वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - सेमीफायनल - दक्षिण आफ्रीका विरुद्ध न्यूझीलंड

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
12 Mar 2017 - 10:41 am

२४ मार्च २०१५
इडन पार्क, ऑकलंड

ऑकलंडच्या इडन पार्कवर यजमान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल रंगणार होती. क्वार्टरफायनलमध्ये मार्टीन गप्टीलच्या २३७ रन्सच्या इनिंग्जमुळे न्यूझीलंडने वेस्ट इंडीजला १४३ रन्सनी धूळ चारली होती तर श्रीलंकेविरुद्धची क्वार्टरफायनल आरामात जिंकून दक्षिण आफ्रीकेने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. १९९२ मधल्या आपल्या पहिल्या वर्ल्डकपपासून अखेर ७ व्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रीकेने नॉकआऊट स्टेजमध्ये आपली पहिली मॅच जिंकण्यात यश मिळवलं होतं. न्यूझीलंडची ही ७ वी सेमीफायनल तर दक्षिण आफ्रीकेची ४ थी! न्यूझीलंडला आतापर्यंत १९७५, १९७९, १९९२, १९९९, २००७ आणि २०११ अशा ६ वर्ल्डकप्समध्ये सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता तर दक्षिण आफ्रीकेला १९९२, १९९९ आणि २००७ मध्ये सेमीफायनल मध्ये गाशा गुंडाळावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघ प्रथमच वर्ल्डकप फायनल गाठण्याच्या ईर्ष्येनेच मैदानात उतरणार होते!

वर्ल्डकपला सुरवात होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रीकेच्या फ्रान्सवाल 'फाफ' ड्युप्लेसीने नॉकआऊट मॅचेसमध्ये न्यूझीलंडशी दोन हात करण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्तं केली होती. २०११ च्या क्वार्टरफायनलमध्ये एबी डिव्हीलीयर्स रनआऊट झाल्यावर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी केलेलं स्लेजिंग तो विसरला नव्हता!

ड्युप्लेसी म्हणाला,
"In my perfect world I would like to play New Zealand in the semi-final and have that same situation arise again. But this time it will be the other way around. We'll be the team that's on top, and we can do the same to them. They targeted me as a youngster. That moment taught me a lot about myself. I learnt a lot about international cricket. I learnt a lot about myself when I didn't stand back to those guys.Some teams target guys who are younger and less experienced. New Zealand are brilliant at that, the Aussies as well!"

... आणि आता दक्षिण आफ्रीकेची नेमकी न्यूझीलंडशी सेमीफायनलमध्ये गाठ पडली होती!

ब्रेंडन मॅक्कलमच्या न्यूझीलंड संघात स्वतः मॅक्कलम, मार्टीन गप्टील, केन विल्यमसन, रॉस टेलर, ग्रँट इलियट असे बॅट्समन होते. न्यूझीलंडच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने होता तो ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊदी यांच्यावर. या दोघांच्या जोडीला न्यूझीलंड क्रिकेटचा Grand old man डॅनियल व्हिटोरी होता. जखमी अ‍ॅडम मिलेनच्या ऐवजी मॅट हेन्रीची न्यूझीलंडच्या संघात निवड करण्यात आली होती. ७ व्या नंबरवर बॅटींगला येऊन १७० रन्स फटकावण्याचा रेकॉर्ड नावावर असलेला ल्यूक राँचीसारखा विकेटकीपर बॅट्समन आणि ३६ बॉल्समध्ये वन डे सेंचुरी ठोकणारा ऑलराऊंडर कोरी अँडरसन यांचाही न्यूझीलंडच्या संघात समावेश होता!

एब डिव्हीलीयर्सच्या दक्षिण आफ्रीकन संघात स्वतः डिव्हीलीयर्स, हाशिम अमला, फाफ ड्युप्लेसी, राइली रुसो, जीन पॉल ड्युमिनी, डेव्हीड मिलर असे बॅट्समन होते. त्यांच्या जोडीला क्विंटन डिकॉक सारखा विकेटकीपर बॅट्समन होता. दक्षिण आफ्रीकेच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने अनुभवी डेल स्टाईन आणि मॉर्नी मॉर्केल यांच्यावर होता. मूळचा पाकिस्तानी असलेला लेगस्पिनर इमरान ताहीरचाही दक्षिण आफ्रीकन संघात समावेश होता, पण क्वार्टरफायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या काईल अ‍ॅबटच्या ऐवजी दुखापतीतून सावरत असलेल्या व्हर्नान फिलँडरच्या दक्षिण आफ्रीकेच्या संघातील समावेशामुळे मात्रं सर्वजणच चकीत झाले होते. फिलँडरच्या स्विंग बॉलिंगला ऑकलंडच्या विकेटवर मदत मिळेल अशी डिव्हीलीयर्सने सारवासारव केली असली तरी दक्षिण आफ्रीकेतल्या कोटा सिस्टीममुळेच पूर्णपणे फिट नसतानाही त्याची संघात वर्णी लावण्यात आली असावी अशी बहुतेकांना शंका आली होती!

एबी डिव्हीलीयर्सने टॉस जिंकल्यावर बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. टिम साऊदीच्या पहिल्या अचूक मेडन ओव्हरनंतर दुसर्‍या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टचा बॉल क्विंटन डिकॉकच्या बॅटच्या एजला लागून थर्डमॅन बाऊंड्रीपार गेला. आणखीन जेमतेम एक बॉलनंतर पुन्हा बोल्टच्या बॉलवर डिकॉकची एज लागली, पण विकेटकीपर ल्यूक राँचीने हा कॅच ड्रॉप केलाच, वर डिकॉकला पुन्हा थर्डमॅनला बाऊंड्री मिळाली! पुढच्याच ओव्हरमध्ये साऊदीचा बंपर हूक करण्याच्या नादात अमलाच्या बॅटची टॉप एज लागली, पण फाईनलेगला बोल्टला कॅच घेता आला नाही. त्याच ओव्हरच्या शेवटच्या २ बॉल्सवर अमलाने फाईनलेग आणि मिडविकेटला लागोपाठ २ बाऊंड्री फटकावल्या पण पुढच्याच ओव्हरमध्ये...

बोल्टचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
अमलाने जागच्या जागी उभं राहत तो कव्हर्समधून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्नं केला...
टप्पा पडल्यावर बॉल स्विंग झाला आणि अमलाच्या बॅटची इनसाईड एज घेऊन मिडलस्टंपवर गेला...
दक्षिण आफ्रीका २१ / १!

अमला आऊट झाल्यावर नॉकआऊट मॅचमध्ये न्यूझीलंडची गाठ पडावी अशी जाहीर अपेक्षा व्यक्तं करणारा फाफ ड्युप्लेसी बॅटींगला आला. बोल्टचा अचूक पडलेला यॉर्करवर अगदी शेवटच्या क्षणी स्क्वेअरलेगला बाऊंड्री फटकावत ड्युप्लेसीने आक्रमक सुरवात केली, पण साऊदी आणि बोल्ट्च्या अचूक बॉलिंगमुळे पुढच्या ३ ओव्हर्समध्ये डिकॉक आणि ड्युप्लेसी यांना फटकेबाजीची कोणतीही संधी दिली नाही. अखेर याचा परिणाम व्हायचा तोच झाला...

बोल्टचा बॉल ऑफस्टंपच्या किंचित बाहेर पडला....
डिकॉकने लेगसाईडला सरकत तो कव्हर्समधून फटकावण्याचा प्रयत्नं केला पण....
टप्पा पडल्यावर स्विंग झालेल्या बॉलमुळे डिकॉकच्या बॅटची एज लागली...
थर्डमॅन बाऊंड्रीवर असलेल्या टिम साऊदीला इंचभरही सरकावं लागलं नाही...
दक्षिण आफ्रीका ३१ / २!

डिकॉक आऊट झाल्यावर एबी डिव्हीलीयर्स बॅटींगला येईल अशीच सर्वांची अपेक्षा असताना त्याच्याऐवजी राइली रुसो बॅटींगला आला. ड्युप्लेसीने बोल्टला थर्डमॅनला लेटकट्ची बाऊंड्री मारली, पण टिम साऊदीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या मॅट हेन्रीने ड्युप्लेसीला लागोपाठ २ मेडन ओव्हर्स टाकत पार जखडून टाकलं होतं. बोल्टला रुसोने मिडऑनला बाऊंड्री मारल्यावर मॅक्कलमने त्याच्या ऐवजी 'डॅन द मॅन' व्हिटोरीला बॉलिंगला आणलं. व्हिटोरीच्या पहिल्या अचूक ओव्हरनंतर पुढच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रीकेला ५ वाईड्सची फुकटची खिरापत मिळाली. हेन्रीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या साऊदीला ड्राईव्ह मारण्याचा रुसोचा प्रयत्नं पार फसला पण रुसोच्या सुदैवाने त्याच्या बॅटची इनसाईड एज लागून बॉल फाईनलेग बाऊंड्रीपार गेला. २० ओव्हर्सनंतर दक्षिण आफ्रीकेचा स्कोर होता ७७ / २!

साऊदीच्या ओव्हरमध्ये ड्युप्लेसीने मिडऑफवरुन दोन बाऊंड्री फटकावल्यावर मॅक्कलमने त्याच्या ऐवजी केन विल्यमसनला बॉलिंगला आणलं. विल्यमसनच्या दुसर्‍याच बॉलवर अ‍ॅक्रॉस द लाईन खेळण्याचा ड्युप्लेसीचा प्रयत्नं पार फसला, पण अंपायर इयन गूल्डने एलबीडब्ल्यूचं अपिल तर फेटाळलंच आणि ड्युप्लेसीने काढलेली रनही लेगबाय दिली नाही! विल्यमसनच्या एकमेव ओव्हरनंतर मॅक्कलमने ग्रँट इलियटला बॉलिंगला आणलं, पण रुसोने त्याला त्याच्याच डोक्यावरुन दणदणीत सिक्स ठोकली! ड्युप्लेसी आणि रुसो यांनी ८३ रन्सची पार्टनरशीप केल्यावर....

इलियट्च्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या कोरी अँडरसनचा दुसराच बॉल ऑफस्टंपच्या किंचित बाहेर पडला...
रुसोने फ्रंटफूटवर येत तो कव्हर्समधून फटकावण्याचा प्रयत्नं केला...
त्याच्या अपेक्षेपेक्षा बॉल जास्तं बाऊंस झाल्याने बॅटच्या हँडलपाशी लागून बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने गेला....
बॅकवर्ड पॉईंटला मार्टीन गप्टीलने उजव्या बाजूला हवेत जंप मारली आणि एका हातात त्याचा कॅच घेतला!

५३ बॉल्समध्ये २ बाऊंड्री आणि इलियटला मारलेल्या सिक्ससह रुसोने ३९ रन्स फटकावल्या.
दक्षिण आफ्रीका ११४ / ३!

रुसो परतल्यावर एबी डिव्हीलीयर्स बॅटींगला आला, पण अँडरसनचा पहिलाच बॉल त्याच्या ग्लोव्हजना लागून स्टंप्सवर जाण्यापासून तो थोडक्यात वाचला! डिव्हीलीयर्स - ड्युप्लेसी यांनी कोणतीही रिस्क न घेता आरामात १-२ रन्स काढण्यास सुरवात केली. मॅक्कलमने बोल्ट आणि त्याच्यानंतर हेन्रीला बॉलिंगला आणलं. ड्युप्लेसीने क्रीजमधून पुढे सरसावत हेन्रीला साईटस्क्रीनवर सिक्स ठोकली! पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने व्हिटोरीला लेग ग्लान्सची बाऊंड्री मारल्यावर त्याच ओव्हरमध्ये व्हिटोरीच्या फुलटॉसवर डिव्हीलीयर्सने स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. हेन्रीच्या ओव्हरमध्ये डिव्हीलीयर्सने मिडविकेटला २ बाऊंड्री फटकावल्यावर अँडरसनच्या पुढच्या ओव्हरमध्ये ड्युप्लेसी - डिव्हीलीयर्स यांनी पुन्हा २ बाऊंड्री मारल्या, परंतु हेन्रीच्या पुढच्या ओव्हरमध्ये डिव्हीलीयर्स रनआऊट होताहोता वाचला! ३५ ओव्हर्सनंतर दक्षिण आफ्रीकेचा स्कोर होता १८४ / ३!

ड्युप्लेसी आणि डिव्हीलीयर्ससारखे बॅट्समन व्यवस्थित 'सेट' झालेले असताना दक्षिण आफ्रीका बॅटींग पॉवरप्ले घेणार हे उघड होतं!
बॅटींग पॉवरप्लेमधल्या पहिल्याच ओव्हरमध्ये...

कोरी अँडरसनच्या पहिल्या बॉलवर ड्युप्लेसीने १ रन काढली...

अँडरसनचा दुसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
डिव्हीलीयर्सने फ्रंटफूटवर येत तो कव्हर्समधून फटकावला...
शॉर्ट कव्हरला विल्यमसनने डाव्या बाजूला कॅच घेण्याचा प्रयत्नं केला पण...
अगदी शेवटच्या क्षणी बॉल त्याच्या हातातून सुटला!

विल्यमसनसारखा शांत खेळाडूही डिव्हीलीयर्सला ड्रॉप करण्याचे काय परिणाम होऊ शकतात या कल्पनेने स्वतःवरच चिडला होता...
परिणाम ताबडतोब दिसून आला...

अँडरसनचा तिसरा बॉल ऑफस्टंपवर पडला...
डिव्हीलीयर्स क्रीजमधून पुढे सरसावला आणि त्याने तो लाँगऑनवरुन उचलला... सिक्स!

चौथा बॉल मिडलस्टंपवर पडला...
डिव्हीलीयर्स पुन्हा क्रीजमधून पुढे सरसावला आणि त्याने मिडऑफला ड्राईव्ह मारला... बाऊंड्री!

पाचवा बॉल ऑफस्टंपवर पडला...
लागोपाठ तिसर्‍यांदा डिव्हीलीयर्स क्रीजमधून पुढे सरसावला आणि त्याने स्ट्रेट ड्राईव्ह मारला... बाऊंड्री!

शेवटचा बॉल अचूक पडलेला यॉर्कर होता. डिव्हीलीयर्सलाही त्यावर काही करता येणं शक्यं नव्हतं!

अँडरसनच्या ओव्हरमध्ये १५ रन्स फटकावल्या गेल्या!

टिम साऊदीच्या अचूक यॉर्कर्समुळे ड्युप्लेसी - डिव्हीलीयर्स यांना पुढच्या ओव्हरमध्ये केवळ ५ रन्स काढता आल्या. साऊदीच्या बंपरवर डिव्हीलीयर्सची टॉप एज लागली, पण त्याच्या सुदैवाने बॉल मिडविकेट, वाईड लाँगऑन आणि डीप मिडऑन वरुन आलेल्या ३ फिल्डर्सच्या मध्ये पडला!

एव्हाना पावसाला सुरवात झाली होती....

बोल्टच्या पुढच्या ओव्हरमध्ये डिव्हीलीयर्सने अपर कट्ची बाऊंड्री मारली...
शेवटच्या बॉलवर यॉर्कर टाकण्याचा बोल्टचा प्रयत्नं सपशेल फसला आणि ड्युप्लेसीने त्याला मिडऑफ मधून बाऊंड्री तडकावली...

आतापर्यंत पावसाचा जोर चांगलाच वाढला होता.
दोन्ही अंपायर्सनी आपापसात चर्चा केली आणि खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.

पावसामुळे खेळ थांबला तेव्हा ३८ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्री़केचा स्कोर होता २१६ / ३!

सुमारे पाऊण तासांनी पाऊस थांबला अशा कल्पनेने खेळ सुरु होण्याच्या अपेक्षेत सर्वजण असतानाच पुन्हा पावसाने जोर धरला...
अखेर पुन्हा खेळ सुरु झाला तेव्हा पावसामुळे २ तास वाया गेले होते.
दोन्ही संघांच्या ७-७ ओव्हर्स कमी करुन मॅच ४३ ओव्हर्सची झाली.

ट्रेंट बोल्टच्या आणि डॅनियल व्हिटोरीच्या ९-९ ओव्हर्स संपल्यामुळे ते दोघं आता बॉलिंग करु शकत नव्हते. साऊदी किंवा हेन्री यांच्यापैकी एकजण ९ ओव्हर्स पूर्ण करु शकत होता, त्यामुळे किमान ३ ओव्हर्स अँडरसन किंवा इतर कोणालातरी टाकाव्या लागणार होत्या. दक्षिण आफ्रीकेच्या दृष्टीने विचार करता ही फटकेबाजीला पर्वणी होती. पण पावसानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये...

अँडरसनचा बंपर लेगस्टंपच्या किंचित बाहेर पडला....
ड्युप्लेसीचा बॉल पूल करण्याचा प्रयत्नं सपशेल फसला...
विकेटकीपर राँकी आणि अँडरसन यांनी कॅचसाठी जोरदार अपिल केलं पण...
अंपायर इयन गूल्डने चक्कं वाईड बॉलचा इशारा केला...
मॅक्कलमने डीआरएसचा आधार घेत इयन गूल्डच्या निर्णयाविरुद्ध थर्ड अंपायर नायजेल लाँगकडे दाद मागितली...
टीव्ही रिप्लेमध्ये बॉल ड्युप्लेसीचा ग्लोव्हजना लागून गेल्याचं स्पष्टं झालं...
स्निकोमीटरमध्ये बॉल ग्लोव्हजवर लागताना झालेला आवाज अचूक टिपला गेला होता...
नायजेल लाँगच्या सूचनेनंतर इयन गूल्डने आपला निर्णय बदलल...

१०७ बॉल्समध्ये ७ बाऊंड्री आणि १ सिक्स ठोकत ड्युप्लेसीने ८२ रन्स फटकावल्या.
दक्षिण आफ्रीका २१७ / ५!

शेवटच्या ४ ओव्हर्स बाकी असताना आणि एबी डिव्हीलीयर्ससारखा खतरनाक बॅट्समन क्रीजवर असताना त्याच्या जोडीला कोण यावं तर 'In the arc, out of the park' असं साधं तत्वज्ञान असलेला डेव्हीड मिलर!

४० व्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात टिम साऊदीचा बॉल फुलटॉस आला आणि मिलरने त्याला लाँगऑनला बाऊंड्री फटकावली. पुढच्या बॉलवर ऑफस्टंपच्या बाहेर अचूक यॉर्कर पडला. पण मिलरच्या बॅटची बॉटम एज लागून तो थर्डमॅन बाऊंड्रीपार गेला! तिसरा बॉल बंपर असल्याने मिलरला त्यावर काहीच करता आलं नाही, पण फुलटॉस आलेल्या चौथ्या बॉलवर मिलरने मिडऑफवरुन बाऊंड्री फटकावली. पाचव्या स्लो बॉलवर मिलरने पुन्हा मिडऑफला बाऊंड्री तडकावल्यावर शेवटच्या बॉलवर १ रन काढली. साऊदीच्या ओव्हरमध्ये मिलरने १७ रन्स फटकावल्या! पण पुढच्या ओव्हरमध्ये....

अँडरसनचा पहिला बॉल ऑफस्टंपवर पडला...
मिलरने तो मिडविकेटवरुन फटकावण्याचा प्रयत्नं केला पण त्याच्या बॅटची एज लागून बॉल थर्डमॅनला गेला... बाऊंड्री!

दुसरा बॉल वाईड गेल्यावर पुढच्या २ बॉल्सवर मिलर आणि डिव्हीलीयर्सने २ रन्स काढल्या...

अँडरसनने पाचवा बॉल टाकण्यापूर्वीच मिलर क्रीजमधून पुढे सरसावला...
तो क्रीजमधून पुढे आलेला पाहून अँडरसनने शॉर्टपीच बॉल टाकला पण मिलरने तो सरळ लाँगऑनवरुन उचलला... सिक्स!

सहावा बॉल लेगस्टंपवर पडला...
मिलरने तो मिडविकेटवरुन उचलला... सिक्स!

सातवा बॉल मिलरने लाँगलेगला फ्लिक करुन १ रन काढली.
अँडरसनच्या ओव्हरमध्ये २० रन्स झोडपल्या गेल्या होत्या!

साऊदीच्या पुढच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर मिलरने पुन्हा मिडऑफवरुन बाऊंड्री तडकावली, पण हा अपवाद वगळता त्याने मिलर आणि डिव्हीलीयर्सला फटकेबाजीची कोणतीही संधी दिली नाही, पण शेवटच्या ओव्हरमध्ये...

अँडरसनच्या पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
मिलरने ऑफस्टंपच्या बाहेर जात तो लाँगऑनवरुन खेचला... सिक्स!

ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला दुसरा बॉल कव्हर्समधून फटकावण्याच्या नादात मिलरची एज लागली...
विकेटकीपर राँचीने कॅच घेतल्यावर अखेर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सुटकेचा नि:श्वास सोडला!

१८ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री आणि ३ सिक्स ठोकत डेव्हीड मिलरने ४९ रन्स झोडपल्या!

मिलर परतल्यावर जेपी ड्युमिनीने उरलेल्या ४ बॉल्समध्ये ९ रन्स फटकावल्या.
अखेर ४३ ओव्हर्स संपल्या तेव्हा दक्षिण आफ्रीकेचा स्कोर होता २८१ / ६!

डकवर्थ - लुईस नियमाच्या आधाराने मॅच जिंकण्यासाठी न्यूझीलंडसमोर ४३ ओव्हर्समध्ये २९८ रन्सचं टार्गेट होतं!
मॅच टाय झाली तर न्यूझीलंड फायनलमध्ये गेले असते कारण ग्रूपमधल्या मॅचेसनंतर त्यांनी दक्षिण आफ्रीकेपेक्षा वरचं स्थान मिळवलं होतं!

कधी नव्हे तो या मॅचमधली न्यूझीलंडची फिल्डींग नेहमीच्या तुलनेत बर्‍याच प्रमाणात गचाळ होती. न्यूझीलंडच्या फिल्डर्सनी एकूण ४ कॅच ड्रॉप केले होते. इतकंच नव्हे तर अनेकदा त्यांची ग्राऊंड फिल्डींगही नेहमीप्रमाणे दर्जेदार नव्हती. डिव्हीलीयर्स आणि ड्युप्लेसी दोघंही रनआऊट होताहोता वाचले होते. आता प्रश्नं होता तो या वर्ल्डकपमध्ये सुरवातीपासूनच अतिआक्रमक बॅटींग करण्याच्या न्यूझीलंडचा पवित्रा दक्षिण आफ्रीकेच्या बॉलर्सपुढे कितपत यशस्वी होणार होता?

डेल स्टाईनच्या पहिल्याच ओव्हरमध्ये ब्रेंडन मॅक्कलमने कव्हर्सवरुन सिक्स ठोकत नेहमीप्रमाणे फटकेबाजीला सुरवात केली. पुढच्या ओव्हरमध्ये...

व्हर्नान फिलँडरच्या पहिल्याच बॉलवर क्रीजमधून पुढे सरसावत हूक मारण्याचा मॅक्कलमचा प्रयत्नं फसला...
पण फिलँडरचा बॉल विकेटकीपर क्विंटन डिकॉकलाही पकडता आला नाही...
न्यूझीलंडला ४ बाईजचा बोनस मिळाला!

मॅक्कलम पुन्हा क्रीजमधून पुढे येईल या अपेक्षेने फिलँडरने दुसरा बॉल बंपर टाकला...
मॅक्कलमने बॅकफूटवर जात तो लाँगलेगवरुन हूक केला... सिक्स!

तिसरा शॉर्टपीच बॉल लेगस्टंपवर पडला...
मॅक्कलमने तो स्क्वेअरलेगला खेचला... बाऊंड्री!

पुढच्या २ बॉल्सवर मॅक्कलमला काहीच करता आलं नाही...

शेवटचा बॉल लेगस्टंपवर पडला...
मॅक्कलमने तो पुन्हा स्क्वेअरलेगला तडकावला... बाऊंड्री!

फिलँडरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये १८ रन्स फटकावल्या गेल्या होत्या!

तिसर्‍या ओव्हरच्या दुसर्‍या बॉलवर जेपी ड्युमिनीचा थ्रो स्टंप्सवर न लागल्याने मार्टीन गप्टील रनआऊट होण्यापासून थोडक्यात बचावला होता. आणखीन २ बॉल्सनंतर मॅक्कलमने स्टाईनला कव्हर्सवरुन बाऊंड्री तडकावली!

फिलँडरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये १८ रन्स फटकावल्या गेल्याने डिव्हीलीयर्सने त्याच्याऐवजी मॉर्नी मॉर्केलला बॉलिंगला आणलं, पण मॅक्कलमला काहीच फरक पडला नाही. मॉर्केलच्या पहिल्याच बॉलवर मिडऑनवरुन बाऊंड्री फटकावल्यावर मॅक्कलमने त्याला मिडविकेटवर पूलची बाऊंड्री तडकावली. वाहत्या गंगेत हात धुवून घेत गप्टीलनेही मॉर्केलला स्क्वेअरलेगला बाऊंड्री मारली. मॅक्कलमच्या आतषबाजीमुळे दक्षिण आफ्रीकन खेळाडू काहीसे गोंधळून गेले होते. फिलँडर आणि मॉर्केलची आतापर्यंत झालेली धुलाई पुरेशी नव्हती म्हणूनच की काय पुढच्या ओव्हरमध्ये...

स्टाईनचा पहिला बॉल मिडलस्टंपवर पडला...
मॅक्कलमने क्रीजमधून पुढे सरसावत तो त्याच्या डोक्यावरुन स्ट्रेट उचलला.... सिक्स!

स्टाईनचा दुसरा बॉल लेगसाईडला गेलेला वाईड होता...

तिसरा बॉल ऑफस्टंपवर पडलेला शॉर्टपीच बॉल होता...
मॅक्कलमने पुन्हा क्रीजमधून पुढे सरसावत तो मिडऑफवरुन फटकावला.... बाऊंड्री!

चौथा बॉल लेगस्टंपवर पडलेला बंपर होता...
मॅक्कलमने बॅकफूटवर जात तो लाँगलेगवरुन हूक केला.... सिक्स!

पाचवा बॉल लेगस्टंपच्या बाहेर आलेला फुलटॉस होता...
मॅक्कलमने तो सोडून दिला असता तर वाईड गेला असता पण त्याने तो फाईनलेगला फ्लिक केला.... बाऊंड्री!

सहावा बॉल ऑफस्टंपच्या किंचित बाहेर पडलेला आऊटस्विंगर होता...
मॅक्कलमने फ्रंटफूटवर येत तो कव्हर्समधून ड्राईव्ह केला.... बाऊंड्री!

शेवटच्या बॉलवर मॅक्कलम पुन्हा क्रीजमधून पुढे सरसावला पण स्टाईनने ऑफस्टंपच्या बाहेर टाकेल्या बॉलवर त्याला काहीच करता आलं नाही...

स्टाईनच्या ओव्हरमध्ये २५ रन्स झोडपल्या गेल्या होत्या!

फिलँडर, मॉर्केलपाठोपाठ स्टाईनचीही धुलाई झाल्यामुळे डिव्हीलीयर्ससमोर आता एकच पर्याय उरला होता तो म्हणजे लेगस्पिनर इमरान ताहीर!
ताहीरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये...

लेगस्टंपवर पडलेला ताहीरचा बॉल स्वीप करण्याचा गप्टीलचा प्रयत्नं फसला आणि बॉल त्याच्या पॅडवर आदळला...
दक्षिण आफ्रीकन खेळाडूंचं एलबीडब्ल्यूचं अपिल अंपायर रॉड टकरने फेटाळलं...
डिव्हीलीयर्सने डीआरएसचा आधार घेत थर्ड अंपायर नायजेल लाँगकडे दाद मागितली...
टीव्ही रिप्लेमध्ये बॉल लेगस्टंपवर पडल्याचं आणि मिडलस्टंपवर गप्टीलच्या पॅडवर लागल्याचं दिसत होतं पण बॉल स्टंप्सवरुन जात होता!

ताहीरने गप्टीलला टाकलेल्या मेडन ओव्हरनंतर डिव्हीलीयर्सने पुन्हा मॉर्केलला बॉलिंगला आणलं...

मॉर्केलच्या पहिल्याच बॉलवर मॅक्कलम क्रीजमधून पुढे सरसावला...
पण त्याच्या अपेक्षेपेक्षा बॉल किंचित वेगाने आल्याने लेगसाईडला बॉल फटकावण्याचा त्याचा अंदाज पार फसला...
मिडऑनला स्टाईनने त्याचा कॅच घेण्यात कोणतीही कसूर केली नाही.

अवघ्या २६ बॉल्समध्ये ८ बाऊंड्री आणि ४ सिक्स ठोकत मॅक्कलमने ५९ रन्स झोडपून काढल्या!
न्यूझीलंड ७१ / १!

मॅक्कलम आऊट झाल्यावर दक्षिण आफ्रीकेच्या खेळाडूंनी सुटकेचा नि:श्वास टाकला! गप्टीलला मेडन ओव्हर टाकणार्‍या इमरान ताहीरच्या ऐवजी डिव्हीलीयर्सने फिलँडरला बॉलिंगला आणलं, पण गप्टीलने त्याला स्क्वेअरलेगला बाऊंड्री फटकावली. मॅक्कलम आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या केन विल्यमसनने मॉर्केलच्या पुढच्या ओव्हरमध्ये मिडविकेटला पूलची बाऊंड्री तडकावली पण पुढच्याच बॉलवर पुन्हा मॉर्केलला पूल करण्याच्या प्रयत्नात त्याच्या बॅटची बॉटम एज लागली आणि बॉल मिडलस्टंपवर गेला. न्यूझीलंड ८१ / २!

विल्यमसन परतल्यावर बॅटींगला आलेल्या रॉस टेलरने फिलँडरच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या ड्युमिनीला स्वीपची बाऊंड्री मारत आक्रमक सुरवात केली. मॉर्केलच्या पुढच्या ओव्हरमध्ये कट्ची बाऊंड्री मारण्यात त्याने कोणतीही हयगय केली नाही. पुढच्या ओव्हरमध्ये गप्टीलने ड्युमिनीला लाँगऑनवरुन सिक्स ठोकल्यावर डिव्हीलीयर्सने त्याच्या ऐवजी पुन्हा ताहीरला बॉलिंगला आणलं. ताहीर आणि फिलँडरच्या अचूक बॉलिंगमुळे गप्टील - टेलर यांना पुढच्या ४ ओव्हर्समध्ये फटकेबाजीची कोणतीही संधी मिळाली नाही पण दोघांनी शांत डोक्याने १-२ रन्स काढण्याची एकही संधी सोडली नाही. अखेर फिलँडरला गप्टीलने स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री फटकावल्यावर त्याच ओव्हरमध्ये टेलरने पूलची बाऊंड्री तडकावली. गप्टील - टेलर यांनी ४७ रन्सची पार्टनरशीप केल्यावर....

इमरान ताहीरचा बॉल टेलरने कट् केला आणि १ रनसाठी कॉल दिला...
गप्टीलने टेलरच्या कॉलला प्रतिसाद दिला पण...
बॉल सरळ बॅकवर्ड पॉईंटला असलेला हाशिम अमलाच्या हातात गेला होता...
क्रीजमधून बाहेर आलेला टेलर क्षणभरासाठी थबकला...
टेलरला थांबलेला पाहून गप्टीलनेही आपला वेग आवरला...
एव्हाना टेलरने पुन्हा नॉनस्ट्रायकर एन्डकडे धाव घेतली होती...
अमलाने बॉल पिकअप करुन आरामात डिकॉककडे थ्रो केला...
डिकॉकने बेल्स उडवल्या तेव्हा गप्टील क्रीजच्या जवळपासही पोहोचला नव्हता!
२०११ च्या वर्ल्डकपच्या क्वार्टरफायनलमधल्या डिव्हीलीयर्सच्या रनआऊटची आठवण येणं अपरिहार्य होतं!

३८ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि ड्युमिनीला ठोकलेल्या सिक्ससह गप्टीलने ३४ रन्स फटकावल्या.
न्यूझीलंड १२८ / ३!

गप्टील आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या ग्रँट इलियटने ताहीरच्या पहिल्याच बॉलवर स्वीपची बाऊंड्री मारली. गप्टील आऊट झाल्यावर डिव्हीलीयर्सने विकेट्स मिळवण्याच्या दृष्टीने स्टाईनला बॉलिंगला आणलं, पण टेलरने त्याला मिडऑनला बाऊंड्री फटकावली. एव्हाना स्टाईनला गुडघेदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याने ड्रेसिंगरुममध्ये परतण्याचा निर्णय घेतला. स्टाईनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या मॉर्केलला इलियटने लेग ग्लान्सची बाऊंड्री मारली पण ड्युमिनीच्या पुढच्या ओव्हरमध्ये ऑफसाईडला सरकत फ्लिक करण्याच्या नादात टेलरच्या बॅटची एज लागली आणि डिकॉकने त्याचा कॅच घेतला. ३९ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह टेलरने ३० रन्स फटकावल्या. न्यूझीलंड १४९ / ४!

शेवटच्या २१ ओव्हर्समध्ये न्यूझीलंडला १४७ रन्सची आवश्यकता होती!

टेलर परतल्यावर बॅटींगला आलेल्य कोरी अँडरसनने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत दक्षिण आफ्रीकन बॉलर्सना फटकावण्यास सुरवात केली. फिलँडरला मिडऑफला बाऊंड्री फटकावल्यार ड्युमिनीला त्याने स्वीपची बाऊंड्री मारली. अँडरसनच्या पावलावर पाऊल टाकत इलियटने ड्युमिनीला स्वीपची बाऊंड्री तडकावली. फिलँडरच्या पुढच्या ओव्हरमध्ये अँडरसनने स्क्वेअरलेगला दणदणीत सिक्स ठोकली. ड्युमिनीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या इमरान ताहीरच्या अचूक बॉलिंगमुळे अँडरसन - इलियट यांना फटकेबाजीची कोणतीही संधी मिळाली नाही पण फिलँडरच्या पुढच्या ओव्हरमध्ये कव्हर्समधून बाऊंड्री तडकावण्याचा मोका इलियटने अचूक साधल्यावर डिव्हीलीयर्सने त्याच्याऐवजी पुन्हा ड्युमिनीला बॉलिंगला आणलं, पण अँडरसनने त्याला लाँगऑफवरुन सिक्स ठोकली!

१३ ओव्हर्समध्ये न्यूझीलंडला अद्याप ९९ रन्स बाकी होत्या!

३१ व्या ओव्हरमध्ये स्वतः डिव्हीलीयर्स बॉलिंगला आला. त्याच्या अचूक ओव्हरमध्ये इलियट - अँडरसनला काहीच करता आलं नाही. दुखर्‍या गुडघ्यावर उपचार घेऊन मैदानात परतलेल्या डेल स्टाईनच्या पुढच्या ओव्हरमध्ये...

ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला बॉल इलियटने कट् केला...
अँडरसनने १ रनसाठी कॉल दिला आणि धाव घेतली...
बॅकवर्ड पॉईंटला जेपी ड्युमिनीने बॉल पिकअप केलेला पाहून इलियटने अँडरसनला परत पाठवलं...
अँडरसन परत फिरला खरा पण एव्हाना त्याला उशिर झाला होता...
एव्हाना मिडऑनवरुन डिव्हीलीयर्स नॉनस्ट्रायकर एन्डला बॉल कलेक्ट करण्यासाठी पोहोचला होता...
ड्युमिनीचा हाफव्हॉलीवर आलेला थ्रो स्टंप्सना लागला नाही...
त्याचा थ्रो कलेक्ट करण्याच्या प्रयत्नात डिव्हीलीयर्सचा हात लागून बेल्स पडल्याच पण तोल जाऊन तो स्वत:ही आडवा झाला....
बेल्स पडल्यामुळे अँडरसनला रनआऊट करण्यासाठी विकेटमधून स्टंप्स उखडणं आवश्यक होतं पण....
डिव्हीलीयर्सला नेमकं तेच जमलं नाही....
अँडरसन सुखरुप आपल्या क्रीजमध्ये परतला!

स्टाईनच्या अखेरच्या बॉलवर इलियटने चाणाक्षपणे थर्डमॅनला बाऊंड्री मारल्यावर अँडरसन - इलियट यांनी बॅटींग पॉवरप्ले घेण्याचा निर्णय घेतला. ५० ओव्हर्सच्याऐवजी मॅच ४३ ओव्हर्सची झाल्याने बॅटींग पॉवरप्ले ४ ओव्हर्सचा असणार होता. न्यूझीलंडचा हिशोब सरळ होता. बॅटींग पॉवरप्ले घेतल्यामुळे डिव्हीलीयर्सला स्टाईन, मॉर्केल आणि ताहीर यांना बॉलिंगला आणावं लागणार होतं, त्यामुळे ड्युमिनी किंवा तो स्वतः टाकत असलेल्या ५ व्या बॉलर्सच्या ओव्हर्स शेवटी शिल्लक राहणार होत्या!

मॉर्नी मॉर्केलच्या पहिल्याच बॉलवर अँडरसनने मिडऑफला बाऊंड्री तडकावली, पण मॉर्केलच्या अचूक बॉलिंगमुळे अँडरसनला आणखीन काहीच करता आलं नाही. पुढच्या ओव्हरमध्ये स्टाईननेही इलियट - अँडरसन यांना कोणतीही संधी दिली नाही पण मॉर्केलच्या पुढच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर इलियटने स्क्वेअरलेगला सिक्स ठोकली! त्याच ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर अँडरसनने कव्हर्समधून तडकावलेला बॉल जीवाच्या आकांताने प्रयत्नं करुनही डिव्हीलीयर्सला बाऊंड्री जाण्यापासून अडवता आला नाही. स्टाईनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या इमरान ताहीरला अँडरसनने कव्हरपॉईंटला बाऊंड्री फटकावल्यावर त्याच ओव्हरमध्ये इलियटने कव्हर्सवरुन बाऊंड्री तडकावण्याची संधी सोडली नाही. बॅटींग पॉवरप्लेच्या ४ ओव्हर्समध्ये इलियट - अँडरसन यांनी ३५ रन्स फटकावल्या होत्या!

अद्याप ७ ओव्हर्समध्ये न्यूझीलंडला ५५ रन्स हव्या होत्या!

बॅटींग पॉवरप्ले संपल्यावर बॉलिंगला परतलेल्या डिव्हीलीयर्सला अँडरसनने स्क्वेअरलेगला बाऊंड्री मारली, पण पुढच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलला इलियटने १ रन काढल्यावर मॉर्केलच्या अचूक बॉलिंगमुळे पुढच्या ४ बॉल्सवर अँडरसनला काही करता आलं नाही....

मॉर्केलच्या ओव्हरचा शेवटचा बॉल ऑफस्टंपवर पडलेला शॉर्टपीच बॉल होता...
अँडरसनने बॅकफूटवर जात तो मिडविकेटला पूल करण्याचा प्रयत्नं केला...
त्याच्या अपेक्षेपेक्षा किंचित वेगाने आलेल्या बॉलमुळे टॉप एज लागून बॉल उंचच उंच गेला...
स्क्वेअरलेगला फाफ ड्युप्लेसीने कॅच पकडण्यात कोणतीही कसूर केली नाही पण....
अंपायर इयन गूल्ड आणि रॉड टकर यांनी अँडरसनला थांबण्याची खूण केली...
मैदानावर तरंगत असलेल्या 'स्पायडर कॅम'च्या वायरला बॉल लागला असावा अशी त्यांना शंका आली होती!
बॉल स्पायडर कॅमच्या वायरला लागलेला असला तर तो 'डेड बॉल' ठरला असता...
....आणि बॉल डेड झाल्यामुळे अँडरसनला नॉटआऊट देण्यावाचून अंपायर्सना पर्याय उरला नसता....
अनेक रिप्ले पाहूनही रात्रीच्या अंधारात आणि ते देखिल काळ्या रंगाच्या वायरला बॉल लागला किंवा नाही हे स्पष्टं होणं अशक्यं होतं...
अखेर अँडरसन आऊट असल्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला!

५७ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री आणि २ सिक्ससह अँडरसनने ५८ रन्स फटकावल्या.
इलियटबरोबर १०३ रन्सची पार्टनरशीप करुन त्याने न्यूझीलंडचं आव्हान कायम ठेवलं होतं.
न्यूझीलंड २५२ / ५!

शेवटच्या ५ ओव्हर्समध्ये न्यूझीलंडला ४६ रन्सची आवश्यकता होती!

अँडरसन आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या ल्यूक राँचीने १-२ रन्स काढून इलियटला स्ट्राईक देण्याचा मार्ग पत्करला होता. डिव्हीलीयर्सने इलियटला बंपर टाकण्याचा वेडेपणा केला आणि इलियटने त्याला मिडविकेटवर दणदणीत सिक्स ठोकत त्याच्या चुकीचं पुरेपूर माप त्याच्या पदरात टाकलं. इमरान ताहीरच्या पुढच्या ओव्हरमध्ये राँचीने मिडविकेटला बाऊंड्री फटकावण्याची संधी सोडली नाही, पण ४१ व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर डेल स्टाईनला फटकावण्याचा राँचीचा प्रयत्नं पार फसला आणि मिडविकेट बाऊंड्रीवर राइली रुसोने त्याचा कॅच घेतला. रुसोने कॅच घेण्यापूर्वी क्रॉस झालेल्या इलियटने स्टाईनचा पुढचा बॉल कट् करत २ रन्स काढल्या पण पुढच्या बॉलवर...

स्टाईनचा बॉल लेगसाईडला फ्लिक करत इलियटने १ रन पूर्ण केली आणि दुसर्‍या रनसाठी धाव घेतली...
मिडविकेटला रुसोने बॉल पिकअप केला आणि डिकॉककडे थ्रो केला...
डिकॉकने रुसोचा थ्रो कलेक्ट करण्यापूर्वीच घाईघाईने बेल्स उडवल्या, पण बॉल त्याच्या ग्लोव्हजमध्ये आलाच नव्हता....
क्रीजपासून सुमारे दोन मीटरवर असणारा इलियट रनआऊट होण्यापासून वाचला!

स्टाईनचा शेवटचा बॉल अचूक पडलेला यॉर्कर होता...
इलियटला तो डिफेंड करण्यापलिकडे काहीच करणं शक्यं नव्हतं...
शॉर्ट मिडविकेटला असलेल्या डिव्हीलीयर्सने बॉल पिकअप केला...
डॅन द मॅन व्हिटोरी रन काढण्याच्या इराद्याने क्रीजमधून बाहेर आला होता पण...
डिव्हीलीयर्सचा थ्रो स्टंप्सवर लागला नाही!

२ ओव्हर्समध्ये न्यूझीलंडला २३ रन्स बाकी होत्या!

अराऊंड द विकेट बॉलिंग करणार्‍या मॉर्केलचा पहिला बॉल फुलटॉस होता...
व्हिटोरीने तो ड्राईव्ह केला पण शॉर्ट कव्हरला हाशिम अमलाने मारलेल्या डाईव्हमुळे त्याला १ रनवरच समाधान मानावं लागलं....

मॉर्केलचा दुसरा बॉल इलियटने लेगसाईडला फटकावण्याचा प्रयत्नं केला...
त्याच्या अपेक्षेप्रमाणे बाऊंस झालेला बॉल हवेत उंच गेला...
मिडविकेटवरुन धावत आलेल्या ड्युप्लेसीने कॅच घेण्यासाठी डाईव्ह मारली पण बॉल ड्युप्लेसी, अमला आणि मिलर यांच्या मधोमध पडला!
इलियट - व्हिटोरी यांनी चाणाक्षपणे २ रन्स काढल्या!

मॉर्केलच्या तिसर्‍या बॉलवर आलेल्या स्लो बंपरवर इलियटच्या बॅटची बॉटम एज लागून १ रन मिळाली...

मॉर्केलच्या चौथ्या बॉलवर लेगस्टंपवर आलेला बंपर व्हिटोरीने पूल केला...
लाँगलेग बाऊंड्रीवर दुखर्‍या पायाची पर्वा न करता स्टाईनने डाईव्ह मारली आणि बॉल बाऊंड्रीपार जाण्यापासून अडवला!
बाऊंड्री जाणार या अपेक्षेत असलेल्या व्हिटोरीला १ रनवर समाधान मानावं लागलं...

मॉर्केलचा पाचवा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
इलियटने शांत डोक्याने तो कव्हर्सवरुन तडकावला.... बाऊंड्री!

मॉर्केलचा शेवटचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
इलियटने मिडविकेटला पूल मारण्याचा केलेला प्रयत्नं फसला आणि त्याची टॉप एज लागून बॉल स्क्वेअरलेगला हवेत गेला...
स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर फिलँडरच्या ऐवजी फिल्डींगला आलेला फरहान बेहरादीन कॅच घेण्यासाठी धावला...
फाईनलेगवरुन ड्युमिनी कॅच घेण्यासाठी धावला...
दक्षिण आफ्रीकेच्या दुर्दैवाने दोघांपैकी कोणीही एकमेकाला कॅचसाठी कॉल दिला नाही....
दोघं एकमेकाला धडकले आणि बॉल जमिनीवर पडला....
इलियट -व्हिटोरी यांनी २ रन्स काढल्या पण कॅच घेतला जातो किंवा नाही हे पाहण्यात गुंतल्यामुळे तिसरी रन काढण्याचं त्यांना भान राहीलं नाही!
पुन्हा एकदा इलियट वाचला होता!

शेवटच्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडला १२ रन्स बाकी होत्या!

डेल स्टाईनचा पहिला बॉल चाणाक्षंपणे टाकलेला स्लो बॉल होता...
व्हिटोरीने तो फटकावण्याचा केलेला प्रयत्नं साफ फसला पण चाणाक्षं इलियटने १ बाय काढली!

५ बॉल्स - ११ रन्स!

स्टाईनचा दुसरा बॉल ऑफस्टंपवर आलेला फुलटॉस होता...
इलियटने तो कव्हर्सला फटकावला, पण त्याला १ रनवर समाधान मानावं लागलं...

एव्हाना स्टाईनच्या दुखर्‍या पायात पुन्हा कळ आली होती...
दक्षिण आफ्रीकेच्या फिजीओने मैदानात धाव घेऊन त्याच्या पायावर तात्पुरते उपचार केले...
दक्षिण आफ्रीकेच्या दृष्टीने जीवन-मरणाचा प्रश्न असल्यासारख्या या प्रसंगी स्टाईन मागे हटणं शक्यंच नव्हतं

४ बॉल्स - १० रन्स!

स्टाईनचा चौथा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर अचूक पडलेला यॉर्कर होता...
लेगसाईडला सरकलेल्या व्हिटोरीने बॅट नेमकी बॉलच्या वाटेत आडवी घालून बॉलला फक्तं दिशा दिली....
थर्डमॅनवरुन धावत आलेल्या मॉर्केलने मारलेली डाईव्ह व्यर्थ गेली.... बाऊंड्री!

३ बॉल्स - ६ रन्स!

पाचवा बॉल मिडलस्टंपवर पडलेला बंपर होता...
व्हिटोरीचा पूल करण्याचा प्रयत्नं सपशेल फसला पण इलियटने बाय काढण्यासाठी धाव घेतली होती...
क्विंटन डिकॉकचा थ्रो स्टंप्सवर लागला नाही...
डिकॉकचा थ्रो कलेक्ट करुन स्टाईनने नॉनस्ट्रायकर एन्डला केलेला थ्रोही स्टंप्सवर लागला नाही...
व्हिटोरीने क्रीजमध्ये डाईव्ह मारली!

२ बॉल्स - ५ रन्स!

स्टाईनचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला लेंग्थ बॉल होता...
इलियटने तो मिडविकेटवरुन उचलला....
बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार प्रेक्षकांत गेला... सिक्स!

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला इयन स्मिथ कमालीच्या उत्तेजीत आवाजात ओरडला,
"Elliot hits it into the grandstand and New Zealand are in World Cup Final! Grant Elliot superman!"

न्यूझीलंडने ४ विकेट्सनी मॅच जिंकली!

ग्रँट इलियट ७३ बॉल्समध्ये ७ बाऊंड्री आणि ३ सिक्ससह ८४ रन्स फटकावून नॉटआऊट राहीला!
जन्माने मूळचा दक्षिण आफ्रीकन असलेल्या इलियटने दक्षिण आफ्रीकेविरुद्धच न्यूझीलंडला फायनलमध्ये नेलं होतं!

सहा वेळा सेमीफायनलमध्ये पराभव पत्कराव्या लागलेल्या न्यूझीलंडने अखेर सातव्या खेपेस फायनलमध्ये धडक मारली होती!
दक्षिण आफ्रीकेच्या नशिबी वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा अपयश आलं होतं!

दक्षिण आफ्रीकन खेळाडूंना भावना अनावर झाल्या होत्या...

ग्रँट इलियटने सिक्स मारल्यावर डेल स्टाईन निराशेने पीचवरच कोसळला होता...इलियटनेच त्याला हात देऊन उठवलं होतं!
मॉर्नी मॉर्केलच्या डोळ्यांतून पाण्याची धार लागली होती. वेन पार्नेल त्याची समजूत घालण्याचा व्यर्थ प्रयत्नं करत होता...
डेव्हीड मिलर, राइली रुसो आणि फरहान बेहरादीन एकमेकांचं सांत्वन करण्याचा निष्फळ प्रयत्नं करत होते...
एबी डिव्हीलीयर्सलाही अश्रू आवरत नव्हते...
फाफ ड्युप्लेसी सुन्नपणे ग्राऊंडवर बसला होता. त्याला उठून उभं राहण्याचीही इच्छा राहीली नव्हती...
त्याच्या अपेक्षेप्रमाणे नॉकआऊट मॅचमध्ये न्यूझीलंडशी गाठ पडली होती, पण पुन्हा वाट्याला पराभवच आला होता!

मॅच संपल्यावर बोलताना डिव्हीलीयर्स म्हणाला,
"Amazing game of cricket! We gave it our best. No regrets. It is hurting. It is going to take a while to recover. I hope people back home can still be proud of us. I guess the best team has come out on top."

ब्रेंडन मॅक्कलम म्हणाला,
"South Africa gave as good as they got all day. Everybody involved will remember this for the rest of their lives. Keep raining is what I thought when AB was going. The way we kept giving it in the field, with the bat. We wanted to hang in till the end. Great innings from Grant. Credit to South Africa the way they played tonight!"

मॅन ऑफ द मॅच म्हणून अर्थातच ग्रँट इलियटची निवड झाली!

इलियट म्हणाला,
"It's great! We wanted to take it as deep as we could. We timed the pace of the innings to perfection. I didn't want to be there 70-odd and not winning this game. Dan said we weren't going to run to the keeper again, so it was up to me. I had two balls to try and take us. I knew that four runs would do it because a tie was as good as a win, so that was always in the back of my mind. I was looking to hit that ball for six or four. I was just going to line it up and wherever it was, it was going over the boundary, hopefully. But I think we probably left it a little bit late to be honest, and it was stressful towards the end there."

जगभरातल्या अनेक दिग्गज आजी-माजी खेळाडूंनी दोन्ही संघांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

सचिन तेंडुलकर म्हणाला,
"Its tough to see a side lose in a match like the semis. Well played South Africa. Big Congratulations to New Zealand!"

ब्रायन लारा म्हणाला,
"Well played NZ well deserved!! Cricket the true winner best game of the Cup!! Grant Elliot cool head magnificent innings!!"

शेन वॉर्न म्हणाला,
"What a game of cricket in NZ, please hold your heads high South Africa, you've done everyone proud as you gave it absolutely everything !!"

केव्हीन पीटरसन म्हणाला,
"South Africa DID NOT CHOKE! They got beaten by a better team today...AB led the team wonderfully well! But, well done NZ!"

ग्रॅहॅम स्वान म्हणाला,
"WHAT A GAME!!!! The eruption of Eden park there was spine tingling huge! Grant Elliot take a bow!"

दक्षिण आफ्रीकेच्या पराभवाचा विचार करताना त्यांच्या पराभवाला ग्रँट इलियटच्या अप्रतिम इनिंग्ज इतक्याच मोक्याच्या क्षणी फिल्डींगमध्ये झालेल्या चुकाही कारणीभूत होत्या असं म्हटल्यास फारसं वावगं ठरु नये. स्टाईनच्या ४१ व्या ओव्हरमध्ये डिकॉकच्या चुकीमुळे इलियट रनआऊट होण्यापासून वाचला. शेवटच्या ओव्हरमध्ये इलियट बाय घेत असतानाही डिकॉकचा थ्रो स्टंप्सवर लागला नाही. एबी डिव्हीलीयर्ससारख्या फिल्डरचाही थ्रो स्टंप्सवर लागला नाही. अर्थात अत्यंत टेन्शनमुळे या चुका होणं एकवेळ मान्यं केलं तरी मॉर्केलच्या ४२ व्या ओव्हरमध्ये इलियटचा कॅच फरहान बेहरादीनच्या हातात जात असताना जेपी ड्युमिनीने कोणताही कॉल न देता कॅच घेण्यासाठी त्याच्यावर धडकणं हे निव्वळ अक्षम्यं होतं!

दक्षिण आफ्रीकेच्या इनिंग्जमध्ये डिव्हीलीयर्सची फटकेबाजी सुरु असताना मोक्याच्या वेळी आलेल्या पावसामुळे न्यूझीलंडला फायदा झाला असाही एक मतप्रवाह होता. पावसामुळे मॅच ४३ ओव्हर्सचीच झाली आणि ७ ओव्हर्समध्ये डिव्हीलीयर्सने अगदी १०० रन्स फटकावण्याची शक्यता गृहीत धरली तरी तो आऊट होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. पावसानंतर खेळ सुरु झाल्यावर ड्युप्लेसी आऊट झाल्यावर डेव्हीड मिलरच्या आतषबाजीमुळे काही प्रमाणात ही कसर भरुन निघाली होती. सर्वात महत्वाचं म्हणजे पावसाची शक्यता ध्यानात घेऊनही १९९२ च्या सेमीफायनलमधल्या मध्ये केपलर वेसल्सच्या निर्णयाप्रमाणेच टॉस जिंकल्यावर डिव्हीलीयर्सने बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. पावसामुळे न्यूझीलंडला काही प्रमाणात फायदा निश्चित झाला यात शंका नाही पण केवळ पावसामुळे द्क्षिण आफ्रीकेच्या पदरी पराभव आला या दाव्याला फारसा काही अर्थ नाही.

सर्वात वादग्रस्तं मुद्दा होता तो म्हणजे काईल अ‍ॅबटच्या ऐवजी व्हर्नान फिलँडरची दक्षिण आफ्रीकन संघात झालेली निवड!

दक्षिण आफ्रीकेच्या सरकारी धोरणानुसार एका विशिष्ट प्रमाणात गौरेतर आणि कृष्णवर्णीय खेळाडूंचा क्रिकेटसह प्रत्येक खेळात समावेश अनिवार्य करण्यात आला होता. परंतु दक्षिण आफ्रीकन क्रिकेट असोसिएशनने मात्रं या सरकारी धोरणाला विरोध करत केवळ गुणवत्तेच्या आधारावरच खेळाडूंची निवड करण्याची भूमिका घेतली होती. परंतु सेमीफायनलच्या या मॅचमध्ये मात्रं अमला, ड्युमिनी आणि इमरान ताहीर असे ३ गौरेतर खेळाडू संघात असतानाही अ‍ॅबटच्या ऐवजी फिलँडरची निवड लादली गेली असं मानण्यास वाव आहे.

AB: The Autobiography या आपल्या आत्मचरित्रात खुद्दं एबी डिव्हीलीयर्सनेच याचा खुलासा केला आहे. सेमीफायनलच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता टीम मिटींग पूर्वी दक्षिण आफ्रीकन क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार्‍याने फोन करुन फिलँडर फिट असल्याची आणि अ‍ॅबटच्या ऐवजी सेमीफायनलमध्ये खेळणार असल्याची सूचना दिली होती!

डिव्हीलीयर्स म्हणतो,
"I got a call around 5.30 the night before final informing Vern is fit and will play instead of Kyle! We had been assured that Cricket South Africa was the only national governing body in the country that had declined to set a target for the number of players of colour to be included in the national team but there was a delicate balance to be struck and it was generally understood that, as they chose the side, the national selectors would be conscious of providing opportunities for at least four players of colour. So what had happened? Had Vernon, who was officially classified as coloured, been selected ahead of Kyle, who was officially white, to ensure there were four players of colour in the semi-final? Or had the decision been made for purely cricketing reasons? It depressed me to think of my team-mates in these outdated racial terms. Would anyone really mind if there were three or four players of colour in our side?"

दक्षिण आफ्रीकन क्रिकेटमध्ये सुरु झालेल्या या कोटा पद्धतीचा परिपाक दक्षिण आफ्रीकेच्या खेळाडूंवर होणं अपरिहार्य होतं. वर्ल्डकपनंतर वर्षाभरातच काईल अ‍ॅबट आणि राइली रुसो यांनी दक्षिण आफ्रीकन क्रिकेटला रामराम ठोकत आणि आपल्या आंतरराष्ट्रीय करीयरवर पाणी सोडत इंग्लिश कौंटी संघाशी कोल्पाक करार करुन इंग्लंडची वाट धरली!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

लोनली प्लॅनेट's picture

12 Mar 2017 - 3:49 pm | लोनली प्लॅनेट

माझी अत्यंत आवडती मॅच, न्यूझीलंड चा मी कायमस्वरूपी पाठराखा असल्यामुळे ( हो अगदी भारताविरुद्ध सुद्धा) सुरुवाती पासूनच प्रचंड टेन्शन आले होते या ए बी डिव्हिलियर्स ज्याप्रमाणे बॅटिंग करत होता ते सहज 350 करतील असे वाटत होते
ब्रेंडन मॅककल्लूम ने प्रचंड दडपण असताना त्यांची जी धुलाई केली त्याला तोड नाही कोरी अँडरसन ची खेळी हि विसरता येणार नाही
दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलायचे झाले तर ते जोपर्यंत कोटा पद्धत चालू ठेवतील तोपर्यंत एकही ICC स्पर्धा जिंकू शकणार नाहीत
इलियट चा कॅच डुमिनी आणि बेहर्दिन या डॉन कोटा वाल्यानीच सोडला आणि दक्षिण आफ्रिकेच्या पदरी पराभव पडला

अभिजीत अवलिया's picture

12 Mar 2017 - 7:43 pm | अभिजीत अवलिया

ह्या सामन्यानंतर रडणारे आफ्रिकेचे खेळाडू पाहून १९९६ ची श्रीलंकेविरुद्धची सेमीफायनल गमावल्यावर रडणारा विनोद कांबळी आणी मी स्वत: आठवले होते.