वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंड

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
9 Mar 2017 - 8:53 am

२०१५ चा वर्ल्डकप हा १९९२ च्या वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेला दुसरा वर्ल्डकप होता. २०११ च्या वर्ल्डकपप्रमाणेच ग्रूपमधल्या मॅचेसनंतर क्वार्टरफायनल, सेमीफायनल आणि फायनल अशा पद्धतीने मॅचेस खेळवण्यात येणार होत्या. २०११ च्या वर्ल्डकपप्रमाणेच १४ संघांचा या वर्ल्डकपमध्ये समावेश करण्यात आला होता. २०११ च्या वर्ल्डकपप्रमाणेच या वर्ल्डकपसाठीही ब्रँड अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकरची नेमणूक करण्यात आली होती.

*************************************************************************************

२६ फेब्रुवारी २०१५
युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडीन

न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावरचा ओटेगो प्रांतातल्या ड्युनेडीनच्या युनिव्हर्सिटी ओव्हलच्या मैदानात पूल ए मधली अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड यांच्यातली मॅच खेळली जाणार होती. संघर्ष आणि तालीबानी दहशतवाद पाचवीला पुजलेल्या अफगाणिस्तानच्या संघासाठी मात्रं वर्ल्डकपमध्ये खेळण्याची ही पहिलीच संधी होती. बहुतेक सर्व अफगाण खेळाडूंनी यादवी युद्धाच्या काळात पाकिस्तानात आश्रय घेऊन पेशावरला क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेले होते. स्कॉटलंडला पहिल्या २ मॅचेसमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. अफगाणिस्तानचा बांग्लादेशविरुद्ध पराभव झालेला असला तरी दुसर्‍या मॅचमध्ये जेमतेम ५० रन्समध्ये पहिल्या ४ विकेट्स काढून त्यांनी श्रीलंकेला हादरवलं होतं, पण महेला जयवर्धनेने सेंचुरी ठोकून ऐनवेळी श्रीलंकेला तारलं होतं. स्कॉटलंडचा संघ २०१५ च्या वर्ल्डकपपूर्वी १९९९ आणि २००७ च्या वर्ल्डकपमध्ये खेळलेला होता, पण अद्याप एकाही मॅचमध्ये त्यांना विजय मिळवता आला नव्हता त्यामुळे वर्ल्डकपमधला पहिलावहिला विजय मिळवण्यासाठी स्कॉटीश संघ उत्सुक होता तर प्रथमच वर्ल्डकपमध्ये खेळण्याच्या संधीचं सोनं करण्याच्या इराद्याने अफगाण संघ मैदानात उतरणार होता!

प्रेस्टन मॉमसेनच्या स्कॉटीश संघात स्वतः मॉमसेन, काईल कोट्झर, कॅलम मॅक्लीऑड, हमिश गार्डीनर, मॅट मॅचान असे बॅट्समन होते. स्कॉटलंडच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने इयन वॉर्डलॉ आणि जोश डेव्ही यांच्यावर होता. त्यांच्या जोडीला अ‍ॅल्सडेअर इव्हान्स होता. विकेटकीपर - बॅट्समन मॅथ्यू क्रॉसचाही स्कॉटलंडच्या संघात समावेश होता पण स्कॉटलंडचे खरे आधारस्तंभ होते ते म्हणजे अनुभवी माजिद हक आणि रिची बेरींग्टन हे दोघं ऑलराऊंडर्स! स्कॉटलंडच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणजे बहुतेक सर्व स्कॉटीश खेळाडूंना इंग्लिश कौंटी मध्ये खेळण्याचा अनुभव होता.

मोहंमद नबीच्या अफगाण संघात अनुभवी नवरोज मंगल, जावेद अहमदी, अशगर स्टॅनिकझाई, समिउल्लाह शेनवारी, नजिबुल्ला झादरान असे बॅट्समन होते. अफगाणिस्तानच्या बॉलिंगची मदार होती ती श्रीलंकेची अवस्था कठीण करुन सोडणार्‍या त्यांच्या शापूर झादरान, हमिद हसन आणि दौलत झादरान या तीन फास्ट बॉलर्सवर! त्यांच्या जोडीला गुलबदीन नैब आणि स्वतः कॅप्टन नबी हे दोघं ऑलराऊंडर्स होते. विकेटकीपर बॅट्समन अफसर झझईचाही अफगाणिस्तानच्या संघात समावेश होता. आवश्यकता भासल्यास समिउल्लाह शेनवारी लेगब्रेक्स टाकू शकत होता.

मोहंमद नबीने टॉस जिंकल्यावर फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. शापूर झादरानच्या पहिल्या अचूक ओव्हरनंतर दौलत झादरानच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये कोट्झर बोल्ड होण्यापासून थोडक्यात बचावला पण त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर दौलतचा बॉल कट् करण्याचा मॅक्लीऑडचा प्रयत्नं पार फसला आणि बॅकवर्ड पॉईंटला नजिबुल्ला झादरानने त्याचा कॅच घेतला. स्कॉटलंड ७ / १!

मॅक्लीऑड आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या हमिश गार्डीनरने सावध पवित्रा घेत अफगाण बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. कोट्झरने शापूरला कट्ची बाऊंड्री मारल्यावर पुढच्या ओव्हरमध्ये दौलतला स्क्वेअरकट्ची बाऊंड्री तडकावली. शापूरला त्याने कव्हर्सवरुन बाऊंड्री फटकावल्यावर मोहंमद नबीने त्याच्याऐवजी हमिद हसनला बॉलिंगला आणलं पण कोट्झरला काहीच फरक पड्ला नाही. हमिदला स्क्वेअरकट्ची बाऊंड्री फटकावल्यावर पुढच्याच बॉलवर त्याने स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तड्कावली. पण हमिदच्या पुढच्या ओव्हरमध्ये अचूक बॉलिंगमुळे कोट्झरला काहीच करता आलं नाही. दौलतच्या इनकट्वर गार्डीनर बोल्ड होण्यापासून वाचला पण हमिदच्या पुढच्या ओव्हरमध्ये अ‍ॅक्रॉस द लाईन खेळण्याचा त्याचा प्रयत्नं पार फसला आणि तो एलबीडब्ल्यू झाला. स्कॉटलंड ३८ / २!

पुढच्याच ओव्हरमध्ये....
दौलतचा बॉल ऑफस्टंपच्या किंचित बाहेर पडला...
कोट्झरने पायांची कोणतीही हालचाल न करता तो कव्हर्समधून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्नं केला...
टप्पा पडल्यावर बॉल सीम झाला आणि कोट्झरच्या बॅट आणि पॅडमधल्या गॅपमधून घुसला...
कोट्झरचा ऑफस्टंप उडाला!

४१ बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह कोट्झरने २५ रन्स फटकावल्या.
स्कॉटलंड ४० / ३!

कॅप्टन प्रेस्टन मॉमसेन आणि मॅट मॅचान यांनी आक्रमक पवित्रा घेत अफगाण बॉलर्सना फटकावण्यास सुरवात केली. दौलतच्या बॉलवर मॉमसेनने कट्ची बाऊंड्री मारल्यावर दौलतच्याच पुढच्या ओव्हरमध्ये त्याने कव्हर्समधून बाऊंड्री फटकावली. हमिद हसनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या गुलबदीन नैबला मॉमसेनने मिडविकेटला पूलची बाऊंड्री तडकावली. मॉमसेनच्या पावलावर पाऊल टाकत मॅचानने दौलतला स्क्वेअरड्राईव्हची बाऊंड्री मारल्यावर नैबच्या पुढच्या ओव्हरमध्ये कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली. नैबच्या पुढच्या बॉलवर मॅचानच्या बॅटची एज लागली पण स्लिपमध्ये असलेल्या नवरोज मंगलपासून सुरक्षित अंतरावरुन बॉल थर्डमॅन बाऊंड्रीपार गेला. नैबच्या पुढच्या ओव्हरमध्येही मॅचानने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री फटकावल्यावर त्याच ओव्हरमध्ये मॉमसेननेही कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली. मॅचान - मॉमसेन यांनी ५३ रन्सची पार्टनरशीप केल्यावर हे दोघं अफगाणिस्तानला त्रासदायक ठरणार असं वाटत असतानाच लेगसाईडला सरकत मोहंमद नबीला कव्हर्समधून फटकावण्याचा मॅचानचा प्रयत्नं पार फसला आणि त्याची दांडी उडाली. २८ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह मॅचानने ३१ रन्स फटकावल्या. स्कॉटलंड ९३ / ३!

मॅचान आऊट झाल्यावर जेमतेम २ रन्सची भर पडते तोच पुढच्या ओव्हरमध्ये...

गुलाबदिन नैबचा बॉल ऑफस्टंपवर पडला....
मॉमसेनने फ्रंटफूटवर येत बॉल डिफेंड करण्याचा प्रयत्नं केला...
अचूक लेंग्थवर पडलेला बॉल सीम झाला आणि मॉमसेनच्या बॅटची एज लागली...
विकेटकीपर अफसर झझईने कॅच घेण्यात कोणतीही कसूर केली नाही!
स्कॉटलंड ९५ / ५!

रिची बेरींग्टन आणि विकेटकीपर मॅथ्यू क्रॉस यांनी कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढण्यावर भर दिला पण हमिद हसनच्या बॉलवर पॉईंटमधून बाऊंड्री मारण्याची संधी क्रॉसने दवडली नाही. पण हा अपवाद वगळता हमिद आणि नबी यांच्या अचूक बॉलिंगने बेरींग्टन - क्रॉस यांना कोणतीही संधी दिली नाही. नबीच्या पुढच्या ओव्हरमध्ये स्कॉटलंडला ५ वाईड्सचा बोनस मिळाल्यावर बेरींग्टनने नैबला स्क्वेअरकट्ची बाऊंड्री तडकावली. बेरींग्टन - क्रॉस यांनी ३५ रन्सची पार्टनरशीप केल्यावर नबीने नैबच्या ऐवजी शापूर झादरानला बॉलिंगला आणलं...

अराऊंड द विकेट बॉलिंग करणार्‍या शापूरचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
क्रॉसने फ्रंटफूटवर येत बॉल डिफेंड करण्याचा प्रयत्नं केला पण त्याच्या बॅटची एज लागली...
विकेटकीपर अफसर झझईने कॅच घेण्यासाठी उजवीकडे डाईव्ह मारली...
झझईच्या सुदैवाने त्याच्या ग्लोव्हजच्या अगदी टोकाला दोन बोटांमध्ये बॉल अडकला!
स्कॉटलंड १३२ / ६!

क्रॉस परतल्यावर नबीच्या पुढच्या ओव्हरमध्ये बेरींग्टनविरुद्धचं एलबीडब्ल्यूचं अपिल अंपायर सायमन फ्रेने फेटाळून लावलं. नबीने डीआरएसचा आधार घेत थर्ड अंपायर रॉड टकरकडे दाद मागितली, पण टीव्ही रिप्लेमध्ये बॉल लेगस्टंपच्या किंचित बाहेर जात असल्याचं निष्पन्न झाल्याने बेरींग्टन वाचला. पण पुढच्याच ओव्हरमध्ये शापूरला मिडऑफवरुन फटकावण्याचा जोश डेव्हीचा प्रयत्नं पार फसला आणि मिडऑफला असलेल्या हमिद हसनने पुढे डाईव्ह मारत त्याचा अप्रतिम कॅच घेतला. नबीच्या पुढच्या ओव्हरमध्ये बेरींग्टनने कव्हर्समधून बाऊंड्री तड्कावली, पण दौलतच्या अचूक पडलेल्या आऊटस्विंगरवर बेरींग्टनची एज लागली आणि पुन्हा एकदा झझईने डाईव्ह मारत कॅच घेतला. ४६ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह बेरींग्टनने २५ रन्स काढल्या. स्कॉटलंड १४४ / ८!

स्कॉटलंडपुढे आता आव्हान होतं ते पूर्ण ५० ओव्हर्स खेळून काढण्याचं!
अद्याप १३ ओव्हर्स बाकी होत्या...

अनुभवी माजिद हकने हमिद हसनच्या फुलटॉसवर पॉईंटला बाऊंड्री मारली. दौलतच्या पुढच्या ओव्हरमध्ये अ‍ॅल्सडेअर इव्हान्स रनआऊट होण्यापासून थोडक्यात वाचला. हमिदच्या पुढच्या ओव्हरमध्ये इव्हान्सने त्याला कव्हर्समधून बाऊंड्री फटकावली. पुढच्याच ओव्हरमध्ये....

दौलतचा शॉर्टपीच बॉल ऑफस्टंपवर पडला...
माजिद हकने बॉल डिफेंड करण्याचा पवित्रा घेतला पण बॉल त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्तं बाऊंस झाला...
शेवटच्या क्षणी शांत डोक्याने माजिदने बॉल स्लिप्सच्या दिशेने खेळला पण....
माजिदच्या बॅटचा चक्कं तुकडा उडाला होता!

हमिद हसनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या नैबच्या बॉलवर इव्हान्सला थर्डमॅनला सुदैवी बाऊंड्री मिळाली. पण हा अपवाद वगळता हक आणि इव्हान्सने शांत डोक्याने १-२ रन्स काढत ५० ओव्हर्स पूर्ण खेळून काढण्यावरच भर दिला होता. नबीने जावेद अहमदीच्या ऑफब्रेक्सचाही प्रयोग करुन पाहिला पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. पण आश्चर्य म्हणजे समिउल्लाह शेनवारीच्या लेगब्रेक्सचा बहुतेक त्याला विसर पडला असावा! नबीने स्वतःच्या ऐवजी शापूरला बॉलिंगला आणल्यावर...

शापूरने लेगस्टंपवर यॉर्कर टाकण्याचा केलेला प्रयत्नं पार फसला....श
बॉल त्याच्या हातातून सुटला आणि माजिद हकच्या छातीच्या दिशेने बीमर गेला...
अनपेक्षित आलेल्या बीमरमुळे गोंधळलेल्या हकने त्या परिस्थितीतही डोकं शांत ठेवत तो फाईनलेगला पूल केला...
बॉल फाईनलेग बाऊंड्रीपार गेला...
स्क्वेअरलेग अंपायर रुचिरा पलियागुरगेने ताबडतोब नो-बॉलची खूण केली.

शापूरच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर हकने थर्डमॅनला बाऊंड्री मारली. ४९ व्या ओव्हरमध्ये इव्हान्सने नैबला मिडऑफवरुन बाऊंड्री तडकावली. त्याच ओव्हरमध्ये इव्हान्सच्या पॅडला लागून बॉल बाऊंड्रीपार गेल्यावर स्कॉटलंडला लेगबायची आयतीच बाऊंड्री मिळाली. अखेरच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर शापूरला फटकावण्याच्या नादात हकची टॉप एज लागली आणि पॉईंटला नैबने डाईव्ह मारत त्याचा कॅच घेतला. इनिंग्जचा शेवटचा बॉल कव्हर्समधून फटकावण्याचा इव्हान्सचा प्रयत्नं फसला आणि कव्हर्समध्ये मोहंमद नबीने त्याचा कॅच घेतला.

५० ओव्हर्सनंतर स्कॉटलंड २१० रन्समध्ये ऑलआऊट झाले होते!

माजिद हकने ५१ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह ३१ रन्स काढल्या होत्या. अ‍ॅल्सडेअर इव्हान्सने ३७ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह २८ रन्स फटकावल्या होत्या. या दोघांच्या ६२ रन्सच्या पार्टनरशीपमुळे स्कॉटलंडने वर्ल्डकपमध्ये प्रथमच २०० रन्सपार मजल मारली होती! प्रश्नं होता तो म्हणजे श्रीलंकेविरुद्ध २३० पेक्षा जास्तं रन्स काढणार्‍या अफगाण बॅट्समनना आव्हान देणासाठी हा स्कोर कितपत पुरेसा होता?

इयन वॉर्डलॉ आणि जोश डेव्ही यांच्या अचूक बॉलिंगमुळे जावेद अहमदी आणि नवरोज मंगल यांनी सावधपणे पहिल्या २ ओव्हर्समध्ये केवळ ३ रन्स काढल्या. पण त्यानंतर मात्रं अहमदीने आक्रमक पवित्रा घेत स्कॉटीश बॉलर्सची धुलाई करण्यास सुरवात केली. वॉर्डलॉच्या बॉलवर क्रीजमधून पुढे सरसावत कव्हर्समधून बाऊंड्री फटकावल्यावर डेव्हीच्या पुढच्या ओव्हरमध्ये अहमदीने पुन्हा क्रीजमधून पुढे येत मिडऑफवरुन बाऊंड्री तडकावली. डेव्हीच्या पुढच्या बॉलवर स्क्वेअरकट्ची बाऊंड्री मारण्यात त्याने कोणताही अनमान केला नाही. वॉर्डलॉच्या बॉलवर स्लिप्समध्ये मॉमसेनला मंगलचा कॅच घेता आला नाही, पण त्याच ओव्हरमध्ये अहमदीने पुन्हा पुढे सरसावत कव्हर्सवरुन बाऊंड्री तडकावली! वॉर्डलॉच्या पुढच्या ओव्हरमध्ये त्याने मिडविकेटला लागोपाठ २ बाऊंड्री फटकावल्या. पण पुढच्याच ओव्हरमध्ये....

इव्हान्सच्या पहिल्या २ बॉल्सवर मंगल आणि अहमदीने २ रन्स काढल्या....

इव्हान्सचा तिसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
मंगलने फ्रंटफूटवर येत कव्हरड्राईव्ह मारण्याचा केलेला प्रयत्नं सपशेल फसला...
बॉल सीम होऊन बॅट-पॅडमधून घुसला आणि मंगलचा ऑफस्टंप उडाला!
अफगाणिस्तान ४२ / १!

मंगलच्या ऐवजी बॅटींगला आलेल्या अशगर स्टॅनिकझाईने चौथा बॉल खेळून काढला...

पाचवा बॉल ऑफस्टंपच्या किंचित बाहेर पडला...
स्टॅनिकझाईने तो कव्हर्समधून तडकावला...
कव्हर्समध्ये असलेल्या मॅट मॅचानला कोणतीही संधी मिळाली नाही...
कव्हर्स बाऊंड्रीपार गेला...

शेवटच्या बॉलवर इव्हान्सच्या लेगकटरवर स्टॅनिकझाईच्या बॅटची एज लागली...
विकेटकीपर मॅथ्यू क्रॉसने कॅच घेण्यात कोणतीही चूक केली नाही...
अफगाणिस्तान ४६ / २!

स्टॅनिकझाई आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या समिउल्लाह शेनवारीने सावध पवित्रा घेत कोणतीही रिस्क न घेता स्कॉटीश बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. पण २ विकेट्स गेल्यानंतरही अहमदीचा आक्रमकपणा यत्किंचीतही कमी झाला नाही. इव्हान्सने शेनवारीला टाकलेल्या मेडन ओव्हरनंतर अहमदीने डेव्हीला मिडविकेटला पूलची बाऊंड्री फटकावली. इव्हान्सच्या पुढच्या ओव्हरमध्ये शेनवारीने कट्ची बाऊंड्री मारण्याची संधी दवडली नाही. डेव्हीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या माजिद हकच्या अचूक ओव्हरनंतर शेनवारीने पुन्हा इव्हान्सला कट्ची बाऊंड्री फटकावली. माजिद हकच्या अचूक बॉलिंगने अहमदीला फटकेबाजीची कोणतीही संधी मिळत नव्हती, पण शेनवारीने त्याला स्वीपची बाऊंड्री मारल्यावर पुन्हा बॉलिंगला आलेल्या इयन वॉर्डलॉला अहमदीने स्लीप्सवरुन बाऊंड्री मारली. अहमदी - शेनवारी यांनी ४१ रन्सची पार्टनरशीप केल्यावर...

रिची बेरींग्टनचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
नेहमीप्रमाणे क्रीजमधून पुढे सरसावत अहमदीने मिडऑनवरुन बॉल फटकावण्याचा प्रयत्नं केला...
त्याच्या अपेक्षेपेक्षा किंचित स्लो आलेला बॉल हवेत उंच गेला...
मिडऑनला मॅट मॅचानने कॅच घेण्यात कोणतीही कसूर केली नाही.

५१ बॉल्समध्ये ८ बाऊंड्रीसह जावेद अहमदीने ५१ रन्स फटकावल्या.
अफगाणिस्तान ८५ / ३!

अहमदी आऊट झाल्यावर पुढच्याच ओव्हरमध्ये जोश डेव्हीच्या बॉलवर कॅप्टन मोहंमद नबी एलबीडब्ल्यू झाला. नबीने अंपायर फ्रेच्या निर्णयाविरुद्ध डीआरएसचा आधार घेत थर्ड अंपायर रॉड टकरकडे दाद मागितली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढच्याच ओव्हरमध्ये....

बेरींग्टनचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
शेनवारीने फ्रंटफूटवर येत कव्हरड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नं केला...
अगदी शेवटच्या क्षणी बॉल सीम झाल्याने शेनवारीच्या बॅटची एज लागली पण...
पहिल्या स्लिपमध्ये माजिद हकला आपल्या डाव्या बाजूला कॅच घेता आला नाही...
शेनवारी थोडक्यात वाचला...

बेरींग्टनच्या त्याच ओव्हरचा शेवटचा बॉल मिडलस्टंपसमोर अफसर झझईच्या पॅडवर आदळला! बेरींग्टनच्या पुढच्या ओव्हरमध्ये नजिबुल्ला झादरानने कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली, पण आणखीन एक बॉलनंतर पुन्हा कव्हरड्राईव्ह मारण्याच्या नादात नजिबुल्लाच्या बॅटची एज लागली आणि यावेळी स्लिपमध्ये माजिद हकने कोणतीही चूक केली नाही. पुढच्याच ओव्हरमध्ये डेव्हीचा बंपर डिफेंड करण्याच्या प्रयत्नात गुलबदीन नैबच्या बॅटच्या हँडलला लागून बॉल उडाला आणि पुन्हा स्लिपमध्ये असलेल्या माजिद हकने उजवीकडे डाईव्ह मारत कॅच घेतला! ८५ / २ वरुन ६ ओव्हर्समध्ये अफगाणिस्तानची ९७ / ७ अशी घसरगुंडी उडाली होती!

अद्याप २६ ओव्हर्समध्ये अफगाणिस्तानला ११४ रन्सची आवश्यकता होती!

शेनवारीने डोकं शांत ठेवून स्कॉटीश बॉलर्सना खेळून काढण्यास सुरवात केली. डेव्हीने त्याला टाकलेल्या मेडन ओव्हरनंतरही फटकेबाजीच्या मोहात न पडता त्याने १-२ रन्स काढण्यावरच भर दिला होता. नैब आऊट झाल्यावर पुढच्या ६ ओव्हर्समध्ये १० रन्स निघाल्यावर वॉर्डलॉच्या ओव्हरमध्ये शेनवारीने मिडविकेट आणि मिडऑफला लागोपाठ २ बाऊंड्री तडकावल्या. वॉर्डलॉच्या ऐवजी बॉलिंगला आलेया बेरींग्टनला दौलत झादरानने लेग ग्लान्सची बाऊंड्री मारण्याची संधी सोडली नाही. ३३ ओव्हर्सनंतर अफगाणिस्तानचा स्कोर होता १२४ / ७!

शेवटच्या १७ ओव्हर्समध्ये अफगाणिस्तानला ८७ रन्स बाकी होत्या!

स्कॉटलंडचा कोच ग्रँट ब्रॅडबर्न चॅनल नाईनशी बोलताना म्हणाला,
"Our total wasn't enough but our bowling has shown outstanding character and our fielding has been great!"

माजिद हकच्या अचूक ओव्हरनंतर बेरींग्टनच्या पुढच्या ओव्हरमध्ये शेनवारीने स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री मारली. पण त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर....

बेरींग्टनचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
दौलतने तो मिडविकेटवरुन उचलण्याचा प्रयत्नं केला...
पण त्याच्या अपेक्षेपेक्षा बॉल काहीसा स्लो आल्याने त्याचा शॉट हवेत गेला...
शॉर्ट कव्हरला असलेल्या मॉमसेनने जवळपास मिडऑफपर्यंत धाव घेत कॅच घेतला...
नॉनस्ट्रायकर एन्डला असलेल्या शेनवारीने निराशेने बॅट क्रीजमध्ये आपटली!

शेनवारी - दौलत झादरान यांनी ३५ रन्सची पार्टनरशीप केली.
अफगाणिस्तान १३२ / ८!

शेनवारीपुढे आता जास्तीत जास्तं स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं आणि रन्स काढणं अशी दुहेरी कामगिरी उभी ठाकली!

दौलत झादरान आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या हमिद हसनने डोकं शांत ठेवत शेनवारीला सपोर्ट देण्याची भूमिका घेतली. बॅटींग पॉवरप्लेच्या पहिल्या ३ ओव्हर्समध्ये स्कॉटीश बॉलर्सच्या अचूक बॉलिंगमुळे शेनवारी - हमिद यांना केवळ ५ रन्स काढण्यात यश आलं, पण ३९ व्या ओव्हरमध्ये जोश डेव्हीच्या स्लो बॉलवर शेनवारीने मिडविकेटवरुन दणदणीत सिक्स ठोकली! डेव्हीच्या पुढच्या बॉलवर शेनवारीने कट्ची बाऊंड्री फटकावली. माजिद हकच्या पुढच्या ओव्हरमध्ये हमिदने लेटकट् मारली पण थर्डमॅनला बेरींग्टनने डाईव्ह मारून बाऊंड्री अडवल्यामुळे हसनला ३ रन्सवर समाधान मानावं लागलं.

१० ओव्हर्समध्ये अफगाणिस्तानला ५८ रन्स हव्या होत्या!

डेव्ही आणि इव्हान्सच्या अचूक बॉलिंगमुळे पुढच्या २ ओव्हर्समध्ये शेनवारीला फटकेबाजीची कोणतीही संधी मिळाली नाही. या २ ओव्हर्समध्ये अफगाणिस्तानला केवळ २ रन्स मिळाल्या पण पुन्हा बॉलिंगला आलेल्या माजिद हकच्या ओव्हरमध्ये शेनवारीने मिडविकेटवरुन सिक्स ठोकली! इव्हान्सच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या वॉर्डलॉने हसनला बंपर टाकण्याचा प्रयत्नं केला, पण हसनने बॅकफूटवर जात त्याला स्क्वेअरलेगला बाऊंड्री फटकावली, पण हकच्या पुढच्या ओव्हरमध्ये...

हमिद हसनने हकचा बॉल लेगसाईडला फ्लिक केला...
शेनवारीने १ रनसाठी कॉल दिला आणि तो धावत सुटला पण हमिदने क्रीजमधून एक पाऊलही पुढे टाकलं नव्हतं...
दरम्यान स्क्वेअरलेगला कॅलम मॅक्लीऑडने बॉल पिकअप केला...
एव्हाना अर्ध्या पीचपर्यंत पोहोचलेला शेनवारी परत फिरला पण त्याला आता उशीर झाल्याचं स्पष्टं दिसत होतं...
मॅक्लीऑडचा थ्रो माजिद हकच्या हाती आला पण त्याने बेल्स उडवण्यात अक्षम्यं दिरंगाई केली...
शेनवारीने जीवाच्या आकांताने क्रीजमध्ये डाईव्ह मारली!

हकचा शेवटचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
शेनवारीने तो स्क्वेअरलेगला स्वीप केला आणि १ रन काढली...
रन पूर्ण करताना शेनवारीची नेमकी हकशी टक्कर झाली...
शेनवारी आपल्या अंगावर धडकणार याची कल्पना आल्याने हकने दोन्ही हात पुढे केले होते....
शेनवारी सरळ त्याच्या मिठीतच शिरला...
ओव्हर संपल्यामुळे स्वतःला सावरत हक आपल्या फिल्डींग पोझीशनकडे जाण्यासाठी वळला पण...
....शेनवारी आपल्या मिठीतून हकला सोडायला तयार नव्हता...

नेमका काय प्रकार झाला याची कल्पना आल्यावर स्कॉटलंडचे खेळाडू, दोन्ही अंपायर्स आणि प्रेक्षकांमध्ये हास्यस्फोट झाला!

या गमतीशीर प्रसंगामुळे वातावरणातला ताण थोडा कमी झाला असला तरी माजिद हकच्या ओव्हरमध्ये केवळ २ रन्स निघाल्या होत्या. हकच्या पावलावर पाऊल टाकत वॉर्डलॉने अचूक बॉलिंग करत शेनवारीला फटकेबाजीची कोणतीही संधी दिली नाही. वॉर्डलॉच्या ओव्हरमध्ये शेनवारी - हसन यांना केवळ ३ रन्स काढता आल्या.

शेवटच्या ४ ओव्हर्समध्ये अफगाणिस्तानला अद्याप ३८ रन्सची आवश्यकता होती!

अराऊंड द विकेट बॉलिंग करणार्‍या माजिद हकचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
शेनवारीने क्रीजमधून पुढे सरसावत तो लेगसाईडला उचलला...
बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार गेला... सिक्स!

हकचा दुसरा बॉल वाईड गेला...

तिसरा बॉल लेगस्टंपच्या बाहेर पडला...
शेनवारीने स्क्वेअरलेगवरुन स्वीप मारला...
यावेळेस बॉल स्क्वेअरलेग बाऊंड्रीपार गेला...सिक्स!

चौथा बॉल अचूक पडलेला यॉर्कर होता. शेनवारीला त्यावर काहीच करता आलं नाही...

पाचवा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
शेनवारीने पुन्हा स्क्वेअरलेगवरुन स्वीप मारला...
बॉल पुन्हा स्क्वेअरलेग बाऊंड्रीपार असलेल्या प्रेक्षकांमध्ये गेला... सिक्स!

शेनवारीच्या फटकेबाजीने स्कॉटीश खेळाडू पार हादरले होते. स्कॉटलंडने जवळपास जिंकलेली मॅच त्याने पुन्हा अफगाणिस्तानच्या आवाक्यात आणली होती.

पहिल्या ५ बॉल्समध्ये शेनवारीने ३ सिक्स ठोकल्यावर शेवटच्या बॉलसाठी हक ओव्हर द विकेट बॉलिंगला आला...
ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला बॉल शेनवारीने पुन्हा मिडविकेटला उचलला...
पण यावेळी बॉल त्याच्या बॅटवर बरोबर बसला नव्हता....
मिडविकेट बाऊंड्रीवर जोश डेव्हीने शेनवारीचा कॅच घेतला!

निराश मनाने पॅव्हेलियनकडे परतणार्‍या शेनवारीला अंपायर्सनी थांबण्याची खूण केली...
हकने बॉल टाकला तेव्हा आवश्यक तेवढे फिल्डर्स ३० यार्ड सर्कलच्या बाहेर नसावेत अशी अंपायरर्सना शंका आली होती...
स्कॉटलंडचे फिल्डर्स योग्य पोझीशनमध्ये नसल्यास नियमाप्रमाणे तो नो-बॉल ठरला असता...
थर्ड अंपायर रॉड टकरने टीव्ही रिप्ले पाहून आवश्यक तेवढे स्कॉटीश फिल्डर्स योग्य पोझीशनमध्ये असल्याचं स्पष्टं केलं
स्कॉटलंडच्या खेळाडूंनी सुटकेचा नि:श्वास सोडला!

१४७ बॉल्समध्ये ७ बाऊंड्री आणि ५ सिक्स ठोकत समिउल्लाह शेनवारीने ९६ रन्स फटकावल्या.
अफगाणिस्तान १९२ / ९!

अद्याप ३ ओव्हर्समध्ये अफगाणिस्तानला १९ रन्स बाकी होत्या!

अफगाणिस्तानच्या सर्व आशा आता हमिद हसन आणि शापूर झादरान या दोघांवर होत्या. इव्हान्सच्या ४८ व्या ओव्हरमध्ये हमिद हसनने १ रन काढल्यावर शापूर विरुद्धचं कॅचचं अपिल अंपायर फ्रेने फेटाळून लावलं. प्रेस्टन मॉमसेनने डीआरएसचा आधार घेत थर्ड अंपायरकडे दाद मागितली, पण टीव्ही रिप्लेमध्ये बॉल शापूरच्या थायपॅडला लागून गेल्याचं स्पष्टं झालं! इव्हान्सच्या वाईडनंतर हमिद - शापूर यांनी शांत डोक्याने १-१ रन्स काढण्यावरच भर दिला...

शेवटच्या २ ओव्हर्समध्ये अफगाणिस्तानला १४ रन्स हव्या होत्या!

जोश डेव्ही, माजिद हक आणि अ‍ॅल्सडेअर इव्हान्स यांच्या १० ओव्हर्स संपल्या होत्या. कॅप्टन मॉमसेनसमोर असलेले दोन पर्याय होते ते म्हणजे रिची बेरींग्टन आणि इयन वॉर्डलॉ! मॉमसेनने ४९ व्या ओव्हरसाठी बेरींग्टनला बॉलिंगला आणलं....

बेरींग्टनच्या पहिल्या ३ बॉल्सवर हमिद आणि शापूरने ३ रन्स काढल्या...
ऑफस्टंपच्या बाहेर पडलेल्या चौथ्या बॉलवर हमिदला काहीच करता आलं नाही...

पाचवा बॉल हमिदच्या पॅडला लागून पॉईंटच्या दिशेने घरंगळला...
हमिद - शापूर यांनी लेगबाय काढण्यात कोणतीही हयगय केली नाही...

सहावा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला वाईड होता....
वाईड टाकल्यामुळे तो पुन्हा टाकणं बेरींग्टनला क्रमप्राप्तं होतं...

सातवा बॉल लेगस्टंपवर पडलेला स्लो शॉर्टपीच बॉल होता....
शापूरने शांत डोक्याने तो फाईनलेगला पूल केला.... बाऊंड्री!

अखेरच्या ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला केवळ ५ रन्सची आवश्यकता होती!

इयन वॉर्डलॉचा बॉल ऑफस्टंपवर पडलेला अचूक यॉर्कर होता...
हमिदची बॅट शेवटच्या क्षणी खाली आली आणि त्याच्या बॅटची एज लागली...
थर्डमॅन बाऊंड्रीवरुन धावत आलेल्या डेव्हीने बॉल पिकअप करेपर्यंत हमिद - शापूर यांनी १ रन पूर्ण केली...

५ बॉल्स - ४ रन्स!

दुसरा बॉल लेगस्टंपवर पडलेला स्लो बॉल होता...
शापूरने तो लेगसाईडला फ्लिक केला आणि १ रन काढण्यासाठी धूम ठोकली...
मिडविकेटवरुन धावत आलेल्या मॅचानने बॉल पिकअप केला...
हमिदने शापूरला परत पाठवलं पण एव्हाना उशीर झाला होता...
मॅचानने जेमतेम ६ यार्डांवरुन केलेला थ्रो स्टंप्सपासून काही सेंटीमीटर्सवरुन गेला...
शापूर रनआऊट होण्यापासून थोडक्यात बचावला...

४ बॉल्स - ४ रन्स!

वॉर्डलॉने तिसरा बॉल लेगस्टंपवर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्नं केला पण बॉल फुलटॉस आला...
शापूरने शांतपणे बॉल स्क्वेअरलेगला फ्लिक केला...
बॉलवर नजर ठेवूनच शापूर रन काढण्यासाठी धावत होता...
.... आणि बॉल बाऊंड्रीपार गेला!

शापूर दोन्ही हात उंचावत गुडघ्यांवर बसला...
काही क्षणांत हमिदने त्याला गाठून मिठी मारली...
अफगाणिस्तानचे सर्व खेळाडू मैदानावर धावून आले...

अवघ्या १ विकेटने अफगाणिस्तानने मॅच जिंकली!

वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने मिळवलेला हा पहिला विजय होता!
तिसर्‍या वर्ल्डकपमध्ये खेळणार्‍या स्कॉटलंडला अद्यापही एकही मॅच जिंकता आली नव्हती!

स्कॉटलंडचा कॅप्टन प्रेस्टन मॉमसेन म्हणाला,
"We knew what to expect. We knew if we were patient we can take a couple of wickets and get more. We had them seven down, but we couldn't do it. Obviously we were trying to take wickets the whole time. Those 8, 9, 10, but unfortunately it wasn't to be. Particularly difficult for us!"

मोहंमद नबी म्हणाला,
"This is our first win in the World Cup! The pressure was great. The boys didn't bat well, four five wickets early but Sami played very well. Good learning experience about handling the pressure."

मॅन ऑफ द मॅच म्हणून अर्थातच ९९ / ७ अशा अवस्थेत सापडलेल्या अफगाणिस्तानला जवळपास एकहाती विजय मिळवून देणार्‍या समिउल्लाह शेनवारीची निवड झाली!

शेनवारी म्हणाला,
"We lost five wickets early. So I had the responsibility to stay there till the end. I was just telling them to just stay at the wicket, and the wicket was not doing anything. I was trying to get a six when I got out caught on the boundary, but thats part of the game."

आजतागायत स्कॉटलंडला ३ वर्ल्डकपमधल्या १४ मॅचेसपैकी एकही मॅच जिंकता आलेली नाही!

क्रीडालेख