वर्ल्डकप क्लासिक्स - २००७ - वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
3 Mar 2017 - 10:51 am

२१ एप्रिल २००७
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन

बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनमधल्या केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानात सुपर एटमधली वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातली मॅच खेळली जाणार होती. वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दोन्ही संघांचं आव्हान संपुष्टात आलं असल्याने सेमीफायनलच्या मुकाबल्यावर या मॅचच्या निकालाचा काहीही परिणाम होणार नव्हता. पण वेस्ट इंडीज आणि इंग्लंड या दोघांच्या दृष्टीने मात्रं ही मॅच महत्वाची होती. इंग्लंडचा कोच डंकन फ्लेचर याने राजिनामा दिलेला असल्याने कोच म्हणून त्याची ही शेवटची मॅच होती, पण हाऊसफुल्ल भरलेल्या केन्सिंग्टन ओव्हलवरच्या वेस्ट इंडीयन प्रेक्षकांची आणि जगभरातील क्रिकेटरसिकांची या मॅचकडे नजर लागली होती ती वेगळ्याच कारणासाठी...

इंग्लंडविरुद्धची ही मॅच ब्रायन चार्ल्स लाराची शेवटची मॅच होती!

लाराच्या वेस्ट इंडीयन संघात खुद्दं लारा, अनुभवी शिवनारायण चँडरपॉल. रामनरेश सरवान, क्रिस गेल, मारलॉन सॅम्युएल्स, डेव्हन स्मिथ असे बॅट्समन होते. वेस्ट इंडीजच्या बॉलिंगचा भार मुख्यतः जेरॉम टेलर, डॅरन पॉवेल आणि कॉरी कॉलिमूर यांच्यावर होता. विकेटकीपर - बॅट्समन दिनेश रामदीनचाही वेस्ट इंडीजच्या संघात समावेश होता. या सर्वांच्या जोडीला ड्वेन ब्रावोसारखा हरहुन्नरी ऑलराऊंडर होता!

मायकेल वॉनच्या इंग्लीश संघात स्वतः वॉन, अँड्र्यू स्ट्राऊस, केव्हीन पीटरसन, रवी बोपारा असे बॅट्समन होते. इंग्लंडच्या बॉलिंगचा भार प्रामुख्याने होता तो जेम्स अँडरसनवर. त्याच्या जोडीला स्ट्युअर्ट ब्रॉड. लियाम प्लंकेट असे बॉलर्स होते. पॉल निक्सनसारखा आक्रमक विकेटकीपर - बॅट्समन इंग्लंडच्या संघात होता. इंग्लंडचे खरे आधारस्तंभ होते ते म्हणजे संघात असलेले ऑलराऊंडर्स! अँड्र्यू फ्लिंटॉफ, पॉल कॉलिंगवूड आणि ऑफस्पिनर जेम्स डालरिंपल असे तीन ऑलराऊंडर्स इंग्लंडच्या संघात होते. गरज पडल्यास रवी बोपारा आणि स्वतः कॅप्टन वॉनच्या बॉलिंगचाही इंग्लंडला वापर करता येणार होता!

टॉसच्या वेळेस बोलताना लारा म्हणाला,
"I've had a really wonderful time playing cricket, and it's a fitting place to end my career in the Caribbean. England want to win it for Duncan Fletcher but I just want my team to win it for West Indies cricket. This game is for the people."

मायकेल वॉनने टॉस जिंकल्यावर फिल्डींगचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे वेस्ट इंडीयन प्रेक्षकांकडून या निर्णयाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं!

क्रिस गेल संपूर्ण वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत अपयशी ठरला होता, पण या मॅचमध्ये मात्रं सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत त्याने इंग्लिश बॉलर्सची धुलाई करण्यास सुरवात केली. जेम्स अँडरसनला लेग ग्लान्सची बाऊंड्री मारल्यावर लियाम प्लंकेटच्या पुढच्या ओव्हरमध्ये त्याने लाँगऑनला दणदणीत सिक्स ठोकली! अँडरसनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या स्ट्युअर्ट ब्रॉडला गेलने मिडविकेट आणि कव्हर्समधून लागोपाठ बाऊंड्री तडकावल्या. पुढच्या २ ओव्हर्समध्ये केवळ २ रन्स निघाल्यावर प्लंकेटच्या ८ व्या ओव्हरमध्ये...

गेल आणि डेव्हन स्मिथ यांनी पहिल्या २ बॉल्समध्ये २ रन्स काढल्या...

प्लंकेटचा तिसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
गेलने तो एक्ट्रा कव्हरमधून तडकावला... बाऊंड्री!

चौथा बॉल फटकावण्याच्या इराद्याने गेल लेगस्टंपच्या बाहेर सरकला...
प्लंकेटने चाणाक्षंपणे लेगस्टंपच्या बाहेर बॉल टाकला पण...
गेलने शेवटच्या क्षणी चक्कं स्लिप्सवरुन बॉल थर्डमॅनला फटकावला... बाऊंड्री!

पाचवा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
गेलने फ्रंटफूटवर येत तो लाँगऑफ बाऊंड्रीपार उचलला... सिक्स!

शेवटचा बॉल मिडलस्टंपवर पडला...
गेलने काहीसा अ‍ॅक्रॉस द लाईन उचलला...
बॉल लाँगऑन बाऊंड्रीपार क्लाईड वॉलकॉट स्टँडमध्ये गेला... सिक्स!

प्लंकेटच्या त्या ओव्हरमध्ये २२ रन्स निघाल्या होत्या!

ब्रॉड आणि प्लंकेटच्या जागी बॉलिंगला आलेला अँड्र्यू फ्लिंटॉफ यांच्या अचूक बॉलिंगमुळे पुढच्या २ ओव्हर्समध्ये फक्तं ६ रन्स निघाल्या, पण ब्रॉडच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या ऑफस्पिनर जेमी डालरिंपलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये गेलने २ बाऊंड्री तडकावल्या. फ्लिंटॉफच्या एकमेव ओव्हरनंतर मायकेल वॉनने पॉल कॉलिंगवूडला बॉलिंगला आणलं, पण गेलने त्याच्या २ ओव्हर्समध्ये २ बाऊंड्री फटकावल्या. गेलची आतषबाजी सुरु असताना डेव्हन स्मिथला मात्रं रन्स काढण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. १५ ओव्हर्सनंतर वेस्ट इंडीजचा स्कोर होता १०२ / ०!

डेव्हन स्मिथला रन्स काढणं कठीण जात असल्याचं मायकेल वॉनसारख्या कॅप्टनच्या तीक्ष्णं नजरेतून सुटलं असतं तरच नवलं! गेलला १ रन देऊन स्मिथला जास्तीत जास्तं बॉल खेळवण्याचं त्याने धोरण अवलंबलं. कॉलिंगवूड आणि डालरिंपलच्या जागी बॉलिंगला आलेला स्वतः वॉन यांच्या पुढच्या ६ ओव्हर्समध्ये गेलला केवळ ९ बॉल्स खेळायला मिळाले! कॉलिंगवूडच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या फ्लिंटॉफनेही तोच मार्ग अनुसरल्याने गेल वैतागला...

वॉनच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या अँडरसनचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
गेलने अपर कट् मारण्याचा प्रयत्नं केला पण बॉल त्याच्या बॅटच्या टॉपएजला लागून थर्डमॅनच्या दिशेने गेला...
थर्डमॅन बाऊंड्रीवर प्लंकेटने डाव्या बाजूला धाव घेतली पण त्याचा अंदाज चुकला...
शेवटच्या क्षणी प्लंकेटने डाईव्ह मारली पण बॉल त्याच्या हातातून सुटला...

फ्लिंटॉफच्या पुढच्या ओव्हरमध्ये गेलची अपर कट् पुन्हा टॉपएज लागून थर्डमॅनच्या दिशेने गेली...
यावेळी थर्डमॅनला होता स्ट्युअर्ट ब्रॉड...
प्लंकेटप्रमाणेच ब्रॉडलाही शेवटच्या क्षणी डाईव्ह मारावी लागली...
पण डोकं शांत ठेवून त्याने कॅच सुटणार नाही याची काळजी घेतली!

५८ बॉल्समध्ये १० बाऊंड्री आणि ३ सिक्ससह गेलने ७९ रन्स फटकावल्या.
वेस्ट इंडीज १३१ / १!

गेल पॅव्हेलियनमध्ये परतत असताना टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला...
याचा एकच अर्थ होऊ शकत होता...
ब्रायन चार्ल्स लारा बॅटींगला आला होता!

लारा क्रीजकडे येत असताना इंग्लिश खेळाडूंनी दुतर्फा उभे राहून त्याला 'गार्ड ऑफ ऑनर' दिला!
"Good luck!" वॉन त्याला शुभेच्छा देत म्हणाला!

लारा बॅटींगला आल्यावर वॉन आणि कंपनीने गेलप्रमाणेच लारालाही स्ट्राईकपासून दूर ठेवण्याचा मार्ग पत्करला. स्मिथने अँडरसनला थर्डमॅनला बाऊंड्री मारली खरी पण हा अपवाद वगळता त्याला फारसं काही करता आलं नाही. अखेर २८ व्या ओव्हरमध्ये लाराने बॅटींग पॉवरप्ले घेतला...

फ्लिंटॉफच्या ओव्हरच्या दुसर्‍याच बॉलवर लाराने नेहमीच्या पद्धतीने कव्हरपॉईंटला स्क्वेअरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली. अँडरसनच्या पुढच्या ओव्हरमध्ये लेगस्टंपच्या बाहेर पडलेल्या बॉलवर लेग ग्लान्स मारण्याची संधी त्याने सोडली नाही. अँडरसनच्या हाफ व्हॉलीवर स्मिथने कव्हर्समधून बाऊंड्री मारली पण पुढच्याच ओव्हरमध्ये...

ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला फ्लिंटॉफचा बॉल स्मिथने स्क्वेअर ड्राईव्ह केला...
सगळ्यांच्या नजरा बाऊंड्रीकडे लागलेल्या असतानाच...
बॅकवर्ड पॉईंटला असलेल्या पॉल कॉलिंगवूडने मागच्या दिशेने जंप मारली...
हवेतच त्याचा उजवा हात बॉलच्या दिशेने वर झाला....
कॉलिंगवूड जमिनीवर पडला तेव्हा त्याच्या उजव्या हातात बॉल होता!

१०६ बॉल्समध्ये ६ बाऊंड्रीसह स्मिथने ६१ रन्स काढल्या.
वेस्ट इंडीज १६८ / २!

आणखीन एक बॉलनंतर फ्लिंटॉफचा ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला बॉल लाराने विकेटकीपर पॉल निक्सन आणि सेकंड स्लिपमध्ये असलेला अँड्र्यू स्ट्राऊस यांच्या बरोबर मधून थर्डमॅन बाऊंड्रीवर फटकावला. पण ब्रॉडच्या पुढच्या ओव्हरमध्ये...

ब्रॉडचा मिडलस्टंपवर पडलेला बॉल मारलॉन सॅम्युएल्सने मिडऑनला फ्लिक केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
लाराने अपेक्षेप्रमाणे सॅम्युएल्सच्या कॉलला प्रतिसाद दिला पण...
मिडऑनला असलेल्या केव्हीन पीटरसनने बॉल पिकअप केला...
क्रीजमधून दोन पावलं पुढे आलेला सॅम्युएल्स थबकला आणि मागे वळून त्याने आपलं क्रीज गाठलं...
पीटरसनने स्टंप्सकडे धाव घेतली आणि चार यार्डांवरुन स्टंप्सचा अचूक वेध घेतला...

आपल्या शेवटच्या इनिंग्जमध्ये लारा रनआऊट झाला!

कॉमेंट्रीबॉक्समध्ये असलेला टोनी कोझीयर म्हणाला,
"What an unfortunate way to go for Brian Lara in his final innings for West Indies! Marlon Samuels has sold him a dummy down the river!"

लारा पॅव्हेलियनमध्ये परतत असताना केन्सिंग्टन ओव्हलवरील यच्चयावत प्रेक्षकांनी उस्फूर्तपणे उभं राहत टाळ्यांचा कडकडाट केला!
एका महान खेळाडूच्या यशाची ती पावती होती!

स्ट्युअर्ट ब्रॉड म्हणतो,
"The atmosphere at Kensington Oval was amazing. You could sense the occasion, with Lara playing his last match. We gave him a guard of honour. I think a lot of us were disappointed he couldn't get to finish on a better note. I feel honored as I bowled the last ball of Brian Lara's international career at the crease, although he wasn't facing, as he was run out at the non-striker's end."

टोनी कोझीयरबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेल्या मायकेल आर्थर्टनने मार्मिक उद्गार काढले,
"Marlon Samuels is going to be most hated man in the whole Caribbean today!"

लारा आऊट झाल्यावर जेमतेम ८ रन्सची भर पडते तोच लियाम प्लंकेटच्या बॉलला कट् करण्याच्या नादात रामनरेश सरवानच्या बॅटची एज लागली आणि निक्सनने आरामात त्याचा कॅच घेतला. वेस्ट इंडीज १८१ / ४!

सरवान परतल्यावर बॅटींगला आलेल्या शिवनारायण चँडरपॉलने पहिल्याच बॉलवर प्लंकेटला लेग ग्लान्सची बाऊंड्री मारली. सॅम्युएल्सनेही आक्रमक पवित्रा घेत ब्रॉडच्या पुढच्या ओव्हरमध्ये कव्हर्समधून लागोपाठ २ बाऊंड्री तडकावल्या. पुढच्या ओव्हरमध्ये...

प्लंकेटचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
सॅम्युएल्सने लेगसाईडला सरकत तो प्लंकेटच्या डोक्यावरुन साईटस्क्रीनवर तडकावला... सिक्स!

प्लंकेटच्या दुसर्‍या बॉलवर सॅम्युएल्सने १ रन काढली...
तिसर्‍या बॉलवर चँडरपॉलला काहीच करता आलं नाही...

चौथा बॉल चँडरपॉलने कव्हर्समधून फटकावला...
पॉईंट बाऊंड्रीवरुन आलेल्या डालरिंपलने डाईव्ह मारत बाऊंड्री अडवली...
चँडरपॉल - सॅम्युएल्सनी आरामात ३ रन्स काढल्या...

पाचवा बॉल वाईड गेल्यावर सहावा नो बॉल लेगस्टंपवर पडला...
सॅम्युएल्सने तो मिडविकेटवरुन उचलला...
लाँगऑफवरुन आलेल्या फ्लिंटॉफने मारलेल्या डाईव्हचा काही उपयोग झाला नाही... बाऊंड्री!

सातवा बॉल मिडलस्टंपवर पडलेला शॉर्टपीच बॉल होता...
सॅम्युएल्सने मारलेला पूल स्क्वेअरलेगला असलेला डालरिंपल आणि मिडविकेटला असलेला फ्लिंटॉफ यांच्या मधून बाऊंड्रीवर गेला!

शेवटचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
सॅम्युएल्सने बॅकफूटवर जात तो पॉईंट बाऊंड्रीपार कट् केला!

गेलच्या तडाख्यात सापडून २२ रन्स देणार्‍या प्लंकेटला सॅम्युएल्सने २४ रन्स झोडपल्या होत्या!

प्लंकेटची धुलाई झाल्यावर मायकेल वॉन स्वतः बॉलिंगला आला. वॉनच्या ओव्हरमध्ये अवघी १ रन निघाली पण फ्लिंटॉफच्या पुढच्या ओव्हरमध्ये चँडरपॉलने चाणाक्षंपणे थर्डमॅनला दोन बाऊंड्री मारल्या! वॉनला त्याने स्वीपची बाऊंड्री मारल्यावर फ्लिंटॉफचा यॉर्कर सॅम्युएल्सच्या इनसाईड एजला लागून फाईनलेग बाऊंड्रीपार गेला. वॉन आणि फ्लिंटॉफच्या ऐवजी बॉलिंगला आलेला कॉलिंगवूड यांच्या अचूक बॉलिंगमुळे पुढच्या ३ ओव्हर्समध्ये केवळ ९ रन्स निघाल्यावर वॉनला फटकावण्याचा सॅम्युएल्सचा प्रयत्नं पार फसला आणि मिडविकेटला कॉलिंगवूडने त्याचा कॅच घेतला. ३९ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री आणि प्लंकेटला मारलेल्या सिक्ससह सॅम्युएल्सने ५२ रन्स फटकावल्या. वेस्ट इंडीज २५८ / ५!

सॅम्युएल्स परतल्यावर बॅटींगला आलेला ड्वेन ब्रावो आणि चँडरपॉल यांनी १८ रन्स जोडल्यावर कॉलिंगवूडला फटकावण्याचा चँडरपॉलचा प्रयत्नं पार फसला आणि लाँगऑनला प्लंकेटने त्याचा कॅच घेतला. ३९ बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह चँडरपॉलने ३४ रन्स फटकावल्या. आणखीन १ रनची भर पडल्यावर वॉनला फटकावण्याच्या नादात मिडविकेट बाऊंड्रीवर डालरिंपलने ब्रावोचा कॅच घेतला. विकेटकीपर दिनेश रामदीनने वॉनला बाऊंड्री मारल्यावर जेरॉम टेलरने पुढच्या ओव्हरमध्ये फ्लिंटॉफला बाऊंड्री तडकावली, पण पुढच्या ओव्हरमध्ये वॉनने टेलरला मिडविकेटच्या ट्रॅपमध्ये अडकवलं. डालरिंपलने मिडविकेट बाऊंड्रीवर घेतलेला हा दुसरा कॅच होता. शेवटच्या ओव्हरमध्ये फ्लिंटॉफने डॅरन पॉवेल आणि कॉरी कॉलिमूर दोघांनाही रनआऊट केलं!

शेवटच्या १० ओव्हर्समध्ये ५० रन्समध्ये वेस्ट इंडीजच्या ६ विकेट्स गेल्या होत्या.
इंग्लंडच्या इतर सर्व बॉलर्सच्या तुलनेत पार्टटाईम ऑफब्रेक्स टाकणार्‍या मायकेल वॉनने ३ विकेट्स घेतल्या होत्या!

४९.५ ओव्हर्समध्ये ३०० रन्समध्ये वेस्ट इंडी़ज ऑलआऊट झाले होते!

मायकेल वॉन आणि अँड्र्यू स्ट्राऊस यांनी सुरवातीला सावध पवित्रा घेत वेस्ट इंडी़अच्या बॉलर्सना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. कॉलीमूर आणि पॉवेल दोघांचेही बॉल चांगलेच स्विंग होत होते. तिसर्‍या ओव्हरमध्ये स्ट्राऊसने कॉलिमूरला लेग ग्लान्सची बाऊंड्री मारली, पण आणखीन एक बॉलनंतर त्याला स्क्वेअरलेगवरुन फटकावण्याचा स्ट्राऊसचा प्रयत्नं पार फसला आणि स्क्वेअरलेगला स्मिथने त्याचा कॅच घेतला. इंग्लंड ११ / १!

स्ट्राऊस आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या रवी बोपाराने कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढण्यावर भर दिला. पॉवेलच्या शॉर्टपीच बॉलवर पूलची बाऊंड्री फटकावल्यावर कॉलिमूरच्या पुढच्या ओव्हरमध्ये वॉनने कव्हर्सवरुन बाऊंड्री तडकावली. पण कॉलिमूरच्या पुढच्या ओव्हरमध्ये...

मिडलस्टंपवर पडलेला बॉल बोपाराने लेगसाईडला फ्लिक केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
वॉनने बोपाराच्या कॉलला प्रतिसाद दिला...
स्क्वेअरलेगला सॅम्युएल्सने बॉल पिकअप केलेला पाहून बोपारा जागीच थबकला...
एव्हाना अर्ध्याहून अधिक पीचपार गेलेला वॉन परत वळला खरा पण...
वॉनच्या सुदैवाने सॅम्युएल्सचा थ्रो स्टंपच्या जवळपासही फिरकला नाही!

पॉवेलच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या जेरॉम टेलरला वॉनने मिडविकेटला लागोपाठ दोन बाऊंड्री फटकावल्या. वॉनच्या पावलावर पाऊल टाकत पुन्हा बॉलिंगला परतलेल्या पॉवेलला बोपाराने २ बाऊंड्री मारल्या. टेलरच्या पुढच्या ओव्हरमध्ये वॉनने मिडविकेटवरुन दणदणीत सिक्स ठोकली. लाराने टेलरच्या ऐवजी गेलला बॉलिंगला आणलं पण वॉनचा आक्रमकपणा यत्कींचितही कमी झाला नाही. गेलला त्याने लाँगऑनवरुन सिक्स ठोकली! पॉवेलच्या पुढच्या ओव्हरमध्ये कव्हर्समधून ड्राईव्ह करण्याचा वॉनचा प्रयत्नं साफ फसला, पण कव्हर्समध्ये असलेल्या सॅमुएल्सने हा कॅच ड्रॉप केला. वॉन - बोपारा यांनी ९० रन्सची पार्टनरशीप केल्यावर...

कॉलिमूरचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
बोपाराने तो पॉईंट बाऊंड्रीला तडकावला आणि रन काढण्यासाठी तो धावत सुटला ...
बॅकवर्ड पॉईंटला ड्वेन ब्रावोने डाईव्ह मारुन बॉल अडवला...
दुसर्‍याच क्षणी ब्रावो उभा राहिला आणि त्याने नॉनस्ट्रायकर एन्डच्या स्टंप्सचा वेध घेतला...
बोपारा क्रीजपासून किमान दोन मीटर दूर होता!
इंग्लंड १०१ / २!

बोपारा आऊट झाल्यानंतर बॅटींगला आलेल्या केव्हीन पीटरसनने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत वेस्ट इंडीजच्या बॉलर्सना फटकावण्यास सुरवात केली. पॉवेलला मिडविकेटमधून बाऊंड्री तडकावल्यावर कॉलिमूरला फटकावण्याच्या नादात पीटरसनच्या बॅटची टॉप एज लागली, पण त्याच्या सुदैवाने बॉल विकेटकीपरच्या डोक्यावरुन बाऊंड्रीवर गेला! कॉलिमूरच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या ब्रावोलाही त्याने मिडविकेटवर बाऊंड्री तडकावली. पीटरसनची फटकेबाजी सुरु असताना मायकेल वॉन चाणाक्षपणे स्ट्राईक रोटेट करत होता, पण क्रिस गेलच्या बॉलवर स्वीपची बाऊंड्री फटकावण्यात त्याने कोणतीही कसूर केली नाही. वॉन - पीटरसन यांनी ५३ रन्सची पार्टनरशीप केल्यावर लाराने रामनरेश सरवानच्या पार्टटाईम लेगब्रेकचा वापर करण्याचा निर्णय घेतला. सरवानच्या पहिल्याच ओव्हरमधे...

ऑफस्टंपवर पडलेला सरवानचा बॉल वॉनने कट् केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
बॅकवर्ड पॉईंटला ड्वेन ब्रावोने डाईव्ह मारत बॉल अडवला....
दुसर्‍याच क्षणी ताडकन उभ्या राहिलेल्या ब्रावोचा अचूक थ्रो स्टंप्सवर लागला...
पीटरसनने परत पाठवल्यावर परत फिरलेला वॉन क्रीजच्या जवळपासही नव्हता...
बोपाराप्रमाणेच ब्रावोच्या अप्रतिम फिल्डींगने वॉनलाही गुंडाळलं होतं!

६८ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री आणि २ सिक्ससह वॉनने ७९ रन्स फटकावल्या.
इंग्लंड १५४ / ३!

वॉन परतल्यावर बॅटींगला आलेल्या पॉल कॉलिंगवूडने आक्रमक पवित्रा घेत ब्रावोला मिडऑफला बाऊंड्री मारली, पण ब्रावोच्या पुढच्या ओव्हरमध्ये ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला बॉल कट् करण्याचा त्याचा प्रयत्नं फसला आणि बॉल त्याच्या बॅटची बॉटम एज लागून मिडलस्टंपवर गेला. इंग्लंड १६२ / ४!

कॉलिंगवूड आऊट झाल्यावर त्याच्या जागी आलेल्या फ्लिंटॉफच्या बॅटची एज लागून बॉल थर्डमॅन बाऊंड्रीवर गेला. ब्रावोच्या पुढच्या ओव्हरमध्ये फ्लिंटॉफने मिडविकेटला बाऊंड्री तडकावली, पण सरवान - ब्रावोच्या पुढच्या दोन ओव्हर्समध्ये इंग्लंडला केवळ ८ रन्स मिळाल्या. पीटरसन - फ्लिंटॉफ यांनी २३ रन्स जोडल्यावर सरवानचा लेगस्टंपवर पडलेला बॉल फ्लिंटॉफने मिडविकेटला असलेल्या डॅरन पॉवेलच्या हातात फ्लिक केला! फ्लिंटॉफ परतल्यावर जेमतेम ४ रन्सची भर पडल्यावर मिडविकेटला डेव्हन स्मिथच्या हातात बॉल मारुन रन काढण्याचा जेमी डालरिंपलचा प्रयत्नं स्मिथच्या अचूक थ्रो मुळे पार फसला. इंग्लंड १८९ / ६!

शेवटच्या १४ ओव्हर्समध्ये इंग्लंडला ११४ रन्सची आवश्यकता होती!

विकेटकीपर पॉल निक्सनने कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढत पीटरसनला सपोर्ट देण्याची भूमिका घेतली होती. पीटरसनची फटकेबाजी सुरुच होती. पॉवेलला कव्हरड्राईव्हची बाऊंड्री मारल्यावर पॉवेलच्याच पुढच्या ओव्हरमध्ये त्याने ऑन ड्राईव्हची बाऊंड्री फटकावली. लाराने पॉवेलच्या ऐवजी ब्रावोला बॉलिंगला आणलं पण पीटरसनवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. ब्रावोच्या बॉलवर लेटकट्ची बाऊंड्री मारल्यावर टेलरच्या पुढच्या ओव्हरमध्ये लागोपाठ २ बाऊंड्री तडकावल्या. टेलर आणि ब्रावोच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या क्रिस गेलच्या पुढच्या २ ओव्हर्समध्ये एकही बाऊंड्री न मारता पीटरसन - निक्सन यांनी १४ रन्स काढल्या! टेलरच्या जागी बॉलिंगला आलेल्या कॉलिमूरच्या पुढच्याच ओव्हरमध्ये....

मिडलस्टंपवर पडलेला कॉलिमूरचा बॉल निक्सनने मिडऑनला ड्राईव्ह केला आणि १ रनसाठी कॉल दिला...
पीटरसनने त्याच्या कॉलला प्रतिसाद दिला खरा पण बॉल थेट गेला तो मिडऑनला असलेल्या क्रिस गेलच्या हाती...
गेलला शेवटच्या क्षणी बॉल पिकअप करण्यात अपयश आलं...
गेलचा थ्रो विकेटकीपर रामदीनच्या हाती येण्यापूर्वीच डाईव्ह मारत पीटरसनने क्रीज गाठलं!

कॉलिमूरच्या पुढच्याच बॉलवर पीटरसनने मिडविकेटला बाऊंड्री फटकावली!

४ ओव्हर्समध्ये इंग्लंडला ३८ रन्स बाकी होत्या!

इंग्लंडच्या सर्व आशा एकवटल्या होत्या त्या केव्हीन पीटरसनवर!
पीटरसन ९४ रन्सवर खेळत होता!

टेलरच्या ४६ व्या ओव्हरचा पहिलाच बॉल मिडलस्टंपवर पडला...
पीटरसनने लेगसाईडला सरकत तो लाँगऑनला उचलला...
बॉल लाँगऑन बाऊंड्रीपार गेला...
दणदणीत सिक्स ठोकत पीटरसनने सेंचुरी पूर्ण केली होती!

टेलरचा पुढचा बॉल ऑफस्टंपवर पडला...
पीटरसनने तो मिडविकेटला फटकावण्याचा प्रयत्नं केला पण...
बॉल त्याच्या बॅटच्या पट्ट्यात आलाच नाही...
पीटरसनचा मिडलस्टंप उडाला!

९१ बॉल्समध्ये १० बाऊंड्री आणि टेलरला मारलेल्या सिक्ससह पीटरसनने बरोबर १०० रन्स फटकावल्या.
इंग्लंड २६९ / ७!

आणखीन २ रन्सची भर पडल्यावर टेलरच्या त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर टेलरला फटकावण्याचा लियाम प्लंकेटचा प्रयत्नं पार फसला आणि लाँगऑनला ब्रावोने त्याचा कॅच घेतला. इंग्लंड २७१ / ८!

शेवटच्या ३ ओव्हर्समध्ये इंग्लंडला २९ रन्स हव्या होत्या!

पुन्हा एकदा मॅच वेस्ट इंडीजच्या दिशेने झुकली होती...

कॉलिमूरचा पहिलाच बॉल मिडलस्टंपवर आलेला फुलटॉस होता...
निक्सनने तो मिडविकेटला फटकावला... बाऊंड्री!
दुसर्‍या बॉलवर निक्सनला काहीच करता आलं नाही...
कॉलिमूरचा तिसरा बॉल त्याने ऑफस्टंपच्या बाहेरून मिडविकेटला उचलला... बाऊंड्री!
कॉलिमूरचा चौथा बॉल ऑफस्टंपवर पडला...
क्रीज सोडून पुढे सरसावलेल्या निक्सनने पुन्हा तो मिडविकेटला तडकावला... बाऊंड्री!
पाचवा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला बंपर होता...
निक्सनने पूल मारण्याचा प्रयत्नं केला पण बॉल त्याच्या बॅटवर लागलाच नाही...
विकेटकीपर दिनेश रामदीनच्याही डोक्यावरुन जात बॉल बाऊंड्रीपार गेला...
इंग्लंडला फुकटच ४ बाय रन्स मिळाल्या!
शेवटच्या बॉलवर १ रन काढून स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यास चाणाक्षं निक्सन विसरला नाही!

कॉलिमूरच्या ओव्हरमध्ये १७ रन्स फटकावल्या गेल्या होत्या!
मॅचचं पारडं पुन्हा इंग्लंडच्या दिशेने झुकलं होतं!

शेवटच्या २ ओव्हर्समध्ये इंग्लंडल १२ रन्सची आवश्यकता होती!

टेलरच्या ४९ व्या ओव्हरच्या पहिल्या दोन बॉल्सवर निक्सन आणि स्ट्युअर्ट ब्रॉड यांनी २ रन्स काढल्यावर तिसर्‍या बॉलवर निक्सनने लेग ग्लान्सची बाऊंड्री मारली! पुढच्या २ बॉल्सवर २ रन्स निघाल्यावर शेवटच्या बॉलवर निक्सनचा कॅच घेतल्याचं रामदीनने जोरदार अपिल केलं, पण अंपायर रुडी कुर्ट्झनने ते फेटाळून लावलं. टीव्ही रिप्लेमध्ये टेलरचा बॉल निक्सनच्या थायपॅडला लागून गेल्याचं स्पष्टं झालं.

शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडला अवघ्या ४ रन्स हव्या होत्या!

वेस्ट इंडीजच्या दृष्टीने समाधानाची एकच गोष्टं म्हणजे निक्सन स्ट्राईकवर नव्हता.
शेवटच्या ओव्हरसाठी लाराने बॉलिंगला आणलं ड्वेन ब्रावोला!

ब्रावोचा पहिला बॉल यॉर्कर होता....
कसा कोणास ठाऊक, पण ब्रॉडने तो लाँगऑफला फटकारला आणि १ रन काढली...

५ बॉल्स - ३ रन्स!

ब्रावोचा दुसरा बॉल मिडलस्टंपवर पडला...
निक्सनने क्रीजमधून पुढे सरसावत मिडविकेटला फटकावण्याचा प्रयत्नं केला पण...
ब्रावोच्या स्लो बॉलचा त्याला अजिबात अंदाज आला नाही...
ऑफस्टंपवरची एकच बेल खाली पडली!

३९ बॉल्समध्ये ६ बाऊंड्रीसह निक्सनने ३८ रन्स फटकावल्या.
इंग्लंड २९८ / ९!

४ बॉल्स - ३ रन्स!

ब्रावोचा बॉल लेगस्टंपच्या बाहेर पडला आणि जेम्स अँडरसनच्या पॅडवर लागला...
ब्रावो एलबीडब्ल्यूचं अपिल करत असताना अँडरसन आणि ब्रॉड यांनी लेगबाय घेण्यात कोणतीही हयगय केली नाही!

३ बॉल्स - २ रन्स!

ब्रावोचा स्लो बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
ब्रॉडने तो ऑफसाईडला खेळला पण कव्हर्समधून धावत आलेल्या गेलने ब्रॉड - अँडरसन यांना रन घेण्याची कोणतीही संधी दिली नाही!

२ बॉल्स - २ रन्स!

इंग्लंडच्या ड्रेसिंगरुममध्ये विलक्षण तणावाचं वातावरण होतं!

कॉलिंगवूडने लेस्टरशायर कौंटीतील ब्रॉडचा सहकारी असलेल्या निक्सनला विचारलं,
"Do you reckon he's got this? Where's he going to hit it?"
"He'll go over extra cover." निक्सन शांतपणे उत्तरला!

ब्रावोचा बॉल ऑफस्टंपच्या किंचित बाहेर पडला...
ब्रॉड लेगसाईडला सरकला आणि त्याने बॉल ऑफसाईड उचलला...
एक्स्ट्राकव्हरला असलेल्या डेव्हन स्मिथच्या डोक्यावरुन!

स्मिथने बॉल पिकअप करेपर्यंत ब्रॉड आणि अँडरसन यांनी २ रन्स पूर्ण केल्या होत्या!
इंग्लंडने १ विकेटने मॅच जिंकली!

गॅरी सोबर्स, क्लाईव्ह लॉईड, व्हिव्हियन रिचर्ड्स, रिची रिचर्ड्सन यांच्याप्रमाणेच वेस्ट इंडीजसाठीच्या शेवटच्या मॅचमध्ये ब्रायन लाराच्या नशिबी पराभवच आला होता!

लाराप्रमाणेच पॉल निक्सनचीही ही शेवटची मॅच ठरली!
पुन्हा कधी त्याची इंग्लंड संघात निवडच झाली नाही!

मॅन ऑफ द मॅच म्हणून केव्हीन पीटरसनची निवड करण्यात आली.

पीटरसनने सेंचुरी ठोकल्यावर प्रथमच इंग्लंडने वन डे मॅच जिंकली होती!
त्याने सेंचुरी ठोकलेली पहिली वन डे टाय झाल्यावर उरलेल्या तीनही वेळेला इंग्लंडला पराभव पत्करावा लागला होता!

मॅचनंतर मायकेल आर्थर्टनशी बोलताना लारा म्हणाला,
“I’ve had a tremendous time playing for West Indies … my dream was to see West Indies cricket stay on top and not doing that has been the most disappointing thing.”

शेवटी लाराने प्रेक्षकांना विचारलं,
"Did I entertain?"

केन्सिंग्टन ओव्हलवरचे प्रेक्षक, जगभरातील क्रिकेटरसिक आणि प्रतिस्पर्धी इंग्लिश खेळाडूंचही एका सुरात आलेलं उत्तर होतं,
"Yes!"

....आणि टाळ्यांच्या कडकडाटात ब्रायन चार्ल्स लाराच्या कारकिर्दीवर पडदा पडला!

क्रीडालेख