan 2017 - 1:16 am | हकु

मस्तच!

पैसा's picture

31 Jan 2017 - 6:04 pm | पैसा

थरारक सामना आणि थरारक वर्णन!