वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
11 Mar 2017 - 10:10 am

७ मार्च २०१५
बेलरीव्ह ओव्हल, होबार्ट

ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया बेटावरच्या होबार्टमधल्या बेलरीव्ह ओव्हलवर पूल बी मधली आयर्लंड आणि झिंबाब्वे यांच्यातली मॅच होणार होती. क्वार्टरफायनलमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मॅच अत्यंत महत्वाची होती. आयर्लंडने वेस्ट इंडीज आणि संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध विजय मिळवला असला तरी दक्षिण आफ्रीकेविरुद्धं त्यांना तब्बल २०० रन्सनी पराभव पत्करावा लागला होता. झिंबाब्वेने संयुक्त अरब अमिरातीविरुद्धची मॅच जिंकली असली तरी दक्षिण आफ्रीका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानने त्यांना धूळ चारली होती. आयर्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव पत्करावा लागल्यास झिंबाब्वेचा वर्ल्डकप ग्रूपमध्येच संपुष्टात येणार होता.

विल्यम पोर्टरफिल्डच्या आयरीश संघात स्वतः पोर्टरफिल्ड, पॉल स्टर्लींग, एड जॉईस, अँडी बॅलबर्नी, नियाल ओब्रायन, गॅरी विल्सन असे बॅट्समन होते. २०११ च्या वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या नियाल ओब्रायन आणि गॅरी विल्सन यांच्यात विकेटकिपींगच्या जबाबदारीची अदलाबदल झाली होती. नियाल ओब्रायनच्या ऐवजी या वर्ल्डकपमध्ये विकेटकिपींगची जबाबदारी विल्सनवर आली होती. आयर्लंडच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने अँड्र्यू मॅकब्रायन आणि जॉर्ज डॉकरेल यांच्यावर होता. आयरीश संघाचं वैशिष्ट्यं म्हणजे या संघात असलेले ऑलराऊंडर्स! २०११ च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या विजयाचे प्रमुख शिल्पकार असलेले केव्हीन ओब्रायन, अ‍ॅलेक्स क्युसॅक आणि जॉन मूनी हे तिघं ऑलराऊंडर्स आयरीश संघात होते!

झिंबाब्वेचा कॅप्टन एल्टन चिगुम्बुरा जखमी असल्याने या मॅचमध्ये खेळू शकत नव्हता. त्याच्याऐवजी ब्रेंडन टेलरवर कॅप्टन आणि विकेटकीपर अशी दुहेरी जबाबदारी आली होती. टेलरच्या संघात स्वतः टेलर, चामू चिभाभा, सिकंदर रझा, सॉलोमन मायर, हॅमिल्टन मॅसाकाड्झा, रेगिस चकब्वा, क्रेग अर्विन असे बॅट्समन होते. झिंबाब्वेच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने तेंडई चतारा आणि तिनशे पानयांगारा यांच्यावर होता. त्यांच्या जोडीला तवांडा मूपरीवा होता. सीन विल्यमसारखा ऑलराऊंडरही झिंबाब्वेच्या संघात होता. स्वतः टेलरनेच विकेटकिपींगची जबाबदारी घेतलेली असल्याने झिंबाब्वेला एक्स्ट्रा बॅट्समन किंवा बॉलर खेळवणं शक्यं झालं होतं. तसंच आवश्यकता भासल्यास मॅसाकाड्झा आणि सिकंदर रझा हे दोघं बॉलिंग करु शकत होते.

ब्रेंडन टेलरने टॉस जिंकल्यावर फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. तिनशे पानयांगाराच्या पहिल्याच ओव्हरमध्ये पॉल स्टर्लींगने मिडविकेट आणि स्क्वेअरलेगला २ बाऊंड्री फटकावल्या. पण पानयांगाराच्या पुढच्या ओव्हरमध्ये स्टर्लींगचा कट् मारण्याचा प्रयत्नं सपशेल फसला आणि बॅकवर्ड पॉईंटला सीन विल्यमसने हवेत जंप मारत त्याचा कॅच घेतला. आयर्लंड १६ / १!

स्टर्लींग आऊट झाल्यावर बॅटींगला आलेला एड जॉईस आणि कॅप्टन विल्यम पोर्टरफिल्ड यांनी कोणतीही रिस्क न घेता झिंबाब्वेच्या बॉलर्सना खेळून काढण्यास सुरवात केली. पानयांगाराच्या फुलटॉसवर पोर्टरफिल्डने कव्हरपॉईंटला बाऊंड्री मारल्यावर तेंडई चताराच्या पुढच्या ओव्हरमध्ये जॉईसने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. पण हा अपवाद वगळता झिंबाब्वेच्या अचूक बॉलिंगमुळे जॉईस आणि पोर्टरफिल्ड यांना १-२ रन्सवरच समाधान मानावं लागत होतं. तवांडा मूपरीवाच्या बॉलवर जॉईसने स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री मारली, पण मूपरीवाच्या पुढच्या ओव्हरमध्ये पूल मारण्याचा जॉईसचा प्रयत्नं पार फसला आणि त्याची टॉप एज लागली, पण फॉलो थ्रूमध्ये हा कॅच घेणं मूपरीवाला जमलं नाही! जॉईस - पोर्टरफिल्ड यांनी ६३ रन्सची पार्टनरशीप केल्यावर सीन विल्यम्सला फटकावण्याच्या प्रयत्नात मिड ऑफला हॅमिल्टन मॅसाकाड्झाने पोर्टरफिल्डचा कॅच घेतला. आयर्लंड ७९ / २!

पोर्टरफिल्ड आऊट झाल्यावर बॅटींगला आलेला अँडी बॅलबर्नी आणि जॉईस यांनी कोणतीही रिस्क न घेता रन्स काढण्यास सुरवात केली. बॅलबर्नीने विल्यम्सला कव्हर्समधून बाऊंड्री मारल्यावर विल्याम्सच्या पुढच्या ओव्हरमध्ये जॉईसने बाऊंड्री फटकावली मॅसाकाड्झाला बाऊंड्री मारल्यावर विल्यम्सच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या सिकंदर रझाला मिडविकेटवरुन दणदणीत सिक्स ठोकली. जॉईस - बॅलबर्नी स्पिनर्सना फटकावत असल्याचं पाहून ब्रेंडन टेलरने पानयांगाराला बॉलिंगला आणलं, पण जॉईसने त्यालाही कव्हर्समधून बाऊंड्री तडकावल्यावर पुढच्या ओव्हरमध्ये चताराला मिडविकेटवरुन दुसरी सिक्स ठोकली! ३० ओव्हर्सनंतर आयर्लंडचा स्कोर होता १४६ / २!

जॉईसच्या फटकेबाजीने गोंधळलेल्या टेलरने त्याला स्ट्राईकपासून दूर ठेवण्यासाठी बॅलबर्नीला जास्तीत जास्तं बॉल्स खेळवण्याचं धोरण अवलंबलं. परंतु जॉईसच्या जोडीने बॅलबर्नीनेही झिंबाब्वेच्या बॉलर्सना फटकावण्यास सुरवात केल्याने टेलरची ही चाल त्याच्यावरच उलटली. मॅसाकाड्झाच्या बॉलवर टेलरच्या डोक्यावरुन स्कूपची बाऊंड्री मारल्यावर बॅलबर्नीने मूपरीवाला पॉईंटवरुन बाऊंड्री तडकावली. विल्यम्सच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या पानयांगाराला जॉईसने बाऊंड्री मारल्यावर पुढच्या ओव्हरमध्ये...

सिकंदर रझाचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
लेगस्टंपच्या बाहेर जात कव्हर्सच्या वरुन बॉल उचलण्याचा जॉईसचा प्रयत्नं पार फसला...
बॉल गेला तो थेट एक्स्ट्रा कव्हरला असलेल्या क्रेग अर्विनच्या हातात पण....
अर्विनच्या हातातून बॉल सुटला!

आणखीन १ बॉलनंतर...

रझाचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
बॅलबर्नीने तो मिडविकेटवरुन स्लॉग स्वीप केला... सिक्स!

शेवटचा बॉल जॉईसच्या लेगस्टंपवर पडला...
जॉईसने क्रीजमधून पुढे सरसावत तो लाँगऑनवरुन उचलला.... सिक्स!

टेलर आणि बॅलबर्नी यांनी १३८ रन्सची पार्टनरशीप केल्यावर...

चताराचा बॉल मिडलस्टंपवर आलेला स्लो फुलटॉस होता...
जॉईसने तो मिडविकेटवरुन फटकावण्याचा प्रयत्नं केला पण...
बॉल त्याच्या बॅटच्या अगदी खालच्या टोकाला लागून हवेत गेला....
यावेळी शॉर्ट मिडविकेटला अर्विनने कॅच घेण्यात कोणतीही कसूर केली नाही!

१०३ बॉल्समध्ये ९ बाऊंड्री आणि ३ सिक्स ठोकत एड जॉईसने ११२ रन्स फटकावल्या.
आयर्लंड २१७ / ३!

जॉईस परतल्यावर बॅटींगला आलेल्या केव्हीन ओब्रायनने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत झिंबाब्वेच्या बॉलर्सना फटकावण्यास सुरवात केली. मुपरीवाच्या बॉलवर केव्हीन ओब्रायनने मिडऑफ वरुन बाऊंड्री तडकावल्यावर पुढल्या ओव्हरमध्ये बॅलबर्नीने विल्यम्सला मिडविकेटवरुन स्लॉग स्वीपची सिक्स ठोकली. मूपरीवाच्या ऐवजी बॉलिंगला आलेला रझाला केव्हीन ओब्रायनने स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री फटकावल्यावर पुढच्या ओव्हरमध्ये...

अराऊंड द विकेट बॉलिंग करणार्‍या पानयांगाराचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
बॅलबर्नीने तो मिडविकेटवरुन फटकावण्याचा पवित्रा घेतला...
बॉल त्याच्या बॅटची इनसाईड एज लागून फाईनलेगला गेला... बाऊंड्री!

दुसरा बॉल अचूक पडलेला यॉर्कर होता. बॅलबर्नीला त्यावर काहीच करता आलं नाही...

पानयांगाराचा तिसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला स्लो बॉल होता...
बॅलबर्नीने तो त्याच्या डोक्यावरुन स्ट्रेट उचलला.... सिक्स!

चौथा बॉल वाईड गेल्यावर....

पाचवा बॉल मिडलस्टंपवर आलेला फुलटॉस होता....
बॅलबर्नीने या खेपेस तो स्क्वेअरलेगवरुन उचलला... सिक्स!

सहावा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला यॉर्कर होता, बॅलबर्नीला त्यावर काहीच करता आलं नाही...

शेवटचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
बॅलबर्नीने शेवटच्या क्षणी तो थर्डमॅनला चॉप केला.... बाऊंड्री!

पानयांगाराच्या ओव्हरमध्ये २१ रन्स झोडपल्या गेल्या!

मूपरीवाच्या पुढच्या ओव्हरमध्ये केव्हीन ओब्रायनने लेग ग्लान्सची बाऊंड्री मारली. त्याच ओव्हरमध्ये बॅलबर्नीने कव्हर्सवरुन बाऊंड्री फटकावण्यात कोणतीही कसूर केली नाही. चताराच्या पुढच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर आलेल्या बीमरवर केव्हीन ओब्रायनने स्क्वेअरलेगला बाऊंड्री फटकावली. चताराचा पुढचा बॉल लाँगऑनवरुन उचलण्याचा ओब्रायनचा प्रयत्नं चताराच्या स्लो बॉलचा अजिबात अंदाज न आल्याने फसला आणि लाँगऑनला रेगीस चकब्वाने त्याचा कॅच घेतला. २२ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह केव्हीन ओब्रायनने २४ रन्स फटकावल्या. आयर्लंड २७६ / ४!

केव्हीन ओब्रायन आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या गॅरी विल्सनने मुपरीवाला कव्हर्समधून बाऊंड्री फटकावल्यावर पुढच्या ओव्हरमध्ये चताराला बॅकवर्ड पॉईंटला बाऊंड्री तडकावली. दोन बॉल्सनंतर चताराच्या फुलटॉसवर विल्सनने स्क्वेअरलेगवरुन दणदणीत सिक्स ठोकली! विल्यम्सच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर स्वीपची बाऊंड्री फटकावल्यावर पुढच्या बॉल कव्हर्सवरुन फटकावण्याचा विल्सनचा प्रयत्नं फसला आणि बॅकवर्ड पॉईंटला चकब्वाने त्याचा कॅच घेतला. १३ बॉल्समध्य ३ बाऊंड्री आणि चताराला मारलेल्या सिक्ससह विल्सनने २५ रन्स फटकावल्या. मूनीने विल्यमसला लागोपाठच्या बॉलवर स्वीप आणि रिव्हर्स स्वीपच्या २ बाऊंड्री तडकावल्या, पण पुढच्याच बॉलवर विल्सनने त्याची दांडी उडवली. चताराच्या ४९ व्या ओव्हरमध्ये बंपरला अपर कट मारण्याच्या प्रयत्नात थर्डमॅनला पानयांगाराने नियाल ओब्रायनचा कॅच घेतला.

४४ व्या ओव्हरपासून ९० रन्सच्या पार पोहोचलेला बॅलबर्नीला केव्हीन ओब्रायन आणि विल्सनची फटकेबाजी सुरु असल्यामुळे फारसा स्ट्राईकच मिळालेला नव्हता. मूपरीवाची शेवटची ओव्हर सुरु झाली तेव्हा तो ९६ पर्यंत पोहोचला होता....

मूपरीवाचा पहिलाच बॉल मिडलस्टंपवर पडलेला यॉर्कर होता...
बॅलबर्नीने लेगसाईडला सरकत तो कव्हर्समधून फटकावला आणि १ रन पूर्ण केली...
कव्हर्स बाऊंड्रीवर चकब्वाने बॉल पिकअप केला पण बॅलबर्नी दुसर्‍या रनसाठी परत फिरला होता...
चकब्वाचा थ्रो कलेक्ट करुन ब्रेंडन टेलरने बेल्स उडवल्या....
बॅलबर्नीने क्रीज गाठण्यासाठी मारलेल्या डाईव्हचा काहीही उपयोग झाला नाही...

५० ओव्हर्स पूर्ण झाल्या तेव्हा आयर्लंडचा स्कोर होता ३३१ / ८!

अँडी बॅलबर्नीने ७९ बॉल्समध्ये ७ बाऊंड्री आणि ४ सिक्ससह ९७ रन्स फटकावल्या!
बॅलबर्नी, केव्हीन ओब्रायन आणि विल्सन यांच्या फटकेबाजीमुळे शेवटच्या १० ओव्हर्समध्ये आयर्लंडने १०८ रन्स झोडपल्या!

आयर्लंडची इनिंग्ज संपल्यावर बोलताना एड जॉईस म्हणाला,
"It's a good pitch to bat on, short boundaries, but there was a bit of moisture early on and the ball wasn't coming on to the bat at the start."

३३२ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना अ‍ॅलेक्स क्युसॅक आणि जॉन मूनी यांच्या अचूक बॉलिंगमुळे चामू चिभाभा आणि सिकंदर रझा यांना पहिल्या ३ ओव्हर्समध्ये केवळ ३ रन्स काढता आल्या. चौथ्या ओव्हरमध्ये चिभाभाने मूनीला कव्हरड्राईव्ह आणि पॉईंटच्या बाऊंड्री फटकावल्या. क्युसॅकच्या पुढच्या ओव्हरमध्ये रझने पूलची बाऊंड्री फटकावल्यावर पुढच्या ओव्हरमध्ये चिभाभा - रझा यांनी पुन्हा मूनीला २ बाऊंड्री तडकावल्या. पण मूनीच्या पुढच्याच ओव्हरमध्ये कव्हरड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात रझाच्या बॅटची आऊटसाईड एज लागली आणि पहिल्या स्लिपमध्ये डाईव्ह मारत स्टर्लिंगने कॅच घेतला. झिंबाब्वे ३२ / १!

पुढच्याच ओव्हरमध्ये....
क्युसॅकचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
चिभाभाने क्रीजमधून पुढे सरसावत तो कव्हर्सवरुन फटकावण्याचा प्रयत्नं केला...
त्याच्या अपेक्षेपेक्षा बॉल किंचित स्लो आल्याने त्याची एज लागली...
पॉईंटवर असलेल्या विल्यम पोर्टरफिल्डने मागे जात त्याचा कॅच घेतला.
झिंबाब्वे ३२ / २!

चिभाभा आउट झाल्यावर जेमतेम ९ रन्सची भर पडते तोच क्युसॅकच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या केव्हीन ओब्रायनच्या पहिल्याच ओव्हरमध्ये हॅमिल्ट मॅसाकाड्झाच्या बॅटची एज लागली आणि विकेटकीपर गॅरी विल्सनने त्याचा कॅच घेतला. झिंबाब्वे ४१ / ३!

मॅसाकाड्झा आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या ब्रेंडन टेलरने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत आयरीश बॉलर्नना फटकावून काढण्यास सुरवात केली. केव्हीन ओब्रायनच्या २ ओव्हर्समध्ये टेलरने ४ बाऊंड्री तडकावल्यावर जॉर्ज डॉकरेलच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या अँड्र्यू मॅकब्रायनच्या बॉलवर केव्हीन ओब्रायनने सॉलोमन मायरचा कॅच ड्रॉप केला. पण पुढच्याच ओव्हरमध्ये डॉकरेललाच कट मारण्याचा मायरचा प्रयत्नं सपशेल फसला आणि बॅकवर्ड पॉईंटवर क्युसॅकने त्याचा कॅच घेतला. झिंबाब्वे ७४ / ४!

मायर आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या सीन विल्यम्सने शांत डोक्याने आयरीश बॉलर्सना खेळून काढत टेलरला सपोर्ट देण्याची भूमिका घेतली. टेलरची फटकेबाजी सुरुच होती. मॅकब्रायनला त्याने मिडविकेटवर स्लॉग स्वीपची दणदणीत सिक्स ठोकली. चाणाक्षं विल्यम्सने मॅकब्रायनच्या पुढच्या ओव्हरमध्ये रिव्हर्स स्वीपची बाऊंड्री मारण्याची संधी सोडली नाही. पोर्टरफिल्डने मॅकब्रायनच्या ऐवजी पॉल स्टर्लींगला बॉलिंगला आणलं, पण टेलरवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. स्टर्लींगला त्याने मिडविकेटला पूलची बाऊंड्री मारल्यावर डॉकरेलच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या केव्हीन ओब्रायनच्या ओव्हरमध्ये विल्यम्स - टेलर यांनी २ बाऊंड्री तडकावल्या. ३० ओव्हर्सनंतर झिंबाब्वेचा स्कोर होता १६४ / ४!

शेवटच्या २० ओव्हर्समध्ये झिंबाब्वेला १६८ रन्सची आवश्यकता होती!

जॉन मूनीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या मॅकब्रायनला मिडऑफवरुन बाऊंड्री फटकावल्यावर त्याच ओव्हरमध्ये विल्यमसने त्याला स्वीपची बाऊंड्री मारली. जॉर्ज डॉकरेलच्या अचूक ओव्हरनंतर टेलरने स्टर्लींगला लाँग ऑनवरुन दणदणीत सिक्स ठोकली. स्टर्लींगच्या पुढच्या बॉलवर मिडऑफ वरुन बाऊंड्री तडकावण्यात टेलरने कोणतीही हयगय केली नाही. पण पुढच्याच ओव्हरमध्ये....

डॉकरेलचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
टेलरने ऑफस्टंपच्या बाहेरुन फाईनलेगला स्वीप मारण्याचा प्रयत्नं केला...
विकेटकीपर विल्सनने बॉल कलेक्ट केला आणि कॅचसाठी अपिल केलंलं अपिल अंपायर पॉल रायफलने फेटाळलं...
विल्यम पोर्टरफिल्डने डीआरएसचा आधार घेत थर्ड अंपायर जोएल विल्सनकडे दाद मागितली...
टीव्ही रिप्लेमध्ये टेलरच्या बॅटला बॉलचा स्पर्श झाल्याची कोणतीही खूण अथवा स्निकोमीटरमध्ये आवाज आढळला नाही...
अंपायर जोएल विल्सनने आयर्लंडचं अपिल फेटाळत टेलर नॉटआऊट असल्याचा निर्णय दिला!

झिंबाब्वेने बॅटींग पॉवरप्ले घेतल्यावर अ‍ॅलेक्स क्युसॅकच्या अचूक ओव्हरमुळे टेलर - विल्यम्स यांन फटकेबाजीची कोणतीही संधी मिळाली नाही. पण पुढच्या ओव्हरमध्ये...

डॉकरेलचा पहिला बॉल मिडलस्टंपवर पडला...
टेलरने क्रीजमधून पुढे सरसावत तो लाँगऑन बाऊंड्रीपार उचलला... सिक्स!

डॉकरेलच्या दुसर्‍या बॉलवर २ रन्स काढल्यावर पुढच्या २ बॉल्समध्ये टेलरला काहीच करता आलं नाही...

पाचवा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
टेलर पुन्हा क्रीजमधून पुढे सरसावला आणि त्याने बॉल लाँगऑन बाऊंड्रीपार उचलला... सिक्स!

शेवटचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
टेलरने तो मिडऑनवरुन खेचला... बाऊंड्री!

डॉकरेलच्या ओव्हरमध्ये १८ रन्स फटकावल्या गेल्या होत्या!

टेलर आणि विल्यम्स यांनी १४९ रन्सची पार्टनरशीप केली होती. हे दोघं आयर्लंडला भारी पडणार अशी चिन्हं दिसत असतानाच...

अ‍ॅलेक्स क्युसॅकचा बॉल ऑफस्टंपच्या किंचित बाहेर पडला...
टेलरने तो मिडऑफवरुन फटकावण्याचा पवित्रा घेतला...
क्युसॅकच्ने चाणाक्षपणे टाकलेल्या स्लो बॉलमुळे टेलरचा अंदाज साफ चुकला आणि बॉल हवेत गेला...
मिडऑनला केव्हीन ओब्रायनने आरामात कॅच घेतला!

९१ बॉल्समध्ये ११ बाऊंड्री आणि ४ सिक्स ठोकत ब्रेंडन टेलरने १२१ रन्स झोडपल्या.
झिंबाब्वे २२३ / ५!

१२ ओव्हर्समध्ये झिंबाब्वेला अद्याप १०८ रन्स बाकी होत्या!

टेलर परतल्यावरही विल्यम्सची फटकेबाजी सुरुच होती. टेलरने डॉकरेलच्या केलेल्या धुलाईनंतर त्याच्याऐवजी बॉलिंगला आलेल्या केव्हीन ओब्रायनला विल्यम्सने मिडविकेटवर दणदणीत सिक्स ठोकली. अचूक बॉलिंग करणार्‍या क्युसॅकला त्याने मिडविकेटवरुन बाऊंड्री फटकावल्यावर केव्हीन ओब्रायनच्या पुढच्या ओव्हरमध्ये विल्यम्स आणि क्रेग अर्विन यांनी २ बाऊंड्री तडकावल्या. क्युसॅकच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या मूनीच्या अचूक ओव्हरनंतर मॅकब्रायनला रिव्हर्स स्वीप मारण्याचा अर्विनचा प्रयत्नं पार फसला आणि शॉर्ट थर्डमॅनला नियाल ओब्रायनने त्याचा आरामात कॅच घेतला. झिंबाब्वे २५९ / ६!

अर्विन आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या रेगिस चकब्वाने चाणाक्षपणे विल्यमसला जास्तीत जास्तं स्ट्राईक देण्याचा मार्ग पत्करला. विल्यम्सने मूनीला स्क्वेअरलेगला बाऊंड्री मारल्यावर पुढच्या ओव्हरमध्ये मॅकब्रायनला मिडविकेटला स्लॉग स्वीपची सिक्स ठोकली! क्युसॅकच्या ४६ व्या ओव्हरमध्ये चकब्वा रनआऊट होताना तर वाचलाच पण नियाल ओब्रायनच्या ओव्हरथ्रोमुळे झिंबाब्वेला २ रन्स आणखीन मिळाल्या. केव्हीन ओब्रायनच्या पुढच्या ओव्हरमध्ये चकब्वाने मिडविकेटला बाऊंड्री तडकावण्यात कोणतीही कसूर केली नाही. विल्यम्स - चकब्वा यांनी ४१ रन्सची पार्टनरशीप केल्यावर त्याच ओव्हरमध्ये....

केव्हीन ओब्रायनचा बॉल ऑफस्टंपवर पडला....
विल्यम्सने तो लेगसाईडला उचलला...
मिडविकेटला असलेल्या जॉन मूनीने शांत डोक्याने बाऊंड्रीच्या अगदी जवळ कॅच घेतला...
आपला पाय बाऊंड्रीला लागला किंवा नाही याची स्वतः मूनीला काहीच कल्पना नव्हती...
अंपायर पॉल रायफल आणि रुचिरा पलियागुरुगे यांनी विल्यम्सला थांबण्याची खूण केली आणि थर्ड अंपायर जोएल विल्सनवर हा निर्णय सोपवला....
थर्ड अंपायर विल्सनने अनेक वेगवेगळ्या अँगल्समधून रिप्ले पाहिल्या...
मूनीचा पाय बाऊंड्रीला लागला अथवा नाही हे कोणत्याही रिप्लेमधून निर्णायकरित्या कळून येत नव्हतं....
एव्हाना विल्सनने मैदानातून बाहेर पडून ड्रेसिंगरुम गाठली होती!
झिंबाब्वेचा पुढच्या बॅट्समन तिनशे पानयांगारा क्रीजमध्ये पोहोचला होता....
अंपायर विल्सनला मूनीचा पाय बाऊंड्रीला लागल्याचं किंवा न लागल्याचं स्पष्टं होत नव्हतं...
... पण विल्सन मैदानावरुन निघून गेलेला असल्याने अखेर तो आऊट असल्याचा निर्णय देण्यात आला!

८३ बॉल्समध्ये ७ बाऊंड्री आणि २ सिक्ससह सीन विल्यम्सने ९६ रन्स फटकावल्या.
झिंबाब्वे ३०० / ७!

शेवटच्या ३ ओव्हर्समध्ये झिंबाब्वेला ३२ रन्स हव्या होत्या!

मूनीच्या ४८ व्या ओव्हरच्या पहिल्या ३ बॉल्सवर पानयांगाराने ४ रन्स काढल्या, पण लेगस्टंपवर पडलेला मूनीचा बॉल फटकावण्याचा त्याचा प्रयत्नं सपशेल फसला आणि लाँगऑनवर धावत आलेल्या पोर्टरफिल्डने डाईव्ह मारत त्याचा अप्रतिम कॅच घेतला. झिंबाब्वे ३०५ / ८!

अद्याप २ ओव्हर्समध्ये झिंबाब्वेला २६ रन्स बाकी होत्या!

विल्यम पोर्टरफिल्डपुढे शेवटच्या २ ओव्हर्स कोणाला द्यावा हा प्रश्नं होता. मूनी आणि डॉकरेल यांच्या १०-१० ओव्हर्स संपल्या होत्या. अँडी मॅकब्रायन किंवा स्टर्लींग यांच्या ऑफब्रेक्सचा प्रयोग करणं अर्थातच रिस्की होतं. त्यामुळे केव्हीन ओब्रायन आणि क्युसॅक हे दोन पर्याय त्याच्यापुढे होते. ४९ व्या ओव्हरमध्ये त्याने बॉलिंगला आणलं केव्हीन ओब्रायनला...

पहिला बॉल मिडलस्टंपवर पडलेला यॉर्कर होता. चकब्वाने तो स्क्वेअरलेगला खेळला आणि १ रन काढली....

दुसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर आलेला फुलटॉस होता...
तवांडा मुपरीवाने ऑफस्टंपच्या बाहेर जात तो फाईनलेगला स्कूप केला आणि २ रन्स काढल्या...

तिसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
मुपरीवाने फ्रंटफूटवर येत तो कव्हर्समधून तडकावला.... बाऊंड्री!

चौथा बॉलही तिसर्‍या बॉलपेक्षा ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
मूपरीवाने तो पॉईंटवरुन फटकावला.... बाऊंड्री!

पाचवा बॉल ऑफस्टंपवर पडलेला शॉर्टपीच बॉल होता....
मूपरीवाने तो लेगसाईडला खेचला....
स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर असलेल्या बॅलबर्नीच्या डोक्यावरुन बॉल प्रेक्षकांत गेला... सिक्स!

शेवटचा बॉल मिडलस्टंपवर आलेला फुलटॉस होता...
मूपरीवाने तो लाँगऑनला फटकावला आणि मॅकब्रायनचा थ्रो येण्यापूर्वी २ रन्स काढल्या...

केव्हीन ओब्रायनच्या ४९ व्या ओव्हरमध्ये १९ रन्स फटकावल्या गेल्या होत्या!
मूपरीवाच्या अनपेक्षित फटकेबाजीमुळे आयर्लंडचं धाबं दणाणलं होतं...
मॅचचं पारडं पुन्हा झिंबाब्वेच्या दिशेला झुकलं!

शेवटच्या ओव्हरमध्ये झिंबाब्वेला केवळ ७ रन्सची आवश्यकता होती!

विल्यम पोर्टरफिल्डसमोर शेवटच्या ओव्हरसाठी अ‍ॅलेक्स क्युसॅक हा एकच पर्याय शिल्लक होता....

क्युसॅकचा पहिला बॉल ऑफस्टंपच्या किंचित बाहेर पडला...
चकब्वाने तो अ‍ॅक्रॉस द लाईन मिडविकेटला फटकावण्याचा प्रयत्नं केला...
चाणाक्षपणे टाकलेल्या स्लो ऑफकटरचा त्याला अजिबात अंदाज आला नाही...
बॉल त्याच्या बॅटच्या बॉटम एजला लागून स्टंप्सवर गेला!
झिंबाब्वे ३२५ / ९!

५ बॉल्स - ७ रन्स!

क्युसॅकच्या दुसर्‍या बॉलवर तेंडई चताराने स्क्वेअरलेगला १ रन काढली आणि केव्हीन ओब्रायनची धुलाई करणार्‍या मूपरीवाला स्ट्राईक दिला...

४ बॉल्स - ६ रन्स!

क्युसॅकचा तिसरा बॉलही ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
मूपरीवाने एका फटक्यात मॅच संपवण्याच्या दृष्टीने तो लाँग ऑनवरुन उचलण्याचा प्रयत्नं केला पण....
पुन्हा एकदा क्युसॅकच्या स्लो बॉलने झिंबावेच्या बॅट्समनला चकवलं होतं....
मूपरीवाचा अंदाज सपशेल चुकल्याने बॉल हवेत गेला...
लाँग ऑन बाऊंड्रीवरुन धावत आलेल्या पोर्टरफिल्डने शांतपणे कॅच घेतला!
झिंबाब्वे ३२६ ऑल आऊट!

आयर्लंडने ५ रन्सनी मॅच जिंकली!

मॅच जिंकणं सहज शक्यं असतानाही पदरी पराभव पडल्यामुळे ब्रेंडन टेलर चांगलाच निराश झाला होता. तो म्हणाला,
"It's pretty frustrating to be in a winning situation again, and throw it away a little bit. Basically six singles, if you're running hard you're going to get the odd two. We weren't making smart decisions as batters."

मूनीने घेतलेल्या विल्यम्सच्या कॅचबद्दल टेलर म्हणाला,
Mooney's catch looked clean, but I was not aware what communications had taken place between the umpires and Williams. I couldn't tell if the umpire tried to hold him back or anything. You generally take the fielder's opinion and you go with it. I don't know, maybe the umpires could have made a stronger call and had a few more looks at it on the big screen on the replays, but that's all history."

विल्यम पोर्टरफील्ड टेलरला दुजोरा देताना कॅचबद्दल म्हणाला,
"I thought it was a fantastic catch. It's a great skill, he's under pressure, he's close to the line. They showed a couple of replays on the big screen, which is obviously pretty inconclusive. Whether he has or hasn't, I don't know."

मॅन ऑफ द मॅच म्हणून एड जॉईसची निवड करण्यात आली!

शेवटच्या ६ बॉल्समध्ये १-२ रन्स काढूनही मॅच जिंकणं सहज शक्यं असताना शेवटच्या क्षणी फटकेबाजीच्या मोहात पडल्याने झिंबाब्वेचा घात झाला होता! आयर्लंडविरुद्ध झालेल्या या पराभवामुळे झिंबाब्वेचा वर्ल्डकप ग्रूपमध्येच आटपणार हे स्पष्टं होतं. उलट आयर्लंडच्या क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश करण्याच्या आशा वाढीस लागल्या!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

लोनली प्लॅनेट's picture

11 Mar 2017 - 11:22 am | लोनली प्लॅनेट

हि एक अविस्मरणीय मॅच होती झिम्बाब्वे चा पराभव झाल्याने वाईट वाटलं होतं ब्रेंडन टेलर आणि शॉन विल्यम्स दोघांनी या वर्ल्ड कप मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती टेलर ने भारताविरुद्ध हि शतक मारले होते
त्या मूर्ख रॉबर्ट मुराग्वे मुळे झिम्बाब्वे क्रिकेट वर येऊ शकले नाही नाहीतर आज झिम्बाब्वे मुख्य संघात गणला गेला असता