वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - फायनल - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
13 Feb 2017 - 9:16 am

८ नोव्हेंबर १९८७
ईडन गार्डन्स, कलकत्ता

कलकत्त्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्डकपची फायनल रंगणार होती. वास्तविक ही फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होईल असा अनेकांचा अंदाज होता पण 'बिली द किड' क्रेग मॅकटरमॉटने लाहोरला पाकिस्तानला धूळ चारली होती तर ग्रॅहॅम गूचच्या स्वीपने आणि चंद्रकांत पंडीतला एलबीडब्ल्यू देण्याच्या अंपायर टोनी क्राफ्टरच्या साफ चुकीच्या निर्णयामुळे भारताच्या वर्ल्डकपच्या आकांक्षांवर पाणी पडलं होतं! भारताचा पत्ता कट् झाल्यामुळे इंग्लंडविरुद्ध खदखदत असलेला राग आणि त्यातच ऑस्ट्रेलियाने केलेला पाकिस्तानचा पराभव यामुळे ईडन गार्डन्सवर फायनलला हजर असलेल्या ९०,००० हजार प्रेक्षकांचा जोरदार पाठींबा होता तो ऑस्ट्रेलियाला!

( ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान सेमीफायनलमध्ये अब्दुल कादीरचा अपेक्षेपेक्षा जास्तं बाऊंस झालेला बॉल तोंडावर लागल्याने सलिम युसुफ ड्रेसिंगरुममध्ये परतला आणि त्याच्याजागी उरलेली सर्व इनिंग्ज विकेटकीपर होता जावेद मियांदाद! इतकंच नव्हे तर सलिम मलिकच्या लेगसाईडच्या बॉलवर त्याने डेव्हीड बूनला स्टंप केलं होतं! )

अ‍ॅलन बॉर्डरच्या ऑस्ट्रेलियन संघात डेव्हीड बून, जेफ मार्श, डीन जोन्स, स्वतः बॉर्डर, माईक व्हॅलेटा असे बॅट्समन होते. सुरवातीच्या काही मॅचेसमध्ये खेळलेल्या टॉम मूडीच्या जागी निवड झालेल्या व्हॅलेटाने पाकिस्तानविरुद्ध बॉर्डरबरोबर मोक्याच्या क्षणी ६० रन्सची पार्टनरशीप केली होती. ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगचा भार मुख्यतः क्रेग मॅकडरमॉट आणि ब्रूस रीड यांच्यावर होता. त्यांच्या जोडीला सायमन ओडोनेल आणि ऑफस्पिनर टीम मे होते. विकेटकीपर ग्रेग डायर आणि स्टीव्ह वॉसारखा ऑलराऊंडर यांचाही ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश होता. स्टीव्ह वॉची बॉलिंग आणि विशेषतः ऑस्ट्रेलियाच्या इनिंग्जमध्ये सलिम जाफरच्या शेवटच्या इनिंग्जमध्ये त्याने तडकावलेल्या १८ रन्स निर्णायक ठरल्या होत्या!

माईक गॅटींगचा इंग्लिश संघही ऑस्ट्रेलियाच्या तोडीसतोड होता. भारताविरुद्ध सेमीफायनलला सेंच्युरी ठोकणारा आणि जबरदस्तं फॉर्ममध्ये असलेला ग्रॅहॅम गूच, टिम रॉबिन्सन, बिल अ‍ॅथी, गॅटींग, अ‍ॅलन लॅम्ब, विकेटकीपर पॉल डाऊन्टन असे बॅट्समन होते. वर्ल्डकपच्या सर्व मॅचेसमध्ये अ‍ॅलन लॅम्बने गूचच्या बरोबरीने अनेक मॅचेसमध्ये महत्वाच्य क्षणी फटकेबाजी करुन इंग्लंडला मॅचेस जिंकून दिल्या होत्या. इंग्लंडच्या बॉलिंगची मदार मुख्यतः अनुभवी नील फोस्टर, फिलीप डिफ्रीटास आणि ग्लॅडस्टन स्मॉल यांच्यावर होती. त्यांच्या जोडीला जॉन एम्बुरी आणि एडी हेमिंग्ज असे दोन अनुभवी ऑफस्पिनर्सही इंग्लंडकडे होते.

अ‍ॅलन बॉर्डरने टॉस जिंकल्यावर बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. फिलीप डिफ्रीटास आणि गॅडस्टन स्मॉल यांच्या सुरवातीच्या खराब बॉलिंगचा फायदा उठवत डेव्हीड बून आणि जेफ मार्श यांनी पहिल्या १० ओव्हर्समध्ये ५२ रन्स फटकावल्या. सुरवातीच्या फटकेबाजीनंतर अनुभवी नील फोस्टर आणि एडी हेमिंग्ज यांच्या अचूक बॉलिंगमुळे बून - मार्श यांना पार जखडून टाकलं होतं. या दोघांनी १७ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाचा स्कोर ७५ पर्यंत नेल्यावर नील फोस्टरच्या मिडलस्टंपवर पडलेल्या लेगकटरने मार्शचा ऑफस्टंप उडवला!

मार्श आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या डीन जोन्सलाही फोस्टरला फटकावणं जमत नव्हतं. फोस्टरच्या पहिल्या ८ ओव्हर्समध्ये जेमतेम १६ रन्स निघाल्या! फोस्टरप्रमाणेच अनुभवी जॉन एम्बुरीनेही अचूक बॉलिंग करत बून - जोन्स यांना फटकेबाजीची फारशी संधी मिळू दिली नव्हती. या दोघांनी १९ ओव्हर्समध्ये ७६ रन्सची पार्टनरशीप केल्यावर एडी हेमिंग्जला फटकावण्याच्या नादात शॉर्ट मिडविकेटला बिल अ‍ॅथीने जोन्सचा कॅच घेतला. ५७ बॉल्समध्ये १ बाऊंड्री आणि हेमिंग्जलाच मिडविकेटवर ठोकलेल्या सिक्ससह जोन्सने ३३ रन्स फटकावल्या. जोन्स आऊट झाला तेव्हा ३६ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता १५१ / २!

जोन्स परतल्यावर बॅटींगला आला क्रेग मॅकडरमॉट!

मॅकडरमॉट म्हणतो,
"When Dino & Boonie were batting, AB told me to pad up. Dino was out, and as I walked in, AB said ‘Go & blast the fucking poms around!"

मॅकडरमॉटने बॉर्डरच्या सूचनेप्रमाणे आक्रमक पवित्रा घेत ८ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह १४ रन्स फटकावल्या, पण ग्रॅहॅम गूचच्या यॉर्करने मॅकडरमॉटचा मिडलस्टंप उडवल्याने बॉर्डरची ही चाल फारशी यशस्वी झाली नाही. त्यातच हेमिंग्जला स्वीप मारण्याच्या प्रयत्नात बूनची टॉप एज लागली आणि विकेटकीपर डाऊन्टनने सुमारे १५ यार्ड मागे धावत जात त्याचा कॅच घेतला. शांत डोक्याने आणि सावधपणे खेळत बूनने १२५ बॉल्समध्ये ७ बाऊंड्रीसह ७५ रन्स फटकावल्या. बून आऊट होऊन परतला तेव्हा ३९ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता १६८ / ४!

बॉर्डर आणि माईक व्हॅलेटा यांनी सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत इंग्लिश बॉलर्सना फटकावण्यास सुरवात केली. एडी हेमिंग्जच्या शेवटच्या ओव्हरमध्ये बॉर्डरने त्याला लागोपाठ दोन वेळा कट्ची बाऊंड्री तडकावली. पहिल्या ८ ओव्हर्समध्ये अचूक बॉलिंग करणार्‍या नील फोस्टरला व्हॅलेटाने मिडविकेट आणि एक्स्ट्राकव्हरला बाऊंड्री ठोकल्या. व्हॅलेटाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे माईक गॅटींगही चांगलाच गोंधळून गेला. फोस्टर - एम्बुरी - डिफ्रीटास यांना फटकावून काढत १० ओव्हर्समध्ये या दोघांनी ७३ रन्सची पार्टनरशीप केल्यावर...

जॉन एम्बुरीचा बॉल व्हॅलेटाने स्क्वेअरलेगला फ्लिक केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
एक रन पूर्ण केल्यावर बॉर्डरने दुसरी रन घेण्यासाठी धाव घेतली...
व्हॅलेटा क्रीज सोडून पुढे आला पण...
स्क्वेअरलेगला टीम रॉबिन्सनने बॉल पिकअप केलेला पाहून त्याने बॉर्डरला परत पाठवलं...
बॉर्डर मागे वळून क्रीजमध्ये परतण्यापूर्वी रॉबिन्सनचा थ्रो कलेक्ट करुन डाऊन्टनने बेल्स उडवल्या!

सेमीफायनलप्रमाणे फायनलमध्येही माईक व्हॅलेटाबरोबर पार्टनरशीपनंतर बॉर्डर रनआऊट झाला!
३१ बॉल्समध्ये ३ बाऊंड्रीसह बॉर्डरने ३१ रन्स फटकावल्या.
ऑस्ट्रेलिया २३१ / ५!

व्हॅलेटा म्हणतो,
"I had no chance of getting there, so I had to send AB back. I didn't think I was going to get halfway. We probably wouldn't have crossed."

अखेर ५० ओव्हर्स पूर्ण झाल्या तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोर होता २५३ / ५!
शेवटच्या ६ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाने ६५ रन्स फटकावल्या होत्या!
३१ बॉल्समध्ये ६ बाऊंड्रीसह ४५ रन्स फटकावत व्हॅलेटा नॉटआऊट राहीला!

स्टीव्ह वॉ म्हणतो,
"Veletta played a gem of a cameo, using all of his crease to dance and maneuvering around, prima ballerina-like, almost to the point of distracting the bowlers!"

वर्ल्डकप जिंकण्यासाठी इंग्लंडला ५० ओव्हर्समध्ये २५४ रन्सचं टार्गेट होतं!

मॅकडरमॉटने पहिल्याच ओव्हरमध्ये टिम रॉबिन्सनला एलबीडब्ल्यू करुन इंग्लंडला सुरवातीलाच हादरा दिला. सुरवातीला बसलेल्या या धक्क्यानंतर गूच आणि बिल अ‍ॅथी यांनी सावध पवित्रा घेत मॅकडरमॉट - रीड यांना खेळून काढण्याचा मार्ग पत्करला. अर्थात ऑस्ट्रेलियाच्य अचूक बॉलिंगमुळे फटकेबाजीची संधी अभावानेच मिळत होती. गूच - अ‍ॅथी यांनी १७ ओव्हर्स खेळून काढत ६५ रन्सची पार्टनरशीप केल्यावर सायमन ओडोनेलच्या बॉलवर अ‍ॅक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात गूच एलबीडब्ल्यू झाला. ५७ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह गूचने ३५ रन्स काढल्या. इंग्लंड ६६ / २!

माईक गॅटींगने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत ऑस्ट्रेलियन बॉलर्सना फटकावण्याचं धोरण अवलंबलं होतं. टिम मे - ओडोनेल यांना त्याने बाऊंड्री तडकावल्या. गॅटींगची फटकेबाजी सुरु असताना अ‍ॅथीने मात्रं १-२ रन्स काढण्यावरच भर दिला होता, पण ओडोनेलच्या अचूक बॉलिंगने त्याला पार जखडून टाकलं होतं! गॅटींग खेळत असतानाच...

टिम मेचा बॉल क्रीजमधून पुढे सरसावत गॅटींगने लाँगऑनला उचलला...
लाँगऑन बाऊंड्रीवर असलेल्या स्टीव्ह वॉने कॅच घेतला खरा पण...
बाऊंड्रीच्या अगदी जवळ असलेल्या वॉला आपलाबॅलन्स सांभाळता आला नाही...
त्याचा पाय बाऊंड्रीच्या पार पडला!
गॅटींग आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतण्याऐवजी त्याला सिक्स मिळाली!

हे कमी होतं म्हणून की काय, ओडोनेलच्या पुढच्या ओव्हरमध्ये गॅटींगला रनआऊट करण्याच्या प्रयत्नात बॅकवर्ड पॉईंटवरुन केलेला डीन जोन्सचा थ्रो बाऊंड्रीपार गेल्याने इंग्लंडला ओव्हरथ्रोच्या चार रन्स फुकट मिळाल्या!

गॅटींग - अ‍ॅथी यांनी १७ ओव्हर्समध्ये ६८ रन्सची पार्टनरशीप केली होती. ३१ ओव्हर्समध्ये इंग्लंडचा स्कोर होता १३५ / २! शेवटच्या १९ ओव्हर्समध्ये इंग्लंडला मॅच जिंकण्यासाठी ११९ रन्सची आवश्यकता होती. व्यवस्थित सेट झालेला गॅटींग ऑस्ट्रेलियन बॉलर्सना फटकावत होता. त्यातच वर्ल्डकपमध्ये जोरदार फॉर्ममध्ये असलेला अ‍ॅलन लॅम्ब अद्याप बॅटींगला आलेला नव्हता!

मॅच ऑस्ट्रेलियाच्या हातातून निसटत चालली होती...
नेमक्या याच वेळी टिम मेच्या जागी स्वतः बॉर्डर बॉलिंगला आला!

बॉर्डरचा पहिलाच बॉल लेगस्टंपच्या बाहेर पडला...
गॅटींगने खाली वाकत दिशेने रिव्हर्स स्वीप मारण्याचा पवित्रा घेतला...
बॉल गॅटींगच्या अपेक्षेपेक्षा किंचित जास्तं बाऊंस झाला...
... आणि बॅटची एज घेऊन गॅटींगच्या खांद्याला लागून उडाला..
विकेटकीपर ग्रेग डायर इतका चकीत झाला की त्याने जवळजवळ कॅच सोडलाच होता!

४५ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि टिम मेला मारलेल्या सुदैवी सिक्ससह गॅटींगने ४१ रन्स फटकावल्या.
ऑस्ट्रेलिया १३५ / ३!

इंडीपेंडंट मधल्या आपल्या लेखात मार्टीन जॉन्सन म्हणाला,
"The reverse sweep itself, especially the way Gatting plays it, is a perfectly legitimate one, whatever the views of Peter May. However, to attempt it to Border's first ball was more than a little startling. Thanks to a thickish edge (and in the opinion of some observers, a thickish head as well) the ball plopped into the wicketkeeper's gloves, and the England chairman - watching from the VIP box - very probably laid an egg."

गॅटींग परतल्यावर आलेल्या अ‍ॅलन लॅम्बनेही सुरवातीपासूनच आक्रमक फटकेबाजीचा मार्ग अवलंबला होता. परंतु दुसर्‍या बाजूला अ‍ॅथी मात्रं पूर्वीप्रमाणेच रखडत होता. या दोघांनी ८ ओव्हर्समध्ये ३५ रन्स जोडल्यावर...

ब्रूस रीडचा बॉल अ‍ॅथीने मिडऑन आणि मिडविकेटच्या मध्ये फ्लिक केला आणि २ रन्स पूर्ण केल्या...
बाऊंड्रीपासून जवळपास दहा - पंधरा यार्डांवर स्टीव्ह वॉने बॉल पिकअप केला...
लॅम्ब तिसरी रन घेण्यासाठी धावत सुटला पण अ‍ॅथी...
स्टीव्ह वॉचा थ्रो कलेक्ट करुन रीडने बेल्स उडवल्या तेव्हा अ‍ॅथी क्रीजपासून किमान दोन - तीन मीटर दूर होता!

१०३ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह अ‍ॅथीने ५८ रन्स काढल्या.
ऑस्ट्रेलिया १७० / ४!

अ‍ॅथी आऊट झाल्यावर लॅम्ब आणि विकेटकीपर पॉल डाऊन्टन यांनी १८ रन्स जोडल्या. बॉर्डरच्या बॉलवर डाऊन्टनने मारलेला स्वीप टॉप एज झाला, पण स्क्वेअरलेगला मॅकडरमॉटला हा कठीण कॅच घेता आला नाही. बॉर्डरच्या पुढच्याच ओव्हरमध्ये मात्रं लाँगऑफ बाऊंड्रीवर सायमन ओडोनेलने डाऊन्टनचा कॅच घेतला. इंग्लंड १८८ / ५!

अद्याप ८ ओव्हर्समध्ये इंग्लंडला ६६ रन्सची आवश्यकता होती!

डाऊन्टन परतल्यावर बॅटींगला आलेल्या एम्बुरीने लॅम्बला जास्तीत जास्तं स्ट्राईक देण्याचा मार्ग पत्करला. लॅम्बची फटकेबाजी सुरुच होती. बॉर्डर - स्टीव्ह वॉ दोघांनाही त्याने बाऊंड्री तडकावल्या. लँम्ब - एम्बुरी यांनी ४ ओव्हर्समध्ये ३० रन्सची पार्टनरशीप केली. लॅम्ब क्रीजमध्ये असेपर्यंत इंग्लंडच्या विजयाच्या आशा कायम होत्या, पण स्टीव्ह वॉचा बॉल पूल करण्याच्या नादात लॅम्बचा ऑफस्टंप उडाला! ५५ बॉल्समध्ये ४ बाऊंड्रीसह लॅम्बने ४५ रन्स फटकावल्या. लॅम्ब आऊट झाल्यावर जेमतेम २ रन्सची भर पडते तोच मिडविकेटवरुन डेव्हीड बूनच्या थ्रोमुळे एम्बुरी रनआऊट झाला. इंग्लंड २२० / ७!

शेवटच्या १६ बॉल्समध्ये इंग्लंडला अद्याप ३४ रन्स हव्या होत्या!

मॅकडरमॉटच्या तिसर्‍या बॉलवर फिलीप डिफ्रीटासने एक्स्ट्राकव्हरला बाऊंड्री मारली...
चौथा बॉल गुडलेंग्थवर पडला आणि डिफ्रीटासने लाँगऑनला प्रेक्षकांमध्ये तडकावला!
पाचवा बॉल लेगस्टंपवर पडलेली हाफव्हॉली होती...
डिफ्रीटासने ती मिडविकेट बाऊंड्रीला फटकावली!

डिफ्रीटासच्या या अनपेक्षित फटकेबाजीने इंग्लंडच्या आशेला पुन्हा नवी पालवी फुटली!

शेवटच्या २ ओव्हर्समध्ये इंग्लंडला १९ रन्सची आवश्यकता होती!

स्टीव्ह वॉच्या पहिल्या दोन बॉलवर डिफ्रीटासला काहीच करता आलं नाही...
तिसरा बॉल डिफ्रीटासने मिडऑफवर उचलला, पण स्टीव्ह वॉच्या त्या सुप्रसिद्ध स्लो बॉलमुळे डिफ्रीटासचा शॉट हवेत गेला...
लाँग ऑफ बाऊंड्रीवर लंबूटांग ब्रूस रीडने आरामात त्याचा कॅच घेतला!
इंग्लंड २३५ / ९!

शेवटची ओव्हर सुरु झाली तेव्हा इंग्लंडला अद्यापही १७ रन्स हव्या होत्या!

मॅकडरमॉटला १७ रन्स फटकावणं हे नील फोस्टर आणि ग्लॅडस्टन स्मॉल या दोघांच्या आवाक्याबाहेरचं होतं पण...
क्रिकेटसारख्या बेभरवशाच्या खेळात काहीही अशक्यं नसतं!
ऑस्ट्रेलियन खेळाडूंना याची पुरेपूर कल्पना होती!

जेफ मार्शने मॅकडरमॉटला बजावलं,
"Billy, Just don't bowl a no-ball!"

मॅकडरमॉटच्या शेवटच्या ओव्हरमध्ये फोस्टर आणि स्मॉल यांनी आकांती प्रयत्न करुनही त्यांना केवळ ९ रन्स काढता आल्या...

ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला!

माईक व्हॅलेटा म्हणतो,
"Last ball was hit to me. I fielded and threw it back to Greg Dyer. That was bit foolish. Should have just held on to it. Or let it go through for four and then picked it up. Should have kept the ball. In the end, as you know, people were grabbing stumps and bails. Steve Waugh actually grabbed me a bail."

स्टीव्ह वॉ म्हणतो,
"The game was in the balance with probably two overs to go. I remember bowling late in the innings and feeling under enormous pressure but also enjoying the experience. I knew if I bowled a couple of good overs, we could win the game. So for me as a cricketer, it was a great, joyous occasion. We didn't expect to really win it, in India, so in the end it was amazing. We got some momentum and went all the way. Of all the World Cups I played in, that one in India was really a dream."

डेव्हीड बूनची मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली तरी माईक व्हॅलेटाच्या फटकेबाज इनिंग्जमुळेच ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकता आला असं बहुतेकांचं मत होतं.

स्टीव्ह वॉ म्हणतो,
"Boonie scored 75 and laid the foundation, but it was Valetta’s cameo which made the difference in the end."

भारताविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये एडी हेमिंग्जच्या बॉलवर मिडविकेट बाऊंड्रीवर कपिलचा कॅच घेतल्यावर मॅचनंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये गॅटींग म्हणाला होता,
"It was silly stroke under such circumstances!"

फायनलमध्ये स्वतः गॅटींगने त्याच्या वरताण मूर्खपणाचं प्रदर्शन करुन वर्ल्डकप जिंकण्याची संधी घालवली!

क्रीडालेख

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

13 Feb 2017 - 10:05 am | गॅरी ट्रुमन

अजून एक जबरदस्त लेख.

भारताचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर फायनल बघायचा उत्साहच राहिला नव्हता. तो सामना बघितला होता पण या सामन्याच्या विशेष आठवणी नाहीत.

असो. आता १९९२ च्या विश्वचषकावरील लेखांची वाट बघत आहे,

अत्रुप्त आत्मा's picture

13 Feb 2017 - 11:20 pm | अत्रुप्त आत्मा

येकदम झका.... स !