वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - वेस्ट इंडीज विरुद्ध श्रीलंका

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
25 Feb 2017 - 10:09 am

२८ फेब्रुवारी २००३
न्यूलँड्स, केपटाऊन

टेबल माऊंटनच्या पार्श्वभूमीवर असलेल्या केपटाऊनच्या निर्सगरम्य न्यूलँड्सच्या मैदानात पूल बी मधली वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांचातली मॅच होती. वर्ल्डकपमधलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी वेस्ट इंडीजच्या दृष्टीने ही मॅच अत्यंत महत्वाची होती. या मॅचमध्ये श्रीलंकेवर मात केल्यास वेस्ट इंडीजच्या सुपर सिक्समधल्या प्रवेशाची शक्यता वाढणार होती, पण या मॅचमध्ये पराभव पत्करावा लागल्यास वेस्ट इंडीजला सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी श्रीलंका - दक्षिण आफ्रीका, केनिया - बांग्लादेश आणि न्यूझीलंड - कॅनडा यांच्यामधल्या मॅचच्या निकालांवर अवलंबून राहवं लागणार होतं.

दक्षिण आफ्रीकेविरुद्धच्या न्यूलँड्सलाच झालेल्या पहिल्या मॅचमधला विजेता संघच वेस्ट इंडीजने या मॅचमध्ये पुन्हा उतरवला होता. कार्ल हूपरच्या वेस्ट इंडीयन संघात स्वतः हूपरसह अनुभवी ब्रायन लारा, शिवनारायण चँडरपॉल, रामनरेश सरवान, क्रिस गेल, वेव्हल हाईंड्स, रिकार्डो पॉवेल असे बॅट्समन होते. त्यांच्या जोडीला रिडली जेकब्ससारखा विकेटकीपर होता. वेस्ट इंडीजच्या बॉलींगचा भार मुख्यतः मर्व्हन डिलन, व्हॅसबर्ट ड्रेक्स आणि पेड्रो कॉलिन्स यांच्यावर होता. त्यांच्याव्यतिरिक्तं स्वतः हूपर आणि गेल यांच्या ऑफस्पिनचा तसंच वेव्हल हाईंड्सच्या सीम बॉलिंगचा वापर करण्याचा हूपरचा इरादा होता.

सनथ जयसूर्याच्या श्रीलंकेच्या संघात स्वतः जयसूर्या, मर्व्हन अट्टापट्टू, अनुभवी अरविंदा डिसील्वा, हशन तिलकरत्ने, महेला जयवर्धने, रसेल आर्नॉल्ड असे बॅट्समन होते. त्यांच्या जोडीला कुमार संगकारासारखा विकेटकीपर - बॅट्समन होता. श्रीलंकेच्या बॉलिंगचा भार मुख्यतः चामिंडा वास आणि ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन यांच्यावर होता. या दोघांच्या जोडीला दिलहरा फर्नांडो आणि पुलस्थी गुणरत्ने (ऐकलंय का नाव कधी?) हे दोघे होते. वर्ल्डकपमध्ये जोरदार फॉर्मात असलेल्या श्रीलंकेच्या आक्रमक संघापुढे वेस्ट इंडीज कितपत टिकाव धरु शकेल हा खरा प्रश्नं होता.

सनथ जयसूर्याने टॉस जिंकल्यावर बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. मर्व्हन डिलनच्या अचूक पहिल्या ओव्हरनंतर दुसर्‍या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला जयसूर्याने कॉलिन्सला कट्ची बाऊंड्री मारली. पण चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर...

कॉलिन्सचा ऑफस्टंपवर पडलेला बॉल जयसूर्याने स्ट्रेट ड्राईव्ह केला...
अट्टापट्टू रन काढण्याच्या इराद्याने क्रीजमधून बाहेर आला होता...
कॉलिन्सने फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला पण...
अट्टापट्टूला क्रीजमध्ये परतण्याची संधी मिळण्यापूर्वीच कॉलिन्सच्या हाताला लागून बॉल स्टंपवर गेला...
श्रीलंका ११ / १!

अट्टापट्टू रनआऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या हशन तिलकरत्नेने सुरवातीला सावध पवित्रा घेत वेस्ट इंडीयन बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. डिलन आणि कॉलिन्स यांच्या अचूक बॉलिंगमुळे तिलकरत्नेच काय पण जयसूर्यालाही फटकेबाजी करण्याची संधी मिळत नव्हती. सातव्या ओव्हरमध्ये जयसूर्याने कॉलिन्सला कव्हर्समधून बाऊंड्री मारली पण कॉलिन्सच्याच पुढच्या ओव्हरमध्ये ड्राईव्ह मारण्याच्या नादात तिलकरत्नेच्या बॅटची एज घेऊन बॉल ऑफस्टंपच्या जवळून फाईनलेग बाऊंड्रीपार गेल्याने तो बोल्ड होताहोता थोडक्यात वाचला! डिलनच्या जागी बॉलिंगला आलेल्या व्हॅसबर्ट ड्रेक्सला जयसूर्याने लेगग्लान्सची बाऊंड्री मारली खरी, पण हा अपवाद वगळता ड्रेक्सच्या अचूक बॉलिंगने जयसूर्या - तिलकरत्ने यांना पार जखडून टाकलं होतं.

कार्ल हूपरच्या दुसर्‍याच ओव्हरमध्ये

हूपरचा तिसरा बॉल मिडल्स्टंपवर पडला...
क्रीजमधून पुढे सरसावत कव्हरड्राईव्ह मारण्याचा तिलकरत्नेचा प्रयत्नं पार फस्ला...
बॉल तिलकरत्नेच्या बॅटच्या इनसाईड एजला लागला आणि...
स्टंपिंगच्या तयारीत असलेल्या रिडली जेकब्सच्या उजव्या बाजूने फाईनलेग बाऊंड्रीपार गेला!
पुन्हा एकदा तिलकरत्ने बालंबाल बचावला!

अखेर वेव्हल हाईंड्सच्या कामचलाऊ बॉलिंगला फटकावण्याच्या नादात तिलकरत्नेचा ऑफस्टंप उडाला!

६८ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह ३६ रन्स करणार्‍या तिलकरत्नेने जयसूर्याबरोबर २० ओव्हर्समध्ये ८५ रन्सची पार्टनरशीप केली.
२४ ओव्हर्समध्ये श्रीलंकेचा स्कोर होता ९६ / २!

तिलकरत्ने परतल्यावर बॅटींगला आलेल्या अरविंदा डिसील्वाने नेहमीप्रमाणेच आक्रमक सुरवात करत ड्रेक्स आणि हाईंड्स यांना बाऊंड्री तडकावल्या. डिसील्वा वेस्ट इंडीयन बॉलर्सची चांगलीच धुलाई करणार असं वाटत असतानाच...

ड्रेक्सचा बॉल डिसील्वाने कव्हर्समधून ड्राईव्ह केला आणि दोन रन्स पूर्ण केल्या...
पॉईंट बाऊंड्रीवरुन धावत आलेल्या रामनरेश सरवानने बॉल पिकअप केला...
दोन रन पूर्ण केलेल्या डिसील्वाने तिसर्‍या रनसाठी कॉल दिला...
जयसूर्याने तिसर्‍या रनच्या कॉलला प्रतिसाद दिला पण...
सरवानचा थ्रो रिडली जेकब्सकडे येत असलेला पाहून त्याने डिसील्वाकडे पाठ फिरवली आणि आपलं क्रीज गाठलं...
जेकब्सने बेल्स उडवल्या तेव्हा डिसील्वा हताशपणे पीचच्या मध्ये उभा होता!
श्रीलंका ११३ / ३!

डिसील्वा आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या महेला जयवर्धनेने हाईंड्सला बाऊंड्री मारत आक्रमक सुरवात केली खरी, पण हाईंड्सच्या ऐवजी बॉलिंगला आलेला क्रिस गेल आणि डिलन यांच्या अचूक बॉलिंगमुळे जयवर्धनेला जखडून ठेवलं होतं. डिलनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या हूपरला फ्लिक करण्याच्या नादात मिडविकेटला रिकार्डो पॉवेलने त्याचा कॅच घेतला, पण श्रीलंकेला खरा धक्का बसला तो आणखीन ८ रन्सची भर पडल्यावर... गेलच्या मिडलस्टंपवर पडलेल्या बॉलवर स्लॉग स्वीप मारण्याच्या प्रयत्नात जयसूर्याच्या बॅटची टॉप एज लागली. मिडविकेट बाऊंड्रीवरुन धावत आलेल्या शिवनारायण चँडरपॉलने त्याचा कॅच घेतला. ९९ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह जयसूर्याने ६६ रन्स काढल्या. ३५ ओव्हर्सनंतर श्रीलंकेचा स्कोर होता १३९ / ५!

रसेल आर्नॉल्ड आणि कुमार संगकारा यांनी कोणतीही रिस्क न घेता वेस्ट इंडीयन बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. गेलच्या बॉलवर स्क्वेअरकट्ची बाऊंड्री मारल्यावर संगकाराने डिलनला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. पण हा अपवाद वगळता संगकारा - आर्नॉल्ड यांनी १-२ रन्स काढण्यावरच लक्षं केंद्रीत केलं होतं. या दोघांनी ८ ओव्हर्समध्ये ३९ रन्सची पार्टनरशीप केल्यावर ड्रेक्सला कट् करण्याचा संगकाराचा प्रयत्नं फसला आणि बॅकवर्ड पॉईंटला ब्रायन लाराने त्याचा कॅच घेतला. ४३ ओव्हर्समध्ये श्रीलंका १७८ / ६!

संगकारा आऊट झाल्यावर आर्नॉल्ड आणि चामिंडा वास यांनी पूर्ण ५० ओव्हर्स खेळून काढण्यावरच भर दिला. वासने कॉलिन्सच्या दोन ओव्हर्समध्ये दोन बाऊंड्री तडकावल्या पण आर्नोल्ड मात्रं कोणतीही रिस्क न घेता स्ट्राईक रोटेट करत होता. कॉलिन्सच्या शेवटच्या ओव्हरमध्ये वासने त्याला मिडविकेटला बाऊंड्री मारल्यावर अखेरच्या बॉलवर आर्नोल्डने त्याला कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली. कॉलिन्सच्या अखेरच्या ओव्हरमध्ये आर्नॉल्ड - वास यांनी १५ रन्स फटकावून काढल्या होत्या.

५० ओव्हर्सनंतर श्रीलंकेचा स्कोर होता २२८ / ६!

चामिंडा वासचे बॉल्स सुरवातीपासूनच चांगले स्विंग होत होते. वासच्या पहिल्याच ओव्हरमध्ये गेलच्या बॅटची एज लागली, पण स्लिपमध्ये असलेल्या अरविंदा डिसील्वाने हाफव्हॉलीवर बॉल उचलला. गेलने पुलस्थी गुणरत्नेला बाऊंड्री मारली, पण तिसर्‍या ओव्हरमध्ये वासच्या बॉलवर मिडविकेटमधून अ‍ॅक्रॉस द लाईन फ्लिक मारण्याचा हाईंड्सचा प्रयत्नं साफ फसला आणि तो एलबीडब्ल्यू झाला. श्रीलंका १० / १!

हाईंड्स आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या ब्रायन लाराला वासच्या अचूक बॉलिंगचा सामना करणं चांगलंच कठीण जात होतं. वासच्या आऊटस्विंगर्सवर विकेटकीपर किंवा स्लिपमध्ये कॅच जाण्यापासून कित्येकदा लारा वाचला, पण अखेर वासलाच ड्राईव्ह करण्याच्या नादात लाराची एज लागली आणि संगकाराने त्याचा कॅच घेतला. केवळ १ रन काढण्यासाठी लाराला २२ बॉल्स संघर्ष करावा लागला होता. लारा आऊट झाला तेव्हा ९ ओव्हर्समध्ये वेस्ट इंडीजचा स्कोर होता २७ / २!

लारा परतल्यावर बॅटींगला आलेल्या रामनरेश सरवानने सुरवातीला सावधपणे श्रीलंकन बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. गेलने १० व्या ओव्हरमध्ये गुणरत्नेला २ बाऊंड्री तडकावल्यावर वासच्या पुढच्या ओव्हरमध्ये सरवानने त्याला लेगग्लान्सची बाऊंड्री मारली. जयसूर्याने गुणरत्नेच्या ऐवजी अरविंदा डिसील्वाला बॉलिंगला आणलं, पण गेलने आक्रमक पवित्रा घेत त्यालाही मिडविकेटला बाऊंड्री तडकावली. पहिल्या स्पेलमध्ये ७ ओव्हर्स टाकल्यावर जयसूर्याने वासच्या ऐवजी दिलहरा फर्नांडोला बॉलिंगला आणलं. फर्नांडोच्या पहिल्याच बॉलवर सरवानने स्क्वेअरकट्ची बाऊंड्री फटकावली पण...

फर्नांडोचा दुसरा बॉल ऑफस्टंपवर पडला...
सरवानने बंपर डक करण्याचा पवित्रा घेतला पण बॉलवरची नजर हटवण्याची चूक त्याला भोवली...
बॉल त्याच्या हेल्मेटवर जोराने आदळला...
बॉलच्या आघाताने सुन्नं झालेला सरवान जमिनीवर कोसळला...

नॉनस्ट्रायकर एन्डला असलेला गेल आणि श्रीलंकेच्या खेळाडूंनी सरवानकडे धाव घेतली. वेस्ट इंडीज संघाच्या डॉक्टरनी मैदानात त्याच्यावर तात्पुरते उपचार केले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. सरवानच्या गालावरुन रक्ताचे ओघळ वाहत होते. डोक्यावर झालेल्या आघातामुळे त्याला धड बसताही येत नव्हतं. अखेर स्ट्रेचरवरुन त्याला मैदानातून बाहेर आणण्यात आलं आणि ताबडतोब त्याची रवानगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली.

सरवानच्या जखमी होऊन रिटायर झाल्यावर बॅटींगला आलेला कार्ल हूपर पुढच्याच बॉलवर एलबीडब्ल्यू झाला!
वेस्ट इंडीज ६२ / ३!

हूपर परतल्यावर आलेल्या शिवनारायण चँडरपॉलने नेहमीप्रमाणेच कोणतीही रिस्क न घेता रन्स काढण्यावर भर दिला. फर्नांडोच्या त्याच ओव्हरमध्ये स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री मारल्यावर पुढच्या ओव्हरमध्ये त्याने डिसील्वाला कव्हर्समधून बाऊंड्री मारली. जयसूर्याने डिसील्वाच्या ऐवजी मुथय्या मुरलीधरनला बॉलिंगला आणलं, पण चँडरपॉलला रोखणं त्यालाही जमलं नाही. गेल - चँडरपॉल यांनी जवळपास प्रत्येक ओव्हरमध्ये बाऊंड्री मारण्याचा सपाटा लावला होता! या दोघांनी ५९ रन्सची पार्टनरशीप केल्यावर अखेर जयसूर्याने वासला बॉलिंगला आणलं. वासची पहिली ओव्हर गेल आणि चँडरपॉलने सावधपणे खेळून काढली खरी, पण बॉल रिव्हर्स स्विंग होत असल्याचं पाहून जयसूर्याने त्याला आणखीन एक ओव्हर देण्याचा निर्णय घेतला आणि तो श्रीलंकेला चांगलाचा फायदेशीर ठरला...

वासचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
गेलने फ्रंटफूटवर येत बॉल डिफेंड करण्याचा पवित्रा घेतला पण....
बॉल स्विंग होऊन मिडलस्टंपसमोर गेलच्या पॅडवर आदळला...
अंपायर वेंकटराघवनचं बोट वर झालं!
७६ बॉल्समध्ये ८ बाऊंड्रीसह गेलने ५५ रन्स फटकावल्या.

गेल परतल्यावर दोन बॉल्सनंतर रिडली जेक्ब्सचा वासला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्नं पार फसला आणि संगकाराने त्याचा कॅच घेतला.
हे कमी होतं म्हणून की काय पुढच्याच ओव्हरमध्ये मुरलीधरनने रिकार्डो पॉवेलची दांडी उडवली!

१२१ / ३ वरुन वेस्ट इंडीजची १२२ / ६ अशी घसरगुंडी उडाली!
जखमी झाल्यामुळे सरवान बॅटींगला येण्याची शक्यता नव्हती.

वेस्ट इंडीजच्या दृष्टीने आशेचा एकमेव किरण होता तो म्हणजे चँडरपॉल!

पॉवेल परतल्यावर बॅटींगला आलेल्या व्हॅसबर्ट ड्रेक्सने शांत डोक्याने चँडरपॉलला सपोर्ट देण्याचा मार्ग पत्करला. वेस्ट इंडीजच्या दृष्टीने जमेची एक बाजू म्हणजे चामिंडा वासच्या ओव्हर्स संपल्या होत्या. चँडरपॉल आणि ड्रेक्स यांनी कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढत स्कोर वाढवण्यावर लक्षं केंद्रीत केलं. फर्नांडोच्या शॉर्टपीच बॉलवर चँडरपॉलने त्याला मिडविकेटला पूलची बाऊंड्री तडकावली. चँडरपॉल - ड्रेक्स यांनी ४७ रन्सची पार्टनरशीप केल्यावर अखेर अरविंदा डिसील्वाच्या बॉलवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात चँडरपॉलची टॉप एज लागली आणि अट्टापट्टूने त्याचा कॅच घेतला. ९० बॉल्समध्ये ६ बाऊंड्रीसह चँडरपॉलने ६५ रन्स फटकावल्या. वेस्ट इंडीज १६९ / ७!

शेवटच्या ८ ओव्हर्समध्ये वेस्ट इंडीजला ६० रन्सची आवश्यकता होती!

व्हॅसबर्ट ड्रेक्सच्या जोडीला पेड्रो कॉलिन्स आणि मर्व्हन डिलन हे दोघं बॉलर्स उरल्यामुळे श्रीलंकेने मॅच जिंकल्यात जमा होती पण...
बॅटींगसाठी मैदानात उतरणार्‍या बॅट्समनला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला...
...आणि दुसर्‍याच क्षणी न्यूलँड्सच्या मैदानावर हजर असलेल्या एकूण एक प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला...

रामनरेश सरवान!

अवघ्या दोन तासांपूर्वी स्ट्रेचरवरुन मैदानातून बाहेर आणण्यात आलेला सरवान हॉस्पिटलमधून परतल्यावर पुन्हा मैदानात उतरला होता आणि तो देखिल हेल्मेट न घालता!

जयसूर्या म्हणतो,
"None of us thought he will come back to bat after he was carried out from the ground on stretcher. It was one of the most courageous acts I have ever seen on cricket field!"

सरवानने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत श्रीलंकन बॉलर्सना फटकावण्यास सुरवात केली. डिसील्वाच्या ओव्हरच्या शेवटच्या दोन बॉल्सना बाऊंड्रीवर मर्व्हन अट्टापट्टूने बाऊंड्री अडवल्यावरही सरवानचा आक्रमकपणा कमी झाला नाही. इतका वेळ सावधपणे खेळणार्‍या ड्रेक्सनेही जयसूर्याला बाऊंड्री तडकावली, पण जयसूर्याच्या पुढच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर त्याला फटकावण्याचा ड्रेक्सचा प्रयत्नं फसला आणि स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर चामिंडा वासने ड्रेक्सचा कॅच घेतला. ४८ बॉल्समध्ये १ बाऊंड्रीसह ड्रेक्सने २५ रन्स काढल्या. वेस्ट इंडीज १८६ / ८!

२३ बॉल्समध्ये वेस्ट इंडीजला अद्याप ४२ रन्सची आवश्यकता होती!

ड्रेक्स आऊट झाल्यावर पुढच्याच बॉलवर....
जयसूर्याचा ऑफस्टंपवर पडलेला बॉल क्रिजमधून पुढे सरसावत सरवानने लाँगऑफवर उचलला...
बाऊंड्रीपासून पाच यार्ड आत असलेल्या अट्टापट्टूने हवेत जंप मारली पण...
जेमतेम त्याच्या बोटांना स्पर्श करुन बॉल बाऊंड्रीपार गेला.. सिक्स!

जयसूर्याचा पुढच्या बॉलवर सरवानला काहीच करता आलं नाही, पण चौथ्या बॉलवर त्याने मिडविकेटला बाऊंड्री तडकावली. पाचवा बॉल सरवानने मिडविकेटलाच फटकावला, पण महेला जयवर्धनेने डाईव्ह मारत बाऊंड्री वाचवल्यामुळे सरवानला ३ रन्सवर समाधान मानावं लागलं. ड्रेक्स आऊट झाल्यावर पुढच्या ४ बॉल्समध्ये सरवानने १३ रन्स झोडपल्या होत्या!

अद्याप ३ ओव्हर्समध्ये वेस्ट इंडीजला २९ रन्स हव्या होत्या!

अरविंदा डिसील्वाच्या पहिल्या बॉलवर डिलनने एक रन काढल्यावर दुसर्‍या बॉलवर सरवानने मिड्विकेटवरुन दणदणीत सिक्स ठोकली! डिसील्वाच्या पुढच्याच बॉलवर स्क्वेअरलेगला सिक्स मारण्याचा सरवानचा प्रयत्नं साफ फसला आणि त्याची टॉप एज लागली पण स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर अट्टापट्टूने हा कॅच ड्रॉप केला!

शेवटच्या २ ओव्हर्समध्ये वेस्ट इंडीजला १६ रन्स बाकी होत्या!

जयसूर्याने ४९ व्या ओव्हरमध्ये मुरलीधरनला बॉलिंगला आणलं. मुरलीधरनच्या पहिल्या ४ बॉल्सवर मर्व्हन डिलनला काहीच करता आलं नाही. शेवटच्या २ बॉल्सवर सरवान - डिलन यांनी २ रन्स काढल्या.

शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडीजला १४ रन्सची आवश्यकता होती!

जयसूर्यासमोर प्रश्नं होता तो म्हणजे शेवटची ओव्हर कोणाला द्यावी हा! वास, मुरलीधरन आणि डिसील्वाच्या ओव्हर्स संपल्या होत्या. जयसूर्याच्या समोर फर्नांडो, गुणरत्ने किंवा स्वतः जयसूर्या असे पर्याय होते. अरविंदा डिसील्वाशी चर्चा केल्यावर त्याने बॉलिंगला आणलं गुणरत्नेला!

६ बॉल्स - १४ रन्स!

गुणरत्नेचा पहिला बॉल अचूक यॉर्कर होता. सरवानला त्यावर काहीच करता आलं नाही...

५ बॉल्स - १४ रन्स!

गुणरत्नेचा दुसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
सरवानने क्रीजमधून पुढे सरसावत तो कव्हर्समधून फटकावण्याचा प्रयत्नं केला पण...
बॉल त्याच्या बॅटच्या एजला लागून थर्डमॅन बाऊंड्रीवर गेला!

४ बॉल्स - १० रन्स!

गुणरत्नेचा तिसरा बॉल यॉर्कर होता...
सरवानला तो बॉलरच्या हातात खेळण्यापलिकडे काहीच करता आलं नाही...
रन काढण्याच्या दृष्टीने जवळपास अर्ध्या पीचपर्यंत पोहोचलेल्या डिलनला क्रीजमध्ये परतण्यास संधीच मिळाली नाही...
वेस्ट इंडीज २१९ / ९!

३ बॉल्स - १० रन्स!

लेगस्टंपच्या लाईनवर पडलेला गुणरत्नेचा बॉल सरवानने स्क्वेअरलेगला फ्लिक केला आणि २ रन्ससाठी कॉल दिला...
कॉलिन्सने पहिली रन पूर्ण केली पण...
स्क्वेअरलेग बाऊंड्रीवरुन धावत आलेल्या मुरलीधरनने बॉल पिकअप केल्यामुळे दुसरी रन मिळण्याचा चान्सच नव्हता...

२ बॉल्स - ९ रन्स!

पेड्रो कॉलिन्सच्या समोर २ बॉल्समध्ये किमान ८ रन्स फटकावून मॅच टाय करण्याचं आव्हान होतं पण...
गुणरत्नेच्या बंपरपुढे कॉलिन्सला १ रनवरच समाधान मानावं लागलं...
मॅच वेस्ट इंडीजच्या हातातून निसटली...

शेवटच्या बॉलवर सरवानने १ रन काढली...

श्रीलंकेने ६ रन्सनी मॅच जिंकली!

रामनरेश सरवान ४४ बॉल्समध्ये ४ बाऊंड्री आणि २ सिक्ससह ४७ रन्स फटकावून नॉटआऊट राहीला पण...
स्ट्रेचरवरुन हॉस्पिटलमध्ये जावं लागल्यावरही मैदानात पुन्हा परतलेल्या सरवानची जिगर वेस्ट इंडीजला मॅच जिंकून देण्यास अपुरी पडली...

कार्ल हूपर वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात आल्याने इतका हताश झाला होता की सरवानच्या कौतुकाचे दोन शब्दही त्याच्या तोंडून निघाले नाहीत...
“I don’t think it is too big a deal, we’ve seen bloodshed before,” हूपर म्हणाला!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

diggi12's picture

9 Oct 2021 - 1:51 am | diggi12

जबरदस्त

श्रीगुरुजी's picture

9 Oct 2021 - 9:01 am | श्रीगुरुजी

हा सामना आठवतोय. त्यावेळी सरवानची जिद्द पाहून आश्चर्य वाटले होते. जयवर्धने हा अत्यंत शैलीदार फलंदाज होता. या महान फलंदाजाची २००३ च्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी होती १, ५, ९, १, ०, ०, ५. श्रीलंकेचा सर्वकालीन महान खेळाडू अरविंद डिसिल्वाची ही शेवटची विश्वचषक स्पर्धा. या स्पर्धेत उपांत्य फेरीत श्रीलंका ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाले व त्यांचे आव्हान संपुष्टात आले व तो अरविंद डिसिल्वाचा शेवटचा सामना ठरला.

२००७ विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंड वि. श्रीलंका हा सामनाही अत्यंत रोमहर्षक झाला होता ज्यात इंग्लंड फक्त ३ धावांनी पराभूत झाले होते.