वर्ल्डकप क्लासिक्स - १९९९ - सेमीफायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रीका

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
23 Feb 2017 - 9:29 am

१७ जून १९९९
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

वॉरीकशायर काऊंटीचं माहेरघर असलेल्या एजबॅस्टनच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल रंगणार होती. या मॅचमधील विजेत्या संघाची लॉर्ड्सवर फायनलमध्ये गाठ पडणार होती ती पाकिस्तानशी. ओल्ड ट्रॅफर्डच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा आरामात पराभव करुन पाकिस्तान फायनलमध्ये धडकले होते. वास्तविक सुपरसिक्समध्ये प्रत्येक मॅच जिंकणं आवश्यक असताना दक्षिण आफ्रीकेविरुद्धच ऑस्ट्रेलिया कठीण परिस्थितीत सापडली होती, पण स्टीव्ह वॉचा कॅच पकडल्यावर बॉलवर नियंत्रण मिळवण्यापूर्वीच सेलिब्रेशनच्या नादात हर्शेल गिब्जच्या हातातून बॉल सुटला आणि याचा पुरेपूर फायदा उठवत सेंच्युरी ठोकून स्टीव्ह वॉने ऑस्ट्रेलियाला तारलं होतं!

मॅचपूर्वी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मानसिक दडपण आणणं - स्टीव्ह वॉच्या शब्दात Mental Disintegration - यात ऑस्ट्रेलियनांचं तोंड कोणीच धरु शकणार नाही!
हर्शेल गिब्जने सोडलेल्या कॅचची आठवण करुन दिली नाही तर तो स्टीव्ह वॉ कसला?

"I wouldn't want to be in Gibbs' shoes!" मॅचपूर्वी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना स्टीव्ह वॉ म्हणाला, "There will be a lot of pressure on him, but that's the nature of one-day cricket. You put yourself on the line and he made an error. I hope it plays on his mind."

ऑस्ट्रेलियाने चार दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रीकेविरुद्ध झालेल्या मॅचमधलाच संघच सेमीफायनलला कायम ठेवला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघात करण्यात आलेला एकमेव बदल म्हणजे दुखापतीतून सावरलेला डॅरन लिहमन डॅमियन मार्टीनच्या जागी संघात परतला होता. मार्क आणि स्टीव्ह हे वॉ बंधू, रिकी पाँटींग, डॅरन लिहमन, मायकेल बेव्हन असे बॅट्समन ऑस्ट्रेलियाकडे होते आणि त्यांच्या जोडीला होता तडाखेबंद विकेटकीपर - बॅट्समन अ‍ॅडम गिलख्रिस्ट! टॉम मूडीसारखा कित्येक वर्षांचा कौंटी क्रिकेटचा अनुभव असलेला ऑलराऊंडर आणि ग्लेन मॅकग्राथ, शेन वॉर्न, डॅमियन फ्लेमिंग, पॉल रायफल असे बॉलर्स ऑस्ट्रेलियाच्या संघात होते!

दक्षिण आफ्रीकेनेही एकमेव अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमधलाच संघ मैदानात उतरवला होता. गॅरी कर्स्टन, हर्शेल गिब्ज, डॅरील कलिनन, कॅप्टन हॅन्सी क्रोनिए, जाँटी र्‍होड्स असे बॅट्समन दक्षिण आफ्रीकेच्या संघात होते. मार्क बाऊचरसारखा विकेटकीपर - बॅट्समन होता. दक्षिण आफ्रीकेची बॉलिंगही ऑस्ट्रेलियाच्या तोडीस तोड होती. दक्षिण आफ्रीकेच्या बॉलिंगचा मुख्य भार होता अ‍ॅलन डोनाल्ड आणि शॉन पोलॉक यांच्यावर! त्यांच्या जोडीला स्टीव्ह एलवर्दी होता. वर्ल्डकपमध्ये जोरदार फॉर्ममध्ये असलेला लान्स क्लूसनरसारखा धोकादायक ऑलराऊंडर दक्षिण आफ्रीकेच्या संघात होताच, पण दक्षिण आफ्रीकेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं दुखापतीतून सावरलेला जॅक कॅलिस निकी बोयेच्या जागी परतला होता!

हॅन्सी क्रोनिएने टॉस जिंकल्यावर सर्वांच्याच अपेक्षेला धक्का देत फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला!
क्रोनिएचा हा निर्णय इतका अनपेक्षित होता की इतरांची गोष्टं सोडाच पण खुद्दं स्टीव्ह वॉ देखिल चकीत झाला होता.

स्टीव्ह वॉ म्हणतो,
"I fully expected him to bat after he won the toss. So when he said he would bowl first. I was like ‘did he really mean that’?"

डॅरील कलिननलाही क्रोनिएचा हा निर्णय अनपेक्षीत होता. तो म्हणतो,
"Jacques Kallis was bowling really quickly and swinging the ball upfront, so the decision was based on getting the best out of him, but it still seemed unusual. In a big match like that, you'd prefer to have runs on the board!"

मॅचच्या पहिल्याच बॉलवर...
ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला पोलॉकचा बॉल ड्राईव्ह करण्याचा गिलख्रिस्टने पवित्रा घेतला...
गिलख्रिस्टच्या अपेक्षेपेक्षा किंचीत कमी वेगाने बॉल आल्याने ड्राईव्ह हवेत गेला...
केवळ सुदैवानेच मिडऑनला असलेल्या क्रोनिएच्या उजव्या बाजूने बॉल बाऊंड्रीकडे गेला...
गिलख्रिस्टला ३ रन्स मिळाल्या!

पोलॉकचा पाचवा शॉर्टपीच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
मार्क वॉने बॉल सोडून देण्याचा निर्णय घेतला...
टप्पा पडल्यावर बॉल सीम होऊन उसळला...
मार्क वॉने मागे झुकत बॅट आणि ग्लोव्हच बॉलच्या मार्गातून बाजूला घेण्याचा आकांती प्रयत्नं केला, पण...
वॉच्या ग्लोव्हजना चाटून बॉल मार्क बाऊचरच्या ग्लोव्हजमध्ये गेला!
ऑस्ट्रेलिया ३ / १!

मार्क वॉ आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या रिकी पाँटींगने सावध पवित्रा घेत दक्षिण आफ्रीकन बॉलर्सना खेळून काढण्यावर भर दिला. पोलॉक आणि एलवर्दी यांच्या अचूक बॉलिंगपुढे पाँटींगच काय पण गिलख्रिस्टलाही आक्रमक फटकेबाजी करणं अशक्यं झालं होतं. पहिल्या ५ ओव्हर्समध्ये जेमतेम १० रन्स निघाल्यावर अखेर एलवर्दीच्या बंपरवर पाँटींगने स्क्वेअरलेग बाऊंड्रीपार सिक्स ठोकली! एलवर्दीच्या पुढच्या शॉर्टपीच बॉलवर पूलची बाऊंड्री वसूल करण्यातही त्याने कोणतीही कसूर केली नाही. एलवर्दीच्या पुढच्या ओव्हरमध्ये पाँटींगने स्लिप्सवरुन थर्डमॅनला बाऊंड्री तडकावली, पण पोलॉकच्या अचूक बॉलिंगने गिलख्रिस्टला मात्रं पार जखडून टाकलं होतं. अखेर ७ रन्स काढण्यासाठी २६ बॉल्स खर्ची घातल्यावर गिलख्रिस्टने एलवर्दीला लाँगऑनला सिक्स ठोकली. गिलख्रिस्ट - पाँटींग यांनी ५१ रन्सची पार्टनरशीप केल्यावर...

अ‍ॅलन डोनाल्डचा पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडलेली हाफव्हॉली होती...
पाँटींगने आक्रमक पवित्रा घेत कव्हरड्राईव्ह तडकावला...
कव्हर्समध्ये असलेल्या गॅरी कर्स्टनला इंचभरही बाजूला सरकावं लागलं नाही...
पाँटींगचा कव्हरड्राईव्ह थेट त्याच्या हातात गेला होता!
४८ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि एलवर्दीला मारलेल्या सिक्ससह पाँटींगने ३७ रन्स फटकावल्या.

त्याच ओव्हरमध्ये...
मिडलस्टंपच्या लाईनमध्ये पडलेला डोनाल्डचा शॉर्टपीच बॉल...
डॅरन लिहमनने बॅकफूटवर डिफेन्सिव पवित्रा घेतला पण...
सीमवर पडून उसळलेल्या बॉलने लिहमनच्या बॅटची एज घेतली...
मार्क बाऊचर तयारीत होताच!
ऑस्ट्रेलिया ५८ / ३!

लिहमन आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या स्टीव्ह वॉने थंड डोक्याने १-२ रन्स काढण्यावर भर दिला. डोनाल्डच्या पुढच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर गिलख्रिस्टने बाऊंड्री तडकावली. आतापर्यंत सावधपणे खेळणारा गिलख्रिस्ट नेहमीच्या आक्रमक शैलीत फटकेबाजी करेल अशी ऑस्ट्रेलियनांची अपेक्षा होती, पण अराऊंड द विकेट बॉलिंग करणार्‍या जॅक कॅलीसचा ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला बॉल गिलख्रिस्टने अपर कट् केला तो थेट थर्डमॅन बाऊंड्रीवर अ‍ॅलन डोनाल्डच्या हातात! ३९ बॉल्समध्ये १ बाऊंड्री आणि १ सिक्स ठोकल्यावरही गिलख्रिस्ट २० रन्सवरच रखडला होता. १७ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता ६८ / ४!

स्टीव्ह वॉ आणि गिलख्रिस्टच्या जागी बॅटींगला आलेला मायकेल बेव्हन यांनी सुरवातीला कोणतीही रिस्क न घेता दक्षिण आफ्रीकन बॉलर्सना खेळून काढत १-२ रन्स काढण्याचा मार्ग पत्करला. कॅलिसच्या बॉलवर बेव्हनने कट्ची बाऊंड्री मारल्यावर त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये स्टीव्ह वॉने त्याला कव्हरड्राईव्हची बाऊंड्री तडकावली पण डोनाल्ड - कॅलिस - क्लूसनर यांच्या पुढच्या ८ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला फक्तं ६ रन्स मिळाल्या! कॅलिसने दोन तर डोनाल्ड - क्लूसनरने एकेक मेडन ओव्हर टाकत स्टीव्ह वॉ आणि बेव्हन यांना पार जखडून टाकलं होतं. अखेर क्लूसनरच्या ओव्हरमध्ये स्टीव्ह वॉच्या बॅटाची एज लागून थर्डमॅनला बाऊंड्री गेल्यावर बेव्हनने त्याच ओव्हरमध्ये मिडविकेटमधून पूलची बाऊंड्री तडकावली. ३० ओव्हर्सनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता १०१ / ४!

कॅलिसच्या ऐवजी एलवर्दी बॉलिंगला आल्यावर स्टीव्ह वॉने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. एलवर्दीच्या स्लो बॉलवर मिडविकेटवरुन बाऊंड्री मारल्यावर पुढच्याच बॉलला त्याने मिडऑफला बाऊंड्री तडकावली. क्लूसनरच्या पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्रेट ड्राईव्हची बाऊंड्री फटकावल्यावर स्टीव्ह वॉने शेवटच्या बॉलवर लाँगऑनवर दणदणीत सिक्स ठोकली. वॉच्या पावलावर पाऊल टाकत बेव्हनने क्लूसनर आणि डोनाल्ड यांना बाऊंड्री तडकावल्यावर क्रोनिएने क्लूसनरच्या ऐवजी पोलॉकला बॉलिंगला आणलं पण स्टीव्ह वॉने त्याला मिडऑफमधून बाऊंड्री फटकावली. स्टीव्ह वॉ - बेव्हन यांनी ९० रन्सची पार्टनरशीप केली. हे दोघं अखेरच्या दहा ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकन बॉलर्सची धुलाई करणार असं वाटत असतानाच....

ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला पोलॉकचा बॉल थर्डमॅनच्या दिशेने खेळण्याचा स्टीव्ह वॉचा प्रयत्नं फसला...
वॉच्या बॅटची एज घेऊन गेलेला बॉल बाऊचरने ग्लोव्हजमध्ये पकडला...
स्टीव्ह वॉने पॅव्हेलियनची वाट धरल्यावर डोळे मिचकावत बाऊचरने बॉल हवेत उडवला!
७६ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री आणि क्लूसनरला ठोकलेल्या सिक्ससह स्टीव्ह वॉने ५६ रन्स फटकावल्या.

दोन बॉल्सनंतर...
ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला पोलॉकचा बॉल इनस्विंग होऊन आत आला...
टॉम मूडीने लेगसाईडला फ्लिक करण्याचा प्रयत्नं पार फसला आणि बॉल त्याच्या पॅडवर आदळला...
अंपायर वेंकटराघवनचं बोट वर गेलं!
४० ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलिया १५८ / ६!

स्टीव्ह वॉ परतल्यावर बेव्हन आणि शेन वॉर्न यांनी कोणतीही रिस्क न घेता दक्षिण आफ्रीकन बॉलर्सना खेळून काढत जास्तीत जास्तं ओव्हर्स बॅटींग करण्याचा मार्ग पत्करला. एलवर्दीच्या बॉलवर वॉर्नच्या बॅटची एज लागून थर्डमॅनला बाऊंड्री मिळाली. पोलॉकच्या लेग्स्टंपवर पडलेल्या बॉलवर बेव्हनने लेगग्लान्सची बाऊंड्री मारली. बेव्हन - वॉर्न यांनी पण त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर पोलॉकला फटकावण्याचा वॉर्नचा प्रयत्नं फसला आणि मिडविकेटला क्रोनिएने मागे डाईव्ह मारत त्याचा अफलातून कॅच घेतला. बेव्हन - वॉर्न यांनी ४९ रन्सची महत्वपूर्ण पार्टनरशीप केली होती. ऑस्ट्रेलिया २०७ / ७!

पुढच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर...
डोनाल्डच्या यॉर्करचा पॉल रायफलला अजिबात अंदाज आला नाही आणि बॉल ऑफस्टंपवर आदळला...
दोन बॉल्सनंतर...
डोनाल्डचा इनस्विंगर ऑफस्टंपच्या लाईनवर पडला आणि टप्पा पडल्यावर सीम होत डॅमियन फ्लेमिंगचा ऑफस्टंप उडवून गेला...
ऑस्ट्रेलिया २०७ / ९!

शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर बेव्हनने पोलॉकला मिडविकेटवर बाऊंड्री तडकावली पण...
पोलॉकच्या पुढच्याच बॉलवर बेव्हनच्या बॅटची बॉटम एज लागली आणि बाऊचरने त्याचा कॅच घेतला.
१०१ बॉल्समध्ये ६ बाऊंड्रीसह बेव्हनने ६५ रन्स काढल्या.
४९.२ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलिया २१३ रन्समध्ये ऑल आऊट झाले होते.

ग्लेन मॅकग्राथ म्हणतो,
"213 was a tough score to defend. We knew we had to bowl well and get some early wickets."

दक्षिण आफ्रीकेच्या बॅटींग लाईनअपपुढे २१४ रन्सचं टार्गेट कितपत आव्हान उभं करु शकणार होतं?

हर्शेल गिब्जने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. ग्लेन मॅकग्राथच्या पहिल्याच ओव्हरमध्ये स्लिप आणि गली दरम्यानच्या गॅपमधून बाऊंड्री मारल्यावर त्याने डॅमियन फ्लेमिंगला कव्हर्समधून बाऊंड्री तडकावली. गॅरी कर्स्टननेही गिब्जचा कित्ता गिरवत मॅकग्राथला स्क्वेअरलेगला बाऊंड्री मारली. स्टीव्ह वॉने फ्लेमिंगच्या ऐवजी पॉल रायफलला बॉलिंगला आणलं पण गिब्जवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. मॅकग्राथ - रायफलच्या सलग तीन ओव्हर्समध्ये त्याने तीन बाऊंड्री तडकावल्यावर अखेर स्टीव्ह वॉने आपलं हुकुमी अस्त्रं बाहेर काढलं...

शेन वॉर्न!

वॉर्नची पहिली ओव्हर कर्स्टन आणि गिब्ज यांनी सावधपणे खेळून काढली पण दुसर्‍या ओव्हरमध्ये...

वॉर्नचा बॉल लेगस्टंपच्या बाहेर पडला...
गिब्जने लेगसाईडला फ्लिक करण्याचा प्रयत्नं केला पण...
टप्पा पडल्यावर बॉल स्पिन झाला आणि...
गिब्जचा ऑफस्टंप उडाला!

१९९३ च्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये माईक गॅटींगची दांडी उडवणार्‍या बॉलची कार्बन कॉपी असलेला बॉल वॉर्नने गिब्जला टाकला होता.
....आणि बोल्ड झाल्यावर गिब्जही गॅटींगप्रमाणेच गोंधळून गेला होता!

दक्षिण आफ्रीका ४८ / १!

वॉर्नच्या पुढच्या ओव्हरमध्ये...
पहिलाच बॉल लेफ्ट हँडर कर्स्टनच्या ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
कर्स्टनने स्टीव्ह वॉच्या स्टाईलमध्ये मिडविकेटवर स्वीप मारण्याचा पवित्रा घेतला पण...
स्पिन झालेला बॉल त्याच्या बॅटच्या पट्ट्यात न येता ऑफस्टंपवर गेला...
दक्षिण आफ्रीका ५३ / २!

हॅन्सी क्रोनिएने पहिला बॉल खेळून काढला पण पुढच्याच बॉलवर...
वॉर्नचा बॉल लेगस्टंपच्या बाहेर आणि क्रोनिएच्या पायाजवळ पडला...
क्रोनिएने लेगस्टंपच्या बाहेर जात कव्हरड्राईव्ह मारण्याचा प्रयत्नं केला...
बॉल गेला तो पहिल्या स्लिपमध्ये असलेल्या मार्क वॉच्या हातात!
अंपायर डेव्हीड शेपर्डचं बोट वर झालं!
दक्षिण आफ्रीका ५३ / ३!

टीव्ही रिप्लेमध्ये वॉर्नचा बॉल क्रोनिएच्या बॅटला न लागता बुटाला लागून गेल्याचं आणि त्याच वेळेस क्रोनिएची बॅट जमिनीवर आपटल्याचं दिसत होतं पण त्याचा काहीही उपयोग नव्हता.

डॅरील कलिनन आणि जॅक कॅलीस यांनी सावध पवित्रा घेत वॉर्न आणि फ्लेमिंग यांना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. पहिल्या ओव्हरमध्ये ३ रन्स दिल्यावर वॉर्नच्या पुढच्या ३ ओव्हर्स मेडन होत्या. फ्लेमिंगनेही अचू़क बॉलिंग करत कलिनन आणि कॅलिस यांना फटकेबाजीची कोणतीही संधी मिळणार नाही याची दक्षता घेतली. वॉर्न - फ्लेमिंग यांच्या अचूक बॉलिंगमुळे ७ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला केवळ ६ रन्स मिळाल्या. शेवटी व्हायचा तो परिणाम झालाच...

फ्लेमिंगचा बॉल कॅलिसने मिडऑनला ड्राईव्ह केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
कलिननने कॅलिसच्या कॉलला प्रतिसाद देण्यास किंचीत उशीर केला...
मिडऑनला मायकेल बेव्हनने बॉल पिकअप केला...
बेव्हन्च्या थ्रोने स्टंप्सचा अचूक वेध घेतला तेव्हा कलिनन क्रीजच्या जवळपासही पोहोचला नव्हता.
दक्षिण आफ्रीका ६१ / ४!

कलिनन आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या जाँटी र्‍होड्सने कोणतीही रिस्क न घेता १-२ रन्स काढण्यावरच भर दिला. स्टीव्ह वॉने आक्रमक पवित्रा घेत फ्लेमिंगच्या ऐवजी मॅकग्राथला बॉलिंगला आणलं पण र्‍होड्स - कॅलिसने त्याला खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. मॅकग्राथच्या एकमेव ओव्हरनंतर त्याच्या ऐवजी बॉलिंगला आलेल्या टॉम मूडीला कॅलिसने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री मारली. आणखीन दोन ओव्हर्सनंतर कॅलिसने मार्क वॉला क्रीजमधून पुढे सरसावत बाऊंड्री तडकावली. ३० ओव्हर्सनंतर दक्षिण आफ्रीकेचा स्कोर होता ९५ / ५!

शेवटच्या २० ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला ११९ रन्सची आवश्यकता होती.

कॅलिस आणि र्‍होड्स यांनी अद्यापही फटकेबाजीच्या मोहात न पडता १-२ रन्सवरच लक्षं केंद्रीत केलं होतं, पण मार्क वॉ आणि मूडीच्या अचूक बॉलिंगमुळे आणि ऑस्ट्रेलियाच्या फिल्डींगमुळे र्‍होड्सच्या रन्स चोरण्याच्या कारभारालाही आळा बसला होता. मूडीचा मिडलस्टंपवर पडलेल्या बॉलवर र्‍होड्सने मिडविकेटला बाऊंड्री तडकावल्यावर स्टीव्ह वॉने त्याच्या ऐवजी रायफलला बॉलिंगला आणलं पण र्‍होड्सने त्याला चक्कं लेटकटची बाऊंड्री मारली! मार्क वॉच्या पुढच्या ओव्हरमध्ये र्‍होड्सने मिदविकेटवर दणदणीत सिक्स ठोकली! पण पुढच्याच ओव्हरमध्ये ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला रायफलचा बॉल पूल करण्याचा र्‍होड्सचा प्रयत्नं पार फसला आणि स्क्वेअरलेग बाऊंड्रीवरुन धावत आलेल्या बेव्हनने त्याचा अप्रतिम कॅच घेतला. ५५ बॉल्समध्ये २ बाऊंड्री आणि मार्क वॉला मारलेल्या सिक्ससह र्‍होड्सने ४३ रन्स फटकावल्या. दक्षिण आफ्रीका १४५ / ५!

अद्याप शेवटच्या ९ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला ६८ रन्सची आवश्यकता होती.

र्‍होड्स आऊट झाल्यावर जोरदार फॉर्ममध्ये असलेला लान्स क्लूसनर बॅटींगला येईल अशी बहुतेकांची अपेक्षा होती, पण बॅटींगला आला शॉन पोलॉक! चाणाक्षं स्टीव्ह वॉने मूडी आणि मार्क वॉ यांच्या ऐवजी मॅकग्राथ आणि वॉर्नला बॉलिंगला आणलं. कॅलिस - पोलॉक यांनी सावधपणे या दोघांच्या ३ ओव्हर्समध्ये १५ रन्स काढल्या.

शेवटच्या ६ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला ५३ रन्स हव्या होत्या!

४५ व्या ओव्हरमध्ये...

वॉर्नचा पहिलाच बॉल कॅलिसने लाँगऑफला उचलला...
लाँगऑफ बाऊंड्रीवर असलेल्या रायफलपुढे मागे राहून बॉल सुरक्षितपणे अडवणं किंवा कॅच असे दोन पर्याय होते...
रायफल कॅच घेण्यासाठी धावत पुढे आला पण...
बॉल त्याच्या हातात न येता टप्पा पडून दूर घरंगळला...
कॅलिसला ३ रन्स मिळाल्या.

वॉर्नचा दुसरा बॉल लेगस्टंपच्या बाहेर पडला...
पोलॉक क्रीज सोडून पुढे सरसावला...
बॉल लाँगऑन बाऊंड्रीपार गेला... सिक्स!

वॉर्नचा तिसरा बॉल ऑफस्टंपवर पडला...
पोलॉकने तो कव्हर्समधून तडकावला...बाऊंड्री!

वॉर्नच्या चौथ्या बॉलवर पोलॉकने एक रन काढली...

पाचवा बॉल लेगस्टंपच्या बाहेर पडला...
कॅलीसने लेगस्टंपच्या बाहेर जात तो कव्हर्समधून फटकावण्याचा पवित्रा घेतला पण...
कॅलिसचा ड्राईव्ह गेला तो कव्हर्समध्ये स्टीव्ह वॉच्या हातात!
९२ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह कॅलिसने ५३ रन्स काढल्या.
दक्षिण आफ्रीका १७५ / ६!

शेवटच्या बॉलवर कॅलिस आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या लान्स क्लूसनरने एक रन काढली.
वॉर्नच्या शेवटच्या ओव्हरमध्ये १५ रन्स फटकावल्या गेल्या होत्या!

५ ओव्हर्समध्ये अद्याप ३८ रन्स बाकी होत्या!

४६ व्या ओव्हरमध्ये डॅमियन फ्लेमिंगच्या पहिल्याच बॉलवर क्लूसनरने मिडविकेटमधून बाऊंड्री तडकावली. पण आणखीन ३ बॉल्सनंतर...
फ्लेमिंगचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
पोलॉकने लेगसाईडला सरकून कव्हर्समधून फटकावण्याचा पवित्रा घेतला पण...
फ्लेमिंगचा यॉर्कर पोलॉकच्या बॅटची इनसाईड एज घेऊन लेगस्टंपवर गेला..
पोलॉकने निराशेने पीचवर बॅट आपटली.
दक्षिण आफ्रीका १८३ / ७!

४७ व्या ओव्हरमध्ये मॅकग्राथने अचूक बॉलिंग करत क्लूसनर आणि मार्क बाऊचर यांना फटकेबाजीसाठी कोणतीही संधी दिली नाही. मॅकग्राथच्या या ओव्हरमध्ये केवळ ५ रन्स निघाल्या!

फ्लेमिंगच्या पुढच्या ओव्हरमध्ये पहिले ३ बॉल्स बाऊचरला काहीच करता आलं नाही...
चौथ्या बॉलवर अखेर बाऊचरने एक रन काढली...
पाचव्या बॉलवर क्लूसनरने पॉईंटवर बाऊंड्री तडकावली!
सहावा बॉल क्लूसनरने मिडविकेटला पूल केला...
मिडविकेटला टॉम मूडीने बाऊंड्री जाण्यापासून रोखली...
क्लूसनर - बाऊचर यांनी २ रन्स काढल्या.

शेवटच्या २ ओव्हर्समध्ये दक्षिण आफ्रीकेला १८ रन्सची आवश्यकता होती!

४९ व्या ओव्हरमध्ये...

मॅकग्राथचा पहिला बॉल यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात फुलटॉस आला...
बाऊचरने तो कव्हर्समध्ये स्टीव्ह वॉच्या हातात फटकावला...

मॅकग्राथचा दुसरा बॉल मिडलस्टंपवर पडला...
लेगसाईडला बाहेर जात कव्हर्समधून बॉल फटकवण्याचा बाऊचरचा प्रयत्नं साफ फसला...
मॅकग्राथच्या यॉर्करने त्याचा मिडलस्टंप उडवला!
दक्षिण आफ्रीका १९६ / ८!

मॅकग्राथचा तिसरा बॉल स्टीव्ह एलवर्दीने पॉईंटला खेळला आणि एक रन काढली...

मॅकग्राथचा चौथा बॉल क्लूसनरने लाँगऑनला तडकावला...
लाँगऑनला पॉल रायफलने बॉल पिकअप करेपर्यंत क्लूसनर - एलवर्दी यांनी एक रन पूर्ण केली...
क्लूसनरला स्ट्राईक देण्याच्या इराद्याने एलवर्दीने दुसर्‍या रनसाठी धाव घेतली पण...
लाँगऑनवरुन आलेला रायफलचा थ्रो मॅकग्राथने स्टंप्सवर ढकलला...
अंपायर डेव्हीड शेपर्डने थर्ड अंपायर स्टीव्ह बकनरकडे हा निर्णय सोपवला...
एलवर्दी रनआऊट झाला!
दक्षिण आफ्रीका १९८ / ९!

क्लूसनरच्या जोडीला आला दक्षिण आफ्रीकेचा शेवटचा बॅट्समन...
अ‍ॅलन डोनाल्ड!

मॅकग्राथचा पाचवा बॉल फुलटॉस होता...
क्लूसनरने तो लाँगऑनला उचलला...
पॉल रायफल दुसरी रन अडवण्याच्या हेतूने लाँगऑन बाऊंड्रीपासून दहा यार्ड आतमध्ये होता...
रायफलने हवेत जंप मारुन कॅच घेण्याचा प्रयत्नं केला पण...
बॉल त्याच्या हाताला लागून बाऊंड्रीपार गेला...
सिक्स!

मॅकग्राथच्या शेवटच्या बॉलवर क्लूसनरने एक रन काढली आणि स्ट्राईक स्वतःकडे राहील याची काळजी घेतली.

शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रीकेला ९ रन्स हव्या होत्या!

स्टीव्ह वॉ समोर शेवटच्या ओव्हरसाठी दोन पर्याय होते - पॉल रायफल आणि डॅमियन फ्लेमिंग!
१९९६ च्या सेमीफायनलमध्ये अशाच परिस्थितीत शेवटच्या ओव्हरमध्ये मार्क टेलरने फ्लेमिंगच्या हाती बॉल दिला होता आणि फ्लेमिंगने मॅच जिंकली होती.
स्टीव्ह वॉने फ्लेमिंगला बॉलिंगला आणावं यात काहीच आश्चर्य नव्हतंरा

राऊंड द विकेट बॉलिंग करणार्‍या फ्लेमिंगचा पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडला...
क्लूसनरने तो ऑफसाईडला तडकावला...
कव्हर्समध्ये असलेल्या स्टीव्ह वॉच्या उजव्या बाजूने सुसाटत बॉल बाऊंड्रीपार धडकला...
बाऊंड्रीवर असलेल्या पाँटींगला कोणतीही संधी न देता!

५ बॉल्स - ५ रन्स!

फ्लेमिंगचा दुसरा बॉल ऑफस्टंपच्या लाईनमध्ये पडला...
क्लूसनरने पुन्हा तो ऑफसाईडला फटकावला...
या खेपेला स्टीव्ह वॉच्या डाव्या बाजूने बॉल बाऊंड्रीपार धडकला...
लाँगऑफला असलेल्या टॉम मूडीला कोणतीही संधी मिळाली नाही!

दक्षिण आफ्रीकेच्या पाठीराख्या प्रेक्षकांनी जल्लोष केला!
केवळ ४ बॉल्समध्ये १ रन बाकी असताना आणि क्लूसनर स्ट्राईकवर असताना दक्षिण आफ्रीका मॅच जिंकणार यात शंकाच नव्हती पण...
दक्षिण आफ्रीकेला फायनल गाठण्यासाठी ती १ रन अत्यावश्यक होती!
सुपर सिक्समध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रीकेचा पराभव केल्याने मॅच टाय झाल्यास ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये प्रवेश मिळाला असता!

४ बॉल्स - १ रन!

स्टीव्ह वॉने आपले सर्व फिल्डर्स ३० यार्ड सर्कलमध्ये आणले, पण महत्वाचा प्रश्नं होता तो म्हणजे...
क्लूसनर १ रन काढण्याचा प्रयत्नं करणार..
की
पहिल्या दोन बॉल्सप्रमाणेच बाऊंड्री मारण्याचा प्रयत्नं करणार?

स्टीव्ह वॉ फ्लेमिंगला म्हणाला,
"Okay, get it over with."

राऊंड द विकेट टाकलेल्या पहिल्या दोन बॉल्सवर क्लूसनरने बाऊंड्री तडकावल्याने फ्लेमिंगने ओव्हर द विकेट बॉलिंगला येण्याचा निर्णय घेतला...
मिडलस्टंपवर पडलेला बॉल क्लूसनरने पूल केला...
मिडऑनवर डॅरन लिहमनने बॉल पिकअप केला...
अ‍ॅलन डोनाल्ड रन काढण्याच्या इराद्याने क्रीज सोडून बाहेर आला होता...
क्लूसनरने त्याला परत पाठवल्यावर डोनाल्डने क्रीज गाठण्यासाठी डाईव्ह मारली...
अवघ्या सहा यार्डांवरुन केलेला लिहमनचा थ्रो स्टंपपासून काही अंतरावरुन गेला...
डोनाल्ड रनआऊट होताहोता वाचला!

डॅरील कलिनन म्हणतो,
"I remember thinking someone should run out onto the field with gloves or something like that - just stop the game for a little while!"

फ्लेमिंग म्हणतो,
"After Lehmann's miss the batsmen didn't chat and a few guys said Klusener was asking the umpire what the score was. The scores were tied and the pressure seemed to be back on the batsmen."

फ्लेमिंगचा चौथा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला यॉर्कर होता...
क्लूसनरने तो सरळ फटकावण्याचा प्रयत्नं केला...
बॅटला बॉल लागताच क्लूसनर धावत सुटला...
नॉनस्ट्रायकर एन्डला डोनाल्ड बॉलकडे बघण्यात गुंतला होता...
मिडऑफला असलेल्या मार्क वॉने बॉल पिकअप केला...
डोकं शांत ठेवत मार्क वॉने बॉल फ्लेमिंगकडे थ्रो केला...
एव्हाना क्लूसनर जवळपास डोनाल्डजवळ पोहोचला होता...
भानावर आलेल्या डोनाल्डने रन पूर्ण करण्यासाठी धाव घेतली पण त्यापूर्वीच त्याच्या हातातली बॅट पडली होती...
फ्लेमिंगने बॉल थ्रो करण्याची रिस्क न घेता गिलख्रिस्टकडे सरपटी टाकला...
फ्लेमिंगचा थ्रो कलेक्ट करुन गिलख्रिस्टने बेल्स उडवल्या तेव्हा डोनाल्ड अर्ध्या पीचपर्यंतही पोहोचला नव्हता!
क्लूसनर धावत सुटला तो बाऊंड्रीपर्यंत थांबलाच नाही...

१६ बॉल्समध्ये ४ बाऊंड्री आणि मॅकग्राथला तडकावलेल्या सिक्ससह ३१ रन्स फटकावत क्लूसनर नॉटआऊट राहिला पण...
दक्षिण आफ्रीका २१३ मध्ये ऑलआऊट झाले होते!
सेमीफायनल टाय झाली!

ऑस्ट्रेलियाने फायनल गाठली!

खेळाडूंना मात्रं नेमकं काय झालं आहे याचा पत्ता नव्हता!

ब्रेट ली म्हणतो,
"No one really knew what was going on! We thought we won the game when we tied! We were not sure if we go through until it was flashed on scoreboard that we were in the Final!"

हॅन्सी क्रोनिए मॅच संपल्यावर इयन चॅपलशी बोलताना म्हणाला,
"Up to the fall of the 1st wicket, we were looking good, but…." बिचार्‍या क्रोनिएला पुढे शब्दंच फुटत नव्हते.

स्टीव्ह वॉ म्हणाला,
"It's the most exciting match I have ever played in. This leaves behind the 96 semi final a long way!"

दक्षिण आफ्रीकेच्या ड्रेसिंगरुममध्ये सगळे खेळाडू सुन्न झाले होते. डॅरील कलिनन म्हणतो,
"I don't remember anything being said. It was just stunned silence. Not a word was spoken."

मॅन ऑफ द मॅच म्हणूण निवड झाली शेन वॉर्नची!

फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा फडशा पाडून दुसर्‍यांदा वर्ल्डकपवर नाव कोरलं!
स्टीव्ह वॉ आणि टॉम मूडी हे १९८७ च्या विजेत्या संघातले दोघं खेळाडू १२ वर्षांनी पुन्हा वर्ल्डचँपियन्स ठरले होते!

सेमीफायनलनंतर महिन्याभराने एक अफलातून किस्सा समोर आला...

शॉन पोलॉक दरबानमधल्या 'दरबान जुलै' या प्रसिद्ध डर्बीला गेला होता. पोलॉकला रेसला आलेला पाहून एका माणसाने त्याने कोणत्या घोड्यावर पैसे लावले आहेत अशी चौकशी केली आणि म्हणाला,

"Whatever you do, don't bet on number 10. He doesn't run."

वर्ल्डकपमध्ये अ‍ॅलन डोनाल्डच्या शर्टचा नंबर होता १०!
ही कॉमेंट अर्थातच डोनाल्डला उद्देशून होती!

पोलॉक म्हणतो,
"I knew that was a reference to Allan Donald not running in the semi-final against Australia. I knew we wouldn't be able to escape the jokes about our semi-final mishap for a while."

पोलॉकने त्या घोड्यावर पैसे लावले नाहीत...
...आणि १० नंबरच्या त्या घोड्याने रेस जिंकली!

दक्षिण आफ्रीकन संघातील एकाही खेळाडूने मात्रं डोनाल्डला दोष दिला नाही. कलिनन म्हणतो,
"There was not a word of blame, because we understood it could have happened to any of us. In that situation, with that pressure, it could have happened to any of us. It was just such a day. Everything was just left there. I think that was the birth of the 'chokers' tag. And that was a genuine choke!"

क्रीडालेख

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2017 - 10:06 am | गॅरी ट्रुमन

जबराट.

ही मॅचही सगळी बघितली होती. शेवटी क्लुसनरने दोन चौकार ठोकले आणि असे वाटायला लागले की दक्षिण आफ्रिका जिंकणारच. अ‍ॅलन डॉनल्डला धावायची काही गरज नव्हती असे वाटले. अर्थातच ती मॅच झाल्यानंतर इतक्या वर्षांनी एसी केबिनमध्ये बसून हे लिहिणे सोपे आहे. कदाचित आपण अ‍ॅलन डॉनल्डच्या जागी असतो तर आपणही तसेच केले असते!!

लान्स क्लुसनरने २२ यार्डवर उभे राहून दक्षिण आफ्रिकेचे वर्ल्डकपचे स्वप्न भंगताना बघितले--- एकदा नाही तर दोनदा. २००३ मध्येही थोडासा असाच प्रकार झाला होता हे आठवते. पण नक्की डिटेल लक्षात नाहीत.

अभिजीत अवलिया's picture

23 Feb 2017 - 5:55 pm | अभिजीत अवलिया

डोनाल्ड ऐवजी क्लुजनर कडून चूक झाली असेच म्हणेन मी. अजून २ चेंडू बाकी होते आणी त्यामुळे 'तो' रन घेण्याचा प्रयत्न करण्याची तितकीशी गरज होती असे वाटत न्हवते.

जगप्रवासी's picture

23 Feb 2017 - 6:35 pm | जगप्रवासी

मॅच बघताना माझ्या आवडत्या क्लुसनरला मी स्वतः शिव्या घातल्या होत्या. काय धावायची गरज होती अजून २ बॉल बाकी होते. साले ते ऑस्ट्रेलिया वाले फायनलला गेले त्यामुळे अजून चिडलो होतो