वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - सेमीफायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
12 Feb 2017 - 9:25 am

४ नोव्हेंबर १९८७
गद्दाफी, लाहोर

लाहोरच्या गद्दाफी स्टेडीयमवर यजमान पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल खेळली जाणार होती. न्यूझीलंडविरुद्धच्या ग्रूपमधल्या शेवटच्या मॅचमध्ये गावस्कर - श्रीकांत यांच्या आतषबाजीने ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या स्थानावर ढकललं होतं. ग्रूपमधल्या आपल्या सगळ्या मॅचेस भारतात खेळणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने पाकिस्तानविरुद्ध आणि ते देखिल पाकिस्तानमध्ये खेळणं निश्चितच कठीण आव्हान होतं. या वर्ल्डकपनंतर आपण क्रिकेटमधून रिटायर होत असल्याची आणि लाहोरची मॅच ही पाकिस्तानमधली आपली अखेरची मॅच असल्याचं इमरान खानने जाहीर केलेलं होतं. रिटायर होण्यापूर्वी ही मॅच जिंकून कलकत्त्याच्या ईडन गार्डन्सवर वर्ल्डकप जिंकण्याच्या इराद्यानेच इमरान मैदानात उतरणार होता!

पाकिस्तानी संघात रमिझ राजा, मन्सूर अख्तर, सलिम मलिक, जावेद मियांदाद, एजाज अहमद असे बॅट्समन होते. अनुभवी अब्दुल कादीर, वासिम अक्रम, सलिम जाफर, तौसिफ अहमद असे बॉलर्स पाकिस्तानकडे होते. सलिम युसुफसारखा विकेटकीपर बॅट्समनही पाकिस्तानच्या संघात होता. वेस्ट इंडीजविरुद्ध मोक्याच्या क्षणी हाफ सेंच्युरी ठोकून त्याने पाकिस्तानला मॅच जिंकून दिली होती. अर्थात पाकिस्तानचा खरा आधारस्तंभ होता तो म्हणजे अर्थातच कॅप्टन इमरान खान!

अ‍ॅलन बॉर्डरच्या ऑस्ट्रेलियन संघात डेव्हीड बून, जेफ मार्श, डीन जोन्स, स्वतः बॉर्डर असे बॅट्समन होते. टॉम मूडीला दुखापत झाल्यामुळे त्याच्याजागी माईक व्हॅलेटाचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला होता. विकेटकीपर ग्रेग डायर आणि क्रेग मॅकडरमॉट, ब्रूस रीड, सायमन ओडोनेल, टिम मे असे बॉलर्सही ऑस्ट्रेलियाकडे होते. स्टीव्ह वॉसारखा ऑलराऊंडर ऑस्ट्रेलियाच्या संघात होता. अर्थात लाहोरच्या मैदानात प्रेक्षकांचा पूर्ण पाठींबा पाकिस्तानला असताना ऑस्ट्रेलियाचा त्यांच्यापुढे कितपत निभाव लागणार होता हा खरा प्रश्नं होता.

टॉम मूडी म्हणतो,
"I remember that being a bit of a body blow. We had this enormous confidence in our campaign, and then suddenly it was like we got derailed by being told, 'By the way, you're playing a semi-final in Lahore out of India', so I think everyone felt it may have just taken the momentum away,"

अ‍ॅलन बॉर्डरने टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. इमरानच्या पहिल्याच ओव्हरमध्ये जेफ मार्शची एज लागली पण दुसर्‍या स्लिपमध्ये असलेल्या मन्सूर अख्तरने हाफव्हीलीवर बॉल उचलला. बून - मार्श यांनी कोणतीही रिस्क न घेता इमरानला खेळून काढण्याचा आणि सलिम जाफरला फटकावण्याचा मार्ग पत्करला. सलिम जाफर ऐवजी बॉलिंगला आलेल्या वासिम अक्रमलाही दोघांनी बाऊंड्री तडकावल्या. १७ ओव्हर्समध्ये बून - मार्श यांनी ७३ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केल्यावर...

तौसिफ अहमदचा बॉल मार्शने स्क्वेअरलेगला फ्लिक केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
बून त्याला प्रतिसाद देत क्रीजधून दोन पावलं पुढे आला पण...
स्क्वेअरलेगला सलिम मलिकने बॉल पिकअप केलेलं बूनच्या नजरेस पडल्यावर तो जागीच थबकला...
मार्श परत फिरला खरा पण तो क्रीजमध्ये पोहोचण्यापूर्वीच मलिकच्या थ्रोने समोर दिसत असलेल्या एकमेव स्टंपचा वेध घेतला!

५७ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह ३१ रन्स काढल्यावर मार्श रनआऊट झाला.
ऑस्ट्रेलिया ७३ / १!

मार्श परतल्यावर आलेल्या डीन जोन्सने सुरवातीला फटकेबाजीच्या मोहात न पडता १-२ रन्स काढण्यावर भर दिला. ऑस्ट्रेलियाच्या इनिंग्जच्या १९ व्या ओव्हरमध्ये...

अब्दुल कादीरचं जोन्सविरूद्धंचं एलबीडब्ल्यूचं जोरदार अपिल अंपायर डिकी बर्डने फेटाळून लावलं...
कादीरच्या पुढच्याच बॉलवर जोन्सने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली.
कादीरचा तिसरा बॉल गुगली होता...
जोन्स आणि विकेटकीपर सलिम युसुफ दोघांच्याही अपेक्षेपेक्षा हा बॉल बाऊंस झाला...
फ्रंटफूटवर डिफेन्सिव पद्धतीने खेळणार्‍या जोन्सच्या पॅडच्या फ्लॅपला लागून बॉल थेट सलिम युसुफच्या जबड्यावर आदळला....

पाकिस्तान संघाच्या डॉक्टरने युसुफची दुखापत तपासल्यावर त्याला ड्रेसिंगरुममध्ये परतण्याचा सल्ला दिला. पाकिस्तानच्या संघात इतर कोणालाही विकेटकीपींगचा अनुभव नसल्याने युसुफच्या जागी विकेटकीपर म्हणून कोण उभं राहणार असा प्रश्नं निर्माण झाला. अखेर कोणतंही आव्हान स्वीकारण्यास सदैव तयार असलेल्या पाकिस्तानच्या व्हाईस कॅप्टनने ही जबाबदारी घेतली...

जावेद मियांदाद!

कादीरच्या जागी सलिम जाफर बॉलिंगला आल्यावर बून - जोन्स यांनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानी बॉलर्सना फटकावण्याचा मार्ग पत्करला. जोन्सने जाफरला लागोपाठ दोन स्क्वेअरकटच्या बाऊंड्री तडकवल्या. जाफरच्या जागी बॉलिंगला आलेल्या सलिम मलीकलाही बूनने बाऊंड्री ठोकली. बून - जोन्स यांनी १४ ओव्हर्समध्ये ८२ रन्स फटकावल्यावर...

३१ व्या ओव्हरचा सलिम मलिकचा शेवटचा बॉल...
लेगस्टंपवर पडलेला बॉल स्क्वेअरलेगला फ्लिक करण्याच्या बूनचा प्रयत्नं फसला..
बॉल खेळताना क्रीज सोडून पुढे आलेला बून क्रीजमध्ये परतण्यापूर्वीच...
लेगसाईडला गेलेला बॉल कलेक्ट करुन मियांदादने बेल्स उडवल्या!
बून स्टंप झाला!

१९७५ च्या वर्ल्डकपमध्ये लेगब्रेकवर क्लाईव्ह लॉईडची विकेट घेणार्‍या मियांदादने १२ वर्षांनी १९८७ मध्ये बूनला स्टंप केलं होतं!
वर्ल्डकपच्या इतिहासात बॉलिंग करुन विकेट घेणारा आणि विकेटकीपर म्हणून स्टंपिंग करणारा तो पहिलाच खेळाडू!
( पुढे १९९६ च्या एकाच वर्ल्डकपमधल्या दोन वेगवेगळ्या मॅचेसमध्ये जिमी अ‍ॅडम्सने हा पराक्रम केला! )

९१ बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह बूनने ६५ रन्स फटकावल्या.
ऑस्ट्रेलिया १५५ / २!

या अनपेक्षित धक्क्यातून ऑस्ट्रेलिया सावरण्यापूर्वीच...
तौसिफ अहमदच्या पुढच्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर कट् मारण्याच्या प्रयत्नात डीन जोन्सची दांडी उडाली!

४५ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह जोन्सने ३८ रन्स फटकावल्या.
ऑस्ट्रेलिया १५५ / ३!

बून आणि जोन्स एकापाठोपाठ एक परतल्यावर इमरानने कादीरला बॉलिंगला आणलं. बॉर्डर आणि माईक व्हॅलेटा यांनी कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढण्याचा मार्ग पत्करला. सलिम मलिकच्या जागी बॉलिंगला आलेल्या इमरानला बॉर्डरने कट् आणि ड्राईव्हव्या बाऊंड्री तडकावल्या. व्हॅलेटानेही आक्रमक पवित्रा घेत कादीरला मिडविकेट आणि स्क्वेअरलेगला दोन बाऊंड्री ठोकल्या. या दोघांनी ६० रन्सची पार्टनरशीप केल्यावर...

वासिम अक्रमचा बॉल बॉर्डरने ड्राईव्ह केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
मिडऑफला असलेल्या मन्सूर अख्तरने बॉल पिकअप केला...
मन्सूरचा साईडऑन थ्रो अचूक स्टंपवर लागला...
बॉर्डर रनआऊट झाला!
ऑस्ट्रेलिया २१५ / ४!

बॉर्डर परतल्यावर आलेला स्टीव्ह वॉ आणि व्हॅलेटा यांनी २१ रन्स जोडल्यावर इमरानने व्हॅलेटाच लेगस्टंप उडवला. ५० बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह व्हॅलेटाने ४८ रन्स फटकावल्या. इमरानच्याच ओव्हरमध्ये दोन बॉल्स नंतर...

मिडलस्टंपवर पडलेला इमरानचा बॉल ओडोनेलच्या पॅडला लागून पीचवरच पडला...
चाणाक्षं स्टीव्ह वॉने लेगबाय घेण्याच्या हेतूने ओडोनेलला कॉल दिला पण...
स्टीव्ह वॉ त्याच्या शेजारी येऊन पोहोचला तरी ओडोनेल जागचा हललाच नाही!
आपला फॉलो थ्रू पूर्ण करुन इमरानने बॉल पिकअप केला...
नॉनस्ट्रायकर एन्डला स्टंपशेजारी पोहोचलेल्या मन्सूर अख्तरने इम्रानचा थ्रो कलेक्ट करुन बेल्स उडवल्या!
स्टीव्ह वॉने पॅव्हेलियनची वाट धरली पण...

स्क्वेअरलेग अंपायर डेव्हीड शेपर्डच्या तीक्ष्णं नजरेने एक बारीक गोष्टं अचूक टिपली होती...
इमरानचा बॉल पॅडवर लागल्यावर ओडोनेल क्रीजमधून बाहेर आला होता...
दोघांपैकी एकजण रनआऊट होणार हे ध्यानात येताच ओडोनेलने आपली बॅट क्रीजमध्ये टेकवली होती...
स्टीव्ह वॉ ओडोनेलला क्रॉस करुन क्रीजमध्ये पोहोचला तेव्हाही ओडोनेलची बॅट क्रीजमध्ये टेकलेली होती...
पण....
ज्या क्षणी मन्सूरने बेल्स उडवल्या नेमक्या त्या क्षणी ओडोनेलने क्रीजमध्ये टेकलेली आपली बॅट उचलली होती!

डेव्हीड शेपर्ड आणि डिकी बर्ड यांनी सेकंद चर्चा केली आणि सायमन ओडोनेल रनआऊट असल्याचा निर्णय दिला!
एव्हाना बाऊंड्रीपर्यंत पोहोचलेला स्टीव्ह वॉला पुन्हा क्रीजमध्ये परतला!

या निर्णयाचा काय परिणाम होणार होता?

स्टीव्ह वॉने इमरानला थर्डमॅनला बाऊंड्री मारली, पण त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर इमरानने विकेटकीपर ग्रेग डायरची दांडी उडवली!
इमरानच्या त्या ओव्हरमध्ये ५ रन्स निघाल्या होत्या, पण तीन बॅट्समन आऊट झाले!
ऑस्ट्रेलिया २४१ / ७!

आणखीन ८ रन्सची भर पडल्यावर ४९ व्या ओव्हरमध्ये इमराननेच क्रेग मॅकडरमॉटचा मिडल स्टंप उडवला!
इमरानच्या पुढच्याच बॉलवर टिम मे बोल्ड होण्यापासून थोडक्यात वाचला!
४९ ओव्हर्सनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता २४९ / ८

शेवटची ओव्हर वासिम अक्रमला देण्यचा इमरानचा इरादा होता, परंतु ओव्हर्स मोजण्यामध्ये त्याचा गोंधळ झाल्याचं डेव्हीड शेपर्डने इमरानच्या ध्यानात आणून दिलं. स्वतः इमरान, अक्रम, कादीर आणि तौसिफ यांच्या १० ओव्हर्स संपल्या होत्या त्यामुळे शेवटाच्या ओव्हरसाठी सलिम जाफर किंवा सलिम मलिक असे दोनच पर्याय पाकिस्तानसमोर होते. जाफरच्या पहिल्या ५ ओव्हर्समध्ये ३९ रन्स फटकावल्या गेल्या होत्या तर मलिकच्या ४ ओव्हर्समध्ये २२, पण इमरानने पसंती दिली सलिम जाफरला!

नेमका का निर्णय पाकिस्तानसाठी घातक ठरणार होता!

जाफरच्या पहिल्याच बॉलवर स्टीव्ह वॉने लाँगऑनला दणद्णीत सिक्स ठोकली...
दुसरा बॉलही स्टीव्ह वॉने मिडविकेटला फटकावला. यावेळी त्याला बाऊंड्री मिळाली...

तिसरा बॉल फुलटॉस होता. स्टीव्ह वॉने लाँगऑनला ड्राईव्ह केला आणि दोन रन्स काढल्या. खरंतर लाँगऑनवरुन आलेला थ्रो स्टंप्सपासून बराच दूर असल्याने टिम मे रनआऊट होण्यापासून वाचला होता, पण मे ला त्याची पर्वा नव्हती! तो म्हणतो,

"Steve Waugh was hitting it brilliantly and my job was only to put head down and bolt up and down the wicket. I was not bothered about getting run out. All that mattered was to get Steve back on strike."

चौथा बॉलही फुलटॉसच होता, पण यावेळी स्टीव्ह वॉने लेगस्टंपच्या बाहेर जात तो एक्स्ट्राकव्हरला तडकावला आणि पुन्हा दोन रन्स काढल्या...
जाफरचा पाचवा बॉल अचूक टप्प्यावर पडलेला यॉर्कर होता. स्टीव्ह वॉ त्यावर काहीच करता आलं नाही.

शेवटचा बॉल लेगस्टंपवर पडलेली हाफव्हॉली होती. स्टीव्ह वॉने तो स्क्वेअरलेगला फ्लिक केला पण स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर एजाज अहमदच्या मिसफिल्डमुळे त्याला आयतीच बाऊंड्री मिळाली!

जाफरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये १८ रन्स फटकावल्या गेल्या होत्या.
२८ बॉल्समध्ये ४ बाऊंड्री आणि जाफरला मारलेल्या सिक्ससह स्टीव्ह वॉने ३२ रन्स तडकावल्या!
५० ओव्हर्सनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता २६७ / ८!

वर्ल्डकपची फायनल गाठण्यासाठी पाकिस्तानला २६८ रन्सचं टार्गेट होतं.

पाकिस्तानच्या इनिंग्जच्या पहिल्याच ओव्हरमध्ये...

मन्सूर अख्तरने मॅकडरमॉटचा बॉल कव्हर्समध्ये खेळला आणि एक रनसाठी कॉल दिला...
रमिझ राजाने मन्सूरच्या कॉलला प्रतिसाद दिला पण...
कव्हरपॉईंटला बॉर्डरने बॉल पिकअप केलेला पाहून मन्सूरने मागे वळून आपलं क्रीज गाठलं...
रमिझ परत फिरला पण आता उशिर झाला होता...
बॉर्डरचा थ्रो कलेक्ट करुन मॅकडरमॉटने बेल्स उडवल्या तेव्हा रमिझ क्रीजच्या जवळपासही पोहोचला नव्हता...
पाकिस्तान २ / १!

रमिझ राजा आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या सलिम मलिकने आक्रमक पवित्रा घेत मॅकडरमॉट - रीड यांना फटकावून काढण्याचा मार्ग पत्करला. ब्रूस रीडला त्याने लागोपाठ दोन बाऊंड्री तडकावल्या. मलिकची फटकेबाजी सुरु असताना मन्सूरला मात्रं ऑस्ट्रेलियन बॉलर्सचा मुकाबला करणं कठीण जात होतं. या दोघांनी ३५ रन्सची पार्टनरशीप केल्यावर मॅकडरमॉटने इनस्विंगरवर मन्सूरचा मिडलस्टंप उडवला. आणखीन जेमतेम १ रनची भर पडते तोच स्टीव्ह वॉचा पहिलाच बॉल लेगला फ्लिक करण्याच्या नादात मलिकच्या बॅटची लिडींग एज लागली आणि मिडऑनला मॅकडरमॉटने त्याचा आरामात कॅच घेतल. पाकिस्तान ३७ / ३!

मॅच जिंकण्यासाठी पाकिस्तानला अद्याप जवळपास ४० ओव्हर्समध्ये २३१ रन्सची आवश्यकता होती.
क्रीजवर होते.. इमरान खान आणि जावेद मियांदाद!

स्टीव्ह वॉच्या पहिल्याच बॉलवर इमरान एलबीडब्ल्यू असल्याचं जोरदार अपिल अंपायर डेव्हीड शेपर्डने फेटाळून लावलं.
पुढच्याच ओव्हरमध्ये...
ब्रूस रीडच्या आऊटस्विंगरवर मियांदादची एज लागली पण...
विकेटकीपर डायर आणि वाईड स्लिपमध्ये असलेला बॉर्डर यांच्यामधून बॉल थर्डमॅन बाऊंड्रीपार गेला!

इमरान आणि मियांदाद यांनी मग सावधपणे कोणतीही रिस्क न घेता ऑस्ट्रेलियन बॉलर्सना खेळून काढत पाकिस्तानचि इनिंग्ज सावरण्यास सुरवात केली. फटकेबाजीच्या मोहात न पडता १-२ रन्स घेण्यावर दोघांनी भर दिला होता. रीड - ओडोनेल - स्टीव्ह व्हॉ यांना दोघंही आरामात खेळत होते. एकदा सेट झाल्यावर इमरानने स्टीव्ह वॉला फाईनलेग आणि मिडविकेटला दोन बाऊंड्री तडकावल्या. पाठोपाठ ओडोनेलला त्याने कटची बाऊंड्री मारली. २४ ओव्हर्समध्ये पाकिस्तानने ८८ / ३ पर्यंत मजल मारली असतानाच...

ओडोनेलचा बॉलवर जावेदने मारलेला कव्हरड्राईव्ह हवेत गेला...
शॉर्ट एक्स्ट्राकव्हरला असलेल्या बॉर्डरने डाईव्ह मारली...
पण बॉर्डरच्या हातातून बॉल सुटला..!

मियांदादने मग सावध पवित्रा घेत इमरानला सपोर्ट देण्याचाच मार्ग पत्करला. इमरानने ओडोनेलला मिडविकेटमधून बाऊंड्री मारल्यावर बॉर्डरने त्याच्याऐवजी टिम मेला बॉलिंगला आणलं पण आता मियांदादने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजी करण्यास सुरवात केली. टिम मेच्या बॉलवर मियांदादने रिव्हर्स स्वीपची बाऊंड्री मारल्यावर बॉर्डरही गोंधळून गेला. ३७ / ३ अशा अवस्थेतून इमरान - मियांदाद यांनी ११२ रन्सची पार्टनरशीप करुन पाकिस्तानला सावरलं होतं. स्टेडीयममधल्या प्रेक्षकांचा दोघांनाही, खासकरुन इमरानला जोरदार पाठींबा होता. हे दोघं आरामात पाकिस्तानला मॅच जिंकून देणार असं वाटत असतानाच...

टिम मेच्या जागी बॉलिंगला आलेल्या बॉर्डरला फटकावण्याच्या नादात इमरानची बॉटम एज लागली...
ग्रेग डायरने कॅच घेण्यात कोणतीही कसूर केली नाही!
८४ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह इमरानने ५४ रन्स फटकावल्या होत्या.
पाकिस्तान १५० / ४!

शेवटच्या १५ ओव्हर्समध्ये पाकिस्तानला ११८ रन्सची आवश्यकता होती!

इमरान आऊट झाल्यावर एजाज अहमदच्या आधी बॅटींगला आला वासिम अक्रम!
नेमक्या याच वेळी बॉर्डरने बॉलिंगला आणलं 'बिली द किड' मॅकडरमॉटला!

वासिम अक्रमने अपेक्षेप्रमाणे सुरवातीपासूनच फटकेबाजीला सुरवात केली. मॅकडरमॉटला त्याने लाँगऑफवर दणदणीत सिक्स ठोकली. पुढच्याच ओव्हरमध्ये बॉर्डरलाही अक्रमने मिडविकेटवरुन सिक्स तडकावली. एजाजच्या आधी अक्रमला बॅटींगला पाठवण्याची इमरानची चाल यशस्वी होणार असं वाटत असतानाच मॅकडरमॉटच्या अचूक यॉर्करवर अक्रमचा लेगस्टंप उडवला. १३ बॉल्समध्ये दोन सिक्ससह अक्रमने २० रन्स फटकावल्या. पाकिस्तान १७७ / ५!

अक्रम परतल्यावर बॅटींगला आलेल्या एजाज अहमदनेही बॉर्डरला बाऊंड्री ठोकत आक्रमक सुरवात केली. मियांदाद - एजाज यांनी १५ रन्स जोडल्यावर ब्रूस रीडला फटकावण्याच्या नादात स्क्वेअरलेग बाऊंड्रीवर डीन जोन्सने एजाजचा कॅच घेतला. पाकिस्तान १९२ / ६!

अद्याप ९ ओव्हर्समध्ये पाकिस्तानला ७६ रन्स हव्या होत्या!

अर्थात जावेद मियांदाद क्रीजवर असेपर्यंत काहीही अशक्यं नाही असा पाकिस्तानी प्रेक्षकांचा विश्वास होता! एजाज आऊट झाल्यावर बॅटींगला आलेला विकेटकीपर सलिम युसुफ आणि मियांदाद या दोघांनी फटकेबाजी करत पाकिस्तानचा स्कोर २१२ पर्यंत नेल्यावर...

ब्रूस रीडचा मिडलस्टंपवर पडलेला बॉल मियांदादने लेगला तडकावण्याचा प्रयत्नं केला पण...
बॅट आणि बॉल यांची गाठ पडलीच नाही...
मियांदादचा ऑफस्टंप उडाला!
पाकिस्तान २१२ / ७!

शेवटच्या ६ ओव्हर्समध्ये पाकिस्तानला ५६ रन्सची आवश्यकता होती!

ग्रूपमध्ये वेस्ट इंडी़जविरुद्धच्या मॅचमध्ये हिरो ठरलेला अब्दुल कादीर आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला सलिम युसुफ यांनी फटकेबाजीला सुरवात केली. युसुफने स्टीव्ह वॉला स्क्वेअरलेगला बाऊंड्री तडकावल्यावर कादीरने वॉलाच मिडऑफवरुन मारलेला शॉट सिक्स जाण्यापासून थोडक्यात वाचला! स्टीव्ह वॉच्या ओव्हरमध्ये १५ रन्स फटकावल्या गेल्यावर पुन्हा मॅचचं पारडं पाकिस्तानकडे झुकलं. युसुफ - कादीर यांनी २४ रन्स फटकावल्यावर मॅकडरमॉटला फटकावण्याच्या नादात विकेटकीपर ग्रेग डायरने युसुफचा कॅच घेतला. पाकिस्तान २३६ / ८!

अद्याप १५ बॉल्समध्ये पाकिस्तानला ३२ रन्स हव्या होत्या!

पाकिस्तानच्या उरल्यासुरल्या सर्व आशा आता कादीरवर होत्या. स्टीव्ह वॉच्या ४८ व्या ओव्हरमध्ये कादीरला इनसाईड एज लागून सुदैवी बाऊंड्रीही मिळाली. रनआऊट होण्याची पर्वा न करता बॅटला बॉल लागताक्षणीच कादीर आणि जाफर रन्स काढण्यासाठी धावत होते! ४८ व्या ओव्हरच्या अखेरीस पाकिस्तानचा स्कोर होता २४७ / ८!

पाकिस्तानला मॅच जिंकण्यासाठी अद्याप २ ओव्हर्स्मध्ये २१ रन्स बाकी होत्या.

मॅकडरमॉटच्या ४९ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर जाफरला काहीच करता आलं नाही...
दुसर्‍या बॉलवर मॅकडरमॉटला स्लॉग करण्याच्या नादात डायरने जाफरचा कॅच घेतला.
पाकिस्तान २४७ / ९!

कादीर आणि तौसिफ अहमद यांनी पुढच्या ३ बॉल्समध्ये २ रन काढल्या...
अखेर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर ग्रेग डायरने तौसिफचा कॅच घेतला!
पाकिस्तान २४९ मध्ये ऑल आऊट झाले!

क्रेग मॅकडरमॉटने ४४ रन्समध्ये ५ विकेट्स घेत ईडन गार्डन्सवरची फायनल गाठण्याचं इमरानचं स्वप्नं उधळून लावलं!
ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपची फायनल गाठली!

मॅन ऑफ द मॅच म्हणून ५ विकेट्स घेणार्‍या क्रेग मॅकडरमॉटची निवड करण्यात आली.

१८ रन्सनी ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकली होती!
सलिम जाफरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये स्टीव्ह वॉने फटकावलेल्या १८ रन्स निर्णायक ठरल्या होत्या!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

12 Feb 2017 - 9:56 am | गॅरी ट्रुमन

नेहमीप्रमाणे जबरदस्त लेख.

या सामन्याची एक आठवण म्हणजे ऑस्ट्रेलियाची बॅटिंंग सुरू असताना स्टेडिअममध्ये 'ले जाएंगे ले जाएंगे हम वर्ल्डकप ले जाएंगे' अशा घोषणा होत होत्या. मियांदादचा उडलेला झेल नक्की कोण पकडणार या गोंधळातून अ‍ॅलन बॉर्डर आणि डायर या दोघांनीही पकडला नाही आणि त्यातून चौकार गेला हे दृश्यही अजूनही आठवते.

पाकिस्तानचा संघ शेवटपर्यंत चिवटपणे लढतो असा विश्वास असल्यामुळे शेवटी अब्दुल कादिर आणि तौसिफ अहमद खेळत असतानाही पाकिस्तानच जिंकणार असे वाटत होते. पण क्रेग मॅकडरमॉटने तसे होऊ दिले नाही.

पाकिस्तानने पहिली सेमीफायनल गमावल्यानंतर काय आकाश ठेंगणे झाले होते. आता दुसर्‍या दिवशीची इंग्लंडविरूध्दची सेमीफायनल जिंकून कलकत्त्याला इडन गार्डनमध्ये ऑस्ट्रेलियाला नमविले की रिलायन्स कप आपलाच असे मलाच नाही तर बहुसंख्य क्रिकेटचाहत्यांना वाटायला लागले असावे. पण कुठचे काय....

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2017 - 4:09 pm | श्रीगुरुजी

या सामन्यापूर्वी इम्रान अहंकाराने फुरफुरत होता. "आम्ही भारताला भारतामध्ये हरवून विश्वचषक जिंकण्यास उत्सुक आहोत" असे त्याने सांगितले होते. पाकिस्तान यावेळी विश्वचषक जिंकणारच असा पाकिस्तानी संघाला व संपूर्ण पाकिस्तानला प्रचंड अंधविश्वास होता. परंतु ऑस्ट्रेलियाने तो पार धुळीस मिळविला. या सामन्यात शेवटची १० षटके सुरू असताना अक्रमने लागोपाठ ३ वाईड चेंडू टाकल्याचे आठवते. हा सामना हरल्यानंतर लाहोरवर प्रेतकळा पसरली होती असे वाचल्याचे आठवते. हा संपूर्ण सामना मी पाहिला होता व पाकिस्तान हरताना अत्यानंद होत होता. अर्थात दुसर्‍याच दिवशी या अत्यानंदाला टाचणी लागली होती.

गॅरी ट्रुमन's picture

12 Feb 2017 - 9:57 pm | गॅरी ट्रुमन

पाकिस्तान यावेळी विश्वचषक जिंकणारच असा पाकिस्तानी संघाला व संपूर्ण पाकिस्तानला प्रचंड अंधविश्वास होता. परंतु ऑस्ट्रेलियाने तो पार धुळीस मिळविला.

यात पाकिस्तान ऐवजी भारत लिहिले आणि ऑस्ट्रेलियाऐवजी इंग्लंड लिहिले तर फार परिस्थिती वेगळी नव्हती :(

भारताचा इंग्लंडविरूध्दचा सेमीफायनलचा सामना होता ५ नोव्हेंबर १९८७ रोजी म्हणजे गुरूवारी. त्यावेळी मॅच बघायला म्हणून मुंबईतील अनेक खाजगी ऑफिसांनी सुटी दिली होती आणि तो दिवस शनीवरी भरून काढावा असे सांगितले होते. आमच्या बिल्डिंगमधील सगळेच त्या दिवशी घरी होते आणि सगळे मॅच बघत होते. अर्थातच असे पराभव पचवायण्याच्या बाबतीत आपण पाकिस्तानपेक्षा अधिक परिपक्व आहोत (असे मला १९९६ च्या इडन गार्डनवरील श्रीलंकेविरूध्दच्या सेमीफायनलपर्यंत वाटत होते) त्यामुळे मुंबईवर प्रेतकळा वगैरे पसरली नाही पण माझ्यासकट अनेकांना अतीव दु:ख नक्कीच झाले होते.

इडन गार्डनवरील प्रकाराने मात्र त्या समजाला तडा गेला. १९९९ मध्ये इडन गार्डनवरच पाकिस्तानविरूध्दच्या कसोटीच्या वेळी परत एकदा हुल्लडबाजी झाल्यावर सगळे स्टेडिअम खाली करून सामना खेळवला गेला होता. नशीबाने त्यानंतर असे काही झालेले नाही.