वर्ल्डकप क्लासिक्स - २००3 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
27 Feb 2017 - 9:32 am

२ मार्च २००३
सेंट जॉर्जेस पार्क, पोर्ट एलिझाबेथ

ईस्टर्न केप प्रांतातल्या पोर्ट एलिझाबेथच्या सेंट जॉर्जेस पार्कच्या मैदानावर पारंपारिक अ‍ॅशेस प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पूल ए मधली मॅच खेळली जाणार होती. ग्रूपमधल्या पहिल्या पाचही मॅचेस जिंकून ऑस्ट्रेलिया आधीच सुपर सिक्समध्ये धडकली होती त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने या मॅचला फारसं महत्वं नव्हतं, पण We want to win everything या वृत्तीने वर्ल्डकपमध्ये उतरलेल्या स्टीव्ह वॉला एकही मॅच गमावणं आणि ते देखिल इंग्लंडसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध हे कधीही मंजूर होणं शक्यं नव्हतं. इंग्लंडसाठी मात्रं ही मॅच महत्वाची होती. हरारेमध्ये झिंबाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये खेळण्यास नकार दिलेल्या इंग्लंडला आशिश नेहराच्या करामतीमुळे भारताकडून पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे सुपर सिक्समध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने इंग्लंडला या मॅचमध्ये विजय मिळवणं अत्यावश्यंक होतं.

रिकी पाँटींगच्या ऑस्ट्रेलियन संघात स्वतः रिकी पाँटींग, मॅथ्यू हेडन, डॅमियन मार्टीन, डॅरन लिहमन, मायकेल बेव्हन, अँड्र्यू सायमंड्स असे बॅट्समन होते. अ‍ॅडम गिलख्रिस्टसारखा तडाखेबंद विकेटकीपर - बॅट्समनही ऑस्ट्रेलियाच्या संघात होता. ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगची मदार मुख्यतः ग्लेन मॅकग्राथ आणि ब्रेट ली यांच्यावर होती. त्यांच्या जोडीला अँड्र्यू बिकल आणि चायनामन बॉलर ब्रॅड हॉग यांचा समावेश होता. आवश्यकता भासल्यास सायमंड्स, लिहमन, बेव्हन, मार्टीन यांच्यापैकी कोणीही पाचव्या बॉलरच्या ओव्हर्स टाकू शकत होतं!

नासिर हुसेनच्या इंग्लिश संघात मार्कस ट्रेस्कॉथिक, निक नाईट, मायकेल वॉन, स्वतः नासिर हुसेन, अ‍ॅलेक स्ट्युअर्ट, पॉल कॉलिंगवूड असे बॅट्समन होते. इंग्लंडच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने अँड्र्यू कॅडीकवर होता. त्याच्या जोडीला जेम्स अँडरसन, अ‍ॅश्ली जाईल्स (तोच तो निगेटीव्ह लाईनवाला रड्या) आणि ऑलराऊंडर क्रेग व्हाईट होते. इंग्लंडचा खरा आधारस्तंभ होता तो म्हणजे अँड्र्यू फ्लिंटॉफ! विकेटकिपींगची जबाबदारी स्ट्युअर्टने उचलल्यामुळे इंग्लिश संघ कागदावर तरी बर्‍यापैकी समतोल वाटत होता. खरा प्रश्न होता तो म्हणजे जोरदार फॉर्मात असलेल्या ऑस्ट्रेलियासमोर इंग्लंडचा कितपत निभाव लागेल हा!

नासिर हुसेनने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतल्यावर ट्रेस्कॉथिक आणि नाईट यांनी सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत ऑस्ट्रेलियन बॉलर्सची धुलाई करण्यास सुरवात केली. ट्रेस्कॉथिकने पहिल्याच ओव्हरमध्ये मॅकग्राथला स्क्वेअरकटच्या २ बाऊंड्री तडकावल्या. नाईटने ब्रेट लीला बाऊंड्री तडकावल्यावर ट्रेस्कॉथिकने लीचा बंपर फाईनलेग बाऊंड्रीपार हूक करत दणदणीत सिक्स ठोकली! लीच्या पुढच्या ओव्हरमध्ये ट्रेस्कॉथिकची लिडींग एज लागली पण स्लिपमध्ये असलेल्या पाँटींगच्या डोक्यावरुन थर्डमॅनला बाऊंड्री मिळाली! मॅकग्राथला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री फटकावल्यावर ट्रेस्कॉथिकने मॅकग्राथच्या पुढच्या ओव्हरमध्ये थर्डमॅन आणि मिडविकेटला लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. ९ ओव्हर्सनंतर इंग्लंडचा स्कोर होता ६६ / ०!

मॅकग्राथ आणि ली यांची धुलाई झाल्यावर पाँटींगने अँडी बिकलला बॉलिंगला आणलं.

बिकलच्या तिसर्‍या बॉलवर नाईटविरुद्धं एलबीडब्ल्यूचं अपिल अंपायर रसेल टिफीनने फेटाळून लावलं...
पुढचाच बॉल नाईटच्या बॅट-पॅड मधल्या गॅपमधून घुसत मिडलस्टंपच्या वरुन गिलख्रिस्टच्या ग्लोव्हजमध्ये गेला...
बिकलचा पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
नाईटने थर्डमॅनच्या दिशेने बॉल खेळण्याचा केलेला प्रयत्नं पार फसला आणि त्याच्या बॅटची एज लागली...
वाईड स्लिपमध्ये असलेल्या डॅमियन मार्टीनने डाव्या बाजूला डाईव्ह मारत कॅच घेतला!

३३ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह नाईटने ३० रन्स फटकावल्या.
इंग्लंड ६६ / १!

मॅकग्राथच्या पुढच्या ओव्हरमध्ये ट्रेस्कॉथिकने स्क्वेअरलेगला हूकची बाऊंड्री तडकावल्यावर पुढच्या ओव्हरमध्ये...

बिकलचा पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या लाईनवर पडला...
मायकेल वॉनने तो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्नं केला पण...
बिकलच्या आऊटस्विंगरने वॉनच्या बॅटची एज घेतली आणि गिलख्रिस्टने आरामात त्याचा कॅच घेतला...
इंग्लंड ७२ / २!

आणखीन चार बॉल्सनंतर...
बिकलचा बॉल ऑफ आणि मिडलस्टंपच्या लाईनवर पडला...
नासिर हुसेनने बॉल डिफेंड करण्याचा पवित्रा घेतला पण...
अचूक टप्प्यावर पडलेला बॉल आऊटस्विंग झाला आणि...
हुसेनचा ऑफस्टंप उडाला!
इंग्लंड ७४ / ३!

बिकलने घातलेला धुमाकूळ कमी होता म्हणूनच की काय पुढच्या ओव्हरमध्ये...

मॅकग्राथचा बॉल मिडलस्टंपच्या लाईनवर पडला...
ट्रेस्कॉथिकने फ्रंटफूटवर येत बॉल खेळून काढण्याचा प्रयत्नं केला पण...
त्याच्या बॅटची आऊटसाईड एज लागली...
वाईड स्लिपमध्ये असलेल्या डॅमियन मार्टीनने यावेळेस उजवीकडे डाईव्ह मारत कॅच घेतला!

३६ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री आणि ब्रेट लीला ठोकलेल्या सिक्ससह ट्रेस्कॉथिकने ३७ रन्स काढल्या.
इंग्लंड ७४ / ४!

अ‍ॅलेक स्ट्युअर्ट आणि पॉल कॉलिंगवूड यांनी सावधपणे बिकल आणि मॅकग्राथ यांची बॉलिंग खेळून काढण्याचं धोरण अवलंबलं. मॅकग्राथच्या ऐवजी चायनामन ब्रॅड हॉग बॉलिंगला येताच कॉलिंगवूडने त्याला मिडविकेटवर सिक्स ठोकली, पण बिकलचा ऑफस्टंपबाहेर पडलेला बॉल कट् करण्याच्या प्रयत्नात कॉलिंगवूडच्या बॅटची एज लागली आणि गिलख्रिस्टने आरामात त्याचा कॅच घेतला. तो आऊट झाला तेव्हा १८ ओव्हर्समध्ये इंग्लंडचा स्कोर होता ८७ / ५!

कॉलिंगवूड परतल्यावर बॅटींगला आलेल्या अँड्र्यू फ्लिंटॉफने सावधपणे ऑस्ट्रेलियन बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. बिकल आणि हॉगच्या अचूक बॉलिंगपुढे कोणतीही रिस्क घेण्याचा मोह फ्लिंटॉफने कटाक्षाने टाळला होता. ब्रेट लीच्या बॉलवर फ्लिंटॉफने अपर कट्ची बाऊंड्री मारली, पण हा अपवाद वगळता फ्लिंटॉफ आणि स्ट्युअर्ट यांनी १-२ रन्स काढत जास्तीत जास्तं ओव्हर्स बॅटींग करण्यावर भर दिला होता. सुमारे १३ ओव्हर्सनंतर अखेर फ्लिंटॉफने हॉगला कट्ची बाऊंड्री मारल्यावर पाँटींगने त्याच्या ऐवजी अँड्र्यू सायमंड्सला बॉलिंगला आणलं. सायमंड्सच्या पहिल्याच ओव्हरमध्ये लेगग्लान्सची बाऊंड्री मारल्यावर फ्लिंटॉफने मिडविकेटवर सिक्स ठोकली! ४० ओव्हर्सनंतर इंग्लंडचा स्कोर होता १७१ / ५!

४१ व्या ओव्हरमध्ये पाँटींगने सायमंड्सच्या ऐवजी बिकलला बॉलिंगला आणलं. बिकलच्या पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर स्ट्युअर्टची एज लागली, पण गिलख्रिस्टने डाईव्ह मारुनही कॅच घेण्याचा केलेला प्रयत्नं निष्फळ ठरला. पुढच्याच ओव्हरमध्ये लिहमनला फटकावण्याच्या नादात फ्लिंटॉफचा अत्यंत कठीण कॅच पाँटींगला घेता आला नाही, पण बिकलच्या पुढच्या ओव्हरमध्ये पूल मारण्याचा प्रयत्नात फ्लिंंटॉफची टॉप एज लागली आणि गिलख्रिस्टने आरामात त्याचा कॅच घेतला. ८० बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि १ सिक्ससह फ्लिंटॉफने ४५ रन्स काढत त्याने स्ट्युअर्टबरोबर ९० रन्सची पार्टनरशीप केली. इंग्लंड १७७ / ६!

फ्लिंटॉफ परतल्यावर जेमतेम ३ रन्सची भर पडते तोच बिकलच्या पुढच्या ओव्हरमध्ये अ‍ॅक्रॉस द लाईन फटकेबाजीच्या नादात स्ट्युअर्टचा मिडलस्टंप उडाला! ९२ बॉल्समध्ये एकमेव बाऊंड्रीसह स्ट्युअर्टने ४६ रन्स काढल्या. ४७ व्या ओव्हरमध्ये बिकलला फटकावण्याचा अ‍ॅश्ली जाईल्सचा प्रयत्नं फसला आणि मिडऑफला मायकेल बेव्हनने जंप मारत त्याचा कॅच घेतला. इंग्लंड १८७ / ८!

क्रेग व्हाईट आणि अँड्र्यू कॅडीक यांनी शांत डोक्याने उरलेल्या ३ ओव्हर्स खेळून काढल्या.
५० ओव्हर्सनंतर इंग्लंडचा स्कोर होता २०४ / ८!

अँड्र्यू बिकलने १० ओव्हर्समध्ये २० रन्स देत ७ विकेट्स उडवल्या होत्या! अवघ्या तीन दिवसांपूर्वी नामिबियाला ४५ रन्समध्ये उखडताना मॅकग्राथने १५ रन्समध्ये ७ विकेट्स घेतल्या होत्या म्हणून नाहीतर वर्ल्डकपमधला हा ऑस्ट्रेलियन रेकॉर्ड ठरला असता!

ऑस्ट्रेलियाच्या बॅटींग लाईनअपच्या दॄष्टीने २०५ रन्सचं टार्गेट तसं साधच होतं. त्यातच अ‍ॅडम गिलख्रिस्टने नेहमीप्रमाणे सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत ऑस्ट्रेलियन बॉलर्सची धुलाई करण्यास सुरवात केली. दुसर्‍या ओव्हरमध्ये त्याने जेम्स अँडरसनला कव्हर्समधून ३ बाऊंड्री फटकावल्या. गिलख्रिस्टच्या या धडाकेबाज फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलिया आरामात मॅच जिंकणार असं वाटत असतानाच तिसर्‍या ओव्हरमध्ये...

अँड्र्यू कॅडीकचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
मॅथ्यू हेडनने मिडविकेटवरुन बॉल पूल करण्याचा पवित्रा घेतला पण...
हेडनच्या बॅटची टॉप एज लागून बॉल हवेत गेला...
मिडऑनला अ‍ॅश्ली जाईल्सने त्याचा कॅच घेतला.
ऑस्ट्रेलिया १५ / १!

हेडन आऊट झाल्याचा गिलख्रिस्टवर कोणताही परिणाम झाला नाही. कॅडीकच्या पुढच्याच बॉलवर त्याने मिडऑनलाच बाऊंड्री मारली. त्याच ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर कट्ची बाऊंड्री मारण्यातही त्याने कसूर केली नाही. अँडरसनच्या पुढच्या ओव्हरमध्ये रिकी पाँटींगने मिडविकेटला बाऊंड्री तडकावली पण...

कॅडीकचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
गिलख्रिस्टने थर्डमॅनच्या दिशेने अपर कट मारली पण...
बॉल सरळ थर्डमॅन बाऊंड्रीवर असलेल्या मायकेल वॉनच्या हातात गेला...
वॉनच्या हातातून बॉल जवळपास सुटला होता...
दुसर्‍या प्रयत्नात त्याने तो यशस्वीपणे पकडला!
ऑस्ट्रेलिया ३३ / २!

दोन बॉल्सनंतर...
कॅडीकचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
डॅमियन मार्टीनने तो डिफेन्सिव पद्धतीने मिडऑनला खेळण्याचा पवित्रा घेतला...
टप्पा पडल्यावर इनस्विंग झालेला बॉल मिडलस्टंपसमोर मार्टीनच्या पॅडवर आदळला...
ऑस्ट्रेलिया ३३ / ३!

अँडरसनच्या पुढच्या ओव्हरमध्ये पाँटींगने पूलची बाऊंड्री तडकावली. कॅडीकच्या मेडन ओव्हरनंतर अँडरसनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या फ्लिंटॉफच्या बॉलवर डॅरन लिहमन कॅचआऊट होण्यापासून थोडक्यात वाचला! पण ९ व्या ओव्हरमध्ये....

कॅडीकचा पहिलाच बॉल बंपर होता...
पाँटींगने तो स्क्वेअरलेग बाऊंड्रीपार हूक केला... सिक्स!
दोन बॉल्सनंतर...
कॅडीकने पुन्हा पाँटींगला बंपर टाकला...
पाँटींगने पुन्हा हूक मारला पण...
यावेळेस मात्रं त्याचा अंदाज चुकला होता...
फाईनलेग बाऊंड्रीवर असलेल्या जाईल्सने आरामात कॅच घेतला..
ऑस्ट्रेलिया ४८ / ४!

पाँटींग आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या मायकेल बेव्हनने कोणतीही रिस्क न घेता इंग्लिश बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. कॅडीकच्या हाफव्हॉलीवर डॅरन लिहमनने कव्हर्समधून बाऊंड्री मारल्यावर हुसेनने त्याच्या ऐवजी अँडरसनला बॉलिंगला आणलं. बेव्हनने अँडरसनला स्क्वेअरलेगला पूलची बाऊंड्री फटकावली, पण हा अपवाद वगळता बेव्हन आणि लिहमन यांनी १-२ रन्स काढण्यावरच भर दिला होता. फ्लिंटॉफ आणि क्रेग व्हाईट यांना बेव्हन - लिहमन आरामात खेळत असल्याने हुसेनने अ‍ॅश्ली जाईल्सला बॉलिंगला आणल्यावर लिहमनने त्याला कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली. हुसेनने मायकेल वॉनचा ऑफस्पिनही वापरुन पाहिला पण लिहमनने त्यालाही कट्ची बाऊंड्री मारण्याची संधी सोडली नाही. बेव्हन - लिहमन यांनी ६३ रन्सची पार्टनरशीप केल्यावर अखेर आपल्या मेव्हण्याचा - क्रेग व्हाईटचा - बॉल थर्डमॅनला खेळण्याच्या नादात लिहमनची एज लागली आणि स्ट्युअर्टने त्याचा कॅच घेतला. ६२ बॉल्समधे ३ बाऊंड्रीसह लिहमनने ३७ रन्स काढल्या. ऑस्ट्रेलिया १११ / ५!

(डॅरन लिहमन आणि क्रेग व्हाईट हे यॉर्कशायरकडून कौंटीत खेळत असताना व्हाईटच्या बहिणीशी लिहमनची ओळख झाली आणि त्यांनी लग्नं केलं. २००२ च्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये आणि २००३ च्या वर्ल्डकपमध्ये दोघं प्रतिस्पर्धी होते! )

लिहमन परतल्यावर पुढच्याच ओव्हरमध्ये जाईल्सला ड्राईव्ह करण्याचा अँड्र्यू सायमंड्सचा प्रयत्नं पार फसला आणि फॉलो थ्रूमध्ये डाईव्ह मारत जाईल्सने त्याचा अप्रतिम कॅच घेतला. व्हाईटच्या अचूक मेडन ओव्हरनंतर जाईल्सला कट् करण्याच्या प्रयत्नात ब्रॅड हॉगची बॉटम एज लागली आणि सदैव सतर्क असलेल्या स्ट्युअर्टने कॅच घेण्यात कोणतीही कसूर केली नाही. ऑस्ट्रेलिया ११४ / ७!

शेवटच्या १८ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला ९० रन्सची आवश्यकता होती!

हॉग परतल्यावर बॅटींगला आलेल्या ब्रेट लीने सावधपणे इंग्लिश बॉलर्सना खेळून काढण्याचं धोरण अवलंबलं होतं. क्रेग व्हाईटच्या अचूक बॉलिंगने लीला पार जखडून टाकलं होतं. बेव्हनला मात्रं व्हाईट - जाईल्स यांचा मुकाबला करण्यात कोणतीही अडचण येत नव्हती. जाईल्सला त्याने मिडविकेटवर दणदणीत सिक्स ठोकली. बेव्हन - ली यांनी २१ रन्स जोडल्यावर....

जाईल्सचा बॉल बेव्हनने स्क्वेअरलेगला फ्लिक केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
ब्रेट लीने बेव्हनच्या कॉलला प्रतिसाद दिला...
स्ट्युअर्ट ओरडला, “Get it! Run him out! Come on! Shoot!”
बॅकवर्ड स्क्वेअरलेगला असलेल्या क्रेग व्हाईटने बॉल पिकअप केला...
व्हाईटचा थ्रो कलेक्ट करुन स्ट्युअर्टने बेल्स उडवल्या...
अंपायर आलिम दारने हा निर्णय थर्ड अंपायर डेव्ह ऑर्चर्डकडे सोपवला...
ब्रेट ली रनआऊट झाला!
ऑस्ट्रेलिया १३५ / ८!

अद्याप ऑस्ट्रेलियाला १२ ओव्हर्समध्ये ६९ रन्स बाकी होत्या!

ली परतल्यावर बॅटींगला आला अँडी बिकल! इंग्लंडच्या इनिंग्जमध्ये त्याने ७ विकेट्स घेतल्यानंतरही ऑस्ट्रेलियाचा पराभव होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण बिकलला त्याची पर्वा नव्हती. अँडरसनच्या बॉलवर त्याने कट्ची बाऊंड्री तडकावली. बेव्हननेही आक्रमक पवित्रा घेत जाईल्स - अँडरसनला बाऊंड्री फटकावल्या. अर्थात फटकेबाजी सुरु असताना चाणाक्षपणे १-२ रन्स काढण्यात बेव्हन आणि बिकलने कोणतीही हयगय केली नाही.

शेवटच्या ९ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला ४८ रन्स हव्या होत्या.

जाईल्स आणि अँडरसन यांनी पुढच्या २ ओव्हर्समध्ये अचूक बॉलिंग करत बेव्हन - बिकल यांना फटकेबाजीची कोणतीही संधी दिली नाही. हुसेनने जाईल्सच्या ऐवजी फ्लिंटॉफला बॉलिंगला आणल्यावर पहिल्याच बॉलवर बेव्हनने स्क्वेअरकट्ची बाऊंड्री फटकावली. अँडरसनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या कॅडीकला बिकलने स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावल्यावर हुसेनचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

शेवटच्या ५ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला २७ रन्सची आवश्यकता होती!

हुसेनने फ्लिंटॉफ आणि कॅडीकच्या ऐवजी पुन्हा अँडरसन आणि जाईल्सला बॉलिंगला आणलं. बेव्हन आणि बिकल यांनी शांत डोक्याने कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढण्यावर लक्षं केंद्रीत केलं. जाईल्स आणि अँडरसनच्या पुढच्या २ ओव्हर्समधे १० रन्स निघाल्यावर ४८ व्या ओव्हरमध्ये जाईल्सच्या अचूक बॉलिंगमुळे बेव्हन आणि बिकलला केवळ ३ रन्स मिळाल्या. ४८ ओव्हर्सनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता १९१ / ८!

२ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला १४ रन्स बाकी होत्या!

नासिर हुसेनच्या समोर आता प्रश्नं होता तो म्हणजे शेवटच्या दोन ओव्हर्ससाठी बॉलिंगला कोणाला आणावं?

जाईल्स आणि व्हाईटच्या ओव्हर्स संपल्या होत्या. फ्लिंटॉफ आणि कॅडीक दोघांचीही एकेक ओव्हर बाकी होती तर अँडरसनच्या दोन, पण फ्लिंटॉफ - कॅडीकच्या शेवटच्या ओव्हर्समध्ये बेव्हन - बिकलने बाऊंड्री फटकावल्या होत्या तर अँडरसनच्या ओव्हरमध्ये बाऊंड्री न मारताही ६ रन्स काढल्या होत्या. स्ट्युअर्ट आणि वॉनशी बराच वेळ चर्चा केल्यावर अखेर हुसेनने बॉलिंगला आणलं जेम्स अँडरसनला!

अँडरसनच्या पहिल्या बॉलवर बेव्हनने १ रन काढली..

अँडरसनचा दुसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
बिकल एक पाय दुमडून गुडघ्यावर बसला आणि त्याने बॉल मिडविकेटला उचलला..
बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार असलेल्या स्कोरबोर्डच्या वरच्या टोकावर जाऊन आदळला.... सिक्स!

अँडरसनचा तिसरा बॉल लेगस्टंपवर पडला...
बिकलने तो लेगसाईडला फ्लिक केला...
मिडविकेटला असलेल्या कॅडीकपासून जेमतेम ८ - १० फूट अंतरावरुन बॉल गेला....
पण कॅडीकला काही हालचाल करण्याची संधीच मिळाली नाही... बाऊंड्री!

बिकलने दिलेल्या या दोन दणक्यांनी इंग्लंडची हवा तंग झाली होती. चौथ्या बॉलवर त्याने एक रन काढल्यावर उरलेले दोन बॉल्स बेव्हनने थंड डोक्याने खेळून काढले!

शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकण्यासाठी केवळ २ रन्सची आवश्यकता होती!

फ्लिंटॉफचा पहिला बॉल अचूक यॉर्कर होता...
बिकलला काहीच करता आलं नाही....

५ बॉल्स - २ रन्स!

फ्लिंटॉफचा दुसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
बिकलने स्ट्रेट ड्राईव्ह मारला...
फ्लिंटॉफला कॅच घेण्यास वेळ मिळण्यापूर्वीच बॉल त्याच्या हाताला लागून कव्हर्सच्या दिशेने गेला...
मायकेल बेव्हन एक रन काढण्याच्या इराद्याने धावत सुटला...
शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला असलेल्या क्रेग व्हाईटने बॉल पिकअप केला...
बेव्हनने मागे फिरुन आपलं क्रीज गाठलं!

४ बॉल्स - २ रन्स!

फ्लिंटॉफचा तिसरा बॉल....
ऑफस्टंपवर पडलेला बॉल बिकलने मिडऑनला फटकावला...
मिडऑनला असलेल्या मायकेल वॉनने बॉल अडवण्याचा प्रयत्नं केला पण...
बॉल त्याच्या पायांमधून गेला...
बिकल आणि बेव्हन १ रन काढण्याची संधी सोडणं शक्यंच नव्हतं!

३ बॉल्स - १ रन!

फ्लिंटॉफच्या फुलटॉसवर मिडविकेटला बाऊंड्री तडकावत बेव्हनने मॅच संपवली!

२ विकेट्सनी ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकली!

ऑस्ट्रेलिया कठीण परिस्थितीत सापडलेली असताना पुन्हा एकदा मायकेल बेव्हन धावून आला होता...
१२६ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री आणि जाईल्सला मारलेल्या सिक्ससह ७४ रन्स काढून तो नॉटआऊट राहीला...
अँंडी बिकल बेव्हनला सपोर्ट देत ३६ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि अँडरसनला मारलेल्या सिक्ससह ३४ रन्स फटकावल्या...
बेव्हन - बिकल यांनी १३५ / ८ अशा परिस्थितीतून ७३ रन्सची पार्टनरशीप करुन मॅच जिंकली!

नासिर हुसेन ग्राऊंडवरच दोन्ही हातांत डोकं धरुन बसला होता...
अ‍ॅलेक स्ट्युअर्टही आपलं नेमकं काय चुकलं याचा विचार करत उभा होता...
इंग्लंडचा वर्ल्डकप ग्रूपमध्येच आटपल्यात जमा होता..
हुसेन आणि स्ट्युअर्टचं वन डे करीअरही या मॅचबरोबरच संपुष्टात आलं!

मॅन ऑफ द मॅच म्हणून अर्थातच अँडी बिकलची निवड झाली!

१९७५ मध्ये गॅरी गिल्मोरनंतर वर्ल्डकपच्या मॅचमध्ये ६ विकेट्स आणि २५ रन्स अशी कामगिरी करणारा बिकल हा दुसराच खेळाडू!

क्रीडालेख