वर्ल्डकप क्लासिक्स - १९९६ - सेमीफायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
19 Feb 2017 - 9:15 am

१४ मार्च १९९६
पीसीए, मोहाली

चंदीगडमधल्या मोहालीच्या मैदानात वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल खेळली जाणार होती. क्वार्टरफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने ली जरमॉनच्या न्यूझीलंडचा पराभव करुन सेमीफायनल गाठली होती तर वेस्ट इंडीजने वर्ल्डकपचे प्रमुख दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रीकेला घरचा रस्ता दाखवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. या सेमीफायनलमधल्या विजेत्या संघाची फायनलमध्ये अर्जुन रणतुंगाच्या श्रीलंकेशी गाठ पडणार होती. कलकत्त्याला ईडन गार्डन्सवर प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे मॅच रेफ्री असलेल्या क्लाईव्ह लॉईडने श्रीलंकेला मॅच बहाल केली होती.

मार्क टेलरच्या ऑस्ट्रेलियन संघात स्वत: टेलर, मार्क आणि स्टीव्ह हे वॉ बंधू, रिकी पाँटींग, स्ट्युअर्ट लॉ, मायकेल बेव्हन असे बॅट्समन होते. यांच्याबरोबरच मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करण्यात उस्ताद असलेला विकेटकीपर इयन हिली होता. ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगचा भर मुख्यत: ग्लेन मॅकग्राथ आणि अर्थातच शेन वॉर्न यांच्यावर होता. मोहालीची विकेट ही फास्ट बॉलिंगला मदत करणारी असल्याने मॅकग्राथच्या जोडीला पॉल रायफल आणि डॅमियन फ्लेमिंगचाही ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश होता.

रिची रिचर्ड्सनच्या वेस्ट इंडीज संघाने पुण्याला केनियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर ग्रूपमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारत क्वार्टरफायनल गाठली होती. क्वार्टरफायनलमध्ये कोणाचीही अपेक्षा नसताना वेस्ट इंडीजने ब्रायन लाराच्या सेंच्युरीनंतर स्पिनर्सच्या जाळ्यात अडकवून दक्षिण आफ्रीकेची शिकार केली होती. वेस्ट इंडीजच्या संघात स्वतः रिचर्ड्सन, ब्रायन लारा, शिवनारायण चँडरपॉल, जिमी अ‍ॅडम्स, कीथ आर्थर्टन असे बॅट्समन होते. मोहालीची विकेट फास्ट बॉलर्सना अनुकूल असल्याने कर्टली अँब्रोज, कॉर्टनी वॉल्श, इयन बिशप यांच्याबरोबर रोलँड होल्डरच्या ऐवजी ओटीस गिब्सनचा वेस्ट इंडीजच्या संघात समावेश करण्यात आला होता. ऑफस्पिनर रॉजर हार्पर आणि विकेटकीपर कॉर्टनी ब्राऊनही वेस्ट इंडी़अच्या संघात होते.

इयन बिशप म्हणतो,
"We looked at it as a great opportunity to put behind what had happened before, in terms of the defeat to Kenya. We thought we were in with as good a chance as any team getting through to the final."

मार्क टेलरने टॉस जिंकल्यावर बॅटींगचा निर्णय घेतला खरा पण...

कर्टली अँब्रोजचा पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या फूटभर बाहेर पडला....
विकेटकीपर कॉर्टनी ब्राऊनने तो कलेक्ट केला तेव्हा लेगसाईडला किमान अडीच-तीन फूट जाण्याइतका स्विंग झाला होता!

अँब्रोजचा दुसरा बॉलही ऑफस्टंपच्या बाह्रेर पडलेला इनस्विंगरा होता...
फक्तं यावेळी स्टंप्सवरुन ब्राऊनकडे न जाता तो ऑफस्टंपच्या बरोबर समोर मार्क वॉच्या पॅडवर आदळला...
अंपायर श्रीनिवास वेंकटराघवनचं बोट वर गेलं!
ऑस्ट्रेलिया ० / १!

दुसर्‍या ओव्हरमध्ये इयन बिशपला कट् करण्याच्या प्रयत्नात मार्क टेलरच्या बॅटची एज लागली, पण पहिल्या स्लिपमध्ये लाराला हा कॅच घेता आला नाही. पण चौथ्या ओव्हरमध्ये बिशपच्याच बॉलवर स्क्वेअरड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात टेलरच्या बॅटची इनसाईड एज लागली आणि बॉल स्टंपवर गेला. ऑस्ट्रेलिया ७ / २!

रिकी पाँटींगने पाचव्या ओव्हरचे पहिले चार बॉल खेळून काढले पण पाचव्या बॉलवर अँब्रोजचा इनस्विंगर मार्क वॉप्रमाणेच पाँटींगच्या पॅडवर आदळला! वेस्ट इंडीजची बॉलिंग इतकी अचूक होती की १५ बॉल्समध्ये पाँटींगला एकही रन काढता आली नाही. ऑस्ट्रेलिया ८ / ३!

बिकट परिस्थितीतून ऑस्ट्रेलियाला हमखासपणे तारुन नेणारा माणूस म्हणजे स्टीव्ह वॉ...

नवव्या ओव्हरचा पहिलाच बॉल...
बॅकफूटवर जात इयन बिशपला ड्राईव्ह करण्याचा स्टीव्ह वॉचा प्रयत्नं फसला....
स्टीव्ह वॉच्या बॅटची इनसाईड एज लागून स्टंप्सवर गेला!

अँब्रोज आणि बिशप यांनी ९.१ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाची अवस्था १५ / ४ अशी करुन टाकली होती!

स्ट्युअर्ट लॉ आणि मायकेल बेव्हन यांनी सावधपणे ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज सावरण्यास सुरवात केली. ११ व्या ओव्हरमध्ये लॉने अँब्रोजला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. ऑस्ट्रेलियाच्या इनिंग्जमधली ही पहिली बाऊंड्री! परंतु हा अपवाद वगळता अँब्रोव, बिशप आणि अँब्रोजच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या कॉर्टनी वॉल्शनेही अचूक बॉलिंग करत ऑस्ट्रेलियन बॅट्समनना फटकेबाजीची कोणतीही संधी दिली नाही. लॉ आणि बेव्हन यांनीही फटकेबाजीच्या मोहात न पडता वेस्ट इंडीजची बॉलिंग खेळून काढत १-२ रन्स काढण्यावरच भर दिला. ओटीस गिब्सनच्या १८ व्या ओव्हरमध्ये बेव्हनने स्क्वेअरकटची बाऊंड्री तडकावली. पुढच्याच ओव्हरमध्ये...

इयन बिशपचा लेगस्टंपवर पडलेला बॉल लॉने मिडविकेटला रिची रिचर्ड्सनच्या हातात फ्लिक केला....
....पण वेस्ट इंडीजच्या दुर्दैवाने बिशपचा पाय क्रीजच्या पुढे पडला होता!
नो बॉल!

बिशप म्हणतो,
"I had Stuart Law caught off a no-ball when he flicked one to midwicket. On reflection, that would have been a significant breakthrough. Even now, it's very disappointing on my part that I couldn't keep my foot behind the line, given the situation Australia were in at the time."

पहिल्या २० ओव्हर्सनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता ४५ / ४!

२२ व्या ओव्हरमध्ये रिचर्ड्सनने रॉजर हार्परला बॉलिंगला आणल्यावर लॉने आक्रमक पवित्रा घेत त्याला मिडविकेटवरुन बाऊंड्री तडकावली. गिब्सनच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये बेव्हनने कट्ची बाऊंड्री मारल्यावर रिचर्ड्सनने त्याच्या ऐवजी बिशपला बॉलिंगला आणलं, पण बेव्हनने त्याला कव्हर आणि मिडविकेटला बाऊंड्री फटकावल्या. लॉ - बेव्हन ऑस्ट्रेलियाची गाडी हळूहळू परत मार्गावर आणत असताना ३५ व्या ओव्हरमध्ये एक गंमतीशीर प्रकार झाला...

कॉर्टनी वॉल्शचा हाफव्हॉलीवर पडलेला बॉल स्ट्युअर्ट लॉने स्ट्रेट ड्राईव्ह केला...
वॉल्शला हा कॅच घेता येणं अशक्यंच होतं, पण....
अंपायरचा हात झटकन कॅच घेण्यासाठी वर झाला...
त्याने जवळपास कॅच घेतलाच होता...
.... अगदी शेवटच्या क्षणी तो बॉलच्या वाटेतून बाजूला झाला...
स्ट्युअर्ट लॉला बाऊंड्री मिळाली!

अंपायर होता एकेकाळी स्वतः अफलातून फिल्डर असलेला वेंकट! त्याच्या चेहर्‍यावर मिस्किल हास्यं उमटलं होतं.

वेंकट म्हणतो,
"The batsman drove the ball right back at me and I thought, ‘Here comes the return catch!’. Almost instinctively I threw out my hand to catch the ball but suddenly realized that I am an umpire and not player anymore, so at the very last moment managed to pull out!"

रिची रिचर्ड्सनने जिमी अ‍ॅडम्सला बॉलिंगला आणल्यावर लॉ आणि बेव्हन यांनी आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. लॉने अ‍ॅडम्सला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री मारल्यावर बेव्हनने रॉजर हार्परला लाँगऑफवरुन दणदणीत सिक्स ठोकली. लॉ - बेव्हन यांनी १३८ रन्सची पार्टनरशीप केल्यावर...

अ‍ॅडम्सचा लेगस्टंपवर पडलेला बॉल लॉने बॅकफूटवर जात कट् केला...
बेव्हनने एक रनसाठी दिलेल्या कॉलला लॉने प्रतिसाद दिला पण...
अँब्रोजचा शॉर्ट थर्डमॅनवरुन आलेला थ्रो कलेक्ट करुन अ‍ॅडम्सने बेल्स उडवल्या...
लॉ जेमतेम अर्ध्या क्रीजपार पोहोचला होता...

१०५ बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह स्ट्युअर्ट लॉने ७२ रन्स काढल्या.
ऑस्ट्रेलिया १५३ / ५!

लॉ आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या इयन हिलीने हार्परला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. बेव्हन - हिली यांनी १८ रन्स जोडल्यावर रॉजर हार्परला फटकावण्याचा बेव्हनचा प्रयत्नं फसला आणि एक्स्ट्राकव्हरला रिचर्ड्सनने त्याचा कॅच घेतला. ११० बॉल्समध्ये ४ बाऊंड्री आणि हार्परला मारलेल्या सिक्ससह बेव्हनने ६९ रन्स काढल्या. ऑस्ट्रेलिया १७१ / ६!

बेव्हन परतल्यावर हिलीने पॉल रायफलच्या जोडीने १-२ रन्स ढापण्याचा सपाटा लावला. या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा स्कोर १८६ पर्यंत नेल्यावर कॉर्टनी वॉल्शने फॉलो थ्रूमध्ये बॉल पिकअप करुन नॉनस्ट्रायकर एंडच्या स्टंप्सचा वेध घेतल्याने रायफल रनआऊट झाला. हिली - वॉर्न यांनी शेवटच्या २ ओव्हर्समध्ये २१ रन्सची पार्टनरशीप केली. वॉल्शच्या शेवटच्या ओव्हरमध्ये मिडविकेटला हिलीने बाऊंड्री तडकावली. अखेर शेवटच्या बॉलवर दुसरी रन काढण्याच्या प्रयत्नात हिली रनआऊट झाला. २८ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह हिलीने ३१ रन्स फटकावल्या.

५० ओव्हर्स संपल्या तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता २०७ / ८!

बिशप म्हणतो,
"At the innings break, we were pretty confident to win the match. With Lara, Chanderpaul and Richardson in excellent form, 208 was never going to be a problem."

शिवनारायण चँडरपॉल आणि कॉर्टनी ब्राऊन यांनी कोणतीही रिस्क न घेता ऑस्ट्रेलियन बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. चँडरपॉलने डॅमियन फ्लेमिंगला फ्लिक आणि स्ट्रेट ड्राईव्हच्या बाऊंड्री मारल्यावर मार्क टेलरने ७ व्या ओव्हरमध्ये आपलं हुकुमी अस्त्रं बाहेर काढलं...शेन वॉर्न!

वॉर्नचा पहिलाच बॉल शॉर्टपीच होता...
कॉर्टनी ब्राऊनने बॅकफूटवर जात तो ड्राईव्ह केला पण...
वॉर्नने फॉलो थ्रूमध्ये डाईव्ह मारत अप्रतिम कॅच घेतला!
वेस्ट इंडीज २५ / १!

कॉर्टनी ब्राऊन आऊट झाल्यावर लारा बॅटींगला आला. कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला इयन चॅपल म्हणाला,
“This is another reason why its a fascinating world cup, 96! So many good match ups. This is another beauty - Warne to Lara!”

लाराने सावधपणे मॅकग्राथ आणि वॉर्नला खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. पण वॉर्नच्या जागी फ्लेमिंग बॉलिंगला आल्यावर आक्रमक पवित्रा घेत लाराने त्याला बॅकवर्ड पॉईंट्ला लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. टेलरने फ्लेमिंगच्या ऐवजी स्टीव्ह वॉला बॉलिंगला आणलं, पण लारावर त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. स्टीव्ह वॉला लेगग्लान्सची बाऊंड्री मारल्यावर वॉच्या पुढच्या ओव्हरमध्ये लाराने कव्हर्समधून बाऊंड्री ठोकली. लाराची फटकेबाजी सुरु असताना चँडरपॉलने मात्रं कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढण्याचा मार्ग पत्करला होता. स्टीव्ह वॉचा शॉर्टपीच बॉल चँडरपॉलने त्याच्याच डोक्यावरुन फटकावला, पण हा अपवाद वगळता लाराला सपोर्ट देण्याचं धोरण त्याने अवलंबलं होतं. लारा - चँडरपॉल यांनी ७८ रन्सची पार्टनरशीप केली. हे दोघं - विशेषतः लारा ऑस्ट्रेलियन बॉलर्सना फटकावत असतानाच...

स्टीव्ह वॉचा इनस्विंगर ऑफस्टंपच्या लाईनमध्ये पडला...
वॉ राऊंड द विकेट बॉलिंग करत असल्याने हा बॉल मिडलस्टंपच्या लाईनमध्ये येईल हा लाराचा अंदाज होता पण...
ऑफस्टंपच्या लाईनमध्ये पडलेला वॉचा बॉल अचूक टप्प्यावर पडला आणि सीम होऊन बाहेर गेला...
डिफेन्सिव पद्धतीने बॉल खेळण्याचा लाराचा प्रयत्नं पार फसला...
लाराचा ऑफस्टंप उडाला!

४५ बॉल्समध्ये ४ बाऊंड्री तडकावत लाराने ४५ रन्स फटकावल्या.
वेस्ट इंडीज २३ ओव्हर्समध्ये ९३ / २!

लारा परतल्यावर बॅटींगला आलेल्या कॅप्टन रिची रिचर्ड्सनने कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढ्ण्यावर भर दिला. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक रन रेट आवाक्यात असल्याने आक्रमक फटकेबाजी करण्याचं कोणतंही दडपण नव्हतं. रिचर्ड्सन आणि चँडरपॉल स्टीव्ह वॉ आणि पॉल रायफल यांना आरामात खेळत असल्याचं पाहून टेलरने वॉर्नला बॉलिंगला आणलं. २७ व्या ओव्हरमध्ये...

वॉर्नचा बॉल लेगस्टंपच्या किंचित बाहेर पडला...
स्क्वेअरलेगला फिल्डर नसल्याचा फायदा उठवण्याच्या इराद्याने रिचर्ड्सनने स्वीप मारला...
स्क्वेअरलेग अंपायर बी सी कुरेला बॉलच्या मार्गातून दूर होण्यास संधीच मिळाली नाही...
बॉल त्याच्या डोक्याला लागला आणि मिडविकेटला गेला...
रिचर्ड्सनला २ रन्स मिळाल्या!

अंपायर कुरेचं नशिब म्हणून कोणतीही मोठी दुखापत झाली नाही!

वॉर्नच्या पुढच्याच ओव्हरमध्ये चँडरपॉलने त्याला स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. एव्हाना दव पडण्यास सुरवात झाल्याने ओला झालेला बॉल अनेकदा ऑस्ट्रेलियन बॉलर्सच्या हातातून निसटत होता. टेलरने मायकेल बेव्हन आणि स्ट्युअर्ट लॉ यांनाही बॉलिंगला आणून पाहिलं, पण रिचर्डसनने दोघांनाही बाऊंड्री ठोकल्या. रिचर्डसन आरामात खेळत असताना चँडरपॉलला मात्रं क्रॅम्प्सचा त्रास जाणवत होता. कॉर्टनी ब्राऊन रनर म्हणून आल्यावर चँडरपॉलने आक्रमक पवित्रा घेत ऑस्ट्रेलियन बॉलर्सना फटकावण्यास सुरवात केली. डॅमियन फ्लेमिंगला त्याने मिडऑनला असलेल्या पॉल रायफलच्या डोक्यावरुन बाऊंड्री तडकावली, पण फ्लेमिंगप्रमाणेच ग्लेन मॅकग्राथला फटकावण्याचा चँडरपॉलचा प्रयत्नं पार फसला आणि मिडऑनला फ्लेमिंगने त्याचा कॅच घेतला.

१२६ बॉल्समध्ये ७ बाऊंड्रीसह चँडरपॉलने ८० रन्स काढल्या.
वेस्ट इंडीज १६५ / ३!

शेवटच्या ५२ बॉल्समध्ये वेस्ट इंडीजला ४३ रन्सची आवश्यकता होती!

चँडरपॉल आऊट झाल्यावर जिमी अ‍ॅडम्स किंवा कीथ आर्थर्टन या बॅट्समनपैकी कोणीतरी बॅटींगला येईल अशीच सर्वांची अपेक्षा होती. एका बाजूला कॅप्टन रिची रिचर्ड्सन आरामात खेळत असल्याने त्याच्या जोडीला एखाद्या बॅट्समनने येऊन कोणतीही रिस्क न घेता आवश्यक रन्स काढणं हे संयुक्तीक ठरलं असतं पण अ‍ॅडम्स किंवा आर्थर्टनऐवजी बॅटींगला आला रॉजर हार्पर!

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला इयन चॅपल म्हणाला,
"West Indies don’t want to work hard for their runs. They want to hit boundaries!"

हार्परला फटकेबाजीच्या हेतूने पाठवण्याची वेस्ट इंडीजची चाल साफ फसली. ५ बॉल्समध्ये २ रन्स काढल्यावर ४४ व्या ओव्हरमध्ये मॅकग्राथला अ‍ॅक्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नात हार्पर एलबीडब्ल्यू झाला. वेस्ट इंडीज १७३ / ४!

३९ बॉल्समध्ये वेस्ट इंडीजला ३५ रन्स हव्या होत्या!

हार्परला बढती देण्याचा प्रयोग फसल्यावर तरी वेस्ट इंडीजने योग्य तो धडा घ्यावा की नाही?
पण नाही!
हार्पर परतल्यावर बॅटींगला आला ओटीस गिब्सन!

रिचर्ड्सनवर मात्रं हार्परच्या विकेटचा फारसा परिणाम झाला नव्हता.
मॅकग्राथचा लेगस्टंपवरच्या बॉलवर त्याने स्क्वेअरलेगला बाऊंड्री तडकावली.

मार्क टेलरने चाणाक्षपणे बॉलिंगला आणलं शेन वॉर्नला!

वॉर्नचा पहिलाच बॉल कट् करण्याचा गिब्सनचा प्रयत्नं पार फसला...
इयन हिलीने कॅच घेण्यात कोणतीही कसूर केली नाही!
वेस्ट इंडीज १७८ / ५!

वेस्ट इंडीजच्या ड्रेसिंगरुममध्ये चिंतेचं जाळं पसरण्यास सुरवात झाली होती!

इयन बिशप म्हणतो,
"I think the panic came from my side when the batting order was changed. I can only speak for myself. I know my ability with the bat. All I had to do was play it a little straighter and work it around. As soon as it got down to a few wickets left, we started realizing we were messing this up."

फायनल गाठण्यासाठी वेस्ट इंडीजला ३५ बॉल्समध्ये ३० रन्स बाकी होत्या!

गिब्सन परतल्यावर अखेर अ‍ॅडम्स बॅटींगला आला खरा, पण एव्हाना सूर सापडलेल्या वॉर्नला खेळणं त्याला कमालीचं जड जात होतं. दुसर्‍याच बॉलवर वॉर्नला फटकावण्याच्या प्रयत्नात बोल्ड होण्यापासून थोडक्यात वाचला, पण अखेर ४७ व्या ओव्हरमध्ये वॉर्नचा मिडलस्टंपवर पडलेला बॉल स्वीप करण्याचा अ‍ॅडम्सचा प्रयत्नं पार फसला आणि तो एलबीडब्ल्यू झाला. अ‍ॅडम्सला ११ बॉल्समध्ये जेमतेम २ रन्स काढता आल्या! वेस्ट इंडीज १८३ / ६!

२१ बॉल्समध्ये वेस्ट इंडीजला २५ रन्सची आवश्यकता होती!

अ‍ॅडम्स आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या कीथ आर्थर्टनने वॉर्नच्या ओव्हरचे उरलेले ३ बॉल्स खेळून काढले, पण पुढच्या ओव्हरमध्ये डॅमियन फ्लेमिंगला मिडविकेटला फटकावण्याच्या प्रयत्नात आर्थर्टनची एज लागली आणि हिलीने त्याचा कॅच घेतला. वर्ल्डकपमधल्या ५ इनिंग्जमध्ये आर्थर्टनने २ रन्स काढल्या होत्या! वेस्ट इंडीज १८७ / ७!

अद्याप १४ बॉल्समध्ये २१ रन्स बाकी होत्या!

आर्थर्टन परतल्यावर बॅटींगला आलेल्या इयन बिशपने पहिलाच बॉल एक्स्ट्राकव्हरला तडकावला. बाऊंड्री जाणार असं वाटत असतानाच रिकी पाँटींगने जोरदार डाईव्ह मारत बॉल अडवला! रिचर्ड्सन - बिशप यांनी ३ रन्स काढल्या. फ्लेमिंगचा शेवटच्या बॉलवर रिचर्ड्सनने स्क्वेअरलेगला पूलची बाऊंड्री तडकावली!

शेवटच्या २ ओव्हर्समध्ये - १२ बॉल्समध्ये - वेस्ट इंडीजला १४ रन्स हव्या होत्या!

४९ व्या ओव्हरचा पहिला बॉल बिशपने खेळून काढला, पण दुसर्‍या बॉलवर वॉर्नच्या फ्लिपरचा अजिबात अंदाज न आल्याने बिशप एलबीडब्ल्यू झाला.
वेस्ट इंडीज १९४ / ८!

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला टोनी ग्रेग म्हणाला,
"Well bowled Shan Warne! He’s come to the party when it mattered!"

वॉर्नच्या तिसर्‍या बॉलवर कर्टली अँब्रोजने १ रन काढल्यावर रिचर्ड्सनने २ बॉल खेळून काढले आणि शेवटच्या बॉलवर एक रन काढली.

शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडीजला १० रन्सची आवश्यकता होती!

डॅमियन फ्लेमिंगचा पहिला बॉल...
मिडलस्टंपवर पडलेला पहिला बॉल रिचर्ड्सनने मिडविकेटला तडकावला.... बाऊंड्री!
मॅचचं पारडं पुन्हा एकदा वेस्ट इंडीजच्या बाजूने झुकलं होतं!

५ बॉल्स - ६ रन्स!

फ्लेमिंगचा दुसरा बॉल ऑफस्टंपच्या फूटभर बाहेर पडला...
रिचर्ड्सनचा कव्हरड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नं फसला आणि त्याच्या बॅटची इनसाईड एज लागली...
बॉल नेमका कुठे गेला असावा याची अजिबात कल्पना नसताना रिचर्ड्सनने रनसाठी कॉल दिला...
इयन हिलीने बॉल पिकअप केला आणि स्टंप्सचा अचूक वेध घेतला...
वेंकटने हा थर्डअंपायर खिझर हायातवर सोपवला...
अँब्रोज रनआऊट झाला होता!

वास्तविक रिचर्ड्सनने ही रन काढण्यासाठी आततायीपणा करण्याची काहीही गरज नव्हती.
अगदी एक रन मिळाली असती तरी फ्लेमिंगसमोर अँब्रोज स्ट्राईकवर आला असता.
एकच शक्यता होती....
वर्ल्डकपच्या नियमानुसार सेमीफायनल टाय झाल्यास ग्रूपमधल्या मॅचमध्ये वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने वेस्ट इंडीज फायनलमध्ये गेले असते.
बहुतेक याच विचाराने उरलेल्या प्रत्येक बॉलवर एकेक रन काढून मॅच जिंकली नाही तरी किमान टाय करण्याचा रिचर्ड्सनचा हेतू असावा...
पण याचा परिणाम वेस्ट इंडीजसाठी घातक ठरला...
अँब्रोज रनआऊट झालाच पण रिचर्ड्सन नॉनस्ट्रायकर एंडला गेला होता!

डॅमियन फ्लेमिंगसमोर स्ट्राईकवर होता कॉर्टनी वॉल्श!

इयन बिशप म्हणतो,
"It was a nerve-wracking time in the dressing room, given Courtney's reputation with the bat. We were just hoping he would stay at the other end and bat time. He's always nervous when he has a bat in his hand!"

वेस्ट इंडीयन खेळाडूंची भीती अनाठायी नव्हती!

डॅमियन फ्लेमिंगचा तिसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
वॉल्शने बॅट फिरवली खरी पण त्याच्या बॅटची बॉलशी गाठ पडलीच नाही...
वॉल्शचा ऑफस्टंप उडाला....
वेस्ट इंडीज २०२ ऑल आऊट!

५० बॉल्समध्ये ३७ रन्समध्ये वेस्ट इंडीजच्या ८ विकेट्स गेल्या होत्या!
कॅप्टन रिची रिचर्ड्सन ८३ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह ४९ रन्स काढून नॉटआऊट राहीला.
क्वार्टरफायनलमध्ये भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागलेल्या जावेद मियांदादप्रमाणेच रिची रिचर्ड्सनचीही ही अखेरची मॅच!

ऑस्ट्रेलियाने ५ रन्सनी मॅच जिंकली!

इयन बिशप म्हणतो,
"Everyone was very sad because we threw away something that was there to be taken. We were so grief-stricken and embarrassed that I don't even remember if the Australians came to see us after the game!"

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मार्क टेलर म्हणाला,
"West Indies had won 95 per cent of the match."

मार्क वॉ म्हणतो,
"How the bloody hell did we win that?"

रिची रिचर्डसन पुढे काही वर्षांनी या मॅचबद्द्ल बोलताना म्हणाला,
"I honestly thought that we could have won the World Cup. I felt let down by some of the players on that tour. We really should not have lost the match against Australia. I was just really really frustrated."

मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड झाली शेन वॉर्नची!
शेवटच्या स्पेलमध्ये ४५ व्या ओव्हरमध्ये बॉलिंगला आलेल्या वॉर्नने ३ ओव्हर्समध्ये फक्तं ६ रन्स देत ३ विकेट्स उडवल्या होत्या!

विस्डेनने वेस्ट इंडीजच्या पराभवाचं एका वाक्यात समर्पक वर्णन केलं आहे,
West Indies pulled off an extraordinary defeat

क्रीडालेख

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

19 Feb 2017 - 1:41 pm | कानडाऊ योगेशु

ह्या मॅचमधले रॉजर हॉर्पर बॅटींगला येतानाचे दृष्य मला अजुनही आठवते आहे. हॉर्पर हा पिंच हिटर म्हणुन कधीही प्रसिध्द नव्हता आणि आल्यानंतर एक दोन बॉल खेळल्यावर हा नक्की बॅट्समन तरी असावा का अशी स्थिती बनली होती.मॅच लवकर संपवण्याचा वेस्ट इंडिजचा आततायीपणा त्यांना नडला.

गॅरी ट्रुमन's picture

19 Feb 2017 - 8:51 pm | गॅरी ट्रुमन

ही पण एक अविस्मरणीय मॅच होती.

मार्क वॉ जर म्हणाला असेल---"How the bloody hell did we win that?" तर ते अगदी समजण्यासारखे आहे. एक वेळ अशी होती की वेस्ट इंडिजने १६५ रन्स केल्या होत्या आणि दोनच विकेट गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची तिसरी विकेट पडल्यावर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू केवळ एक उपचार म्हणून एकत्र आले होते. कोणीही विकेट गेल्याचा आनंद व्यक्त केला नव्हता. त्यावेळीही आता वेस्ट इंडिज किती ओव्हर राखून आणि किती विकेट राखून जिंकणार एवढाच प्रश्न राहिला आहे असे वाटत होते.

साधा मुलगा's picture

19 Feb 2017 - 8:54 pm | साधा मुलगा

अगदी ५-६ वर्षाचा होतो तेव्हा , अंधुकशी आठवते हि match, अम्पायारची टोपी उडाली हे लक्षात आहे.

स्थितप्रज्ञ's picture

23 Feb 2017 - 12:19 pm | स्थितप्रज्ञ

कोणीतरी स्वीप मारला होता आणि वेंकटराघवनच्या टाळक्यावर बसला होता चेंडू. तरी पट्ठ्या अक्खी मॅच उभा राहिला. मी असतो तर टॅम्पलीस करून घरी गेलो असतो...ख्या ख्या ख्या

स्थितप्रज्ञ's picture

22 Feb 2017 - 5:24 pm | स्थितप्रज्ञ

या मॅचची शेवटची ५ षटके बाकी असताना आमच्याकडे लाईट गेली होती. पुढील वृत्तांत रेडिओवर ऐकला होता. पण ते ऐकताना खल्लास मजा आली होती.

अभिजीत अवलिया's picture

22 Feb 2017 - 6:30 pm | अभिजीत अवलिया

विंडीजच्या पराभवाचे खूप वाईट वाटले होते. लारा, अॅम्ब्रोज, वाॅल्श ह्या त्रिकुटाच्या पदरी एक तरी विश्वचषक यायला हवा होता.