वर्ल्डकप क्लासिक्स - २००७ - आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
1 Mar 2017 - 9:18 am

२००७ चा वर्ल्डकप हा वेस्ट इंडीजमध्ये झालेला पहिला वर्ल्डकप. वेस्ट इंडीजमधल्या बार्बाडोस, जमेका, गयाना, त्रिनिदाद - टोबॅगो, अँटीगा - बर्बुडा, ग्रेनेडा, सेंट कीट्स - नेव्हीस आणि सेंट लुशिया या आठ देशांत वर्ल्डकपच्या मॅचेस खेळवण्यात आल्या होत्या. वर्ल्डकपच्या मॅचेससाठीच्या सुरक्षा नियमांमुळे आणि वेस्ट इंडीयन प्रेक्षकांच्या रसिकतेचं अविभाज्यं अंग असलेल्या ड्रम्स आणि इतर वाद्यांवर बंदी घालण्यात आल्याने वेस्ट इंडीजच्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच नाराजी होती. त्याचबरोबर मॅचच्या तिकीटांच्या किमतीही सामान्यांच्या आवाक्याबाहेर होत्या.

या वर्ल्डकपमध्ये भाग घेतलेल्या एकूण १६ संघांची चार ग्रूप्समध्ये विभागणी करण्यात आली होती. १९९९ आणि २००३ च्या वर्ल्डकपमध्ये असलेली सुपर सिक्स ही कल्पना आता सुपर एट अशी वाढवण्यात आली होती. प्रत्येक ग्रूपमधील दोन संघांचा सुपर एटमध्ये समावेश होणार होता. परंतु एक धोका होता तो म्हणजे ग्रूपमध्ये कोणत्याही २ मॅचेसमध्ये पराभव पत्करावा लागणार्‍या संघाचं वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात येणार होतं. बांग्लादेश आणि श्रीलंकेकडून पराभव झाल्यामुळे भारत, आणि वेस्ट इंडीज आणि नवख्या आयर्लंडकडून पराभव झाल्यामुळे पाकिस्तानवर नेमकी हीच आपत्ती ओढवली आणि त्यामुळे भारतीय उपखंडातील बहुसंख्य प्रेक्षकांनी वर्ल्डकपकडे पाठ फिरवली. त्यातच आयर्लंडविरुद्धच्या मॅचमधील पराभवानंतर पाकिस्तानचा कोच बॉब वूल्मरच्या गूढ मृत्यूचं सावटही शेवटपर्यंत या वर्ल्डकपवर होतं.

या वर्ल्डकपचं आणखीन एक वैशिष्ट्यं म्हणजे वन डे क्रिकेटच्या नियमांनुसार पहिल्या १० ओव्हर्सनंतर ५ - ५ ओव्हर्सच्या बॉलिंग आणि बॅटींग पॉवरप्लेचा या वर्ल्डकपमध्ये प्रथमच प्रयोग करण्यात आला होता.

*************************************************************************************

१५ मार्च २००७
सबाईना पार्क, किंग्स्टन, जमेका

जमेकातल्या किंगस्टनच्या सबाईना पार्क मैदानावर झिंबाब्वे आणि प्रथमच वर्ल्डकपमध्ये खेळत असलेले आयर्लंड यांच्यात ग्रूप डी मधली मॅच होती. दक्षिण आफ्रीकेत झालेल्या २००३ च्या वर्ल्डकपनंतर झिंबाब्वेच्या क्रिकेटजगतात अनेक स्थित्यंतरं झाली होती. २००३ च्या वर्ल्डकपमध्ये अँडी फ्लॉवर आणि हेन्री ओलोंगा यांनी रॉबर्ट मुगाबे सरकारच्या निषेधार्ह लावलेल्या काळ्या फितींच्या स्मृती अद्यापही अनेकांच्या मनात ताज्या होत्या. त्यापाठोपाठ २००४ मध्ये सरकारच्या वर्णद्वेषी धोरणामुळे हीथ स्ट्रीक आणि इतर १४ गोर्‍या खेळाडूंची हकालपट्टी करण्यात आली होती. या सर्वाच्या परिणामातून अद्यापही झिंबाब्वेचं क्रिकेट सावरलेलं नव्हतं. त्यामुळे या वर्ल्डकपमध्ये आलेला झिंबाब्वेचा संघ अगदीच अननुभवी होता.

प्रॉस्पर उत्सेयाच्या झिंबाब्वे संघात टेरी डफीन, वूसी सिबांडा, चामू चिभाभा, स्ट्युअर्ट मॅट्सिकेन्येरी, ब्रेंडन टेलर असे बॅट्समन होते. विकेटकीपर बॅट्समन असलेल्या ब्रेंडन टेलरकडे अँडी फ्लॉवरचा वारसदार म्हणून पाहिलं जात होतं. ऑलराऊंडर सीन विल्यम्स आणि एल्टन चिगुम्बुरा यांचाही संघात समावेश होता. झिंबाब्वेच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने क्रिस्तोफर मोफू, एड रेन्सफोर्ड यांच्यावर होता. त्यांच्या जोडीला कॅप्टन उत्सेया आणि गॅरी ब्रेन्ट हे दोघं होते. प्रमुख बॅट्समन असलेल्या ब्रेंडन टेलरने विकेटकिपींगचीही जबाबदारी घेतली असल्याने झिंबाब्वेला एक्स्ट्रा बॉलर खेळवणं शक्यं झालं होतं.

ट्रेंट जॉन्स्टनच्या आयरीश संघासाठी वर्ल्डकपचा हा पहिला अनुभव होता. जॉन्स्टनच्या संघात विल्यम पोर्टरफिल्ड, जेरेमी ब्रे, ऑईन मॉर्गन, नियाल ओब्रायन असे बॅट्समन होते. आयर्लंडच्या बॉलिंगचा भार होता तो मुख्यतः बॉईड रॅन्कीन, डेव्हीड लँगफोर्ड-स्मिथ आणि काईल मॅक्कॅलन यांच्यावर. आयर्लंडच्या संघाचं वैशिष्ट्यं म्हणजे त्यात ऑलराऊंडर्सचा भरणा होता. आंद्रे बोथा, केव्हीन ओब्रायन, अँड्र्यू व्हाईट आणि स्वतः कॅप्टन ट्रेंट जॉन्स्टन असे चार ऑलराऊंडर्स आयर्लंडच्या संघात होते. आयर्लंडला इतके ऑलराऊंडर्स खेळवणं शक्यं झालं होतं कारण प्रमुख बॅट्समनपैकी एक असलेल्या नियाल ओब्रायनवर विकेटकिपींगची जबाबदारी होती. आयर्लंडच्या खेळाडूंपैकी मॉर्गन इंग्लिश कौंटी स्पर्धेत गाजत होता. ब्रे आणि जॉन्स्टन यांच्या गाठीशी ऑस्ट्रेलियाच्या शेफील्ड शील्डमध्ये न्यू साऊथ वेल्ससाठी खेळण्याचा अनुभव जमा होता!

मॅचला सुरवात होण्यापूर्वी अँडी फ्लॉवरने झिंबाब्वेमधल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरआयसीसीने झिंबाब्वेवर आर्थिक निर्बंध घालण्याची सूचना केली!

"When you see how badly the leader of the official opposition has been beaten, it shows just how out of touch with the reality the government, the Zanu PF thugs, are. They will do anything to stay in power. Robert Mugabe has never changed since he took over in the early 1980s." द टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीत फ्लॉवर म्हणाला, "The protest I made four years ago was a personal decision. You can question whether it is appropriate for players to be representing their country in an international tournament at this time. But I can understand why they want to play international cricket and to make the best of their opportunities. Maybe some sort of sporting sanctions or other sanctions would be a more powerful tool in bringing pressure to bear on the government rather than expecting a team of cricketers, most of them 20 to 23 years old, to be making those sort of decisions."

अँडी फ्लॉवरच्या या मुलाखतीमुळे वर्ल्डकपमधल्या झिंबाब्वेच्या कामगिरीवर सर्वांचं लक्षं वेधलं गेलं नसतं तरच नवल!

प्रॉस्पर उत्सेयाने टॉस जिंकल्यावर बॉलिंगला मदत मिळणार्‍या विकेटवर फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच ओव्हरमध्ये...

क्रिस्तोफर मोफूचा शेवटचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
विल्यम पोर्टरफिल्डचा ऑफस्टंपच्या बाहेर बॉल डिफेंड करण्याचा प्रयत्नं फसला...
पोर्टरफिल्डच्या बॅटची एज घेऊन गेलेला बॉल विकेटकीपर ब्रेंडन टेलरच्या ग्लोव्हजमधून निसटला पण...
दुसर्‍या स्लिपमध्ये असलेल्या वूसी सिबांडाने चाणाक्षपणे टेलरच्या मागे डाईव्ह मारत कॅच घेतला!
आयर्लंड ० / १!

पोर्टरफिल्डच्या ऐवजी बॅटींगला आलेला ऑईन मॉर्गन आणि जेरेमी ब्रे यांनी सुरवातीला सावधपणे झिंबाब्वेच्या बॉलर्सना खेळून काढण्याचं धोरण अवलंबलं. पाचव्या ओव्हरमध्ये मोफूच्या बॉलवर ब्रेने पॉईंटला बाऊंड्री तडकावली. आणखीन एक बॉलनंतर ब्रेने पॉईंटवरुनच दणदणीत सिक्स ठोकली! मॉर्गननेही आक्रमक पवित्रा घेत एड रेन्सफोर्डला लेग ग्लान्सची बाऊंड्री मारल्यावर मोफूच्या पुढच्या ओव्हरमध्ये लागोपाठ दोन स्क्वेअरकटच्या बाऊंड्री तडकावल्या. ब्रे - मॉर्गन यांनी ९ ओव्हर्समध्ये ४३ रन्सची पार्टनरशीप केल्यावर रेन्सफोर्डच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या गॅरी ब्रेन्टला ड्राईव्ह करण्याच्या नादात मॉर्गनची एज लागली आणि पहिल्या स्लिपमध्ये एल्टन चिगुम्बुराने त्याचा कॅच घेतला. २७ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह मॉर्गनने २१ रन्स फटकावल्या. आयर्लंड ४३ / २!

मॉर्गन आऊट झाल्यावर जेमतेम १ रनची भर पडते तोच चिगुम्बुरच्या बॉलवर विकेटकीपर टेलरने नियाल ओब्रायनचा कॅच घेतला. झिंबाब्वे ४४ / ३!

नियाल ओब्रायन परतल्यावर बॅटींगला आलेल्या आंद्रे बोथाने सावध पवित्रा घेत ब्रेला सपोर्ट देण्याची भूमिका घेतली. ब्रेची फटकेबाजी सुरुच होती. ब्रेन्टल एक्स्ट्राकव्हरमधून बाऊंड्री तडकावल्यावर चिगुम्बुराला त्याने थर्डमॅनवरुन अपर कटची सिक्स ठोकली! पण पुढच्याच ओव्हरमध्ये चिगुम्बुराच्या इनकटरचा अजिबात अंदाज न आल्याने बोथाची दांडी उडाली. आयर्लंड ६४ / ४!

बोथा आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या केव्हीन ओब्रायनने सुरवातीला आक्रमक पवित्रा घेत झिंबाब्वेच्या बॉलर्सना फटकावण्याचा मार्ग पत्करला. चिगुम्बुराला एक्स्ट्राकव्हरला बाऊंड्री तडकावल्यावर ब्रेन्टच्या पुढच्या ओव्हरमध्ये त्याने लेग ग्लान्सची बाऊंड्री मारली. चिगुम्बुराच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या मोफूच्या ओव्हरमध्ये कव्हर्समध्ये असलेल्या चामू चिभाभाचा थ्रो स्टंप्सवर न लागल्याने ब्रे रनआऊट होण्यापासून थोडक्यात बचावला. उत्सेयाने ब्रेन्टच्या ऐवजी पुन्हा रेन्सफोर्डला बॉलिंगला आणल्यावर रेन्सफोर्डच्या २ ओव्हर्समध्ये ब्रेने २ बाऊंड्री तडकावल्या पण रेन्सफोर्डच्या आऊटस्विंगरवर केव्हीन ओब्रायनची एज लागली आणि टेलरने आरामात त्याचा कॅच घेतला. तो आऊट झाला तेव्हा २२ ओव्हर्समध्ये आयर्लंडचा स्कोर होता ८९ / ५!

केव्हीन ओब्रायन परतल्यावर बॅटींगला आलेल्या अँड्र्यू व्हाईटने सावध पवित्रा घेत झिंबाब्वेच्या बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. ब्रेने चिगुम्बुराच्या पुढच्या ओव्हरमध्ये दोन बाऊंड्री फटकावल्या, पण उत्सेया आणि सीन विल्यम्स हे स्पिनर्स बॉलिंगला आल्यावर ब्रेने आपला आक्रमक पवित्रा बदलून १-२ रन्स काढण्यावर भर दिला. उत्सेया - विल्यम्स यांच्या अचूक बॉलिंगने आयरीश बॅट्समनना फटकेबाजी करण्याची कोणतीही संधी मिळत नव्हती. ३१ व्या ओव्हरमध्ये व्हाईटने उत्सेयाला रिव्हर्स स्वीपची बाऊंड्री फटकावली, पण हा अपवाद वगळता ब्रे - व्हाईट यांनी शांत डोक्याने ओव्हर्स खेळून काढण्याचं धोरण अवलंबलं होतं. विल्यम्सच्या जागी बॉलिंगला आलेल्या ब्रेन्टचा बॉल व्हाईटच्या बॅटची इनसाईड एज घेऊन फाईनलेग बाऊंड्रीपार गेला. व्हाईट बोल्ड होण्यापासून थोडक्यात वाचला होता! उत्सेयाच्या पुढच्या ओव्हरमध्ये व्हाईटने पुन्हा रिव्हर्स स्वीपची बाऊंड्री तडकावली. ब्रे - व्हाईट यांनी ५६ रन्सची पार्टनरशीप केल्यावर ब्रेन्टच्या स्लो बॉलचा अजिबात अंदाज न आल्याने पूल करण्याचा व्हाईटचा प्रयत्नं फसला आणि मिडलस्टंपसमोर बॉल त्याच्या पॅडवर आदळला. ४८ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह व्हाईटने २८ रन्स काढल्या. आयर्लंड १४५ / ६!

व्हाईट परतल्यावर बॅटींगला आलेल्या कॅप्टन ट्रेंट जॉन्स्टनने ब्रेन्टला स्क्वेअरलेगला बाऊंड्री फटकावली. ब्रेन्टच्या पुढच्या ओव्हरमध्ये ब्रेने त्याला मिडविकेटवरुन फटकावलेली बाऊंड्री सिक्स जाण्यापासून थोडक्यात वाचली होती. ब्रे आणि जॉन्स्टन आरामात खेळत असतानाच...

उत्सेयाच्या ४३ व्या ओव्हरमध्ये पाऊस प्रगटला!
पावसामुळे सुमारे २० मिनीटांचा खेळ वाया गेला पण सुदैवाने एकही ओव्हर कमी झाली नव्हती.

पाऊस थांबल्यावर पुन्हा खेळ सुरु झाल्यावर ४४ व्या ओव्हरमध्ये जॉन्स्टनने मोफूला लेग ग्लान्सची बाऊंड्री मारली. त्याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर ब्रेने कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली पण पुढच्याच बॉलवर...

मोफूचा बॉल ब्रेने कव्हर्समध्ये ड्राईव्ह केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
जॉन्स्टनने ब्रेच्या कॉलला प्रतिसाद दिला पण...
कव्हर्समध्ये चिगुम्बुराने बॉल पिकअप केला...
ब्रे दोन पावलं टाकल्यावर थबकला आणि मागे फिरुन त्याने आपलं क्रीज गाठलं...
जॉन्स्टन परत फिरला पण एव्हाना त्याला उशीर झाला होता...
चिगुम्बुराचा बॉल कलेक्ट करुन मोफूने आरामात बेल्स उडवल्या!

२४ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह २० रन्स फटकावल्यावर जॉन्स्टन रन आऊट झाला.
आयर्लंड १८२ / ७!

विल्यम्सच्या पुढच्या ओव्हरमध्ये काईल मॅक्कॅलनचा स्वीप मारण्याचा प्रयत्नं पार फसला आणि टेलरने चाणाक्षपणे बेल्स उडवल्या!
टीव्ही रिप्लेमध्ये अगदी थोडक्यात मॅक्कॅलन स्टंप झाल्याचं निष्पन्न झालं!
आयर्लंड १८२ / ८!

ब्रे एव्हाना ९१ रन्सवर पोहोचला होता. त्याची सेंचुरी पूर्ण होण्याआधीच आयर्लंड ऑलआऊट होण्याची शक्यता निर्माण झाली होती!

डेव्हीड लँगफोर्ड-स्मिथने शांत डोक्याने खेळत फटकेबाजीच्या मोहात न पडता ब्रेला साथ देण्याचा मार्ग पत्करला. मोफूच्या लेगस्टंपवर पडलेल्या बॉलवर ब्रेने मिडविकेटला बाऊंड्री तडकावली. लँगफोर्ड-स्मिथ चाणाक्षपणे स्ट्राईक रोटेट करत होता...

...अखेर मोफूचा बॉल थर्डमॅन बाऊंड्रीपार फटकावत ब्रेने सेंचुरी पूर्ण केली!

शेवटच्या २ ओव्हर्समध्ये ब्रे आणि लँगफोर्ड स्मिथ यांनी २० रन्स फटकावल्या. इनिंग्जच्या शेवटच्या बॉलवर मोफूला पूल करण्याच्या नादात लँगफोर्ड-स्मिथची टॉप एज लागली आणि टेलरने आरामात त्याचा कॅच घेतला.

५० ओव्हर्स संपल्या तेव्हा आयर्लंडचा स्कोर होता २२१ / ९!

ओपनिंगला आलेला जेरेमी ब्रे १३७ बॉल्समध्ये १० बाऊंड्री आणि २ सिक्ससह ११५ रन्स फटकावून नॉटआऊट राहीला!
वर्ल्डकपमध्ये आयर्लंडच्या खेळाडूने ठोकलेली ही पहिलीच सेंचुरी होती!

टेरी डफीनने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत आयरीश बॉलर्सना फटकावण्याचा मार्ग पत्करला होता. लँगफोर्ड-स्मिथच्या दुसर्‍याच बॉलवर स्क्वेअरड्राईव्हची बाऊंड्री फटकावल्यावर पुढच्या ओव्हरमध्ये बॉईड रॅन्कीनच्या बॉलवर त्याने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. रॅन्कीनच्या पुढच्या ओव्हरमध्ये वूसी सिबांडाने स्लिप आणि गलीच्या मधून बाऊंड्री मारली. सहाव्या ओव्हरमध्ये...

रॅन्कीनचा पहिला बॉल मिडलस्टंपवर पडला...
डफीनने बॉल डिफेंड करण्याचा पवित्रा घेतला पण...
टप्पा पडल्यावर सीम झालेल्या बॉलने त्याच्या बॅटची एज घेतली...
विकेटकीपर नियाल ओब्रायनने सहज घेता येण्यासारखा कॅच ड्रॉप केला!

पुढचे तीन बॉल्स डफीनने खेळून काढल्यावर...

पाचवा बॉल ऑफस्टंपवर पडला...
पुन्हा एकदा डफीनच्या बॅटची एज लागली पण...
या वेळेस दुसर्‍या स्लीपमध्ये मॉर्गनने कॅच ड्रॉप केला!

रॅन्कीनचा शेवटचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
तिसर्‍या खेपेला डफीनच्या बॅटची एज लागली...
या वेळी मात्रं नियाल ओब्रायनने कॅच घेण्यात कोणतीही कसूर केली नाही!
झिंबाब्वे २६ / १!

डफीन आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या चामू चिभाभाने सावध पवित्रा घेत सिबांडाला सपोर्ट देण्याची भूमिका घेतली. लँगफोर्ड-स्मिथच्या पुढच्या ओव्हरमध्ये केवळ १ रन निघाल्यावर सिबांडाने आक्रमक पवित्रा घेत रॅन्कीनच्या ओव्हरमध्ये ३ बाऊंड्री तडकावल्या! रॅन्कीनच्या पुढच्या ओव्हरमध्ये पुन्हा बाऊंड्री मारल्यावर सिबांडाने लँगफोर्ड-स्मिथच्या २ ओव्हर्समध्ये २ बाऊंड्री तडकावल्या! सिबांडाची आतषबाजी सुरु असताना चिभाभाला मात्रं रन्स काढणं कठीण जात होतं. ट्रेंट जॉन्स्टनला मिडविकेटला पूलची बाऊंड्री मारल्यावर सिबांडाने आंद्रे बोथाला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. सिबांडा - चिभाभा यांनी ६६ रन्सची पार्टनरशीप केल्यावर जॉन्स्टनला ड्राईव्ह करण्याचा चिभाभाचा प्रयत्नं फसला आणि कव्हर्समध्ये लँगफोर्ड-स्मिथने त्याचा कॅच घेतला. १२ रन्स काढण्यासाठी चिभाभाला ३६ बॉल्स खर्ची घालावे लागले होते. झिंबाब्वे ९२ / २!

चिभाभा आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या सीन विल्यम्सने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. काईल मॅक्कॅलनला लेटकट्ची बाऊंड्री मारल्यावर त्याने जॉन्स्टनला कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली, पण मॅक्कॅलनच्या पुढच्या ओव्हरमध्ये त्याला मिडऑनवरुन फटकावण्याचा विल्यम्सचा प्रयत्नं फसला आणि रॅन्कीनने त्याचा कॅच घेतला. झिंबाब्वे १०७ / ३!

विल्यम्स परतल्यावर आलेल्या स्ट्युअर्ट मॅट्सिकेन्येरीने सावध पवित्रा घेत जॉन्स्टनची मेडन ओव्हर खेळून काढली, पण पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने मॅक्कॅलनला मिडऑनला बाऊंड्री फटकावली. जॉन्स्टनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या अँड्र्यू व्हाईटला कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावल्यावर मॅक्कॅलनच्या पुढच्या ओव्हरमध्ये मॅट्सिकेन्येरीने लाँगऑन बाऊंड्रीपार दणदणीत सिक्स ठोकली. पण पुढच्याच ओव्हरमध्ये...

व्हाईटचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
सिबांडाने तो बॅकफूटवर जात कव्हर्समधून ड्राईव्ह केला पण....
बॅकफूटवर जाण्याच्या नादात सिबांडाचा पाय ऑफस्टंपला लागला आणि बेल खाली पडली...
सिबांडा हिटविकेट झाला होता!

८४ बॉल्समध्ये ९ बाऊंड्रीसह सिबांडाने ६७ रन्स काढल्या.
झिंबाब्वे १२८ / ४!

सिबांडा आऊट झाल्यावर जेमतेम ५ रन्सची भर पडते तोच मॅक्कॅलनला फटकावण्याचा चिगुम्बुराचा प्रयत्नं पार फसला आणि मिडऑनवर जेरेमी ब्रेने डाईव्ह मारत त्याचा अप्रतिम कॅच घेतला. झिंबाब्वे १३३ / ५!

शेवटच्या २० ओव्हर्समध्ये झिंबाब्वेला ८९ रन्सची आवश्यकता होती!

चिगुम्बुरा आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या ब्रेंडन टेलरने आक्रमक पवित्रा घेत मॅक्कॅलनला मिडऑफवर बाऊंड्री फटकावली. पुढच्याच ओव्हरमध्ये मॅट्सिकेन्येरीने रॅन्कीनला कट्ची बाऊंड्री तडकावली. मॅक्कॅलनच्या पुढच्या ओव्हरमध्ये त्याने बाऊंड्री मारल्यावर जॉन्स्टनने त्याच्या ऐवजी बोथाला बॉलिंगला आणलं. बोथाच्या अचूक मेडन ओव्हरनंतर पुढच्या ओव्हरमध्ये मॅट्सिकेन्येरीने लँगफोर्ड-स्मिथला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री फटकावली. बोथाच्या पुढच्या ओव्हरमध्ये त्याने पुन्हा बाऊंड्री ठोकल्यावर ट्रेंट जॉन्स्टन स्वतः बॉलिंगला आला. जॉन्स्टनने टेलरला टाकलेल्या मेडन ओव्हरनंतर पुढच्या ओव्हरमध्ये बोथाला ड्राईव्ह मारण्याचा टेलरचा प्रयत्नं फसला, पण त्याच्या बॅटची एज लागून बॉल थर्डमॅन बाऊंड्रीवर गेला!

१० ओव्हर्समध्ये झिंबाब्वेला अद्याप ४७ रन्स बाकी होत्या.

४२ व्या ओव्हरमध्ये मॅक्कॅलनला फटकावण्याचा मॅट्सिकेन्येरीचा प्रयत्नं पार फसला, पण लाँगऑफला जेरेमी ब्रेने हा कॅच ड्रॉप केलाच आणि वर मॅट्सिकेन्येरीला बाऊंड्री मिळाली! जॉन्स्टनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या केव्हीन ओब्रायनच्या ओव्हरमध्ये मॅट्सिकेन्येरी - टेलर यांनी एकही बाऊंड्री न मारता ९ रन्स काढल्या, पण पुढच्या ओव्हरमध्ये...

मॅक्कॅलनच्या पहिल्या बॉलवर टेलरने एक रन काढल्यावर तिसर्‍या बॉलवर मॅट्सिकेन्येरीने स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली...
मॅक्कॅलनचा चौथा बॉल ऑफस्टंपवर पडला...
मॅट्सिकेन्येरीने स्ट्रेट ड्राईव्ह मारला...
मॅक्कॅलनने बॉल अडवण्याचा प्रयत्नं केला...
बॉल त्याच्या हाताला लागून नॉनस्ट्रायकर एन्डच्या स्टंप्सवर गेला...
आयरीश खेळाडूंनी साहजिकच रनआऊटसाठी अपिल केलं...
अंपायर इयन गूल्डने हा निर्णय थर्ड अंपायर बिली बाऊडनकडे सोपवला...
टेलर रनआऊट झाला!

४० बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह टेलरने २४ रन्स काढल्या.
झिंबाब्वे २०३ / ६!

टेलर आऊट झाला तरी मॅट्सिकेन्येरीवर त्याचा काहीही परिणाम झाला नव्हता. मॅक्कॅलनच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर त्याने लेग ग्लान्सची बाऊंड्री मारण्यात कोणतीही हयगय केली नाही.

अद्याप ६ ओव्हर्समध्ये झिंबाब्वेला १५ रन्स हव्या होत्या!

जॉन्स्टनच्या ४५ व्या ओव्हरमध्ये गॅरी ब्रेन्टला फक्तं १ रन काढता आली. मॅक्कॅलनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या बोथानेही पुढच्या ओव्हरमध्ये मॅट्सिकेन्येरी आणि ब्रेंट यांना फटकेबाजीची कोणतीही संधी दिली नाही. जॉन्स्टनच्या पुढच्या ओव्हरमध्येही केवळ २ रन्स निघाल्या!

शेवटच्या ३ ओव्हर्समध्ये झिंबाब्वेला १० रन्सची आवश्यकता होती!

बोथाच्या ४८ व्या ओव्हरच्या पहिल्या २ बॉल्सवर ब्रेन्टला काहीच करता आलं नाही...
तिसर्‍या स्लो बॉलचा ब्रेन्टला अजिबात अंदाच आला नाही आणि तो एलबीडब्ल्यू झाला!
झिंबाब्वे २१२ / ७!
पाचव्या बॉलवर प्रॉस्पर उत्सेयाने १ रन काढली, पण शेवटच्या बॉलवर मॅट्सिकेन्येरी काहीच करु शकला नाही!

२ ओव्हर्स - ९ रन्स!

ट्रेंट जॉन्स्टनच्या १० ओव्हर्स संपल्या होत्या. रॅन्कीन आणि मॅक्कॅलनला मॅट्सिकेन्येरीने फटकावून काढलेलं असल्याने जॉन्स्टनने ४९ व्या ओव्हरसाठी केव्हीन ओब्रायनला बॉलिंगला आणलं.

केव्हीन ओब्रायनचा पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर आलेला फुलटॉस होता...
उत्सेयाने तो ऑफसाईडला ड्राईव्ह केला...
कव्हर्समध्ये असलेल्या मॉर्गनच्या हातात!
झिंबाब्वे २१३ / ८

केव्हीन ओब्रायनच्या पुढच्या ३ बॉल्सवर क्रिस्तोफर मोफूला काहीच करता आलं नाही...
पाचव्या बॉलवर मोफूने स्ट्रेट ड्राईव्ह मारला, पण...
ओब्रायनने नेमक्या वेळी तो आपल्या बुटाने अडवला...

मोफूने शेवटचा बॉल मिडऑनला ड्राईव्ह केला आणि एक रनसाठी धाव घेतली...
तो जवळपास नॉनस्ट्रायकर एन्डला पोहोचला तरी मॅट्सिकेन्येरी जागचा हलला नाही!
मिडऑनला जॉन्स्टनने बॉल पिकअप केला...
जॉन्स्टनचा थ्रो कलेक्ट करुन नियाल ओब्रायनने आरामात बेल्स उडवल्या...
झिंबाब्वे २१३ / ९!

मॅट्सिकेन्येरीचा हिशोब सरळ होता. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक हवा होता. मोफूने शेवटच्या बॉलवर रन काढली असती तर स्ट्राईक मोफूकडेच राहीला असता. झिंबाब्वेला मॅच जिंकण्यासाठी मॅट्सिकेन्येरी स्ट्राईकवर असणं आवश्यंक होतं!

केव्हीन ओब्रायनची ४९ वी ओव्हर मेडन होती!
इतकंच नव्हे तर आयर्लंडला दोन विकेट्स मिळाल्या होत्या!

शेवटच्या ओव्हरमध्ये झिंबाब्वेला ९ रन्सची आवश्यकता होती!

जॉन्स्टनने शेवट्ची ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंगला आणलं अँड्र्यू व्हाईटला.
झिंबाब्वेच्या सगळ्या आशा स्ट्युअर्ट मॅट्सिकेन्येरीवर होत्या.

व्हाईटचा पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
मॅट्सिकेन्येरीने तो कव्हर्समधून फटकावला...
लाँगऑफला असलेल्या केव्हीन ओब्रायनने सुमारे २०-२५ यार्ड धाव घेत बाऊंड्री जाणार नाही याची खबरदारी घेतली..
मॅट्सिकेन्येरी आणि एड रेन्सफोर्ड यांनी २ रन्स काढल्या...

५ बॉल्स - ७ रन्स!

व्हाईटचा शॉर्टपीच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
मॅट्सिकेन्येरीने तो पॉईंटमधून फटकावला...
कव्हर्स बाऊंड्रीवर असलेल्या मॅक्कॅलनने केव्हीन ओब्रायनप्रमाणेच बाऊंड्री अडवली...
झिंबाब्वेला आणखीन २ रन्स मिळाल्या...

४ बॉल्स - ५ रन्स!

व्हाईटचा मिडलस्टंपवर पडलेला बॉल मॅट्सिकेन्येरीने मिडविकेटला फ्लिक केला...
रेन्सफोर्डने दिलेल्या १ रनच्या कॉलला यावेळी मॅट्सिकेन्येरीने योग्य प्रतिसाद दिला...
झिंबाब्वेचं टार्गेट आणखीन १ रनने कमी झालं...

३ बॉल्स - ४ रन्स!

व्हाईटचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
रेन्सफोर्डने तो मिडविकेटला खेचण्याचा प्रयत्नं केला...
बॉल त्याच्या बॅटच्या टोकाला लागून कव्हर्समध्ये गेला...
मॅट्सिकेन्येरीने १ रन काढण्याची संधी सोडली नाही...

२ बॉल्स - ३ रन्स!

व्हाईटचा स्लो बॉल मॅट्सिकेन्येरीने बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने कट् केला...
बॅकवर्ड पॉईंटला बोथाने कॅच घेण्यासाठी डाईव्ह मारली पण बॉल त्याच्या हाताला लागून बाऊंड्रीच्या दिशेने गेला...
बोथा स्वतःला सावरत ताडकन उठला आणि त्याने काही अंतरावर असलेला बॉल पिकअप केला...
मॅट्सिकेन्येरी - रेन्सफोर्ड यांनी तोपर्यंत एक रन पूर्ण करुन दुसर्‍या रनसाठी धाव घेतली होती...
बोथाचा थ्रो नॉनस्ट्रायकर एन्डला आला पण...
चाणाक्षं रेन्सफोर्डने बॉल आणि स्टंप्सच्या मध्ये डाईव्ह मारत तो आपल्या अंगावर घेतला...
झिंबाब्वेला २ रन्स मिळाल्या!

१ बॉल - १ रन!

व्हाईटचा शेवटचा बॉलही ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
मॅट्सिकेन्येरीने कव्हर्समधून ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नं केला पण...
आतापर्यंत ओव्हरचे सगळे बॉल फटकावणार्‍या मॅट्सिकेन्येरीला मोक्याच्या क्षणी शॉट मारता आला नाही...
नियाल ओब्रायनने बॉल कलेक्ट केला आणि बेल्स उडवल्या...
मॅट्सिकेन्येरीने क्रीज सोडलेलं नसल्याने तो स्टंप होण्याचा प्रश्नं नव्हता पण...
रेन्सफोर्ड एक रन काढण्यासाठी धावत सुटला होता...
नियाल ओब्रायनचा थ्रो कलेक्ट करुन व्हाईटने बेल्स उडवल्या!
झिंबाब्वे २२१ ऑल आऊट!

मॅच टाय झाली होती!

७६ बॉल्समध्ये ९ बाऊंड्री आणि १ सिक्ससह ७३ रन्स फटकावत मॅट्सिकेन्येरी नॉटआऊट राहीला...
पण तो झिंबाब्वेला विजय मिळवून देऊ शकला नाही!

आयरीश खेळाडूंनी मैदानात जल्लोष केला!
वर्ल्डकपमधली पहिलीच मॅच टाय होणं हा त्यांच्यासाठी विजयच होता!
उलट मॅच टाय होणं हा आपला पराभव आहे अशी झिंबाब्वेच्या खेळाडूंची भावना होती!

ट्रेंट जॉन्स्टन म्हणाला,
"We did our best to throw it away, but we fought back in the last eight to ten overs to give ourselves a chance. To get it back to a tie was outstanding."

प्रॉस्पर उत्सेया म्हणाला,
"Ireland did well to manage a tie. All points to them. But our bowling was not up to the mark. We gave too much width to Bray. The guys fumbled at the end. There was a lot of tension. We dropped too many catches and gave away runs."

मॅन ऑफ द मॅच म्हणून अर्थातच जेरेमी ब्रेची निवड झाली.

मार्टीन विल्यमसन म्हणतो,
"Zimbabwe will wonder how they threw away an almost certain victory. The day belonged to the Irish, and in particular Jeremy Bray. Ireland celebrating at the end while the expressions on the faces of the Zimbabwe side were of utter bewilderment. We had seen South Africa blowing up many a times in past, but this was an epic choke of a royal magnitude by Zimbabwe."

क्रीडालेख