वर्ल्डकप क्लासिक्स - १९९२ - सेमीफायनल - न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
15 Feb 2017 - 8:37 am

२१ मार्च १९९२
ईडन पार्क, ऑकलंड

न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलंडमधल्या ऑकलंडच्या ईडन पार्कवर यजमान न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल रंगणार होती. न्यूझीलंडच्या संघाने आपल्या ८ पैकी सात मॅचेस जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. पहिल्या ७ मॅचेस जिंकल्यावर शेवटच्या एकमेव मॅचमध्ये न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला होता. अर्थात आधीच सेमीफायनल गाठलेली असल्याने न्यूझीलंडच्या दृष्टीने ही मॅच फारशी महत्वाची नव्हती. याउलट पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला होता तो पावसाच्या कृपेने! इंग्लंडविरुद्ध ७४ रन्समध्ये ऑलआऊट झाल्यानंतरही पावसामुळे ही मॅच वाहून गेली होती. या मॅचमध्ये मिळालेला एकमेव पॉईंटच पाकिस्तानला तारुन गेला होता. शेवटच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा पराभव केल्याने पाकिस्तानचा मार्ग मोकळा झाला होता.

मार्टीन क्रोचा न्यूझीलंड संघ जोरदार फॉर्ममध्ये होता. न्यूझीलंडच्या संघात अनुभवी जॉन राईट, अँड्र्यू जोन्स, स्वत: मार्टीन क्रो, केन रुदरफोर्ड असे बॅट्समन होते. त्यांच्याव्यतिरिक्तं सुरवातीपासूनच आक्रमक फटकेबाजी करणारा मार्क ग्रेटबॅचसारखा ओपनर होता! इयन स्मिथसारखा अनुभवी विकेटकीपर बॅट्समन न्यूझीलंडच्या संघात होता. न्यूझीलंडच्या बॉलिंगचा भार मुख्यतः डॅनी मॉरीसनवर होता. त्याच्या जोडीला विली वॉटसन, गेव्हीन लार्सन, क्रिस हॅरीस, दीपक पटेल असे बॉलर्स होते. आतापर्यंतच्या सर्व मॅचेसमध्ये मॉरीसनच्या जोडीला ओपनिंग बॉलर म्हणून पटेलला वापरण्याची मार्टीन क्रोची चाल चांगलीच यशस्वी ठरलेली होती.

पाकिस्तानच्या संघात अनुभवी जावेद मियांदाद, सलिम मलीक, रमिझ राजा, आमिर सोहेल, इंझमाम-उल-हक असे बॅट्समन होते. पाकिस्तानच्या बॉलिंगची मदार होती ती वासिम अक्रमवर! अक्रमच्या जोडीला आकिब जावेद, मुश्ताक अहमद, लेगस्पिनर इक्बाल सिकंदर असे बॉलर्स पाकिस्तानकडे होते. विकेटकीपर मोईन खानचाही पाकिस्तानच्या संघात समावेश होता. पण पाकिस्तानचा खरा आधारस्तंभ होता तो म्हणजे कॅप्टन इमरान खान! वास्तविक १९८७ च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यावर इमरान रिटायर झाला होता, पण वर्षाभरानंतर त्याने रिटायरमेंटमधून पुनरागमन केलं होतं!

न्यूझीलंडचा कॅप्टन मार्टीन क्रोने टॉस जिंकल्यावर बॅटींगचा निर्णय घेतला. खरंतर आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली मॅच वगळता टॉस जिंकल्यास न्यूझीलंडने प्रथम फिल्डींग करण्यासा प्राधान्यं दिलं होतं. पण सेमीफायनलची गोष्टं वेगळी होती. सेमीफायनलमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असल्याने प्रथम बॅटींग करण्याचा मार्टीन क्रोचा निर्णय होता.

मार्टीन क्रो म्हणतो,
"The weather forecast was bit dodgy with thunderstorms predicted in the afternoon around 3 o’clock and under the rain rule, we did not want to be batting when the rain arrive, so we changed out tactics and decided to bat first."

मार्क ग्रेटबॅच या वर्ल्डकपमध्ये आपल्या आक्रमक फटकेबाजीमुळे प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरलेला होता. पहिल्या दोन ओव्हर्स सावधपणे खेळून काढल्यावर वासिम अक्रमच्या तिसर्‍या ओव्हरमध्ये जॉन राईट रनआऊट होण्यापासून थोडक्यात बचावला. अर्थात ग्रेटबॅचला काहीच फरक पडला नव्हता. अक्रमच्या पुढच्या ओव्हरमध्ये त्याने बॅकवर्ड पॉईंटवरुन कट्ची सिक्स ठोकली तर त्याच्या पुढ्च्या ओव्हरमध्ये क्रीजमधून पुढे सरसावत अकिब जावेदचा बॉल त्याने लाँगऑन बाऊंड्रीपार तडकावला! ग्रेटबॅच पाकिस्तानी बॉलर्सची चांगलीच धुलाई करणार असं वाटत असतानाच अकिब जावेदच्या स्लो बॉलचा अजिबात अंदाज न आल्याने तो बोल्ड झाला. न्यूझीलंड ३५ / १.

ग्रेटबॅचची फटकेबाजी सुरु असताना अक्रम - अकिब यांनी जॉन राईटला मात्रं पार जखडून टाकलेलं होतं. अखेर १३ व्या ओव्हरमध्ये मुश्ताक अहमदला फटकावण्याचा राईटचा प्रयत्न फसला आणि लाँगऑनवर रमिझ राजाने त्याचा कॅच घेतला. जेमतेम १३ रन्स काढण्यासाठी राईटला ४४ बॉल्स झगडावं लागलं होतं. तो आऊट झाला तेव्हा १३ ओव्हर्समध्ये न्यूझीलंडचा स्कोर होता ३९ / २!

राईट परतल्यावर बॅटींगला आलेल्या मार्टीन क्रोने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानी बॉलर्सना फटकावून काढण्याचा पवित्रा घेतला होता. इमरान - मुश्ताक अहमद यांना त्याने बाऊंड्री तडकावल्या. अँड्र्यू जोन्सने मात्रं पाकिस्तानी बॉलर्सना खेळून काढता मार्टीन क्रोला जास्तीत जास्तं स्ट्राईक देण्याचा मार्ग पत्करला होता. जोन्स - मार्टीन क्रो यांनी ११ ओव्हर्समध्ये ४८ रन्सची पार्टनरशीप केल्यावर मुश्ताक अहमदच्या गुगलीवर जोन्स एलबीडब्ल्यू झाला. २४ व्या ओव्हरमध्ये न्यूझीलंड ८७ / ३!

जोन्स आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या केन रुदरफोर्डला आपली पहिली रन काढण्यासाठी तब्बल २१ बॉल्स वाट पाहवी लागली. मुश्ताकच्या जागी बॉलिंगला आलेल्या वासिम अक्रमचा अचूक यॉर्कर मिडलस्टंपसमोर रुदरफोर्डच्या पॅडवर आदळला पण अंपायर डेव्हीड शेपर्डने नोबॉल दिल्यामुळे रुदरफोर्ड वाचला! जॉन राईटप्रमाणेच रुदरफोर्डलाही रन्स काढण्यासाठी अपार संघर्ष करावा लागत होता. मुश्ताक - इक्बाल सिकंदरनी त्याला पार खिळवून ठेवलं होतं. मार्टीन क्रो आरामात खेळत असतानाही रुदरफोर्डमुळे न्यूझीलंडच्या रनरेटला खीळ बसली होती. ३३ ओव्हर्ससमध्ये न्यूझीलंडने जेमतेम ११४ / ३ पर्यंत मजल मारली होती!

पाकिस्तानी बॉलर्सच्या अचूक बॉलिंगमुळे वैतागलेल्या रुदरफोर्डने मुश्ताकला मिडऑफवरुन फटकावण्याचा प्रयत्नं केला, प्ण लाँगऑफला अकिब जावेदला त्याचा कॅच घेता आला नाही. पहिल्या ९ रन्स काढण्यासाठी तब्बल ३८ बॉल्स खर्ची घालणार्‍या रुदरफोर्डने आता मात्रं आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. इक्बाल सिकंदर - मुश्ताक यांना त्याने बाऊंड्री तडकावल्यावर मार्टीन क्रोने सिकंदरला मिडविकेटला दणदणीत सिक्स ठोकली. क्रोच्या पावलावर पाऊल टाकत रुदरफोर्डने सिकंदरला त्याच्याच डोक्यावरुन सिक्स तडकावली. इमरानने मुश्ताकच्या जागी अक्रमने बॉलिंगला आणलं पण मार्टीन क्रोने अक्रमचा शॉर्टपीचवर पडलेला बॉल स्क्वेअरलेग प्रेक्षकांमध्ये फटकावला! मार्टीन क्रो - रुदरफोर्ड यांनी १०७ रन्सची पार्टनरशीप केल्यावर अखेर अक्रमला पूल करण्याच्या नादात रुदरफोर्डची टॉप एज लागली आणि विकेटकीपर मोईन खानने त्याचा कॅच घेतला. ६८ बॉल्समध्ये ५ बाऊंड्री आणि १ सिक्ससह रुदरफोर्डने ५० रन्स फटकावल्या. न्यूझीलंड १९४ / ४!

रुदरफोर्डची टॉप एज लागून मोईन खानने त्याचा कॅच घेण्यापूर्वी मार्टीन क्रो आणि रुदरफोर्ड क्रॉस झाले होते...
पण क्रीजमध्ये पोहोचण्यापूर्वीच मार्टीन क्रोच्या मांडीचा स्नायू दुखावला...
न्यूझीलंडचा फिजीओथेरपीस्ट मार्क प्लमरने मार्टीन क्रोवर उपचार केले खरे पण...

आणखीन दोन ओव्हर्सनंतर मार्टीन क्रोला रन्स पळणं जवळपास अशक्यं झालं...
रनरशिवाय खेळणं त्याला जमणार नव्हतं...
मार्टीन क्रोचा रनर म्हणून आला मार्क ग्रेटबॅच!

रुदरफोर्ड परतल्यावर बॅटींगला आलेल्या क्रिस हॅरीसने मार्टीन क्रोसह २० रन्स जोडल्यावर इक्बाल सिकंदरला फटकावण्याच्या नादात मोईन खानने त्याला स्टंप केलं. अक्रमच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या इमरानच्या शॉर्टपीच बॉलवर मार्टीन क्रोने स्क्वेअरलेगला सिक्स तडकावली. तो सेंच्युरी ठोकणार असं वाटत असतानाच...

इमरानचा बॉल मार्टीन क्रोने एक्स्ट्राकव्हरला ड्राईव्ह केला आणि दोन रन्ससाठी कॉल दिला...
इयन स्मिथने एक रन पूर्ण करुन दुसर्‍या रनसाठी धाव घेतली...
एक्स्ट्राकव्हवर बाऊंड्रीवर सलिम मलिकने बॉल पिकअप केला...
स्क्वेअरलेगला पळत असलेल्या मार्क ग्रेटबॅचला मार्टीन क्रोचा कॉल नीट ऐकूच आला नव्हता...
पहिली रन पूर्ण केल्यावर ग्रेटबॅच गोंधळला...
स्मिथची दुसरी रन जवळपास पूर्ण झाल्यावर अखेर ग्रेटबॅच स्वतःला सावरुन रन पूर्ण करण्यासाठी धावला पण...
सलिम मलिकचा थ्रो कलेक्ट करुन मोईन खानने बेल्स उडवल्या!
मार्टीन क्रो रनआऊट झाला!

८३ बॉल्समध्ये ७ बाऊंड्री आणि ३ सिक्स तडकावत मार्टीन क्रोने ९१ रन्स फटकावल्या.
न्यूझीलंड २२१ / ६!

मार्टीन क्रो म्हणतो,
"I had hit it to deep extra-cover. I called because I saw it as an easy two. For some reason Greatbatch got a little bit misaligned. He was running to the far side, where the ball was. As he hesitated Ian Smith had run two. So Greatbach got run out coming back."

मार्टीन क्रो आऊट झाल्यावरही इयन स्मिथची फटकेबाजी सुरुच होती. दीपक पटेलबरोबर त्याने २३ रन्स जोडल्यावर अक्रमच्या यॉर्करवर पटेल एलबीडब्ल्यू झाला. पटेल परतल्यावर आलेल्या गेविन लार्सन आणि स्मिथ दोघांनीही शेवटच्या ओव्हरमध्ये इमरानला बाऊंड्री तडकावल्या!

५० ओव्हर्स संपल्या तेव्हा न्यूझीलंडचा स्कोर होता २६२ / ७!
शेवटच्या १७ ओव्हर्समध्ये न्यूझीलंडने १४८ रन्स झोडपून काढल्या होत्या!

मार्टीन क्रोच्या समोर आता निराळाच प्रश्नं उभा होता...

पायाचा स्नायू दुखावलेला असतानाही फिल्डींगला जावं का ड्रेसिंगरुममध्ये आराम करुन फायनलसाठी स्वतःला तंदुरुस्तं ठेवावं?
२६२ रन्स काढल्यावर न्यूझीलंड मॅच जिंकणार याबद्दल मार्टीन क्रोला जवळपास खात्री झाली होती!

मार्टीन क्रो म्हणतो,
"It was the toughest decision I had ever to make wether to take the field and effectively rule myself out of final or let John Wright take care of it out in the middle and get myself ready for the final. Our physio made it clear that if I go out to field, I will miss the final. Its sort of like captain abandoning the ship!"

अखेर मार्टीन क्रोने ड्रेसिंगरुममध्ये आराम करण्याचा निर्णय घेतला!

फायनल गाठण्यासाठी २६३ रन्सचं टार्गेट असल्याने पाकिस्तानचा संघही काळजीत पडला होता. जावेद मियांदाद म्हणतो,
"Even though Eden Park has a short boundary, 263 from 50 overs is a demanding target under any conditions. We had, in fact, never reached that total batting second in the World Cup competition. It made us very nervous."

मार्टीन क्रोने न्यूझीलंडचा कोच वॉरन लीसबरोबर पाकिस्तानच्या इनिंग्जमध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीने बॉलिंग करावी याचा सुस्पष्टं प्लॅन आखला होता. पाकिस्तानी बॅट्समनना सेटल होण्याची संधी मिळू नये म्हणून दोन किंवा जास्तीत जास्तं तीन ओव्हरच्या स्पेल्समध्ये बॉलर्सना वापरण्याची क्रोचा इरादा होता. त्याच्या योजनेनुसार पाकिस्तानच्या इनिंग्जमध्ये किमान १६ ते १७ बॉलिंग चेंजेस करणं अपेक्षित होतं!

सेमीफायनलपूर्वीच्या मॅचमध्ये डॅनी मॉरीसनने पहिल्याच ओव्हरमध्ये आमिर सोहेल आणि पुढच्याच ओव्हरमध्ये इंझमामला आऊट केलं होतं, पण मार्टीन क्रोच्या ऐवजी कॅप्टनपदाची जबाबदारी सांभाळणार्‍या जॉन राईटने पहिल्याच ओव्हरमध्ये बॉलिंगला आणलं दीपक पटेलला!

मार्टीन क्रो म्हणतो,
"Danny Morrison had knocked over a couple of Pakistan batsmen in the first over three days earlier. And for some reason John Wright started off with Dipak Patel rather than Danny. I felt that was weird. So everything changed - he just interpreted it completely opposite to the way I did. But he just did not know the plan as well as I knew it and I should have been out in the middle,"

रमिझ राजा आणि आमिर सोहेल यांनी सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत न्यूझीलंडच्या बॉलर्सना फटकावून काढण्याचा मार्ग पत्करला. डॅनी मॉरीसनला दोघांनीही बाऊंड्री तडकावल्या. हे दोघं पाकिस्तानला चांगली ओपनिंग पार्टनरशीप करुन देणार असं वाटत असतानाच सातव्या ओव्हरमध्ये दीपक पटेलला स्वीप करण्याचा आमिर सोहेलचा प्रयत्नं पार फसला आणि बॅकवर्ड स्क्वेअरलेगला अँड्र्यू जोन्सने त्याचा कॅच घेतला. पाकिस्तान ३० / १!

आमिर सोहेल आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या इमरानने १-२ रन्स काढत रमिझला साथ देण्याचं धोरण अवलंबलं. परंतु दीपक पटेलच्या अचूक बॉलिंगमुळे इमरानला सहजपणे रन्स काढणं शक्यं होत नव्हतं. दुसर्‍या बाजूने रमिझ राजाची फटकेबाजी मात्रं सुरुच होती. डॅनी मॉरीसनला त्याने मिडविकेटला लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. दोन ओव्हर्सनंतर दीपक पटेललाही रमिझने मिडविकेटला बाऊंड्री तडकावली! इतका वेळ सावधपणे खेळणार्‍या इमरानने पटेलच्या त्याच ओव्हरमध्ये मिडविकेटलाच दणदणीत सिक्स ठोकली! इमरान - रमिझ यांनी ५४ रन्सची पार्टनरशीप केल्यावर विली वॉटसनला फटकावण्याच्या नादात लाँगऑनला डॅनी मॉरीसनने रमिझचा कॅच गेह्तला. ५५ बॉल्समध्ये ६ बाऊंड्रीसह रमिझने ४४ रन्स फटकावल्या. पाकिस्तान ८४ / २!

रमिझ परतल्यावर बॅटींगला आलेल्या जावेद मियांदादने सुरवातीला १-२ रन्स काढत इमरानला सपोर्ट देण्याचा मार्ग पत्करला. अचूक बॉलिंग करणार्‍या गेव्हीन लार्सनच्या बॉलवर इमरानने क्रीजमधून पुढे येत लाँगऑनला दणदणीत सिक्स ठोकली. इमरान - मियांदाद यांनी १२ ओव्हर्समध्ये ५० रन्सची पार्टनरशीप केल्यावर क्रिस हॅरीसला फटकावण्याचा इमरानचा प्रयत्नं फसला आणि स्क्वेअलेग बाऊंड्रीवर लार्सनने त्याचा कॅच घेतला. ९३ बॉल्समध्ये १ बाऊंड्री आणि २ सिक्ससह इमरानने ४४ रन्स काढल्या. इमरान परतला तेव्हा ३४ ओव्हर्समध्ये पाकिस्तानचा स्कोर होता १३४ / ३!

पुढच्याच ओव्हरमध्ये लार्सनला ड्राईव्ह करण्याच्या नादात मार्टीन क्रोच्या ऐवजी फिल्डींगला आलेल्या रॉड लॅथमने सलिम मलिकचा कॅच घेतला. पाकिस्तान १४० / ४!

शेवटच्या १५ ओव्हर्समध्ये पाकिस्तानला १२३ रन्सची आवश्यकता होती!

सलिम मलिक आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत असताना मियांदादने ड्रेसिंगरुमकडे तोंड करुन लेफ्ट हँड बॅट्समनची अ‍ॅक्शन केली! फटकेबाजी करण्याच्या दृष्टीने वासिम अक्रमला बॅटींगला पाठवण्याची ही सूचना होती, पण त्याच्या सूचनेप्रमाणे अक्रमऐवजी बॅटींगला आला इंझमाम-उल-हक!

मियांदाद म्हणतो,
"Inzi walked up to me for advice. He seemed nervous and overawed and looked like he had seen a ghost,"

न्यूझीलंडच्या ड्रेसिंगरुममध्ये मार्टीन क्रो अस्वस्थं झाला होता. तो म्हणतो,
"I was concerned because our tactics had changed. We were bowling guys in long spells until they got hit. And we weren't bowling Andrew Jones, our fifth bowler. Andrew Jones had to bowl. And I did not understand why he wasn't."

इंझमामने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. गेव्हीन लार्सनला स्क्वेअरलेगला बाऊंड्री मारल्यावर क्रिस हॅरीसला त्याने मिडविकेट - स्क्वेअरलेगला दोन बाऊंड्री तडकावल्या!

शेवटच्या १३ ओव्हर्समध्ये पाकिस्तानला अद्यापही १०४ रन्स हव्या होत्या.

ड्रिंक्स ब्रेकमध्ये जॉन राईट बाथरुमला जाण्यासाठी ड्रेसिंगरुममध्ये आला होता. मार्टीन क्रोने त्याला पटेलच्या ओव्हर्स संपवण्याची आणि अँड्र्यू जोन्सला बॉलिंगला आणण्याची सूचना केली.

"I told John he had to had to bowl Jones and Patel out straightaway. Get through four quick overs while Inzamam was settling in."

परंतु राईटने मार्टीन क्रोच्या सल्ल्याकडे दुर्लक्षं केलं!

इंझमामने आता न्यूझीलंडच्या बॉलर्सची पद्धतशीरपणे धुलाई करण्यास सुरवात केली. क्रिस हॅरीसला पूलची बाऊंड्री मारल्यावर पुढच्याच बॉलवर त्याने हॅरीसला लाँगऑफ बाऊंड्रीवर सिक्स ठोकली. इंझमामची फटकेबाजी सुरु असताना मियांदाद चाणाक्षपणे स्ट्राईक रोटेट करत होता. मार्टीन क्रोच्या सूचनेप्रमाणे राईटने पटेलला बॉलिंगला आणलं खरं पण मियांदादने त्याला कट्ची बाऊंड्री मारली. पटेलच्या पुढच्या ओव्हरमध्ये इंझमामने त्याला मिडविकेटला लागोपाठ बाऊंड्री फटकावल्या. राईटने पटेलच्या जागी मॉरीसनला बॉलिंगला आणलं, पण इंझमामला आवरणं मॉरीसनलाही जमलं नाही. मॉरीसनच्या ऑफस्टंपच्या किंचित बाहेर पडलेल्या बॉलवर इंझमामने कव्हरड्राईव्हई बाऊंड्री तडकावली. मॉरीसनचा पुढचा बॉलही जवळपास त्याच स्पॉटवर पडला, पण यावेळी इंझमामने अ‍ॅक्रॉस द लाईन मिडविकेटला बाऊंड्री ठोकली!

मार्टीन क्रो म्हणतो,
"We had always protected the over - in other words, the last two balls of an over we had always put the maximum men on the boundary when we were defending. But for some reason we did not do that when Inzamam was batting. And he got away with some easy, early boundaries. And since the bowling was not changed around, he just got used to certain bowlers and then started to attack them."

मियांदाद - इंझमाम यांनी १० ओव्हर्समध्ये ८७ रन्सची पार्टनरशीप केल्यावर...

गेव्हीन लार्सनचा बॉल मियांदादने ऑफसाईडला खेळला आणि एक रनसाठी कॉल दिला...
इंझमामने मियांदादच्या कॉलला प्रतिसाद दिला पण...
बॅकवर्ड पॉईंटवरुन धावत आलेल्या क्रिस हॅरीसने बॉल पिकअप केला...
हॅरीसच्या थ्रोने स्टंप्सचा अचूक वेध घेतला...
इंझमाम रनआऊट झाला!

३७ बॉल्समध्ये ७ बाऊंड्री आणि हॅरीसला मारलेल्या सिक्ससह इंझमामने ६० रन्स झोडपल्या!
पाकिस्तान २२७ / ५!

शेवटच्या ५ ओव्हर्समध्ये पाकिस्तानला ३६ रन्सची आवश्यकता होती.

इंझमाम परतल्यावर बॅटींगला आलेल्या वासिम अक्रमने मॉरीसनच्या फुलटॉसवर बाऊंड्री तडकावली, पण ४७ व्या ओव्हरमध्ये विली वॉटसनला फटकावण्याच्या नादात अक्रमची दांडी उडाली. पाकिस्तान २३८ / ६!

अक्रम आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या मोईन खानने वॉटसनच्या शेवटच्या बॉलवर बाऊंड्री फटकावली. मियांदाद - मोईन खान यांनी चाणाक्षपणे १-२ रन्स पळून काढण्याचं धोरण अवलंबलं होतं. मॉरीसनच्या ४८ व्या ओव्हरमध्ये केवळ ६ रन्स निघाल्या.

शेवटच्या २ ओव्हर्समध्ये पाकिस्तानला १३ रन्सची आवश्यकता होती.

क्रिस हॅरीसचा पहिल्याच बॉलवर मोईन खानने मिडऑफला एक रन काढली...
पुढच्याच बॉलवर मियांदादने मिडविकेटला फ्लिक करत एक रन काढली...
हॅरीसच्या तिसरा बॉल मोईन खानने चक्कं स्क्वेअरलेगला स्वीप केला, पण त्याला एक रनवरच समाधाना मानावं लागलं...
चौथ्या बॉलवर मियांदादने लॉंगऑफला एक रन काढली...

अद्याप ८ बॉल्समध्ये पाकिस्तानला ९ रन्स हव्या होत्या....

हॅरीसच्या ओव्हरचा पाचवा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
मोईन खानने फ्रंटफूटवर येत तो लाँगऑफ बाऊंड्रीपार तडकावला.... सिक्स!

मियांदादने अत्यानंदाने मोईनला मिठी मारली!

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला बिल लॉरी म्हणाला,
"Big hit! Its gone for six all the way! That’s six over long off!"

लॉरीच्या जोडीला कॉमेंट्रीबॉक्समध्ये होता इयन चॅपल. तो म्हणाला,
"If ever Pakistan needed six runs, this was the moment!"

हॅरीसचा शेवटचा बॉल मोईन खानने स्क्वेअरलेगला पूल केला...
स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर लार्सनने डाईव्ह मारली पण बॉल अडवण्यात त्याला यश आलं नाही...

पाकिस्तानने वर्ल्डकपची फायनल गाठली!
जावेद मियांदाद ६९ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह ५७ रन्स फटकावत नॉटआऊट राहीला!

मार्टीन क्रो म्हणतो,
"Javed did a great job. He kept talking to Inzamam, kept him focused, kept him going and at the same time Javed kept his charge going. He played beautifully alongside Izamam’s blinder."

मॅन ऑफ द मॅच म्हणून अर्थातच इंझमामची निवड झाली!

वासिम अक्रम म्हणतो,
"The night before, Inzy had high fever and had been throwing up all night, So he went to Imran Khan and said, 'I've got fever and I don't think I can play.' Imran said: 'Inzy, don't think about anything else, just think how you are going to play this game.' And Inzy played a superb knock and that particular innings gave him the confidence to eventually become a great player."

शेवटच्या एका तासात मार्टीन क्रो आणि न्यूझीलंडच्या संघाचं महिन्याभराचं कर्तृत्व मातीमोल झालं होतं!

मार्टीन क्रो म्हणतो,
"I had that dilemma of whether to go out on the field and captain the side and probably rule myself out of the final appearance if we made it, or to rest up and think that we had enough and I could kill two birds with one stone by not fielding. In other words, the team would win and I would be fit for the final. With what unfolded, I had made a massive mistake in not taking the field despite a hamstring injury, because I was trying to be fit for the final as opposed to getting the team through to the final."

क्रीडालेख

प्रतिक्रिया

लोनली प्लॅनेट's picture

15 Feb 2017 - 10:39 am | लोनली प्लॅनेट

अतिशय सुंदर लिखाण अगदी सामना पाहत आहे असंच वाटत होतं
गेल्या वल्ड कप मध्ये सुद्धा न्यूझीलंड चं महिन्याभराचं कर्तृत्व फायनल मध्ये मातीमोल ठरलं होतं तेंव्हा फार वाईट वाटलं होतं

गॅरी ट्रुमन's picture

15 Feb 2017 - 10:45 am | गॅरी ट्रुमन

नेहमीप्रमाणे आणखी एक जबरदस्त लेख.

हा सामना शनीवारी होता आणि अर्धा दिवस शाळा झाल्यावर सकाळी मॅच बघायला घेतली तेव्हा पाकिस्तानच्या डावातील तीसेक षटके झाली होती. तोपर्यंत न्यू झीलंडच जिंकेल असे वाटत होते. थोड्या वेळातच इंझमाम आला. त्याने पहिले २-३ बॉल्स खेळून काढले आणि त्यानंतर न्यू झीलंडच्या बॉलिंगवर त्याने ना भूतो ना भविष्यति असा हल्ला सुरू केला. त्यानंतर न्यू झीलंडला जिंकायची थोडीही संधी त्याने शिल्लक ठेवली नाही.

३३ ओव्हर्ससमध्ये न्यूझीलंडने जेमतेम ११४ / ३ पर्यंत मजल मारली होती!

त्या काळचे एकदिवसीय सामन्यांचे गणित वेगळे असायचे असे दिसते. १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये अनेक मॅचमध्ये ३० ओव्हर्स पूर्ण झाल्या तरी शंभरीच्या आसपास रन्स झालेल्या असणे ही बर्‍यापैकी सामान्य गोष्ट होती. भारत विरूध्द पाकिस्तान या ४ मार्चच्या सिडनीमधील लढतीत किरण मोरे उड्या मारतो म्हणून जावेद मियांदाद आणि किरण मोरे यांच्यात थोडी बोलाचाली झाली होती आणि नंतर जावेदने भर स्टेडिअममध्ये किरण मोरेची नक्कल करायला बेडूकउडी मारली होती. या दोघांची बोलाचाली चालू असताना पाकिस्तानच्या डावातील २५ ओव्हर्स पूर्ण झाल्या होत्या आणि रन्स झाल्या होत्या ८५/२. त्याचवेळी स्क्रिनवर खाली भारताची २५ ओव्हर्सनंतर ८६/२ अशी स्थिती होती असे दाखवत होते. त्याकाळी २३०-२४० ही बर्‍यापैकी आव्हानात्मक धावसंख्या असायची. २५० पेक्षा जास्त धावा काढल्या तर विजय पक्काच असे समजले जायचे. १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये बहुतांश सामन्यांमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणार्‍या संघाने २५० पेक्षा कमी रन्स केल्या होत्या.

नंतरच्या काळात हे गणित बदलले. तशी सुरवात मार्क ग्रेटबॅचने केलीच होती. पहिल्या १५ ओव्हर्सपर्यंत ३० यार्डाबाहेर दोनच फिल्डर्स असायचे त्यामुळे सुरवातीलाच बॉलर्सवर तुटून पडायचे आणि रन्स गोळा करायच्या हे धोरण मार्क ग्रेटबॅचने सुरू केले होते (त्यापूर्वी काही प्रमाणात श्रीकांतने हे धोरण अवलंबले होते). पण तरीही सुरवातीला फटकेबाजी केल्यानंतर नंतर वेग मंदावून शेवटी २५० च्या आसपासच धावा केल्या जायच्या. सचिनने वनडे मधील पहिले शतक ठोकले होते ऑस्ट्रेलियाविरूध्द कोलंबोला. ही मॅच होती १९९४ च्या गणपतीच्या पहिल्या दिवशी. त्या सामन्यातही सचिन ऑस्ट्रेलियनांवर अगदी जोरदार तुटून पडला होता आणि १० ओव्हर्समध्ये आपल्या १०० रन्स झाल्या होत्या. पण ५० ओव्हर्स पूर्ण होईपर्यंत धावसंख्या होती २४६!! म्हणजे उरलेल्या ४० ओव्हर्समध्ये साडेतीनच्या रनरेटने रन्स काढल्या गेल्या होत्या.

१९९६ च्या वर्ल्डकपमध्ये जयसूर्याने मात्र हे गणित पूर्णच बदलले.

अभिजीत अवलिया's picture

15 Feb 2017 - 2:45 pm | अभिजीत अवलिया

सहमत.
पहिल्या १५ ओव्हर नंतर ५०/० किंवा ५०/१ म्हणजे अतिशय चांगली सुरवात, २५-३० ओव्हर मध्ये १०० आणी ५० ओव्हर मध्ये २४० म्हणजे भारी वाटायचे. २५० च्या पुढे रन्स झाल्या तर मॅच जिंकलीच अशी परिस्थिती असायची.
त्या वेळची पिचेस देखील जलदगती गोलंदाजांना मदत देणारी होती आणी बहुतेक देशांकडे (भारत सोडून) उत्तम जलदगती गोलंदाजांचा तोफखाना होता.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Feb 2017 - 11:37 am | अत्रुप्त आत्मा

अफाट. लिवलय!

१९९६ च्या वर्ल्डकपमध्ये जयसूर्याने मात्र हे गणित पूर्णच बदलले.

यावरून एक गोष्ट आठवली. कधीकधी असे वाटते की आपणच आपल्यावर बंधने घालून घेत असतो.

एक मैल धावायच्या शर्यतीत हे अंतर ४ मिनिटापेक्षा कमी वेळात पूर्ण करणे शक्य नाही अशी धारणा कित्येक वर्षे होती. किंबहुना त्या वेगाने धावण्यासाठी मानवी शरीर बनलेलेच नाही आणि त्या वेगाने धावल्यास पायाच्या स्नायू आणि हाडांवर परिणाम होईल असेही म्हटले जात होते. एका अर्थी एक मैल धावायला चार मिनिटांचे मानसिक बंधन आपणच आपल्यावर घालून घेतले होते. मे १९५४ मध्ये इंग्लंडच्या रॉजर बॅनिस्टरने हे अंतर ३ मिनिटे ५९ सेकंद आणि काही मिलिसेकंदात पूर्ण केले आणि ते ४ मिनिटांचे बंधन मोडले.हे अंतर ४ पेक्षा कमी मिनिटात पूर्ण करणे शक्य आहे हे समजल्यावर ते मानसिक बंधन दूर झाले. आणि दिड महिन्यातच रॉजर बॅनिस्टरचा विक्रमही एका सेकंदाने मोडला गेला. सध्याचा विक्रम आहे ३ मिनिटे ४३ सेकंद आणि काही मिलिसेकंद. हा विक्रमही कधीतरी मोडला जाईलच.

क्रिकेटमध्येही ५० ओव्हर्समध्ये ३०० धावा करणे खूप कठिण मानले जायचे. वेस्ट इंडिजने १९७८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूध्द ५० ओव्हर्समध्ये ३०० पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. हा विक्रम अनेक वर्षे अबाधित होता. १९८७ मध्ये रिलायन्स कप दरम्यान व्हिव्हिअन रिचर्डसने त्यावेळी लिंबूटिंबू असलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजीची पिसे काढली आणि ५० षटकात ३६० रन्स केल्या. तो विक्रम अबाधित होता १९९६ पर्यंत. १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेने लिंबूटिंबू असलेल्या केनियाविरूध्द ३९८ रन्स कुटल्या तेव्हा वाटले की दुसरा संघ केनियासारखा लिंबूटिंबू होता म्हणून इतक्या रन्स काढता येणे शक्य झाले आणि ४०० रन्स काढता येणे शक्य नाही. मार्च २००६ मध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरूध्द ४०० धावांचे ते मानसिक बंधन ओलांडले. ४०० धावा हे बंधन नाही आणि ते ओलांडता येऊ शकते हे लक्षात आल्यावर दक्षिण आफ्रिकेने त्यानंतर अवघ्या ४ तासात तो विक्रमही मोडला. आतापर्यंत १८ वेळा ५० ओव्हर्समध्ये ४०० पेक्षा जास्त रन्स वनडे मध्ये काढल्या गेल्या आहेत. सध्याचा विक्रम आहे ४४४ धावांचा. आता वाटत आहे की ४५० रन करणे शक्य नाही. पण हा विक्रमही कधीतरी मोडला जाईलच.

ग्लेन टर्नरने वनडे मध्ये १७१ धावा काढून नवा विक्रम नोंदवला १९७५ मध्ये. तो विक्रम ८ वर्षे अबाधित होता आणि कपिल देवने १७५ धावा करून तो विक्रम १९८३ मध्ये मोडला. तेव्हाही वाटले की कपिलसारखे वादळ सारखेसारखे येत नसते आणि विरूध्द संघ झिम्बाब्वेसारखा लिंबूटिंबू होता म्हणून ते शक्य झाले. पण पुढच्याच वर्षी १९८४ मध्ये रिचर्डसने १८९ धावा ठोकल्या आणि हा विक्रमही मोडता येऊ शकतो हे दाखविले. त्यानंतर वनडेमध्ये २०० रन्स कोणी करू शकत नाही असे वाटत असतानाच सचिनने तो विक्रम केलाच. खरा तर पहिले द्विशतक झळकावायचा सईद अन्वरच. पण मे १९९७ मधील चेन्नईमधील सामन्यात सौरभ गांगुलीने त्याचा एक जबरदस्त कॅच पकडला आणि सईद अन्वरला २०० रन्स काढता आल्या नाहीत पण रिचर्ड्सचा विक्रम त्याने मोडलाच. सचिनचाही विक्रम पहिल्यांदा सेहवागने आणि नंतर रोहित शर्माने मोडलाच. सध्या असे वाटत आहे की रोहित शर्माचा २६४ धावांचा विक्रम अबाधित राहिल आणि तो मोडता येणे कठिण. पण हा विक्रम मोडता येणे शक्य नाही हे माहित नसलेला किंवा असे मानसिक बंधन स्वतःवर न घातलेला कोणीतरी "इडिअट" येईलच आणि रोहित शर्माचाही विक्रम मोडेल. सध्या वाटत आहे की वनडेमध्ये ३०० करता येणे शक्य नाही पण कोण जाणे ते ही शक्य होईल.

अनेकदा अशक्यप्राय समजल्या जाणार्‍या गोष्टी कोणीतरी साध्य करतो आणि सगळ्यांना त्याचे आश्चर्य वाटते. ते साध्य होते त्यातील एक महत्वाचे कारण असते की ती गोष्ट अशक्यप्राय आहे हे इतर लोक समजतात हे त्याला माहितच नसते किंवा माहित असले तरी तो स्वतः ती गोष्ट अशक्यप्राय आहे हे बंधन स्वतःवर घालून घेत नसतो. त्यातूनच असे वेगवेगळे विक्रम प्रस्थापित होतात आणि मोडलेही जातात.