माझ्या लहानपणी, म्हणजे साधारण ऐंशीच्या दशकात कधीतरी टीव्हीवर मला एका नव्या दुनियेचा शोध लागला. टीव्हीतल्या डॉक नावाच्या एका सुतार काकांच्या घरात असलेल्या एका बिळात एक अनोखी दुनिया वसल्याचं मला समजलं जिचं नाव होतं "Fraggle Rock". तिथे राहत होते फ्रॅगल्स. डॉक काकांना फ्रॅगल्सचं अस्तित्त्व माहितच नव्हतं पण त्यांचा पाळीव कुत्रा स्प्रॉकेट सतत त्यांना ते सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करायचा.
या फ्रॅगल्स पैकी गोबो, मॉकी, रेड, बूबर आणि विम्ब्ली मला आमच्यापैकीच एक वाटायची. ते आनंदात गाणी म्हणायचे, दु:खात गाणी म्हणायचे, गोष्टीत गाणी म्हणायचे आणि शिकताना-शिकवतानाही गाणी म्हणायचे.