वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - दक्षिण आफ्रीका विरुद्ध श्रीलंका

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
28 Feb 2017 - 8:55 am

३ मार्च २००३
किंग्जमीड, दर्बन

क्वा झुलू नाताल प्रांतातल्या दर्बानच्या किंग्जमीड मैदानावर यजमान दक्षिण आफ्रीका आणि श्रीलंका यांच्या पूल बी मधली मॅच होणार होती. दक्षिण आफ्रीकेच्या दृष्टीने ही मॅच अत्यंत महत्वाची होती. ग्रूपमधल्या पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडीजकडून पराभव पत्करावा लागलेल्या दक्षिण आफ्रीकेला नंतर न्यूझीलंडने पावसाने व्यत्यय आलेल्या मॅचमध्ये डकवर्थ - लुईस नियमाच्या आधारे हरवलं होतं. ग्रूपमधल्या इतर तीन मॅचेस दक्षिण आफ्रीकेने जिंकल्या असल्या तरीही सुपर सिक्समध्ये प्रवेश करण्यासाठी दक्षिण आफ्रीकेला या मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्धं विजय मिळवणं अत्यावश्यंक होतं.

खरंतर ही मॅच होते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. श्रीलंकेच्या संघाने पूलमधल्या मॅचेस नंतर आणि सुपर सिक्समध्ये जाताना वापरण्यात येणार्‍या पॉईंट्स सिस्टीमबद्दल आणि दोन संघांचे समसमान पॉईंट्स झाल्यास वापरण्यात येणार्‍या टायब्रेकर पद्धतीवर आक्षेप घेत तक्रार नोंदवली होती. आपल्या या आक्षेपांवर योग्यं ती कारवाई न झाल्यास दक्षिण आफ्रीकेविरुद्धची ही मॅच सोडून देण्याची श्रीलंकेने भूमिका घेतली होती. श्रीलंकेने ही मॅच सोडून दिल्यास ते दक्षिण आफ्रीकेच्या पथ्यावर पडलं असतं कारण दक्षिण आफ्रीकेला सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळाला असता आणि रन रेट कमी असल्यामुळे केनियाच्या संघावर पहिल्या राऊंडमध्येच वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची आपत्ती ओढवली असती. वर्ल्डकपच्या संयोजन समितीने श्रीलंकेची मागणी फेटाळलीच पण श्रीलंकेने दक्षिण आफ्रीकेला मॅच बहाल केल्यास श्रीलंकेच्या संघाला आर्थिक दंड आणि वर्ल्डकपमधून निलंबनास सामोरं जावं लगेल अशी तंबी दिल्यावर श्रीलंका दाती तृण धरुन शरण आली!

सनथ जयसूर्याच्या श्रीलंकन संघात स्वतः जयसूर्या, अनुभवी अरविंदा डिसील्वा, मर्व्हन अट्टापट्टू, हशन तिलकरत्ने, रसेल आर्नॉल्ड, महेला जयवर्धने असे बॅट्समन होते. त्यांच्या जोडीला कुमार संगकारासारखा विकेटकीपर बॅट्समन होता. श्रीलंकेच्या बॉलिंगचा भार मुख्यतः चामिंडा वास आणि ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन यांच्यावर होता. त्यांच्या जोडीला दिलहरा फर्नांडो आणि पुलस्थी गुणरत्ने हे दोघं होते. स्वतः जयसूर्या आणि अरविंदा डिसील्वाच्या कामचलाऊ स्पिनचाही श्रीलंकेला वापर करणं शक्यं होतं.

शॉन पोलॉकच्या दक्षिण आफ्रीकन संघात गॅरी कर्स्टन, हर्शेल गिब्ज, बोटा डिपनार आणि जाँटी र्‍होड्सला दुखापत झाल्यामुळे वर्ल्डकपमध्ये समावेश करण्यात आलेला ग्रॅम स्मिथ असे बॅट्समन होते. दक्षिण आफ्रीकेच्या बॉलिंगची मदार प्रामुख्याने कॅप्टन पोलॉक आणि मखाया एन्टीनीवर होती. त्यांच्या जोडीला मोंडे झोंडेकी होता. मार्क बाऊचरसारखा फटकेबाज विकेटकीपर बॅट्समन दक्षिण आफ्रीकेकडे होताच पण शॉन पोलॉकबरोबर कोणालाही हेवा वाटावे असे जॅक कॅलिस, लान्स क्लूसनर आणि अँड्र्यू हॉल असे ऑलराऊंडर्स दक्षिण आफ्रीकेच्या संघात होते.

सनथ जयसूर्याने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतल्यावर जयसूर्या - अट्टापट्टू यांनी सावधपणे दक्षिण आफ्रीकन बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. तिसर्‍या ओव्हरमध्ये अट्टापट्टूने पोलॉकलाअ कव्हर्स आणि बॅकवर्ड पॉईंटमधून ३ बाऊंड्री तडकावल्या, पण हा अपवाद वगळता पोलॉक - एन्टीनी यांच्या अचूक बॉलिंगमुळे जयसूर्या आणि अट्टापट्टू यांना फटकेबाजीची कोणतीही संधी मिळत नव्हती. ९ व्या ओव्हरमध्ये....

पोलॉकचा बॉल जयसूर्याने मिडऑनला ड्राईव्ह केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
अट्टापट्टूने जयसूर्याच्या कॉलला प्रतिसाद दिला आणि दोन पावलं उचलली पण...
मिडऑनवर असलेल्या गॅरी कर्स्टनने बॉल पिकअप केला...
जयसूर्या थबकला आणि पुन्हा दोन पावलं पुढे आला...
अट्टापट्टूने त्याला परत पाठवल्यावर अखेर जयसूर्या मागे फिरला पण...
गॅरी कर्स्टनच्या थ्रोने स्टंप्सचा अचूक वेध घेतला होता...
श्रीलंका ३७ / १!

जयसूर्य आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या हशन तिलकरत्नेने सुरवातीला सावधपणे अट्टापट्टूला सपोर्ट देण्याची भूमिका घेतली. एन्टीनीला मिडविकेटला पूलची बाऊंड्री फटकावल्यावर अट्टापट्टूने पोलॉकच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या मोंडे झोंडेकीला लागोपाठ दोनवेळा कट्ची बाऊंडी तडकावली. एन्टीनीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या जॅक कॅलिसचा बॉल फ्लिक करण्याचा तिलकरत्नेचा प्रयत्नं साफ फसला पण मिडविकेटला लान्स क्लूसनरने हाफवॉलीवर बॉल उचलला. कॅलिसच्या पुढच्याच बॉलवर बाऊंड्री फटकावल्यावर झोंडेकीच्या पुढच्या ओव्हरमध्ये तिलकरत्नेने ऑनड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. अट्टापट्टू - तिलकरत्ने यांनी ४० रन्सची पार्टनरशीप केल्यावर कॅलीसचा बॉल ड्राईव्ह करण्याच्या नादात तिलकरत्नेच्या बॅटची एज लागली आणि विकेटकीपर मार्क बाऊचरने त्याचा कॅच घेतला. श्रीलंका ७७ / २!

तिलकरत्ने आऊट झाल्यावर जेमतेम १३ रन्सची भर पडते तोच झोंडेकीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या अँड्र्यू हॉलला कट् करण्याच्या प्रयत्नात महेला जयवर्धनेच्या बॅटची एज लागली आणि बाऊचरने त्याचा कॅच घेतला. तो आऊट झाला तेव्हा २२ ओव्हर्समध्ये श्रीलंकेचा स्कोर होता ९० / ३!

जयवर्धनेच्या जागी बॅटींगला आलेल्या अनुभवी अरविंदा डिसील्वाने सुरवातीला कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढण्यावरच भर दिला. दुसर्‍या बाजूला अट्टापट्टूची फटकेबाजी सुरुच होती. कॅलिस आणि झोंडेकीला त्याने बाऊंड्री फटकावल्या. झोंडेकीच्या ऐवजी पुन्हा बॉलिंगला आलेल्या हॉलच्या बॉलवर डिसील्वाने कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली. हॉलच्या ऐवजी पोलॉक स्वतः बॉलिंगला आल पण डिसील्वाने त्याला लागोपाठ दोन बाऊंड्री फटकावल्या. अट्टापट्टू - डिसील्वा यांनी मग दक्षिण आफ्रीकन बॉलर्सची पद्धतशीरपणे धुलाई करण्यास सुरवात केली. क्लूसनर - हॉल - झोंडेकी - कॅलीस यांना जवळपास प्रत्येक ओव्हरमध्ये बाऊंड्री फटकावण्याचं त्यांनी सत्रं आरंभलं होतं. पोलॉकने एन्टीनीला बॉलिंगला आणल्यावर...

एन्टीनीच्या पहिल्याच बॉलवर अट्टापट्टूचा पूल मारण्याचा प्रयत्नं फसला...
स्क्वेअरलेगला असलेला क्लूसनर आणि मिडऑनला असलेला स्मिथ यांच्या मध्ये बॉल पडल्याने अट्टापट्टू वाचला...
एन्टीनीचा पुढचा बॉल बंपर होता...
डिसील्वाला शॉर्टपीच बॉल टाकणं म्हणजे आत्महत्या...
अपेक्षेप्रमाणेच डिसील्वाने तो मिडविकेट बाऊंड्रीपार हूक केला... सिक्स!
एन्टीनीचा पुढचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
डिसील्वाने कोणतीही दयामाया न दाखवता तो बॅकवर्ड पॉईंट बाऊंड्रीवर कट् केला!

हॉलच्या पुढच्या ओव्हरमध्येही याचीच पुनरावृत्ती झाली...
लेगस्टंपवर पडलेल्या हॉलच्या बॉलवर डिसील्वाने मिडविकेटला सिक्स ठोकली...
पुढच्याच बॉलवर पॉईंटला बाऊंड्री ठोकली पण...
हॉलला फटकावण्याचा अट्टापट्टूचा प्रयत्नं मात्रं पार फसला...
लाँगऑन बाऊंड्रीवर झोंडेकीच्या ऐवजी फिल्डींगला आलेल्या रॉबिन पीटरसनने त्याचा कॅच घेतला!

१२९ बॉल्समध्ये १८ बाऊंड्रीसह अट्टापट्टूने १२४ रन्स फटकावल्या.
अरविंदा डिसील्वा बरोबर त्याने १५२ रन्सची पार्टनरशीप केली.
श्रीलंका २४२ / ४!

जेमतेम १ रनची भर पडते तोच...
हॉलच्या पुढच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर...
लेगस्टंपवर पडलेला बॉल डिसील्वाने मिडविकेटवर उचलला पण...
डिसील्वाच्या अपेक्षेपेक्षा हॉलचा बॉल किंचित स्लो आला होता...
मिडविकेटला ग्रॅम स्मिथने डाईव्ह मारत अप्रतिम कॅच घेतला!

७८ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री आणि २ सिक्स तडकावत डिसील्वाने ७३ रन्स फटकावल्या.
श्रीलंका २४३ / ५!

डिसील्वा परतल्यावर श्रीलंकेची घसरगुंडी उडाली. कॅलिसच्या बॉलवर पोलॉकने कुमार संगकाराचा कॅच घेतल्यावर पोलॉकने रसेल आर्नॉल्डची दांडी उडवली. मुरलीधरनने आपल्या नेहमीच्या डोळे बंद करुन बॅट फिरवण्याच्या शैलीत एक बाऊंड्री फटकावली पण शेवटच्या ओव्हरमध्ये कॅलीसने त्याची दांडी उडवली. अखेरच्या बॉलवर बाऊचरच्या हातात बॉल असताना रन काढण्याच्या प्रयत्नात चामिंडा वास रनआऊट झाला.

५० ओव्हर्सनंतर श्रीलंकेचा स्कोर होता २६८ / ९!

दक्षिण आफ्रीकेच्या बॅटींग लाईनअपचा विचार करता २६९ रन्सचं टार्गेट गाठणं अशक्यं नव्हतं पण श्रीलंकेच्या स्पिनर्सना - विशेषतः मुरलीधरनला नजरेआड करुन चालणार नव्हतं. मुरलीच्या जोडीला चामिंडा वासही चांगलाच फॉर्मात होता, पण दक्षिण आफ्रीकेच्या दृष्टीने धोक्याची सूचना होती ती म्हणजे दर्बनच्या दक्षिणेला आकाशत ढग जमा होण्यास सुरवात झाली होती!

चामिंडा वासच्या पहिल्या मेडन ओव्हरनंतर हर्शेल गिब्ज आणि ग्रॅम स्मिथ यांनी आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. गुणरत्नेच्या बॉलवर गिब्जने मिडविकेटला बाऊंड्री फटकावल्यावर वासच्या पुढच्या ओव्हरमध्ये त्याने लेगग्लान्सची बाऊंड्री मारली. स्मिथनेही गिब्जच्या पावलावर पाऊल टाकत गुणरत्नेला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. पाचव्या ओव्हरमध्ये...

वासचा शॉर्टपीच बॉल लेगस्टंपच्या लाईनवर पडला...
गिब्जने फ्रंटफूटवर येत तो लेगसाईडला उचलला...
बॉल मिडविकेट बाऊंड्रीपार गेला.... सिक्स!

गुणरत्नेच्या पुढच्या ओव्हरमध्ये स्मिथने पुन्हा एकदा स्ट्रेटची बाऊंड्री तडकावल्यावर जयसूर्याने त्याच्याऐवजी दिलहरा फर्नांडोला बॉलिंगला आणलं, पण गिब्जने त्याला दोन बाऊंड्री तडकावल्या. स्मिथने वासला मिडविकेटला बाऊंड्री फटकावल्यावर फर्नांडोच्या जागी पुन्हा बॉलिंगला आलेल्या गुणरत्नेला कट्ची बाऊंड्री मारली. अखेर गुणरत्नेच्या ऐवजी जयसूर्याने अरविंदा डिसील्वाला बॉलिंगला आणलं आणि ही चाल यशस्वी ठरली. डिसील्वाचा पहिलाच बॉल मिडविकेटला फटकावण्याचा स्मिथचा प्रयत्नं पार फसला आणि मिडविकेट बाऊंड्रीवर गुणरत्नेने त्याचा कॅच घेतला. ३४ बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह स्मिथने ३५ रन्स फटकावल्या. दक्षिण आफ्रीका ६५ / १!

स्मिथ आऊट झाल्यावरही गिब्जची फटकेबाजी सुरुच होती. डिसील्वाच्या २ ओव्हर्समध्ये त्याने २ बाऊंड्री मारल्या, पण स्मिथच्या जागी बॅटींगला आलेल्या गॅरी कर्स्टनला मात्रं रन्स काढणं कठीण जात होतं. अखेर डिसील्वालाच स्वीप मारण्याच्या नादात कर्स्टनच्या पॅड आणि खांद्याला लागून बॉल स्टंपवर गेला. ८ रन्स काढण्यासाठी कर्स्टनला २१ बॉल्स खर्ची घालावे लागले होते. दक्षिण आफ्रीका ९१ / २!

कर्स्टन परतल्यावर बॅटींगला आलेल्या जॅक कॅलीसने कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढून गिब्जला सपोर्ट देण्याचा मार्ग पत्करला. गिब्जने डिसील्वाला मिडविकेटवर दणदणीत सिक्स ठोकल्यावर रसेल आर्नॉल्डच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या मुरलीधरनच्या पहिल्याच ओव्हरमध्ये कॅलीसने त्याला कट्ची बाऊंड्री तडकावली. कॅलिस - गिब्ज यांनी ३३ रन्सची पार्टनरशीप केल्यावर डिसील्वाच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या जयसूर्याने कॅलिसची दांडी उडवली. दक्षिण आफ्रीका १२४ / ३!

कॅलीस परतल्यावर बॅटींगला आलेल्या बोटा डिपनारने सावध पवित्रा घेत श्रीलंकन बॉलर्सना - विशेषतः मुरलीधरनला खेळून काढण्याचं धोरण अवलंबलं. मुरलीधरन - जयसूर्या यांच्या अचूक बॉलिंगमुळे डिपनारला रन्स काढणं कठीण जात होतं. गिब्जने जयसूर्याला कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली पण पुढच्याच ओव्हरमध्ये...

मुरलीधरनचा शेवटचा बॉल ऑफस्टंपच्या किंचीत बाहेर पडला...
गिब्जने ऑफस्टंपच्या बाहेरून स्वीप मारण्याचा प्रयत्नं केला पण...
बॉल टप्पा पडल्यावर वळला आणि गिब्जच्या पायामागून लेगस्टंपवर गेला...
गिब्जलाच काय पण स्क्वेअरलेगला असलेल्या अंपायर वेंकटराघवनलाही नेमकं काय झालं हे कळलंच नाही...
संगकाराने स्टंपिंग करण्याच्या हेतूने बेल्स उडवले असावे असा गिब्जचा ग्रह झाला होता...
थर्ड अंपायर पीटर विलीकडे हा निर्णय सोपवण्यात आल्यावर गिब्ज बोल्ड झाल्याचं निष्पन्नं झालं!

८८ बॉल्समध्ये ७ बाऊंड्री आणि २ सिक्ससह गिब्जने ७३ रन्स फटकावल्या.
दक्षिण आफ्रीका १४९ / ४!

जयसूर्याच्या पुढच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर डिपनार एलबीडब्ल्यू झाला!
दक्षिण आफ्रीका १४९ / ५!

अद्याप दक्षिण आफ्रीकेला जवळपास २१ ओव्हर्समध्ये १२० रन्सची आवश्यकता होती!

डिपनार आऊट झाल्यावर पोलॉक बॅटींगला आला. तो आल्याबरोबर विकेटकीपर कुमार संगकाराने शस्त्रं उपसलं स्लेजिंगचं!

"There is some pressure here for skippy yeh…" पोलॉक क्रीजमध्ये पोहोचत असताना संगकाराने त्याचं 'स्वागत केलं, "...gonna led his country down now it feels! Lots of exceptions fellows..come on! Oh man, the weight of all these exceptions fellows…weight of the country chaps… forty two million supports right here depending on Shaun!"

संगकाराच्या या नेमक्या वक्तंव्यामुळे पोलॉकच्या चेहर्‍यावरही हलकीशी स्मितरेषा चमकून गेली!

बाऊचर आणि पोलॉक यांनी सुरवातीला कोणतीही रिस्क न घेता श्रीलंकन बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. जयसूर्याने विकेट्स मिळवण्याच्या दृष्टीने चामिंडा वासला बॉलिंगला आणलं, पण बाऊचर - पोलॉक यांनी त्याला दाद दिली नाही. जयसूर्याला पोलीकने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री फटकावल्यावर पुढच्याच ओव्हरमध्ये बाऊचरने मुरलीधरनला स्क्वेअरलेगला बाऊंड्री तडकावली. बाऊचर - पोलॉक यांनी १३ ओव्हर्समध्ये ६५ रन्सची पार्टनरशीप करुन दक्षिण आफ्रीकेची घसरलेली गाडी पुन्हा ट्रॅकवर आणली होती, पण आता कोणत्याही क्षणी पावसाची चिन्हं दिसू लागली होती!

शेवटच्या ८ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला ५९ रन्सची आवश्यकता होती.

मुरलीधरनची ४३ वी ओव्हर सुरु होण्यापूर्वीच रिमझिम पावसाला सुरवात झाली होती!

पोलॉकने मुरलीधरनचा बॉल स्क्वेअरलेगला फ्लिक केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
बाऊचरने पोलॉकच्या कॉलला प्रतिसाद दिला पण...
विकेटकीपर कुमार संगकाराने बॉल पिकअप केला...
मुरलीधरनने थ्रो कलेक्ट करुन बेल्स उडवण्याच्या भानगडीत पडलाच नाही...
संगकाराचा थ्रो त्याने स्टंपवर डिफ्लेक्ट केला...

अंपायर स्टीव्ह बकनरने हा निर्णय थर्ड अंपायर पीटर विलीवर सोपवला...
अनेक वेगवेगळ्या अँगल्समधून रिप्ले पाहिल्यावर पीटर विलीने आपला निर्णय दिला...
...अवघ्या एक - दोन मिलीमीटर्सच्या फरकाने पोलॉक रनआऊट झाला होता!
दक्षिण आफ्रीका २१२ / ६!

पावसाला सुरवात झाल्यामुळे डकवर्थ - लुईस नियमाप्रमाणे मॅचचा निकाल लागणार हे उघड होतं. त्यातच पोलॉक आऊट झाल्यामुळे डकवर्थ - लुईसच्या आकडेवारीनुसार दक्षिण आफ्रीकेसमोरचं टार्गेट अधिकच कठीण झालं होतं.

४४ व्या ओव्हरमध्ये जयसूर्याने रसेल आर्नॉल्डला बॉलिंगला आणलं...
बाऊचरने दुसर्‍या बॉलवर एक रन काढली पण...
उरलेल्या चार बॉल्सवर लान्स क्लूसनरला काहीच करता आलं नाही!

अद्याप ६ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला ५३ रन्स बाकी होत्या!

मुरलीधरनची ४५ वी ओव्हर सुरु होण्यापूर्वी पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. ही ओव्हर शेवटची ठरणार या शक्यतेने दक्षिण आफ्रीकेचा कोच एरीक सिमन्स याने १२ वा खेळाडू असलेल्या निकी बोयेबरोबर बाऊचरला डकवर्थ - लुईस नियमानुसार ४५ ओव्हर्समध्ये २२९ रन्सची आवश्यकता असल्याचा निरोप पाठवला!

मुरलीधरनच्या पहिल्याच बॉलवर बाऊचरने १ रन काढली...
पुढच्या दोन बॉल्सवर क्लूसनरला काहीच करता आलं नाही...
पावसाचा जोर हळूहळू वाढत होता...
बॉल इतका ओला झाला होता की तो हातातून निसटत होता...
मुरलीधरनचा चौथा बॉल असाच हातातून निसटून लेगसाईडला गेला...
संगकारालाही तो अडवता आला नाही...
दक्षिण आफ्रीकेला ५ वाईड्सचा बोनस मिळाल!
पाचव्या बॉलवर अखेर क्लूसनरने १ रन काढली...हा त्याने खेळलेला ८ वा बॉल होता!
सहाव्या बॉलवर बाऊचरने क्रीजमधून पुढे सरसावत मिडविकेट बाऊंड्रीपार सिक्स ठोकली!
दक्षिण आफ्रीकेचा स्कोर झाला २२९ / ६!

मुरलीधरनने शेवटचा बॉल टाकण्यापूर्वी कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेला टोनी ग्रेग म्हणाला,
“If they don’t get back on, they need one more run. They are probably aware of it.”

बाऊचरने शेवटचा बॉल काळजीपूर्वक मिडविकेटला खेळला...
रन काढण्याचा कोणताही प्रयत्नं न करता!

पावसाचा जोर आता इतका वाढला होता की अंपायर वेंकटराघवन आणि स्टीव्ह बकनर यांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांना पॅव्हेलियनमध्ये परतण्याची सूचना केली.

बाऊचर आणि क्लूसनर ड्रेसिंगरुममध्ये परतले तेव्हा पोलॉक डोकं धरुन बसला होता...
डकवर्थ - लुईस नियमानुसार २२९ हा 'Par Score' होता...
मॅच 'टाय' होण्यासाठीचा!
मॅच जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रीकेला आणखीन १ रनची आवश्यकता होती!
बाऊचरला हे कळलं तेव्हा तो स्तंभितच झाला!

सनथ जयसूर्याला मात्रं मॅच टाय झाल्याची कल्पना होती. तो म्हणतो,
"We knew that it was a tie. I had the Duckworth - Lewis sheet in my hand."

दक्षिण आफ्रीकेचे खेळाडू आणि मैदानावर हजर असलेले प्रेक्षक पाऊस थांबावा म्हणून मनोमन प्रार्थना करत होते, पण त्यांच्या आशेवर शब्दशः पाणी पडलं!
वेंकट आणि बकनर यांनी डकवर्थ - लुईस नियमानुसार मॅच टाय झाल्याचं जाहीर केलं!

....आणि त्याबरोबरच दक्षिण आफ्रीकेचा वर्ल्डकप आटपला!

पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी झालेल्या गोंधळामुळे दक्षिण आफ्रीका वर्ल्डकपमधून बाहेर पडली होती!
यावेळी डकवर्थ - लुईस नियमाची पूर्ण माहिती नसल्यामुळे!

बिचारा लान्स क्लूसनर!
१९९९ आणि २००३ - दोन्ही वर्ल्डकपमध्ये मॅच टाय होऊन दक्षिण आफ्रीका वर्ल्डकपबाहेर गेली तेव्हा तो नॉटआऊट होता!

मॅचनंतर बोलताना शॉन पोलॉक म्हणाला,
"Boucher had been given a message of 229 and so he was pretty happy once we'd got that. But, you know, it's a difficult one too. If we'd known we were going to stop after that over, it's a different kettle of fish. You can look at all the ifs and buts but at the end of the day it doesn't really help much. This would take a hell of a long time to sink in."

मार्क बाऊचर म्हणाला,
"Niki Boje brought out a message that out target was 229. So after hitting Murali for six, I was careful not to get out as it would change the equation again. We min-interpreted the Duckworth - Lewis and it cost us the place in Super Six."

दक्षिण आफ्रीकेचा भूतपूर्व ओपनर आणि कॉमेंटेटर अँड्र्यू हडसन म्हणाला,
"42 million South Africans are going to bed tonight hoping it was a bad dream!"

या सगळ्या गोंधळाचा आणि दक्षिण आफ्रीकेच्या वर्ल्डकपमधून झालेल्या गच्छ्न्तीचा परिणाम भोगावा लागला तो पोलॉकला!
वर्ल्डकपनंतर त्याला कॅप्टन पदावरुन डच्चू देण्यात आला आणि त्याच्या ऐवजी ग्रॅम स्मिथची कॅप्टन म्हणून नेमणूक करण्यात आली!

*************************************************************************************

२००३ च्या वर्ल्डकपबरोबरच गेल्या १६-१७ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाजत असलेल्या तीन खेळाडूंचं करीअर संपुष्टात आलं..
अरविंदा डिसील्वा, कार्ल हूपर आणि वासिम अक्रम!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

कबीरा's picture

28 Feb 2017 - 11:24 am | कबीरा

१९९६ पासून लागलेला चोकर्स हा धब्बा अजून ही अफ्रिकन टीम ला पुसता आला नाहीये. बघूया आता २०१९ मध्ये काय होत.

गामा पैलवान's picture

28 Feb 2017 - 8:36 pm | गामा पैलवान

अवांतर :

स्पार्टाकस,

ते exceptions च्या जागी expectations हवं होतं ना?

आ.न.,
-गा.पै....................

अभिजीत अवलिया's picture

1 Mar 2017 - 9:55 am | अभिजीत अवलिया

बघितली होती ही मॅच. निव्वळ मूर्खपणा आफ्रिकेचा.