वर्ल्डकप कासिक्स - २००७ - इंग्लंड विरुद्ध श्रीलंका

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
2 Mar 2017 - 10:04 am

४ एप्रिल २००७
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडीयम, नॉर्थ साऊंड

अँटीगाच्या नॉर्थ साऊंडमधल्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडीयममध्ये सुपर एटमधली इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातली मॅच रंगणार होती. हे स्टेडीयम २००७ च्या वर्ल्डकपसाठी मुद्दाम बांधण्यात आलेलं होतं आणि त्याला व्हिव्हियन रिचर्ड्सचं नाव देण्यात आलं होतं. सुपर एटमधल्या ६ मॅचेस या मैदानात खेळवण्यात येणार होत्या. श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातली मॅच ही या मैदानात खेळवण्यात येत असलेली पाचवी मॅच होती.

महेला जयवर्धनेच्या श्रीलंकन संघात सनथ जयसूर्या, उपुल तरंगा, कुमार संगकारा, स्वतः जयवर्धने, चामरा सिल्वा, तिलकरत्ने दिलशान, रसेल आर्नॉल्ड असे बॅट्समन होते. श्रीलंकेच्या बॉलिंगचा भार मुख्यतः अनुभवी चामिंडा वास आणि मुथय्या मुरलीधरन यांच्यावर होता. त्यांच्या जोडीला होते दिलहरा फर्नांडो आणि लसिथ मलिंगा! प्रॉव्हीडन्सला झालेल्या सुपर एटच्या दुसर्‍या मॅचमध्ये मलिंगाने दक्षिण आफ्रीकेविरुद्ध ४ बॉल्समध्ये ४ विकेट्स घेतल्या होत्या! कुमार संगकाराने विकेटकिपींगची जबाबदारी घेतली असल्याने आणि जयसूर्या, दिलशान आणि आर्नॉल्ड हे बॉलिंग करु शकत असल्याने श्रीलंकेचा संघ अगदी समतोल होता.

मायकेल वॉनच्या इंग्लिश संघात स्वतः वॉन, एड जॉईस, इयन बेल, केव्हीन पीटरसन असे बॅट्समन होते. इंग्लंडच्या बॉलिंगचा भार मुख्यत्वे जेम्स अँडरसन आणि साजिद मेहमूद यांच्यावर होता. त्यांच्या जोडीला मधुसूदनसिंग 'मॉन्टी' पानेसर होता. विकेटकीपर पॉल निक्सनचाही इंग्लंडच्या संघात समावेश होता. पण इंग्लंडची खरी ताकद होती ते म्हणजे इंग्लिश संघात असलेले ऑलराऊंडर्स! अँड्र्यू फ्लिंटॉफ, पॉल कॉलिंगवूड, रवी बोपारा असे ३ ऑलराऊंडर्स इंग्लंडच्या संघात असल्याने इंग्लिश संघही श्रीलंकेच्या तोडीस तोड होता.

मायकेल वॉनने टॉस जिंकल्यावर फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. जेम्स अँडरसनच्या अचूक बॉलिंगमुळे उपुल तरंगाला रन्स काढणं कठीण जात होतं पण सनथ जयसूर्याने मात्रं सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत इंग्लिश बॉलर्सना फटकावण्याचा पवित्रा घेतला होता. दुसर्‍या ओव्हरमध्ये साजिद मेहमूदला लेग ग्लान्सची बाऊंड्री मारल्यावर मेहमूदच्या पुढच्या ओव्हरमध्ये जयसूर्याने त्याला बॅकवर्ड पॉईंटमधून कट्ची बाऊंड्री तडकावली. अचूक बॉलिंग टाकणार्‍या अँडरसनला त्याने एकाच ओव्हरमध्ये दोनवेळा पूल आणि हूकच्या बाऊंड्री फटकावल्या. मेहमूदच्या पुढच्या ओव्हरमध्ये जयसूर्याचा पूल मारण्याचा प्रयत्नं पार फसला आणि त्याची टॉप एज लागली, पण मेहमूदच्या वेगामुळे जयसूर्याला थर्डमॅनला सिक्स मिळाली! पण त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मेहमूदचा बॉल डिफेंड करण्याच्या प्रयत्नात जयसूर्याच्या बॅटची इनसाईड एज लागली आणि त्याचा लेगस्टंप उडाला. श्रीलंका ३७ / १!

जयसूर्या आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या कुमार संगकाराने कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढण्याचा मार्ग पत्करला. अँडरसन आणि मेहमूदच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या फ्लिंटॉफने तरंगाला जखडून ठेवलं होतं, पण संगकाराने मात्रं फ्लिंटॉफच्या २ ओव्हर्समध्ये कव्हरड्राईव्हच्या २ बाऊंड्री तडकावल्या. तरंगा - संगकारा यांनी १० ओव्हर्समध्ये ३२ रन्सची पार्टनरशीप केल्यावर...

साजिद मेहमूदचा बॉल ऑफस्टंपच्या बराच बाहेर असलेला फुलटॉस होता...
संगकाराला तो कुठेही फटकावणं शक्यं होतं पण...
संगकाराने स्क्वेअर ड्राईव्ह केला तो बॅकवर्ड पॉईंटला पॉल कॉलिंगवूडच्या हातात!
श्रीलंका ६९ / २!

संगकारा परतल्यावर आलेल्या महेला जयवर्धनेने आपल्या नेहमीच्या शैलीत बॉलिंग खेळून काढत १-२ रन्स काढण्याची भूमिका घेतली. मेहमूद आणि फ्लिंटॉफच्या ओव्हर्समध्ये कोणतीही रिस्क न घेता रन्स काढल्यावर मेहमूदच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या पॉल कॉलिंगवूडच्या २ ओव्हर्समध्ये जयवर्धनेने २ बाऊंड्री फटकावल्या, पण तरंगाला मात्रं रन्स काढण्यासाठी झगडावं लागत होतं. माँटी पानेसरच्या जोडीला स्वतः मायकेल वॉनच्या पार्टटाईम ऑफस्पिनलाही फटकावणं त्याला मुश्किल जात होतं. जयवर्धनेने पानेसरला स्वीपची बाऊंड्री मारल्यावर वॉनने त्याच्याऐवजी फ्लिंटॉफला बॉलिंगला आणलं. तरंगाने त्याला कव्हरड्राईव्हची बाऊंड्री मारली खरी, पण जेमतेम दोन बॉल्सनंतर फ्लिंटॉफला पूल मारण्याचा तरंगाचा प्रयत्नं साफ फसला आणि त्याची टॉप एज लागली आणि स्क्वेअरलेगला केविन पीटरसने आरामात त्याचा कॅच घेतला. १०३ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह तरंगाने ६२ रन्स काढल्या. श्रीलंका १६० / ३!

तरंगा आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या चामरा सिल्वाने जयवर्धनेला सपोर्ट देण्याचा मार्ग पत्करला. जयवर्धने - सिल्वा यांनी १५ रन्सची भर घातल्यावर कॉलिंगवूडला पूल करण्याच्या प्रयत्नात मिडविकेट बाऊंड्रीवर एड जॉईसने जयवर्धनेचा कॅच घेतला. ६१ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह जयवर्धनेने ५६ रन्स फटकावल्या. श्रीलंका १७५ / ४!

जयवर्धने परतल्यावर सिल्वाने आक्रमक पवित्रा घेत पानेसर आणि मेहमूदला बाऊंड्री तडकावल्या. पण ४३ व्या ओव्हरमध्ये....

अँडरसनचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
सिल्वाने फ्रंटफूटवर येत कव्हरड्राईव्ह तडकावला आणि एक रनसाठी कॉल दिला...
तिलकरत्ने दिलशानने सिल्वाच्या कॉलला प्रतिसाद दिला पण...
कव्हर्समध्ये इयन बेलने डाईव्ह मारत बॉल अडवला...
सिल्वा जागीच थबकला आणि त्याने दिलशानला परत पाठवलं...
दिलशान जेमतेम मागे वळला तोच...
बेलने बॉल पिकअप केला आणि समोर दिसत असलेल्या एकमेव स्टंपचा अचूक वेध घेतला!
श्रीलंका १९३ / ५!

दिलशान आऊट झाल्यावर आलेल्या रसेल आर्नॉल्डने सिल्वाबरोबर २२ रन्स जोडल्यावर फ्लिंटॉफच्या अचूक यॉर्करने सिल्वाचा मिडलस्टंप उडवला. फ्लिंटॉफच्या त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बॅकवर्ड पॉईंटला कॉलिंगवूडने चामिंडा वासचा कॅच घेतला. ४८ व्या ओव्हरमध्ये कॉलिंगवूडच्या अचूक बॉलिंगमुळे आर्नॉल्ड आणि मलिंगा यांना जेमतेम २ रन्स काढता आल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये...

साजिद मेहमूदचा पहिलाच बॉल बंपर होता...
पूल करण्याच्या प्रयत्नात मलिंगाची टॉप एज लागली...
विकेटकीपर पॉल निक्सनने फाईनलेगला ३० यार्ड सर्कलपर्यंत धावत जात कॅच घेतला...
आणखीन दोन बॉल्सनंतर आर्नॉल्डने मेहमूदचा फुलटॉस मिडविकेटला जॉईसच्या हातात मारला...
शेवटच्या बॉल दिलहरा फर्नांडोने कव्हर्समधून तडकावला आणि १ रन पूर्ण केली...
दुसरी रन घेण्याचा फर्नांडो आणि मुरलीधरनने प्रयत्नं केला पण...
पण केविन पीटरसनचा थ्रो कलेक्ट करुन निक्सनने बेल्स उड्वल्या तेव्हा फर्नांडो अर्ध्या पीचपर्यंतही पोहोचला नव्हता...

५० ओव्हर्समध्ये श्रीलंका २३५ मध्ये ऑलआऊट झाले होते!

वर्ल्डकपमध्ये अजिबात फॉर्मात नसलेल्या इंग्लंडच्या संघाला हे आव्हान कितपत झेपणार होतं?

चामिंडा वास आणि लसिथ मलिंगाच्या अचूक बॉलिंगमुळे इंग्लंडला पहिल्या २ ओव्हर्समध्ये जेमतेम १ रन काढता आली. मलिंगाच्या मेडन ओव्हरमध्ये एड जॉईससी एज लागली, पण स्लिपमध्ये असलेल्या आर्नॉल्डने बॉल हाफव्हॉलीवर उचलला. पण पुढच्याच ओव्हरमध्ये....

वासचा बॉल लेगस्टंपच्या बाहेर पडला...
मायकेल वॉनने फाईनलेगच्या दिशेने ग्लान्स मारण्याचा प्रयत्नं केला...
वॉनच्या अपेक्षेपेक्षा किंचित वेगाने आलेल्या बॉलवर त्याची फक्तं एज लागली...
संगकाराने कॅच घेण्यात कोणतीही चूक केली नाही...
इंग्लंड १ / १!

वासच्या पुढच्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलला एड जॉईसच्या बॅटची एज लागली पण त्याच्या सुदैवाने दुसर्‍या स्लिपमध्ये असलेल्या महेला जयवर्धनेला हा कॅच घेता आला नाही आणि जॉईसला थर्डमॅनला बाऊंड्री मिळाली. पण पुढच्याच ओव्हरमध्ये मलिंगाच्या बॉलवर जॉईस एलबीडब्ल्यू झाला. इंग्लंड ११ / २!

जॉईस आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या केव्हीन पीटरसनने नेहमीच्या आक्रमक शैलीत श्रीलंकन बॉलर्सना फटकावण्याचा पवित्रा घेतला. मलिंगाच्या बंपरवर मिडविकेटला पूलची बाऊंड्री फटकावल्यावर त्याच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या दिलहरा फर्नांडोला त्याने कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली. वासच्या पुढच्या ओव्हरमध्ये इयन बेलने स्क्वेअरड्राईव्हची बाऊंड्री मारल्यावर पीटरसनने वासला त्याच्या डोक्यावरुन साईटस्क्रीनवर दणदणीत सिक्स ठोकली! वासच्या पुढच्या ओव्हरमध्ये त्याने पुन्हा मिडविकेटला बाऊंड्री फटकावल्यावर बेलनेही आक्रमक पवित्रा घेत दोन बाऊंड्री तडकावल्या. १५ ओव्हर्सनंतर इंग्लंडचा स्कोर होता ६९ / २!

जयवर्धनेने वास आणि फर्नांडोच्या ऐवजी सनथ जयसूर्या आणि तिलकरत्ने दिलशान यांना बॉलिंगला आणल्यावर पीटरसन - बेल यांनी आक्रमक पवित्रा बदलून १-२ रन्स काढण्याचा मार्ग पत्करला. स्लो विकेटवर स्पिनर्सना मदत मिळत असल्याने आक्रमक फटकेबाजी करणं दोघांनाही जड जात होतं. जयसूर्या - दिलशान यांच्या ९ ओव्हर्समध्ये २९ रन्स निघाल्यावर अखेर २५ व्या ओव्हरमध्ये जयवर्धनेने मुथय्या मुरलीधरनला बॉलिंगला आणलं. मुरलीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये पीटरसन बोल्ड होण्यापासून थोडक्यात बचावला. पीटरसन - बेल यांनी ९० रन्सची पार्टनरशीप केल्यावर पुढच्याच ओव्हरमध्ये...

जयसूर्याचा लेगस्टंपवर पडलेला बॉल पीटरसनने स्ट्रेट ड्राईव्ह केला...
जयसूर्याने फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्नं केला पण त्याला यश आलं नाही...
बॉल त्याच्या हाताला लागून नॉनस्ट्रायकर एन्डला स्टंप्सवर गेला...
श्रीलंकन खेळाडूंनी अर्थातच रनआऊटसाठी अपिल केलं...
थर्ड अंपायर रुडी कुर्ट्झनने वेगवेगळ्या अँगलमधून अनेक रिप्ले पाहिल्यावर अखेर आपला निर्णय दिला...

७१ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह ४७ रन्स काढल्यावर इयन बेल रनआऊट झाला.
इंग्लंड १०१ / ३!

बेल आउट झाल्यावर बॅटींगला आलेल्या पॉल कॉलिंगवूडने सावधपणे श्रीलंकन स्पिनर्सना खेळून काढण्यास सुरवात केली. मुरलीधरनने पीटरसनला टाकलेल्या मेडन ओव्हरनंतर पुढच्या २ ओव्हर्समध्येही जेमतेम ७ रन्स निघाल्यावर अखेर पीटरसन - कॉलिंगवूड यांनी बॅटींग पॉवरप्ले घेतला. जयसूर्याच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या मलिंगाला कॉलिंगवूडने स्क्वेअरलेग आणि कव्हर्समधून बाऊंड्री फटकावल्या. मुरलीधरनच्या पुढच्या ओव्हरमध्ये पीटरसनने स्वीपची बाऊंड्री तडकावली पण आणखीन एक बॉलनंतर...

मुरलीधरनचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
पीटरसनने तो मिडविकेटमधून फ्लिक करण्याचा प्रयत्न केला पण...
पीटरसनची लिडींग एज लागली...
फॉलो थ्रूमध्ये मुरलीधरनने आरामात कॅच घेतला!

८० बॉल्समध्ये ५ बाऊंड्री आणि वासला ठोकलेल्या सिक्ससह पीटरसनने ५८ रन्स फटकावल्या.
इंग्लंड १२६ / ४!

मुरलीधरनच्या पुढच्या ओव्हरमध्ये कॉलिंगवूडने क्रीजमधून पुढे सरसावत मिडऑफला बाऊंड्री तडकावली, पण पुढच्याच ओव्हरमध्ये...

दिलहरा फर्नांडोचा पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
अँड्र्यू फ्लिंटॉफने मिडऑफवरुन फटकावण्याचा प्रयत्नं केला पण...
फर्नांडोच्या अलो बॉलचा त्याला अजिबात अंदाज आला नाही...
३० यार्ड सर्कलमध्ये असलेल्या मलिंगान आरामात कॅच घेतला!

आणखीन एक बॉलनंतर...
फर्नांडोचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
कॉलिंगवूडने तो डिफेंड करण्याचा प्रयत्नं केला पण...
बॉल मिडलस्टंप समोर त्याच्या पॅडवर आदळला...
अंपायर असद रौफचं बोट वर गेल!

इंग्लंड १३३ / ६!

शेवटच्या १६ ओव्हर्समध्ये इंग्लंडला १०२ रन्सची आवश्यकता होती!

रवी बोपारा आणि विकेटकीपर पॉल निक्सन यांनी सावध पवित्रा घेत श्रीलंकन बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. या दोघांनी कोणतीही रिस्क न घेता ९ ओव्हर्समध्ये ३६ रन्सची पार्टनरशीप केल्यावर मलिंगाच्या बॉलवर बोपाराने लेग ग्लान्सची बाऊंड्री मारली. मुरलीधरनच्या पुढच्य ओव्हरमध्ये त्याने मिडविकेटला बाऊंड्री फटकावल्यावर मलिंगाच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या फर्नांडोला निक्सनने स्क्वेअरलेगला बाऊंड्री तडकावली.

३ ओव्हर्समध्ये इंग्लंडला अद्याप ३२ रन्स बाकी होत्या!

मुरलीधरनच्या पहिल्या ३ बॉल्सवर बोपारा - निक्सन यांनी ३ रन्स काढल्या...
चौथा बॉल लेगस्टंपवर पडला...
निक्सनने क्षणार्धात बॅटवरची ग्रीप बदलली आणि रिव्हर्स स्वीप मारला...
बॉल कव्हर्स बाऊंड्रीपार गेला... सिक्स!

आणखीन एक बॉलनंतर...
मुरलीच्या बॉलवर निक्सनने पुन्हा रिव्हर्स स्वीप मारला...
यावेळी बॉल थर्डमॅनला गेला... बाऊंड्री!

२ ओव्हर्समध्ये इंग्लंडला १९ रन्स बाकी होत्या.

४९ व्या ओव्हरमध्ये मलिंगाच्या पहिल्या ४ बॉल्समध्ये केवळ ३ रन्स निघाल्या...
मलिंगाचा पाचवा बॉल ऑफस्टंपवर पडला...
निक्सनने तो एक्स्ट्राकव्हरवरुन फटकावण्याचा प्रयत्नं केला पण...
मलिंगाच्या स्लो बॉलचा त्याला अजिबात अंदाज आला नाही...
मिडऑफला जयवर्धनेने त्याचा कॅच घेतला.
इंग्लंड २२० / ७!

४४ बॉल्समध्ये २ बाऊंड्री आणि मुरलीला मारलेल्या सिक्ससह निक्सनने ४२ रन्स फटकावल्या.
बोपाराबरोबर ८७ रन्सची पार्टनरशीप करुन त्याने त्याने इंग्लंडला विजयाच्या मार्गावर आणून सोडलं होतं.

निक्सन परतल्यावर साजिद मेहमूद बॅटींगला आला पण जयवर्धनेने कॅच घेण्यापूर्वी चाणाक्ष बोपाराने क्रॉस होण्याची खबरदारी घेतली होती.
मलिंगाच्या शेवटच्या बॉलवर बोपाराने शांत डोक्याने कव्हर ड्राईव्हची बाऊंड्री मारली!

शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडला १२ रन्सची आवश्यकता होती!

जयवर्धनेच्या समोर शेवटची ओव्हर कोणाला द्यावी हा प्रश्नं उभा होता. वासच्या ८ ओव्हर्समध्ये ४५ रन्स फटकावल्या गेल्या होत्या. जयसूर्या आणि दिलशानसारख्या स्पिनर्सना बॉलिंगला आणणं हे तुलनेने रिस्की होतं, त्यामुळे शेवटच्या ओव्हरसाठी त्याने बॉलिंगला आणलं दिलहरा फर्नांडोला!

फर्नांडोच्या पहिल्या बॉलवर मेहमूदने १ रन काढली.

५ बॉल्स - ११ रन्स!

फर्नांडोचा दुसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
बोपाराने ऑफस्टंपच्या किंचित बाहेर सरकत बॉल लेगसाईडला स्कूप केला...
फाईनलेगला ३० यार्ड सर्कलमध्ये असलेल्या मलिंगाला कोणतीही संधी मिळाली नाही...
बॉल फाईनलेग बाऊंड्रीपार गेला...

४ बॉल्स - ७ रन्स!

फर्नांडोचा ऑफस्टंपवर पडलेला बॉल बोपाराने कव्हर्समधून फटकावला...
बाऊंड्रीवर असलेल्या चामरा सिल्वाने डाईव्ह मारुन बाऊंड्री अडवली...
बोपारा आणि मेहमूदने २ रन्स काढल्या...

३ बॉल्स - ५ रन्स!

फर्नांडोच्या पुढच्या बॉलवर बोपाराने पुन्हा कव्हरड्राईव्ह मारला...
बोपारा - मेहमूद यांनी १ रन पूर्ण केली पण...
सिल्वाच्या अचूक थ्रोमुळे यावेळी दुसरी रन काढण्याचा कोणताही चान्स नव्हता...

२ बॉल्स - ४ रन्स!

फर्नांडोचा पुढचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
मेहमूदने ड्राईव्ह मारण्याचा केलेला प्रयत्नं साफ फसला...
बॉल त्याच्या बॅटच्या इनसाईड एजला लागून पॅडवर आदळला आणि क्रीजसमोर पडला...
लेगबाय काढण्यासाठी बोपारा आणि त्याला रनआऊट करण्यासाठी फर्नांडो यांच्यात रेस लागली...
अगदी अखेरच्या क्षणी बोपारा क्रीजमध्ये पोहोचला!

शेवटच्या बॉलवर इंग्लंडला ३ रन्स हव्या होत्या!

फर्नांडो बॉल टाकण्यासाठी क्रीजमध्ये आला पण...
शेवटच्या क्षणी कमालीचा नर्व्हस झाल्याने त्याने बॉल टाकलाच नाही!
अखेर पुन्हा एकदा त्याने रनअप घेतला...
ऑफस्टंपच्या किंचित बाहेर पडलेला बॉल बोपाराने पॉईंटला फटकावण्याचा प्रयत्नं केला पण...
बॅट आणि बॉलची गाठ पडलीच नाही...
बॉल ऑफस्टंपला लागला आणि थर्डमॅन बाऊंड्रीच्या दिशेने गेला...

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला रणजित फर्नांडो उद्गारला,
"Thats an outside edge and it goes for four! England win… oh wait…he’s bowled him! Sri Lanka have won!"

ऑफस्टंपवरची बेल उडाली होती!
श्रीलंकेने अवघ्या २ रन्सनी मॅच जिंकली!

मायकेल वॉन म्हणाला,
"We were good in the field but our batting let us down a bit. KP was our star player playing nicely, and their star bowler got him out. It was a bitter blow, and at 130 for 6, I was thinking it was all over, but the partnership that Ravi and Nixon produced was spectacular. I just wish we'd got over the line."

महेला जयवर्धने म्हणाला,
"I don't want to play this kind of cricket. There was no strategy, I can't even remember what I was thinking. The guys have a lot of character in the team and they showed it today again. It's an important tournament and finishes like this are good for cricket. We had them at 133 for 6 and thought we were just one ball away from exposing the tail. But Paul Nixon and Ravi Bopara batted really well and took it to the last few overs."

मॅन ऑफ द मॅच म्हणून रवी बोपाराची निवड झाली, पण इंग्लंडला मॅच जिंकून देण्यात आलेलं अपयश त्याला सलत होतं.

बोपारा म्हणतो,
"I just played the way I play normally. Simple cricket with minimum fuss. It hurts that this one got away at the last moment. I am gutted!"

क्रीडालेख