वर्ल्डकप क्लासिक्स - १९९२ - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
14 Feb 2017 - 8:11 am

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेला १९९१९ मधला वर्ल्ड्कप हा पूर्वीच्या चारही वर्ल्डकपपेक्षा अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण होता. या वर्ल्डकपमध्ये सर्वप्रथम पांढर्‍या रंगाच्या कपड्यांऐवजी रंगीत कपड्यांचा वापर करण्यात आला होता. पारंपारीक लाल बॉलची जागा पांढर्‍या बॉलने घेतली होती तर पांढरा बॉल स्पष्टपणे दिसावा म्हणून काळ्या रंगाचा साईटस्क्रीनही या वर्ल्डकपमध्येच प्रथम वापरण्यात आला. सर्वात महत्वाचं म्हणजे फ्लडलाईट्समध्ये खेळवल्या गेलेल्या डे-नाईट मॅचेसचा प्रथमच या वर्ल्डकपमध्ये समवेश करण्यात आला होता.

वंशभेदी अपार्थाईड व्यवस्थेमुळे बहिष्कृत झाल्यावर २१ वर्षांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्‍या दक्षिण आफ्रीकेचा हा पहिलाच वर्ल्डकप होता.

या वर्ल्डकपमध्ये काही अत्यंत इंटरेस्टींग नियम वापरण्यात आले होते.

पहिला नियम म्हणजे पहिल्या इनिंग्जमध्ये साडेतीन तासाची वेळ संपल्यावर बॉलिंग करणार्‍या संघाने जितक्या ओव्हर्स टाकल्या असतील तितक्याच ओव्हर्स बॅटींग करताना त्या संघाला टार्गेटचा पाठलाग करताना मिळणार होत्या. हा नियम प्रथम फिल्डींग करणार्‍या संघाच्या दृष्टीने फायदेशीर होता कारण टार्गेटचा पाठलाग करताना नेमक्या किती ओव्हर्स उपलब्धं आहेत हे इनिंग्जला सुरवात करण्यापूर्वीच स्पष्टं होत होतं. प्रथम बॅटींग करणार्‍या संघाला मात्रं आयत्या वेळेस वेळ संपल्यामुळे कमी ओव्हर्स मिळण्याची शक्यता होती.

दुसरा नियम म्हणजे कुप्रसिद्ध पावसाचा नियम!

या नियमानुसार दुसर्‍या इनिंग्जच्या दरम्यान पाऊस आल्यास पहिल्या इनिंग्जमधल्या सर्वात कमी रन्स फटकावण्यात आलेल्या ओव्हर्स कमी करण्यात येत होत्या आणि त्या ओव्हर्समध्ये काढण्यात आलेल्या रन्स टार्गेटमधून वजा करण्यात येत होत्या! प्रथम बॅटींग करणार्‍या संघाला या नियमाचा अर्थातच फायदा होणार होता! या विचित्रं नियमामुळे कोणाला तरी फटका बसणार हे उघड होतं आणि तो बसलाच!

***********************************************************************************

१ मार्च १९९२
गॅब्बा, ब्रिस्बेन

क्वीन्सलँडमधल्या ब्रिस्बेनच्या गॅब्बा मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली मॅच रंगणार होती. दोन्ही संघांच्या दृष्टीने ही मॅच अत्यंत महत्वपूर्ण होती. ऑस्ट्रेलियाला पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडने तर दुसर्‍या मॅचमध्ये वर्ल्डकपमधली आपली पहिलीच मॅच खेळणार्‍या दक्षिण आफ्रीकेने हरवलं होतं. भारताला पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. भारताची श्रीलंकेविरुद्धची मॅच केवळ दोन बॉल्सनंतर रद्द करावी लागली होती. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये पहिला विजय मिळवण्याच्या जिद्दीनेच दोन्ही संघ मैदानात उतरणार होते.

अ‍ॅलन बॉर्डरच्या ऑस्ट्रेलियन संघात डेव्हीड बून, जेफ मार्श, डीन जोन्स, स्वतः अ‍ॅलन बॉर्डर असे बॅट्समन होते. भारताविरुद्धच्या या मॅचसाठी मार्क टेलरचाही समावेश करण्यात आला होता. बॉलिंगचा भार मुख्यतः क्रेग मॅकडरमॉट, माईक व्हिटनी, पीटर टेलर आणि ब्रूस रीडच्या ऐवजी संघात आलेला मर्व्ह ह्यूज यांच्यावर होता. याखेरीज स्टीव्ह वॉ आणि टॉम मूडीसारखे ऑलराऊंडर ऑस्ट्रेलियाकडे होते परंतु विकेटकीपर इयन हिली मात्रं मांडीला झालेल्या दुखापतीमुळे या मॅचमध्ये खेळू शकणार नव्हता. हिलीच्या अनुपस्थितीत विकेटकिपींगची जबाबदारी आली होती डेव्हीड बूनवर!

अझरुद्दीनच्या भारतीय संघात रवी शास्त्री, श्रीकांत, स्वतः अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, संजय मांजरेकर, अजय जाडेजा असे बॅट्समन होते. श्रीलंकेविरुद्धची पहिली मॅच पावसामुळे रद्दं झाल्यावर अजय जाडेजाची ही दुसरीच मॅच होती. कपिल देवसारखा ऑलराऊंडर भारताकडे होता. त्याच्या जोडीला मनोज प्रभाकर, जवगल श्रीनाथ, वेंकटपती राजू असे बॉलर्स होते. किरण मोरेसारख्या विकेटकीपर बॅट्समनचाही भारतीय संघात समावेश होता. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये अपयशी ठरलेल्या सुब्रतो बॅनर्जी आणि विनोद कांबळीला मात्रं वगळण्यात आलं होतं.

अ‍ॅलन बॉर्डरने टॉस जिंकल्यावर बॅटींगचा निर्णय घेतला. १९८७ च्या वर्ल्डकपमध्ये बून - मार्श यांनी जवळपास प्रत्येक मॅचमध्ये चांगली ओपनिंग पार्टनरशीप केलेली होती. पण मार्क टेलरचा समावेश करण्यात आल्याने आणि बूनला विकेटकिपींगही करावं लागणार असल्याने जेफ मार्शबरोबर मार्क टेलर ओपनिंगला आला. पण याचा फारसा उपयोग झाला नाही. कपिल देवला स्क्वेअरड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात टेलरची बॉटम एज लागली आणि विकेटकीपर किरण मोरेने त्याचा कॅच घेतला. कपिल आणि मनोज प्रभाकरच्या अचूक बॉलिंगमुळे जेफ मार्शही चाचपडतच होता. अखेर कपिललाच चॉप करण्याच्या नादात मार्शच्या बॅटची एज लागून बॉल स्टंप्सवर गेला. १० ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता ३१ / २!

डेव्हीड बून आणि डीन जोन्स यांनी ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज सावरण्यास सुरवात केली. चाणाक्षपणे १-२ रन्स काढताना संधी मिळताच फटकेबाजीची एकही संधी दोघंही सोडत नव्हते. खासकरुन श्रीनाथला ठोकून काढण्याचं दोघांनी धोरण पत्करलं होतं. बूनने श्रीनाथला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री मारल्यावर जोन्सने श्रीनाथला लाँगऑन बाऊंड्रीपार दणदणीत सिक्स ठोकली! श्रीनाथच्या पुढच्याच ओव्हरमध्ये जोन्स आणि बून यांनी स्क्वेअरलेगला बाऊंड्री तडकावल्यावर अझरुद्दीनने त्याच्याऐवजी सचिनला बॉलिंगला आणलं. सचिनला कट् मारण्याच्या नादात बूनची बॉटम एज लागली, पण किरण मोरेला कोणतीही संधी न देता बॉल थर्डमॅन बाऊंड्रीपार गेला. अर्थात बूनचा आक्रमकपणा किंचीतही कमी झाला नाही. सचिनला त्याने पुन्हा कव्हरड्राईव्हची बाऊंड्री ठोकली. बून - जोन्स यांनी ७१ रन्सची पार्टनरशीप केल्यावर अखेर वेंकटपती राजूला फटकावण्याच्या नादात शॉर्ट मिडविकेटला रवी शास्त्रीने त्याचा कॅच घेतला. ६० बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह बूनने ४३ रन्स फटकावल्या. ऑस्ट्रेलिया १०२ / ३!

बून आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या स्टीव्ह वॉने अजय जाडेजाला मिडऑनला बाऊंड्री ठोकली, पण हा अपवाद वगळता थंड डोक्याने डीन जोन्सला जास्तीत जास्तं स्ट्राईक देण्याचा त्याने मार्ग पत्करला होता. जोन्सची फटकेबाजी सुरुच होती. सचिन - राजू दोघांनाही त्याने बाऊंड्री तडकावल्या. स्टीव्ह वॉ - जोन्स यांनी ५४ रन्सची पार्टनरशीप केल्यावर श्रीनाथला फटकावण्याच्या प्रयत्नात स्टीव्ह वॉची दांडी उडाली. ऑस्ट्रेलिया १५६ / ४!

स्टीव्ह वॉ परतल्यावर रन रेट वाढवण्याच्या हेतूने बॉर्डरऐवजी बॅटींगला आला टॉम मूडी. ऑस्ट्रेलियाची ही चाल चांगलीच यशस्वी ठरली. मूडीने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. श्रीनाथला कव्हर्समधून लागोपाठ दोन बाऊंड्री ठोकल्यावर मूडीने सचिनला मिडविकेट वर मारलेली बाऊंड्री सिक्स जाण्यापासून थोडक्यात वाचली होती. पण २३ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह २५ रन्स फटकावल्यावर मनोज प्रभाकरच्या स्लो बॉलला फटकावण्याचा मूडीचा प्रयत्नं पार फसला आणि त्याच्या बॅटची इज लागून बॉल स्टंपवर गेला. ४६ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता १९८ / ५!

मूडी आऊट झाल्यावरही जोन्सची फटकेबाजी सुरुच होती. कपिलच्या ४७ व्या ओव्हरमध्ये त्याने मिडविकेट आणि कव्हर्समधून ३ बाऊंड्री फटकावत १६ रन्स वसूल केल्या. प्रभाकरच्या पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने मिडविकेटवरुन सिक्स तडकावली. जोन्स आरामात सेंच्युरी ठोकणार असं वाटत असतानाच प्रभाकरचा पुढचाच बॉल फटकावण्याच्या नादात त्याच्या बॅटची टॉप एज लागली आणि प्रभाकरनेच त्याचा कॅच घेतला. १०८ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री आणि २ सिक्स तडकावत जोन्सने ९० रन्स फटकावल्या. ऑस्ट्रेलिया २३० / ६!

कपिलच्या पुढच्याच ओव्हरमध्ये...
ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला बॉल लाँगऑफला फटकावण्याचा बॉर्डरचा प्रयत्नं फसला...
हवेत उडालेला बॉल ३० यार्ड सर्कलच्या जेमतेम बाहेर गेला होता...
हा बॉल जमिनीवर पडणार असं वाटत असतानाच...
लाँग ऑफ बाऊंड्रीवरुन जवळपास २५-३० यार्ड धावत आलेल्या अजय जाडेजाने पुढे डाईव्ह अप्रतिम कॅच घेतला!
ऑस्ट्रेलिया २३५ / ७!

प्रभाकरच्या शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल वाईड गेला...
पुढच्याच बॉलवर मिडविकेटला जाडेजाने मॅकडरमॉटचा कॅच घेतला...
तिसर्‍या बॉलवर पीटर टेलरने एक रन काढली...
पुढच्या तीन बॉल्सवर ह्यूजला काहीच करता आलं नाही...
शेवटच्या बॉलवर लेग बाय घेण्याच्या प्रयत्नात पीटर टेलर रन आऊट झाला....

५० ओव्हर्स संपल्या तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता २३७ / ९!

क्रेग मॅकडरमॉट आणि माईक व्हिटनी यांच्या पहिल्या दोन्ही ओव्हर्स मेडन गेल्यावर तिसर्‍या ओव्हरमध्ये शास्त्रीने पहिली रन काढली! कोणतीही रिस्क न घेता ऑस्ट्रेलियन बॉलर्सना खेळून काढण्याचा शास्त्रीने पवित्रा घेतला होता. पहिल्या ४ ओव्हर्समध्ये जेमतेम ६ रन्स निघाल्यावर अखेर मॅकटरमॉटच्या यॉर्करचा अजिबाद अंदाज न आल्याने श्रीकांतचा ऑफस्टंप उडाला. भारत ६ / १!

श्रीकांत आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या अझरुद्दीनने आक्रमक पवित्रा घेत व्हिटनीला स्क्वेअरकटची बाऊंड्री मारली. मॅकडरमॉट - व्हिटनीच्या अचूक बॉलिंगनंतरही चाणाक्षपणे बॉल प्लेस करत अझर १-२ रन्स काढत होता, पण शास्त्री?

व्हिटनीला मारलेल्या एकमेव बाऊंड्रीनंतर टेस्ट मॅच खेळावी अशा थाटात तो प्रत्येक बॉल डिफेन्सिव पद्धतीने खेळून काढत होता!
नॉन स्ट्रायकर एन्डला अझरच्या चेहर्‍यावरची नाराजीची छटा अजिबात लपून राहत नव्हती...
शास्त्रीच्या इनिंग्जमुळे भारताच्या इनिंग्जला खीळ बसली होती...
१० ओव्हर्सनंतर भारताचा स्कोर होता २६ / १!

मर्व्ह ह्यूजच्या पहिल्याच बॉलला अझरने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. दुसर्‍या बॉलला त्याने १ रन घेतल्यावर उरलेले चारही बॉल्स शास्त्रीने आपल्या नेहमीच्या पद्धतीने शांतपणे खेळून काढले! पुढच्याच ओव्हरमध्ये...

व्हिटनीला फ्लिक करण्याच्या प्रयत्नात अझरच्या पॅडला लागून बॉल बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला गेला...
अझर क्रीज सोडून दोन पावलं पुढे आला...
शास्त्रीने एक रन काढण्यासाठी कॉल दिला आणि तो धावत सुटला पण...
बॅकवर्ड पॉईंटला मार्शने बॉल पिकअप केलेला पाहून अझर जागीच थबकला...
शास्त्री परत फिरला खरा पण एव्हाना मार्शने व्हिटनीकडे थ्रो केला होता...
नॉनस्ट्रायकर एन्डला स्टंप्सपाशी असलेल्या व्हिटनीच्या हातातून बॉल सुटला...
मिडऑफवरुन धावत आलेल्या स्टीव्ह वॉने बॉल पिकअप केला पण...
नेमक्या त्या क्षणी व्हिटनी स्टंप्सच्या दोन बाजूला पाय फाकवून उभा होता...
स्टीव्ह वॉचा थ्रो स्टंप्सला लागणं अर्थातच शक्यंच नव्हतं!

शास्त्री रनआऊट होण्यापासून वाचला!

माईक व्हिटनीने जाणूनबुजून शास्त्रीला रनआऊट केलं नव्हतं. अनेक वर्षांनी त्याबद्द्ल बोलताना व्हिटनी मिस्किलपणे म्हणाला,
"The way he was batting was perfectly fine for us. I made sure not to run him out and did not let Steve Waugh either!"

शास्त्रीची कूर्मगती बॅटींग सुरु असतानाच पावसाला सुरवात झाली...
भारताचा स्कोर होता १६.२ ओव्हर्समध्ये ४५ / १!

अखेर पाऊस थांबला तेव्हा सुमारे १५ मिनीटांचा खेळ वाया गेल्याचं स्पष्टं झालं.
भारताच्या इनिंग्जमधल्या ३ ओव्हर्स कमी करण्यात आल्या पण...
भारतापुढे असलेलं २३८ रन्सचं टार्गेट केवळ २ रन्सनी कमी करण्यात आलं!
पावसाच्या आगमनापूर्वी २०२ बॉल्समध्ये भारताला १९३ रन्सची आवश्यकता होती...
पावसानंतर १८२ बॉल्समध्ये १९१!

मॅच पुन्हा सुरु झाल्यावरही शास्त्रीच्या खेळात फारसा फरक पडला नव्हता. पुढच्या २ ओव्हर्समध्ये त्याने ९ बॉल खेळून केवळ २ रन्स काढल्या होत्या! अखेर टॉम मूडीला लेगस्टंपच्या बाहेर जात कव्हर्सवरुन फटकावण्याच्ता नादात अखेर कव्हर्समध्ये स्टीव्ह वॉने शास्त्रीचा कॅच घेतला!

६७ बॉल्समध्ये व्हिटनीला मारलेल्या एकमेव बाऊंड्रीसह २५ रन्सपर्यंत सरपटल्यावर शास्त्री एकदाचा आऊट झाला!
भारत ५३ / २!

शास्त्री आऊट झाल्यावर अपेक्षेप्रमाणे भारताचा स्कोर झटपट वाढण्यास सुरवात झाली. मर्व्ह ह्यूजला अझरने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. शास्त्रीच्या जागी बॅटींगला आलेल्या सचिनने टॉम मूडीच्या शॉर्टपीच बॉलवर मिडविकेटला पूलची बाऊंड्री फटकावली. अझर - सचिन यांनी ३३ रन्सची पार्टनरशीप केल्यावर शास्त्रीप्रमाणेच मूडीला फटकावण्याच्या नादात कव्हर्समध्ये स्टीव्ह वॉने सचिनचा कॅच घेतला. भारत ८६ / ३!

मॅच जिंकण्यासाठी अद्याप भारताला २१ ओव्हर्समध्ये १५६ रन्सची आवश्यकता होती!

सचिन परतल्यावर बॅटींगला आलेल्या कपिलने सुरवातीपासूनच आक्रमक फटकेबाजीला सुरवात केली. स्टीव्ह वॉ - मूडी यांना त्याने मिडऑफवरुन दोन बाऊंड्री तडकावल्या. अझरनेही कपिलच्या पावलावर पाऊल टाकत टॉम मूडीला मिडऑफवरच बाऊंड्री तडकावली. बॉर्डरने मूडीच्या जागी मॅकडरमॉटला बॉलिंगला आणलं, पण अझरने त्याला त्याच्याच डोक्यावरुन बाऊंड्री तडकावली! अझर - कपिल यांनी ६ ओव्हर्समध्ये ४२ रन्सची पार्टनरशीप केल्यावर स्टीव्ह वॉचा स्लो बॉल अ‍ॅक्रॉस द लाईन फटकावण्याच्या नादात कपिल एलबीडब्ल्यू झाला. २१ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह कपिलने २१ रन्स फटकावल्या. भारत १२८ / ५!

शेवटच्या १४ ओव्हर्समध्ये भारताला १०७ रन्स हव्या होत्या!

कपिल आऊट झाल्यावर अझरच्या जोडीला संजय मांजरेकर बॅटींगला आला. अत्यंत टेक्नीकल बॅट्समन असलेला मांजरेकर आक्रमक फटकेबाजी कितपत करु शकेल याबद्द्ल अनेकांना शंकाच होती. मांजरेकरने व्हिटनीला मिडऑनवरुन बाऊंड्री तडकावत आक्रमक सुरवात केली खरी, पण अझरची फटकेबाजी सुरु असल्याने १-२ रन काढत अझरलाच जास्तीत जास्तं स्ट्राईक देण्याचा त्याने मार्ग पत्करला होता!

शेवटच्या ७ ओव्हर्समध्ये भारताला ६७ रन्सची आवश्यकता होती!

अझरने स्टीव्ह वॉला एक्स्ट्राकव्हर - मिडऑफला लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मांजरेकरने स्क्वेअरलेगला बाऊंड्री मारत स्टीव्ह वॉच्या ओव्हरमध्ये १५ रन्स वसूल केल्या! बॉर्डरने मर्व्ह ह्यूजला बॉलिंगला आणलं पण मांजरेकरने ऑफस्टंपच्या बाहेर जात त्याला स्क्वेअरलेगला बाऊंड्री तडकावली! ९ ओव्हर्समध्ये अझर - मांजरेकर यांनी ६८ रन्स फटकावल्या! हे दोघं भारताला मॅच जिंकून देणार असं वाटत असतानाच...

स्टीव्ह वॉचा बॉल मांजरेकरने मिडविकेटला फ्लिक केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
अझरने मांजरेकरच्या कॉलला प्रतिसाद दिला पण...
मिडविकेटला असलेल्या अ‍ॅलन बॉर्डरने बॉल पिकअप केला आणि...
बॉर्डरच्या थ्रोने अचूक स्टंपचा वेध घेतला!
अझर थोडक्यात रनआऊट झाला!

१०२ बॉल्समध्ये १० बाऊंड्री तडकावत अझरने ९३ रन्स फटकावल्या.
भारत १९४ / ५!

अझर परतल्यावर जेमतेम ५ रन्सची भर पडते तोच मर्व्ह ह्यूनजे अजय जाडेजाला बोल्ड केलं.
भारत १९९ / ६!

भारताच्या उरल्यासुरल्या सर्व आशा मांजरेकरवर होत्या.

ह्यूजच्या त्याच ओव्हरचा पाचवा बॉल...
क्रीजमधून पुढे सरसावत ह्यूजचा स्लो बॉल मांजरेकरने मिडविकेट बाऊंड्रीपार उचलला... सिक्स!
पुढचाच बॉल मांजरेकरने ऑफस्टंपच्या बाहेर जात फाईनलेग बाऊंड्रीवर ग्लान्स केला...
जाडेजाची विकेट गेल्यानंतरही ह्यूजच्या ओव्हरमध्ये १४ रन्स फटकावल्या गेल्या होत्या!

अद्याप ३ ओव्हर्समध्ये भारताला २६ रन्स हव्या होत्या!

टॉम मूडीच्या ४५ व्या ओव्हरच्या पहिल्या ५ बॉल्सवर मांजरेकर आणि किरण मोरे यांनी ५ रन्स काढल्या.
मूडीचा शेवटचा बॉल यॉर्कर होता...
मांजरेकरने शेवटच्या क्षणी तो थर्डमॅनच्या दिशेने खेळला आणि एक रन पूर्ण केली...
थर्डमॅन बाऊंड्रीवरुन धावत आलेल्या क्रेग मॅकडरमॉटने बॉल पिकअप केला...
मांजरेकरने मोरेला दुसर्‍या रनसाठी कॉल दिला...
मॅकडरमॉटचा थ्रो कलेक्ट करुन विकेटकीपर डेव्हीड बूनने बेल्स उडवल्या....

४२ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि ह्यूजला मारलेल्या सिक्ससह मांजरेकरने ४७ रन्स फटकावल्या.
भारत २१६ / ७!

मांजरेकर परतल्यावर बॅटींगला आलेला श्रीनाथ आणि किरण मोरे यांनी मॅकडरमॉटच्या ४६ व्या ओव्हरमध्ये ७ रन्स काढल्या.
४६ ओव्हर्सनंतर भारताचा स्कोर होता २२३ / ७!

शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला १३ रन्सची आवश्यकता होती!

माईक व्हिटनी आणि स्टीव्ह वॉ यांच्या ओव्हर्स संपल्या होत्या. मॅकडरमॉटने ४६ वी ओव्हर टाकली असल्याने शेवटची ओव्हर त्याला देणं शक्यंच नव्हतं त्यामुळे शेवटच्या ओव्हरसाठी बॉर्डरसमोर दोनच पर्याय होते ते म्हणजे मर्व्ह ह्यूज किंवा टॉम मूडी. ह्यूजच्या आधीच्या ओव्हरमध्ये १४ रन्स फटकावल्या गेल्याने बॉर्डरने टॉम मूडीच्या हाती बॉल दिला!

मूडीचा पहिला बॉल...
लेगस्टंपच्याही बाहेर असलेला फुलटॉस किरण मोरेने स्क्वेअरलेगला फ्लिक केला...
स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर डीन जोन्सची जिवाच्या मारलेली आकांती डाईव्ह फुकट गेली...

५ बॉल - ९ रन्स!

मूडीचा दुसरा बॉल...
मिडलस्टंपवर आलेला फुलटॉस पुन्हा एकदा किरण मोरेने स्क्वेअरलेगला फ्लिक केला...
यावेळी जोन्स बॉलच्या जवळपासही पोहोचू शकला नाही...

मोरेच्या या दोन बाऊंड्रीनी मॅचचं पारडं पुन्हा भारताच्या बाजूने फिरलं. कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला इयन चॅपल म्हणाला,
"Allan Border would have aged 3 to 4 years in the last 2 balls!"

४ बॉल - ५ रन्स!

मूडीचा तिसरा बॉल...
ऑफस्टंपच्या बाहेर जात फाईनलेगला ग्लान्स करण्याचा मोरेचा प्रयत्नं पार फसला...
मोरेचा मिडलस्टंप उडाला...
भारत २३१ / ८!

३ बॉल ५ रन्स!

मूडीचा चौथा बॉल...
किरण मोरेच्या जागी बॅटींगला आलेल्या मनोज प्रभाकरने ऑफसाईडला खेळला आणि एक रनसाठी धाव घेतली...
मूडीने फॉलो थ्रू मध्ये बॉल पिकअप केला आणि नॉनस्ट्रायकर एन्डला थ्रो केला...
थ्रो स्टंपवर लागला असता तर प्रभाकर निश्चित रनआऊट झाला असता...
मूडीचा थ्रो स्टंपवर लागला नाहीच, उलट मिडऑफवरुन स्टंप्सजवळ येत असलेल्या बॉर्डरपासूनही दूर गेला...
लाँगऑन बाऊंड्रीवरुन धावत आलेल्या फिल्डरने भारताला ओव्हरथ्रो मिळणार नाही खबरदारी घेतली...
स्टीव्ह वॉ!

२ बॉल ४ रन्स!

मूडीचा पाचवा बॉल...
मिडलस्टंपवर पडलेला बॉल श्रीनाथने फटकावला तो बॉर्डरच्या हातात...
प्रभाकर रन काढण्यासाठी धावत सुटला, पण श्रीनाथ क्रीजमधून बाहेरही आला नाही!
बॉर्डरचा थ्रो कलेक्ट करुन मूडीने आरामात बेल्स उडवल्या...
भारत २३२ / ९!

स्टेडीयममध्ये अस्लेल्या ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांपैकी अनेकजण ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकली या समजुतीत मैदानावर धावून आले होते. वस्तुस्थितीची कल्पना आल्यावर ते पुन्हा बाऊंड्रीपार परतले. दरम्यान बॉर्डरने अंपायर इयन रॉबिन्सनकडून पुन्हा शेवटच्या बॉलवर भारताला किती रन्सची आवश्यकता आहे याची खात्री करुन घेतली!

शेवटच्या बॉलवर भारताला ४ रन्स हव्या होत्या!

मूडीचा शेवटचा बॉल...
ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला बॉल श्रीनाथने वाईड मिडविकेट बाऊंड्रीच्या दिशेने हवेत तडकावला...
लाँगऑनवरुन धावत आलेल्या स्टीव्ह वॉ सारख्या फिल्डरच्या हातून हा कॅच सुटला...
एव्हाना श्रीनाथ आणि वेंकटपती राजूने २ रन्स पूर्ण केल्या होत्या...
क्षणार्धात स्वतःला सावरत स्टीव्ह वॉने बॉल पिकअप केला आणि थ्रो केला...
बाऊंड्रीवरुन आलेला स्टीव्ह वॉचा थ्रो कलेक्ट करुन विकेटकीपर डेव्हीड बूनने बेल्स उडवल्या...
तिसरी रन काढण्याच्या प्रयत्नात असलेला राजून रनआऊट झाला!
भारत २३४ ऑल आऊट!

अवघ्या १ रनने ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकली!

स्टीव्ह वॉ म्हणतो,
"I had too much time to take the catch, which gave me jelly legs and unhinged my composure. Fuming from my clumsiness and driven by the cockiness of Raju's gesture, I launched a bounce throw laced with anger to David Boon with all the force I had in me and ran the batsman out."

पावसाच्या विचित्रं नियमाचा भारताला फटका बसला होता!

कपिल देवच्या २ मेडन ओव्हर्स आणि केवळ २ रन्स निघालेली प्रभाकरची शेवटची ओव्हर यामुळे भारतासमोरचं टार्गेट केवळ २ रन्सनी कमी झालं, पण ते गाठण्यासाठी भारताला ३ ओव्हर्स कमी मिळाल्या होत्या! अर्थात तरीही भारताला मॅच जिंकणं सहज शक्यं होतं, पण...

रवी शास्त्रीची भयानक कूर्मगती बॅटींग!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये ५७ रन्स काढण्यासाठी ११२ बॉल्स खर्ची घालत शास्त्रीने भारताच्या अपेक्षा धुळीला मिळवल्या होत्या. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची पुनरावृत्ती झाल्यावर वर्ल्डकपच्या पुढच्या सर्व मॅचेसमधून त्याची हकालपट्टी झाली हे आपलं नशिब!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

14 Feb 2017 - 10:31 am | गॅरी ट्रुमन

ही मॅचही एक क्लिफहँगर होती. ऑस्ट्रेलियात सकाळी सुरू होणारी मॅच भारतीय वेळेप्रमाणे पहाटे सुरू होत असे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या डावातील पहिली चाळीस षटके बघायला मिळाली नव्हती. पण त्यानंतर मात्र सगळी मॅच बघितली होती. ही एक खरोखरच अविस्मरणीय मॅच होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नक्की काय होईल असे सांगता येत नाही अशा काही मॅच असतात त्यात या मॅचचा नंबर बराच वरचा आहे हे नक्कीच.

या मॅचची आणखी एक आठवण म्हणजे सचिनने मारलेला एक फटका सीमारेषेपार गेला होता. पण तो षटकार आहे की चौकार याविषयी संभ्रम होता. सुरवातीला तो षटकार आहे असे गृहित धरून भारताच्या खात्यात ६ रन्स जास्त आल्या होत्या.पण नंतर पंचांनी वॉकीटॉकीवरून खात्री करून तो चौकार आहे हे जाहिर केले होते. त्यामुळे टिव्हीवर स्कोअर दोन रन्सनी कमी झाला होता. आणि नेमक्या याच दोन रन्स आपल्याला भोवल्या :( या सामन्याचे आणि १९८७ च्या रिलायन्स कपमधील ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या सामन्याशी हे साम्य नक्कीच आहे. त्या सामन्यात डिन जोन्सने मारलेला फटका चौकार आहे की षटकार याविषयी संभ्रम होता. तसाच संभ्रम यावेळी सचिनने मारलेल्या फटक्याविषयी होता. डिन जोन्सचा तो सुरवातीला चौकार समजून ऑस्ट्रेलियाला चार रन्स दिल्या गेल्या होत्या पण नंतर तो षटकारात बदलला गेला तर सचिनचा तो फटका सुरवातीला षटकार समजून सहा रन्स दिल्या गेल्या होत्या त्या नंतर चारमध्ये बदलल्या गेल्या. दोन्ही सामन्यात आपला एका रनने पराभव झाला होता. आणि दोन्ही सामन्यात या दोन-दोन रन्स आपल्याला भोवल्या होत्या :(

रवी शास्त्री ज्या पध्दतीने खेळला हे बघून खरोखरच त्याच्यावर संताप आला होता. मुंबईत काही ठिकाणी त्याचे पोस्टर जाळायचा वगैरेही प्रकार झाला होता. त्याकाळी क्रिकेट हा अगदी कडव्या धर्माप्रमाणे मी समजत असे त्यामुळे आम्हा मित्रमंडळींमध्येही रवी शास्त्रीविरूध्द प्रचंड संताप आला होता. नशीबाने त्याला इतर सामन्यांमध्ये घेतले गेले नाही. त्यानंतर सप्टेंबर १९९४ मध्ये त्याने निवृत्ती जाहिर केली तेव्हा तो कोणाच्या खिजगणतीतही नव्हता.

एकूणच १९९१-९२ मध्ये रवी शास्त्रीची कूर्मगती आपल्या काही पराभवांसाठी कारणीभूत ठरली होती. दक्षिण आफ्रिकेच्या नोव्हेंबर १९९१ मधील पहिल्या भारत दौर्‍यात तिसरा सामना होता दिल्लीला जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये. ही विकेट उस़ळती होती आणि त्यावर भरपूर रन्स निघणार्‍यातल्या होत्या. या सामन्यात भारताने ५० ओव्हरमध्ये २ बाद २८७ रन्स केल्या-- रवी शास्त्री आणि संजय मांजरेकर या दोघांनीही शतके ठोकली. पण रवी शास्त्रीने १४९ बॉल्समध्ये १०९ रन्स केल्या होत्या. म्हणजे जवळपास ५०% बॉल्स खेळून ४०% पेक्षा कमी रन्स त्याने केल्या होत्या. या सामन्यात केप्लर वेसल्स आणि पीटर कर्स्टन यांनी भारतीय बॉलर्सचा भरपूर समाचार घेऊन दक्षिण आफ्रिकेला पहिला विजय मिळवून दिला होता. वर्ल्डकपच्या आधी भारत, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिरंगी लढत झाली होती त्यातही काही सामन्यांमध्ये रवी शास्त्रीची कूर्मगती आपल्याला भोवली होती.

त्यानंतर कॉमेन्टरी करताना रवी शास्त्री (आणि संजय मांजरेकरनेही) "required run rate is going out of control. India needs to score runs at a faster pace" असे काहीसे म्हटले की लेकांनो तुम्ही स्वतः असे किती वेळा केले होतेत हा प्रश्न विचारायचा वाटायचा :(

अभिजीत अवलिया's picture

14 Feb 2017 - 12:34 pm | अभिजीत अवलिया

रवी शास्त्रीने अक्षरश: रडू आणले होते ह्या मॅचमध्ये. माझे वडील भारत एका रनने हरला ह्या धक्क्याने २ दिवस आजारी देखील पडले.
बाकी १९९२ च्या वर्ल्ड कपने मला क्रिकेटची ओळख झाली. त्यावेळेपर्यंत आमच्याकडे टी. व्ही. देखील न्हवता. वर्ल्ड कप आहे म्हणून टी. व्ही. घेतला. पहाटे लवकर उठून मॅच बघायला खूप मजा यायची.

श्रीगुरुजी's picture

14 Feb 2017 - 3:34 pm | श्रीगुरुजी

रवी शास्त्री ज्या पध्दतीने खेळला हे बघून खरोखरच त्याच्यावर संताप आला होता. मुंबईत काही ठिकाणी त्याचे पोस्टर जाळायचा वगैरेही प्रकार झाला होता. त्याकाळी क्रिकेट हा अगदी कडव्या धर्माप्रमाणे मी समजत असे त्यामुळे आम्हा मित्रमंडळींमध्येही रवी शास्त्रीविरूध्द प्रचंड संताप आला होता. नशीबाने त्याला इतर सामन्यांमध्ये घेतले गेले नाही. त्यानंतर सप्टेंबर १९९४ मध्ये त्याने निवृत्ती जाहिर केली तेव्हा तो कोणाच्या खिजगणतीतही नव्हता.

रवी शास्त्रीचे नाव काढले किंवा त्याला बघितले तरी अत्यंत संताप येतो. या माणसाने आपल्या संथ खेळीने अनेक सामने घालविले आहेत. त्याचा निवृत्तीपूर्व शेवटचा सामना देखील भयंकर होता. १९९३-९४ मध्ये भारत द. आफ्रिकेच्या दौर्‍यावर गेला होता. पहिल्या तीन कसोटीतील ३ सामन्यांपैकी १ आफ्रिकेने जिंकला होता व २ अनिर्णित राहिले होते. मालिका वाचविण्यासाठी भारताने चौथा सामना जिंकणे आवश्यक होते. चौथ्या सामन्याने आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली. मला नक्की धावफल आठवत नाही, परंतु आफ्रिकेचा दुसरा डाव चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रात संपल्यानंतर उर्वरीत अर्धा तास व संपूर्ण पाचवा दिवस या वेळात विजयासाठी भारताला ३१८ धावांचे लक्ष्य दिले होते. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या होती नाबाद १५. सिधू व शास्त्री नाबाद होते. ५ व्या दिवशी भारताला ९० षटकांत ३०३ धावा करायच्या होत्या. परंतु भारताने ५ व्या दिवशी विजयास अजिबात प्रयत्न न करता संपूर्ण दिवस खेळून सामना अनिर्णित ठेवण्यात धन्य मानली. भारताने संपूर्ण ५ व्या दिवसांत ९० षटके खेळून फक्त २ गडी गमावून सामना हरू दिला नाही, परतु धावा फक्त १२५ केल्या. सामना संपला तेव्हा भारताची धावसंख्या नाबाद १५ वरून २ बाद १४० इतकीच झाली होती. त्या डावात सिधु, शास्त्री, मांजरेकर व अझरूद्दीन या चौघांनी अत्यंत संथ फलंदाजी करून भारतीयांना पूर्ण निराश केले. सामना जिंकायचा निदान थोडा प्रयत्न तरी करायचा होता. शास्त्रीने त्या डावात तब्बल २०० मिनिटे फलंदाजी करून जेमतेम २३ धावा केल्या होत्या. हा सामना शास्त्रीच्या आयुष्यातला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. या सामन्यानंतर तो संघातून कायमचा वगळला गेला व परत कधीच संघात येऊ शकला नाही हे आपले सुदैव.

गॅरी ट्रुमन's picture

14 Feb 2017 - 4:21 pm | गॅरी ट्रुमन

१९९२ च्या वर्ल्डकपच्या आधी भारत, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिरंगी मालिका झाली होती. तसेच भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामने झाले होते. त्या पाच पैकी ३ कसोटी सामने झाल्यावर तिरंगी मालिका पूर्ण केली गेली आणि उरलेले दोन कसोटी सामने नंतर झाले. मला वाटते या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात रवी शास्त्रीला दुखापत झाली आणि त्यामुळे तो उपचारांसाठी भारतात परतला. परिणामी त्याला दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळता आले नव्हते. पाचवा कसोटी सामना संपल्यावर साधारण १०-१२ दिवसांनी वर्ल्डकप सुरू होणार होता. रवी शास्त्रीची दुखापत वेळेत बरी होऊ नको दे आणि त्याला वर्ल्डकपमध्ये खेळायला मिळू नको दे असे फार फार वाटत होते.

एक दिवस मराठी बातम्यांमध्ये सांगितले गेले: "मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी-- रवी शास्त्री विश्वचषकात खेळू शकणार"!! त्यावेळी आनंदाची बातमी ऐवजी प्रचंड दु:खाची बातमी असे म्हणायला पाहिजे होते असे फार वाटले होते. ही बातमी ऐकून मला तरी त्यावेळी फार वाईट वाटले होते :(

वरुण मोहिते's picture

14 Feb 2017 - 4:31 pm | वरुण मोहिते

मालिका . अगदी थरारक वर्णन .