वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - फायनल - भारत विरुद्ध वेस्ट इंडीज

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
7 Feb 2017 - 5:16 am

२५ जून १९८३
लॉर्ड्स, लंडन

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानातच पहिल्या दोन वर्ल्डकपप्रमाणे तिसर्‍या वर्ल्डकपचीही फायनल रंगणार होती. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना फायनलमध्ये येऊन धडकलेल्या भारतीय संघाचा सामना होता तो क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीजशी. पहिल्या दोन वर्ल्डकपप्रमाणेच तिसरा वर्ल्डकप जिंकून हॅटट्रीक करण्याचा लॉईडचा निर्धार होता. त्यातच भारत फायनलला आल्यावर तर फायनलची मॅच ही केवळ एक औपचारिकता आहे आणि वेस्ट इंडीजने वर्ल्डकप जिंकल्यातच जमा आहे असं जवळपास प्रत्येकाचं मत होतं!

अर्थात वेस्ट इंडीजचा संघही तसाच होता. गॉर्डन ग्रिनिज, डेस्मंड हेन्स, व्हिव्हियन रिचर्ड्स, लॅरी गोम्स, कॅप्टन लॉईड, फाऊद बॅकस असे एकापेक्षा एक बॅट्समन वेस्ट इंडीजच्या संघात होतेच शिवाय जेफ दुजाँसारखा विकेटकीपर बॅट्समनही होता. यांच्या जोडीला होते जगभरातल्या बॅट्समनना वर्षानुवर्षे धडकी भरवणारे चार फास्ट बॉलर्स.. अँडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डींग, जोएल गार्नर आणि माल्कम मार्शल!

.... आणि लॉर्ड्सची विकेट हिरवीगार होती!

फायनलमधल्या दोन अंपायर्सपैकी एक होता डिकी बर्ड. तो म्हणतो,
"Roberts, Garner, Marshall, Holding … four of the greats in the history of the game! Just amazing! And you think looking at that battery of fast bowlers, where are you going to get runs? Where is India going to get runs?"

वेस्ट इंडीजच्या बॉलर्सच्या तुलनेत कपिल देवसह बलविंदरसिंग संधू, रॉजर बिन्नी, मदनलाल, मोहींदर अमरनाथ, किर्ती आझाद म्हणजे गल्लीतली पोरं अशीच प्रत्येकाची धारणा होती. भारतीय बॉलर्सचा भर हा मुख्यतः स्विंग आणि सीम यावर होता. इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्डच्या सेमीफायनलमध्ये याचाच परिणामकारक वापर करुन अमरनाथ - आझाद यांनी इंग्लंडची नाकेबंदी केली होती. परंतु वेस्ट इंडीजच्या बॅट्समनसमोर त्यांचा कितपत निभाव लागणार होता?

मोहींदर अमरनाथ म्हणतो,
"Kapil told us, 'We are in the finals when nobody expected us to be here. Lets go out there and enjoy ourselves No matter what, we are going to give it our hundred percent!'"

लॉईडने टॉस जिंकल्यावर फिल्डींगचा निर्णय घेतला!
लॉर्ड्सच्या हिरव्यागार विकेटवर भारतीय बॅट्समनना रॉबर्ट्स, गार्नर, होल्डींग, मार्शल यांच्या तोफखान्याला तोंड देणं आता क्रमप्राप्तं होतं!

तिसर्‍याच ओव्हरमध्ये रॉबर्ट्सच्या बॉलवर दुजाँने गावस्करचा कॅच घेतला!
भारत २ / १!

गावस्कर आऊट झाल्यावर अमरनाथ बॅटींगला आला. अमरनाथ बॅटींगला येताच होल्डींग - रॉबर्ट्स यांनी त्याच्यावर बंपर्सचा मारा केला, पण अमरनाथ बधला नाही. दुसर्‍या बाजूला श्रीकांतने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली!

श्रीकांत म्हणतो,
"Joel Garner was unplayable that day. Once I got of the mark, I decided I am going to go for it. If they are going to bounce at me, I am going for pool or hook."

अँडी रॉबर्ट्सने बंपर टाकताच श्रीकांतने त्याला हूकची बाऊंड्री तडकावली!

गावस्कर म्हणतो,
"We all knew Roberts had two different bouncers. One that you can score off, but the other quicker one was unplayable. We suspected he was setting up Srikanth for the quicker one."

गावस्करच्या अंदाजाप्रमाणे रॉबर्ट्सचा पुढचा बंपर पहिल्यापेक्षा वेगात आला..
श्रीकांतला कसलीच पर्वा नव्हती. त्याने बिनदिक्कतपणे पुन्हा हूक केला..
यावेळी बॉल स्क्वेअरलेग बाऊंड्रीपार गेला!

पुढच्याच ओव्हरमध्ये श्रीकांतने रॉबर्ट्सला स्क्वेअरकटची बाऊंड्री मारली. रॉबर्ट्सच्या जागी बॉलिंगला आलेल्या होल्डींगला तर त्याने होल्डींगच्या डोक्यावरुन स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली! श्रीकांतच्या पावलावर पाऊल टाकत अमरनाथने मार्शलच्या बंपरवर हूकची बाऊंड्री वसूल केली. या दोघांनी ५७ रन्सची पार्टनरशीप केल्यावर मार्शलला अ‍ॅक्रॉस द लाईन फटकावण्याच्या नादात श्रीकांत एलबीडब्ल्यू झाला. ५७ बॉल्समध्ये ७ बाऊंड्री आणि रॉबर्ट्सला मारलेल्या सिक्सच्या जोरावर श्रीकांतने ३८ रन्स फटकावल्या. भारत ५९ / २!

श्रीकांत परतल्यावर अमरनाथ आणि यशपाल शर्मा यांनी सावध पवित्रा घेत फास्ट बॉलर्सना खेळून काढण्याचं धोरण अवलंबलं. या दोघांनी भारताचा स्कोर ९० पर्यंत नेल्यावर होल्डींगने इनस्विंगरवर अमरनाथचा ऑफस्टंप उडवला. ८० बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह अमरनाथने २६ रन्स केल्या. आणखीन जेमतेम २ रन्सची भर पडते तोच लॅरी गोम्सला फटकावण्याच्या नादात पॉईंट बाऊंड्रीवर रॉबर्ट्सच्या जागी फिल्डींगला आलेल्या गस लोगीने यशपालचा कॅच घेतला. भारत ९२ / ४!

रॉबर्ट्स - गार्नर - होल्डींग - मार्शल यांच्याव्यतिरिक्त उरलेल्या १२ ओव्हर्ससाठी लॅरी गोम्स आणि रिचर्ड्स यांच्या पार्टटाईम बॉलिंगचा वापर करण्यापलिकडे लॉईडसमोर दुसरा पर्याय नव्हता. कपिल आणि संदीप पाटील यांनी रिचर्ड्स - गोम्स यांच्या बॉलिंगचा फायदा उठवण्याच्या दृष्टीने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. पण ८ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह १५ रन्स फटकावल्यावर गोम्सला सिक्स मारण्याच्या नादात कपिल लाँगऑन बाऊंड्रीवर मायकेल होल्डींगच्या हातात सापडला. कपिल आऊट झाल्यावर आलेल्या किर्ती आझादचा रॉबर्ट्सचा बंपर हूक करण्याचा प्रयत्नं पार फसला आणि स्क्वेअरलेगला गार्नरने आरामात त्याचा कॅच घेतला. भारत १११ / ६!

रॉजर बिन्नीने फटकेबाजीच्या मोहात न पडता संदीप पाटीलला साथ देण्याचं धोरण पत्करलं होतं. संदीपने लॅरी गोम्सला मिडविकेटवरुन दणदणीत सिक्स ठोकली. या दोघांनी भारताचा स्कोर १३० पर्यंत नेल्यावर रॉबर्ट्सचा बॉल फ्लिक करण्याच्या नादात मिडविकेटला गार्नरने बिन्नीचा कॅच घेतला. बिन्नी परतल्यावर आलेल्या मदनलालने संदीपला सपोर्ट देत भारताची इनिंग्ज सावरण्याचा प्रयत्नं केला. संदीपप्रमाणेच गोम्सच्या शॉर्टपीच बॉलवर मदनलालने मिडविकेटवरुन सिक्स तडकावली. या दोघांनी २३ रन्सची पार्टनरशीप केल्यावर गार्नरला पूल मारण्याच्या प्रयत्नात मिडऑनवर गोम्सने संदीपचा कॅच घेतला. २९ बॉल्समध्ये गोम्सला मारलेल्या सिक्ससह संदीपने २७ रन्स फटकावल्या. भारत १५३ / ८!

कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेला रिची बेनॉ म्हणाला,
"India 153 for 8 and it looks to me that they are about to commit greatest sin in limited overs cricket to be bowled out in fewer than available 60 overs."

संंदीप पाटील आऊट झाल्यावर भारताची इनिंग्ज गुंडाळण्याच्या दृष्टीने लॉईडने गार्नरच्या जोडीला मार्शलला बॉलिंगला आणलं. मदनलाल आणि किरमाणी यांनी सावध पवित्रा घेत ८ रन्स जोडल्यावर मार्शलने मदनलालची दांडी उडवली. भारत १६१ / ९!

किरमाणीच्या जोडीला भारताचा शेवटचा बॅट्समन आला बलविंदरसिंग संधू!

संधू म्हणतो,
"When I went into bat, we had about 14 odd overs. I told Kiri, we have to stick around as long as possible. You don’t get out, they can’t get me!"

किरमाणी आणि संधू यांनी सावध पवित्रा घेत ६० ओव्हर्स खेळून काढण्याचं धोरण पत्करलं. यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात होल्डींगने हाफव्हॉली टाकताच संधूने त्याला कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली! हे दोघं दाद देत नाहीत हे पाहून वैतागलेल्या मार्शलने संधूला बंपर टाकला...

अचूक टप्प्यावर पडलेला मार्शलचा बंपर संधूच्या हेल्मेटवर आदळला..
विकेटकीपर जेफ दुजाँने संधूकडे धाव घेऊन त्याची चौकशी केली पण संधूच्या चेहर्‍यावर वेदनेचं चिन्हंही नव्हतं.
पुढचा बॉल खेळण्यास तो लगेच तयार झाला!

संधू म्हणतो,
"When I got hit on helmet by Marshall, Dujon came and said ‘Are you ok?’ I simply said ‘fine, ok!’ and took my stance to face next ball quickly. I didn’t want to show that you can get me out and you can’t scare me out!"

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला माईक ब्रिअर्ली म्हणाला,
"If you bowl a bouncer at number 11, I can’t think its a right way to play game of cricket."

मार्शलचा पुढचाच बॉल मिडऑनला फटकावत संधूने ३ रन्स वसूल केल्या! अखेर होल्डींगने किरमाणीला बोल्ड करुन भारताची इनिंग्ज संपुष्टात आणली तेव्हा संधू - किरमाणी यांनी शेवटच्या विकेटसाठी २२ रन्सची पार्टनरशीप केली होती!

रॉबर्ट्सने ३ तर मार्शल, होल्डींग, गोम्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स काढल्या होत्या!
५५ व्या ओव्हरमध्ये १८३ रन्समध्ये भारताची इनिंग्ज आटपली होती!
वर्ल्डकपच्या फायनलमधला तोपर्यंतचा हा सर्वात कमी स्कोर होता!

वर्ल्डकपची हॅटट्रीक साधण्यासाठी वेस्ट इंडीजला १८४ रन्सचं टार्गेट होतं.

मायकेल होल्डींग म्हणतो,
"When we were walking off, I was very happy with what we had done, 183 runs in 60 overs. There was no way India could restrict us less than 183 runs. 3 world cups, 3 winners!”

वेस्ट इंडीजसारख्या बॅटींग लाईनअपला १८४ रन्सचं टार्गेट अगदीच सहजसाध्यं होतं. लॉर्ड्सवर हजर असलेले भारतीय प्रेक्षकच काय, भारतीय खेळाडूही कमालीचे निराश झालेले होते. अपवाद फक्तं कपिलचा! कोणत्याही परिस्थितीत हार मान्यं करणं हे कपिलला मंजूर नव्हतं.

फिल्डींगला जाण्यापूर्वी कपिल म्हणाला,
"We have made 183, they have got to make them."

ग्रिनिज आणि हेन्स बॅटींगला आले तेव्हा दोघांच्याही चेहर्‍यावर दिलखुलास हास्यं पसरलेलं होतं! १८४ रन्सचं टार्गेट आणि ते देखिल भारताच्या बॉलिंगपुढे म्हणजे त्यांच्या दृष्टीने पोरखेळच होता. कपिलची पहिली ओव्हर ग्रिनिजने खेळून काढल्यावर हेन्सने संधूला बाऊंड्री तडकावली. चौथ्या ओव्हरमध्ये...

संधूचा ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला बॉल ग्रिनिजने सोडून दिला...
स्टंपपासून सुरक्षित अंतरावरुन बॉल किरमाणीच्या ग्लोव्हजमध्ये जाईल अशी ग्रिनिजला अपेक्षा होती, पण...
ग्रिनिजचा अंदाज साफ चुकला!
ऑफस्टंपच्या जवळपास फूटभर बाहेर पडलेला इनस्विंगर ऑफस्टंपला लागून बेल उडवून गेला!
वेस्ट इंडीज ५ / १!

ग्रिनिज आऊट झाल्यावर बॅटींगला आला व्हिव्हियन रिचर्ड्स!

संदीप पाटील म्हणतो,
"The swagger look on his face, the brutal power and the arrogance he shows.. we thought fine, this is all over now! May be next 10 overs!"

रिचर्ड्सने सुरवातीपासूनच भारतीय बॉलर्सची धुलाई करण्यास सुरवात केली. संधू, बिन्नी, मदनलाल आणि कपिल सर्वांनाच त्याने आपल्या बॅटचा प्रसाद दिला. रिचर्ड्सची फटकेबाजी सुरु असताना लॉर्ड्सवर असलेले वेस्ट इंडीजचे प्रेक्षक आनंदोत्सवात मग्नं होते. प्रेक्षकच काय पण भारतीय खेळाडू आणि पॅव्हेलियनमध्ये हजर असलेल्या त्यांच्या बायकांनीही आशा सोडली होती!

संदीप पाटील म्हणतो,
"I was fielding at the third man in front of the pavilion. Sunil’s wife Marshneil told me to pass on the message to Sunil to meet her at Wood Green Station after 2 hours!"

रिचर्ड्सची आतषबाजी सुरु असताना हात धुवून घेण्याच्या प्रयत्नात हेन्सने मदनलाललाचा बॉल कव्हर्समध्ये रॉजर बिन्नीच्या हातात ड्राईव्ह केला. हेन्स आऊट झाल्यावर रिचर्ड्सच्या जोडीला लॉईड बॅटींगला आल्यावर तर भारताच्या सपोर्टर्सचे चेहरे अधिकच काळवंडले. आधीच रिचर्ड्सने बॉलर्सना धारेवर धरलं होतं, त्यात लॉईड आल्यावर दोघं भारतीय बॉलर्सची धुलाई करणार यात कोणालाच शंका नव्हती. पण पहिलीच रन काढताना त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला! आऊट होऊन ड्रेसिंगरुममध्ये परतलेला हेन्स पॅड्स सोडण्यापूर्वीच लॉईडचा रनर म्हणून मैदानात परतला.

लॉईडला झालेल्या दुखापतीचा रिचर्ड्सवर काहीच परिणाम झाला नाही. मदनलालला त्याने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री ठोकली!
मदनलालने पुढचा बॉल बंपर टाकला!
लिली, थॉमसन, विलीस, बोथम, इमरान यांच्यासारख्या बॉलर्सना फटकावणार्‍या रिचर्ड्सला मदनलालने आपल्याला बंपर टाकावा हे कसं सहन होणार?
रिचर्ड्सने टिपीकल कॅरेबियन स्टाईलने मिडविकेट बाऊंड्रीपार तडकावण्याच्या इराद्याने बॉल पूल केला...
पण मदनलालचा बॉल रिचर्ड्सच्या बॅटवर न आल्याने तो टॉपएज झाला आणि मिडविकेट बाऊंड्रीच्या दिशेने हवेत गेला...
जवळपास प्रत्येकाची नजर मिडविकेट बाऊंड्रीकडे लागलेली होती...
रिचर्ड्सने हेन्सला दुसर्‍या रनसाठी कॉल दिला...

....आणि मिडऑन वरुन बॉलवरची नजर क्षणभरही न हटवता २५ यार्ड धावत आलेल्या कपिलने कॅच घेतला!
मिडविकेट बाऊंड्रीपासून जेमतेम १५ यार्डांवर!

२८ बॉल्समध्ये ७ बाऊंड्री तडकावत ३३ रन्स फटकावल्यावर रिचर्ड्स आऊट झाला.
वेस्ट इंडीज ५७ / ३!

श्रीकांत म्हणतो
"Kapil’s catch of Richards brought us back in the game. Once he was out, we thought may be… may be we can put pressure on West Indies!"

मदनलाल म्हणतो,
"Its recorded in scorebook as wicket to me, but it was Kapil’s wicket! No one else could have taken that catch!"

रिचर्ड्स आऊट झाल्यावर आणि लॉईडचा पाय दुखावला असल्याने कपिलने आक्रमक पवित्रा घेत गावस्करला स्लिपमध्ये पाठवलं. कपिलची ही चाल अचूक ठरली. मदनलालचा बॉल कट् करण्याच्या नादात गोम्सची एज लागली आणि गावस्करने त्याचा कॅच घेतला. वेस्ट इंडीज ६६ / ४!

गोम्स परतल्यावर बॅटींगला आलेला फाऊद बॅकस हा वेस्ट इंडीजचा शेवटचा बॅट्समन होता. त्याच्यापाठी फक्तं जेफ दुजाँ आणि बॉलर्स होते. त्यातच लॉईड दुखापतग्रस्तं! भारताविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये हार पत्करावी लागल्यावर वेस्ट इंडीजचा संघ प्रथमच अशा दडपणाखाली येत होता. लॉईडच्या दृष्टीने यावर एकच उपाय होता तो म्हणजे भारतावर प्रतिहल्ला चढवणं!

नेमका हाच पवित्रा घातक ठरला!

रॉजर बिन्नीचा बॉल लॉईडने एक्स्ट्राकव्हरला असलेल्या कपिलच्या हातात ड्राईव्ह केला.
वेस्ट इंडीज ६६ / ५!

संदीप पाटील म्हणतो,
"When Lloyd was out, first time since morning we thought we can go all the way and win it!"

लॉईड आऊट झाल्यावर कपिलने अधिकच आक्रमक पवित्रा घेतला. गावस्करच्या जोडीला अमरनाथची दुसर्‍या स्लिपमध्ये रवानगी झाली तर श्रीकांतची फॉरवर्ड शॉर्टलेगला! बॅकस आणि जेफ दुजाँ यांनी सावधपणे मदनलाल - बिन्नी यांना खेळून काढण्याचं धोरण पत्करलं. बॅकवर्ड पॉईंटवरुन श्रीकांतच्या अचूक थ्रो नंतरही दुजाँ रनआऊट होण्यापासून थोडक्यात वाचला. कपिलने मदनलालच्या जागी संधूला बॉलिंगला आणलं आणि ही चाल परिणामकारक ठरली. सुरवातीला इनस्विंगरवर ग्रिनिजची दांडी उडवणार्‍या संधूचा ऑफस्टंपच्या काहीसा बाहेर पडलेला आऊटस्विंगरवर ड्राईव्ह करण्याचा बॅकसचा प्रयत्नं फसला आणि पहिल्या स्लिपमध्ये असलेल्या गावस्करसमोर डाईव्ह मारत किरमाणीने त्याचा अफलातून कॅच घेतला. वेस्ट इंडीज ७६ / ६!

सर्व प्रमुख बॅट्समन परतल्यावर दुजाँ आणि माल्कम मार्शल यांनी थंड डोक्याने भारतीय बॉलिंगचा मुकाबला करण्यास सुरवात केली. दुजाँने संधूला मारलेल्या हूकच्या सिक्सचा अपवाद वगळता १-२ रन्स काढण्यावरच दोघांनी भर दिला होता. संधू - मदनलाल - बिन्नी यांना हे दोघं सहजपणे खेळत असलेले पाहून कपिलने किर्ती आझादच्या ऑफस्पिनचा प्रयोग करुन पाहिला, परंतु त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. दुजाँ - मार्शल यांनी सावधपणे खेळत ४३ रन्सची पार्टनरशीप केली. हे दोघं धोकादायक ठरणार अशी चिन्हं दिसत असतानाच...

मोहींदर अमरनाथचा ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला बॉल दुजाँच्या अपेक्षेपेक्षा किंचित जास्तं बाऊंस झाला...
फ्रंटफूटवर असलेल्या दुजाँने शेवटच्या क्षणी बॉल सोडून देण्याच्या इराद्याने बॅट वर करण्याचा प्रयत्नं केला पण..
बॅटची इनसाईड एज लागून बॉल लेगस्टंपवर गेला!

७३ बॉल्समध्ये संधूला मारलेल्या सिक्ससह २५ रन्स करुन दुजाँ आऊट झाला.
वेस्ट इंडीज ११९ / ७!

त्याच ओव्हरमध्ये आणखीन दोन बॉल्सनंतर अमरनाथच्या बॉलवर रॉबर्ट्सच्या बॅटला चाटून स्लिपमध्ये असलेल्या गावस्करच्या बराच पुढे टप्पा पडून बॉल थर्डमॅनच्या दिशेने गेला. पण अमरनाथच्या पुढच्याच ओव्हरमध्ये ड्राईव्ह करण्याच्या नादात मार्शलची एज लागली आणि गावस्करने त्याचा कॅच घेण्यात कोणतीही कसूर केली नाही. आणखीन २ रन्सची भर पडते तोच वेस्ट इंडीजची इनिंग्ज गुंडाळण्याच्या इराद्याने बॉलिंगला आलेल्या कपिलने अँडी रॉबर्ट्सला एलबीडब्ल्यू केलं. वेस्ट इंडीज १२६ / ९!

जोएल गार्नरच्या जोडीला आला वेस्ट इंडीजचा शेवटचा बॅट्समन मायकेल होल्डींग!

होल्डींग म्हणतो,
"At no point in my mind I thought we are going to loose that match. Even as I was walking out as last man, I was thinking, we are gonna get these runs. Nothing is wrong with this pitch. The bowling is not that dynamic. We will get these runs."

गार्नर आणि होल्डींग यांनी कोणतीही रिस्क न घेता ७ ओव्हर्स खेळून काढत १४ रन्स काढल्यावर...

अमरनाथचा बॉल अ‍ॅक्रॉस द लाईन खेळण्याच्या होल्डींगचा प्रयत्नं फसला आणि बॉल त्याच्या पॅडवर आदळला...
अमरनाथ अपिल करत असतानाच डिकी बर्डचं बोट वर झालं होतं!
वेस्ट इंडीजची शेवटची विकेट उडाली..
होल्डींग एलबीडब्ल्यू झाला होता!
वर्ल्डकप फायनलमध्ये आतापर्यंत सर्वात कमी - १८४ रन्सचं टार्गेट असतानाही वेस्ट इंडीजची इनिंग्ज १४३ मध्ये आटपली!

भारताने वर्ल्डकप जिंकला!

लॉर्डसवर हजर असलेले भारतीय प्रेक्षक चहूबाजूंनी मैदानात धावून आले!
त्यांच्या गर्दीतून सुटका करुन घेत ड्रेसिंगरुममध्ये पोहोचेपर्यंत खेळाडूंची चांगलीच दमछाक झाली!
'बिग बर्ड' जोएल गार्नरने मॅच संपताक्षणीच एक स्टंप उचलला होता, पण ड्रेसिंगरुममध्ये येण्यापूर्वी कोणीतरी तो स्टंप हिसकावला होता!

संधू म्हणतो,
"The moment the last wicket fell I ran in from long off to collect a stump as a souvenir. By the time I had reached there the crowd had taken over and I was engulfed in the huge mass of people. Funnily, all of them were trying to take away the stump from me! I managed to retain it, though, and return to the pavilion safely. Only Roger Binny, Madan Lal and me have stumps from the final!"

लॉर्ड्सच्या बाल्कनीत भारतीय खेळाडूंच्या सेलिब्रेशनला उधाण आलं होतं..
वेस्ट इंडीजसारख्या संघाला फायनलमध्ये मात देऊन मिळवलेल्या विजयाचं!
लॉर्ड्सवर हजर असलेले यच्चयावत भारतीय प्रेक्षक खेळाडूंचा जयजयकार करत होते.

प्रिन्स फिलीपने वर्ल्ड कप कपिलच्या हातात दिल्यावर भारतीय प्रेक्षकांनी मैदान दणाणून सोडलं!

भूतपूर्व इंग्लिश कॅप्टन माईक ब्रिअर्लीने मोहींदर अमरनाथची मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड केली.
अमरनाथच मॅन ऑफ द सिरीज ठरला!

डिकी बर्ड म्हणतो,
"Kapil Dev captained the side brilliantly on that day. And little seam bowlers from India bowled magnificently."

डेव्हीड गावर म्हणतो,
"On that particular day there was little bit of swing, little bit of movement, just enough for the Indian bowlers. I just think West Indies in a sense were ambushed, and didn’t realize before it was too late that they were in trouble!"

वर्ल्डकपला सुरवात होण्यापूर्वी वेस्ट इंडीजच तिसर्‍यांदा वर्ल्डकप जिंकेल असाच बहुतेकांचा अंदाज होता. इंग्लंड आणि पाकिस्तान हे दोनच संघ वेस्ट इंडीजला आव्हान देऊ शकतील अशी शक्यता व्यक्तं करण्यात आली होती. पहिल्या दोन वर्ल्डकपमध्ये मिळून एक मॅच जिंकलेला भारतीय संघ कोणाच्या खिजगणतीतही नव्हता! केवळ एकच माणूस असा होता जो भारताला निकालात काढण्यास तयार नव्हता.

किम ह्यूज!

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन असलेला ह्यूज वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता,
"West Indies are obviously the contenders, but according to me, India is the dark horse!"

इंग्लिश पत्रकारांनी याची 'Day dreaming' अशी संभावना केली.
पण भारताने वर्ल्डकप जिंकल्यावर किम ह्यूज द्रष्टा ठरला!

विस्डेन क्रिकेट मंथली या मासिकाचा संस्थापक संपादक डेव्हीड फ्रिथ याने वर्ल्डकपला सुरवात होण्यापूर्वी लिहीलेल्या लेखात भारतासारख्या संघाला वर्ल्डकपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भाग घेणास मनाई करण्यात यावी असं प्रतिपादन केलं होतं. पुढल्या वर्ल्डकपमध्ये भारताला पात्रता फेरीत खेळण्याची सक्ती करण्यात यावी असेही त्याने तारे तोडले होते! एवढं लिहूनच फ्रिथ थांबला नाही तर भारताने वर्ल्डकप जिंकला तर मासिकात लिहीलेला माझा लेख मी खाऊन दाखवेन असंही त्याने जाहीर केलं!

"If India wins the World Cup, I will eat my words!"

भारताने वर्ल्डकप जिंकल्यावर न्यूजर्सीला राहणार्‍या मानसिंग पानवार याने डेव्हीड फ्रीथला पत्रं लिहून त्याच्या या वक्तव्याची आठवण करुन दिली! इतकंच नव्हे तर फ्रिथने स्वतःचा लेख वाईन किंवा पाण्याबरोबर गिळण्याचीही त्याने फ्रिथला 'सवलत' दिली!

फ्रीथने काय करावं?

विस्डेन क्रिकेट मंथलीच्या सप्टेंबरच्या अंकात मानसिंग पानवारचं हे पत्रं प्रसिद्ध झालं.
लेखासोबत डेव्हीड फ्रीथचा फोटो होता!
स्वतःचा लेख वाईनच्या घोटाबरोबर गिळत असलेला!

Frith

कपिल आणि कंपनीने डेव्हीड फ्रीथचे शब्दं खरोखरच त्याच्या घशात घातले होते!

१९८३ मधल्या वर्ल्डकप विजयानंतर भारतीय खेळाडूंनी टेस्ट क्रिकेटच्या जोडीलाच वन डे वरही जास्तीत जास्तं भर देण्यास सुरवात केली. या विजयामुळे क्रिकेट भारतातल्या मोठ्या शहरांपुरतं मर्यादीत न राहता गावागावांत पोहोचलं.

मुंबईतल्या जॉन मॅकेन्रोचा फॅन असलेल्या १० वर्षांच्या एका मुलावर या वर्ल्डकप विजयाचा फार मोठा परिणाम झाला. एक दिवस वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्नं घेऊनच टेनिस बाजूला सारत त्याने क्रिकेटवर आपलं लक्षं केंद्रीत केलं. नेमका असाच परिणाम बँगलोरच्याही एका मुलावर झाला होता. पुढे कित्येक वर्ष या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं!

सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

7 Feb 2017 - 8:15 am | अत्रुप्त आत्मा

रोमांतक.. थरारक... जब्बरदस्त!

योगी९००'s picture

7 Feb 2017 - 8:28 am | योगी९००

खूप छान...!! मस्त लिहीलेयं.

मी साधारण पणे चवथीत होतो तेव्हा ही मॅच रेडीओवर ऐकली होती. कोल्हापूरला आम्ही शेजारी-पाजारी मिळून ही मॅच ऐकली होती. भारताची बॅटींग झाल्यावर सगळ्यांनी आशा सोडली होती पण फक्त मी भारत जिंकेल म्हणून सगळ्यांना थांबायला लावून मॅच ऐकायला लावली होती. नंतर माझा खूपच सत्कार झाला होता. (इतका की शेजारच्या काकांनी माझ्यासाठी शर्ट भेट म्हणून दिला...)

ह्या मॅचच्या नंतर साधारण सहा महीन्यांनी हाच वेस्ट इंडीजचा संघ कोल्हापुरात आला होता. (पश्चिम विभाग विरूद्ध वेस्ट इंडीज अशी तीन दिवसीय मॅच होती). माझ्या आयूष्यातली मैदानातली एकमेव पाहीलेली मॅच होती. गॉर्डन ग्रिनिज, डेस्मंड हेन्स, व्हिव्हियन रिचर्ड्स, लॅरी गोम्स आणि रिची रिचर्डसन यांना ह्याच डोळ्याने खेळताना पाहण्याचे भाग्य मला मिळाले होते. (आपल्या प. विभागाच्या संघात गुलाम परकार, बलबिंदर संधू, रेन्डॉल डॅनियल असे वीर होते त्यांचाही खेळ पहाण्यास मिळाला...). तुमच्या ह्या लेखामुळे ह्या आठवणी जाग्या झाल्या.

अभिजीत अवलिया's picture

7 Feb 2017 - 8:37 am | अभिजीत अवलिया

मस्त लिहिता तुम्ही.

बबन ताम्बे's picture

7 Feb 2017 - 11:35 am | बबन ताम्बे

पुनःप्रत्ययाचा आनंद. पिंपरीतल्या अण्णासाहेब मगर स्टेडीअमवर त्यावेळी सार्वजनीक ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट टी व्ही होता. आम्ही त्या रात्री ही संपुर्ण मॅच बघीतली होती.

चौकटराजा's picture

7 Feb 2017 - 11:50 am | चौकटराजा

१९८३ च्या सुमारास जे अगदी वेल टू डू असे लोक्स होते त्यांच्याकडे कृष्ण धवल टी व्ही असे. माझ्या सुदैवाने एका नातेवाईकाकडे तो होता. माझ्या आठवणीत तो एक अचाट दिवस होता. आता कबूल करायला हरकत नाही. अगदी ९ बळी गेले तरी विंडीज हा सामनाच जिंकणार असे मला वाटत होते. संधूचा इन्स्विंग व कपिलचा झेल हे यातील अजरामर असे दोन प्रसंग आहेत. क्रिकेट हा स्टार्सचा खेळ नवे तर तो सांघिक सहकार्याचा खेळ आहे हे या विजयाने अधोरेखित केले. तरीही भारतातील कित्येक जण हा विजय खोटा असे असे मानत होते. त्यातही मी ही एक होतो . पुढे आमची जिरली यात शंका नाही.

फेदरवेट साहेब's picture

7 Feb 2017 - 12:11 pm | फेदरवेट साहेब

अंगभर सरसरून काटा आला, फिर्थच्या बैलाला बो बो बो बो बो

(होलिकोत्सवाच्या अग्रीम शुभेच्छा)

(क्रिकेटग्रस्त) फेदूदा

बापू नारू's picture

7 Feb 2017 - 12:24 pm | बापू नारू

लय भारी वर्णन ,फायनल बघितल्यासारखं वाटलं

गॅरी ट्रुमन's picture

7 Feb 2017 - 2:49 pm | गॅरी ट्रुमन

एकदम जबराट. मिपाचे क्रिकेटसम्राट स्पार्टाकसच.

या फायनलविषयी वाचलेली एक गोष्ट आठवते. भारताने इंग्लंडला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि फायनल दोन दिवसांनी होती. त्यावेळी माल्कम मार्शलने लंडनमध्ये गाडी बुक केली होती आणि म्हटले होते-- वर्ल्डकप जिंकल्यावर गाडी घेऊन जातो. आणि अर्थातच नंतर तो गाडी घ्यायला गेला नाही!! ही गोष्ट खरी आहे की नाही माहित नाही पण वाचलेली आहे हे आठवते.

नितिन थत्ते's picture

7 Feb 2017 - 3:08 pm | नितिन थत्ते

भारत फायनल खेळणार म्हणजे इंग्लंडला फायनल खेळण्याचा मुक्त परवाना असे इंग्लंडचे पत्रकार सेमीफायनलपूर्वी बोलले होते.

स्पार्टाकस's picture

7 Feb 2017 - 8:03 pm | स्पार्टाकस

हो! मार्शल तेव्हा हँपशायरकडून कौंटी क्रिकेट खेळत असे. वर्ल्डकप जिंकल्यावर नविन गाडीत बसून हँपशायरला जायचा त्याचा बेत होता, पण भारताने त्यावर पाणी फेरल्यावर तो गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी गेलाच नाही!

गामा पैलवान's picture

7 Feb 2017 - 7:58 pm | गामा पैलवान

स्पार्टाकस,

सुंदर लिहिता हो तुम्ही.

सगळ्यांनी एव्हढ्या रंजक आठवणी सांगितल्यावर मी एक पोपट आठवण सांगतो. जेव्हा रिचर्ड्स खेळंत होता त्यावेळेस दूरदर्शनवर बाते फिल्मोकी हा कार्यक्रम चालू होता. कोणीतरी कुणाचेतरी कान उपटले आणि मग म्याच दाखवायला सुरुवात झाली. ती अखेरपर्यंत. 'मायकेल होल्डिंग इज आऊट! अँड इंडिया इस द वर्ल्ड चँपियन!!' हे उद्गार आजही कानांत घुमतात.

सामना संपल्यावर वे.इं.चा कोणीतरी खेळाडू विकेटवर पडून रडंत होता. तो मार्शल होता असं दुसऱ्या दिवशी लोकसत्तेत छापून आलं होतं. तेव्हा त्यात मोठ्ठी आकाशओळ (हेडलाईन) आलेली : भारतीय विक्रमाने जिंकलेला विश्वचषक. सोबत कपिलचं अर्कचित्र छापलेलं होतं.

आ.न.,
-गा.पै.

स्पार्टाकस's picture

7 Feb 2017 - 8:01 pm | स्पार्टाकस

धन्यवाद गापै!

भारताने मॅच जिंकल्यावर विकेटवर पडून रडणारा मार्शल नव्हता. तो एक वेस्ट इंडीजचा सपोर्टर प्रेक्षक होता.