वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - इंग्लंड विरुद्ध आयर्लंड

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
5 Mar 2017 - 9:36 am

२ मार्च २०११
चिन्नास्वामी, बँगलोर

बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये ग्रूप बी मधली इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातली मॅच रंगणार होती. अवघ्या ३ दिवसांपूर्वी याच स्टेडीयमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टाय झालेल्या मॅचची धुंदी अद्याप बँगलोरच्या प्रेक्षकांवरुन उतरलेली नव्हती. हॉलंडविरुद्धं पहिली मॅच कण्हतकुंथत जिंकल्यावर आणि भारताविरुद्धची मॅच टाय झाल्यामुळे इंग्लंडच्या दृष्टीने ही मॅच महत्वाची होती. २०१५ च्या पुढल्या वर्ल्डकपमध्ये टेस्ट स्टॅटस न मिळालेल्या संघांची संख्या मर्यादीत करण्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे आयर्लंडच काय पण इतर असोसिएट संघांमध्येही नाराजी पसरलेली होती. बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये आयर्लंडच्या पदरी पराभव आला होता. त्यामुळे या मॅचमध्ये चांगली कामगिरी करुन आपली छाप सोडण्यासाठी आयरीश संघ उत्सुक होता.

तीन दिवसांपूर्वी भारताविरुद्धं टाय झालेल्या मॅचमधील संघच इंग्लंडने या मॅचसाठी मैदानात उतरवला होता. इंग्लंडच्या संघात स्वतः कॅप्टन अँड्र्यू स्ट्राऊस, केव्हीन पीटरसन, जोनाथन ट्रॉट, इयन बेल असे बॅट्समन होते. इंग्लंडच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने जेम्स अँडरसन, स्ट्युअर्ट ब्रॉड, ग्रॅहॅम स्वान यांच्यावर होता. त्यांच्या जोडीला मायकेल यार्डी आणि टिम ब्रेस्नन होते. पॉल कॉलिंगवूडसारखा ऑलराऊंडर आणि मॅट प्रायरसारखा विकेटकीपर बॅट्समन यांचाही इंग्लिश संघात समावेश होता.

विल्यम पोर्टरफिल्डच्या आयरीश संघात स्वतः पोर्टरफिल्ड, पॉल स्टर्लींग, एड जॉईस, नियाल ओब्रायन, गॅरी विल्सन असे बॅट्समन होते. एड जॉईस २००७ च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडकडून आयर्लंडविरुद्ध खेळल्यावर आता स्वगृही परतला होता. आयर्लंडच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने होता तो बॉईड रॅन्कीन, अनुभवी ट्रेंट जॉन्स्टन आणि लेफ्टआर्म स्पिनर जॉर्ज डॉकरेल यांच्यावर. आयर्लंडच्या संघाचं वैशिष्ट्यं म्हणजे संघात असलेले ऑलराऊंडर्स! केव्हीन ओब्रायन, अ‍ॅलेक्स क्युसॅक आणि जॉन मूनी असे ३ ऑलराऊंडर्स आयर्लंडच्या संघात होते. प्रमुख बॅट्समनपैकी एक असलेल्या नियाल ओब्रायनने विकेटकिपींगची जबाबदारी घेतलेली असल्याने आयर्लंडला इतके ऑलराऊंडर्स खेळवणं शक्यं झालं होतं!

अ‍ॅंड्र्यू स्ट्राऊसने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. स्ट्राऊस आणि केव्हीन पीटरसन यांनी सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत आयरीश बॉलर्सना फटकावण्यास सुरवात केली. बॉईड रॅन्कीनच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मिडविकेटला बाऊंड्री मारल्यावर पीटरसनने रॅन्कीनच्या पुढच्या ओव्हरमध्ये लागोपाठ २ बाऊंड्री फटकावल्या. ट्रेंट जॉन्स्टनला कट्ची बाऊंड्री मारल्यावर रॅन्कीनला पूल करण्याच्या प्रयत्नात स्ट्राऊसच्या बॅटची टॉप एज लागली पण त्याच्या सुदैवाने फाईनलेगला असलेल्या जॉर्ज डॉकरेलच्या डोक्यावरुन बॉल बाऊंड्रीपार गेल्याने त्याला सिक्स मिळाली! रॅन्कीनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या अ‍ॅलेक्स क्युसॅकच्या पहिल्याच ओव्हरमध्ये स्ट्राऊस - पीटरसन यांनी २ बाऊंड्री मारल्यावर जॉन्स्टनच्या पुढच्या ओव्हरमध्ये पीटरसनने लाँगऑफवरुन दणदणीत सिक्स ठोकली. १० ओव्हर्सनंतर इंग्लंडचा स्कोर होता ७२ / ०!

केव्हीन पीटरसनला हमखास त्रासदायक ठरणारा बॉलर म्हणजे लेफ्टआर्म स्पिनर! पोर्टरफिल्डने हे ध्यानात ठेवून जॉर्ड डॉकरेलला बॉलिंगला आणलं. डॉकरेलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये पीटरसन एलबीडब्ल्यू होण्यापासून थोडक्यात वाचला, पण डॉकरेलच्या पुढच्या ओव्हरमध्ये ऑफस्टंपच्या बाहेर जात फाईनलेगवरुन बॉल उचलण्याचा स्ट्राऊसचा प्रयत्नं पार फसला आणि त्याची दांडी उडाली. ३७ बॉल्समध्ये २ बाऊंड्री आणि १ सिक्ससह स्ट्राऊसने ३४ रन्स फटकावल्या. मजेदार गोष्टं म्हणजे नेमका त्याच दिवशी स्ट्राऊसचा ३४ वा वाढदिवस होता! ३४ व्या वाढदिवशी स्ट्राऊस ३४ रन्सवर आऊट झाला होता! इंग्लंड ९१ / १!

स्ट्राऊस परतल्यावर बॅटींगला आलेल्या जोनाथन ट्रॉटने सुरवातीला आक्रमक पवित्रा घेत जॉन मूनीच्या १५ व्या ओव्हरमध्ये लागोपाठ २ बाऊंड्री तडकावल्या. त्याच ओव्हरमध्ये मूनीच्या किंचित शॉर्टपीच पडलेल्या बॉलवर पीटरसनने मिडविकेट बाऊंड्रीवर दणदणीत सिक्स ठोकल्यावर पोर्टरफिल्डने त्याच्याऐवजी पॉल स्टर्लींगला बॉलिंगला आणलं. ही चाल अपेक्षेपेक्षा यशस्वी ठरली. स्टर्लींगच्या पहिल्याच ओव्हरमध्ये पीटरसनचा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्नं पार फसला आणि त्याच्या बॅटची टॉप एज लागली. विकेटकीपर नियाल ओब्रायनने कॅच घेण्यात कोणतीही कसूर केली नाही.

५० बॉल्समध्ये ७ बाऊंड्री आणि २ सिक्ससह पीटरसनने ५९ रन्स फटकावल्या.
तो आऊट झाला तेव्हा १७ ओव्हर्समध्ये इंग्लंडचा स्कोर होता १११ / २!

पीटरसन आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या इयन बेलने कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढण्यावरच भर दिला. स्टर्लींग आणि डॉकरेलच्या ऐवजी बॉलिंगला आलेला जॉन मूनी यांच्या अचूक बॉलिंगमुळे बेल - ट्रॉट यांना फटकेबाजीची कोणतीही संधी मिळत नव्हती. स्टर्लींगच्या बॉलवर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात ट्रॉटच्या बॅटची आऊटसाईड एज लागली आणि बॉल थर्डमॅन बाऊंड्रीपार गेला, पण हा अपवाद वगळता आयरीश बॉलर्सनी बेल आणि ट्रॉट यांना पार जखडून ठेवलं होतं. २५ ओव्हर्सनंतर इंग्लंडचा स्कोर होता १४४ / २!

मूनीच्या ऐवजी क्युसॅक बॉलिंगला आल्यावर बेलने त्याला लॉंगऑनवर बाऊंड्री फटकावली. स्टर्लिंगच्या पुढच्या ओव्हरमध्ये ट्रॉटने बेलच्या पावलावर पाऊल टाकत मिडविकेटला बाऊंड्री तडकावली. क्युसॅकच्या ऐवजी बॉलिंगला आलेला डॉकरेल आणि स्टर्लींगच्या पुढच्या २ ओव्हर्समध्ये केवळ ६ रन्स निघाल्यावर बेलने क्रीजमधून पुढे सरसावत डॉकरेलला लाँगऑफवर सिक्स ठोकली! डॉकरेलच्या पुढच्या ओव्हरमध्ये बेल - ट्रॉट यांनी २ बाऊंड्री फटकावल्यावर पोर्टरफिल्डने त्याच्या ऐवजी रॅन्कीनला बॉलिंगला आणलं, पण बेलने त्यालाही मिड्विकेटला पूलची बाऊंड्री तडकावल्यावर त्याच्या ऐवजी जॉन्स्टन बॉलिंगला आला, पण बेलला काहीच फरक पडला नाही. जॉन्स्टन आणि पुन्हा बॉलिंगला आलेला डॉकरेल यांना बाऊंड्री तडकाव्ण्यात त्याने कोणतीही हयगय केली नाही. बेलची फटकेबाजी सुरु असताना ट्रॉट थंड डोक्याने कोणतीही रिस्क न घेता स्ट्राईक रोटेट करत होता. बेल - ट्रॉट यांच्या पार्टनरशीपमुळे पोर्टरफिल्ड हैराण झालेला असतानाच इंग्लंडने बॅटींग पॉवरप्ले घेतला...

डॉकरेलच्या ओव्हरमध्ये ८ रन्स गेल्यावर पोर्टरफिल्डने क्युसॅकला बॉलिंगला आणलं. क्युसॅकच्या दुसर्‍या बॉलवर इंग्लंडला ५ वाईडचा फुकटचा बोनस मिळाल्यावर ट्रॉटने शेवटच्या २ बॉल्सवर मिडविकेटला २ बाऊंड्री तडकावल्या. डॉकरेलच्या पुढच्या ओव्हरमध्ये पुन्हा इंग्लंडला ५ वाईड्सची खिरापत मिळाल्यावर पोर्टरफिल्ड हवालदील झाला. क्युसॅकच्या ओव्हरमध्ये १६ रन्स फटकावल्या गेल्यामुळे त्याच्याऐवजी जॉन्स्टन बॉलिंगला आणण्यावाचून पोर्टरफिल्डला पर्याय राहीला नाही. ट्रॉट - बेल यांनी २६ ओव्हर्समध्ये १६७ रन्स फटकावल्यावर...

यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात मूनीचा बॉल फुलटॉस आला...
बेलने तो लेगसाईडला फ्लिक केला पण....
मिडविकेटला स्टर्लींगने डाव्या बाजूला डाईव्ह मारत अप्रतिम कॅच घेतला...

८६ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री आणि डॉकरेलला मारलेल्या सिक्ससह बेलने ८१ रन्स फटकावल्या.
इंग्लंड २७८ / ३!

बेल परतल्यावर जेमतेम १० रन्सची भर पडते तोच मूनीच्या पुढच्या ओव्हरमध्ये ड्राईव्ह मारण्याचा ट्रॉटचा प्रयत्नं पार फसला आणि त्याचा ऑफस्टंप उडाला!
९२ बॉल्समध्ये ९ बाऊंड्रीसह ट्रॉटने ९२ रन्स फटकावल्या.
इंग्लंड २८८ / ४!

ट्रॉट परतल्यावर पुढच्याच ओव्हरमध्ये जॉन्स्टनला पॉईंटला फटकावण्याचा मॅट प्रायरचा प्रयत्नं जॉन्स्टनच्या चाणाक्षपणे टाकलेल्या स्लो बॉलमुळे साफ फसला आणि तो बोल्ड झाला. पॉल कॉलिंगवूडने मूनीला लाँगऑनवर दणदणीत सिक्स ठोकली, पण त्याच ओव्हरमध्ये मूनीला पुन्हा फटकावण्याच्या नादात लाँगऑनला केव्हीन ओब्रायनने त्याचा कॅच घेतला. रॅन्कीनच्या अचूक बॉलिंगमुळे ४८ व्या ओव्हरमध्ये टिम ब्रेस्नन आणि मायकेल यार्डी यांना केवळ ३ रन्स काढता आल्या. पुढच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर गॅरी विल्सनने मिडविकेट बाऊंड्रीवर यार्डीचा कॅच ड्रॉप केला पण आणखीन दोन बॉल्सनंतर जॉन्स्टनच्या स्लो बॉलने प्रायरप्रमाणेच यार्डीलाही चकवलं आणि तो बोल्ड झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये ग्रॅहॅम स्वानने मूनीला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. अखेर शेवटच्या बॉलवर मिडविकेटला जॉन्स्टनने ब्रेस्ननचा कॅच घेतला. शेवटच्या ९ ओव्हर्समधल्या ६० रन्समध्ये इंग्लंडच्या ६ विकेट्स उडाल्या होत्या.

५० ओव्हर्सनंतर इंग्लंडचा स्कोर होता ३२७ / ८!

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये ३३८ रन्स फटकावूनही इंग्लंड्ला टाय वर समाधान मानावं लागलं होतं. तुलनेने आयर्लंडविरुद्धं इंग्लंडला ३२७ पर्यंत मजल मारता आली होती. प्रश्नं होता तो म्हणजे आयर्लंडच्या अननुभवी खेळाडूंना हे आव्हान कितपत पेलणार होतं?

पहिल्याच बॉलवर....
जेम्स अँडरसनचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला....
विल्यम पोर्टरफिल्डने फ्रंटफूटवर येत कव्हरड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नं केला पण...
पोर्टरफिल्डच्या बॅटची इनसाईड एज लागून बॉल स्टंपवर गेला...
आयर्लंड ० / १!

पोर्टरफिल्ड आऊट झाल्यावर एड जॉईस बॅटींगला आला. २००७ च्या वर्ल्डकपमध्ये जॉईस इंग्लंडकडून आयर्लंडविरुद्धं ओपनिंगला आला होता आणि आता ४ वर्षांनी आयर्लंडकडून पहिल्याच ओव्हरमध्ये इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरला होता.

दुसर्‍या ओव्हरमध्ये स्ट्युअर्ट ब्रॉडचा बॉल जॉईसच्या पॅडवर आदळल...
इंग्लिश खेळाडूंनी एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपिल केलं, पण अंपायर आलिम दरने ते फेटाळून लावलं...
ब्रॉडच्या आग्रहामुळे स्ट्राऊसने डीआरएसचा वापर करत थर्ड अंपायर मरायस इरॅस्मसकडे दाद मागितली...
हॉक-आय बॉल ट्रॅकींगमध्ये ब्रॉडचा बॉल लेगस्टंपच्या बाहेर पडल्याचं निष्पन्नं झालं...
जॉईसला आऊट देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता!

जॉईसविरुद्धच्या एलबीडब्ल्यूच्या अपिलनंतर त्याच ओव्हरमध्ये पॉल स्टर्लींगने एक पायावर गिरकी घेत खास कॅरेबियन स्टाईलमध्ये दणदणीत सिक्स ठोकली! अँडरसनने जॉईसला टाकलेल्या मेडन ओव्हरनंतर ब्रॉडच्या पुढच्या ओव्हरमध्ये स्टर्लींगने २ बाऊंड्री फटकावल्या. अँडरसनला जॉईसने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री मारल्यावर स्टर्लींगने पुन्हा ब्रॉडला लाँगऑनला बाऊंड्री तडकावली. जॉईसने अँडरसनला थर्डमॅनला बाऊंड्री मारल्यावर आयर्लंडला लेगबाईजच्या ४ रन्सचा बोनसही मिळाला. ब्रॉड ऐवजी बॉलिंगला आलेल्या टिम ब्रेस्ननच्या अचूक ओव्हरनंतर स्टर्लींगने अँडरसन ऐवजी बॉलिंगला आलेल्या मायकेल यार्डीला कव्हर्समधून बाऊंड्री फटकावली. ब्रेस्ननच्या पुढच्या ओव्हरमध्ये जॉईस - स्टर्लींग यांनी बाऊंड्री फटकावल्या, पण त्याच ओव्हरमध्ये पूल करण्याच्या नादात स्टर्लींगची टॉप एज लागली आणि स्क्वेअलेगला केव्हीन पीटरसनने त्याचा कॅच घेतला. २८ बॉल्समध्ये ५ बाऊंड्री आणि ब्रॉडल ठोकलेल्या सिक्ससह स्टर्लींगने ३२ रन्स फटकावल्या. आयर्लंड ६२ / २!

स्टर्लींग आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या नियाल ओब्रायनने इंग्लंडच्या बॉलर्सना सावधपणे खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. यार्डीच्या ऐवजी बॉलिंगला आलेला ग्रॅहॅम स्वान आणि ब्रेस्नन यांच्या अचू़क बॉलिंगमुळे जॉईस आणि नियाल ओब्रायन यांना फटकेबाजीची कोणतीही संधी मिळत नव्हती. ब्रेस्ननच्या बॉलवर अ‍ॅक्रॉस द लाईन फटकेबाजीच्या नादात जॉईसची टॉप एज लागली, पण प्रायरला हा कॅच घेता आला नाही. स्वान - ब्रेस्ननच्या ४ ओव्हर्समध्ये केवळ ६ रन्स निघाल्यावर वैतागलेल्या नियाल ओब्रायनने स्वानला लाँगऑफला फटकावण्याचा प्रयत्नं केला. लाँगऑफ बाऊंड्रीवर असलेल्या अँडरसनला हा कॅच घेता आला नाहीच, वर बॉल बाऊंड्रीपार गेल्याने त्याला सिक्स मिळाली! ब्रेस्ननच्या पुढच्या ओव्हरमध्ये नियाल ओब्रायनने २ बाऊंड्री तडकावल्या पण स्वानला फटकावणं मात्रं जॉईस आणि नियाल ओब्रायन दोघांनाही जमत नव्हतं. अखेर स्वानला स्लॉग स्वीप मारण्याचा ओब्रायनचा प्रयत्नं फसला आणि तो बोल्ड झाला. आयर्लंड १०३ / ३!

नियाल ओब्रायन परतल्यावर आलेल्या गॅरी विल्सनला रन्स काढणं कठीण जात होतं. पॉल कॉलिंगवूडच्या बॉलवर ड्राईव्ह मारण्याचा विल्सनचा प्रयत्नं फसला, पण डाईव्ह मारुनही कॉलिंगवूडला हा कॅच घेता आला नाही. पुढच्याच ओव्हरमध्ये...

स्वानचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
जॉईस बॉल फटकावण्यासाठी क्रीजमधून पुढे सरसावला पण...
टप्पा पडल्यावर बॉल स्पिन झाला आणि डिफेंड करण्याच्या प्रयत्नात असलेला जॉईस पार फसला...
प्रायरने आरामात बॉल कलेक्ट करुन बेल्स उडवल्या...

६१ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह जॉईसने ३२ रन्स काढल्या.
आयर्लंड १०६ / ४!

जॉईस आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या केव्हीन ओब्रायनने स्वानला कव्हर्समधून ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नं केला, पण त्याच्या बॅटची एज लागून बॉल थर्डमॅन बाऊंड्रीपार गेला! स्वानच्या पुढच्या ओव्हरमध्ये गॅरी विल्सन एलबीडब्ल्यू असल्याचा अंपायर आलिम दारने निर्णय दिला. विल्सनने डीआरएस वापरुन थर्ड अंपायरकडे दाद मागितली, पण मिडस्टंपच्या समोर बॉल त्याच्या पॅडवर आदळलेला असल्याने त्याला कोणतीही संधी मिळण्याची शक्यताच नव्हती. आयर्लंड १११ / ५!

अद्याप आयर्लंडला २५ ओव्हर्समध्ये तब्बल २१५ रन्स बाकी होत्या...
त्यातच आयर्लंडच्या ५ विकेट्स गेल्यामुळे इंग्लंडने मॅच जिंकल्यात जमा होती!

केव्हीन ओब्रायनने आक्रमक पवित्रा घेत इंग्लंडच्या बॉलर्सना फटकावून काढण्यास सुरवात केली. यार्डीच्या ओव्हरमध्ये दोन बाऊंड्री फटकावल्यावर पुढच्या ओव्हरमध्ये त्याने स्वानला मिडविकेटवरुन दोन दणदणीत सिक्स ठोकल्या. स्ट्राऊसने यार्डीच्या ऐवजी ब्रॉडला बॉलिंगला आणलं पण केव्हीन ओब्रायनने त्यालाही कट्ची बाऊंड्री मारली. ब्रॉडच्या पुढच्या ओव्हरमध्ये ओब्रायनच्या पावलावर पाऊल टाकत अ‍ॅलेक्स क्युसॅकने लागोपाठ २ बाऊंड्री फटकावल्या. स्वानच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या अँडरसनच्या अचूक ओव्हरमध्ये केवळ १ रन निघाल्यावर केव्हीन ओब्रायन - क्युसॅक यांनी बॅटींग पॉवरप्ले घेण्याचा निर्णय घेतला!

बॅटींग पॉवरप्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राऊसने यार्डीला बॉलिंगला आणलं. यार्डीच्या तिसर्‍या बॉलवर आयर्लंडला ४ बाईजचा बोनस मिळाल्यावर ओब्रायनने फाईनलेगला २ बाऊंड्री तडकावत १६ रन्स वसूल केल्या. अँडरसनचा शॉर्टपीच बॉल ओब्रायनने मिडविकेट बाऊंड्रीपार पूल करत दणदणीत सिक्स ठोकली. यार्डीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या ब्रेस्ननला कव्हरड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात ओब्रायनच्या बॅटची एज लागली आणि त्याला थर्डमॅनला बाऊंड्री मिळाली. ब्रेस्ननच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर ओब्रायनने लेगसाईडला सरकत एक्ट्राकव्हरवरुन सिक्स ठोकली!

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला मार्क निकोलस म्हणाला,
"And that’s the stroke of the day! Look no further! Six over square cover by a rampant Kevin O’Brian!"

अँडरसनच्या पुढच्या ओव्हरमध्ये केव्हीन ओब्रायनच्या बॅटची इनसाईड एज लागून फाईनलेगला बाऊंड्री गेल्यावर पुढच्या बॉलवर त्याने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. पण एवढ्यावरच समाधान मानेल तर तो ओब्रायन कसला...

अँडरसनचा बॉल लेगस्टंपवर पडला...
लेगस्टंपच्या बाहेर तयारीतच असलेल्या केव्हीन ओब्रायनने तो मिडविकेटला उचलला....
बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार गेला... सिक्स!
ओब्रायनची ही सिक्स या वर्ल्डकपमधली सर्वात मोठी सिक्स ठरली... १०२ मीटर्स!

अँडरसनच्या ओव्हरमध्ये १७ रन्स झोडपल्या गेल्या होत्या!

मार्क निकोलस म्हणाला,
"Thats a maximum! Seventeen from the Anderson over. Go Ireland Go!!"

यार्डीच्या पुढच्या ओव्हरमध्येही ओब्रायनने बाऊंड्री फटकावण्यात कोणतीही कसूर केली नाही...
बॅटींग पॉवरप्लेच्या ५ ओव्हर्समध्ये ओब्रायन - क्युसॅक यांनी ६२ रन्स ठोकून काढल्या होत्या!

शेवटच्या १४ ओव्हर्समध्ये आयर्लंडला ९९ रन्सची आवश्यकता होती!

केव्हीन ओब्रायनच्या आतषबाजीने इंग्लिश खेळाडू चांगलेच हादरलेले होते. अँडरसनची धुलाई झाल्याने स्ट्राऊसने त्याच्याऐवजी ब्रेस्ननला बॉलिंगला आणलं, पण केव्हीन ओब्रायनला आवरणं आता अशक्यं झालं होतं. ब्रेस्ननच्या शॉर्टपीच बॉलवर स्क्वेअरलेगला बाऊंड्री तडकावल्यावर पुढच्या बॉलवर त्याने मिडविकेटला सिक्स ठोकली! पुढच्या ओव्हरमध्ये यार्डीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या कॉलिंगवूडच्या अचूक बॉलिंगमुळे ओब्रायन - क्युसॅक यांना पहिल्या ५ बॉल्सवर फक्तं ३ रन्स काढता आल्या...

कॉलिंगवूडचा शेवटचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
ओब्रायनने पुन्हा एकदा मिडविकेटवरुन सिक्स ठोकण्याचा प्रयत्नं केला पण....
बॉल त्याच्या बॅटच्या टॉप एजला लागून मिडऑनला हवेत उंचच उंच गेला...
स्ट्राऊस बॉलचा अंदाज घेत कॅच घेण्यासाठी योग्य पोझीशनमध्ये आला पण...
शेवटच्या क्षणी बॉल त्याच्या हातातून सुटला!

पुढच्याच ओव्हरमध्ये ब्रेस्ननच्या ऐवजी बॉलिंगला परतलेल्या यार्डीला स्वतःच्याच बॉलिंगवर क्युसॅकचा स्ट्रेट ड्राईव्ह पकडता आला नाही. ओब्रायनची आतषबाजी सुरु असताना चाणाक्षपणे स्ट्राईक रोटेट करत असलेल्या क्युसॅकने कॉलिंगवूडला मिडविकेटवरुन दणदणीत सिक्स ठोकल्यावर स्ट्राऊस अधिकच हतबल झाला. त्याच ओव्हरमध्ये केव्हीन ओब्रायनने कॉलिंगवूडला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकवण्यात कोणतीही हयगय केली नाही! यार्डीच्या पुढच्या ओव्हरमध्ये क्युसॅकने क्रीजमधून पुढे सरसावत स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री फटकावल्यावर....

यार्डीचा फुलटॉस ओब्रायनने स्क्वेअरलेगला फ्लिक केला आणि २ रन्ससाठी कॉल दिला....
स्क्वेअरलेग बाऊंड्रीवरुन बेलचा थ्रो येण्यापूर्वी ओब्रायन - क्युसॅक यांनी आरामात २ रन्स पूर्ण केल्या...

केव्हीन ओब्रायनची सेंचुरी पूर्ण झाली...
वर्ल्डकपच्या इतिहासातली ही सर्वात जलद गतीने ठोकलेली सेंचुरी होती...
अवघ्या ५० बॉल्समध्ये!

स्टेडीयममध्ये हजर असलेल्या आयर्लंडच्या सपोर्टर्ससह यच्चयावत प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला...
केव्हीन ओब्रायनचा पराक्रम पाहण्यास ओब्रायन बंधूंचे आई-वडील प्रेक्षकांत हजर होते!

ओब्रायनची सेंचुरी पूर्ण झाल्यावर पुढच्याच ओव्हरमध्ये....
स्ट्युअर्ट ब्रॉडचा ऑफस्टंपवर पडलेला बॉल ओब्रायनने ऑफसाईडला खेळला...
ओब्रायनने रन काढण्यासाठी क्रीज सोडल्यावर क्युसॅकने त्याला प्रतिसाद दिला...
पॉईंटवर कॉलिंगवूडने बॉल पिकअप केलेला पाहून ओब्रायन थबकला...
क्युसॅक मागे वळला आणि क्रीज गाठण्यासाठी त्याने जिवाच्या आकांताने डाईव्ह मारली पण...
कॉलिंगवूडचा थ्रो कलेक्ट करुन ब्रॉडने स्टंपचा वेध घेतला होता...
क्युसॅक रनआऊट झाला...

५८ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि १ सिक्ससह क्युसॅकने ४७ रन्स फटकावल्या.
ओब्रायन आणि क्युसॅक यांनी १६२ रन्सची पार्टनरशीप करुन इंग्लंडची हवा पार तंग करुन टाकली होती!
आयर्लंड २७३ / ६!

क्युसॅक म्हणतो,
"Kevin was hitting them so well that I thought if I could just get the singles and get him on strike and chip in with a two or a four or whatever as well, that would keep the partnership ticking."

अद्याप ८ ओव्हर्समध्ये आयर्लंडला ५३ रन्स हव्या होत्या!

क्युसॅक आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या जॉन मूनीने कोणतीही रिस्क न घेता इंग्लिश बॉलर्सना खेळून काढण्याचा पवित्रा घेतला. केव्हीन ओब्रायननेही शेवटपर्यंत खेळून मॅच खेचून आणण्याच्या इराद्याने फटकेबाजी आवरती घेतली, पण त्यामुळे परिणाम असा झाला की ब्रेस्ननच्या पुढच्या ओव्हरमध्ये केवळ ४ रन्स निघाल्या. ब्रॉडच्या पुढच्या ओव्हरमध्ये पहिल्या ५ बॉल्समध्ये ५ रन्स निघाल्यावर शेवटच्या बॉलवर मूनीच्या बॅटची एज लागून बॉल थर्डमॅनला गेला आणि आयर्लंडला सुदैवी बाऊंड्री मिळाली! ब्रेस्ननच्या पुढच्या ओव्हरमध्येही पहिल्या बॉलवर केव्हीन ओब्रायनने १ रन काढल्यावर पुढच्या ४ बॉल्सवर मूनीला काहीच करता आलं नाही, पण पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवर त्याच्या बॅटची एज लागून बॉल थर्डमॅन बाऊंड्रीवर धडकला, पण ब्रॉडच्या पुढच्या ओव्हरमध्ये मूनीने कव्हर्समधून बाऊंड्री तडकावण्यात कोणतीही कसूर केली नाही. ब्रेस्ननच्या पुढच्या ओव्हरमध्ये लेगसाईडला सरकत त्याने पॉईंटला बाऊंड्री तडकावल्यावर स्ट्राऊसला काय करावं ते समजेना!

शेवटच्या ३ ओव्हर्समध्ये आयर्लंडला २० रन्सची आवश्यकता होती!

स्ट्राऊसने ब्रॉडच्या ऐवजी अँडरसनला बॉलिंगला आणलं. अँडरसनच्या पहिल्या ५ बॉल्समध्ये ओब्रायन - मूनी यांना केवळ ४ रन्स काढता आल्या पण शेवटच्या बॉलवर मूनीने मिडविकेटला बाऊंड्री तडकावली!

२ ओव्हर्समध्ये आयर्लंडला १२ रन्स बाकी होत्या!

स्ट्राऊसने पुन्हा ब्रॉडला बॉलिंगला आणलं. ब्रॉडचा पाय दुखावल्याने तो काहीसा अस्वस्थंच होता, पण तरीही स्ट्राऊसने त्याला बॉलिंगला आणलं होतं...

ब्रॉडचा पहिलाच बॉल अचूक यॉर्कर होता...
केव्हीन ओब्रायनने तो स्क्वेअरलेगला खेळला आणि १ रन पूर्ण केली....
स्क्वेअरलेग बाऊंड्रीवरुन आलेल्या इयन बेलने बॉल पिकअप करण्यापूर्वी ओब्रायन दुसरी रन काढण्यासाठी वळला...
मूनीने अर्थातच दुसर्‍या रनसाठी प्रतिसाद दिला...
बेलचा थ्रो स्टंप्सपासून उंचावर होता पण प्रायरने तो कलेक्ट करुन बेल्स उडवल्या...
ओब्रायनने रन पूर्ण करण्यासाठी क्रीजमध्ये डाईव्ह मारली होती...

कॉमेंट्रीबॉक्समध्ये होता डेव्हीड लॉईड!
"This is real close! He’s taken the drive O’Brian! He might just make it!...."

नेमक्या याच क्षणी ओब्रायनच्या आई-वडीलांवर कॅमेरा फोकस झाला..
"Mom, what do you think?"

अंपायर आलिम दरने हा निर्णय थर्ड अंपायर मरायस इरॅस्मसकडे सोपवला...
केव्हीन ओब्रायन रनआऊट झाला!

६३ बॉल्समध्ये १३ बाऊंड्री आणि ६ सिक्स ठोकत इंग्लिश बॉलर्सची मनसोक्तं धुलाई करत केव्हीन ओब्रायनने ११३ रन्स झोडपून काढल्या!
आयर्लंड ३१७ / ७!

केव्हीन ओब्रायन आऊट झाल्यावर इंग्लंडने सुटकेचा नि:श्वास टाकला...
हातातून जवळपास निसटलेली मॅच जिंकण्याची पुन्हा संधी मिळाली या आशेवर स्ट्राऊस असतानाच...

ब्रॉडचा पुढचा बॉल फुलटॉस होता...
ट्रेंट जॉन्स्टनने थंड डोक्याने तो कव्हर्समधून फटकावला...
पॉईंट बाऊंड्रीवरुन धावत आलेल्या बेलने मारलेल्या डाईव्हचा काहीही उपयोग झाला नाही..
या बाऊंड्रीने इंग्लंडच्या आशेवर पुन्हा पाणी पडलं...

ब्रॉडचा पुढचा शॉर्टपीच बॉल जॉन्स्टनने मिड ऑफला खेळला...
जॉन्स्टन आणि मूनी यांनी १ रन आरामात पूर्ण केली पण इतक्यावर मूनीचं समाधान झालं नव्हतं...
त्याने जॉन्स्टनला दुसर्‍या रनसाठी कॉल दिला आणि तो धावत सुटला...
वास्तविक दुसरी रन काढण्याचा जॉन्स्टनचा इरादा नव्हता पण मूनी धावत सुटलेला पाहून त्यानेही पाऊल उचललं...
मूनीच्या या आक्रमक रनिंग बिटवीन द विकेट्समुळे इंग्लिश खेळाडू पार गोंधळले आणि जॉन्स्टनने आरामात दुसरी रन पूर्ण केली!

ब्रॉडच्या पुढच्या बॉलवर जॉन्स्टनने १ रन काढली...

आयर्लंडला मॅच जिंकण्यासाठी आता केवळ ४ रन्स हव्या होत्या...
ब्रॉडच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर स्ट्राईकवर होता मूनी...
आतापर्यंत चारवेळा त्याने ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बाऊंड्री तड्कावलेली होती!
आता बाऊंड्री मारुन मॅच संपवणं त्याला सहज शक्यं होतं पण....
मूनीने कोणतीही रिस्क न घेता १ रन काढली...

शेवटच्या ओव्हरमध्ये आयर्लंडला ३ रन्सची आवश्यकता होती!

अँडरसनचा बॉल लेगस्टंपवर पडला...
मूनीने तो शांतपणे मिडविकेटला फ्लिक केला...
स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर असलेल्या ब्रेस्ननला कोणतीही संधी मिळाली नाही...
बॉल बाऊंड्रीपार गेला...

कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेल्या डेव्हीड लॉईडची तुफान फटकेबाजी सुरु होती.
"This is it...This is it! Take a bow Ireland! What a game of Cricket.... England can not believe it... I can’t believe it... Hussain can’t believe it... Terrific Ireland!"

नासिस हुसेन म्हणाला,
"Unbelievable scenes here... Well played Ireland! They have been brilliant… Absolutely outstanding!"

आयर्लंडने मॅच जिंकली!

जॉन मूनी ३० बॉल्समध्ये ६ बाऊंड्रीसह ३३ रन्स फटकावून नॉटआऊट राहीला...
केव्हीन ओब्रायन आणि क्युसॅकची मेहनत पाण्यात जाणार नाही याची जबाबदारी त्याने चोख पार पाडली होती!

आयर्लंडचे एकूण एक खेळाडू मैदानावर धावून आले....
प्रेक्षकांमध्ये असलेल्या आयर्लंडच्या सपोर्टर्सनी स्टेडीयम डोक्यावर घेतलं होतं!
इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातलं हाडवैर आणि इतिहास याची कल्पना असलेला माणूसच आयरीश सपोर्टसच्या आनंदाची कल्पना करु शकेल...
त्यांच्या दृष्टीने इंग्लंडविरुद्धचा हा विजय म्हणजे वर्ल्डकप जिंकल्यात जमा होता...

वर्ल्डकपच्या इतिहासातील हा सर्वात मोठा रेकॉर्ड रनचेस होता!

अँड्र्यू स्ट्राऊस आणि इंग्लिश खेळाडू अक्षरशः सुन्न झाले होते.
नेमकं काय झालं हेच त्यांना कळत नव्हतं....

स्ट्राऊस इतका हादरला होता की त्याला नेमकं काय बोलावं तेच सुचत नव्हतं.
"It's a bit of a shock for us if I'm honest, and bitterly disappointing. We thought we had done a reasonable job with the bat and also with the ball initially. We weren't expecting such an innings from Kevin O'Brien. It was an outstanding innings. Just the gall he showed to take the game to us in that situation. They took the Power play and he struck the ball beautifully. He rescued them from a perilous position!"

विल्यम पोर्टरफिल्ड अर्थातच जग जिंकल्याच्या आनंदात होता!
"It has been the greatest day of our lives, the best performance that we have put up. We believed in ourselves, Kevin O'Brien was brilliant. We knew that we are capable of winning, we believed in ourselves. Cusack and Mooney too chipped in!"

मॅन ऑफ द मॅच म्हणून अर्थातच केव्हीन ओब्रायनची निवड झाली!

ओब्रायन म्हणाला,
"Not able to believe it, I am quite speechless. I got a bit of luck and things went my way. If we would have gotten out soon, it would have been a boring game for the supporters and so I decided to chance my arm, it paid off!"

ग्रॅहॅम स्वान म्हणाला,
It's disappointing to lose any game of cricket. But it was one where we got ourselves into a position of such dominance, to then have it taken away from us is quite shell-shocking. Every now and again someone wakes up and has the best day of their life - and yesterday Kevin O'Brien did that. We should have bowled better; we certainly could have bowled better, but that's tarnishing the knock he had - personally I think he won the game rather than we lost it. It's the best knock I've seen in a long time!"

जेफ्री बॉयकॉटने इंग्लंडचे पार वाभाडे काढले,
"How the mighty have fallen so quickly. England were national heroes after winning the Ashes. Now they are national chumps after this shocking and embarrassing defeat."

मायकेल आर्थर्टन म्हणाला,
"England made it easy for them with shoddy cricket. There was a palpable sense of complacency that crept in during the Ireland innings, born undoubtedly of arrogance and a ridiculous belief in their superiority. England were bad but take nothing away from Ireland; they played magnificently and courageously."

डॅरन गॉफ म्हणाला,
"I'm flying to India, teach them how to bowl yorkers and use your nous. Embarrassing. Sorry I'm so pissed off with that performance, unacceptable."

परंतु सर्वात भन्नाट प्रतिक्रीया होती ती नियाल आणि केव्हीन ओब्रायन यांचा तिसरा भाऊ जेरार्ड याची!

जेरार्ड म्हणाला,
"Some bookmakers had Ireland at 400-1 at one stage. I wish I'd not kept my money in pocket."

वर्ल्डकपमध्ये भाग घेणार्‍या संघांची संख्या मर्यादीत करण्याच्या आयसीसीच्या प्रस्तावाला आयर्लंडने दिलेली ही सणसणीत चपराक होती!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

लोनली प्लॅनेट's picture

5 Mar 2017 - 10:52 am | लोनली प्लॅनेट

2011 च्या वर्ल्ड कप मधील हाच सर्वात सुंदर सामना होता तुमच्या जबरदस्त फटकेबाजी मुळे तो जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला
आयर्लंड च्या बॅटिंग च्या शेवटच्या 20 ओव्हर मध्ये मी सतत टाळ्या वाजवत होतो
Cricket & Spartacus at it's best

आषाढ_दर्द_गाणे's picture

5 Mar 2017 - 10:04 pm | आषाढ_दर्द_गाणे

Cricket & Spartacus at it's best

+१