वर्ल्डकप क्लासिक्स - १९९६ - क्वार्टरफायनल - भारत विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
17 Feb 2017 - 9:21 am

१९९६ चा वर्ल्डकप हा १९८७ च्या वर्ल्डकपनंतर भारतीय उपखंडात झालेला दुसरा वर्ल्डकप होता. भारत आणि पाकिस्तान यांच्या जोडीला श्रीलंकेलाही स्पर्धेचं संयुक्तं यजमानपद बहाल करण्यात आलं होतं. श्रीलंकेतील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजने श्रीलंकेत मॅचेस खेळण्यास नकार दिल्यावर या दोन्ही संघांची खात्री पटावी म्हणून श्रीलंका विरुद्ध भारत-पाकिस्तान अशी मॅच खेळवण्यात आली होती. या मॅचमध्ये वासिम अक्रमच्या बॉलवर सचिन तेंडुलकरने रोमेश कालुवितरणाचा कॅच घेतल्याची नोंद झाली! अर्थात या मॅचनंतरही ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजचा नकार कायम राहील्याने दोन्ही मॅचेसमध्ये श्रीलंकेला वॉकओव्हर मिळाला.

या वर्ल्डकपचं वैशिष्ट्यं म्हणजे या वर्ल्डकमध्ये प्रथमच ग्रूप मधल्या मॅचेसनंतर क्वार्टरफायनल - सेमीफायनल - फायनल अशा पद्धतीने नॉकआऊट मॅचेसची योजना करण्यात आली होती. टीव्ही रिप्ले पाहून निर्णय देणार्‍या थर्ड अंपायरचा समावेश असलेला हा पहिलाच वर्ल्डकप होता!

***********************************************************************************************

९ मार्च १९९६
चिन्नास्वामी, बँगलोर

गार्डन सिटी ऑफ इंडीया असलेल्या बँगलोरच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये वर्ल्डकपची दुसरी क्वार्टरफायनल रंगणार होती. वर्ल्डकपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यातली ही दुसरीच मॅच होती. १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये सिडनीच्या मैदानात भारताने पाकिस्तानचा ४३ रन्सनी पराभव केला होता. याच मॅचमध्ये जावेद मियांदाद - किरण मोरे यांच्यात जुंपली होती आणि जावेदने किरण मोरेची नक्कल करत बेडूकउड्या मारल्या होत्या! त्यानंतर आता पुन्हा हे दोन्ही संघ आमनेसामने आलेले होते. परंतु मॅच सुरु होण्यापूर्वीच पाकिस्तानला एक धक्का बसला होता तो म्हणजे कॅप्टन वासिम अक्रम बरगडीचा स्नायू दुखावल्यामुळे या मॅचमध्ये खेळण्यास असमर्थ ठरला होता!

अझरुद्दीनच्या भारतीय संघात सचिन तेंडुलकर, नवज्योतसिंग सिद्धू, संजय मांजरेकर, स्वतः अझरुद्दीन, विनोद कांबळी, अजय जाडेजा असे बॅट्समन होते. भारताच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने होता तो श्रीनाथ आणि अनिल कुंबळे यांच्यावर. या दोघांच्या जोडीला वेंकटेश प्रसाद, वेंकटपती राजू असे बॉलर्स आणि विकेटकीपर नयन मोंगिया यांचाही भारतीय संघात समावेश होता. श्रीलंकेविरुद्ध ग्रूपमधल्या मॅचमध्ये सनथ जयसूर्याने धुलाई केलेल्या मनोज प्रभाकरची मात्रं भारतीय संघात निवड करण्यात आली नव्हती. पाचव्या बॉलरच्या १० ओव्हर्स टाकण्याची जबाबदारी सचिन आणि जाडेजा यांच्यावर होती.

वासिम अक्रमच्या अनुपस्थितीत पाकिस्तानच्या कॅप्टनपदाची जबाबदारी आमिर सोहेलवर आली होती. सोहेलच्या पाकिस्तानी संघात स्वतः सोहेल, सईद अन्वर, एजाज अहमद, इंझमाम-उल-हक, अनुभवी सलिम मलिक आणि जावेद मियांदाद यांचा समावेश होता. अक्रमच्या अनुपस्थितीत पाकिस्तानच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने वकार युनुस आणि आकिब जावेद यांच्यावर होता. त्यांच्या जोडीला लेगस्पिनर मुश्ताक अहमद, अक्रमच्या ऐवजी संघात आलेला अता-उर-रहमान आणि विकेटकीपर रशिद लतिफचा पाकिस्तानच्या संघात समावेश होता. १९७५ च्या पहिल्या वर्ल्डकपपासून प्रत्येक वर्ल्डकपमध्ये खेळणार्‍या जावेद मियांदादचा हा सहावा वर्ल्डकप होता. वास्तविक मियांदाद तीन वर्षांपूर्वीच रिटायर झालेला होता, पण पंतप्रधान बेनझीर भुत्तोंच्या सूचनेनंतर त्याने वर्ल्डकपमध्ये पुनरागमन केलं होतं!

अझरुद्दीनने टॉस जिंकल्यावर अपेक्षेप्रमाणेच बॅटींगचा निर्णय घेतला. वकार आणि आकिब जावेदचे बॉल चांगलेच स्विंग होत असल्याने सचिन आणि सिद्धू यांनी सावध पवित्रा घेत पाकिस्तानी बॉलर्सना खेळून काढण्याचा पवित्रा घेतला. वकारच्या तिसर्‍या ओव्हरमध्ये कट् मारण्याच्या नादात लागोपाठ दोन वेळेस सिद्धूची एज लागली पण तिसर्‍या स्लिपमध्ये फिल्डर नसल्याने दोन्ही वेळेस सिद्धू सहीसलामत बचावला. वकारच्या जागी बॉलिंगला आलेल्या अता-उर-रहमानला सचिनने स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. मुश्ताक अहमद बॉलिंगला आल्यावर सिद्धूने आक्रमक पवित्रा घेत त्याला लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. सिद्धू - सचिन यांनी ९० रन्सची पार्टनरशीप केल्यावर अता-उर-रहमानला थर्डमॅनला खेळण्याच्या प्रयत्नात सचिनच्या बॅट इनसाईड एज लागून बॉल ऑफस्टंपवर गेला. ५९ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह सचिनने ३१ रन्स काढल्या. २१ ओव्हर्समध्ये भारताचा स्कोर होता ९० / १!

सचिन आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या संजय मांजरेकरने सावधपणे खेळत सुरवातीला १-२ रन्स काढण्यावरच भर दिला पण मुश्ताक आणि अता-उर-रहमानच्या अचूक बॉलिंगमुळे त्याला सहजपणे रन्स काढणं जमत नव्हतं. अता-उर-रहमानच्या जागी बॉलिंगला आलेल्या आमिर सोहेलला सिद्धूने दोन बाऊंड्री तडकावल्या पण मांजरेकरला मात्रं सोहेलचा कामचलाऊ स्पिन खेळतानाही बरेच प्रयास पडत होते. अखेर सोहेललाच फटकावण्याच्या नादात लाँगऑनवर जावेद मियांदादने मांजरेकरचा कॅच घेतला. २० रन्स काढण्यासाठी मांजरेकरने ४३ बॉल्स खर्ची घातले होते. मांजरेकर आऊट झाला तेव्हा ३३ व्या ओव्हरमध्ये भारताचा स्कोर होता १३८ / २!

मांजरेकर परतल्यावरही सिद्धूची फटकेबाजी सुरुच होती. आमिर सोहेलच्या पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने मिडविकेटवर पूलची बाऊंड्री तडकावली. अझरने थंड डोक्याने स्ट्राईक रोटेट करण्याचा मार्ग पत्करला होता. मुश्ताकच्या पुढच्या ओव्हरमध्ये सिद्धूने लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. तो सेंच्युरी ठोकणार असं वाटत असतानाच मुश्ताकचा फ्लिपर पूल करण्याचा त्याचा प्रयत्नं पार फसला आणि त्याची दांडी उडाली. ११५ बॉल्समध्ये ११ बाऊंड्रीसह सिद्धूने ९३ रन्स फटकावल्या. ३७ ओव्हर्समध्ये भारत १६८ / ३!

सिद्धू आऊट झाल्यावर अझरने आक्रमक पवित्रा घेत मुश्ताकला फटकावण्याचा मार्ग पत्करला. मुश्ताकच्या गुगलीवर मिडविकेटला पूलची बाऊंड्री तडकावल्यावर त्याच्या पुढच्याच ओव्हरमध्ये अझरने क्रीजमधून पुढे सरसावत स्ट्रेट सिक्स ठोकली! अझर आणि कांबळी यांनी ५ ओव्हर्समध्ये ३२ फटकावल्यावर वकार युनुसला थर्डमॅनला खेळण्याच्या नादात अझरची एज लागली आणि विकेटकीपर रशिद लतिफने डाईव्ह मारत त्याचा अप्रतिम कॅच घेतला. २२ बॉल्समध्ये मुश्ताकला तडकावलेल्या बाऊंड्री आणि सिक्ससह अझरने २७ रन्स फटकावल्या. भारत २०० / ४!

अझर परतल्यावर विनोद कांबळी आणि अजय जाडेजा यांनी ४ ओव्हर्समध्ये २६ रन्स जोडल्यावर मुश्ताकला फटकावण्याच्या नादात कांबळी बोल्ड झाला. आणखीन जेमतेम १० रन्सची भर पडते तोच जाडेजा आणि विकेटकीपर नयन मोंगिया यांच्यात दुसरी रन काढताना गोंधळ उडाला आणि याची परिणीती मोंगिया रनआऊट होण्यात झाली. ४७ ओव्हर्समध्ये भारत २३६ / ६!

४८ वी ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंगला आला वकार युनुस!

वकारचा पहिला बॉल वाईड होता...
दुसरा बॉल जाडेजाने मिडविकेटला फ्लिक करुन एक रन काढली...
तिसरा बॉल कुंबळेने मिडऑनला असलेल्या सोहेलच्या डोक्यावरुन तडकावला... बाऊंड्री!
चौथा बॉल पुन्हा एकदा वाईड होता...

पाचवा बॉल टाकण्यासाठी वकार रनअप घेत असताना कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला टोनी ग्रेग म्हणाला,
"Get ready for a blistering yorker!"

वकारचा पाचवा बॉल लेगस्टंपच्या लाईनवर पडला... कुंबळेने तो मिडविकेटला फ्लिक केला...बाऊंड्री!

टोनी ग्रेगने इतर कोणीच काय खुद्दं कुंबळेनेही स्वप्नातही कल्पना न केलेली अजरामर कॉमेंट केली,
"Kumble is playing a blinder!"

सहाव्या बॉलवर कुंबळेने स्क्वेअरलेगला एक रन काढली...
वकारचा सातवा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला... जाडेजाने मिडऑन आणि एक्स्ट्राकव्हरमधल्या गॅपमधून बाऊंड्री तडकावली!

शेवटचा बॉल लेगस्टंपवर पडलेला यॉर्कर होता...
जाडेजाला बहुधा याचीच अपेक्षा होती... तो क्रीजमध्ये फूटभर मागे उभा होता...
.... मिडविकेट बाऊंड्रीपार दिसेनासा झाला... सिक्स!

टोनी ग्रेग म्हणाला,
"This is a great over for India. Twenty two runs have come in an over where they would have settled for six."

४९ व्या ओव्हरच्या तिसर्‍या बॉलला अकिब जावेदला फटकावण्याच्या प्रयत्नात लाँगऑन बाऊंड्रीवर मियांदादने कुंबळेचा कॅच घेतला, पण त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर श्रीनाथने मिडविकेटला बाऊंड्री तडकावल्यावर भारताचा स्कोर झाला २६९ / ७!

शेवटच्या ओव्हरमध्ये वकारच्या समोर पुन्हा जाडेजा स्ट्राईकवर होता...

पहिलाच बॉल जाडेजाने बॅकवर्ड पॉईंटला कट् केला.... बाऊंड्री!
दुसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर शॉर्टपीच पडला...
जाडेजाने तो लाँगऑफ बाऊंड्रीपार उचलला.... सिक्स!

टोनी ग्रेग उद्गारला,
"What an innings this is! Waqar Younus is being slaughtered!!"

टोनीच्या जोडीला कॉमेंट्रीबॉक्समध्ये होता सुनिल गावस्कर. तो म्हणाला,
"Waqar Younus doesn’t always get hit over the top, that too of the black foot into the crowd for a six. This is something which you rarely see."

वकारच्या तिसरा बॉल फटकवण्याचा जाडेजाचा प्रयत्नं फसला आणि लाँगऑफ बाऊंड्रीवर आमिर सोहेलने त्याचा कॅच घेतला.
२५ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि २ सिक्स तडकावत जाडेजाने ४५ रन्स झोडपल्या!

जाडेजा परतल्यावरही शेवटच्या ३ बॉल्समध्ये श्रीनाथने ८ रन्स फटकावत वकारच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम व्यवस्थित पार पाडलं!
पहिल्या ८ ओव्हर्समध्ये २७ रन्स देणार्‍या वकारची शेवटच्या २ ओव्हर्समध्ये अभूतपूर्व धुलाई झाली होती.
जाडेजा - कुंबळे - श्रीनाथ यांनी या २ ओव्हर्समध्ये तब्बल ४० रन्स कुटल्या!

५० ओव्हर्सनंतर भारताचा स्कोर होता २८७ / ८!

जाडेजा म्हणतो,
"I received a half-volley first ball, which I dispatched through the covers. From there on, everything I hit was perfect. I knew Waqar would not try to do too much and would rely mostly on his stock ball, the inswinging yorker. The first of the two sixes I hit came against that ball. I picked it up early and flicked it over midwicket. I just was in the zone during that knock. Everything went according to a perfectly executed script!"

रशिद लतिफ म्हणतो,
“Jadeja’s innings probably ranks as one of the best I have seen in ODI … I really thought we could keep them to 240-250, especially with Waqar and Aaqib Javed to bowl the last overs. But Jadeja just went berserk. Waqar seemed under pressure, probably the first time I have seen him like that during the death overs, and the score just went out of our hands. Jadeja usually liked to chat a bit, and we got on well anyway, but that day he didn’t say anything — he just did it.”

पाकिस्तानी बॉलर्सच्या स्लो ओव्हर रेट मुळे पाकिस्तानच्या इनिंग्जमधली एक ओव्हर कमी करण्यात आली.
सेमीफायनल गाठण्यासाठी पाकिस्तानला ४९ ओव्हर्समध्ये २८८ रन्सची आवश्यकता होती!

कॅप्टन आमिर सोहेल आणि सईद अन्वर यांनी सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत भारतीय बॉलर्सची धुलाई करण्यास सुरवात केली. सईद अन्वरने अप्रतिम रिस्टवर्कचा वापर करत वेंकटेश प्रसादला ड्राईव्ह आणि फ्लिकच्या बाऊंड्री फटकावल्यावर सोहेलने श्रीनाथला पूल आणि कट्च्या बाऊंड्री तडकावल्या. अझरुद्दीनने प्रसादच्या जागी अनिल कुंबळेला बॉलिंगला आणलं, पण कुंबळेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये अन्वरने मिडविकेटला दणदणीत सिक्स ठोकली! त्याच ओव्हरमध्ये सोहेलने लेगस्टंपच्या बाहेर जात कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. पुढच्याच ओव्हरमध्ये श्रीनाथचा लेगस्टंपवरचा बॉल अन्वरने स्क्वेअरलेगला बाऊंड्रीपार फ्लिक केला! दहाव्या ओव्हरमध्ये सोहेलने कुंबळेला पुन्हा दोन बाऊंड्री फटकावल्यावर भारतीय खेळाडू चिंताग्रस्तं झाले होते. अखेर श्रीनाथला मिडविकेटवरुन फटकावण्याचा अन्वरचा प्रयत्नं फसला आणि मिडऑनला कुंबळेने त्याचा कॅच घेतला. ३२ बॉल्समध्ये ५ बाऊंड्री आणि २ सिक्स तड्कावत अन्वरने ४८ रन्स झोडपल्या. पाकिस्तान ८४ / १!

अन्वर आऊट झाल्यानंतरही सोहेलची फटकेबाजी सुरुच होती. कुंबळेच्या जागी बॉलिंगला आलेल्या वेंकटपती राजूला त्याने स्क्वेअरलेगवर सिक्स ठोकली. अन्वरच्या जागी बॅटींगला आलेया एजाज अहमदनेही प्रसादला स्क्वेअरलेगला बाऊंड्री तडकावली...

आणखीन दोन बॉलनंतर....

ऑफस्टंपबाहेर पडलेल्या प्रसादच्या बॉलवर क्रीजमधून पुढे सरसावत सोहेलने कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली...
पण एवढ्यावरच समाधान मानेल तर तो सोहेल कसला?
बाऊंड्रीच्या दिशेने बॅट करुन त्याने बॉल मारल्याची नेमकी दिशा प्रसादला दाखवून दिली...
इतकंच नव्हे तर त्या दिशेला बोट करुन प्रसादला जणू बजावलं...

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला इमरान खान म्हणाला,
"He is a great competitor Aamir Sohail. Here you see him arguing with the bowler or telling him what he is doing!"

प्रसादचा पुढचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
सोहेलचा बॅकफूटवर पूल करण्याचा प्रयत्नं साफ फसला...
.... आणि त्याचा ऑफस्टंप उडाला!

“Fuck off! Go home! You fucking bastard!” प्रसादने सुनावलं.

कॉमेंट्रीबॉक्समध्ये इमरान खानबरोबर असलेला रवी शास्त्री अचूक टायमिंग साधत उद्गारला,
"Well! That’s the answer! That’s the best way you can answer a batsman. Venkatesh Prasad has clean bowled Aamir Sohail!"

बँगलोरच्या प्रेक्षकांनी स्टेडीयम डोक्यावर घेतलं!
४६ बॉल्समध्ये ९ बाऊंड्री आणि राजूला ठोकलेल्या सिक्ससह सोहेलने ५५ रन्स फटकावल्या.
पाकिस्तान ११३ / २!

श्रीनाथ म्हणतो,
"Aamir Sohail, for what he did the previous ball and what happened the next ball, we all thought that justice has been done!"

राहुल द्रविड म्हणतो,
"People really enjoyed the fact that Venkatesh Prasad was able to give it back to Aamir Sohail and show him the pavilion!"

प्रसादच्या पुढच्या ओव्हरमध्ये सोहेल परतल्यावर बॅटींगला आलेला इंझमाम-उल-हक नयन मोंगियाला कॅच न घेता आल्याने थोडक्यात वाचला. परंतु १९ व्या ओव्हरमध्ये प्रसादलाच फटकावण्याच्या नादात मिडऑफला श्रीनाथने एजाज अहमदचा कॅच घेतला. आणखीन जेमतेम १० रन्सची भर पडते तोच प्रसादच्याच बॉलवर इंझमामची एज लागली आणि मोंगियाने यावेळी कॅच घेण्यात कोणतीही कसूर केली नाही. २१ ओव्हर्समध्ये पाकिस्तानचा स्कोर होता १३२ / ४!

सलिम मलिक आणि जावेद मियांदाद या अनुभवी खेळाडूंनी कोणतीही रिस्क न घेता भारतीय बॉलर्सना खेळून काढत १-२ रन्स काढण्याचा मार्ग पत्करला. अझरने नेमक्या याच वेळेस बॉलिंगला आणलेल्या सचिन आणि जाडेजा यांनी अचूक बॉलिंग करत मियांदादला जखडून ठेवलं होतं, पण मलिकने मात्रं आक्रमक पवित्रा घेत दोघांनाही बाऊंड्री तडकावल्या. मलिक - मियांदाद यांनी १५ ओव्हर्समध्ये ५२ रन्सची पार्टनरशीप केल्यावर कुंबळेच्या फ्लिपरवर मलिक एलबीडब्ल्यू झाला. ५० बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह मलिकने ३८ रन्स फटकावल्या. पाकिस्तान १८४ / ५!

शेवटच्या १३ ओव्हर्समध्ये पाकिस्तानला १०४ रन्सची आवश्यकता होती!

मलिक आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या विकेटकीपर रशिद लतिफने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. ३९ व्या ओव्हरमध्ये त्याने श्रीनाथला लाँगऑनवर दणदणीत सिक्स ठोकली. पुढच्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत सावधपणे खेळणार्‍या मियांदादने राजूला बाऊंड्री तडकावली. अझरने श्रीनाथच्या ऐवजी कुंबळेला बॉलिंगला आणलं, पण लतिफने त्यालाही मिडविकेटवरुन सिक्स फटकावली! पुढच्याच ओव्हरमध्ये...

लतिफने राजूचा बॉल मिडविकेटला फ्लिक केला...
मियांदाद एक रन घेण्यासाठी धावत सुटला...
मिडविकेटला कुंबळेने बॉल पिकअप केला...
मियांदाद मागे फिरला आणि त्याने क्रीज गाठण्यासाठी डाईव्ह मारली...
पाकिस्तानच्या सुदैवाने कुंबळेचा थ्रो स्टंप्सपासून बराच लांबून गेल्याने मियांदाद वाचला!

पुढच्याच बॉलवर...
राजूला फटकावण्याच्या इराद्याने लतिफ क्रीज सोडून पुढे सरसावला पण...
राजूचा बॉल लतिफच्या बॅटच्या पट्ट्यात आलाच नाही...
मोंगियाने बेल्स उडवण्यात कोणतीही हयगय केली नाही!
लतिफ स्टंप झाला!

२५ बॉल्समध्ये १ बाऊंड्री आणि २ सिक्स तडकावत रशिद लतिफने २६ रन्स फटकावल्या. आणखीन जेमतेम १ रनची भर पडते तोच कुंबळेच्या पुढच्याच ओव्हरमध्ये मिडविकेटला फ्लिक करण्याच्या नादात मुश्ताक अहमदची लिडींग एज लागली आणि कुंबळेनेच डाईव्ह मारत त्याचा कॅच घेतला.

पाकिस्तान २३२ / ७!

शेवटच्या ६ ओव्हर्समध्ये पाकिस्तानला ५६ रन्सची आवश्यकता होती!
उरलेले बॅट्समन होते वकार युनुस, आकिब जावेद आणि अता-उर-रहमान.
पाकिस्तानच्या दृष्टीने मॅच जिंकणं अशक्यप्राय होत चालं होतं...
पण...
जावेद मियांदाद अद्याप विकेटवर उभा होता...
....आणि मियांदाद खेळत असेपर्यंत मॅच जिंकली असं मानण्यास प्रेक्षकच काय, भारतीय खेळाडूही तयार नव्हते!
दहा वर्षांनंतरही चेतन शर्माला शेवटच्या बॉलवर मारलेली सिक्स कोणीही विसरलेलं नव्हतं...

अद्याप शेवटच्या ४ ओव्हर्समध्ये ४९ रन्स बाकी होत्या..
पाकिस्तानच्या उरल्यासुरल्या सर्व आशा मियांदादवर होत्या!

४६ व्या ओव्हरमध्ये...
कुंबळेचा पहिलाच बॉल वकारने ऑफला खेळला आणि एक रनसाठी कॉल दिला...
वकारच्या कॉलला मियांदादने प्रतिसाद दिला खरा, पण...
बॅकवर्ड पॉईंटला अजय जाडेजाने बॉल पिकअप केला...
जाडेजाचा थ्रो कलेक्ट करुन मोंगियाने बेल्स उडवल्या...

स्क्वेअरलेग अंपायर डेव्हीड शेपर्डने थर्ड अंपायर स्टीव्ह डनला विचारणा केली...
काही क्षणांतच स्टीव्ह डनचा निर्णय स्कोरबोर्डवर झळकला...
आऊट!
मियांदाद रनआऊट झाला!

पाकिस्तानची उरलीसुरली आशा संपुष्टात आली!
आणि
जावेद मियांदाद नामक युगाचा अंत झाला!

आपल्या अखेरच्या इनिंग्जमध्ये ६४ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह मियांदादने ३८ रन्स काढल्या.
पाकिस्तान २३९ / ८!

सुप्रसिद्ध लेखक आणि क्रिकेट इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणतो,

“When Miandad walked off the ground I stood up to applaud him."
‘Why are you clapping?’ गुहाच्या मागे बसलेल्या रो मधल्या प्रेक्षकाने संतप्तं सुरात प्रश्नं केला.
"You should clap him too!" गुहा उत्तरला, "He is a great player, and this is the last time we will see him bat.’
"Thank God I shall never see the bastard again!" रागाने धुमसत त्या प्रेक्षकाने सुनावलं!

मियांदाद परतल्यावर पाकिस्तानचं आव्हान संपल्यातच जमा होतं. कुंबळेने पुढच्याच बॉलवर अता-उर-रहमानला एलबीडब्ल्यू केलं. वकार युनुस - आकिब जावेद यांनी उरलेल्या ओव्हर्स खेळून काढल्या, पण २४८ रन्सपर्यंतच मजल मारणं त्यांना शक्यं झालं.

३९ रन्सनी भारताने मॅच जिंकली!

चिन्नास्वामी स्टेडीयममध्येच काय, संपूर्ण भारतभर एकच जल्लोष झाला!

श्रीनाथ म्हणतो,
"It was like final before the final!"

पाकिस्तानमध्ये सुतकी छाया पसरली होती!
कित्येक लोकांनी आपले टीव्ही फोडले!
जाफर खान नामक माणसाने तर गोळ्या घालून टीव्ही फोडला आणि मग स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली!
आणखीन एका व्यक्तिला पाकिस्तानचा पराभव सहन न झाल्याने हार्टअ‍ॅटॅक आला!

सर्वात कहर म्हणजे काही जणांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी एक स्त्री - बेनझीर भुत्तो - असल्याने पाकिस्तानचा पराभव झाला असेही तारे तोडले!

पराभूत पाकिस्तानी संघ जेव्हा लाहोरच्या एअरपोर्टवर उतरला तेव्हा त्यांना लोकांच्या शिव्याशापांचा आणि सडक्या अंड्यांचा सामना करावा लागला!
आयत्यावेळी मॅचमधून माघार घेणार्‍या वासिम अक्रमला जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या!
एका प्रेक्षकाने तर पाकिस्तानी खेळाडूंच्या कामगिरीची चौकशी करण्यात यावी अशी कोर्टात याचिका दाखल केली!
अक्रमवर मॅचफिक्सींगचेही आरोप झाले.

वेंकटेश प्रसादशी बोलाचाली झाल्यावर पुढच्याच बॉलला बोल्ड झालेल्या आमिर सोहेलवर टीकेची झोड उठली.
अनेकांच्या मते सोहेलची विकेट हा मॅचचा टर्निंग पॉईंट होत.

रमिझ राजा म्हणतो,
"We all knew Aamir Sohail was short tempered and in the heat of the moment he completely lost his temper which cost us the match!"

१९९६ च्या क्रिकेट अ‍ॅन्युअल मध्ये आर मोहनने लिहीलं,
"Pakistan stand-in captain Aamir Sohail won his battle against the interfering ways of former captain Javed Miandad, who he banished to the outfield, but he did not win the battle against his own temper, which he lost when he was right on top of the bowling and was hitting the seamers where he wished. It was a moment of the match when Prasad bowled him. Or was Sohail bowled by his own hot temper?"

क्रीडालेख

प्रतिक्रिया

अभिजीत अवलिया's picture

17 Feb 2017 - 9:33 am | अभिजीत अवलिया

ही मॅच कधीही विसरू शकणार नाही. जडेजाने केलेली वकारची धुलाई आणि नंतर प्रसादने सोहेलचा घेतलेला बदला. हा प्रसंग मनात कायमस्वरूपी कोरला गेलेला आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Feb 2017 - 12:06 pm | अत्रुप्त आत्मा

+++++++++++++++ ११११११११११११११११

चिनार's picture

17 Feb 2017 - 9:55 am | चिनार

जबरदस्त !!
या मॅच विषयी कधी लिहिता याची वाट बघत होतो. अप्रतिम लिहिलं आहे!
२०१५ च्या वर्ल्डकप मधल्या भारत -पाकिस्तान मॅचच्या आदल्या दिवशी मी सुद्धा या आणि २००३ वाल्या मॅचवर लिहिले होते.
http://www.misalpav.com/node/30362

फारएन्ड's picture

17 Feb 2017 - 10:05 am | फारएन्ड

मस्त लिहीत आहेस रे. आवडले.

गॅरी ट्रुमन's picture

17 Feb 2017 - 10:09 am | गॅरी ट्रुमन

ही एक अगदीच अविस्मरणीय मॅच होती. या मॅचमधील पहिल्यापासून शेवटपर्यंत अगदी प्रत्येक बॉल बघितला होता. जाडेजाने वकारची धुलाई करेपर्यंत आपण २५०-२५५ चे आव्हान पाकिस्तानपुढे उभे करू असेच वाटले होते पण जाडेजामुळे २८७ पर्यंत पोहोचलो.

आमीर सोहेल आणि सईद अन्वरने आपल्या गोलंदाजांना झोडपायला सुरवात केली आणि १० ओव्हरमध्ये ८४ पर्यंत मजल मारली तेव्हा असे वाटायला लागले की मॅच गेलीच हातातून!! आमीर सोहेल प्रसादबरोबरच्या भांडणानंतर गेला आणि इंझमाम तसा चाचपडतच खेळत होता. माझी आठवण बरोबर असेल तर आमीर सोहेल-वेंकटेश प्रसाद यांच्यात बाचाबाची चालू होती त्यावेळी नवज्योतसिंग सिध्दूही प्रसादच्या बाजूने आला होता तसेच सिध्दू आणि आमीर सोहेल यांनी आपल्या मातृभाषेतून--पंजाबीतून एकमेकांवर दुगाण्या झाडल्या होत्या.

नंतर रशीद लतीफने फटकेबाजी केली त्यावेळीही मॅच नियंत्रणातून चालली असे वाटू लागले. पण वेंकटपथी राजूने मोंगियाकरवी त्याला मस्त स्टंप-आऊट करवले. वेंकटपथी राजूनेच १९९२ च्या वर्ल्डकपमधील मॅचमध्ये वसिम अक्रमलाही किरण मोरेकडून असेच स्टंप-आऊट करवले होते त्याची आठवण आली.

या मॅचमध्ये विजय मिळाल्यानंतर मार्च महिन्यातच दुसरी दिवाळी साजरी झाली होती. ती शनीवारची रात्र होती आणि मॅच संपल्यावर रात्री दहा-साडेदहानंतर रस्त्यावर तरूणाईला अगदी उधाण आले होते. त्यावेळीही आता १३ मार्चला कलकत्त्यातील सेमीफायनलच्या मॅचमध्ये श्रीलंकेला हरवायचे वगैरे वगैरे स्वप्ने रंगू लागली होती. १० मार्चच्या पेपरमध्येही "उपांत्यपूर्व फेरीत भारताने पाकिस्तानचा पराभव करून मोठ्या दिमाखात उपांत्यफेरीत प्रवेश केला" वगैरे छापून आले होते. पण कुठचे काय....

गॅरी ट्रुमन's picture

17 Feb 2017 - 10:35 am | गॅरी ट्रुमन

एकूणच आपण भारतीय क्रिकेटच्या बाबतीत खूपच 'पझेसिव्ह' असतो. शेवटी तो एक खेळ आहे (आणि कदाचित फिक्सिंगही) हे आपण विसरून क्रिकेटला त्यापेक्षा बरेच जास्त महत्व देत असतो. ९ मार्चला सगळ्या देशाने आपल्या क्रिकेटसंघाला डोक्याला घेतले आणि अवघ्या ४ दिवसातच कलकत्त्यातील श्रीलंकेविरूध्द झालेल्या पराभवानंतर पायदळी तुडविले. अर्थातच पाकिस्तानात जशा गुडघ्यातल्या प्रतिक्रिया आल्या तशा आपल्याकडे आल्या नाहीत. तरीही १३ मार्चच्या एका पराभवानंतर उलट्या टोकाची प्रतिक्रिया देणेही समर्थनीय नव्हते.

१९८९ मध्ये भारतीय संघ पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेला असताना कराचीच्या एकदिवसीय सामन्यात मनोज प्रभाकरने पाकिस्तानच्या ३ विकेट भराभर घेतल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानी प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करून तो सामना बंद पाडला होता. असे काही भारतात कधीच होणार नाही असे वाटत होते १२ मार्च १९९६ पर्यंत. १३ मार्चच्या घटनेने मात्र या समजाला तडा गेला.

"He is a great player, and this is the last time we will see him bat.’

जावेद मियांदाद कसाही असला (दाऊद इब्राहिमचा व्याही असला, मैदानातही भडक डोक्याने बर्‍याच गोष्टी करणारा असला) तरी एक क्रिकेटपटू म्हणून खरोखरच अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा होता हे कोणीच नाकारू शकत नाही. शारजात चेतन शर्माला त्याने शेवटच्या बॉलवर सिक्स मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता ते केवळ अविस्मरणीय होते. असे करायला जबरदस्त जिगर अंगात असायला पाहिजे. त्या शेवटच्या बॉलवरील सिक्सचे व्हिडिओ युट्यूबवर आहेत. शेवटच्या बॉलवर खेळायच्या आधी मैदानात कुठेकुठे भारतीय फिल्डर्स आहेत हे त्याने बघितले आणि चेतन शर्मा रन-अप घ्यायच्या आधी तीनेक सेकंद तो त्याच्या जागेवर क्रिझमध्ये उभा होता तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरील आत्मविश्वास केवळ अप्रतिम होता हे बघायला मिळेलच. असे खेळाडू नेहमीनेहमी होत नसतात त्यामुळे जावेद मियांदादचा तो शेवटचा सामना होता तेव्हा त्याला टाळ्या वाजवून मान देणे यात मला तरी काही चुकीचे वाटत नाही. पण बहुतेकवेळा आपण पाकिस्तानविरूध्दचा सामना मग देशभक्ती, धर्मयुध्द वगैरे गोष्टी करायला लागतो आणि अशा काही गोष्टी नजरेआड करतो.

पाकिस्तानकडून खेळणारे इमरान खान आणि वसिम अक्रम हे खेळाडूही मला त्यांच्या जिगरबाज खेळामुळे आणि आत्मविश्वासामुळे आवडायचे. आज इमरान खान भले तालिबानचा समर्थक असेल पण तो एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होता हे काही त्यामुळे खोटे ठरत नाही. हल्ली क्रिकेटबरोबरची लिंक तुटल्यामुळे सद्यकालीन संदर्भ देता येत नाहीत पण माझ्या आठवणीतील खेळाडू हेच.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Feb 2017 - 12:08 pm | अत्रुप्त आत्मा

संपूर्ण प्रतिसादाला +++++++++++++++ ११११११११११११११११

स्पार्टाकस's picture

17 Feb 2017 - 12:15 pm | स्पार्टाकस

जावेद मियांदाद बॅट्समन म्हणून श्रेष्ठ होताच... किंबहुना हनिफ महंमद, झहीर अब्बास, माजिद खान, इंझमाम उल हक, युनुस खान या सगळ्यांच्या तुलनेतही तो पाकिस्तानने जगाला दिलेला सर्वोकृष्टं बॅट्समन होता, पण त्याचबरोबर तो एक उत्कृष्टं स्ट्रॅटेजिस्ट होता. इमरान कॅप्टन असताना अनेक बॉलिंग चेंजेस आणि फिल्डींग प्लेसमेंट्सचा उगम जावेदच्या सुपिक डोक्यात व्हायचा आणि इमरान ते राबवायचा असं खुद्दं इमराननेच अनेकदा सांगितलं आहे. निव्वळ एक क्रिकेटर म्हणून तो एक अफलातून खेळाडू होता!

चतुरंग's picture

17 Feb 2017 - 7:53 pm | चतुरंग

+१
जावेद मियांदादचं टायमिंग आणि रिस्टवर्क अफलातून होतं. त्यामुळे तो चेंडूचा अंदाज अगदी शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन अगदी शेवटी शेवटी फटका बदलू शकत असे. त्याचा आत्मविश्वासही जबर होता आणि त्याच्यात एक किलर इंस्टिंक्ट होती.

इमरान आणि अक्रम हे दोघेही उच्च दर्जाचे स्विंग बोलर्स होते यात शंका नाही. त्यातही डावखुरा असल्याने अक्रम उजव्या हाताने खेळणार्‍या फलंदाजांना जे डेडली इनस्विंगर्स टाकत असे ते कमाल असत. त्याचे यॉर्कर्स खेळणे हे देखील येरागबाळ्याचे काम नव्हते!

सिरुसेरि's picture

17 Feb 2017 - 11:21 am | सिरुसेरि

छान वर्णन .

वरुण मोहिते's picture

17 Feb 2017 - 12:40 pm | वरुण मोहिते

कदाचित लहान असतानाची पहिली आठवणीत राहिलेली मॅच .मस्त वर्णन. तेव्हापासून प्रसाद हि आवडायला लागला होता :)

स्थितप्रज्ञ's picture

17 Feb 2017 - 2:08 pm | स्थितप्रज्ञ

ही मॅच बरेच वर्ष मला अक्षरशः पाठ होती. आज खूप वर्षांनी उजळणी झाली :P

बबन ताम्बे's picture

17 Feb 2017 - 2:14 pm | बबन ताम्बे

जडेजाने केलेली धुलाई अजूनही आठवतेय. तो जेंव्हा आउट होउन पॅव्हेलीयनकडे जात होता तेंव्हा प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्या वाजवून त्याच्या बॅटींगला दाद दिली होती.

श्रीगुरुजी's picture

17 Feb 2017 - 3:42 pm | श्रीगुरुजी

त्या काळात परदेशात असल्याने १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेतील एकही चेंडू बघायला मिळाला नव्हता. तरी पण या सामन्याचे वर्णन अनेकवेळा वाचले आहे.