वर्ल्डकप क्लासिक्स - २००३ - भारत विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
26 Feb 2017 - 9:27 am

१ मार्च २००३
सुपर स्पोर्ट्स पार्क्स, सेंचुरीयन

ग्वाटेंग प्रांतातल्या सेंचुरीयनच्या सुपर स्पोर्ट्स पार्क मैदानात भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधली पूल ए मधली मॅच रंगणार होती. २००३ च्या वर्ल्डकपमधली मॅच ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातली वर्ल्डकपमधली चौथी मॅच. १९९२, १९९६ आणि १९९९ मधल्या तीन्ही मॅचेसमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता त्यामुळे त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान निकराने प्रयत्नं करणार हे उघड होतं. पाकिस्तानच्या दृष्टीने ही मॅच आणखीन एका कारणाने महत्वाची होती ती म्हणजे या मॅचमध्ये विजय मिळवल्यास पाकिस्तानला सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळवणं सुकर होणार होतं. भारताचा सुपर सिक्समधला प्रवेश जवळपास नक्की झाला होता. ही मॅच जिंकल्यास सुपर सिक्समधलं भारताचं स्थान पक्कं झालं असतं.

सुपर स्पोर्ट्स पार्कच्या मैदानात हजर असलेल्या नाना पाटेकरसह २२,००० हजार प्रेक्षक, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील करोडो लोकं आणि जगाच्या ज्या कुठल्या भागात क्रिकेट खेळलं जातं तिथला प्रत्येक क्रिकेटरसिक या मॅचकडे डोळे लावून बसला होता! वर्ल्डकप संयोजकांच्या दृष्टीने वर्ल्डकपमधल्या अगदी फायनलपेक्षाही या मॅचचं महत्वं अनन्यसाधारण असंच होतं!

सौरव गांगुलीच्या भारतीय संघात स्वतः गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, महंमद कैफ, दिनेश मोंगिया असे बॅट्समन होते. सेंच्युरीयनच्या फास्ट बॉलिंगला मदत करणार्‍या विकेटवर भारतीय बॉलिंगची जबाबदारी मुख्यतः जवगल श्रीनाथ, आशिश नेहरा, झहीर खान आणि अनिल कुंबळे यांच्यावर होती. पाचव्या बॉलरसाठी कॅप्टन गांगुली, सेहवाग, सचिन असे अनेक पर्याय भारताकडे होते. राहुल द्रविडने विकेटकिपींगची जबाबदारी घेतली असल्याने भारताला एक बॅट्समन किंवा एक बॉलर जास्तं खेळवणं सहज शक्यं झालं होतं.

वकार युनुसच्या पाकिस्तान संघात सईद अन्वर, इंझमाम उल हक, युसुफ योहाना, युनुस खान, तौफीक उमर असे बॅट्समन होते. पाकिस्तानची बॉलिंग तर कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाच्या उरात धडकी भरावी अशी होती. स्वतः कॅप्टन वकार युनुस, वासिम अक्रम आणि शोएब अख्तर हे तिघं निव्वळ खतरनाक होते. त्यांच्या जोडीला अब्दुल रझाक आणि शाहीद आफ्रीदीसारखे ऑलराऊंडर्स आणि रशिद लतिफसारखा आक्रमक विकेटकीपर - बॅट्समन पाकिस्तानच्या संघात असल्याने पाकिस्तानचा संघ अत्यंत धोकादायक होता.

या मॅचपूर्वी वासिम अक्रमच्या वन डे मध्ये ५०० विकेट्स पूर्ण झाल्या होत्या. अक्रम मैदानात येताना कोणीतरी त्याला हजार विकेट्ससाठी प्रयत्नं करण्याची सूचना दिल्यावर अक्रम चेष्टेच्या सुरात म्हणाला,

"As it is I need a stretcher and an ambulance to come to the ground."

मॅच सुरु होण्यापूर्वी मॅच रेफ्री माईक प्रॉक्टर दोन्ही संघातील खेळाडूंची गाठ घेऊन म्हणाला,
"This match, is a huge opportunity to perform and also a great responsibility towards cricket and your country."

वकार युनुसने टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय घेतल्यावर मैदानावर हजर असलेल्या पाकिस्तानी सपोर्टर्सनी एकच जल्लोष केला!

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचचं झहीर खानलाही बहुधा जबरदस्तं टेन्शन आलं असावं...
त्याची पहिलीच ओव्हर तब्बल १० बॉल्सची होती!
त्यात २ नोबॉल आणि २ वाईड होते!
पहिल्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला मिळालेल्या ७ रन्स या एक्स्ट्राच्या होत्या!

अन्वर आणि तौफिक उमर यांनी सुरवातीच्या काही ओव्हर्समध्ये भारतीय बॉलर्सना सावधपणे खेळून काढल्यावर आक्रमक फटकेबाजीला सुरवात केली. पाचव्या ओव्हरमध्ये उमरने झहीर खानला कव्हर्समधून बाऊंड्री फटकावली. झहीर खानच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या आशिश नेहराच्या पहिल्या दोन ओव्हर्समध्ये अन्वर - उमर यांनी २-२ बाऊंड्री तडकावल्या. हे दोघं भारतीय बॉलर्सची धुलाई करणार असं वाटत असतानाच नेहराच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या झहीरच्या इनकटरचा तौफीक उमरला अजिबात अंदाज आला नाही आणि त्याची दांडी उडाली. ११ ओव्हर्समध्ये पाकिस्तान ५८ / १!

उमर आऊट झाल्यावर अनपेक्षितपणे तिसर्‍या क्रमांकावर बॅटींगला आला अब्दुल रझाक! सुरवातीला रझाकने सावधपणे अन्वरला सपोर्ट देण्याचा मार्ग पत्करला. भारतीय बॉलिंग म्हणजे अन्वरचं (आणि एकूणच लेफ्ट हँड बॅट्समनचं - आठवा जयसूर्या, चँडरपॉल, जेसी रायडर) चरण्याचं राखीव कुरण! नेहमीच्याच सहजतेने अन्वरने झहीर आणि श्रीनाथला बॅकवर्ड पॉईंट ते मिडऑफच्या दरम्यान बाऊंड्री मारल्या. अन्वरच्या पावलावर पाऊल टाकत रझाकनेही श्रीनाथ आणि झहीरच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या नेहराला बाऊंड्री फटकावण्यात अनमान केला नाही. श्रीनाथच्या जागी बॉलिंगला आलेल्या अनिल कुंबळेने मात्रं आपल्या अचूक बॉलिंगने अन्वर - रझाक यांना फटकेबाजीची कोणतीही संधी दिली नाही. या दोघांनी ३२ रन्सची पार्टनरशीप केल्यावर अखेर नेहराचा बॉल थर्डमॅनला खेळण्याच्या प्रयत्नात रझाकची एज लागली आणि राहुल द्रविडने डाईव्ह मारत त्याचा अप्रतिम कॅच घेतला. रझाक आऊट झाला तेव्हा २१ ओव्हर्समध्ये पाकिस्तानचा स्कोर होता ९० / २!

रझाक परतल्यावर बॅटींगला आलेल्या इंझमामने पहिल्याच बॉलवर कुंबळेला त्याच्या डोक्यावरुन बाऊंड्री तडकावली! इंझमामच्या आक्रमक पवित्र्याने पाकिस्तानी सपोर्टर्सचा आवाज टीपेला गेला होता. भारतीय बॉलर्सना धारेवर धरत इंझमाम फटकेबाजी करणार असं वाटत होतं, पण...

इंझमाम आणि रनआऊट यांचं खास नातं आहे...
अगदी तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना..
हे दोघंही एकमेकाला खेळवत असतात...
कधी इंझमाम हार मानतो आणि रनआऊट होतो...
पण कधीकधी इंझमाम जिंकतो आणि त्याचा पार्टनर रनआऊट होतो...

या लव्ह-हेट रिलेशनशीपमुळे इंझमाम बॅटींग करत असला की त्याचा पार्टनरच काय पण कॉमेंटेटर्स आणि प्रेक्षकांमधले पाकिस्तानी सपोर्टर्सही जीव मुठीत धरुन असतात...
फिल्डींग करणारे प्रतिस्पर्धी खेळाडू मात्रं कमालीचे सतर्क असतात...

कुंबळेचा बॉल सईद अन्वरने स्क्वेअरलेगला फ्लिक केला...
इंझमामने एक रनसाठी कॉल दिला आणि तो धावत सुटला...
अन्वर क्रीजमधून जेमतेम एक पाऊल पुढे आला असेल...
स्क्वेअरलेगला सेहवागने बॉल पिकअप केला...
एव्हाना अर्ध्या पीचपर्यंत पोहोचलेला इंझमाम अन्वरने परत पाठवल्यावर मागे वळला...
सेहवागचा थ्रो कलेक्ट करुन कुंबळेने बेल्स उडवल्या तेव्हा तो क्रीजपासून किमान दोन फूट बाहेर होता...
अंपायर रुडी कुर्ट्झनला थर्ड अंपायरचीही मदत घ्यावी लागली नाही!

आणि यावेळी नेमकं कॉमेंट्रीबॉक्समध्ये कोण असावं तर रनआऊट होण्याबाबत इंझमाम ज्याचा वारसा पुढे चालवत होता तो संजय मांजरेकर!
"… And yet again we see Inzamam-Ul-Haq being runout!" मांजरेकर म्हणाला.

पाकिस्तान ९८ / ३!

इंझमाम आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या युसुफ योहानाने फटकेबाजीच्या मोहात न पडता १-२ रन्स काढत अन्वरला सपोर्ट देण्याची भूमिका घेतली. अन्वर कोणतीही रिस्क न घेता आरामात फटकेबाजी करत होता. नेहराला त्याने मिडविकेटला बाऊंड्री तडकावल्यावर त्याच्याऐवजी सौरव गांगुली स्वतः बॉलिंगला आला, पण अन्वरला काहीच फरक पडला नाही. गांगुलीला कव्हरड्राईव्हची बाऊंड्री फटकावल्यावर त्याने गांगुलीच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या झहीर खानला लेट कट्ची बाऊंड्री मारली! अन्वरची अशी फटकेबाजी सुरु असताना योहाना चाणाक्षपणे स्ट्राईक रोटेट करत होता. अन्वर - योहाना यांनी १४ ओव्हर्समध्ये ७२ रन्सची पार्टनरशीप केल्यावर श्रीनाथला फटकावण्याच्या नादात स्क्वेअरलेग बाऊंड्रीवरुन धावत आलेल्या झहीर खानने डाईव्ह मारत योहानाचा कॅच घेतला. ४२ बॉल्समध्ये योहानाने २५ रन्स केल्या. तो आऊट झाला तेव्हा ३६ ओव्हर्समध्ये पाकिस्तानचा स्कोर होता १७१ / ४!

योहाना परतल्यावर बॅटींगला आलेल्या युनुस खाननेही योहानाप्रमाणेच १-२ रन्स काढत अन्वरला सपोर्ट देण्याचा मार्ग पत्करला. अन्वर - युनुस यांनी श्रीनाथ - कुंबळे - सेहवाग यांच्या ४ ओव्हर्समध्ये एकही बाऊंड्री न मारता आरामात २४ रन्स काढल्या. सेहवागचा बॉल लाँगऑफला ड्राईव्ह करुन १ रन काढत अन्वरने भारताविरुद्धची चौथी सेंचुरी पूर्ण केली आणि वन डे मध्ये भारताविरुद्ध २००० रन्सचा टप्पाही गाठला!

४१ व्या ओव्हरमध्ये गांगुलीने नेहराला बॉलिंगला आणलं...
नेहराचा पहिलाच बॉल अचूक यॉर्कर पडला...
अन्वरला त्याचा अंदाजच आला नाही...
त्याच्या पॅडला लागून बॉल ऑफस्टंपवर गेला...

१२६ बॉल्समध्ये ७ बाऊंड्रीसह अन्वरने १०१ रन्स फटकावल्या!
पाकिस्तान १९५ / ५!

अन्वर आउट झाल्यावर बॅटींगला आलेल्या शाहीद आफ्रीदीने नेहमीप्रमाणेच आक्रमक सुरवात करत नेहराला बाऊंड्री फटकावली. आफ्रीदीच्या उतावळेपणाचा फायदा घेत त्याला फटकेबाजीच्या मोहात अडकवण्याच्या हेतूने गांगुलीने दिनेश मोंगियाला बॉलिंगला आणलं आणि ही चाल यशस्वी ठरली. मोंगियाच्या पहिल्या बॉलवर आफ्रीदीने बाऊंड्री मारली, पण आणखीन दोन बॉल्सनंतर मोंगियाला फटकावण्याच्या नादात आफ्रीदीची टॉप एज लागली आणि मिडऑफला कुंबळेने त्याचा आरामात कॅच घेतला. पाकिस्तान २०८ / ६!

आफ्रीदी परतल्यावर बॅटींगला आलेला रशिद लतीफ आणि युनुस खान यांनी आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. युनुस खानने कुंबळे आणि झहीरला बाऊंड्री फटकावल्या. लतीफनेही युनुसला साथ देत मोंगिया आणि नेहराला बाऊंड्री तडकावण्यात कोणतीही हयगय केली नाही. या दोघांनी ७ ओव्हर्समध्ये ४८ रन्स फटकावल्यावर झहीर खानला फटकावण्याचा युनुसचा प्रयत्नं पार फसला आणि दिनेश मोंगियाने त्याचा कॅच घेतला. ३६ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह युनुसने ३२ रन्स फटकावल्या. झहीरच्या अचूक बॉलिंगमुळे त्याच्या ओव्हरमध्ये केवळ २ रन्स निघाल्या पण लतीफ आणि युनुस खान आऊट झाल्यावर आलेला वासिम अक्रम यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये नेहराला धारेवर धरत १५ रन्स फटकावल्या. नेहराच्या शेवटच्या दोन बॉल्सवर अक्रमने दोन बाऊंड्री तडकावल्या होत्या!

५० ओव्हर्सनंतर पाकिस्तानचा स्कोर होता २७३ / ७!

वर्ल्डकपच्या इतिहासातला आतापर्यंत भारताने यशस्वीपणे गाठलेलं सर्वात जास्तं टार्गेट होतं २२२ रन्सचं आणि ते देखिल न्यूझीलंडविरुद्धं १९८७ मध्ये! इतकंच नव्हे तर वर्ल्डकपमध्ये दुसर्‍या इनिंग्जमधला आतापर्यंतचा भारताचा सर्वाधिक स्कोर होता २६९ आणि तो देखिल १९८७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध! अशा परिस्थितीत २७४ रन्सचं लक्ष्यं गाठणं, ते देखिल पाकिस्तानविरुद्ध आणि अक्रम, वकार आणि शोएब अख्तरसारख्या बॉलर्सना तोंड देत हे निश्चितच आव्हानात्मक होतं. भारताला ही मॅच जिंकणं खूपच कठीण जाणार असाच बहुतेक सर्वांचा अंदाज होता.

बॅटींगला जाण्यापूर्वी सचिन ड्रेसिंगरुममध्ये आपल्या सहकार्‍यांना म्हणाला,
"I am going to get these guys!"

सचिन आणि वीरेंद्र सेहवाग मैदानात उतरल्यावर सचिनने पहिल्यांदा स्ट्राईक घेतल्यावर सौरव गांगुली चकीत झाला होता. सचिनबरोबर अनेकदा ओपनिंगला आल्यामुळे गांगुलीला सचिन पहिल्या बॉलपासून स्ट्राईक घेण्यास नाखूश असतो याची चांगलीच कल्पना होती.

गांगुली म्हणतो,
"When Sachin and Viru went out to open, the first thing that struck me that Sachin had taken the strike. After opening with him over the years, I knew he is reluctant to face the first ball, and it never changed even after I became captain. At that very moment, I realized he was onto something extraordinary and special!"

अक्रमच्या पहिल्याच ओव्हरमध्ये तिसर्‍या बॉलवर सचिनने बॅकफूटवर जात कव्हर्समधून बाऊंड्री फटकावली. शेवटच्या बॉलवर सेहवागनेही थर्डमॅनला बाऊंड्री मारण्यात कोणतीही कसूर केली नाही. पहिल्या ओव्हरमध्ये भारताला ९ रन्स मिळाल्या!

दुसर्‍या बाजूने वकारने बॉलिंगला आणलं शोएब अख्तरला!

भारताविरुद्धच्या या मॅचपूर्वी अनेक वेगवेगळ्या इंटरव्ह्यूमध्ये शोएबने बर्‍याच बाता मारलेल्या होत्या. भारतीय बॅट्समन माझ्यासमोर उभेसुद्धा राहू शकणार नाहीत, सचिनला तर मी पहिल्या बॉलवर आऊट करेन वगैरे अनेक शेखमहंमदी वल्गना त्याने केल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्षं मॅचमध्ये तो काय करतो याकडे पाकिस्तानी सपोर्टर्स डोळे लावून बसलेले होते...

शोएबचा पहिलाच बॉल लेगसाईडला पडलेला वाईड होता..
दुसरा बॉल खेळून काढल्यावर तिसर्‍या बॉलवर सचिनने एक रन काढली...
सेहवागने चौथा बॉल सोडून दिल्यावर पाचव्या बॉलवर पुन्हा शोएबने वाईड टाकला...
विकेटकीपर रशिद लतिफला हा बॉल नीट कलेक्ट न करता आल्याने सचिन - सेहवाग यांनी १ रन काढण्याची संधी सोडली नाही...
आतापर्यंत पाचपैकी २ वाईड गेले होते....

शोएबचा सहावा बॉलही ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
हा बॉलही वाईडच गेला असता पण...
सचिन तयारीत होता....
बॅकफूटवर जात सचिनने बॉल अपर कट् केला...
बॉल थर्डमॅन बाऊंड्रीपार प्रेक्षकांत दिसेनासा झाला.... सिक्स!

सुपर स्पोर्ट्स पार्कवर हजर असलेल्या भारतीय प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतलं होतं.
१७ वर्षांपूर्वी जावेद मियांदादने चेतन शर्माला मारलेल्या सिक्सची सचिनने वर्ल्डकपमध्ये सव्याज परतफेड केली होती!

सचिनचा तो शॉट इतका अफलातून होता की रमिझ राजालाही त्याचं कौतुक केल्यावाचून राहवलं नाही.
"Well! What a hit! That’s gone away in a flash! That is Cricket at its best! He is made to stretch and really hats of for middling that wide one from Shoaib!"

सचिनने दिलेल्या या तडाख्याने शोएब अधिकच चवताळून उठणार हे उघड होतं.
कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेला रवी शास्त्री म्हणाला,
"What will be the reply?"

शोएबचा पुढचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
सचिनने किंचित ऑफला सरकून तो फ्लिक केला...
युनुस खानला बॉलच्या जवळपासही फिरकण्याची संधी मिळाली नाही...
बॉल स्क्वेअरलेग बाऊंड्रीपार गेला...

शोएबचा शेवटचा बॉल ऑफस्टंच्या बाहेर पडला...
सचिन फ्रंटफूटवर आला आणि त्याने बॉल फक्तं डिफेंड केला...
बॅकलिफ्ट नाही... फॉलो थ्रू नाही... काही नाही...
बॉल मिडऑनला असलेल्या वकार युनुसच्या बाजूने बाऊंड्रीपार गेला!

शोएबच्या पहिल्या ओव्हरमध्ये १८ रन्स झोडपल्या गेल्या होत्या!

तिसर्‍या ओव्हरमध्ये अक्रमच्या अचूक बॉलिंगमुळे केवळ एक रन निघाली...

पहिल्या ओव्हरमध्ये झालेल्या धुलाईनंतर शोएब कोणता पवित्रा घेणार याकडे सर्वांचं लक्षं लागलेलं होतं...
पण सचिनने केलेल्या धुलाईमुळे शोएब निम्मा खलास झाला होता...
पुन्हा सचिनसमोर बॉलिंगला येण्याचं त्याने साफ नाकारलं!

अक्रम म्हणतो,
"Shoaib simply refused to bowl to Sachin! He said, 'ओये क्या बॅटींग कर रहा है ये बंदा. मुझे नहीं बॉलिंग करनी इसे!' Had he ever said this to Imran that he does not want to bowl, Imran would have broken his leg in front of everyone!"

मॅचपूर्वी सचिनबद्दल मारलेल्या सार्‍या गमजा त्या एका ओव्हरमध्ये हवेत विरुन गेल्या होत्या.
सचिनचा नॉकआऊट पंच शोएबच्या भलताच जिव्हारी लागला होता!

शोएबच्या जागी बॉलिंगला आलेल्या वकारला पहिल्याच बॉलवर सेहवागने 'हात' दाखवला...
वकारचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
सचिनच्या पावलावर पाऊल टाकत सेहवागने अपर कट मारला...
फरकच करायचा झाला तर सेहवागचा अपर कट पॉईंट बाऊंड्रीपार गेला...
बाकी परिणाम तोच... सिक्स!

त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सचिनने वकारला स्क्वेअरलेगला फ्लिकची बाऊंड्री तडकावली. अक्रमच्या पुढच्या ओव्हरमध्ये सेहवागने लेग ग्लान्स आणि कटच्या दोन बाऊंड्री फटकावल्या. अखेर सहाव्या ओव्हरमध्ये वकारला फटकावण्याच्या नादात शॉर्ट कव्हरला आफ्रीदीने सेहवागचा कॅच घेतला. १४ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि वकारला मारलेल्या सिक्ससह सेहवागने २१ रन्स फटकावल्या होत्या.

वकारच्या पुढच्याच बॉलवर गांगुली एलबीडब्ल्यू झाला!
महंमद कैफने वकारची हॅटट्रीक होणार नाही याची काळजी घेतली.
भारत ५३ / २!

अक्रमच्या पुढच्या ओव्हरचा चौथा बॉल....
ऑफस्टंपवर पडलेला बॉल सचिनने मिडऑफवरुन उचलण्याचा प्रयत्नं केला...
सचिनच्या अपेक्षेपेक्षा बॉल किंचित स्लो आल्याने बॉल हवेत गेला...
मिडऑफला असलेल्या अब्दुल रझाकने कॅच घेण्यासाठी हवेत जंप मारली पण...
रझाकच्या हातून कॅच सुटला!

अक्रम उद्वेगाने त्याला म्हणाला,
"#%^@* तुझे पता है किसका कॅच छोडा है तूने @%^@?"

कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेला अ‍ॅलन विल्कीन्स म्हणाला,
"Thats out! No its isn’t… put down! Ohh..How Pakistan might live to rue that!"

वास्तविक रझाक ३० यार्ड सर्कलच्या लाईनमध्ये उभा असता तर कॅच सहज त्याच्या हातात आला असता, पण तो ५ यार्ड आत असल्याने सचिन वाचला!

महंमद कैफने सावधपणे पाकिस्तानी बॉलर्सना खेळून काढत सचिनला सपोर्ट देण्याची भूमिका घेतली. सचिनची फटकेबाजी चालूच होती. वकारला कव्हर्समधून बाऊंड्री तडकावल्यावर त्याने पुढचा बॉल मिड्विकेटला फ्लिक केला. मिडऑफला असलेल्या युनुस खानने बाऊंड्रीपर्यंत बॉलचा पाठलाग करत डाईव्ह मारुन बाऊंड्री वाचवली पण त्याचा थ्रो येईपर्यंत सचिन आणि कैफ यांनी चार रन्स काढल्या! अक्रमच्या पुढच्या ओव्हरमध्ये सचिनने पुन्हा कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली. पुढच्या ओव्हरमध्ये....

वकारचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
ऑफस्टंपच्या किंचित बाहेर जात सचिनने तो स्क्वेअरलेगला फ्लिक केला...
स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर युसुफ योहानाने बॉल पिकअप करण्यापूर्वीच सचिन दुसर्‍या रनसाठी वळला होता...
युसुफ योहानाचा स्क्वेअरलेगवरुन आलेला थ्रो पीचच्या मधोमध टप्पा पडून पॉईंट बाऊंड्रीपार गेला...
सचिनला ओव्हरथ्रोच्या ४ रन्स आयत्याच मिळाल्या!

फिफ्टी पूर्ण झाल्यावर सचिनने सेंचुरी पूर्ण केल्याच्या थाटात बॅट उंचावली पण वकारच्या शेवटच्या बॉलवर बाऊंड्री मारण्याची संधी सचिनने सोडली नाही!
१० ओव्हर्समध्ये भारताचा स्कोर होता ८८ / २!

अक्रमच्या जागी बॉलिंगला अखेर शोएब अख्तर बॉलिंगला परतला पण कैफ आणि सचिन दोघांनीही त्याला कव्हरड्राईव्हच्या बाऊंड्री फटकावल्या. वकारच्या पुढच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर स्क्वेअरलेगला बाऊंड्री मारल्यावर पुढच्या बॉलवर कैफने स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. एव्हाना सचिनला क्रॅम्प्सचा त्रास जाणवण्यास सुरवात झाली होती, पण शोएबला बाऊंड्री मारण्यात त्याने कोणताही अनमान केला नाही! सचिन आणि कैफ शोएब आणि स्वतः वकारची धुलाई करत असलेले पाहून वकारने शाहीद आफ्रीदी आणि अब्दुल रझाक यांना बॉलिंगला आणलं. आफ्रीदीच्या पहिल्या अचूक ओव्हरनंतर सचिनने त्याला लेटकटची आणि रझाकच्या पुढच्या ओव्हरमध्ये आपला ट्रेडमार्क असलेली स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली! आफ्रीदी आणि रझाक यांनी सचिनला रोखण्याचे शक्यं ते सर्व प्रयत्नं चालवले होते, पण सचिनच्या समोर ते अपुरे पडत होते. आफ्रीदीच्या बॉलवर सचिनने मिडऑनला असलेल्या वकारच्या उजव्या बाजूने बाऊंड्री फटकावल्यावर आफ्रीदी अगदीच निराश झाला होता. आफ्रीदीच्या पुढच्या ओव्हरमध्ये कैफने बाऊंड्री तडकावली पण पुढच्याच बॉलवर कव्हरड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात कैफच्या बॅटची इनसाईड एज लागली आणि तो बोल्ड झाला. ६० बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह कैफने ३५ रन्स काढत कैफने सचिनबरोबर १५ ओव्हर्समध्ये १०५ रन्सची पार्टनरशीप केली. तो आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोर होता १५५ / ३!

भारताला मॅच जिंकण्यासाठी अद्याप २८ ओव्हर्समध्ये ११९ रन्सची आवश्यकता होती!

कैफ आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या राहुल द्रविडने नेहमीच्या पद्धतीने कोणतीही रिस्क न घेता स्ट्राईक रोटेट करण्याचा मार्ग पत्करला. सचिनला होणारा क्रॅम्प्सचा त्रास आता वाढला होता पण त्याचा आक्रमकपणा मात्रं यत्किंचीतही कमी झाला नव्हता. रझाकच्या ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलवर त्याने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री मारण्यात त्याने कोणतीही हयगय केली नाही. २८ व्या ओव्हरमध्ये शोएब अख्तरचा बॉल पॉईंटला खेळून सचिनने एक रन काढली खरी पण रन पूर्ण करताना मात्रं मांडीत आलेल्या क्रॅम्प्समुळे तो जवळपास लंगडत होता!

भारतीय संघाचा फिजीओथेरपीस्ट अँड्र्यू लिपसने सचिनवर मैदानात शक्यं ते उपचार केले...
परंतु सचिनला रन काढण्यासाठी धावणं अशक्यं झालं होतं...
१४ वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच सचिनला रनर घेण्याची वेळ आली....
सचिनचा रनर म्हणून वीरेंद्र सेहवाग मैदानात आल्यावर...

शोएब अख्तरचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
सचिनने बॅकफूटवर जात बॉल डिफेंड करण्याचा प्रयत्नं केला पण...
सचिनच्या अपेक्षेपेक्षा जास्तं उसळलेल्या बंपरने त्याच्या बॅटची लिडींग एज घेतली...
बॅकवर्ड पॉईंटला युनुस खानने पुढे डाईव्ह मारत कॅच घेतला...

७५ बॉल्समध्ये १२ बाऊंड्री आणि शोएबला ठोकलेल्या सिक्ससह सचिनने ९८ रन्स झोडपून काढल्या होत्या!
एकच खंत होती म्हणजे सचिनची सेंचुरी पूर्ण न झाल्याची!
भारत १७७ / ४!

अद्याप भारताला मॅच जिंकण्यासाठी ९७ रन्सची आवश्यकता होती!

सचिन आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या युवराज सिंगने शोएबला स्क्वेअरलेगला बाऊंड्री फटकावत आक्रमक सुरवात केली. वकारने विकेट्स मिळवण्याच्या दृष्टीने अक्रमला बॉलिंगला आणलं पण द्रविड - युवराज यांनी कोणतीही रिस्क न घेता सावधपणे त्याला खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. शोएबच्या ओव्हरमध्ये ५ वाईड्सचा आयताच बोनस भारताला मिळाला. अक्रमच्या जागी वकार बॉलिंगला आल्यावर युवराजने त्याला कव्हर ड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. वकारने अक्रमच्या जागी आफ्रीदीला बॉलिंगला आणलं खरं पण युवराजने त्याला दोन ओव्हर्समध्ये स्वीप आणि कव्हरड्राईव्हच्या बाऊंड्री फटकावल्या!

शेवटच्या १४ ओव्हर्समध्ये भारताला ५३ रन्स हव्या होत्या!

एव्हाना सचिनप्रमाणेच द्रविडलाही थोडाफार क्रॅम्प्सचा त्रास जाणवत होता. पाकिस्तानच्या इनिंग्जमध्ये संपूर्ण ५० ओव्हर्स विकेटकिपींग केल्याने बॅटींग करताना त्याला थकवा जाणवत होता. द्रविड - युवराज यांनी कोणतीही रिस्क न घेता पुढच्या ६ ओव्हर्समध्ये २६ रन्स काढल्यावर युवराजने शोएबला कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. शोएबप्रमाणे वकारलाही युवराजने कव्हर्समधून बाऊंड्री तडकावल्यावर त्याच ओव्हरमध्ये द्रविडने वकारचा बंपर स्क्वेअरलेगला पूल केला...

४६ व्या ओव्हरमध्ये ६ विकेट्सने भारताने मॅच जिंकली!
वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत भारताने गाठलेलं हे सर्वात मोठं टार्गेट होतं!

द्रविडने ७६ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह ४४ रन्स काढल्या...
युवराजने ५३ बॉल्समध्ये ६ बाऊंड्रीसह ५० रन्स फटकावल्या...
या दोघांच्या ९९ रन्सच्या पार्टनरशीपने पाकिस्तानची उरलीसुरली आशा धुळीला मिळवली होती!

मॅन ऑफ द मॅच म्हणून अर्थातच सचिनची निवड झाली!

सचिन म्हणतो,
"I was compelled to live this match a year in advance. Everywhere I went, people reminded me about the game against Pakistan. I did not sleep well for 12 nights before the match!"

शोएबच्या केलेल्या धुलाईबद्दल सचिन म्हणाला,
"I was pumped up for the match all right, but when we went out to bat, the idea was to stay in for the first few overs and see off the new ball. I hadn't really planned to bat that way. It just worked out differently. I got a couple of balls to hit, they went nicely off the bat, and things started happening. Shoaib bowled short and wide. It was there to be hit, and I hit it well. It went for a six. I thought, this is working well so why not carry on? Sometimes you feel good from the start, sometimes you struggle, but today there was so much time that balls close to 150 kmph looked like 130kmph!"

शोएबच्या १० ओव्हर्समध्ये ७२ रन्स झोडपल्या गेल्या होत्या!
२०११ च्या वर्ल्डकपमध्ये रॉस टेलरने केलेल्या धुलाईनंतरही शोएबच्या वन डे करीअरमधले हे सर्वात वाईट आकडे होते!

सचिनने केलेल्या धुलाईनंतर बहुतेक शोएबचे डोळे उघडले असावे... तो म्हणतो,
"Sachin is the greatest batsman in the game, and if he comes out with something like that, nothing much you can do!"

भारतामध्ये अर्थातच अपेक्षेप्रमाणेच जल्लोष झाला!
....उलट पाकिस्तानमध्ये सुतकी छाया पसरली.
नेहमीप्रमाणे टीव्ही फोडण्याचे वगैरे प्रकारही झालेच!

पाकिस्तान क्रिकेट टीमचा मॅनेजर आणि नंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचा अध्यक्षं झालेला शहरयार खान म्हणाला,
"India had overshadowed us mainly through the genius of Tendulkar but there was no disgrace in losing the match."

मॅचनंतर दुसर्‍या दिवशी सचिनला वर्ल्डकप संयोजन समितीचा अध्यक्षं असलेल्या अली बाकरची तार आली,
"We wanted this World Cup to be the most successful World Cup ever and your innings against Pakistan at Centurion has helped us achieve that."

क्रीडालेख

प्रतिक्रिया

अभिजीत अवलिया's picture

26 Feb 2017 - 10:37 am | अभिजीत अवलिया

ही मॅच कशी विसरता येईल. भारताच्या सर्वोत्तम विजयांपैकी एक.

तुषार काळभोर's picture

26 Feb 2017 - 10:57 am | तुषार काळभोर

Even more than 2011 victory

गॅरी ट्रुमन's picture

26 Feb 2017 - 7:15 pm | गॅरी ट्रुमन

मस्तच. ही एक अविस्मरणीय मॅच होती. त्याकाळी भारतात नव्हतो पण वर्ल्डकपपुरती केबल घेतली होती आणि ही एक मॅच मी होतो तिथल्या वेळेप्रमाणे रात्री जागून बघितली होती. सेहवाग आणि गांगुली पाठोपाठ आऊट झाल्यानंतर चिंता वाटू लागली होती पण नंतर सचिन आणि महंमद कैफ यांनी पाकिस्तानला फार डोके वर काढू दिले नाही. भारतात ही मॅच जिंकल्यावर जल्लोष झाला असेलच पण ते भारतात नसल्यामुळे अनुभवायला मिळाले नव्हते :(

वरुण मोहिते's picture

26 Feb 2017 - 7:22 pm | वरुण मोहिते

पण सचिन ची सिक्स अजून लक्षात आहे .ऑफ ला अशी सिक्स ..

चावटमेला's picture

26 Feb 2017 - 10:40 pm | चावटमेला

अजून एक छान लेख. टोनी ग्रेग ने मॅचनंतर घेतलेल्या सचिनच्या मुलाखतीचा उल्लेख हवा होता.
It's fourth time in a row that we have defeated them... सचिन च्या ह्या एका वाक्यानंतर प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतले.. हे वाक्य म्हणजे एक ही मारा पर सॉल्लिड मारा होते..

आषाढ_दर्द_गाणे's picture

26 Feb 2017 - 11:31 pm | आषाढ_दर्द_गाणे

नुकत्याच झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर हा लेख वाचणे फार गरजेचे होते. रविवार आनंदात जाईल आता.
हि मॅच पाहायला नाना पाटेकर आणि सुनील शेट्टी उपस्थित होते आणि संपल्यावर त्या दोघांची करमणूकपूर्ण मुलाखत घेतल्या गेली होती असे आठवतेय

diggi12's picture

9 Oct 2021 - 2:08 am | diggi12

सचिन is सचिन

श्रीगुरुजी's picture

9 Oct 2021 - 9:52 am | श्रीगुरुजी

विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानविरूद्धच्या ७ विजयांपैकी धावांचा पाठलाग करून मिळविलेला हा एकमेव विजय. इतर ६ विजय प्रथम फलंदाजी करून मिळविलेले आहेत.

बबन ताम्बे's picture

9 Oct 2021 - 11:23 am | बबन ताम्बे

सचिन ने शोएब अखतरची चांगलीच धुलाई केली होती. जबरदस्त मॅच झाली होती.